इसवीसन १९८९ साली पहिली नोकरी पत्करली तीच मुळी मार्केट रीसर्चची! त्या वयातच भारतातील सर्व प्रमुख भाग फिरून झाले आणि त्याच काळापासून 'पत्ता शोधणे' हे भूत मानगुटीवर बसले. हे भूत आजपर्यंत उतरलेले नाही. ह्यापुढे उतरेल असे वाटत नाही.
पत्ता शोधणे हा विषय गहन आहे. पत्ता शोधणारा, पत्ता सांगणारा, पत्ता शोधणार्याची निकड, पत्ता सांगणार्याची बेदरकारी, प्रत्यक्ष पत्त्याची क्लिष्टता, त्या पत्त्यावर पोहोचायला लागणारा वेळ, त्या पत्यावर पोचण्यासाठी उपलब्ध असलेली वाहने, पत्ता सांगणार्याची भाषा, त्याचा मूड, त्याचे ज्ञान, त्याच्या शरीरात त्याक्षणी असलेली उर्जा, त्याच्या आयुष्यात त्याक्षणी असलेली भावनिक वादळे, त्याच्या पोटातील वाढलेली अॅसीडिटी, उन्हाचा तडाखा, आपल्या चेहर्यावर आलेले तिरस्करणीय अडाणी भाव, उजवीकडे जायचे असेल तर सांगणार्याने हमखास उजवीकडेच हात दाखवून तोंडाने मात्र 'लेफ्ट मारा' असे म्हणणे व आपण अधिक बावळट होणे अश्या व इतर अनंत घटकांवर पत्ता शोधणे हा विषय विसंबून असतो.
पत्ता शोधणारा नेहमी एकच कोणीतरी असतो. पण पत्ता सांगणारे शेकडो असतात. प्रत्यक्ष ज्याचा पत्ता आहे तो, त्याचा पत्ता शोधण्याचे काम आपल्याला ज्याने दिले आहे तो, त्या पत्त्यावर पोचेपर्यंतच्या वाटेत आपल्याला पडलेल्या अनंत शंकाकुशंकांचे निरसन करणारे लोक, पाट्या, देवळे, हॉटेल्स, पुतळे, इमारती, कार्यालये, पूल, चौक, पोलिस चौक्या, बसथांबे, दुकाने, मॉल्स, झाडे, दगड, टेकाड, चढ, उतार, बाजार, स्मशान, वेड्यांची इस्पितळे, त्यातून अचानक सुटलेले व नेमके आपल्यालाच भेटून पत्ता सांगणारे, म्हातारे, गलितगात्र, मुके, उद्धट, अडाणी, भिकारी, आयुष्यात कश्यातही स्वारस्य न उरलेले असे सर्वजण पत्ता सांगणार्यांमध्ये मोडतात.
पत्ता शोधण्यात आजवरची हयात गेली. पण अजूनही चिडचिड न होता पत्ता ऐकून घेणे किंवा पत्ता सांगणार्याचे नरडे दाबावे अशी भावना मनात येऊ न देता संयमाने प्रत्येकाची तंत्रे सांभाळून पत्ता ऐकणे हे जमलेले नाही.
पत्ता शोधण्यापेक्षा ज्याला पत्ता विचारतो आहोत त्याच्या लहरी सोसणे हे जटिल कार्य आहे. ते करताना आम्लपित्त, रक्तदाब, थकवा, डोके फिरणे, वेड लागायची वेळ येणे, घसा कोरडा पडणे ह्यातील काहीही होऊ शकते. मला तर अनेकदा हे सगळे होते.
एवढे करून त्या पत्त्यावर जाऊन जर फक्त 'त्या ह्यांनी ते हे दिलेले होते, म्हंटले नेऊन द्यावे' इतकेच बोलून कोणाचीतरी टिनपाट वस्तू हस्तांतरीत करायची असली तर जगात माणसे आत्महत्या का करत असावीत हा प्रश्न पडणे बंद होते.
त्याशिवाय, एकदा पत्त्यावर जाऊन पोचल्यानंतर त्यांचे आगतस्वागत, आगतस्वागताचा पूर्ण अभाव, 'पत्ता मिळाला ना सहज' हा घनघोर प्रश्न, 'तुम्हाला म्हंटलो नाही का मी त्या इथून राईट घ्यायचा' वगैरे पोस्ट मॉर्टेम्स ह्यामुळे माणूस अतिरेकी कसा होत असेल ह्याही प्रश्नाचे उत्तर मिळते.
गावागावानुसार पत्ते शोधणे व पत्ते विचारण्यातील धोके ह्यांच्या भयावह स्वरुपात ठळक बदल होत जातात व आपली मनस्थिती पुरेशी लवचीक करण्यासाठी आपण तात्काळ मेडिटेशनचा आसरा घ्यायला हवा आहे ही भावना जागृत होते.
