शहरी शेती

Submitted by साधना on 6 March, 2015 - 10:39

गेली १५ वर्षे मी माझ्या छोट्याशा गच्चीत काहीनाकाही रुजवण्याचे उद्योग करत आहे. आधी कुंडीतुन सुरवात केली. एकेक करता करता शंभरेक कुंड्या जमल्या. तेव्हा शोभेच्या झाडांची जास्त हौस होती. गुलाब, जास्वंद, अबोली, शेवंती, बोगनवेल हे खास आवडीचे विषय होते. एका वेळेस तर आठ प्रकारच्या जास्वंदी माझ्या बागेत सुखाने नांदत होत्या. आपल्याला खायला काही मिळेल असे पिकवायचे डोक्यात कधी आले नाही. सगळे काही हौसेखातर होत असल्याने फक्त पैसे भरपुर जायचे. आणलेल्या रोपांमधली काही लिमिटेड आयुष्य घेऊन येत. ती बिचारी आपले आयुष्य संपले की निमुट जात. दीर्घायुष्यी रोपे जगत. माझे लक्ष असायचे पण कामात कधी वेळ मिळे न मिळे. त्यात माझा स्वभाव अतिशय लहरी. आली लहर की तासनतास खुरपे घेऊन खुरपत बसायचे. नाही तर महिनोन महिने दुर्लक्ष.

एकदा पेपरात वाशीच्या गुणे कुटूंबाबद्दल वाचले. त्यांनी त्यांच्या घरी अगदी उसापासुन सगळे लावलेले. पेपरातल्या बातमीमध्ये दिलेला त्रोटक पत्ता घेऊन घर शोधुन काढले आणि त्यांना भेटले. त्यांनी गांडूळे वापरुन गच्चीत शेती केलेली. फळभाज्या, पालेभाज्या, केळी, अंजीर, चिकु, सिताफळे, कलिंगडे, उस इत्यादी शेतमाल त्यांच्या गच्चीत सुखाने नांदत होता. म्हणजे पिक अगदी ब-यापैकी घेतले गेले म्हणायला हरकत नव्हती. अर्थात या सगळ्या प्रयोगांमध्ये आठवड्यात एक दोन वेळेची सोय झाली तरी खुप असे म्हणावे लागते. अगदी बाराही महिने पिक घ्यायचे तर अशक्य नाहीय पण अगदी लक्ष देऊन आणि नीट आखणी करुन काम करावे लागेल.

गुण्यांचे पाहुन मीही गांडूळ आणुन प्रयोग सुरू केले. अतिशय चांगले रिझल्ट्स यायला लागलेले.

गांडूळांसाठी साधारण ढिग पद्धत वापरा म्हणुन सांगतात. माती आणि कुजलेला भाजीपाला यांचा एक ढीग करायचा आणि त्यात गांडूळ सोडायचे. हा ढिग ओल्या गोणपाटाने झाकायचा. कारण हे सगळे सुकले तर गांडूळ मरणार. मी मात्र गुण्यांसारखेच सरळ कुंडीतच गांडूळ सोडले आणि रोज कुंडीत घरचा हिरवा कचरा टाकायचे, तो कुजला की गांडूळांचे अन्न म्हणुन काम करायचा.

पण हे सुरू केल्यानंतर एका वर्षातच घरदुरुस्ती सुरू केली आणि सगळ्या कुंड्या उचलुन एका शेजा-याच्या बागेत जमिनीवर नेऊन ठेवाव्या लागल्या. दोन महिन्यानी परत कुंड्या आणल्या तेव्हा त्यातले बहुतेक सगळे गांडूळ पसार किंवा नष्ट झालेले.

मग भाजीपाल्याच्याच कच-यावर आणि उरलेल्या थोड्याफार गांडूळांवर कुंड्या जगवत राहिले. कधीकधी मुड असला तर एखादी भाजी लावायचे. एखादे फुलझाड चांगले वाटले की आण विकत आणि लाव असे सुरू होते. पण सिडकोच्या घरात पाणीगळती फार. त्यामुळे लवकरच माझ्या खालच्या शेजा-यांनी ओरडा सुरू केला आणि मला बाग थोडी आवरती घ्यावी लागली. १०० कुंड्या आवरुन आवरुन २०-२५ वर आणल्या. पण इच्छा मात्र तेवढीच राहिली. Happy अधुन मधुन इकडचे तिकडचे वाचुन प्रयोग करत राहिले.

नंतर वैयक्तिक आयुष्यात खुप बीझी झाले आणि माझे बागेकडे दुर्लक्ष झाले. अधुन मधुन जाग येऊन बागेकडे वळत होते पण ते तेवढ्या पुरतेच. बागकाम हे माझे स्ट्रेस बस्टर होते पण वेळच उरेनासा झाला स्ट्रेसबस्टर वापरायला.

