डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – संदर्भासहित स्पष्टीकरण करा !
SPOILER ALERT: लेखातील काही वाक्यांमधून कथानकाचा उलगडा होऊ शकतो. त्यामुळे सावधान !
विद्वान लोक [म्हणजे अर्थातच आम्ही नव्हे] असं म्हणतात की मूळचे रामायण आणि महाभारत हे ग्रंथ अगदी छोटे होते. पण नंतर मात्र सांगणार्या प्रत्येकाने त्यात आपल्या ‘हात’चे लावले. अश्या बूंद बूंदने हे ज्ञानाचे सागर तयार झाले . याचप्रकारे सर आर्थर कॉनन डॉयलच्या मूळ शेरलॉक होम्सचं बंगालीकरण- भारतीयकरण करून शरदिंदु बंदोपाध्याय यांनी व्योमकेश बक्षी आणि अजित [म्हणजे आपला देशी डॉ. वॉटसन बरं का !] यांना जन्माला घातले. त्यात नंतर अनेक सिनेमा-नाट्य-टीव्हीकारांनी आपापल्या परीने तिखट मीठ लावून वेगवेगळी व्यंजने तयार केली. त्यातलंच एक ताजं व्यंजन म्हणजे दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी’. आता हे व्यंजन तिखट, तुरट की आंबट हे ज्याने त्याने सिनेमागृहात जाऊनच ठरवायचं आहे.(ही गोष्ट परंपरागत समीक्षक सर्वात शेवटी सांगतात, पण आम्ही प्रामाणिक आहोत. असो.)
मला तरी हा सिनेमा पाहून पुणेरी पाणचट पाणीपुरी खाल्ल्यासारखं वाटलं. म्हणजे तोंडाला जरावेळ बरं वाटतं पण खालच्या ओठाखालच्या जागेवर काही ‘झनझनाहट’ ‘महसूस’ होत नाही की पाणीपुरीच्या गाडीवरून घरी पोचेस्तोवर तिची चव जिभेवर रेंगाळत नाही. मूळ व्योमकेश बक्षीच्या पात्रावर शेरलॉक होम्सचा कितिही प्रभाव असला तरी त्याचा सिनेमा करताना त्याच्यावरही हॉलीवूडचा प्रभाव देण्यात काय कारण होतं, हे काही कळलं नाही. हिंदी सिनेमाचा मल्टीप्लेक्सी प्रेक्षक खूपच प्रगल्भ, ज्ञानवंत वगैरे आहे असा लेखक-दिग्दर्शकाचा गोड गैरसमज झाला असावा असे वाटते इतकी पटकथा किचकट लिहिलेली आहे.
सर्वसामान्य भारतीय प्रेक्षक जेव्हा हॉलीवूडचा ‘इंसेप्शन’, ‘किंग्स स्पीच’ किंवा गेलाबाजार ‘बॅटमॅन’ पाहायला जातो तेव्हा काहीतरी डोक्याला खुराक देणारं, क्वालिटी एंटरटेनमेंट देणारं बघायला मिळणार या अपेक्षेने मेंदू अगदी जागच्या जागी नसला तरी खालच्या खिशात का असेना परंतु आपल्या सोबत घेऊन जातो. पण तोच प्रेक्षक हिंदी सिनेमा पाहायला जाताना मात्र (समीक्षकांच्या सल्ल्याप्रमाणे आणि हिंदी सिनेमाच्या बदलौकीकाला जागून) मेंदू घरीच ठेवून जातो. आता अश्या बेसावध प्रेक्षकाला सिनेमागृहाच्या अंधार्या खिंडीत गाठून तुम्ही एकदम त्याला दुसर्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम, चिनी आणि जपानी माणूस यांच्यातील फरक सांगा, ‘मेरे पिया गये रंगून’ हे गाणे वगळून भारत-रंगून ऐतिहासिक-सांस्कृतिक-राजनयिक (हा ‘मराठी’ वृत्तपत्रातील नवा शब्द ) संबंध स्पष्ट करा, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’वाले मुंगेर अखंड भारताच्या नकाशावर दाखवा, ‘अफीम’पासून हेरॉईन कसे बनते (शेणापासून गोबर गॅस कसा निर्माण होतो या चालीवर) याची रासायनिक प्रक्रिया सांगा, टपालपेटी ते विविक्षित ‘पानेवाला’ इथपर्यंत एका पत्राचा प्रवास कसा होतो हे सोदाहरण स्पष्ट करा इ.इ. भयानक प्रश्नांची ‘चंदेरी’ प्रश्नपत्रिका दिल्यावर त्याची अवस्था ‘नेट-सेट’ग्रस्तासारखी अवघडल्यासारखी न झाली तरंच नवल.