पोस्टमन, पोलिस, रिक्षावाले, पानवाले असे लोक पत्ता सांगण्यात वाकबगार असतात ह्या बाळबोध गृहीतकाला जेव्हा हिंस्त्र तडे जातात तेव्हा हातात हंटर घेऊन त्यांना फोडून काढावेसे वाटू लागते.
पत्ता शोधणे ह्या भयानक शिक्षेशी निगडीत असे काही घटक विचारात घेऊयात.
पत्ता सांगणारा रस्त्यावरील एक माणूसः
हा जो कोणी एक माणूस असतो त्याचा महिमा वर्णन करण्यास पुरेसे शब्द नाहीत. तो रस्त्याकडेला नुसता बसलेला असला तर तिथेच बसून भुवईने नुसतेच 'क्कॅय' असे विचारून आपला रक्तदाब वाढवू शकतो. तो ढिम्मही हालत नाही. आधी पहिले म्हणजे आपण जे ठिकाण विचारतो आहोत ते त्याला ऐकू जायलाच त्या ठिकाणाच्या नावाचा तीनदा उच्चार करावा लागतो. प्रत्येक उच्चाराबरोबर आपण रुग्ण बनू लागतो. एवढे करू ह्या ढिम्म्याला ते ठिकाण माहीत तरी असणार आहे की नाही हेही आपल्याला माहीत नसते. इतका बेकार जुगार माणूस कधीही खेळत नसेल. त्यात तो ढिम्म नुसत्या भुवया उडवून 'क्कॅय, क्कॅय' करू लागला की त्याच्या जवळ जाऊन त्याला गदागदा हलवून, त्याच्या तोंडावर थाड थाड थापट्या मारून त्याचे केस ओढून त्याला विचारावेसे वाटते की आता येतंय का ऐकू? अरे गाढवा मला ही ही सोसायटी हवी आहे आणि ती तुला माहीत नसली तर आजपासून ह्या जागेवर बूड टेकवून बसत जाऊ नकोस. काम कर एखादे! नाहीतर शीर्षासन कर, पण इथे बसू नकोस. एखाद्याला ऐकू आलेच तर मग प्रश्न येतो की त्याची त्याक्षणी मनोवस्था कशी आहे. म्हणजे असे, की ह्या क्षणी मला कोणीही पत्ता विचारणारा भेटू नये हे जर त्याचे सर्वोच्च प्राधान्य असेल तर पत्ता माहीत असूनही तो नुसती मान हलवून दिशा वगरे दाखवतो. आपण बेसिकली चाललेले त्याच दिशेला असतो, त्यामुळे दिशा कोणती हे आपल्याला विचारायचेच नसते. पण त्याला तितकेच सांगण्यात स्वारस्य असते. काहीजण तर चक्क उत्तर द्यायच्या आधी थुंकतात आणि मग पुन्हा 'काय म्हणालात' विचारतात. सगळ्यात भयंकर राग येतो तो त्या लोकांचा जे प्रतिप्रश्न करतात की 'काय पता दिलाय'! अरे हणम्या तुला मी लँडमार्कच विचारत आहे. एखादा नेने किंवा कदम किंवा ताटके कुठे राहतो असे विचारत नसून शिरसाट रुग्णालय कुठे आहे असे विचारत आहे. गेल्या दहा किलोमीटरपासून सगळ्यांनी मला 'शिरसाट रुग्णालय' म्हंटल्यावर दिशा दाखवून येथपर्यंत आणून पोहोचवलेले आहे. आता इथे तू मला विचारतोयस की 'शिरसाट रुग्णालय? पता काय दिलाय?????' अरे मला शिरसाट रुग्णालय नकोच आहे. त्याच्यासमोरच्या गल्लीत एका क्षुद्र टपरीमागच्या एका दिडवीत खोलीत कोणी एक बारटक्के राहतो त्याच्याकडे जायचे आहे. ही असली माणसे तिथे का बसलेली असतात हेच समजत नाही. त्यांच्या बायकोने सकाळी त्यांना काहीतरी अखाद्य खायला घातलेले असावे असे वाटते. किंवा 'च्यायला ह्या समोरच्याला निदान पत्ता विचारण्याचे तरी काम आहे, मला तर तेही नाही' असा काहीसा मत्सर त्यांना असे वागण्यास प्रवृत्त करत असावा. एक कॅटेगरी अशी असते की तीव्र संताप आणते. उदाहरणार्थ आपण विचारले की 'दादू चौक' कुठे आहे. आता हा दादू चौक, दादू चौक हा उल्लेख आपण इतकेवेळा ऐकलेला असतो आणि इतक्या जणांनी आपल्याला 'ते हे ना? दादू चौकातून उलटा राईट घ्या' वगैरे सांगितलेले असते की इथे पोचून 'दादू चौक कुठे आहे' विचारल्यावर मिळणारे उत्तर 'हा काय समोर' अश्या स्वरुपाचे असेल हे आपल्याला ठामपणे समजलेले असते. पण ही कॅटेगरी भयाण असते. तो माणूस जागेवरून निवांत उठून डुलत डुलत येतो आणि विचारतो 'काय??'