गप्पा २ - सेलेब्रेटी लूक आणि किस्सा क्रिकेटचा

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 April, 2015 - 15:58

..

वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत मी जेवणे, खाणे, लिहिणे, वाचणे, नाचणे, गाणे, टाळ्या वाजवणे... आणि हो, क्रिकेट खेळणे देखील,.. फक्त आणि फक्त उजव्या हाताने करायचो. मग ती फलंदाजी असो वा गोलंदाजी, वा क्षेत्ररक्षणात सूर मारून चेंडू अडवत थ्रो करणे.. सारे काही उजवा हात जगन्नाथ!

डावा हात हा केवळ डोळ्यांवर येणारी केसांची झुलपे मागे सारण्यासाठीच असतो यावर माझा ठाम विश्वास होता. वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत!..

.... आणि मग पंधराव्या वर्षी, अचानक एके दिवशी,
मी डाव्या हातात बॅट पकडत गल्ली क्रिकेटमधील नावाजलेल्या अन निर्ढावलेल्या वेगवान गोलंदाजांचा मारा झेलण्यास सज्ज झालो. हो, अ‍ॅक्चुअली!, वेडेपणा म्हणा वा धाडस, मी उन्हाळी सुट्ट्यांमधील क्रिकेटचा एक अख्खा सीजन आणि त्यानंतरही काही काळ म्हणजे जवळपास सहा ते आठ महिने डावखुरी फलंदाजी करत होतो., करायचा प्रयत्न करत होतो.

पण का? कशाला? काय सिद्ध करायचे होते मला?

तर, विशेष काही नाही, याचे उत्तर होते दादा ..
उर्फ सौरव चंडिदास गांगुली..!

कोवळी मिशी फुटायच्या वयात अचानक माझ्या मित्रांना माझ्या चेहर्‍यात दादा गांगुलीची झलक दिसू लागली आणि मला आधीपासूनच आवडणारा दादा आता प्रचंड आवडू लागला. त्याने केलेली प्रत्येक धाव मीच करतोय असे वाटू लागले. सामना जिंको न जिंको त्याचे शतक व्हावे असे वाटू लागले. मित्र मला ‘दादा दादा’ बोलू लागले आणि त्यामुळे खुद्द दादाचे यशस्वी होणे साहजिकच माझाही भाव उगीचच्या उगीच वधारू लागले.

दादाची कप्तानी पुर्ण भरात असल्याने, आणि सचिनच्या जोडीने तो देखील वीस-बावीस शतके बनवत लिजेंड समजला जाऊ लागल्याने, आपले दादासारखे दिसणे हे आपले उघडलेले नशीब आहे यावर माझा एव्हाना ठाम विश्वास बसला होता. काहीही स्वकर्तुत्व न दाखवता मिळालेली चमकायची संधी मला गमावायची नव्हती. आरश्यात बघतानाही मी आता कोणत्या अ‍ॅंगलमधून दादासारखा जास्त दिसतो हे शोधू लागलो, तर चेहर्‍यावर कसे एक्स्प्रेशन बनवले तर मी त्याचा जास्तीत जास्त त्याचा डुप्लिकेट वाटेल याची मिरर प्रॅक्टीस करू लागलो. एवढेच नव्हे तर क्रिकेट खेळतानाही मी त्याच्या छोट्यामोठ्या स्टाईली कॉपी करू लागलो. रबरी किंवा टेनिस चेंडूवर खेळतानाही जणू सीजन चेंडू ने खेळतोय या आविर्भावात त्याच्या सारखा स्टान्स घेऊन उभा राहू लागलो. कमी वेगाची अंडरआर्म गोलंदाजी खेळताना त्याच्यासारखे पुढे सरसावत चेंडू हवेत भिरकाऊन द्यायला बघू लागलो. गोलंदाजीत देखील दोन्ही हात छातीशी कवटाळत त्याच्यासारखा रन अप घेऊ लागलो. तर फलंदाजीत एखादा चेंडू मनासारखा फटकावता आला नाही तर त्याच्यासारखे डोळे मिचकाऊ लागलो. फरक इतकाच तो एखादा वेगवान बाऊन्सर झेलून मिचकवायचा तर मी उगाच एखादा लूज बॉल सुटला तरी मिचकाऊ लागलो.