पडद्यावर काय चाललं आहे हेच बिचार्या प्रेक्षकाला (माझ्यासकट) कळत नाही. परंतु हे मान्य करायलाच हवं की १९४२-४३ चा काळ उभा करण्यात सिनेमाकारांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे. पानाच्या तबकापासून ते मच्छरदाणीपर्यंत त्या काळच्या वस्तू दाखवण्यात खूप अभ्यास केला आहे,प्रचंड पैसा खर्च केला आहे. पण हे सगळं बघायला, पडद्यावरचं जुनं कलकत्ता एंजॉय करायला पटकथेने ,कॅमेराने प्रेक्षकाला थोडी फुरसत द्यायला हवी. सिनेमाची पटकथा संथ आहे पण कथा गुंतागुंतीची असल्यामुळे प्रेक्षकाची मानसिक शक्ती ती समजून घेण्यातच खर्च होते. मुळात अशा तपासकथा- रहस्यकथा पडद्यावर पाहताना प्रेक्षकाच्या बुद्धीवर प्रचंड ताण येत असतो, त्याला अनेक पात्र, घटना लक्षात ठेवाव्या लागतात. कुठल्या फ्रेममध्ये आपण काय पाहिलं, कोण काय बोललं, मध्येच झळकलेल्या वृत्तपत्रात काय हेडलाईन होती अशा अनेक गोष्टींवर नजर ठेवावी लागते. आजकालच्या आणि त्यातल्या त्यात कॅज्युअल प्रेक्षकाकडून ही हिचकॉकी अपेक्षा ठेवणं चूक आहे. शिवाय त्यामुळे सिनेमाचं इतर नेपथ्य- संगीत यांचा आनंद घेता येत नाही.
परिस्थिती अजून गंभीर बनत जाते जेव्हा मूळ कथा ही आपल्या सामान्य जीवनाशी कनेक्ट होणारी नसते किंवा लेखक-दिग्दर्शक ती तशी करण्यात अयशस्वी होतो. डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षीचं नेमकं हेच झालं आहे. उदाहरणार्थ नुकताच येऊन गेलेला ‘किंग्समेन सीक्रेट सर्विस’ हा गुप्तहेरपट घ्या. त्यातही जगावर ओढवलेलं संकट आहे. त्यातला खलनायक हा सुद्धा खतरनाक आहे, पण त्याने वापरलेलं ‘टूल’ काय आहे तर ते म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला मोबाईल फोन. सामान्य प्रेक्षकाशी पटकन कनेक्ट होणारी, त्याच्या असामान्य बुद्धीला पटणारी गोष्ट. हे आहे सर्जनशील लेखकाचं लक्षण. याउलट ‘बक्षी’ मध्ये- ज्यांच्यातला फरकही आपल्याला ओळखता येत नाही अशा कोण्या चिन्या – जपान्यांच्या गॅंगवारमध्ये ७० वर्षांपूर्वीच कलकत्ता हे ‘ड्रग कॅपिटल’ झालं काय आणि नाही झालं काय, आपल्याला काही फरक पडत असतो. तसंच इतर पात्रांचा व्यवस्थित न होणारा परिचय, त्यांचे रोजच्या ऐकण्यात नसलेली नावे विशेषत: चिनी,जपानी बंगाली नावे, त्यांच्यातले नातेसंबंध,इतर व्यावसायिक संबंध इत्यादी समजेपर्यंत गोष्ट फार पुढे निघून गेलेली असते.