त्यावेळेस इंटरनेटने आपले जाळे पसरवायला सुरवात केली होती. मग ऑफिसातल्या फावल्या वेळेत शेतीविषयक काही सापडते का हे पाहातला लागले. मुंबईत कोण कोण शहरी शेती करतेय याचा शोध घ्यायला लागले.

या शोधात http://www.natuecocityfarming.blogspot.in/ आणि http://www.urbanleaves.org/ या एका गृपचा शोध लागला. याची संस्थापिका प्रिती पाटील ही एक भन्नाट बाई आहे. (http://www.maayboli.com/node/4453) तिला भेटुन आले. तिच्या गृपशी ओळख झाली. प्रितीकडे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कँटीनचे व्यवस्थापन आल्यावर या कँटीनमध्ये रोजच्या रोज निर्माण होणा-या कच-याचे फेकुन देण्याव्यतिरिक्त इतर काय करता येईल का हा किडा तिच्या डोक्यात वळवळायला लागला. शहरी शेतीचे उद्गाते डॉ. दोशी आणि डॉ. दाभोळकरांच्या प्रयोग परिवाराचे दिपक सचदे (http://beyondorganicfarming.in) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितीने या कच-यातुन ट्रस्टच्या गच्चीत भली मोठी शेती फुलवली. चक्क नारळाच्या झाडापासुन साध्या पालेभाजीपर्यंत सर्व काही तिने पिकवले.

निसर्गात उपजाऊ माती तयार होण्यास काही शेकडा वर्षे जावी लागतात पण डॉ. दाभोळकरांच्या प्रयोगाने तयार झालेल्या अमृत मातीत सहा महिन्याच्या कालावधीत प्रयत्नपुर्वक नैसर्गिक उपजाऊ मातीचे गुणधर्म आणता येतात. अशी अमृतमाती तयार करुन ती वापरुन तिच्यातुन प्रिती आणि तिच्या सवंगड्यानी शेती केली. पुढे तिच्या या प्रयोगांबद्दल इतक्या विचारणा होऊ लागल्या की तिने सवंगड्यांच्या मदतीने अर्बनलिव्ह्स हा ग्रुप स्थापन करुन त्याच्या माध्यमातुन हे काम मुंबईत पसरवला सुरवात केली.

प्रितीच्या अर्बनलिव्हजमुळे तिच्या citifarmers ह्या याहूग्रुपची ओळख झाली आणि आजही त्या माध्यमातुन भारतात कोण कुठे काय शेतीकामात किडे करतेय याची माहिती मला मिळतेय. मी जरी आज शेतकरी नसले तरी पुढे होण्याची इच्छा बाळगुन आहे. तेव्हा या माहितीचा उपयोग निश्चित होईल. निदान काय मदत लागली तर कुठे धावावे हे तरी कळेल. Happy

प्रितीला भेटून आल्यावर मी अमृतमाती बनवण्याचा प्रयत्न केला पण मला त्यात यश आले नाही. याचे कारण माझी धरसोड वृत्ती. त्यासाठी लागणारे शेण वगैरे माझ्या जवळच्या गोठ्यात उपलब्ध होते. मी सुरवातही केली पण नंतर आळसाने प्रकल्प पुढे न्यायचा कंटाळा केला. अशाच धरसोड वृत्तीत दिवस जात होते. कुंडीतली झाडे बापडी कशीबशी स्वतःचा जीव जगवत होती. वर्षातुन कधीतरी मुड लागला की त्यांच्या मुळांची माती सैल करुन त्यांना जरा मोकळी हवा खायला घालायचे. पण ते तितकेच.

दोन वर्षांपासुन मात्र परत एकदा लक्ष द्यायला लागले. दोन वर्षांत कुंडीत अननसे लावली, टाकलेल्या कच-यातल्या बियांपासुन टॉमॅटो, खरबुजे आली. तुरळक पालक, कोबी, माठ, शेंगदाणा इत्यादी प्रयोग केले. पुदिना, बेसिल, इतर इतालीयन हर्बस्चे प्रयोग करुन झाले. पण दीर्घकाळ टिकुन राहणारे असे काही केले असे मात्र काही झाले नाही. नेहमीची जी काय झाडे होती ती आपली तशीच राहिली स्वतःचा जीव सांभाळत. असाच मागुन आणलेला तोंडलीचा वेल मात्र या कालावधीत नित्य नियमाने एका वेळच्या मसाले भाताला पुरे होतील इतकी तोंडली देत राहिला. ते पाहुन अधुन मधुन परत सगळे सुरू करण्याची सुरसुरी यायची....... आणि मग आपोआप विझायची.