. आपण राग गिळून म्हणतो 'दादू चौक, दादू चौक"! त्यावर तो माणूस 'आपण अफगाणिस्तानात लास वेगास कुठे आहे' असे विचारत असल्यासारखा चेहरा करत विचारतो. 'दादू चौक??????'! आता आपला संयम सुटू लागलेला असतो, पण तो आवरत आपण म्हणतो 'इथेच कुठेतरी सांगितलंय'! त्यावर ही कॅटेगरी म्हणते, 'काय कल्पना नाही राव'! त्याला धरून उचलून दहा वेळा आपटावेसे वाटते. अरे तुला इथे बसून दादू चौक माहीत नाही तर डुलत डुलत गाडीपर्यंत आलास कशाला संस्थानिकाच्या थाटात? एक तर उन लागत असते, गाडी मधेच थांबवल्यामुळे मागचे वाहनचालक अज्ञात वाहनाची धडक बसल्यासारखे विव्हळत असतात. आणि हा छपरी 'काय कल्पना नाय राव' म्हणत निवांत निघून चाललेला असतो. एक आणखी निराळी कॅटेगरी असते. त्यांना आपण जे विचारत आहोत त्यापलीकडचे काहीतरी माहीत करून घ्यायचे असते. म्हणजे आपण जर विचारलं की 'दादू चौक कुठे आहे' तर हे विचारतात 'कोणाकडे जायचंय?'! अरे भोपळ्या मला जीव द्यायचा असेल, तू नुसता दादू चौक कुठे आहे सांग ना? पण आपण नम्रपणे म्हणतो 'बारटक्केंकडे'! त्यावर हे नांवसुद्धा मराठीत अस्तित्त्वात नसल्यासारखा अत्यंत चिकित्सक चेहरा करून तो इसम विचारतो. 'बारटक्के? कोण बारटक्के?'! तुझा बाप! अरे तुला घेणे का देणे आहे त्या बारटक्केशी? तू दादू चौक कुठे आहे सांग ना यार? पण नाही. आणखी एक प्रकार म्हणजे कोणीतरी जगाच्या चुका आनंदाने व सातत्याने दाखवून देण्यात इतका मुरलेला असतो की आपण जर विचारले 'दादू चौक कुठे आहे' तर त्या प्रश्नातील 'आहे' ह्या शब्दातील 'हे' हे अक्षर उच्चारून होण्याआधीच तो आनंदी चेहर्याने जोरात आवाजात म्हणतो 'दादू चौक मागे राहिला'! गाडीतून उतरून त्याला धरून फरफटत दादू चौकापर्यंत न्यावेसे वाटते. वास्तविक त्याची चूक नसते, पण ह्यावेळी मात्र आपली मनस्थिती बकाल झालेली असते. अरे चूक सांगायची तर जरा सहानुभुतीने सांगा की? असे नाही का म्हणता येत की 'मला सांगायला खेद वाटतो की तुम्ही दादू चौक ओलांडून पुढे आला आहात, मी तुम्हाला चौकाच्या आधीच भेटायला हवे होते'! काहीवेळा कोणीतरी इतक्या वेगात चाललेला असतो की आपण त्याला पता विचारण्यासाठी खाणाखुणा करतो आहोत हे कळेपर्यंत तो खूप पुढे पोचलेला असतो व त्यामुळे त्याला पत्ता विचारण्यातील आपला रस संपलेला असतो. काहीवेळा काही दुकानदार काऊंटरवरून रिलक्टंट चेहरे करून आपल्याकडे बघतात. 'माल घ्यायचाय का? नाही ना? मग फुटा' असे त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट नोंदवलेले दिसते. आपण अगदीच चिवटपणे पत्ता विचारत राहिलो तर नकारार्थी मान हालवून माहीत नाही असे म्हणतात किंवा माहीत असले तरी सांगण्यात स्वारस्य नाही असे दर्शवतात त्यांची दुकाने बेसिकली नीट चाललेली नसतात. त्यांच्यापुढे प्रश्न असतो तो हा की हे दुकान मी काढून बसलो आहे तिथे माल घ्यायला काळं कुत्रं येत नाही आणि पत्ता विचारणार्यांची रांग लागली आहे. पत्ता सांगणार्या माणसांचे आणखीही अनंत प्रकार असतात. त्यातला एक प्रकार असतो सामुहिक पत्तादर्शक टोळके! एकाला पत्ता विचारला की त्याच्या चेहर्यावर दार्शनिकाचे भाव यायच्या आत दुसराच कॉणी टपकतो आणि विचारतो 'कुठे जायचंय'? की आपण त्याला तेच सांगतो. 