या सिनेमाचा दुसरा सगळ्यात मोठा ‘वीक पॉइंट’ आहे तो म्हणजे खुद गब्बर ! खुद्द व्योमकेश बक्षी! खुद्द सुशांतसिंग राजपूत ! तो कुठल्याही अॅंगलने व्योमकेश बक्षी वाटत नाही,किंबहुना गुप्तहेर वाटत नाही. त्याच्या चेहर्यावर ते तेज नाही. रिफ्लेक्टर लावून ते आणता येत नाही. अशा पात्रांसाठी आवश्यक असलेला स्टायलिशनेस त्याच्यात नाहीत. एकूणच राजपूतला हे पात्र झेपलेलं नाही असं माझं मत आहे. सिनेमा बराच वेळा अंधार्या,अपुर्या प्रकाशात असल्यामुळे बॉडी लॅंग्वेज, लकबी यांचा वापर करण्यास वाव होता. पण ते राजपूत आणि बॅनर्जी दोघांनाही जमलं नाही. कदाचित आम्ही रजत कपूरचा छोट्या पडद्यावरचा बक्षी आधी पाहिल्या असल्याने आमच्या अभिनयाबद्दलच्या अपेक्षा अवास्तव असाव्यात. इतका खर्च करूनही या लो बजेट टीव्ही मालिकेच्या उंचीला बक्षी सिनेमा पोहोचू शकला नाही असं माझं स्पष्ट मत आहे.
अनेकदा खुद्द बक्षीचे संवाद समजत नाहीत. हा हॉलीवूडच्या धर्तीवर हिंदी सिनेमात प्रबळ होत चाललेल्या तोंडातल्या तोंडात बोलण्याचा, अॅक्सेंट मारण्याचा, बोलणारी व्यक्ती फ्रेममध्ये न दाखवण्याचा इ.इ. ट्रेण्ड कितीही वास्तववादी, असला तरी भारतीय वातावरणाला शोभत नाही. आम्हाला लिप मूव्हमेंट पाहिल्याशिवाय डायलॉग समजत नाही. सवयीचा परिणाम दुसरं काय ? उदा. अनुष्का शर्माच्या ‘एन-एच-१०’ (हे एक पोस्ट मॉर्टेम पेंडिंगच आहे) मध्ये सुरूवातीचे व्हॉईस ओवर प्रकारचे डायलॉग कळत नाहीत. सुरूवातीच्या पाच- दहा मिनिटात प्रेक्षक अजून हॉलमध्ये येतच असतात, पंख्याखालची जागा शोधत असतात, नुकत्याच आलेल्या आपल्या दोस्तमित्रांना मोबाईलची स्क्रीन चमकवत जागा दाखवत असतात इ.इ. वास्तव सिनेमावाले हल्ली विसरत चालले आहेत. या सगळ्या गोंधळात अनुष्का शर्माचे आणि कोण तो त्याचे अॅक्सेंटमारू इंग्लिशप्रदूषित संवाद ऐकूही येत नाहीत आणि समजतही नाहीत. म्हणून पूर्वी सिनेमात आधी टायटल्स आणि मग पटकन एक गाणं दाखवायची चांगली पद्धत होती. लोकांना सेटल व्हायला वेळ मिळत होता. जाउ द्या, विषयांतर झालं.