काहीही असो, त्याचे हावभाव आणि फलंदाजीची शैली मला डिट्टो जमू लागलीय याची पावती हळूहळू मला मित्रांकडून मिळू लागली, माझा हुरूप वाढू लागला.. आणि ती नक्कल आणखी पर्रफेक्ट वाटायला म्हणून मी एके दिवशी बॅट उलट्या हातात पकडली!..

त्या वयात एक फलंदाज म्हणून मी फार काही तीसमारखां नव्हतो, त्याचबरोबर बरेचसे क्रिकेट दोन ईमारतींमधील गल्लीतच खेळायचे असल्याने चौफेर टोलेबाजी करायची नव्हती. त्यामुळे या डावखुर्‍या फलंदाजीच्या नादात माझ्यातील गुणवत्तेचे नुकसान व्हावे अश्यातला भाग नव्हता. पण यात माझी नैसर्गिक हालचाल होत नसल्याने शरीराला इजा पोहोचू नये म्हणून जपावे मात्र लागायचे.

अर्थात यावरही मी उपाय शोधला होता. जे चेंडू शरीराच्या जवळ येतील त्यांना सरळ बॅट म्यान (बॅटमॅन नव्हे) करत ईज्जत द्यायची, अन्यथा आपलाच बाईज्जत बळी जायची शक्यता होती. जे चेंडू शरीरापासून दूर पडायचे त्यांना मात्र मुक्तहस्ते टोलवायचो. फावल्या वेळात बॅट डाव्या हातात घेत दांडपट्टा फिरवल्यासारखे मी याचाच सराव करत राहायचो. माझे हे डावपेच फार काही लपून राहिले नव्हते, गल्लीतल्या चाणाक्ष पोरांनी ते हेरले होते. पण सहाच्या सहा चेंडू किंवा किमान त्यातील तीन तरी यष्टींचा अथवा माझ्या शरीराचा वेध घेणारे टाकावेत एवढी अचूकता एकाच्याही गोलंदाजीत नव्हती. त्यामुळे तितकीही भिती बाळगण्याची गरज नव्हती. पण एकेकाच्या गोलंदाजीचा वेग तेवढा अफाट होता. कारण गल्ली क्रिकेट म्हटले की गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनबाबत असलेले सारे आंतरराष्ट्रीय नियम धाब्यावर बसवून गोलंदाजी ‘फेकली’ जायची.. आणि याच वेगाने एक दिवस घात केला!

तर, तो भयानक दिवस आजही आठवतो.. आणि आठवतो तो प्रसंग जो माझ्या डावखुर्‍या फलंदाजीचे भूत उतरवायला कारणी भूत ठरला.

ब्राईट सनी डे! ईतरांसाठी रविवारची सुस्तावलेली दुपार. पण आमच्यासाठी क्रिकेट खेळायची आदर्श वेळ. खेळ ऐन रंगात आला होता. आज आम्ही आपापसात खेळत नव्हतो तर दुसर्‍या गल्लीतल्या पोरांशी पैसे लावून ठरवलेला सामना होता. समोरच्यांची फलंदाजी करून झाली होती. आता आमची पाळी होती, ते टारगेट चेस करायची..

आव्हान बलाढ्य होते. मोठे फटके खेळायची गरज होती. ते देखील सातत्याने. केवळ शरीरापासून दूर असलेलेच चेंडू टोलावणार अश्या अटी आता मी ठेऊ शकत नव्हतो. येणार्‍या प्रत्येक चेंडूला त्याच्या मेरीटचा विचार न करता त्यावर तुटून पडायचे होते. पण मला डाव्या हाताने खेळण्याशिवाय पर्याय नव्हता. याचे एक कारण म्हणजे मला माझी इमेज जपायची होती, पण त्याचबरोबर उजव्या हाताने फलंदाजी कशी करतात हे मी आता पुरते विसरून गेलो होतो. किंबहुना उजव्या हाताने खेळून मी धावा जमवू शकतो हा आत्मविश्वास मी गमावला होता.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलो तेव्हा आधीच कठीण असलेले आव्हान आणखी कठीण झाले होते. ते आणखी अवघड झाले जेव्हा मी दोन चार चेंडू वाया घालवले. कानावर शिव्या ऐकू येत होत्या. नाही, स्लेजिंग नाही. ती प्रतिस्पर्ध्यांकडून होते. या शिव्या आमच्याच तंबूतून येत होत्या. गल्ली क्रिकेटमध्ये जेव्हा वेगात धावा जमवायची गरज असते आणि त्या जमवायला जो कमी पडतो, त्याला अश्याच शिव्यांचा आहेर असतो. अश्यावेळी सरळ विकेट फेकून जायचे असते, येस्स, अगदी हिटविकेटचाही पर्याय उपलब्ध असतो.