'दादू चौक'! मग तो आधीच्याकडे असे बघतो जणू दादू चौक हा एखादा संवेदनशील विषय असावा. त्या दोघांची आपापसात चर्चा सुरू होते. त्यातून वादही होऊ शकतात. त्यातच आणखी कोणी दोघे टपकतात आणि चारजण आपल्याला वेगवेगळ्या दिशांना हातवारे करून काहीतरी सांगू लागतात. आपण आपल्या निकषांनुसार त्यातील सर्वात रिलायेबल वाटणार्याचे म्हणणे ऐकून तिकडे वळतो. स्त्रियांना कधीही पत्ते विचारू नयेत. त्यातली एखादी स्वतः बारटक्केची पत्नी असली तरी आपल्याकडे अशी बघेल जसे काही आपण तिला छेडण्यासाठी त्या विभागात आलेलो आहोत. लहान मुलांना पते विचारताना आपल्याला नेमके काही ठामपणे सांगता येत नाही. एखादं शेंबडं पोरगं अतीच शार्पपणे पत्ता सांगतं तर एखादा चुणचुणीत दिसणारा मुलगा बावळटासारखा बघत बसतो. रिक्षेवाल्यांचा एक निराळाच घोळ असतो. त्यांना आपण काय म्हणत आहोत ते नेमके उलटे वाटते. म्हणजे आपण पत्ता विच्रारत असलो तर त्यांना वाटते की भाडे आले आणि आपण रिक्षा हवी आहे म्हणून ठिकाणाचे नांव सांगितले तर ते पत्ता सांगायला लागतात. त्यामुळे दोघांमध्ये आधी एक वैचारीक समन्वय घडवून आणण्यात काही असह्य क्षण व्यतीत होतात. एकदा मला एकाच स्पॉटला तीन वेगवेगळ्या माणसांनी तीन विरुद्ध दिशांना हात दाखवून जायला सांगितले होते. तिघेही तितक्याच प्रामाणिकपणे सांगत होते. पत्ता सांगणार्यांचा एक प्रकार असतो तो स्वतःला किमान आत्तातरी महत्व प्राप्त झाले आहे ह्या भावनेने सुखावून पार लांबून धावत पत्ता सांगायला येतो. त्याची देहबोली पाहून आपल्याला भरते येते खरे, पण त्याला तो पत्ता अजिबात माहीत नसतो. त्यामुळे धड त्याचेही काम होत नाही आणि आपलेही!
प्रत्यक्ष पत्ता सांगणे:
पता सांगणार्या माणसांचे प्रकार जितके चीड आणणारे असतात त्याच्या शेकडो पटीने संताप आणणारे असते ते प्रत्यक्ष पत्ता सांगणे! प्रत्यक्ष पत्ता सांगणार्यांचे तीन प्रमुख प्रकार पडतात. ज्यांना पत्ता नीट माहीत आहे ते, ज्यांना अर्धवट माहीत आहे ते आणि ज्यांना माहीत नाही आहे ते! पण हे तिघेही पत्ता सांगायला जातातच! पत्ता सांगण्याच्या तर्हा पाहून असे वाटते की भल्याभल्या संतप्रभृतींना आणून त्यांच्या संयमाची चाचणी घ्यायला हवी. 'दादू चौक कुठे आहे' ह्या प्रश्नाची किती अनंत प्रकारे उत्तर देता येतात हे आपल्याला समजू लागते.
- खालचा ओठ वरच्या ओठाच्याही वर नेऊन 'काय माहीत' अशी खुण करणे
- नुसतीच नकारार्थी मान हलवून माहीत नाही आहे की सांगायचेच नाही आहे हे कळू न देणे
- मान आणि भुवया उडवून दिशा दाखवणे
- हाताने किंवा बोटाने दिशा दाखवणे
- 'हे काय इथे पुढे दादू चौक' असे म्हणून येड्यात काढणे!
हे झाले दादू चौक कुठे आहे ह्या प्रश्नाच्या उत्तरांचे प्रकार!
पण उत्तरे देणार्यांच्या शैलींचे प्रकार भीषण असतात.