तर हा सिनेमा दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे वगैरे प्रचार ठीक आहे. पण प्रेक्षकाला त्याबद्द्ल किती माहिती आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. पहिल्या महायुद्धाची शताब्दी गेल्यावर्षी आली आणि गेली ,आम्हाला माहितही झालं नाही. आता यावर्षी २०१५ मध्ये दुसरं महायुद्ध संपून ७० वर्षं होतील. पण आज आमच्यासारखे तिशीतलेच काय सत्तरीतल्या सामान्य माणसाला विचारलं तरी ही जागतिक मारामारी कोणत्या दोन पार्ट्यांमध्ये झाली, आपण कुठल्या पार्टीत होतो हे सांगता येईल का एक शंकाच आहे. अशा अज्ञानाच्या खोल सागरात पोहत असणार्या प्रेक्षकाला ‘दुष्मन का दुष्मन दोस्त होता है’ असे घिसेपिटे डायलॉग मारून उपयोग नाही. दोस्त कोण, दुश्मन कोण हे कोणाला माहीत? सिनेमात वारंवार हवाई हल्ल्याचे भोंगे वाजतात तेव्हा कधीतरी एकदा जपानी विमानं दाखवायची,एखादा मिचमिच्या डोळ्यांचा ‘सायोनारा,सायोनारा’ करणारा पायलट दाखवायचा म्हणजे निदान माझ्यासमोर बसलेल्या कॉलेजकुमार सहप्रेक्षकाला हे भोंगे कशाचे हा प्रश्न तरी पडला नसता.
जुन्या सिनेमांचे रिमेक, जुन्या नाटकांचं पुनरूज्जीवन , जुन्या गाण्यांचं रिमिक्स, जुन्या कथा-कादंबरी पात्रांचे पुन्हा-पुन्हा सिनेमाकरण-नाटकीकरण आपण कुठवर करणार आहोत,हा सुद्धा एक वेगळा विषय ‘बक्षी’च्या निमित्ताने चर्चिला जाणे आवश्यक आहे.
युरोप-अमेरिकेत युद्धपटांची, युद्धाच्या पार्श्वभूमीवरच्या सामान्य माणसाच्या कहाण्या सांगण्यार्या सिनेमाची परंपरा असेलही पण असल्या विषयातली आमची ‘बेबी’ आता कुठे थोडी थोडी रांगायला लागली आहे नाहीतर या विषयातील आमची ‘बॉर्डर’ रामानंद सागर कृत ‘आंखे’शी चालू होऊन ‘डॉ. डॅंग़’ च्या चरणापर्यंतच. सन्माननीय अपवाद- मद्रास कॅफे.
बक्षीचे ट्रेलर जेव्हा पहिल्यांदा मी फेसबुकवर पाहिलं तेव्हा सुद्धा मला ते ट्रेलर पाहून या सिनेमाबद्द्ल फारशी अपेक्षा नव्हती आणि आता सिनेमाच्या शेवटी इशारा केलेल्या त्याच्या सीक्वेलकडूनही.
ता:क: सिनेमातील खलनायकाबद्दल मी मुद्दमच लिहिणं टाळलंय. ती पडद्यावरच बघण्याची चीज आहे, किंबहुना सिनेमात सगळ्यात प्रेक्षणीय तीच गोष्ट आहे !
मी काही वर्तमानपत्राच्या
मी काही वर्तमानपत्राच्या पासवर फुकट पिक्चर पाहणार्यातला नसल्यामु...
ऋन्मेष, नाही. धागा भरकटवायला
ऋन्मेष, नाही. धागा भरकटवायला लिहीलं नाहीये. तशी सवयही नाहीये.
>>>
रमड, नाही आपण नक्कीच नाही. मी ते लेखकासाठी लिहिलेले, त्यांनीही ते मुद्दाम लिहिलेय असे वाटत नव्हते. नंतर त्यांनी कित्येक वर्षात आपण पुण्यात राहायला होतो असेही लिहिलेय त्यावरून कन्फर्मही झाले.
@ दुनियादारी,
हो मला एक मराठी माणूस म्हणून अभिमान आहे दुनियादारी चित्रपटाचा. जितका पुणेकरांना पुण्याचा असतो तितकाच अभिमान आहे. कितीही चिडवायचा अयशस्वी प्रयत्न करा तरी जसे विद्येचे माहेरघर सांस्कृतिक वारसा जपणारे पुणे हे पुणेच राहणार तसेच बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला दुनियादारी हा ब्लॉकबस्टर सुद्धा मराठी चित्रपटाच्या इतिहासातील एक मैलाचा दगडच राहणार!
असं तुम्हाला वाटतं
असं तुम्हाला वाटतं
असं तुम्हाला वाटतं >> मग
असं तुम्हाला वाटतं
>>
मग चित्रपट बघायला मी एकटाच असतो.
