मी आणि साप ! (काही किस्से)

Submitted by कवठीचाफा on 4 July, 2008 - 09:58

माणसाच्या मनात ज्या अनेक प्राणिमात्रांची भिती दाटलेली आहे ना ! त्यात सगळ्यात वरच्या काही नंबरात साप कायम स्थान टिकवुन आहे.
एक सर्पमित्र म्हणुन मी काहीकाळ सापांच्या मागे धावलोय, ते ही आगदी शब्दशः त्यावेळी अनेकदा गंमती जंमती घडायच्या त्यावेळचे काही आठवतील तितके किस्से मी लिहून काढायचा प्रयत्न केला. आणि नक्की कुठे पोस्टायच्या ते न कळल्याने कथेत पोष्टतोय.

१] संध्याकाळची वेळ म्हणजे आमच्या कुचाळक्या रंगात आलेल्या असायच्या अश्या या मंगलसमयी एक निरोप आला. त्या अमक्यांच्या घरात साप शिरलाय तुम्हाला लगेच बोलावलेय मी आगदी रुबाबात बाकी मित्र मंडळींकडे पहात त्या निरोप्याच्या मागे रवाना,
घरात शिरलो तर घरातली माणसे जे काही उंच मिळेल त्यावर चढून बसली होती. नेमके वर्णन करायचे तर श्री. टिपॉयवर बसले होते, सौ., खुर्चीवर पाय अखडून, दोन्ही मुले गडबडीत खिडकीवर चढून बसली होती आणि सतत सांधेदुखीचे रडगाणे गाण्यार्‍या आज्जी (म्हणजे बोलायला आज्जी हं वय जास्त नव्हत काही) टि.व्ही च्या टेबलावर शक्य तितक्या अकुंचन पावत बसल्या होत्या.
" का हो ? साप कुठाय? " मी आल्या आल्या प्रश्न केला. हातातली स्टिक मिरवत हं.
" तो? तिकडे किचन मधे " आज्जी चिरकलेल्या आवाजात.
" मग तुम्ही इकडे असे का बसलात?"
"अरे ! तो इकडे आला तर?" श्रींची शक्कल
" आहो मग बाहेर जायचे ना !" मी सोपा मार्ग सुचवला.
" आणि तो कुठे जाउन लपुन बसला म्हणजे?" ही मुक्ताफ़ळे अर्थात श्रींच्या सौ. ची.
" बरं ठीक आहे पहातो मी"
मारे वाघाच्या शिकारीला निघाल्यासारखा हातातली स्टीक समोर धरत किचनमधे शोधाशोध सुरु केली. जास्त शोधायची वेळ आलीच नाही ओट्याखालची जागा साप लोकांची आवडती असते तिथे नाही सापडला तर बहूधा तो फ़्रीज खाली सापडतो. तसा मला तो सापडला मी मारे अलगद शिकवलेल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी आठवत एकदाचा त्या सापाला पकडला आणि हाय रे देवा तो साप म्हणजे `नानेटी 'होती की. अत्यंत निरुपद्रवी आणि बिनविषारी. आणि या बयेला घाबरुन बाहेर लहानसा गिर्यारोहणाचा कार्यक्रम चालु होता.
म्हंटल चला आहे त्यावर भाव खाउन घेउ. अलगद त्या नानेटिला पकडुन मी बाहेर आणली. आनि बाहेरच्या त्या आदिमानवांची नक्कल करु पहाणार्‍या प्रेक्षकवर्गाला दाखवली.
" काका, ही नानेटी आहे आजीबात विषारी नाही"
" अरे बापरे ! आता तु जाउ नको पाठोपाठ सात नानेट्या येतील आता" टिपॉय वरुन पाय खाली सोडायच्या तयारीतले काका पुन्हा मुळ मुद्रेत जात म्हणाले.
" आहो नाही, तसे काही नसते ते चुकुन कधी घडले असेल ( खरे काय असते ते सांगायचे आता जिवावर आले ) नाही येणार आणखी नानेट्या.
" नाही कश्या? माझ्या दिराने एकदा मारली होतीन नानेटी आल्या की हो सात तिच्या मागे ! " आज्जींकडे प्रत्येक गोष्टीचे पुर्वानुभव असतातच.
कशीबशी सगळ्या कुटुंबाची समजुत घालुन मी बाहेर उभ्या मित्रांजवळ आलो आणि जरा आभिमानानेच 'नानेटी' या सापाची माहीती द्यायला लागलो. त्यांच्या चेहर्‍यावर एव्हाना कौतुकाची छटा दिसायला लागलीच होती की मागुन आवाज आला
" अय्याऽऽऽ, चिंट्या! बघ काकांनी केवढा मोठा गांडूळ पकडलाय" आणि पुढच्या हास्यकल्लोळात माझा रुबाब पार उतरला.