मुंबईत होणा-या प्रत्येक फळाफुलांच्या प्रदर्शनाला भेट देऊन वा-वा करण्याचे काम मात्र अगदी नेटाने दरवर्षी करत राहिले. आपल्याला जमले नाही म्हणुन काय झाले. इतर जे करताहेत ते निदान पाहिले तरी बरे वाटते.

निसर्गाच्या गप्पांवर गप्पा मारता मारता निळू दामले यांच्या झाड आणि माणुस या पुस्तकाचा उल्लेख झाला. बुकगंगावर पुस्तक होते, किंमत फक्त ९५ रुपये होती. दोन चार पाने वाचायला मिळाली ती बरी वाटली म्हणुन मागवले. ह्या पुस्तकात दाभोळकरांच्या प्रयोग परिवाराबद्दल माहिती आहे. प्रयोग परिवार आणि डॉ. दोशी यांनी प्रचलीत केलेली शहरी शेती आपल्या खिडकीत कशी करायची याचे सुंदर विवेचन या पुस्तकात आहे. दामल्यांनी आधी स्वतः शहरी शेती केली आणि मग ती लोकांना शिकवली. मी आजवर जे प्रयोग करत होते त्याला पुरक अशी माहिती पुस्तकात तर होतीच पण हे काम अजुन सोपे, अजुन कमी वेळात करता येईल ही आशा मला या पुस्तकाने दाखवली. शेतीचे ओळखवर्ग सायनच्या मराठी विज्ञान परिषदेत होतात ही माहिती पुस्तकात मिळाली. खरेतर दामल्यांच्या पुस्तकात मि़ळालेली माहिती पुरेशी होती. त्यावरुन सहज नवी सुरवात करता आली असती. पण इतक्या जवळ कोणी शहरी शेतीविषयी माहिती देतोय तर एकदा प्रत्यक्ष जाऊन पाहुयाच ही इच्छा मनात निर्माण झाली. तसेही मराठी विज्ञान परिषदेबद्दल खुप काही ऐकुन होते. या निमित्ताने भेट घडावी असे वाटायला लागले.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी शहरी शेतीचा ओळखवर्ग असतो ही माहिती नेमकी महिन्याच्या पहिल्या शनिवारी मिळाली. एव्हाना घरी परत एकदा दुरुस्ती चालु होती. पण उद्या वर्ग आहे आणि हा जर चुकला तर मग महिनाभर थांबावे लागणार या कल्पनेने मला स्वस्थ बसवेना. घरी काम चालु असतानाही मी सरळ गेले वर्गाला. तिथे गेल्यावर वाटले की आले ते बरेच झाले. दर महिन्याला साधारण १०-१५ लोक जमतात या वर्गाला. सध्या श्री. दिपक हेर्लेकर हे वर्ग घेतात. गेली दहा वर्षे ते हे वर्ग नियमित घेत आहेत.

दामल्यांच्या पुस्तकावरुन जरी जुजबी ज्ञान मिळालेले तरी हेर्लेकर सरांच्या पुस्तिकेमध्ये शहरी शेती कशी करायची याचे सखोल मार्गदर्शन आहे. पिक म्हटले की रोग येणार, किड येणार. याचे निवारण नैसर्गिकरित्या कसे करायचे याचे मार्गदर्शन त्यांच्या पुस्तिकेत दिलेय.

आता परत मनात नविन आशा निर्माण झालीय. परत एकदा सगळे सुरू करायचे ठरवलेय. त्या दिशेने वाटचालही सुरू केली. बघु पुढे काय कसे होतेय ते.

शहरी शेतीचे पेटंट डॉ. दोशींनी घेतले आहे. पण म्हणुन त्यांच्या पद्धतीने शहरी शेती करण्याआधी त्यांची परवानगी घ्यावी लागते असे काही नाही. (हे मविपच्या वर्गात सांगितले गेले. मविपचे वर्ग त्यांच्याच सल्ल्याने सुरू झालेत.). ज्याच्याकडे थोडीफार जागा, म्हणजे बाल्कनी, खिडकी, गच्ची इ. आहे आणि जिथे सुर्यप्रकाश येतो तिथे शहरी शेती शक्य आहे. सुर्यप्रकाश दहा तास मिळाला तर उत्तम. नाहीतर मग कमीतकमी चार तास तरी हवाच हवा. दहा तासात वनस्पती जेवढे अन्न बनवु शकतात त्याच्या निम्म्याने त्या चार तासात बनवु शकतील. त्यामुळे अर्थात आपल्याला उत्पन्न कमी मिळेल. पण दोन्ही उत्पादनाची प्रत सारखीच असेल. सुर्यप्रकाशाशिवाय मात्र शहरी शेती शक्य नाही.