उलटेच्या पालटे धोरण - दादू चौक? इथे कुठे आला तुम्ही? फार लांब आलायत. दादू चौकात जायचंय ना? मग मागे वळा, तीन चौक ओलांडा आणि यू टर्न घ्या
जहाल अपमान धोरण - दादू चौक? इकडे कुठे पोचलायत? मधे विचारलं नाहीत काय कुठे? कुठून आलायत? दादू चौक पार त्या तिकडे आहे.
दिशादर्शक धोरण - एक काम करा. सरळ जा आणि तिसरा राईट मारा (स्वतःचा हात मात्र डावीकडे वळवलेला). तिथे गेलात की एक गिरणी दिसेल (गिरणीची खुण एखाद्या फूटबॉलवरून दोन्ही हात फिरवावेत तशी). तिथे विचारा
बादशाही धोरण - रस्त्यावर थुंकत, जागेवरून उठत, कपडे ठाकठीक करत, विजयी वीराच्या थाटात इकडे तिकडे बघत आपल्याकडे न बघताच म्हणायचे. स्ट्रेट जायचं, डावीकडे बघत जायचं, रॉक्सी डेपो लागला की लेफ्ट घ्यायचा, पहिला चौक म्हणजे दादू चौक! हे सांगून झाल्यानंतर आभार मानलेलेही ऐकायचे नाहीत.
घोळघालू धोरण - दादू चौक ना? हा बघा, हा रस्ता आहे खरा! पण इथे जरा खणलंय! तुम्ही आता एक काम करा. (असे म्हणत मान पार १८० मध्ये हलवायची आणि पत्ता सांगणार्याच्या पोटात गोळा आणायचा. आता हा काय उलटे जायला सांगतो की काय?) तुम्ही एक काम करा! असेच सरळ जा! बिग बझार आहे ना? तिथे यू टर्न घ्या! तिकडून या. पण तिकडे ते... अरे हो... तिकडे रस्त्याचे काम चालू आहे. एक काम करा. असल्या ठिकाणी गाडी आणायचीच नाही हो. गाडी लावा इथे. आणि इथून चालत जा.
अनाकलनीय धोरण - सरळ खाली जा, तिथून मारुतीपाशी वर जा, मग पलटी मारा आणि कोणालाही विचारा. ह्यातले आपल्याला काहीही कळत नाही. हे खाली, वर वगैरे नेमके काय असते तेच समजत नाही.
निसर्गविषयक धोरण - हे धोरण राबवणारे मानवनिर्मीती लँडमार्क्स मानत नाहीत. म्हणजे एखादे मोठे हॉस्पीटल, हॉटेल वगैरे सांगावे हे ह्यांना पटत नाही. असे लोक निसर्गातून उपलब्ध झालेले लँडमार्क्स सांगतात. 'तो चौथा वड दिसतोय का? तिथून राईट घ्या, एक पिंपळ लागेल. त्या पिंपळाकडे पाठ केली की दहा झाडं सोडली की चिंच आहे एक मोठी! तिथे विचारा!
प्रश्नार्थक धोरण - दादू चौकात कुठे जायचंय? बारटक्के? म्हणजे कुठे? प्रणिता टेलर्स होय? मग असं म्हणा की? गाडी कुठे लावणारे? बारटक्केंकडे जायचंय का नुसतं पिक अप करायचंय? कारण पार्किंग नाहीये.
ज्योतप्रज्वलन धोरण - दादू चौक? दादू चौक विचारू नका. कोणीही सांगणार नाही. संभाची वाडी विचारा. दादू चौक रस्तारुंदीत जाऊन जमाना झाला. (आपल्या अकलेची ज्योत तिथे पोचल्यावर पेटते)
अंडे प्रथम की कोंबडी धोरण - दादू चौक? कुठला दादू चौक? दादू चौक नाही बुवा माहिती! ए राजा, दादू चौक कुठला रे? (तिकडून राजा बोंबलतो, अरे तो बारटक्के राहतो तो. मग हा माणूस आपल्याला म्हणतो). तो चौक हवाय होय तुम्हाला? बारटक्के विचारा, कोणीही सांगेल दादू चौक कुठे आहे ते! (आपण म्हणतो, अहो बारटक्केंकडेच जायचंय). आँ? मग दादू चौक कसला विचारताय? अहो बारटक्के आहे म्हणून चौकाचं नांव दादू चौक आहे.