२] एकदा असाच भरदुपारी घरी असताना कुणीतरी बाहेरुनच हाका मारत होते. गॅलरीतुन डोकाउन पाहीले तर आमचे जरा दुरचेच शेजारी.
" येता का जरा ? माझा मेव्हणा आलाय आणि त्याला साप चावलाय.
"आहो मग त्यांना दवाखान्यात न्या की !"
"तिकडे नेलेच आहे पण डॉक्टर म्हणतात तो साप आणला असतात तर बरं झाल असतं, आणि साप बसलाय तिकडे जिन्याच्या खाली कोपर्‍यात लपुन"
"तुम्हाला कसे माहीत ? "
"मीच, आत्तापर्यंत लक्षठेउन होतो ना ! आता हिचा मोठा भाउ पण आलाय त्याला तिथे बसवुन आलोय "
जास्त वेळ घेण्यात अर्थ नव्हता. डॉक्टरांनी साप का बघायला मागितला असेल याचा अंदाज आलाच होता.
सर्पदंशाच्या बर्‍याच केसेस मधे बहुधा हुशार डॉक्टर दंशाच्या खुणांवरुन सापाची जात ओळखतात पण क्वचीत प्रसंगी जर गोंधळ उडालाच तर ते असे म्हणतात. सहसा मारलेला का होईना साप असतोच. कारण आपण माणसे सुड घेण्यात चित्रपटातल्या नागीणीपेक्षा जास्त खुनशी ना !
तसलाच काही प्रकार असावा असे समजुन मी धडपडत गेलो. आणि त्याने दाखवलेल्या ठिकाणी पाहीले आणि कपाळावर हात मारुन घ्यायचा बाकी राहीलो. साधे 'दिवड' होते ते. हा पाणसाप चावतो कडकडून पण विषारी नसतो अजिबात.
खरी हकीकत दुसर्‍यादिवशी कळली ती अशी:
हे मेव्हणे महोदय `डिस्कवरी' वर साप पकडताना पाहून प्रभावीत झालेले. त्यात घरात असाच माझा विषय निघालेला. तो अमका ( म्हणजे मीच ) कसा सापाची शेपटी धरुन अलगद उचलतो ( त्यासाठी किती रक्त आटवलेय आणि गोठवलेय माझे मलाच ठाउक ) वगैरे वगैरे. आणि दुसर्‍या दिवशी तो रस्ता चुकलेला 'दिवड' घरात शिरायचा प्रयत्न करताना त्यानेच पाहीला. आपले देखीव ( ऐकीव असते ना तसे ! ) नॉलेज पणाला लावुन कशीबशी एकदाची शेपटी पकडली त्याने दिवडाची ( अर्थात या साठी सुध्दा खुप तयारी लागते मनाची ) आणि नेमके पुढे काय करायचे ते न सुचल्याने बहाद्दराने त्याला तसाच लोंबकाळत वर उचलला. अश्यावेळी साप गडबडतो, आणि काहीतरी अनपेक्षीत हलचाल करतो तसेच झाले आणि साप चावला तो मांडीलाच. तो ही दोनवेळा मग मात्र डोळे फ़िरवले गड्याने आणि दवखानावारी करुन आला.

३] एकदा मात्र हद्द झाली असेच बोलावले म्हणुन गेलो. मारे पोटमाळ्यावरुन `घोणस' शोधुन काढला त्याला घेउन खाली उतरतो तो समोर ज्या काकुनी बोलावले त्यांचे नवरोबा हातात कोयता घेउन आम्हाला सामोरे !
" धरुन ठेव रे निट " कोयता उगारत काका म्हणाले.
" काका तुम्ही खाणार आहात का साप, मारल्यावर ?"
"काही तरी बोलु नको साप का कुणी खातं मेले आम्ही काय चिनी आहोत ?" काकुंनी तोंड सोडलच.
" मग मारता कशाला ?"
" तु काय घरात नेउन पाळणारेस ?"
"नाही, रानात नेउन सोडणार."
" मग सोडतो कशाला" काकु दणक्यात म्हणाल्या तसेही हत्यार आपल्या बाजुचे असले की भांडणार्‍याला जोर येतोच.
" काकु तुम्ही मला साप पकडायला बोलावलत मग आता मारायला का निघालात होता तिथेच मारायचा ना ! " अश्या वेळी मी हे छापिल उत्तर देतो.
" मी मारायलाच बोलावला होता तु येउन धरलास त्याला मी काय करु?" चक्क खोटे बोलत काकु म्हणाल्या कारण मी आगदी स्वच्छपणे ऐकले होते त्यांनी साप धरायला बोलावल्याचे. ती पेशवेकालीन आनंदीबाई पुनर्जन्म घेउन आली असावी असा मला संशय यायला लागला.
पण मी `गारदी' हुषार हो ! म्हंटल तुम्हाला मारायचाच आहे ना ? खुषाल मारा मी हा सोडतो त्याला आणि जातो, मग मारा ! त्यामुळेच मग तो साप बचावला !