सुर्यप्रकाश आणि जागा असेल तर आपण सुरवात करु शकतो. यासाठी परत मुद्दाम खर्च करायचा नाही. घरातल्या प्लॅस्टिकच्या फुटक्या बादल्या, बाटल्या, बरण्या, पिशव्या (सिमेंटच्या, खताच्या, कसल्याही), प्लॅस्टिकच्या कुंड्या, पिंपे इत्यादी जे काय मिळेल ते चालु शकते. कार्डबोर्डाचा मजबुत बॉक्स पण चालेल, थर्मोकोल पण चालेल. मायबोलीकर प्रमोद तांबे यांनी थर्माकोलच्या डब्यांमध्ये केलेल्या शेतीचे फोटो टाकलेले.

मातीची कुंडी शक्यतो शहरी शेतीसाठी वापरु नका. मातीच्या कुंडिला खाली एकच छिद्र असते. अतिरिक्त पाणी वाहुन जायला त्यामुळे अडथळा होतो आणि पाणी कुंडीतच राहिल्याने माती घट्ट होते. ह्या घट्ट मातीत मुळांची वाढ नीट होत नाही. शिवाय् ही माती मोक़ळी करताना टोकदार हत्यार वापरावे लागते. यामुळे मुळांना दुखापत होते. म्हणुन मातीची कुंडी टाळलेलीच बरी. मविपच्या प्लॅस्टिक कुंडीतल्या मातीत मी बोट रुतवुन पाहिले. सहज आत जात होते.

भाजी लावायला साधारण २५ सेमी उंच आणि २५ सेमी व्यासाचे भांडे लागेल (वर लिहिलेय त्यापैकी काहीही). आंबा, डाळींब, पेरु, चिकु अशासारख्या मोठ्या झाडासाठी साधारण आपल्या गुढग्यापर्यंत येईल इतक्या उंचीची प्लॅस्टिकची कुंडी/बादली घ्यायची. कुंडीचा वरचा व्यास दिड फुटापर्यंत ठिक.

जी कुंडी किंवा भांडे निवडाला त्याच्या खालच्या तळाला चाळणीसारखी खुप भोके पाडावी. भोके पाडुन झाली की कुंडीचा वरचा १ इंच भाग सोडुन उरलेल्या भागाचे मनाशीच तिन आडवे भाग करावेत. तळाच्या १/३ भागात उसाचे चिपाड घट्ट दाबुन बसवावे. मधल्या भागात झाडांची वाळलेली पाने दाबुन बसवावी (वेगवेगळ्या झाडांची सुकलेली पाने आपल्या घराच्या आजुबाजुहुन गोळा करावीत) आणि बरच्या उरलेल्या १/३ भागात माती घालावी. अगदीच लाल माती असेल तर थोडे शेणखत मिसळावे. हे झाले की कुंडीत आकारमानाच्या २५% पाणी ओतावे. म्हणजे ४ लिटर पाणी मावेल एवढे भांडे असेल तर १ लिटर पाणि ओतावे. हे केले की तुमची कुंडी तयार झाली रोप लावण्यासाठी.

सुरवात नेहमी भाजीने करावी. कारण भाजीचा जीवन कालावधी ९० दिवस ते १८० दिवस इतका कमी असतो. या अवधीत काहीतरी रुजवुन पिक घेता येते हा विश्वास आपल्याला मिळतो आणि भाजीही मिळते. Happy भाजीचा जीवन कालावधी संपला की ते रोप उपटुन त्याचे तुकडे करुन त्याच मातीत मिसळावे आणि तिथे दुसरी भाजी लावावी. साधारण एकाच मातीत परत तीच भाजी लावु नये कारण आपली माती मर्यादित आहे आणि त्या मातीत त्या भाजीसाठी आवश्यक असलेले घटक आधीच्या रोपाने शोषुन घेतलेत. मुख्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाशपैकी काहीतरी एक कमी झालेले असते. भाज्यांमध्ये फेरपालट केल्याने आपल्या मर्यादित मातीचा बॅलन्स ब-यापकी सांभाळला जातो.

भाजीच्या बीया नर्सरीत मिळतात. बीया थेट पेरण्यापेक्षा त्या रात्रभर पाण्यात भिजवुन, मोड आणवुन पेरल्यास जास्त चांगले रिझल्ट मिळतील. बी पेरताना मातीच्या २ सेमी खाली पेरावे. जास्त खाली नको, जास्त वरही नको. पाणी झारीने घातलेले बरे. तसे न जमल्यास हाताने हलकेच शिंपडावे. बी जागेवरुन हलणार नाही, रुजुन आलेल्या नाजुक रोपाला धक्का लागणार नाही इतपत काळजी घेणे आवश्यक आहे.