भाषिक अभिमान धोरण - हे धोरण अंगिकारणार्याला समोरचा परगावातून आलेला आहे, त्याला आपले उच्चार समजणार नाहीत वगैरे घेणेदेणे नसते. हे लोक अत्यंत वेगवान उच्चार करत पत्ता असा सांगतात. 'स्रळ (सरळ) स्टेट (स्ट्रेट - म्हणजे पुन्हा सरळच) गेलाएनाय (गेलात की नाही - म्हणजे गेलात ना) की साय्वाद्येऊआग्तंय (साईबाबाचं देऊळ लागतंय) , थित्तून फुड्गेआयनाय (तिथून पुढे गेलात की नाही) कीर्र्राईट्लाव्ळा (की राईटला वळा). हे वाक्य सलग ऐकायला असं ऐकू येतं.
स्रळ स्टेत गेलाएनाय की साय्वाद्येऊआग्तंय, थित्तून फुड्गेआयनाय कीर्र्राईट्लाव्ळा!
आता काय घंटा समजणार दादू चौक कुठे आहे ते?
काहीजण मात्र असे असतात की त्यांना पत्ता विचारणार्याच्या केविलवाण्या मनस्थितीची कल्पनाच असते असे नव्हे तर ते पत्ताही अगदी व्यवस्थित सांगतात. असे लोक भेटले की गहिवरून येते.
स्वतःचा पत्ता सांगणारे लोकः
ही एक निराळी वन्य जमात आहे. तिचा प्रगत, विकसित जगाशी आजवर संबंध आलेला नाही. आपण, आपले घर, घराच्या आजूबाजूचे शेजारी, आपली गल्ली, गल्ली पूर्ण अनावश्यकपणे ज्या रस्त्याला फुटली आहे तो रस्ता, तो रस्ता ज्या चौकातून उगाचच निघतो तो चौक आणि तो चौक ज्या परिसरात अजिबात असण्याची गरज नव्हती तो परिसर हे सगळे काही आपल्यामुळे अस्तित्त्वात असून ह्यापलीकडे जग नाही असे त्यांना वाटत असते. 'तू केव्हा येणारेस? सहा वाजता? बरं पत्ता सांगतो. तसा सोपाय! तुझ्या इथून मेनरोडला लागलास ना? की सरळ खाली जा तीन किलोमीटर! बिग बझारपाशी राईट घे आणि पुढे रॉक्सी डेपोला लेफ्ट मार! तिथे दादू चौक विचार. दादू चौकात आलास की बारटक्के कोणीही सांगेल. काय? हो हो, बिग बझारपाशी कोणालाही विचार, दादू चौक फेमस आहे. अगदीच अडचण आली तर फोन कर. नाही तर मग दादू चौकात येऊन उभा राहा, मी येईन घ्यायला. नाहीतर तिसर्या वडापाशी थांब आणि फोन कर. पार्किंग ना? कर रे बिनधास्त! नाही नाही, आत्ता नाही पकडत!
असे हे लोक स्वतःला त्या एरियातील एक लोकोत्तर पुरुष समजतात. 'कोणालाही विचार' हे दोन त्यांचे अत्यंत आवडते शब्द असतात. प्रत्यक्षात हा बारटक्के गल्लीतही कोणाला माहीत नसतो.
पत्ता ऐकून आपल्याकडे येणारे लोकः
आपण आपला पत्ता कितीही, पुन्हा लिहितो, कितीही नेमकेपणाने सांगितला तरी आपल्याकडे येऊ पाहणारे आपल्याला वाटेतून किमान तीन कॉल्स करतात. एक सद्गृहस्थ तर माझ्या घराच्या अर्ध्या किलोमीटरवरून फोन सुरू ठेवूनच आले होते. ते मला कॉमेंट्री ऐकवत होते. 'हं, आता धनलक्ष्मी लागलंय, शेजारी एक भेळवालाय भेळवाला, तिथेच का? आं? केमिस्ट? केमिस्ट नाहीये इथे. एक भिकारी दिसतोय. आं? एक बाई चाललीय बाई, अशी पिवळी साडी नेसून'
ही असली वाक्य ऐकून मी काय कपाळ पत्ता सांगणार समजावून?
त्यात डोअर डिलीव्हरीसाठी येणारे लोक तर महानच! त्यांच्या मालकाला आपला नंबर त्यांच्या स्क्रीनवर दिसला की शेजारी डिटेल्ड पत्ताही दिसतोच, आपण त्यांच्या सिस्टीममध्ये असल्यामुळे! तरीही ते एकदा आपलाच पत्ता आपल्यालाच फोनवरून ऐकवतात. तो आपल्यालाच ऐकायला लागतो आणि 'राईट, बरोबर, एक्झॅक्टली' असे काहीतरी म्हणत राहावे लागते. पण खरा प्रॉब्लेम त्यानंतर सुरू होतो. त्या पिझ्झाचा किंवा आऊटलेटचा मालक आणि आपण ह्यांच्यात झालेला तो सुसंवाद त्यांच्या डिलीव्हरी बॉयपर्यंत काही केल्या पोचलेला नसतो. तो तिथून निघतानाच एक फोन करतो आणी सगळे पुन्हा विचारून घेतो. मग वाटेतून तो तीन फोन करतो. शेवटी आपण आपल्या इमारतीतून उतरून चालत शंभर पावले जाऊन पायउतार झाल्याचे त्या बॉयला कळवल्यावर मग त्याचा इगो सुखावतो आणि तो आपल्याला भेटतो.
