कॅलिफोर्नियात सध्या प्रचंड (ऐतिहासिक, न भूतो…, लय बेक्कार वगैरे वगैरे) दुष्काळ पडला आहे आणि त्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत हे प्रसारमाध्यमांतून आतापर्यंत आपल्याला समजले असेल; २०१२ साली सुरु झालेल्या दुष्काळाचे हे सलग चौथे वर्ष आहे. अमेरिकेची सुमारे १२% लोकसंख्या इथे राहते आणि एकून उत्पन्नापैकी २०% उत्पन्न इथून येते (सुमारे २ ट्रीलियन डॉलर). (अवांतर: कॅलिफोर्नियाची अर्थव्यवस्था इतकी मोठी आहे कि जर तिचा स्वतंत्रपणे विचार केला तर ती जगात ७व्या क्रमांकावर येते.) त्यामुळे इथल्या घडामोडी देशाच्याच दृष्टीने एक चिंतेचा विषय असतो. असो. तर, २०१३ पर्यंतचा दोन वर्षांचा दुष्काळ मी तरी फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम म्हणून सोडून दिला होता. काय तर म्हणे दुष्काळामुळे लॉनला आठवड्यातून तीनच वेळा पाणी घाला पण सक्ती नाही कशाचीच वगैरे. २०१४ मध्ये त्याची तीव्रता लक्षात येऊ लागली. त्या वर्षी सेन्ट्रल व्हेली मधील काही छोटी शहरे वगळता इतर कुठे पाणीकपात करावी लागली नव्हती. पण दुष्काळाच्या सलग चौथ्या वर्षामुळे मात्र आता सगळ्यांनाच याच्या झळा बसणार आहेत याची जाणीव झाली. सर्वात मोठा परिणाम अर्थात शेतीवर झालेला आहे. शेतकी उत्पन्न २०१४ मध्ये ४% घटले होते (उत्पादन जास्तच घटले होते) आणि २०१५ मध्ये त्यात आणखी घट होणार हे निश्चित आहे. अमेरिकेत वापरला जाणारा ५०% पेक्षा अधिक फ्रेश प्रोड्यूस (भाजीपाला, फळे, दूध, मांस इ.) हा एकट्या कॅलिफोर्निया मध्ये उत्पादित होतो. त्यामुळे अमेरिकेतील अन्नपदार्थाच्या किमतीवर या दुष्काळाचा परिणाम येत्या वर्षात होणारच आहे.
गेली ३ वर्षे काही ठोस कारवाई करण्यास कचणारया राज्य सरकारला अखेरीस गेल्या आठवड्यात जाग आली आणि गवर्नर जेरी ब्राऊन यांनी तातडीने घरगुती (शहरी उद्योग आणि हॉटेल इ. सहित) पाणीपुरवठ्यामध्ये २५% कपातीचे आदेश दिले. ब्राऊनसाहेब शेतीच्या पाणीपुरवठ्याबाबतचा निर्णय काही आठवड्यांनी घेणार आहेत म्हणे. गंमत म्हणजे, राज्यातील एकून पाणी वापराच्या ८०% पाणी शेतीलाच वापरले जाते घरगुती वापरासाठी सुमारे २०% पाणी वापरले जाते. त्यामुळे, शेतीच्या पाणीपुरवठ्याचा निर्णय खर्या अर्थाने महत्वाचा. आधीच गेल्या तीन वर्षात अनेक शेतकर्यांचे आणि शेतमजुरांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यात कॅलिफोर्निया मधील पाणी हक्क (water rights) हे कायदेशीरदृष्ट्या अत्यंत जटील प्रकरण आहे. त्यातील अनेक लढाया अनेक वर्षांपासून अनेक कोर्टात (सुप्रीम कोर्टासकट) अव्याहतपणे चालू आहेत. त्याचबरोबर, लॉबिंग ग्रुप्समुळे शेतीसाठीचे पाणी हा एक चांगलाच राजकीय फोडणीचा विषय आहे. बघूया ब्राऊनसाहेब काय ठरवतायात ते. असो.