तसेहीवपाणी घालताना खुप काळजी घ्यावी. पाईप घेऊन सगळ्यांना घाऊकपणे पाणी घालण्यापेक्षा तांब्याने थोडे थोडे घातलेले बरे. भांड्याच्या २५% इतकेच पाणी घालावे. पाणी कुंडीबाहेर येऊन वाया जातेय इतके तर अजिबात घालु नये. उन्हाळ्यात दोनदा घालावे, हिवाळ्यात एकदाच पुरते. पाणी खरे तर रात्री घातलेले बरे कारण सुर्याच्या उन्हामुळे त्याचे बाष्पिभवन होऊन ते वाया जाण्याची शक्यता रात्री कमी असते. पावसाळ्यात गरज असेल तसेच द्यावे.

रोप पाच ते सात सेमी वाढले की घरात निर्माण होणारा भाजीपाल्याचा कचरा बारिक करुन रोज त्याच्या मुळाशी पसरत राहावे. मोठे फळझाडाचे कलम लावले असेल तर हा कचरा लगेच द्यायला सुरवात करायची. या कच-यातुनच रोपाला/झाडाला वाढीसाठी आवश्यक ते घटक मिळणार आहेत. कचरा बारिक करावा कारण असा बारिक केलेला कचरा लवकर विघटन पावतो. रोज १० मिनिटे यासाठी द्यावीत.

रोज झाडाचे थोडेतरी निरिक्षण करावे. झाडाची वाढ कशी होतेय हे लक्षात येते. तण उगवले तर ते हलकेच् काढुन टाकावे. रोपाभोवती कचरा पसरताना हे निरिक्षण करणे सोपे जाते. कचरा पसरताना त्यात किडी जात नाहीयेत ना हे पहावे.

थोडा वेळ असेल तर झाडाची वाढ कशी होत गेली हे सुध्दा रोजच्या निरिक्षणातुन लिहुन ठेवता येइल. झाडाचे जिवनचक्र कसे चालते हे कळेल आणि इतरांना मार्गदर्शन करता येईल. Happy

आपल्या रोपांना दर आठवड्याला एकदा अर्धा तास द्यावा. यात परत झाडाचे निरिक्षण करुन तब्येत बघणे, किड वगैरे पडली तर बंदोबस्त, सुकलेली पाने परत झाडाच्या बुंढ्याशी घालणे इत्यादी करण्यत घालवावी.

एवढी देखभाल केलीत तर तुम्ही अतिशय मस्त भाजी तुमच्या खिडकीत किंवा गॅलरीत घेवु शकता.

इतक्या देखभालीवर फळझाड नीट वाढुन तुम्हाला योग्य वेळी १०-१५ फळे खायला घालु शकते. कुंडीत झाड लावले तर डझनावरी फळे येणार नाहीत आणि जरी तेवढी फुले धरली तरी त्यापैकी सुदृड फुले ठेऊन बाकी फुले तोडणे उत्तम. कारण जास्त फळे धरली तर त्यांचा आकार लहान होणार. मविपमधल्या गच्चीतली डाळींब, सिताफळ एका हंगामात ५-६ फळे देतात. सिताफळाचे दोन हंगाम येतात. अशा प्रकारे वाढवलेल्या फळांचे वजन साधारण पेरु १५० ग्रॅम, डाळींब ३०० ग्रॅम, सिताफळ २५० ग्रॅम असे येते. फळांची संख्या वाढवली तर आकार आणि पर्यायाने वजन कमी होणार.

पालेभाजी किंवा फळभाजी लावली आणि रोज देखभाल केली तर पुर्ण कालावधीत १- १.५ किलो इतकी भाजी मिळते. तुमची एक्-दोन वेळेची गरज भागते. नीट संयोजन करुन, लावण्याची वेळ मागेपुढे करुन जास्त रोपटी लावली तर आठवड्यातुन दोन्-तिन वेळा घरची भाजी खायला मिळू शकते.

मुळात शहरी शेती करायची यासाठी की वाया जाणा-या वस्तु वापरता येतील. त्यामुळे मुद्दाम काहीही विकत न आणता घरातल्या नेहमीच्या भाजीपाल्याचा कचरा आणि भाजीच्या पिशव्या वापरुन भाजी पिकवायची. बाजारात असा कचरा फेकुन दिला जातो. आपल्या घरचा भाजीचा कचरा कमी पडत असेल तर भाजी विकत घेताना भाजीवाल्याकडुन थोडा कचराही वेगळा मागुन घ्यायचा. भाजीवाले देतात काहीच खिच खिच न करता. माझातरी हा अनुभव आहे.

मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी रसवंती गृहे भरपुर आहेत, तिथे उसाची चिपाडे मिळतात. आणल्यावर एखादा दिवस उन्हात ठेवल्यावर उसाचा वास निघुन जातो, वास गेला की मुंगळेही जातात.