एकंदरीत असे लक्षात येते की पत्ता असणे, पत्ता सांगणे, पत्ता शोधणे, पत्ता विचारणार्याला मदत करणे ह्या सर्वच बाबी माणसाच्या इगोशी निगडीत आहेत. 'माझा पत्ता शोधता येत नाही म्हणजे काय?' 'मी किती परफेक्ट पत्ता सांगितला होता, तरी ह्याला इथे पोचता येत नाही?' 'अरेच्च्या? कोणालाही विचार म्हणायला तू कोण रे टिकोजीराव?' असे सगळे विचार आपल्या मनात आणायला हा एक पत्ता कारणीभूत ठरू शकतो. आपला पत्ता आपल्यालाच दहा वेळा विचारत विचारत कोणीतरी आपल्याकडे येत आहे ह्याचे हल्ली प्रेशरच येते डोक्यावर! आपल्यालाही कोणाचा तरी पत्ता विचारत विचारत कुठेतरी जायचे असले की वैताग येतो. त्यात भगीरथ प्रयत्न करून त्यांचे घर सापडले तर त्यांच्याकडे एक भले मोठे कुत्रेच असते. मी तर हल्ली पत्ता विचारतानाच विचारतो की तुमच्याकडे कुत्रे नाही आहे ना? वर हेही सांगतो की मला एखाद्या चुकून, आई वडिलांनी योग्य त्या प्रिकॉशन्स घेऊनही जन्माला आलेल्या आणि चिमूटभरही जीव नसणार्या कुत्र्याचीही भीती वाटते. स्पष्ट असलेले बरे! आधी एक तर वैतागून तिथे जायचे आणि वर घाबरवून घ्यायचे, सांगितलेय कुणी?
वांगी बोळ, बुरुड आळी, झपे गल्ली, शिंत्रे गोदाम, उडके वखार असली पराकोटीची कंटाळवाणी नांवे जर पत्त्यात आली तर मला तो पत्त्याचा कागद चावून चावून थुंकावासा वाटतो. अरे जरा काहीतरी चांगलं नांव ठेवा की आपल्या भागाचं? विद्या बालन बोळ! बिपाशा आळी! सोनाक्षी गल्ली! डिंपल डेपो! मनीषा कोईराला पेस्ट्री शॉप! काय तर म्हणे वांगी बोळ!
'काय? आजकाल पत्ता कुठेय तुझा?' असे विचारणार्याचे मला थोबाड फोडावेसे वाटते. म्हणजे मी राहतो तिथेच राहतोय, हा लेकाचा स्वतःला औरंगजेब समजतो आणि आज समोर आला तर मलाच विचारतोय की पत्ता कुठेय तुझा? एक तर 'पत्ता' म्हंटले की कानशिले तापू लागतात हल्ली!
परवा एकाने मला काय पत्ता सांगावा? इथून यू टर्न घ्या. पुढे लेफ्टला एक बंद पडलेला पेट्रोल पंप आहे. तिथून आत गेले की एक पडीक शाळा आहे पूर्वीची! तिथून पुढे गेले की बंद पडलेली केमिकल फॅक्टरी आहे. त्याच्यासमोर ते ऑफीस आहे.
मी मनात म्हंटलं की ते ऑफीस जिथे चालू असेल तिथे आजूबाजूला सगळे बंदच पडणार की?
पत्ते शोधण्यात आयुष्य चाललेले आहे.
एक दिवस आयुष्य कुठे गेले ह्याचा पत्ताच लागणार नाही.
=====================================
-'बेफिकीर'!
एकच वाक्य बोलेन.......धन्य
एकच वाक्य बोलेन.......धन्य आहात तुम्ही..........................!!!!
मस्तच!!!!!!! एक दिवस आयुष्य
मस्तच!!!!!!!
एक दिवस आयुष्य कुठे गेले ह्याचा पत्ताच लागणार नाही. >>>>>> एकदम जबरी.