तर आता घरगुती वापराबद्दल. या २०% पैकी १४% पाणी हे एकट्या लॉस एंजिलीस शहर व उपनगरात वापरले जाते, ४% हे सॅन फ्रान्सिको बे एरियात तर उरलेल्या राज्यात फक्त २%च पाणी वापरले आते. गंमत अशी की लॉस एंजिलीस जवळ एकही मोठा पाणीपुरवठ्याचा स्त्रोत नाही. त्यामुळे तिथे लागणारे पाणी हे राज्याचा उत्तर भागातून पंप करून सुमारे ४०० मैल वाहून नेले जाते ! याला अर्थातच प्रचंड प्रमाणात उर्जा लागते - कॅलिफोर्नियाच्या एकून वीज वापरापैकी सुमारे २०% वीज ही फक्त पाणी लॉस एंजिलीसला वाहून नेण्यासाठी वापरली जाते (दरवर्षी सुमारे १०,००० मिलिअन युनिट्स = महाराष्ट्रातील १ कोटी घरे मिळून दरवर्षी जेव्हढी वीज वापरतात).
कॅलिफोर्नियाच्या पाण्याचे स्त्रोत म्हणजे पाउस आणि वितळणारा बर्फ़ - दोन्ही पडतात नोव्हेंबर ते मार्च दरम्यान. गेली ४ वर्ष पाउस कमी पडतोय आणि २ वर्ष बर्फ.गंमत म्हणजे अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये यंदा प्रचंड थंडी आणि बर्फ झाला (चुकीच्या किनाऱ्यावर अजूनही चालूच आहे :)) पण कॅलिफोर्निया मात्र कोरडाच राहिला. त्याची शेजारी राज्येदेखील (ओरेगन, नेवाडा - तसेही वाळवंटच आहे, Arizona इ.) थोडीफार कोरडी आहेत पण त्याची बरीच तीव्रता कमी आहे. ह्याला ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत की एल-निनो सिस्टीम याबाबत अजूनही संभ्रम आहे. ते काही असलं तरी ग्लोबल वॉर्मिंग मुळे या दुष्काळाची तीव्रता नक्कीच वाढली / वाढणार आहे. म्हणजे कसं हे थोडक्यात: जो स्नो फॉल (हिमवर्षाव) डोंगरांवर साठून राहतो त्याला स्नो पॅक म्हणतात. हा स्नो पॅकच उन्हाळ्यात वितळून नद्या आणि धरणामध्ये येतो. चांगला स्नो पॅक होण्यासाठी स्नो फॉल होण्यापूर्वी जमीन चांगली गोठून टणक होणे आवश्यक असते. म्हणजे बिलो फ्रीझिंग तापमान अनेक दिवस राहणे इ. जर जमीन टणक नसेल तर चांगला स्नो पॅक तयार होऊ शकत नाही. या वर्षी सरासरीच्या २५-३०% बर्फ पडूनही स्नो पॅक हा सरासरीच्या फक्त ८% च आहे. ग्लोबल वॉर्मिंग मुळे २०१४-१५ चा हिवाळा हा कॅलिफोर्नियामधील सर्वात उष्ण हिवाळा होता (warmest winter so far). किंबहुना, गेल्या १० वर्षात तापमानाचे अनेक उच्चांक सातत्याने मोडले गेले आहेत. तसेच उन्हाळ्यातील तापमानही वाढतच आहे - म्हणजे पाण्याची मागणीही वाढणार (त्याच प्रमाणात नाही, पण वाढणार). तसेच हायड्रो पॉवर जनरेशन कमी पण विजेची (एसी इ.) मागणी जास्त.
एक गोष्ट आहेच की या दुष्काळाची आणि भारतातील दुष्काळाची तुलनाच होऊ शकत नाही. कॅलिफोर्नियाचा घरगुती पाणीवापर सुमारे ५००-६०० लिटर प्रति माणशी प्रति दिन आहे; भारतात हा आकडा १००-१५० आहे (अनेक भागात याहूनही प्रचंड कमी). त्यामुळे २५% कपातीने कॅलिफोर्नियात काही जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही हे निश्चित. तसेच कॅलिफोर्निया मध्ये ग्राउंड वॉटर मुबलक असल्याने लोक बोअर / विहिरी खणून पाण्याची गरज भागवू शकतात आणि भागवतही आहेत. पण त्यालाही मर्यादा आहेत. ग्राउंड वॉटर टेबल गेल्या काही वर्षात घसरत आहे आणि पाणी हे एक सामुदायिक संसाधन आहे; एका माणसाने जर ते जास्त उपसले तर दुसऱ्या माणसाला ते कमी मिळेल.
