लोकल डायरी -- ११

Submitted by मिलिंद महांगडे on 29 April, 2015 - 13:54

http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html --- लोकल डायरी -१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html --- लोकल डायरी - २
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html --- लोकल डायरी - ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_8.html --- लोकल डायरी - ४
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_10.html --- लोकल डायरी - ५
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html --- लोकल डायरी - ६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html --- लोकल डायरी - ७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html --- लोकल डायरी ८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html --- लोकल डायरी ९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html --- लोकल डायरी १०

" नाव … ? "
" मॅगी "
" आडनाव …. ? "
" डिसूजा "
" वय …. ? "
" २४ वर्षे .... आयला हे काय आहे ? काय चाल्लय ? " शरद वैतागला.
" अरे काय यार .... तिसऱ्या प्रश्नालाच वैतागलास ...? हे बघ माझ्याकडे प्रश्नांची लिस्टच आहे " सावंत २० - २५ प्रश्नांची मोठी लिस्ट दाखवत म्हणाले . काल ठरल्याप्रमाणे सगळी प्लॅनिंग झाली की शरद आपल्या प्रेमासाठी मरण पत्करणार होता . आणि त्यासाठी आम्हाला मॅगीची खडा न खडा माहिती हवी होती . त्यात ती सकाळी घरातून किती वाजता निघते ...? स्टेशनला यायला किती वेळ लागतो ...? कोणत्या बाजूने ती स्टेशन मधे येते ..? वगैरे वगैरे बरेच प्रश्न होते . मला तर आतून गुदगुल्या झाल्यासारख्या वाटत होत्या . आम्ही एखादं सिक्रेट मिशन वगैरे करतोय की काय ? असं वाटत होतं .
" शरद नीट व्यवस्थित उत्तरं दे ... ते तुझ्यासाठी चांगलं आहे ... " मी गंभीर चेहरा करुन म्हणालो .
" माझ्यासाठी चांगलं आहे म्हणजे ? असं काय करणार आहात तुम्ही ...? हट , मला नाही ही फालतुगिरी करायची ...!"
" थांब शरद , एकच मिनिट थांब ... तुझं मॅगी वर खरं प्रेम आहे ? " भरतने विचारलं . त्यावर त्याने नुसती मान हलवली
" तुला खरंच तिच्याशी लग्न करायचंय ? " मी विचारलं
" हो ... " शरद निश्चयाने म्हणाला .
" मग आम्ही सांगतो तसं आणि फक्त तसंच कर ..." सावंत अशा काही टोन मधे म्हणाले की शरद शांतपणे उभा राहिला . आज आमचा सगळा ग्रुप लवकरच प्लॅटफॉर्म वर आला होता . आज शरद आम्हाला मॅगीशी ओळख करुन देणार होता ... ओळख करुन देणार म्हणजे तो लांबुनच दाखवणार होता . तसा लोकलला आणि तिलाही यायला बराच वेळ असल्यामुळे आम्ही शरदला सावंतांनी ख़ास तयार करुन आणलेले प्रश्न विचारत होतो . जेणेकरुन आम्हाला पुढचं प्लॅनिंग करता येईल .… काल जिग्नेसने गमतीगमतीत ट्रेन खाली जीव देण्याच्या धमकीची आयडिया शरदला दिली आणि इथून ह्या सगळ्या महाभारताची सुरुवात झाली . सावंतांनी त्यावर विचार करुन लगेच एक योजनाही बनवली. ते लगेच आम्हाला सांगणार नव्हते . पण नक्की काहीतरी भन्नाट असणार !!!
" ठीक आहे चालू दया तुमचं ..." शरद नाईलाजाने म्हणाला . आम्ही आणखी काही प्रश्न विचारले त्याची त्याने शहाण्या बाळासारखी उत्तरे दिली . आम्ही त्याची ही तोंडी परीक्षा घेत असताना अँटी व्हायरस प्लॅटफॉर्मवर आलेली मला दिसली . तिने पूर्ण बाह्यांचा पट्टया पट्टयांचा टॉप आणि डेनिम जीन्स घातली होती. गळ्याला रेशमी स्कार्फ गुंडाळलेला होता . तो तिच्या टॉप वर शोभून दिसत होता . मी मुद्दामच मग तिच्याकडे पाठ करुन उभा राहिलो . आता तिच्यापासून लांब राहणेच योग्य ...! शरदचं तिच्याशी काहीही नसलं तरी दूसरा कोणीतरी, तिचा होणारा नवरा होताच ना ..! चकचकित महागड्या दुकानात काचेच्या पलीकडे असलेल्या वस्तु फक्त बघत राहाव्यात तशी माझी अवस्था झाली होती . तिने बहुदा आमच्या ग्रुपकडे एकदा नजर टाकली असावी , कारण आमच्या प्रश्नांची उत्तरे देता देता शरदने तिच्याकडे बघुन ओळखीचं हसल्यासारखं केलं . मी मागे वळून न बघण्याचा केलेला निश्चय उन्हात ठेवलेल्या बर्फासारखा वितळला... आणि मी तिच्याकडे पहिलं . तिने मला हाताने ' हाय ! ' अशी नाजुक खुण केली . माझाही हात आपोआप वर झाला . नशीब त्या वेळी सावंत प्रश्न विचारण्यात आणि शरद उत्तर देण्यात दंग होता . तरी भरतने मला तसं करताना पहिलंच...! त्याने भुवया उडवून मला ' काय चाल्लय ? ' अशा अर्थाचं नजरेनेच गमतीत खुणावलं ... मी त्याला ' काही नाही ' असं खुणावलं ... तर तो माझ्याकडे बघत मिश्किलपणे गालातल्या गालात हसला .