अब तो आर या पार.. ही टिपिकल मेंटॅलिटी दाखवत आता पुढे सरसावायचे आणि चेंडूवर तुटून पडत तो पुर्ण ताकदीने भिरकावून द्यायचा.. हाच मार्ग मी अवलंबला, मात्र जराशी गडबड झाली. मी चेंडूवर तुटून पडण्याऐवजी तोच माझ्यावर तुटून पडला. १४० ! एकशे चाळीस पेक्षाही जास्त वेगात तो चेंडू थेट फुल्लटॉस होत माझ्या छातीच्या दिशेने आला. जेव्हा चेंडू टप्पा न पडता फुल्लटॉस अंगावर येतो तेव्हा तो त्याच्या अपेक्षित वेळेपेक्षा आधी पोहोचतो आणि आपला टाईमिंग हमखास चुकतो. माझेही तेच झाले. मी चेंडूला गाठण्याआधीच त्याने मला गाठले. स्वत:ला वाचवायला मी अंग मागे घेतले आणि अंदाजाने बॅट पुढे घातली. पण मुळात मी डावखुरा नसल्याने ते प्रतिक्षिप्त क्रियेसारखे नैसर्गिकरीत्या न होता मी वेडावाकडा वळलो आणि चेंडू थेट माझ्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर बसला. नुसता बसला नाही तर बोटाच्या टोकावर समोरून बसला. जसे रामायण-महाभारतात दोन बाणांची आमनेसामने टक्कर होती तसे बसला. आणि या आघातात अर्थातच माझेच बोट चिरडले गेले.

झिणझिण्या जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जातात तेव्हा एक सुन्नता येते. ती काही काळ अनुभवली. या काळात मी माझे बोट न्याहाळले असता प्रथमदर्शनी जे द्रुष्य दिसले ते मी आयुष्यात विसरू शकणार नाही ईतके ते भयंकर होते. माझे बोट अक्षरशा "एक तृतीयांश" झाले होते!

सर्वसाधारण मानवी बोट जे सांध्यांनी जोडले जात तीन भागात विभागले असते, ते तीन भाग समोरून चेंडू येऊन आदळल्याने सांध्यात तुटून ट्रेन अ‍ॅक्सिडंटमध्ये जसे डब्ब्यावर डब्बे चढतात तसे एकावर एक चढत एकत्र झाले होते. त्यांना सामावून घ्यायला सभोवतालची चामडीदेखील तिच्या क्षमतेबाहर पसरत जवळपास फाटली होती. परीणामी माझे मधले बोट लांबीने अंगठ्यापेक्षा निम्मे आणि नेहमीपेक्षा दुपटी तिपटीने जाड दिसत होते. ताणल्या गेलेल्या चामडीचा कुठल्याही क्षणी विस्फोट होत रक्ताच्या चिळकांड्या उडतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. किंबहुना हे जे वर्णन मी आता करतोय ते तेव्हा मला काहीही सुचत नव्हते. हे नक्की काय झाले म्हणून मी रडवेले होत मित्रांसमोर हात धरला आणि एका मित्राने धिटाई दाखवत पटकन पुढचा मागचा कसलाही विचार न करता माझे बोट खेचून पुर्ववत केले. बोटाचे तीनही भाग यांत्रिकरीत्या आपल्या जागी आले खरे, पण त्यानंतर जी कळ गेली ते चक्कर येऊन मी कोसळलोच. त्यानंतर कोणीतरी पाणी पाजत मला टॅक्सीत कोंबल्याचे आठवतेय. ते थेट सरकारी इस्पितळातच डोळे उघडले.

यापुढचा अनुभव खरे तर "माझे डॉक्टरांचे अनुभव" या सदरात मोडावा, पण थोडक्यात ईथेच सांगतो.

