आज भारतासारख्या प्रगत आणि जगात सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा एकमेव मुख्य न्यायाधीश म्हणून बिनविरोध माझी नेमणूक झाल्याचं पत्रक लाल लिफाफ्यासह शाही इतमामात माझ्या ऑफिस केबिनमध्ये येउन जेव्हा सरकारी खास वर्दीतल्या माणसाने माझ्या हातात दिलं, तेव्हा मात्र मी अगदी कृतकृत्य झालो, खुद्द राष्ट्रपतींनी शिफारस करून हे पद खास करून माझ्यासाठी राखून ठेवल्यामुळे आता माझ्यावरची जबाबदारी मात्र खुपच वाढली होती, माझ्या या आधीच्या बऱ्याचशा अतिशय अवघड आणी किचकट केसेस अगदी चतुर डावपेच व कायदेशीर बाबींचा अगदी योग्य समतोल राखत कोणालाही न दुखावता आणी अतिशय निर्भीडपणे समोर कितीही मोठी मान्यवर व्यक्ती असताना देखील कोणाचीच तमा वा भीडभाड न बाळगता वैचारिकदृष्ट्या घेतलेल्या माझ्या निर्णय क्षमतेवरच राष्ट्रापतींसारख्या सर्वोच्य पदावर विराजमान असणाऱ्या व्यक्तीचा माझ्यावर असणाऱ्या विश्वासाला तडा न जाऊ देण्याची जबाबदारी आता पूर्णपणे माझी होती, आणि त्या दृष्टीनेच माझे पुढचे सगळे प्रयत्न चालू होते, माझ्या हातात जेमतेम बारा दिवसच शिल्लक होते त्यामुळे आता जराही वेळ वाया न घालवता प्रत्येक गुन्ह्याच्या आणि सादर पुराव्यांचा अगदी कीस काढत आणि पूर्ण कायदेशीर बाबी तपासत मी हातातल्या सगळ्या केसेस अगदी सहज हातावेगळ्या केल्या होत्या, त्यामुळे अगदी निश्चिंत मनाने आणि माझ्या स्वतःवरच्या पूर्ण विश्वासाने मी निवाड्याच्या दिवसाची चातकाप्रमाणे वाट पाहत बसलो.
आणि एकदाचा तो दिवस उजाडला, मी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून आंघोळ केली आणि नेहमीच्या सवयी प्रमाणे मारुतीच्या देवळात जाऊन त्याला नमस्कार करून साकडं घातलं कि मी जो काही निर्णय घेतलाय तो अगदी निस्वार्थीपणे आणि जनतेच्या हिताचाच विचार करून घेतला आहे, माझ्या या निर्णयामुळे जनतेचे पूर्णपणे समाधान झाले पाहिजे, त्यांच्या गुन्हेगाराला माझ्याकडून योग्य ती शिक्षा मिळून जनतेचा आपल्या आंधळ्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा निर्माण होऊ दे, मी गुन्हेगारांना जी शिक्षा ठोठावणार आहे ती प्रत्यक्ष जनतेच्या मनातीलच असु दे, शोषितांच्या, पिढीतांच्या दुःखाचा योग्य तो निवाडा माझ्या हातून व्हावा इतकीच माझी मनापासून इच्छा आहे, आणि काय चमत्कार मारुतीने चक्क हात उंचावत तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला.
मी तसाच तडक घरी आलो, तयारी करून कोर्टात जाण्यासाठी निघालो, खाली शासनाच्या गाड्यांचा ताफा मला कोर्टात नेण्यासाठी सज्ज होताच, मी वेळेवर कोर्टात पोहोचलो, चोपदाराने मी कोर्टात प्रवेश करत असल्याची जोरदार आरोळी दिली, उपस्थित जनसमुदायाचा कलकलाट त्वरित थांबून एकदम शांतता पसरली, मी माझ्या मानाच्या खुर्चीवर जाऊन आसनस्थ झालो आणि शिपायाने त्वरित येउन पाच भल्या मोठ्या जाडजूड फाईल्स आणून माझ्या समोर ठेवल्या आणि मी क्रमाक्रमाने त्या उघडून एक-एक करून त्यावरचा निर्णय वाचून दाखवू लागलो.