ऋन्म्या.. तुझं जाम कौतुक
ऋन्म्या..
तुझं जाम कौतुक वाटतं यार कधी कधी ! कसला ठाम असतोस स्वत:च्या मतावर !
ह्यात कसलाही उपरोध नसून तुझी मतं कितीही बाष्कळ वाटत असली, तरी त्यावर ठाम असण्याच्या तुझ्या स्पिरीटला मी लै मानतो. __/\__
रच्याकने, बॉक्स ऑफिसवर हिट
रच्याकने, बॉक्स ऑफिसवर हिट ठरला असेलच तर तो मैलाचा दगड वगैरे काही ठरणार नाही, फार फार तर दगड ठरेल
धन्यवाद रसप, पण मत ठाम असले
धन्यवाद रसप,
पण मत ठाम असले तरी मी हट्टी आहे, फ्लेक्जिबल नाही, समोरच्याचा विचार पटला तरी तो स्विकारणार नाही असेही नाहीये.
एखाद्याची विचारसरणी पटली आणि आपण आजवर चुकत होतो हे ध्यानात आले तर ते अंगीकारायाचे आणि पुढे जायचे.. हाच खरा या सोशलसाईट्सचा फायदा.
बाकी दुनियादारी आवडणे ही माय चॉईस आहे, इथे चूक का बरोबरचा प्रश्न येत नसल्याने आवडीवर ठामच राहणार.
आणि याबाबत ठाम असण्याच्या स्पिरीटचे मला कौतुकही नको कारण दुदारीचा चाहता मी एकटाच नाही, तर सोबतीला बॉक्स ऑफिसचे घवघवीत यश आहे
ऋन्मेऽऽष आणि अप्पाकाका,
ऋन्मेऽऽष आणि अप्पाकाका, पुन्हा गल्ली चुकलात
इकडे होउन जाउदे !!!
http://www.maayboli.com/node/52977?page=9
प्रशू, http://www.maayboli.co
प्रशू,
http://www.maayboli.com/node/52037
हिकडे का नको
हिकडे का नको >>>> हरकत नाही,
हिकडे का नको >>>> हरकत नाही, ११ पानानी स्वजोला सुपर्स्टार बनवल आहे, फक्त पुढील ११ पाने सुपरफ्लॉप बनवतील इतकच
(बापरे माझीही गल्ली चुकतेय वाटत )
(No subject)
बाकी चित्रपट व्योमकेश बक्षीचा
बाकी चित्रपट व्योमकेश बक्षीचा आहे तर फोटो सुशांतचा लावण्याऐवजी स्वस्तिकाचा का बरे लावला आहे?
टिआरपी वाढवण्याकरीता ? की "माय चॉईस" अंतर्गत ?
फक्त लेखाबद्दल बोलायचं
फक्त लेखाबद्दल बोलायचं तर..
तुमचा एक दृष्टीकोण असू शकतो ही गोष्ट मान्य आहे. तरी पण तुमच्याकडून जरा अपेक्षा असतात, त्यामुळे तुमचा अँगल पटला नाही.
कॅमेरा आणि नेपथ्य, वातावरणनिर्मिती हे या सिनेमाचं बलस्थान आहे. बहुधा परिणीता चे दिग्दर्शक हेच गृहस्थ होते ( उदयोन्मुख दिग्दर्शकाचा पुरस्कार घेणारा सर्वात वयस्कर दिग्दर्शक ). म्हणजे पीरीयड फिल्म्सचा दांडगा अनुभव आहे. पण या मधे त्या काळाचे तपशील अत्यंत बारकाईने उभे केले आहेत. अगदी संगमरवरी नामफलक सुद्धा. कथेतल्या तपशीलांवर मेहनत घेतली आहे. जो मनुष्य १९४० साली गायब झालेला आहे त्याचे कॉलेजचे वर्ष १९२० आहे. तसंच महायुद्ध चार वर्षे चाललं, म्हणून रंगून मधून पळून आलेली अभिनेत्री आणि नंतर रहस्य उकलत जातं तेव्हां महायुद्ध संपतानाच्या घटना या मधे जराही चूक नाही झालेली.