आता यावर अनेक उपाय सुचवले गेले आहेत - पाणीकपात, पाणीबचत, कार्यक्षमता सुधारणा, पाण्याची किंमत वाढविणे (माझ्या मते सर्वात योग्य) वगैरे. नजीकच्या काळासाठी याहून अधिक फारसे पर्यायही नाहीत. पण दूरगामी दृष्टीकोनातून "नैसर्गिक संसाधने अमर्यादित आहेत" या गृहितकावर आधारलेले limitless growth हे विकासाचे प्रतिमान तपासण्याची अमेरिकेला आणि भारतासारख्या विकसनशील देशांनाही संधी आहे. त्याचबरोबर, यापुढील काळात अशा संकटाना सामोरं जाण्यासाठी आपण तयारच रहायला हवं. किंबहुना, ग्लोबल वार्मिंगमुळे त्यांची तीव्रता वाढणारच आहे (भारतात तर प्रकर्षाने - उदा. अनियमित मॉन्सून, हिमालयन ग्लेशिअल मेल्ट ई.).
या बाबतीत आपली काय मते आहेत, अनुभव काय आहेत, आणि भारतासारख्या देशाला काही शिकण्याजोगे आहे काय याची चर्चा करण्याकरता हा धागा काढला आहे.
भारतासारख्या देशाला काही
भारतासारख्या देशाला काही शिकण्याजोगे आहे काय >>>>> भारत ह्यातून काय शिकणार ? हे तर फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम! उलट भारताकडूनच शिका म्हणावं की वर्षानुवर्षे दुष्काळात कसं रहावं आणि शेती कशी चालवावी ते!
इथे जॉर्जियाता २००८ साली बराच दुष्काळ पडला होता. तेव्हा कार वॉश आणि लॉनला पाणी घालणे ह्यावर बरेच निर्बंध आणले होते. त्याकाळी इथे असणार अजून माहिती देऊ शकतील.
आम्ही पैदाच विदर्भात झालो ,
आम्ही पैदाच विदर्भात झालो , पाण्याची काटकसर हाड़ीमाशी रुजली आहे , ते असो पण अमेरिकन्स कितीही लंब्याचवड्या गप्पा मारू देत नैसर्गिक साधन संपत्ती बरबाद करत असतात सतत, अन्नाच्या बाबतीतही अमेरिकन्स सरसरी चाळीस टक्के अन्न वाया घालवतात, ह्या बाबतीत काही परंपरागत कमी पाणी असणाऱ्या प्रदेशातील मानव समुहाने अंगिकरलेल्या सवयी (उदा राजस्थानात पाण्याऐवजी वाळू ने भांडी स्वच्छ करणारे काही मरुस्थलवासी इत्यादि) तसे एडॉप्शन हे कालांतराने येणारा स्लो चेंज , इमीडियेट मधे पाणीकपात ही एक उत्तम स्टेप आहे , तुमच्या म्हणण्या नुसार ऐंशी टक्के पाणी जरी शेतीला जात असले तरी प्रगत अमेरिकन शेतकरी "डुबुक शेती" करत नसावे, प्लांटेशन फार्मिंग ला पाणी कपातीतुन वगळले तर उत्तम कारण प्लांटेशन फार्मिंग हे "foilage cover" असते एकार्थाने , सामाजिक वनीकरण वगैरे वर भर देणे हे ही केले जाऊ शकते,
भारत ह्यातून काय शिकु शकतो
इंडस्ट्रियल licencing मधे एनवायर्नमेंटल इम्पैक्ट असेसमेंट अजुन स्ट्रिक्ट करणे जेनेकरून परत एक मालीण गाव नकाश्यावरुन न पुसले जावे हीच इच्छा!!
पराग: नवीन इन्फ्रास्र्टक्चर
पराग: नवीन इन्फ्रास्र्टक्चर बांधताना आणि नवीन शहरं विकसित करताना त्यांचा नैसर्गिक संसाधनांचा वापर केन्द्रस्थानी ठेवणे ही महत्वाची शिकवण/संधी आहे भारतासाठी.
पाणि प्रक्रिया करुन रिसायकल
पाणि प्रक्रिया करुन रिसायकल करणे. सिंगापुर मध्ये स्वताचा पाण्याचा सोत्र नसल्याने ते पाणि रिसायकल करतात, ते पाणि पिण्यासाठी , लॅड्स्केप आणि एतर कामासाठी वापरतात. सध्या चेन्नई आणि दुबई मध्ये सिंगापुरियन new water plant टाकत आहेत.
खर्च किती येतो ते माहित नाही पण घरी साधरणता 1US$/1000 लिटर नी पुरवठा होतो. आणि new water generation company आणि utility company बर्यापैकी पैसा कमवतात.
निकीत, छान लिहिला आहेस लेख!!