४] आता दरवेळी पंगा बिनविषारी सापांशी येतो असे नाही पण आपल्या महाराष्ट्रात तरी विषारी जाती कमीच त्यातुन आगदी विषारी म्हणजे 'नाग' मी आत्तापर्यंत आडीच वेळा नाग पकडलेत म्हणजे एकदा `अर्धेल्या' ( अर्धा नाग अर्धी धामण असा असतो म्हणे हा मलाही माहीत नव्हते नेमके शास्त्रीय नाव माहीत नाही ) म्हणुन अर्धा.
त्यातल्या एकावेळी जिव जायचाच, तो प्रसंग माझे अनुभव बी बी वर आहे पण एकदा बाकी मोठा विनोदी प्रकार झाला होता.
एका ठिकाणि घरात शिरलेला नाग पकडला पण त्या लोकांचे म्हणणे होते की तो देवाचा नाग आहे आम्ही त्याला वारुळात सोडावा. त्याना म्हंटले दाखवा वारुळ त्यांनी दाखवलेले वारुळ बघुनच हातापायातल्या मुंग्या जाग्या झाल्य की काय देव जाणे. लाल मुंग्यानी भरलेल्या वारुळात हे नाग सोडायला सांगत होते. त्यात एक तर नाग मेला असता नाहीतर मी तरी. त्यावर मला उत्तर इतके भारी मिळाले की मी गार पडायचाच बाकी
म्हणे हा नाग घरात आला तेवढ्या वेळात मुंग्या लागल्या वारुळाला. आता तुम्ही त्या नागाला सोडलेत की मुंग्या बाहेर पळतील. 'बहूतेक आयत्या बिळावर नागोबा' माहीत नसावे.
बरीच समजुत काढल्यावर तो तयार झाला एकदाचा नाग दुसरीकडे सोडायला. पण म्हणे एकदा त्याला सगळ्या जागेचे दर्शन करु दे ! मग आख्या घरा अंगणापासुन आमची वरात प्लास्टीकच्या बॅगेत नाग घेउन.

आणखि एक आठवण: आमच्या कडे एक गारुडी यायचा नेहमी दर सोमवारी टोपलीत नाग ठेउन मी घरी असलो की त्याला सरळ पुढे पाठवुन द्यायचो. अश्या लोकांचा राग येतो एक तर बिना दाताचे विषग्रंथी काढलेले नाग घेउन येतात त्यात त्यांना सारखे हाताळुन त्यांच्या शरीराचे तापमान वाढवतात मग ते नाग मलुल पडुन रहातात म्हणुन टोचुन टोचुन हलवतात.
तर असाच एकदा तो गारुडी मी असताना आलेला आणि बहूतेक आज ह्याच्याकडून पैसे घेउन जायचेच असे ठरवुन आला असावा
" सायेब, नागोबाला दुध पाजा"
" पाजतो बाबा आणु का घरातुन ?"
" सायेब मस्करी करता का गरीबाची रुपाया द्या द्येवाचं जनावर हाय ह्ये "
" आणि तु घेउन फ़िरतोयस?"
अश्यावेळी हे लोक जे करतात तेच त्याने केले. पटकन नागाचे टोपले माझ्या समोर धरत त्याने झाकण उघडले.
"बगा सायेब, लई इखारी जनावर हाय"
इतके बोलेस्तोवर त्याच्या टोपल्यातुन नाग मी उचलला. आता गडी ढेपाळला, शेवटी इकडे परत यायचे नाही या अटीवर मी त्याला त्याचा नाग परत केला नाहीतरी विषग्रंथी नसलेला आणि विषारी दात नसलेला नाग बाहेर जगणे शक्य नव्हतेच.

थोडक्यात आपण ज्या सापांना घाबरतो ते इतके वाईट नसतात हो !