आता मार्च ते मे पर्यंत खालील रोपे लावली तर सप्टेंबरापर्यंत भाजी मिळत राहिल - ही सगळी मोसमी भाजी आहे.

टोमेटो, वांगी, मिरची, भेंडी, गवार, घेवडा, काकडी, दोडका, पडवळ, कारली, दुधी भोपळा, कांदा, मुळा, सर्व पालेभाज्या, कोथिंबीर.

कोबी, फ्लॉवर, वाटाणा, गाजर वगैरे आता लावु नका. लावलीत तर फक्त थोडीफार पाने मिळतील. अर्थात ती पानेही तितकीच उपयोगी आहेत. सुप व सलाडमध्ये वापरता येतील

आपण पिकवलेली भाजी एक वेळेला जरी झाली तरी तीची चव अफाट लागते.

माझ्याकडे एकुलते एक लाल माठाचे रोपटे वाढलेले, त्याची पाने खुडून त्याची भाजी केली. रोपटे परत तसेच वाढायला सोडुन दिले. एका रोपट्याच्या पानांची एक वाटीभर भाजी झाली. मी आणि आईने अगदी आवडीने आणि कौतुकाने खाल्ली. आता वालाच्या शेंगा आहेत, त्यांचे मुठभर वाल गोळा झालेत. उद्या त्यात बटाटा घालुन भाजी करणार. दोन घास जरी खायला मिळाले तरी स्वर्ग.... गेल्या दोन वर्षात घरची तीन अननसे आणि चारपाच खरबुजे खाऊन झालीत. सध्या एक खरबुज पिकतेय. यापुढे अजुन खुप काही मिळेल ही आशा मनात रुजलीय.

ज्यांना वेळ आणि इच्छा आहे त्यांनी जरुर करुन पाहा.

दोन विडिओ टाकतेय. जरी शहरी शेतीशी थेट संबंध नसला तरी आपण आपल्या शहरी शेतीसाठी यातल्या तत्वांचा उपयोग करु शकतो.

https://www.youtube.com/watch?v=8Rcz1orgL7I

https://www.youtube.com/watch?v=S2JzKzmParw

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृणाल, कुंडीतही होईल गांडूळखत. सुरवात कर. कुंडी भरताना मी वर जसे लिहिलेय तशी भर. आणि दररोज पाणी दिल्यानंतर आठ दिवसांनी त्यात गांडूळे टाक. कुंडीत तळाशी जशी उसाची चिपाडे भरशील तशीच वर रोप लावल्यावरही त्याच्या आजुबाजुच्या मातीवर चिपाडे टाक. त्या चिपाडांवरच भाजीचा कचरा टाकत जा. चिपाडे पाणी धरुन ठेवतात त्यामुळे कुंडीत थंडावा राहिल. गांडूळांना थंडावा खुप आवडतो.

माझ्या कुंड्या उन्हातच असायच्या, दिवसभर तापलेल्या कुंड्या आणि त्यातली तापलेली माती. मी संध्याकाळी कुंड्याना पाईपने पाणी घालायचे ते पाणीही थोडे तापलेले असायचे. पाणी मातीवर पडताच बहुतेक आत सग़ळेच गरम होत असायचे. कुंडीच्या खालच्या छिद्रातुन सगळे गांडूळ बाहेर पडायचे आणि पाण्यात वळवळ करायचे. दोनचार मिनिटांनी परत कुंडीत जायचे.

धन्यवाद साधना. आपला लेख फारच उपयुक्त आणि माहितीपूर्ण आहे. वाचून बरच काही करायची खुमखुमी आली आहे. बघू या काय काय आणि कस कस जमत ते.

गांडूळांना आंबट चालत नाही >>> Biggrin सॉरी एकदम हसायलाच आलं हे वाचून. पथ्यकर आहेत गांडुळं Happy

संत्र्याची सालं पण नसतील चालत मग. संबंधितांनी नोंद घ्यावी Wink

गांडुळे कुण्डी सोडून नाही येत बाहेर. त्याना काळोख आणि ओलसरपणा हवा असतो.

सिंडी Happy एसिडिक नाही चालत. लगेच मरतात. संत्र्याच्या दोन चार साली एक वेळ सहनहि करतील पण सरबतासाठी लिम्बे पिळुन त्याच्या साली टाकल्यास वाट लागते त्यांची. खुप जन उरलेले अन्नही ढिगार्यात टाकायचा सल्ला देतात तेव्हा ते असे अन्न एकदा पाण्यातून काढून मग ते ढिगार्यातटाका हां सल्ला द्यायला विसरत नाहित. अन्नातले मीठ आणि मसाले बाधतात.