निकीत,
छान लिहिला आहेस लेख!!
PNAS (Proceedings of the
PNAS (Proceedings of the National Academy of Sciences of the United States of Amrica) जर्नलमधलं आर्टिकलः
Anthropogenic warming has increased drought risk in California
भारत हा जगाचा गुरु आहे.
भारत हा जगाचा गुरु आहे. आम्हाला काहीही शिकण्याची गरज नाही. देशभर अवकाळी पाऊस पडतोय. पावसाळा मात्र कोरडा / कमी जातो. काय फरक पडतो ? कितीही कठीण परिस्थिती आली तरी देवाच्या भरवश्यावर हा देश नक्कीच त्यातून तरून जाईल. भूसंपादन विधेयक पास करणे हा देशाच्या पुढचा महत्वाचा प्रश्न आहे.
http://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-top-in-exploiting-proper...
जनतेची साधनसंपत्ती हिसकावण्यात महाराष्ट्र आघाडीवर!
महाराष्ट्रापुढील पाण्याचे भीषण संकट वेळीच ओळखून जलव्यवस्थापनाची योग्य नीती आखली नाही, तर महाराष्ट्राचा भविष्यकाळ भीषण असेल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले
लेखाचं शीर्षक आवडलं .. बघू या
लेखाचं शीर्षक आवडलं ..
बघू या चर्चेतून काय निष्पन्न होतं ते ..
निकीत, छान लेख. एल ए मधेच
निकीत, छान लेख. एल ए मधेच राहात असल्याने अजूनच जिव्हाळ्याने वाचला
घरगुती वापरासाठी लोकं इतकं पाणी कसं वापरू आणि नासवू शकतात ते इमॅजिन करते आहे. कदाचित भारतातून येऊन फारशी वर्षं न झाल्याने मी स्वतः अजूनही वॉटर सेव्हिंग मोडातच आहे.
पाण्याची किंमत वाढवणे सर्वात
पाण्याची किंमत वाढवणे सर्वात योग्य उपाय ह्यावर जरा अड़खळले ....
का बरं सीमंतिनी?
का बरं सीमंतिनी?
चांगला लेख. का बरं सीमंतिनी?
चांगला लेख.
का बरं सीमंतिनी? >> +१
पुर्ण कोस्टवर डिसॅलिनेशन
पुर्ण कोस्टवर डिसॅलिनेशन प्लांट बसवुन ते शेतीला आणि इतर कामांसाठी वापरता येईल.
माझी सोशलिस्टीक मेंटालिटी.
माझी सोशलिस्टीक मेंटालिटी. जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रित असावे अशी सरकार कडून अपेक्षा असते.
कॅलिफॉर्निया सारख्या राज्यात निवारा ह्या ओव्हरहेड वर इतका खर्च होतो की सामान्य कुटूंबाला खर्चाशी हातमिळवणी करणे दुरापस्त झाले आहे. कॅलिफोर्निया राज्यात अमेरिकेतील सर्वात अधिक होमलेस आहेत. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू जसे पाणीचे भाव वाढवणे हा एकच मार्ग आहे का आणि तो योग्य आहे का असे मनात आल्याशिवाय रहात नाही.
पाण्याचे रेशनिंग - उदा: ४ तास पाणी उपलब्ध असणे इ जास्त बरे असे वाटते.
भाववाढ सरसकट न करता, जास्त
भाववाढ सरसकट न करता, जास्त वापरवाल्यांसाठी करता येऊ शकेल.
भाववाढ सरसकट न करता, जास्त
भाववाढ सरसकट न करता, जास्त वापरवाल्यांसाठी करता येऊ शकेल. >>> म्हणजे कशी? टॅक्स साठी इन्कम स्लॅब्ज असतात त्याप्रमाणे का? म्हणजे इतक्या लिटर्स वापरासाठी इतका रेट. त्यापुढे गेलात तर अॅडीशनल इ. असं?
मुद्दा व्हॅलिड आहे पण मग
मुद्दा व्हॅलिड आहे पण मग लोकांनां पाण्याची काटकसर पचनी तरी कशी पाडायची?
तसंही लेखातल्या स्टॅट्स प्रमाणे २०% च घरगुती वापर आहे .. तेव्हा ८०% अॅग्रिकल्चर आणि इण्डस्ट्री करता पाण्याची भाववाढ केली तरी त्याचे रिपकर्शन्स् म्हणून महागाई वाढणारच बाकीच्या जीवानावश्यक गोष्टीं मध्ये ..
