काकडीचं थालिपीठ

Submitted by मृण्मयी on 24 April, 2015 - 15:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मोठ्या काकड्या. (पिकल क्यूकंबर्स असतील तर ६ चा एक अख्खा ट्रे)
मीठ
तिखट
हळद
चिमुटभर ओवा
चमचाभर तीळ
धणेपूड
बारीक चिरलेली कोथिंबीर
बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या
कणीक किंवा मिक्स्ड ग्रेन आटा (प्रमाण कृतीत)
तेल

क्रमवार पाककृती: 

-काकड्यांची सालं सोलून काकड्या (किसणीच्या मोठ्या छिद्रांमधून) किसून घ्यायच्या.
-साधारण ५ मिनिटं मोठ्या गाळणीवर ठेवून पाणी गळू द्यायचं. कीस पिळायचा नाही.
- किसात आता पीठ सोडून, बाकी सगळे घटक घालून, हलक्या हातानं मिसळून घ्यायचे.
- या मिश्रणात, व्यवस्थीत घट्टं गोळा होईल इतपत पीठ घालायचं.
- एकीकडे तवा तापत ठेवायचा.
- २-३ मिनिटांत थालिपिठं लावून, तेल घालून, खरपूस भाजायची.

kaakaDicha-thaalipeeTh-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांना एकवेळ पोटभर होतात.
अधिक टिपा: 

-मिश्रणात चमचाभर तांदळाचं पीठ घातलं तर थालिपिठं कुरकुरीत होतात.
-फार बियाळ काकड्या नकोत.
-यात पीठ पडणार आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार बर्‍यापैकी तिखट-मीठ घालायचं.
-थोडं गाजर किसून घातलं तर थालिपीठ देखणं होतं.

माहितीचा स्रोत: 
आई
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतायत.
मी मध्यंतरी केप्रची भाजणी झणझणीत असते म्हणून कांद्याबरोबर्‍ काकडीही घातलेली. कधीतरी कोबी, गाजरही घालते.

मस्तच .. Happy

माझी आज्जी करायची अशी सेम थालीपाठं .. एकदम चविष्ट .. मला वाटलं मी जुन्या मायबोलीत रेसिपी लिहीली होती पण आता काही सापडली नाही ..

मागच्या वेळेला काकड्यांत पाणी तरी फार होतं किंवा माझं काहितरी गडबडलं पण फार ओली, चिकट झाली आणि धड थापायलाही जमेना .. मग त्यानंतर परत केली गेली नाहीत ..

आता नव्या दमाने करून बघते परत .. Happy

भारी होतात. अशीच कोबीची पण आवडतात. ओवा भरपूर घालायचा.
असेच काकडीच्या किसात, गूळ आणि तांदळाचं पीठ घालून गोड घावन पण मस्त लागतात.

थँक्यू! Happy

डीजेचं थालिपीठ बघून मला मी केलेलंच गिळवत नाहीये. Proud खरोखर खमंग दिसतंय.

>>धिरडी पेक्षा घट्ट आणि थालीपीठापेक्षा मऊ
परफेक्ट! काकडीचा कीस गच्चं पिळून घ्यायचा नाही. अश्या न पिळलेल्या किसात पीठ घालून घट्टं भिजवल्यावरही २-३ मिनिटांत गोळा बर्‍यापैकी मऊ पण थापण्याइतपत मॅनेजेबल होतो.

सा.बा.हे करतात. पण काकडीचा कीस थोडा शिजवून घेतात म्ह्णजे पिठात मिळून येतो हा कीस. तसेच पीठ म्हणजे थालीपीठाची भाजणी घेऊन करतात.

असेच गोड थालीपीठही छान लागते, काकडीच्या कीसात गूळ घालून शिजवायचे आणि भाजणीच्या पीठात मिक्स करायचे.

मस्त रेसिपी. मी पण काल काकडीऐवजी कलिंगडाचा पांढरा गर किसून केली. चांगली झाली होती.
Thalipeeth.jpg

मस्त

काकडीचं थालिपिठ मस्त. मी सुद्धा करते हे भाजणी संपली असेल तर. मऊसरच भिजलं जातं याचं पिठ.

कणकेत लाल भोपळा किसूनही छान लागतं थालीपीठ.

मस्त झालेत, मी तान्दळाच पीठ आणी थोड भाजणिच पिठ घातल.

(फोटो काढताना कॅमेरा हलल्याने क्लिअर नाहि आलाय, )resize thalpith.jpg

धन्यवाद मंडळी.

लाल भोपळ्याचं थालिपीठ विसरूनच गेले होते. आणलेल्या भोपळ्याचं आता थालिपीठ. धन्यवाद शर्मिला!

>>कलिंगडाचा पांढरा गर किसून
कधी केली किंवा खाल्ली नाहीत. पांढरा गरही कधी खाल्ला नसल्यामुळे चवीची कल्पना आली नाही. Happy

प्राजक्ता, थालिपिठाचीच भाजणी घातलीय का? इतकी मौल्यवान भाजणी काकड्यांमध्ये मिसळायचा धीर होत नाही. Proud

थालिपिठाचीच भाजणी घातलीय का?>> नाही नाही! चकलीची घातलीय, चमचाभरच घातलिये., ताद्ळाच्या पीठाने कुरकुरीत होतात मस्त.

गेल्या विकांताला दुर्वांकुर मध्ये साईड्-डिश म्हणून थालीपीठ होतं. उच्च लागत होतं लोणी लावलेलं थालीपीठ. छान पातळ थापलेलं, कडेनी कुरकुरीत झालेलं; गरमगरम!
सोबत थंडगार घरगुती पद्धतीची काकडीची दह्यातली कोशिंबीर. बाकी चटण्या/ लोणची होतीच. Happy

आज काकडी थालीपीठ केले होते या पद्धतीने.. फक्त कांदा ही घातलेला..कारण तो मस्ट आहे आमच्याकडे.. खूपच सही टेस्ट झालेली.
तांदूळ पीठीची आयडिया सही आहे. आणि ज्वारी च पीठ वापरले भाजाणी ऐवजी.

Back to top