त्या दिवशी रविवार असल्याकारणाने जवळपासचे सर्व दवाखाने बंद होते, म्हणून माझे मित्र मला थेट एका नामांकित सरकारी इस्पितळात घेऊन गेले. अर्थात तिथे हजर असलेले डॉक्टर चांगलेच असणार होते, पण माझेच नशीब पांडू होते जे त्याचवेळी दोन एमर्जन्सी केस आल्या, ज्यातील पेशंट माझ्यापेक्षाही क्रिटीकल अवस्थेत होते, अगदी मरणोन्मुखच होते म्हणा ना. त्यासमोर माझे क्रिकेट खेळताना तुटलेले बोट आता त्या डॉक्टरांसाठी फार दुय्यम आणि क्षुल्लक केस होती. माझा एक्सरे काढायची औपचारीकता पुर्ण करत बोटाला कसल्याश्या चिंध्या गुंडाळून त्यांनी मला परत पाठवले. बहुतेक वेदनाशामक गोळ्या, इंजेक्शनही दिले असावे जे घरी आल्यावर फारसा आरडाओरडा न करता झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी काळेनिळे पडत सुजून टमटमीत झालेले बोट बघून माझ्या मामेभावाने मला नाक्यावरच्या एका कुडबुड्या वैद्याकडे नेले. त्याने बोटाची छान चंपी करत नव्या चिंध्या जोडल्या. अर्थात त्याने काही फरक पडणार नव्हताच. त्यामुळे तिसर्‍या दिवशी नाईलाजाने आईला बोट दाखवत मी परवा क्रिकेट खेळताना काय काशी करून ठेवलीय याची कल्पना दिली.

येस्स! दोन दिवस मी मार पडेल या भितीने ही गोष्ट घरात लपवून ठेवली होती. तिसर्‍या दिवशी सांगूनही अपेक्षेप्रमाणे धपाटा पडलाच. पण त्याचबरोबर एका चांगल्या डॉक्टरकडेही नेण्यात आले. तिथे मात्र फ्रॅक्चरचे योग्य निदान करत त्यांनी बोटाला एक टोपण लावत त्यावर प्लास्टर केले. पण या उपचाराला बहुतेक उशीर झाला होता. माझे बोट त्याआधीच वेडेवाकडे जोडले गेले होते. क्रमांक एकचा सांधा आता कायमचा मिटला होता. थोडक्यात सांगायचे तर माझे बोट आता आयुष्यात पुन्हा कधीच दुमडले जाणार नव्हते. माझ्या डाव्या हाताची मूठ आता कधीच बंद होणार नव्हती!

जर.. कदाचित.. त्या दिवशी....
मी डावखुरा खेळत नसतो तर आज ही वेळ आली नसती..

पण मी.. मात्र.. आता....
असा सकारात्मक विचार करतो की जर त्या दिवशी मी उजव्या हाताने खेळत असतो तर कदाचित आज माझे उजवे बोट तुटले असते..

देव करतो ते भल्यासाठीच !
पण यापुढे मात्र ते बोट पुन्हा त्या जागी चेंडूचा मार बसण्यापासून जपायला लागणार होते. आणि हे फक्त उजव्या हाताने फलंदाजी करतानाच शक्य होते.

तर, अश्याप्रकारे माझी अखेरची डावखुरी फलंदाजीची इनिंग अकस्मात आणि दुर्दैवीरीत्या संपली होती!

-------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------
--------

..... आणि मग एके दिवशी, वय वर्षे १८ उजाडताना, कोणाला तरी माझ्यात बॉलीवूड स्टार हृतिक रोशनची झलक दिसली......

क्रमऽऽश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उजव्या हाताने फलंदाजी करताना डावा हात समोर येणार त्यामूळे जास्त काळजी घ्यायला लागेल.