थोडेसे अवांतर पण संबंधितही.
http://www.diyncrafts.com/10038/repurpose/recycle-plastic-bottles-into-s...
हे जे इथे केलंय त्याचा किचन गार्डनसाठी प्रयोग करावा असा विचार आहे. कुणी करून बघितलंय का?
इतक्या कमी मातीत पुदिना, कोथिंबीर, बेसिल वगैरे येतील का?
कढीपत्ता येणार नाही याची खात्री आहे कारण ते सरळसोट वाढते.

नीधप,
ते 'सीड स्टार्टर्स' आहेत. म्हणजे रोपे तयार करण्यासाठी फक्त.
कढिलिंबाचे झाड असते अगदी मोठ्या निंबाच्या झाडाइतके मोठे. बॉन्साय केले तर ठिकेय पण मग त्याचा काय उपयोग?

>>इतक्या कमी मातीत पुदिना, कोथिंबीर, बेसिल वगैरे येतील का?
हो, येतील.

हर्ब गार्डन इन सोडा बॉटल्स गुगलल्यावर दिसणार्‍या इमेजेस बघ. महिनोन् महिने पुरेल इतकं पीक मिळणार नाही. पण ४-५ वेळची गरज भागेल इतपत नक्कीच.

मी भारतातून कोनफळ आणले होते. त्याची खीर केली आणि वरचा काप ( त्याला कोंब नव्हता ) कुंडीत पेरून ठेवला होता. तो काही दिवसात कुजला. मग मी त्याच कुंडीत मिरची लावली. तिचे झाड मिरच्या देऊन वाळूनही गेले मग परत कुंडी रिकामीच होती.

आमच्याकडे थंडी सुरु झाल्याबरोबर त्याच कुंडीत कोनफळाचा वेल वाढू लागला. त्याचा नेमका कुठला अंश त्या मातीत सुप्तावस्थेत राहिला होता कळत नाही !

त्या लिंकेत सीड स्टार्टर्स आहेत पण तश्या प्रकारे किचन गार्डन पण करतायत लोक. नेटवर वाचलंय.

कढीलिंबाचं झाड नुकतंच मेलंय कुंडीतलं. त्यामुळे ते मोठे झाड असते हे माहीतीये. प्रश्न विचारताना लिहिलंय की.

सातू, पुण्यात फर्ग्युसनच्या बॉटनी डिपार्टमेंटला एक वर्षाचा पार्ट टाइम गार्डनिंग कोर्स आहे. अतिशय थरो अभ्यासक्रम आहे. नातू आणि ओक सर अजून शिकवत असतील तिथे फारच अप्रतिम.

मृण, बेसिल, पुदिना, पार्स्ली तसंही जेमतेमच लागतं. कोथिंबीरीच्या दोन तीन बाटल्या केल्या तर उपयोग होईल कदाचित.

आमच्याकडे थंडी सुरु झाल्याबरोबर त्याच कुंडीत कोनफळाचा वेल वाढू लागला. त्याचा नेमका कुठला अंश त्या मातीत सुप्तावस्थेत राहिला होता कळत नाही !>>>>
"life finds way!" dialogue from Jurassic Park series! Happy

Vt220 अगदी खरं.. आज दुसर्‍या कुंडीत आले पण उगवून आलेले बघितले. त्या कुंडीतले सर्व आले मी गेल्या वर्षी खाऊन पण टाकले होते. परत लावलेच नव्हते कधी !

नी, लाव बिंदास. तु ह्याच्यात पालक, शेपु, मेथी आणि इटालियन हर्ब्स लावु शकतेस. बाजारातुन आणलेले एखादे बीट टाकुन ठेऊ शकतेस. भाजी करण्याएवढी जरी नाही मिळाली तरी ह्या भाज्यांची पाने सलादमध्ये वापरलेली खुप चांगली. बीटामधुन जेवढे घटक मिळतात त्याच्या हजारपटीने त्याच्या पानातुन मिळतात हे मी माधव जोशींच्या पुस्तकात वाचलेय. त्यांनी तर फ्लॉवर वगैरे भाज्या लावुन त्याचीही पाने सुपमध्ये वगैरे वापरायचा सल्ला दिलेला.

पालक, शेपूच्या बीया पार्ल्याच्या नर्सरीत मिळतील. ५-१० रुपयाची पाकिटे असतात.

नव्या मुंबईत यावर्षीच्या प्रदर्शनात अशाच प्लॅस्टिकच्य बाटल्यांचा एक सेट लावुन ठेवलेल्या. त्या आडव्या कापलेल्या आणि दोरीने एकावर एक शिडीच्या पाय-यांसारख्या ओवलेल्या. मध्ये अंतर थोडे जास्त होते. आडव्या कापल्याने जागा जास्त मिळत होती. त्यांनी त्यात टांगलेली शोभेची रोपे लावलेली. खुप सुंदर दिसत होते.