" अरे ती बघ , आलीच मॅगी... ! " शरद तिच्याकडे बघत म्हणाला .
" कुठंय ...? कुठंय ...? " आम्ही सगळे एकदमच इकडे तिकडे बघू लागलो .
" येड्यासारखे करू नका रे ... शांतपणे माझ्या डाव्या बाजूला पहा . आकाशी रंगाचा टॉप आणि जीन्स घातलेली मुलगी येतेय ना तीच मॅगी आहे. " शरद आम्हाला दबक्या आवाजात सांगत होता .
आम्ही पाहिलं , तिचं नाव मॅगी का असावं ह्याचं उत्तर तिच्याकडे बघुनच आम्हाला कळलं , तिचे केस मॅगी नूडल्ससारखेच कुरळे होते . आणि ते मोकळे सोडलेले केस तिला शोभतही होते . गळ्यात सोन्याच्या क्रॉस होता . गोरी म्हणता येणार नाही पण तिचा सावळा रंग तिला शोभून दिसत होता . चालताना ती नाकासमोर चालत होती . तशी नाकी डोळी चांगली होती ती ! एकूणच शरदला शोभेल अशीच होती . ती आमच्या बाजूने चालत गेली . आम्ही तिच्याकडे बघतोय हे तिच्या लक्षातही आलं नसेल.
"ओके , टारगेट स्पॉटेड...! शरद तुम्हारा चॉईस अच्छा है ..." नायर अंकलनी कॉम्प्लीमेंट दिली
" बरं , आता आपल्याला आणखी 2-3 दिवस तिचं ऑब्ज़र्वेशन करावं लागेल . त्यानंतर आपल्याला प्लॅन एक्जीक्यूट कधी करता येईल ते ठरवावं लागेल. " सावंत म्हणाले .
" सावंत एक विचारु का ...? तुम्ही नक्की कसला प्लॅन करताय ...? मला टेंशन यायला लागलंय ... " शरद कसंनुसं तोंड करत म्हणाला .
" काय नाय रे ... तू टेंशन घेऊ नको ... सगळं नीट होईल... " सावंत त्याला समजावत म्हणाले . गाडीची अनाउन्समेंट ऐकायला आली , पाठोपाठ गाडीचा हॉर्न वाजला . लगेच गाडी प्लॅटफॉर्मला लागली सुद्धा ! आम्ही आपापल्या जागा पकडल्या . पण उल्हासनगरहुन काही लोक डाऊन करुन आल्याने मी आणि भरत उभे राहिलो , आणि बाकीच्यांना बसायला जागा दिली . अँटी व्हायरस समोरच उभी होती . तिने नेहमीप्रमाणे कानात एअर फोन घातले आणि गाणी ऐकत उभी राहिली . तिने एकदा माझ्याकडे पहिलं आणि स्माईल केलं . मीही तिला प्रतिसाद दिला . थोड्या वेळाने भरत माझ्या कानापाशी आला अन म्हणाला , " कोण आहे रे ती ? " मी उडालोच ! पण जास्त काही आश्चर्य न दाखवता , " कोण रे ? "असं विचारलं . त्यावर तो म्हणाला , " तीच रे मघाशी तुला हाय करत होती ती आणि आत्ता स्माईल दिलं ती ...? " त्याच्या विचारण्यात ' कसं पकडलं ! ' असा भाव होता . मी काहीतरी सांगायचं म्हणून बोललो ," अरे ती होय ... ती अशीच ओळखीची आहे ... "
" ओह ...! अशीच ओळखीची का ... बरं... बरं ..." तरी तो माझ्याकडे पाहून मिश्किलपणे हसत होता . त्याला काय घ्यायचा तो अर्थ त्याने घेतला होता . त्यामुळे मी त्याला जास्त काही समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही . मधे थोडा वेळ गेला . आणि लेडीज कंपार्टमेंटमधून मोबाईलची रिंग वाजली . माझं सहज लक्ष गेलं तर अँटी व्हायरस इअर फोनचा माईक तिच्या ओठांजवळ नेऊन बोलत असलेली मी पाहिली . मला अचानक भरतची आठवण झाली , तो लिप रीडिंग करण्यात पटाईत आहे हे मागे त्याने दाखवून दिलं होतं . आता मी पुढचा मागचा विचार न करता त्याला खूण केली .