र्म्द, पाण्याचे भाव तसेच
र्म्द, पाण्याचे भाव तसेच असतात ..
आणि ऑलरेडी सरसकट वाढलेलेच आहेत (निदान आमच्या काउन्टी मध्ये तरी) ..
>> ४ तास पाणी उपलब्ध असणे
प्रामाणिकपणे, वाचूनच अंगावर काटा आला ..
सुरूवात दुपारी १ ते ४
आणि रात्री १२-४ पाणी बंद ठेवून करा बुवा ..
रेन वॉटर हार्वेस्टची लोकांना
रेन वॉटर हार्वेस्टची लोकांना सवय लावणे. नक्की माहिती नाही पण पूर्वी तस करणे अलाउड नव्हत/साधने नव्हती बहुतेक. आता चालते पण लोकांना माहिती नाही.
सशल, ते एवढ भयंकर नसेल. कारण लोक ग्रॅजुअली सिन्टेक्स सारखे उपाय शोधतील. भयंकर प्रकार म्हणजे अब्सोल्यूट रेशनिंग उदा: ४ जणांच्या फॅमिलीला ४ गॅलन पिण्याचे पाणी इ इ (इंडस्ट्रीत फार्म वर पण अशीच काही पध्द्त...)
<< तसंही लेखातल्या स्टॅट्स
<< तसंही लेखातल्या स्टॅट्स प्रमाणे २०% च घरगुती वापर आहे .. तेव्हा ८०% अॅग्रिकल्चर आणि इण्डस्ट्री करता पाण्याची भाववाढ केली तरी त्याचे रिपकर्शन्स् म्हणून महागाई वाढणारच बाकीच्या जीवानावश्यक गोष्टीं मध्ये ..>>

बरोबर. काल गव्हर्नर ब्राऊनने आणखी कडक नियम जाहीर केले तेसुद्धा मुख्यतः अॅग्रिकल्चर वगळूनच.
<<रिपकर्शन्स् म्हणून महागाई वाढणारच बाकीच्या जीवनावश्यक गोष्टीं मध्ये>> हे नको वाटते. त्यामुळे सध्या घरगुती वापरावर बंधने चालतील. LA county मध्ये ४-५ महिन्यापूर्वी पाण्याची बचत करणारी घरगुती साधी उपकरणे रेसिडेंट्सला free of cost दिली (तपशील नीट आठवत नाहीत आत्ता).
<<. स्मित सुरूवात दुपारी १ ते ४ डोळा मारा आणि रात्री १२-४ पाणी बंद ठेवून करा बुवा ..>>
लेख छान लिहीलाय. लोकसत्तामधे
लेख छान लिहीलाय.
लोकसत्तामधे काही महिन्यांपुर्वीच अग्रलेख आला होता यावर. नैसर्गिक साधने अमर्याद नाहीत, ती जपूनच वापरायला हवी. अशी शिस्त आता सर्वांनीच लावून घ्यायला हवीय.
सुरूवात दुपारी १ ते ४ डोळा
सुरूवात दुपारी १ ते ४ डोळा मारा आणि रात्री १२-४ पाणी बंद ठेवून करा बुवा >>>
सशल, हो की! ते लक्षातच नाही आलं. मग स्लॅब्जचे रेटस अजून जास्त वाढवण्याबद्दल म्हणत असेल अमितव.
अजून महागाई नको बाबा. कोतबो.
दोन एक महिन्यापूर्वीच्या
दोन एक महिन्यापूर्वीच्या wired मासिकात sea water harvesting बद्दल एक लेख होता, जगातला सगळ्यात मोठा desalination plat जो economically viable आहे असा इस्रायलमधे सुरू होत आहे. त्याच्या प्रगतीकडे सगळ्या दुष्काळप्रवीण क्षेत्रांचे लक्ष लागले आहे असे. त्यात कॅलिफोर्नियाचे पण नाव होते.
र्म्द स्लॅबचे रेट्स आपोआप वाढतात, फारसे काही न करता नियंत्रण ठेवण्याचा तो सोपा उपाय असतो. पण त्याला एक limitations आहेत. हे फक्त deterrant म्हणूनच लागू होतात. drinking water vs irrigation water ह्यालाही वेगळे रेट्स असतात बर्याच ठिकाणी.