डावखुरे खेळताना स्टायलिश वाटते ह्या कारणास्तव बर्‍याच जणांनी असा प्रयोग केलेला असणार (अस्मादिकांसहित) Happy मी अक्रमची अ‍ॅक्शन करत डावखुरी बॉलिंग करायचो ते नतद्रष्ट मित्र ती जास्त चांगली होते असे म्हणायचे Lol

असामी, येस्स यु आर राईट.
उजव्या हाताने फलंदाजी करताना डावे बोट एक्स्पोज होते. पण ती माझी फलंदाजीची नैसर्गिक शैली असल्याने त्या बोटावर बॉल बसण्यापासून मी टाळेन याचा मला विश्वास होता. तसेच पुन्हा डावखुरी फलंदाजी करत पुढच्या वेळी आणखी कुठे असा जिवघेणा मार खायची इच्छा नव्हती. ना मला कोणी खेळू दिले असते.

मला आठवतेय की मी पुढच्याच रविवारी बोटाला प्लास्टर गुंडाळून खेळायला गेलेलो पण आमच्या ईकडच्या मुलांनीच मला एवढी काय तुला खाज, जे बोट अजून बरे नाही झाले ते खेळायला आलास म्हणत हाकलला होता. तरी मग तरस खात अंडर आर्म खेळताना खेळू दिले होते.

अक्रमवरून आठवले, माझ्या थ्रोईंग आर्म मध्ये ताकद नव्हती ना गोलंदाजीत दम म्हणजेच वेग होता.. त्यामुळे मी स्लो किंवा स्पिन टाकायला बघायचो.. आणि त्यासाठी शेन वार्नचा रन अप कॉपी करायचो .. अर्थात टेनिस बॉलने खेळताना.. पण त्या माणसाचा रन अप कॉपी करूनही काहीतरी फायदाच होईल हा विश्वास Happy

प्लास्टीक चेंडूने खेळताना मात्र मी दादासारखेच मध्यमगती शेवटपर्यंत कायम ठेवली कारण ती खूप चालायची. मी नक्की कसा बॉल सोडायचो याचा फॉर्म्युला मलाच समजत नव्हता, पण तो प्लास्टिकचा बॉल हवेत स्विंग होत जायचा तसेच त्याचा वेगही भल्याभल्यांना चकवायचा की कॅचेस उडतच राहायच्या..

मला श्रीकांत फार आवडायचा, बॅटिंग करताना त्याच्या सारखे नेहमी नाक चोळत होतो, बॉलिंग करताना जिमी सारखे अर्धी रुमाल खिश्याच्या बाहेर असायचे.

ब्रेट ली ची विकेट काढल्यावरची हँडपंप स्टाईल आमच्यावेळी फेमस होती..
किंबहुना विकेट काढल्यावर स्टाईली मारायची फॅशनच होती .. जो कॅच पकडेल त्याच्या जवळ सारे जण स्लो मोशनमध्ये नाचत नाचत यायचे.. धमाल असायची एकेक..

विचित्र अपघात झाला खरा.. आशा करतो, आता बोट व्यवस्थित असेल. ( प्लीज चिंध्या म्हणू नका हो. डॉक्टरांना वाईट वाटेल. )

बोट तसे व्यवस्थित आहे, पण पुढची काही वर्षे थंडीत हाडे गोठायची तेव्हा त्रास द्यायचे, आणि आजही अचानक काही पकडायला जातो तेव्हा बाकीची बोटे मिटतात आणि हे भाल्यासारखे जाऊन त्या वस्तूला ठोकते.. जास्तच जोरात ठोकले तर कळवळून जीव जातो.. आजही Happy

बाकी त्या डॉक्टरांनी प्लास्टरच्या जागी चिंध्याच गुंडाळल्या होत्या म्हणून तसे म्हणालो.
या पेशात इमानैतबारे काम करणार्‍यांबद्दल मला प्रचंड आदरच नाही तर मी त्यांना देव मानतो.

मी जेवणे, खाणे, लिहिणे, वाचणे,
नाचणे, गाणे, टाळ्या वाजवणे...
फक्त आणि फक्त उजव्या हाताने
करायचो. >>>>>>
टाळी एकाच हाताने वाजवायचास का?

टाळी एकाच हाताने वाजवायचास का?

>>>>>

चांगला प्रश्न !

तसे बघायला गेल्यास आपण डावखुरी फलंदाजी म्हणत असलो तरी बॅट दोन्ही हातातच पकडतो ना..

तसेच आहे हे..

डावखुरे लोक उजव्या तळहातावर डावा हात आपटतात .. मी डाव्या तळहातावर उजवा हात आपटत टाळी वाजवायचो.. Happy