इतक्या कमी मातीत पुदिना, कोथिंबीर, बेसिल वगैरे येतील का?

माती कमी कुठे आहे? अर्धी बाटली भरुन आहे ती पुरेशी आहे. पुदिना वेगळा लाव कारण तो इतरांना खाऊन टाकतो. कोथिंबीर कधी येते उगवुन कधी येत नाहि. बेसिलचे रोप मोठे होते तुळशीएवढे. पण एवढ्या मातीत तुला सलाड किंवा पास्त्यात टाकण्याएवढे येईल.

करते लवकरच. झाले की टाकते फोटु.
काल दिवसभर बरीच शोधाशोध केलीये नेटवर. आडव्या बाटल्या, उलट्या बाटल्या एकात एक खुपसलेल्या आणि साईडने झाड असे बरेच ऑप्शन्स बघितले.

सध्या मला बाटली अर्धी कापून वरचा भाग खालच्या भागात उपडा टाकून सेल्फ वॉटरिंग वाले प्रकार करणे सोपे आहे. १ लिटरच्या बाटल्या पिशवीभरून आहेत. आणि घरातली जागा बघता अश्या ६-७ बाटल्या किचनच्या खिडकीवर ठेवता येतील. शिफ्टींग करायचे झालेच तर नेणेही सोपे आहे.

@नीधप, आपण दिलेल्या लिंक मधे त्यांनी २ लिटर च्या बाटल्या वापरलेल्या आहेत.
मला सुद्धा ही कल्पना आवडली. करुन बघणेत येईल. धन्यवाद.

पुदिना;:मी जुन्या पॅालिएस्टर पडद्याच्या कापडाच्या पिशव्या शिवल्याआहेत(उन्हाने पडद्याचा रंग उडतो पण कापड फाटत नाही) . पाच इंच व्यास आणि पाच इंच उंच बस होतात.जुने चहा ट्रे घेऊन त्यात एक इंचभर माती पसरून त्यावर पिशव्या ठेवायच्या. तीन तास ऊन पुरते.एक दोन चमचे गांडुळखत घाला आणि बाल्कनी कट्ट्यावर ठेवता येते.

नी, उत्तम कल्पना. पानांच्या वाढीसाठी नायट्रोजनयुक्त खत हवे. म्हणजे तेच रोप वाढत राहील. पाने वापरायला सुरुवात केल्यावर खत. खताच्या नावात तीन आकडे असतात उदा ७:३:५. यात पहिला आकडा नायट्रोजनच्या प्रमाणाचा. सॅलडरोपांना माती लागत नाही फारशी.
यात मेथी, मोहरी, क्रेस असल्या गोष्टीही शक्य आहेत लावणे.

हो त्यांनी दोन लिटरच्या दाखवल्यात पण आता रिसायकल, रिपर्पज वगैरे म्हणून करायचे तर झाडे लावायला दोन लिटरचे थम्सप विकत आणून ते ओतायचे घशाखाली आणि मग बाटल्या वापरायच्या हे अंमळ जरा विनोदी होईल ना. Happy

माझ्याकडे फार क्वचित सॉफ्ट ड्रिंक्स विकत आणली जातात. ज्या १ लिटरच्या बाटल्या आहेत त्या पाण्याच्या आहेत.

२ लिटर मधे जी जास्त जागा मिळेल त्याने आपला प्रकल्प फसण्याची शक्यता कमी होते. तसेही आधीच नेहमीच्या कुंडी पेक्षा छोटी बाटली वापरायची आहे.

केश्वे, मला घरातल्या बाटल्यांचे काहीतरी करायचेय. त्या बाटल्या हल्ली रद्दीवालेही घेत नाहीत. निदान आमच्याइथले तरी.

नीरजा, एक पसरट रिकामा प्लॅस्टिकचा टब मिळतो तो घे.
त्यात अर्ध्या कापलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या खाली तोंड करून बसव. फार जवळ जवळ कोंबून बसवल्या की दहाबारा बसतील.
मग त्या बाटल्यांत माती भर आणि टबात पाणी भर.

माझ्याकडे फार क्वचित सॉफ्ट ड्रिंक्स विकत आणली जातात. ज्या १ लिटरच्या बाटल्या आहेत त्या पाण्याच्या आहेत.

मलाही मी पाहिलेले बाटल्यांच्या शिडीचे प्रकरण खुपच आवडलेले, पण आम्ही सॉफ्ट ड्रिन्क्स पित नसल्याने घरात एकही बाटली नाही.

पाण्याच्या बाटल्या खुप लेच्यापेच्या असतात. मला माझ्या शिडी प्रकल्पासाठी चालायच्या नाहीत पण नीरजाला चालतील. उभ्या करुन ठेवल्या तर टिकतील थोडे दिवस.

Pages