(No subject)
एकच वाक्य बोलेन.......धन्य
एकच वाक्य बोलेन.......धन्य आहात तुम्ही..........................!!!! >>>>+१११
जबरी ... मस्तच
जबरी ... मस्तच
:)
:):)
बेफी__/\__
बेफी__/\__
छान लिहिलंय बेफी. पण आजकाल
छान लिहिलंय बेफी. पण आजकाल आहात कुठे? मुशायरा नाही... मैफल नाही... सम्मेलन नाही... फोन नाही...
तुमचा पत्ता कुठे आहे?
धोरणं खूप आवडली बेफी मध्ये
धोरणं खूप आवडली बेफी
मध्ये मध्ये जरा पाल्हाळिक झालाय. खास करून पत्ता सांगणारा एक इसम... स्किप्च केलं मग एक दोन वाक्य वाचून.
लाफिंग @ युअर कॉस्ट!!!!
लाफिंग @ युअर कॉस्ट!!!!
भन्नाट लिहिलंय ... वरच्या
भन्नाट लिहिलंय ... वरच्या अनेक कॅटेगरी मधे अनेकदा मोडून पडलोय
पत्ते पत्ते पे लिखा है रहने
पत्ते पत्ते पे लिखा है रहने वाले का नाम
मध्ये मध्ये जरा पाल्हाळिक
मध्ये मध्ये जरा पाल्हाळिक झालाय. खास करून पत्ता सांगणारा एक इसम... स्किप्च केलं मग एक दोन वाक्य वाचून. >> +१ दक्षिणा.. तो पॅरा सलग असल्यान झाल असाव तसं ..
बाकी आवडलं .. लिहित राहा
मस्त
मस्त
बेफि, अहो, पॅराग्राफ वगैरे
बेफि, अहो, पॅराग्राफ वगैरे पाडत जा की जरा. तो पत्ता सांगणारा रस्त्यावरील एक माणूसः वाला पॅरा काय करून ठेवलाय?
मला न उलगडलेला एक प्रश्न आहे. समजा मला कुणी सांगितलं की उदा. ब्रेमन चौकात ये. मी त्या चौकात पोहोचल्यावर हाच तो ब्रेमन चौक असे सांगणारी पाटीबिटी का नसते तिथे?
मध्ये मध्ये जरा पाल्हाळिक
मध्ये मध्ये जरा पाल्हाळिक झालाय. खास करून पत्ता सांगणारा एक इसम... स्किप्च केलं मग एक दोन वाक्य वाचून. >> +१
बाकी मस्तच !!
<< मला कुणी सांगितलं की उदा.
<< मला कुणी सांगितलं की उदा. ब्रेमन चौकात ये. मी त्या चौकात पोहोचल्यावर हाच तो ब्रेमन चौक असे सांगणारी पाटीबिटी का नसते तिथे? >>
ब्रेमेन चौकात पाटी आहे. मी स्वतः पाहिली आहे. हिरव्या रंगाची त्यावर पांढर्या रंगात लिहीलं आहे. पाट्या लावल्यावर नंतर चौकात जी अतिक्रमणे होतात त्यामुळे मग बरेच वेळा पाट्या दिसायला अडचण होते.
मस्त
मस्त
पत्त्याच लिहील आहे बेफि -
पत्त्याच लिहील आहे बेफि - मस्तच .
बेफिकीर.. आवडल.. मस्त लिहील
बेफिकीर.. आवडल.. मस्त लिहील आहे. जबरी ऑब्झर्व्हेशन
इथे अमेरिकेत बर्याच वर्षांपासुन गार्मिन(जि. पी. एस).झिंदाबाद!
तसेही इथल्या सिटीज वेल प्लान्ड असतात व बहुतेक रस्ते काटकोनात असतात.सिटि़ज मधे बहुतेक वेळा.. इस्ट वेस्ट रस्ते नंबरचे व नॉर्थ साउथ रस्ते नावांचे असतात. तसेच इंटर्स्टेट हायवेज वर ... नॉर्थ साउथ हायवेज ऑड नंबर व ईस्ट वेस्ट हायवेज इव्हन नंबर.. असा इथला युनिव्हर्सल कोड आहे. त्यामुळे मुंबई पुण्यासारखी (पत्ते) जास्त शोधत बसायची मजा(?) इथे येत नाही
रँड मॅकनेलीज चे मॅप्स तर इतके जबरी असतात की गार्मिन जी पी एस युनिव्हर्सल व्हायच्या आधी नुसते मॅप्स बघुन सर्व अमेरिकाभर फिरलो आहे.. मुंबई-पुण्याचे मॅप्स गार्मिनला बनवायचे असतील तर दादु चौकासारखे अनंत चौक व वांगीबोळी सारख्या असंख्य बोळी बघुन त्यांच्या स्टाफला चक्करच येइल!:)
तंतोतंत !!
तंतोतंत !!