कथा उलगडण्याची शैली ही आजच्या काळाशी सुसंगत आहे. कारण काळ जुना असला तरी गोष्ट सांगण्याची पद्धत ही आजच्या प्रेक्षकासाठी आहे. सिनेमा संथ आहे म्हणजे खंडहर प्रमाणे नाही. प्रसंगांची लांबी पूर्वीच्या सिनेमाप्रमाणे मोठी आहे. याचं स्वागतच करायला हवं.
व्योमकेश बक्षी हा साधारण दिसणारा तरूण आहे. पूर्वी रजत शर्माने ही तो तसाच उभा केला होता आणि सुशांत राजपूतनेही त्याला न्याय दिला आहे. त्याचा अभिनय अगदी आउटस्टँडिंग नसला तरी ठीकठाक आहे.
स्पॉयलर अॅलर्ट : हा पॅरा वाचल्याने सिनेमाची रंगत कमी होऊ शकेल
पण डॉ गुहांकडे व्योमकेश बक्षी पहिल्यांदा जातो तेव्हां डॉ गुहा त्याचं खोटं बोलणं पकडताना जी कारणमीमांसा देतात त्यावरून ते ही डिटेक्टीव्ह सारखा विचार करणारे आहेत असं वाटतं. असा मनुष्य आपल्या सोबत राहणा -यांच्या वागणुकीतील बदल नोटीस करत नाही हा प्रश्न व्योमकेश बक्षीला का पडत नाही असं आपल्याला वाटतं. त्यासाठी त्या संवादाला कात्री लावायला हवी होती.
स्पोयलर अॅलर्ट समाप्त
लेखा मधे सुरूवातीला स्पॉयलर अॅलर्ट दिल्याबद्दल धन्यवाद. या सिनेमामधलं रहस्य गडद नाही, झिणझिण्या आणणारं तर नाहीच नाही. मुळात रहस्यपटाच्या पारंपारीक कल्पना डोक्यात ठेवून पाहूच नये. हा सिनेमा किंवा व्योमकेश बक्षीच्या कथा या रहस्यकथा नाहीतच. तर तपासकथा किंवा चातुर्यकथा म्हणून पहाव्यात तर त्याची गंमत अनुभवता येते.
रहस्यकथांच्या नावाखाली पाऊस, ओव्हरकोट, हॅट, सावल्या, अंधार या सर्वांचा वीट आलाय अक्षरशः .बरं संयम ठेवून पहावं तर शेवटी सिनेमात न येऊन गेलेलं पात्रं खूनी वगैरे निघतं किंवा नायकच खूनी असतो वगैरे. आता त्यात जराही नावीन्य राहीलेलं नाही. एखादा कहानी येतो म्हणून व्योमकेश बक्षीला लोक स्विकारतात.
मागच्या प्रतिसादात एक दोन
मागच्या प्रतिसादात एक दोन गोष्टी राहूनच गेल्या.... ( आता पुन्हा इडीटत बसत नाही म्हणून स्वतंत्र प्रतिसाद)
१. विक्रम गायकवाड चं काम. तुम्ही सिनेमा क्षेत्रात पीएचडी केलेली असो वा सामान्य प्रेक्षक म्हणून असा , दाद दिल्याशिवाय राहवत नाही.
२. कलादिग्दर्शकाचे नाव वाचले नाही.कामगिरीचा उल्लेख वर आला आहे.
३. दिवाकर मुखर्जींचं दिग्दर्शन (परीणिता वाले नव्हेत हे आता लक्षात आले.)
४. सुशांतसिंह राजपूत व्योमकेश बक्षीच्या गेट अप मधे संघ स्वयंसेवकासारखा दिसतो.
५. स्वस्तिका मुखर्जी ही नवी व्हॅम्प. ( हिच्या नावाने इमेज सर्च देऊ नका )
वरच्या अनेक मतांशी मी
वरच्या अनेक मतांशी मी थोडाथोडा सहमत आहे.