" ती समोरची मुलगी फोन वर काय बोलतेय ते सांगू शकतोस ... प्लीज ...? " मी अवघडलेल्या चेहऱ्याने त्याला विचारलं .
" अरे , अशीच ओळखीची आहे ना ... मग ... कशाला पाहिजे तुला ....? " विजयी मुद्रेने त्याने मला टोमणा मारला
" प्लीज यार , तुला सांगतो नंतर ... प्लीज ...."
"ओके ... ओके... लेट मी कॉन्संट्रेट ...." म्हणत तो बारकाईने तिच्याकडे पाहू लागला . ती बराच वेळ फोनवर बोलत होती . तिच्या निरीक्षणाचे काम मी भरतवर सोपवून सावंत आणि शरदची चर्चा ऐकू लागलो .
" आपण परवाची डेट फायनल करु , काय बोलतो ...? सावंत म्हणाले .
" इतक्या लवकर ? तुम्ही ऑब्जर्वेशन की काय ते करणार होतात ना ? " मरण इतक्या जवळ म्हणजे परवावर येईल असं शरदला वाटलं नसावं .
" उद्याचा दिवस आहे त्यासाठी . आजचं टायमिंग मी नोट केलंय . " सावंत हातातला पेपर दाखवत म्हणाले .
" आणि समजा परवा ती ट्रेनला आलीच नाही तर ...? " शरद आता कसल्याही शंका काढायला लागला . मी मधेच अँटी व्हायरसकडे पहिलं , ती अजुनही फोनवरच बोलत होती . भरत इमाने इतबारे त्याचं काम करत होता.
" तुम इतना डरता कायको है ? प्यार किया तो डरना क्या ? " नायर अंकल मधेच पेटले.
" अंकल वो डरता नहीं ... जो डरता नहीं उसीको शरद भाय बोलते है !!!" जिग्नेस त्याला झाडावर चढवत होता .
" साले तेरी बजेसे ये सब हो रहा है .... फुकट में मुझको मरवाया ..." शरदने त्याच्या पाठीत एक बुक्का मारला .
" त्याला कशाला मारतोस यार ... बरं जाऊ दे ... तुला नको असेल तर आपण नको करुयात हे सगळं ... उगाच कुणाला दोषी नको ठरवायला ..." सावंत म्हणाले .
" बास काय सावंत , गमतीने म्हणालो मी असं , जिग्नेस और मेरा तो ऐसेही चलता है ...क्या जिग्नेस ...? म्हणत त्याने आधीच बारीक असलेले जिग्नेसचे गाल ओढले . सगळे हसले . मी भरतकडे पहिलं तर त्याचं निरिक्षण अजूनही चालू होतं . इतकी काय बोलत असावी ती फोनवर ? तिच्याकडे बघुन मला कसलाच अंदाज बांधता येईना . अखेर बोलणं झाल्यावर तिने फोन ठेवला . मी भरतकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिलं . त्याचा चेहरा गंभीर झाला होता .
" काय रे ? " मी हळू आवाजात त्याला विचारलं . त्यावर त्याने मला कान त्याच्याकडे करायला सांगितला .
" तिचा नाद सोड , ती तिच्या मैत्रीणीशी बोलत होती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल ...! " एखादी दुखःद बातमी सांगावी तसा भरत मला सांगत होता .
" मला माहीत आहे , पुढे बोल ..." मी असं म्हटल्यावर त्याने अविश्वासने माझ्याकडे पाहिलं .
" तुला माहीत आहे हे ? "
"हो .... पण ती इतका वेळ फोनवर काय बोलत होती ते सांग ना ..."
" तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगत होती . तो कसलंही कारण काढून तिच्याशी भांडतो ... सारखा तिच्यावर संशय घेतो , स्वतः ऑफिसच्या मुलींबरोबर ट्रेकला , फिरायला जातो ... आणि ती कोणाशी बोलली तरी त्याला राग येतो . वगैरे वगैरे .... तो पूर्वी असा नव्हता . लग्न ठरल्यापासून तो तिला त्याची मालकी समजायला लागलाय ... असं बरंच काही बोलत होती "
" ओके ... " मी म्हणालो . डोक्यात तिचाच विचार होता .
" आणखी... एक गोष्ट सांगायची राहिली ... " भरत अडखळत म्हणाला .
" काय ? " काहीतरी अनपेक्षित ऐकायला मिळणार याचा मला अंदाज आलाच .
" तिची एंगेजमेंटची तारीख ठरली आहे . बहुतेक पुढच्याच आठवड्यात २७ ला ...! "

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy