स्वित्झर्लंड भाग ८ - अर्नीसी !

Submitted by kulu on 2 April, 2015 - 07:36

आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
स्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991
स्वित्झर्लंड भाग ६ - युफ http://www.maayboli.com/node/53065
स्वित्झर्लंड भाग ७ - सुरसी http://www.maayboli.com/node/53248

मार्था कडे रहायला येऊन पाच महिने उलटले होते. जुन सुरु होता. जुन म्हणजे खरं तर उन्हाळा. पण यावेळी बराच पाऊस सुरु होता. पाऊस मला आवडतोच. पण तो कोसळत असेल तरच. स्वित्झर्लंडला एकदम रड्या पाऊस. दिवसभर उगीच रीपरीप सुरुच! आणि नेमका वीकेंडलाच. अशा पावसात बाहेर जायला नको वाटत. आणि भिजता पण येत नाही कारण एकदम थंड पाऊस! पण माझे न मार्थाच्या कुंडलीत कुठेलेसे चार दोन ग्रह एकत्र आले असावेत, ज्यामुळे या सर्वांवर वचक ठेवणारा तो स्वामी सुर्य एका वीकांताला उगवलाच! आम्ही तर हिंडभवरेच, बाहेर पडलो! डॅनी त्यादिवशी त्याच्या एक मैत्रिणीकडे गेला होता. त्यामुळे तो नव्हता. हंस रुवेदी होता.
युरी नावाच्या स्विस कँटॉन मध्ये अर्निसी हे तळे आहे. तिथे छोटासा जलविद्युत प्रकल्प पण आहे! छोटा म्हणजे अगदीच छोटेखानी, पण त्याचा जलाशय देखणा असं मार्थानं सांगितलं! सकाळी ८ ला नाश्ता करुन बाहेर पडलो. अ‍ॅम्स्टेग ला जाऊन तिथुन एक केबल कार वर तळ्याजवळ नेते. पण कधी नव्हे ते वीकेंड ला सुर्य दर्शन झाल्याने सगळा स्वित्झर्लंड बाहेर पडलेला, अगदी लहान पोरांच्या सहली, तुफान तरुणाई, आणि लुटुपुटु करत त्या सर्वांच्या पुढे जाणारे म्हातारे न त्यांच्या म्हातार्‍या! मला न् मार्थाला टेंशन, एव्हढं जायचं आणि तिथे पण गर्दी असली पुढे तर..........! केबल कार साठी रांग तशी होतीच, एका वेळी चार जणांना सामावु शकणारी ती छुटकुली!
जाताना अगदी जवळच असलेली ही स्वछ नदी, आल्प्समधुन निघालेली ही आल्प्साई, एकदम नितळ!

डुलत डुलत वर येताना, साद देणारी ही हिमशिखरे!

ज्याना हाईट सीकनेस वगैरे असतो त्यानी एकदा इथे ट्राय करावं, निसर्गंच असा की सीकनेस वगैरे अगदीच विसरुन जायला होईल.

मला वाटलं इथे एवढ्या वरती कोण राहणार, पण वर येऊन बघितलं, तर शेतकर्‍यांची समर हाऊसेस आणि गोठे. उन्हाळ्यात इथल्या कुरणावर चरायला येतात............. शेतकरी नव्हे, त्यांच्या गायी ! Proud हिवाळ्यात परत गायी आणि त्यांचे शेतकरी ( Proud ) खाली येतात!

कुरणांतुन जाणारी ही नाजुकशी पाऊलवाट

कुरणांवर निसर्गाने रंगपंचमी खेळली होती, पिवळ्या फुलांचा रंग तर असा की प्रत्यक्ष सुर्याशी चुरस लागलेली. फुलं अक्षरशः वेड लागल्यासारखं डोलत होती.

आणि या सगळ्याच्या पाठीवर हा ध्यानस्थ उभा! आजोबा जसे खुर्चीवर निवांत बसुन वाड्यात बागडणार्‍या मुलांकडे बघत असतात तसं!

इथे राग देस अवतरलेला साक्षात!

सगळीकडुन दिसणारा तो आपल्याला समृद्ध करुन सोडतो!

कैलासला जाऊन आलेल्या माझ्या एका लांऽऽऽऽऽबच्या आज्जीने मला असं सांगितलेलं की कैलासाजवळच अजुन एक पर्वत आहे, जो काळा आहे, तर कैलास शुभ्र! नक्की कसंय काय माहित.पण इथे पण तसं आहे. का माहित नाही, पण हा कृष्णवर्णी पर्वत जास्त गंभीर आणि संन्याशासारखा वाटला!

काळुरामाच्या साक्षीने चढाई करणारे हे आमचे तरणे वीर!

आणि त्यांच्याही पाठुन येणारा हा लिडो. तिथे प्रवासात भेटलेला हा भुभु शेवटपर्यंत आमच्या बरोबर होता!

पाईन वृक्षांच्या आडुन बघणारा हा!

चालुन चालुन खुपच भुक लागली होती! तिथे एका माऊंटन रेस्त्राँ मध्ये चॅसह्यॉर्न्ली आणि अप्पल सॉस खाल्ला! रिवेल्ला तर होतीच सोबती. चॅसह्यॉर्न्ली म्हणजे पास्त्यासारखाच पदार्थ, पण त्यावर भरपुर चीज, मसाले, कोथिंबीर आणि उभा चिरलेला टोमॅटो असतो आणि हे एकत्र रोस्ट करतात! मस्तच असते चव हे सांगायला नकोच! खुप भुक लागली असल्याने फोटो काधायचा विसरलो Proud आणि सोबतीला माझी जिवलग रिवेल्ला! स्वीस वरुन आल्यापासुन रिवेल्लाचा एक घोटही माझ्या घशाखालुन गेलेला नाही! Sad

इथुन पुढे मग तळ्याकडे वाटचाल. तळ्याजवळ आलो तर हाय रे दैव, तळे स्वच्छतेसाठी मोकळे केलेले. आमचा रंकाळा पण असा सारखा मोकळा करण्याचं सुरु असतं मग तो स्वच्छ केला न केला करत तसाच पावसात पुन्हा भरतो. इथे मात्र स्वच्छतेचं काम सुरु होतं! त्या चिखलात काही लहान मुलांनी मस्त कल्ला माजवला होता आणि त्यात त्यांचे पालकही त्याना साथ देत होते!

तळ्याच्या काठाने जाणारी ही वाट, आणि त्यावर हातात हात घालुन चाललेले हे हीरा-पन्ना! (मी फोटो काढताना नेमके ते दोघे वाटेवर होते, नाहीतर मी मुद्दम जोड्यांचे फोटो काढतो असा समज करुन घेऊ नये)

तळ्याभोवती मुरकत जाणारी ही पायवाट. आणि त्या तिथे त्या घरात सुखी माणसाचा सदरा!

आकाश निरभ्र होते. पण तेव्हढ्या कुठुनसा आलेला ढगाचा हा पुंजका तेवढा निवांत लहरत होता, बराच वेळ तो पर्वताच्या टोकापासुन हलला नव्हता, मोहात पडला असणार!

जायची वेळ होती.
"वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे! " असं असताना तिथुन जायला मन धजेना! वेळ ही गोष्ट दुष्ट वाटते अशावेळी!

ते कोपर्‍यात घरासारखं दिसतय तिथुन खाली जायला केबल कार मिळाली!

जाता जाता डोळे सभोवार परत फिरवले. जीव गुंतला!

बस स्टोपवर आम्हाला ऑद्येय (गुड्बाय) करायला हा हळुच आला! बरं वाटलं! गंभीर माणसांचं प्रेमही खोल असतं तशातलच हे!

स्टॉपजवळ एक चॅपेल होतं.

येता येता तिथे एक मेणबत्ती पेटवली. जगात भरुन राहिलेल्या जगन्नियंत्याच्या त्या अफाट ऊर्जेला एक धन्यवाद म्हणुन!
बाबा, तु ठरवलंस म्हणुन तुझा हा पसारा पाहु शकलो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.. हा भाग मी बघितल्यासारखा वाटतोय ! ( कदाचित बसमधून बघितला असेल. किंवा तूझ्या वर्णनाने प्रत्यक्ष बघितल्याचा अनुभव आला असेल Happy )

सुंदर मालिका आहे. फोटो तर आवडलेच पण आमच्या फिरतीच्या नियोजनालाही उपयोगी पडेल. बरीच ऑफ बीट ठिकाणं आहेत.

खुप छान वर्णन केलय - प्रतिपण अप्रतिम आहेत आणि जोडीला पद्यपन्क्ति.
>> बाबा, तु ठरवलंस म्हणुन तुझा हा पसारा पाहु शकलो!
हे एकदम पटल!! जापान visit मध्ये तिथला निसर्ग पाहुन असेच वाटायच.

अमेझिंग अमेझिंग. लिहीतोस पण मस्त तू! मजा आली. तू या आख्ख्या सिरीजचं नाव 'सुखी माणसाचा सदरा' ठेवलंस तरी चालावं Happy जवळपास प्रत्येक ठिकाणी सापडलाच आहे तुला तो.

परत एकदा छान लिहलत.
गायी पण एकदम देखण्या, त्या घंटेसोबत.

( एवढ्या लहान इतकुश्या वयात बघायला मिळणे नशीबच. थोडं मोठ झाल्यावर ह्या ठिकाणांचा उपयोग होइलच.) Wink

कुलु....

नेहमीप्रमाणेच जितकी चित्रे सुंदर आणि मनात कायमची वस्ती करून टाकणारी....तितकेच तुझ्या लिखाणातील काव्यात्मकता....अगदी चित्रासारखीच नाजूक.

"...येता येता तिथे एक मेणबत्ती पेटवली..." ~ हे छान केलेस....त्याच्यामुळेच तर आपणाला हे सारे पाहायला मिळते ही जाणीव त्या निमित्ताने राखली आहेस तू.

वा! अतिशय सुंदर फोटो आणि लेखनशैली नेहमीप्रमाणे संगीतमय!

आनंदी आनंद गडे... देस रागातले आहे का? मी हा राग अजून शिकलो नाही.

सर्वांचे खुप खुप आभार! मामा आणि पुरंदरे काका , कसले भारी प्रतिसाद! Happy

कदाचित बसमधून बघितला असेल >>>>>>>> दिनेश, तु इतक्य वेळा स्वित्झर्लंड ला जाऊन आलायस की येता जाता कधी तरी हा भाग बघितला असशील ट्रेन किंवा बस मधुन! Happy

आनंदी आनंद गडे... देस रागातले आहे का?>>>>>>> बी नाही, ते कुठल्या रागातले आहे माहित नाही. देस वाटत नाही पण. माझ्या लिखाणामुळे तुमचा हा गैरसमज झाला! आता तिथे बदल करतो!

लवली. मस्त फिरणं होतंय. शब्दात सांगणं कठीण आहे माझ्यासाठी. सुरेख अनुभूती. शेवटी मेणबत्ती आणि तुझे वाक्य, क्या बात है.

Thanx कुलु.

समर हाऊसेस वाचल्यावर एक पुस्तक आठवलं, 'And now मिशेल' हे पुस्तक वाचलं (मराठी अनुवाद वाचला). एका मिशेल नावाच्या लहान मुलाच्या नजरेतून मेंढपाळ लोकांचे विश्व दाखवलंय त्यात. असेच ते काही महिने डोंगरावर लांब मेंढ्यांना चरायला नेतात.

काय सुंदर लिहिले आहेत.... ह्या भागात निसर्गा इतकेच तुमचे वर्णन आवडले..:)
सुखी माणसांच्या देशात रहात आहात...मजा करून घ्या!