सिनेमा अजिबातच टाकाऊ आहे असं मी कुठेच म्हटलेलं नाही. पण वरील लेख बारकाईने वाचल्यास मी वारंवार 'सामान्य प्रेक्षक' असा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या दृष्टीकोनातून मी हे विश्लेषण केलेले आहे. हे विश्लेषण जर पूर्णपणे चुकीचे असेल तर मग एका आठवड्याच्या आता पिक्चर टॉकीजमधून उतरण्याचं आणि प्रेक्षकसंख्येच्या दृष्टीने सिनेमा फ्लॉप होण्याचं कारण काय ?
खरं म्हणजे ते जाणून घेण्यासाठी काही फिल्म अॅप्रीसीएशनचा कोर्स करण्याची गरज नाही. सिनेमाचा एक स्टेकहोल्डर या नात्याने टॉकीजच्या बुजुर्ग स्कूटरस्टॅंड अटेंडंटने मला सांगितलेलं एकच वाक्य पुरेसं आहे.
"कायको ऑनलाईन टिकट निकाला साब? कुछ गर्दी नही है काऊंटरपे . पिक्चर लोगोंके दिमागसे उपरसे जानेवाली है." असो.
माबोवरचा सुज्ञ,सुजाण,वेल रेड प्रेक्षक आणि घटकाभर करमणुकीच्या दृष्टीने सिनेमाला जाणारा सामान्य प्रेक्षक (यात सिंगल स्क्रीन थिएटरमधला 'पिटा'तला म्हणून हिणवला जाणारा प्रेक्षक आणि मल्टीप्लेक्स मधला सुशिक्षित,नवश्रीमंत प्रेक्षक हे दोन्ही आले) यांच्या अॅप्रोचमध्ये फरक हा राहणारच.
आज कुठलाही कलाप्रकार जसे की लेखन, नाटक, सिनेमा जे समजण्यासाठी थोडी तयारी, थोडा अभ्यास, त्यातले संदर्भ याची माहिती आणि थोडं अॅप्लिकेशन ऑफ माइंड आवश्यक आहे अशांना वाईट दिवस येत आहेत. याचं एक ढळढळीत उदाहरण म्हणजे पुलंचं ज्याला आपण एरवी एव्हरग्रीन म्हणून समजतो असं लेखनदेखील बोअर वाटणारे नव्या पिढीचे माझे मित्र आहेत. कारण त्यातले संदर्भ त्यांना माहीतच नाहीत, त्यामुळे त्यातली मजा ते घेऊ शकत नाहीत. उदा. बीबीसीआयला जीआयपीचा डबा जोडणे यावरची अंतू बर्व्याची कोटी आज संदर्भहीन आहे. हा विषय फार मोठा आहे.त्याबद्दल नंतर कधीतरी.
वाघमारे, कुठलीही कलाकृती भान
वाघमारे,
कुठलीही कलाकृती भान हरपून निर्माण केली जाते तेव्हां ती कुणाला आवडेल, न आवडेल याचा विचार केला जात नाही. व्योमकेश बक्षी मी दुस-या आठवड्यात पाहीला. फुल्ल होता शो. पण उतरलाच असेल, तर मल्टीप्लेक्सची गणितं वेगळी असतात म्हणूनही असेल. मी काही तज्ञ नाही, ना समीक्षक आहे.
तुम्ही एक संज्ञा अशी वापरली आहे की असा विचारात पडलो.. कि जोशातलं दार मंदपणे लागल.
पाहीला होता, आवडलाही. आता
पाहीला होता, आवडलाही. आता तपशील लक्षात नाहीत. खलनायकाबद्दल शंका येऊन गेली होती, हे चांगल्या रहस्यपटाचं लक्षण आहे. प्रेक्षकाला धक्का देण्यासाठी शेवटी अगदीच असंबद्ध व्यक्तीला आणणे याला रहस्यकथा न म्हणता चातुर्यकथा किंवा तपास कथा म्हणता येऊ शकतं. बक्षी ही तपासकथाच आहे, पण रहस्याची डूब देण्यात आणि टिकविण्यात संबंधित यशस्वी झाले आहेत.
Pages