असेच एकदा कंपनित साप पकडल्यावर मला काहितरी साप पकडण्याचा मंत्र येतो असा गैरसमज सहकारी बंधुंनी करुन घेतला होता त्यातल्या एका बंगाली सहकार्‍याला मंत्र शिकवतो म्हणुन पार शाकाहारी करुन टाकला. आणि नंतर या आमावस्येला नदिवर भेट सांगुन कटवला होता.

गुलमोहर: 

चाफ्या लै डेरींगबाज आहेस बॉ तु. Happy

चाफ्या किस्से फक्कड आहेत:)
मला बॉ सांपांची पण भिती वाटते Happy

.............................................................
अय्याऽऽऽ, चिंट्या! बघ काकांनी केवढा मोठा गांडूळ पकडलाय" >>>>>>>..
Rofl
चांगल लिहिलस रे.
अजुन काहि असतील तर लिहि

चाफ्फ्या, सगळे विनोदि प्रसंग लिहिलेस...... काही रोमहर्षक, चित्तथरारक आठवणी पण लिही ना.

किती घाबरवतोस रे.
एकतर 'ड्यांजर' कथा लिहित असतोस.
अन आता तुझं अन सापाचं असं नातं असल्याचं सांगतोस.
यापुढे तुला पोष्टायला पण मला भीती वाटणार बाबा.

चाफ्फा हि(ही) कला आहे का अंगात ? छान.
अलिकडेच बाजारात मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषांत सापावरचे छान पुस्तक आलेय. सचित्र आहे.

माफ करा मित्रांनो मी डेअरींगबाज वगैरे असल्याचे मला दाखवुन द्यायचे नव्हते ! पण काही किस्से खरच आठवणीत राहीले ते लिहीण्याचा प्रयत्न केला. आणि मुख्य म्हणजे यात भर पडेल अशी अपेक्षा ठेउन केलाय ! Happy
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

सही आहेत किस्से... येउ द्या अजुन.....

मस्त रे. आमचा नेचर क्लब होता. निलिमकुमार आणि अनिलकुमार खैरेना बोलावलं होतं. तेव्हा बेसिक ट्रेनिंग घेतलं पण आई-आजीच्या प्रचंड दबावामुळे पुढे पारंगत होणं जमलं नाही. तू कुणाकडे शिकलास?

वा, झकास माहिती! हे पण येत का तुला! Happy
आयला, साप कसा पकडायचा ते लिहून आमच्या "वाचिक" अन "देखिक" ज्ञानात भर घाल की लेका! Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिंबूला मोदक. How to catch snakes for dummies अशी एक लेखमाला प्रसिद्ध कर! Happy

दोस्तलोक, प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद ! लिंब्याभाव तु विचार खुप छान मांडलायस रे पण एकच लोच्या आहे ! हे साप पकडण्यासाठी मोठा शत्रु म्हणजे भिती आणि मनातली भिती काढायला पुस्तकी नाही प्रत्यक्ष अनुभवच उपयोगी ठरतो. आणि भिती गेल्याखेरीज काही उपयोग नाही Sad
त्यात एक गोष्ट मात्र करु शकतो. साप आणि त्यांच्या सवयी नक्की लिहू शकेन त्यामुळे कदाचीत भिती कमी होईल असे वाटते
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

एक शंका- या सर्वांना एकाच वेळी कसे पकडायचे रे?
Graphic1_0.jpg

एक सापीण आणायची. तिला "ये तो बता देखता है तू क्या" च्या चालीवर गारुड्याचा पुंगीवर नाचवायचे आणि पळवायचे. मग काय? सगळे साप तिच्या मागून धावत निघतील. मग सापिणीला एका जाळिदार पिंजर्‍यात ढकलायचे. आता सगळे साप तिच्या मागून पिंजर्‍यात! मग पटकन पिंजर्‍याचे दार लावून घ्यायचे. कशी वाटली आयडियेची कल्पना?

चाफा, सापांविषयी अजुनही लिही रे लवकरच. म्हणजे तु जे म्हणला आहेस ना की सापांच्या सवयी त्या लिहायला सुरु कर लवकर!
मागचा तुझा नाग सोडतानाचा अनुभव वाचून शहारलो होतो रे बाबा..!!!