आमच्याकडे पाण्याच्या
आमच्याकडे पाण्याच्या वापराच्या १३६% स्यूएज धरून कर लावतात (तिकडेही असेल कदाचित) त्यामुळे गवत हिरवं ठेवायला रात्रभर कारंजं करण्यापेक्षा नळीने थोड्यावेळात घातलं तर पाणी वाचत असावं. (अगेन मी किती वाचत मोजलेलं नाही, पण वाचत असावं असं वाटतंय) टीप: इकडे पाणी पुष्कळ आहे, एशियन फ्रुगल मनोवृत्ती आणि पैसे लागतायत ह्यामुळे वाचवतो.
छान लेख
छान लेख
सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख
सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख निकित. शेवटचा पॅरा पटला नाही. इथल्यापेक्षा आपल्याकडे पाण्याच्या बाबतीत जागरूकता अधिक आहे असेच वाटते.
धनि, का पटला नाही? मला वाटतंय
धनि, का पटला नाही? मला वाटतंय निकीतचा मुद्दा एव्हढाच आहे की भारतात तर ह्यापेक्षाही डायर सिच्युएशन आहे .. नविन टेक्नॉलॉजी, रीसर्च ह्यात कितीही म्हंटलं तरी अमेरिकेचा नंबर भारतापेक्षा बराच वरचा आहे .. जर कॅलिफोर्नियाच्या अनुभवातून खरंच काही नविन शोध, सिस्टीम्स् निघाले तर भारताला त्याचा का उपयोग असणार नाही? अमेरिकेतल्या भारतीयांनीं कुठल्याही डायरेक्ट्/इनडायरेक्ट पद्धतीने भारताची इन्फिरिऑरिटी (हे मी स्नॉबिश संदर्भात नाही म्हणत आहे आणि मी वापरलेला शब्दही योग्य आहे की नाही माहित नाही) हायलाईट केली तर एव्हढा राग का यावा? भारताबद्दलच्या कळकळीनेच ह्या विषयाची गाडी तिकडच्या पाणी टंचाईकडे नेली आहे ना? नाहीतर कॅलिफोर्नियापुरता प्रश्न म्हणून सोडून दिला असता ..
(अवांतराबद्दल क्षमस्व .. )
आणि निकीतचंच परागला दिलेलं उत्तर कोट करतेय परत एकदा:
>> पराग: नवीन इन्फ्रास्र्टक्चर बांधताना आणि नवीन शहरं विकसित करताना त्यांचा नैसर्गिक संसाधनांचा वापर केन्द्रस्थानी ठेवणे ही महत्वाची शिकवण/संधी आहे भारतासाठी.
सशल, माझ्या मते तरी इथली
सशल, माझ्या मते तरी इथली उदाहरणं न बघता भारतानी स्वता:च्या परिस्थितीवर उपाय शोधावेत. सध्या तरी भारतात अमेरिकेतल्या फोल गेलेल्या मॉल आणि खूप पाणी वापरणार्या सबर्बन विकासाचे अंधानुकरण सुरू आहे.
त्यामु़ळे नैसर्गिक संसाधनांचा वापर केन्द्रस्थानी ठेवणे हे पटते पण कॅलिफोर्नियाकडून (आणि एकूणच सबर्बन / अर्बन स्प्रॉल विकास) विकासाबद्दल कल्पना घेऊ नयेत असे माझे तरी स्पष्ट मत आहे.
चांगला , अभ्यासपूर्ण लिहीला
चांगला , अभ्यासपूर्ण लिहीला आहे लेख!
अजुन एक महत्वाचा मूद्दा बहुतेक आला नाही लेखात. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे वॉटर मेन ब्रेक्स. लॉस एंजिलीसमध्ये, बर्याच ठिकाणी - मी राहते त्या भागात वेस्ट हॉलिवूड ह्या भागांमधल्या वॉटर मेन, पाईपलाईन्स ह्या खूप जुन्या असल्याने अलिकडे पाईपलाईन फुटून हजारो, मिलिअन्स गॅलन पाणी वाया जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. माझ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्येच गेल्या ३-४ महिन्यात ३दा तरी असे झाले.
मागच्या वर्षी UCLA campus पाशी तर पूरच आला होता.
इथे बघता येईल हे असं कितीदा होते.. http://losangeles.cbslocal.com/tag/water-main-break/
बाकी, लेखात भारताला शिकण्यासारखे ही ओळ नसती तर आवडले असते. हे दोन वेगळे देश आहेत. डेव्हलपमेंटली वेगळ्या दिशांना असलेले, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. मला नाही वाटत इथले कुठले मॉडेल आन्सर भारतात उपयोगी पडेल.
छान माहीती.
छान माहीती.
Pages