चाफ्फा,
इथे वाचतांना जरी मजा येत असली तरी तिथे असतो तर
मात्र आमची बहुतेकांची तंतरली असती. Proud

चाफ्फ्या तुझ्या या भानगडी वाचुन तुला आता चाफ्फ्या ऐवजि साप्प्या अशी हाक मारवी काय ? Happy दिवे घे रे Happy

साजिरा Happy जर ईतके रॅटलस्नेक एका ठीकाणी असतील तर त्यांनी आपल्याला पकडून 'माणुस कसा पकडावा' याचे प्रशिक्षण बाकी साप लोकांना द्यायच्या आत तिथुन कल्टी खावी हे उत्तम.
असो हे रॅटलस्नेक भारतात सापडत नाहीत त्यामुळे मी सुखात आहे Happy
दुरंधर भाउ काहीही म्हणा हो प्रेमाने म्हणताय ना ? यात सगळ काही आलं दिवे भरपुर आहेत माझ्याकडे ( ते पेटत नाहीत लोडशेडींगमुळे ते वेगळं ) Happy
आता बाकी दोस्तलोकांच्या मागणी नुसार :
snake_copy_2_0.jpg
जरा मोठच प्रकरण आहे हे पण जरा गुंतागुतीचा प्राणी याला अर्धेल्या असे सर्वसाधारण भाषेत म्हणतात. याचे ख्रे नाव मला अजुन कळालेले नाही. विषदंत असतात पण विषग्रंथी दिसत नाहीत म्हणजे नक्की विषारी की बिनविषारी ते कळत नाही. वेगाच्या बाबतीत अप्रतीम. शरीराचा १/३ भाग जमीनीपासुन वर उचलू शकतो नागाप्रमाणे.

snake22_0.jpg

काही लोकांच्या मते हे नाग आणि धामण या दोन सापांचे हायब्रीड आहे. खरं खोट माहीत नाही पण सहसा या जातीचे साप दिसत नाहीत हे मात्र खरं

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

ह्या रॅटलस्नेक्स प्रमाणेच चिपळुणात कुणाच्या तरी ओवरीखाली घोणसांची अशीच प्रचंड प्रमाणात पिल्ले निघाल्याचे मध्ये ऐकले होते.. पण ती पिल्लं होती, वाढलेलं जनावर नाही..
हे अर्धेल्या प्रकरण ऐकलं नव्हतं.. निदान पश्चिम महाराष्ट्र, कोकणात ऐकले नाही.. धामणी बर्‍याच बघितल्या आहेत.. काय चपळ असतात.. बघत बसावं असा वेग असतो..

चाफ्या , माझ्या गावी (परळीला) काल आमच्या वाड्यात साप निघाला , घरी कोणी नव्हतं , सगळ घर फिरुन गेला , वाड्याच्या मागे खूप मोठ अंगण आहे , पण सध्या तिथे कोणी देखभाल करायला नसल्यामुळे खूप आयचन जमलंय , त्यामुळे कदाचित तो फिरत असावा ... दुसर्‍या एका वाड्यात पण गेलेला शेजारच्या Sad , आई , बाबा ची जाम काळ्जी वाटतेय रे . काही उपाय करता येईल का साप घरात न येण्यासाठी ???
****************************
Proud

चाफ्या, अरे ते आधेलं म्हणजेच दिवड ना....... पाणदिवडला कोकणात म्हणजे रत्नागिरी पट्यात आधेलं म्हणतात. आणि खाली तळकोकणात त्यालाच दिवड म्हणतात.

तू नाग आणि धामणीचा संकर म्हणतोयेस त्याला कोकणात लोक "अक्करमाशी" म्हणतात. तो स्वतःहून अटॅक करतो आंगावर वगैरे. पहिल्यांदा अक्करमाशीबद्दल ऐकलेलं तेंव्हा एकंदर वर्णनावरून मला हे लोक किंग कोब्रा बद्दल तर नाही ना बोलत अशी शंका यायची. पश्चिम घाटात असल्याचं म्हटलं जरी असलं तरी अजूनही किंग कोब्रा कधी कोकणात सापडलेला नाही हे आपलं नशीबच Happy

पण मलाही तो "अक्करमाशी" काय प्रकार आहे ते पहायला मिळालेलं नाही. कित्येक फोटोज दाखवले गावातल्यांना. पण आपल्याला पार *** बनवतात हे लोक Sad

तुला दिसला असेल तर त्याचे फोटो टाक ना जरा.

भुंग्या, दिवड हा पाणसाप आहे, हे अक्करमाशी काय प्रकरण आहे माहीत नाही पण बहूदा आपण आर्धेल्या आणि ते अक्करमाशी एकच आहेत असं बाकी वर्णनावरून तरी म्हणू योगायोगानं त्याचे फोटो आहेत माझ्याकडे Happy
आधीही टाकलेत बहूदा, गरीब असतो रे बिचारा लोक काही बाही उठवतात,

Pages