मी पहिली फाईल उघडली, ती केस होती उत्तरेकडील राज्यातल्या एक माजलेल्या बैलासमान दिसणारा अतिशय बेशरम, निर्लज्ज इसम कालू प्रकाश याची, या इसमाने प्रथम जनावराप्रमाणे अगदी एखाद्या डुकरालाही लाज वाटावी अशी आपली स्वतःची लोकसंख्या वाढवून मोकाट वळूप्रमाणे अनेक अनैतिक आणि अवैध मार्गाने गुंडगिरीच्या जोरावर राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवुन खुलेआम भ्रष्टाचार सुरु केला होता, त्यात माणुस तर सोडाच अगदी प्राण्यांच्या खायच्या चाऱ्यामध्ये देखील भलामोठा हजारो करोडचा घोटाळा करून ठेवला, याचं केसच्या शिक्षेची अंतिम सुनावणी मी सुरु केली, सर्वप्रथम मी आरोपीकडे एकदा अतिशय तुच्छतेने कटाक्ष टाकला, पण मला त्याच्या चेहऱ्यावर कोणताही शरमेचा व पश्चातापाचा लवलेश दिसला नाही, उलट मजेत तोंडात पान चघळत करंगळीने उजवा कान खाजवत अतिशय निर्लज्जपणे इकडे-तिकडे पाहत मिळणारी शिक्षा एन्जॉय करण्याच्या इराद्यानेच तो आल्याचं मला जाणवलं, पुरावे अगदी साफ सरळ होते, त्यावर मी लगेचच आपला निर्णय दिला की समोर आरोपीच्या पिंजऱ्यात उभी असलेली व्यक्ती ही कितीही लोकप्रिय वा अगदी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर जरी असली तरीही त्याने केलेला गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून आपल्या राजकीय बळाचा गैरवापर करून त्याने हा पूर्ण विचारांती केलेला आहे, आपल्या हातात सत्ता आहे म्हणजे आपले कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही हा जो समाजात एकप्रकारचा माज आजकाल आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो त्याला आळा बसावा म्हणून मी कालुला कठोरातली कठोर शिक्षा सुनावत आहे,
सर्वप्रथम कालूप्रकाश व त्याच्या सगळ्या कुटुंबियांच्या आणि त्याच्या इतर नातेवाईक, मर्जीतल्या, खास जवळच्या मित्रमंडळींच्या नावे असलेली सर्व संपत्ती, बँक खाती सील करावीत, त्यांची सरकारी वा इतर खाजगी आस्थापनातील वैयत्तिक गुंतवणूक सर्वांवर जप्ती आणावी, त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करून त्या सर्व संपत्तीचा जाहीर लिलाव करून आलेल्या पैशातून एक चारा बँक बनवण्यात यावी, त्यातून गोर-गरीब शेतकऱ्यांना जनावरांसाठी तो चारा मोफत वाटण्यात यावा, कालूच्या सर्व कुटुंबियांना नेसत्या कपड्यानीशी बेघर करण्यात यावे आणि सरकारी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सर्वांना सामावून घेऊन बिनपगारी कामावर ठेवण्यात यावे, त्यांच्याकडून कालवे खोदणे, ग्राम सडक निर्मिती योजनेत दगड फोडणे या सारख्या अतिशय कष्टाच्या कामावर राबवून घेण्यात यावे, कालूच्या मालमत्तेतील काही जमिनींवर भटक्या जनावरांसाठी छावण्या तयार कराव्यात आणि त्या जनावरांसोबतच कालूला एका मोठ्या ओंडक्याला जनावरां समवेत वेसण घालून नागडा बांधून ठेवण्यात यावा आणि रोज येता जाता दिवसातून किमान पाचवेळा तरी वीस-वीस चाबकाचे फटके मारण्यात यावेत व उरलेल्या वेळेत त्याच्या खांद्यावर नांगर बांधून इतर बैलांसमवेत रोज किमान दोन एकर शेत जमीन नांगरून घ्यावी आणि अशी हि शिक्षा त्याला पुढील किमान पंचवीस ते कमाल चाळीस वर्षांपर्यंत मुकाट भोगायची आहे, पंचवीस वर्षांनंतर जर त्याच्या वागणुकीत फरक पडतोय अशी न्यायालयाला खात्री पटली तर त्याची चाळीस वर्षांपर्यंतची शिक्षा शिथिल करून त्याला शिक्षेत दोन वर्षांची सुट देण्याचा विचार न्यायालय राखून ठेवत आहे. धन्यवाद !
माझा निकाल ऐकताच उपस्थित जनसमुदायाच्या आनंदाला पारावारच राहिला नाही त्यांच्याकडून आनंदाने उभे राहुन प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात या निकालाचे जोरदार स्वागत करण्यात आले आणि माझा हुरूप वाढला. मीही या केसच्या निकालाची वेळ संपल्याचे जाहीर करून एक तासाने पुन्हा दुसऱ्या एका नव्या केस संबंधात पुन्हा भेटण्याच्या नोटवर त्यांची रजा घेऊन माझ्या राखीव दालनामध्ये जाऊन पुढच्या केस विषयीची उजळणी करू लागलो.
तासाभरातच पुढची केस सुरु झाली, पहिल्या केसच्या मानाने ही केस तशी साधी सरळ होती, आरोपी होता ऑलम्पिक समितीवर आपल्या देशातर्फे प्रतिनिधीत्व करणारा एक तत्कालीन क्रीडामंत्री, अतिशय निर्ढावलेला, निर्लज्ज व आपण काहीच केलं नाही अशा अविर्भावात वावरणारा कुरतडलेली दाढी असलेला एक इसम सुदेश ताडीमाडी, याने आपल्या देशात होणाऱ्या कॉमनवेल्थ क्रीडा सोहळा आयोजनामध्ये क्रीडा साहित्य आयात ते क्रीडा संकुल उभारणीपासून अगदी लहान सहान अशा जवळजवळ प्रत्येक गोष्टीत अफाट माया जमवली होती, आरोपीवरचे सर्व गुन्हे हे पुराव्यानिशी सहज सिद्ध झालेले असल्यामुळे माझ्यावर फारसे दडपण नव्हतेच, मी माझा निकाल सुनावण्या आधी एकदा उपस्थित जनसमुदायावरून नजर फिरवली आणि सुरवात केली, आरोपी सुदेश ताडीमाडी याने स्वतः केलेला भष्टाचार आणि इतर कायदेशीर बाबींसाठी परवानगी मिळवण्या संबंधात बाकीच्या भ्रष्टाचारी लोकांना गैरमार्गाने केलेली मदत यांमुळे आज आपल्या देशाची मान साऱ्या जगभरात शरमेने खाली झुकली आहे, त्यामुळे सुदेश याला मी अशी शिक्षा ठोठावतो की सर्वप्रथम सुदेश ताडीमाडी याची सर्व मालमत्ता सरकारी तिजोरीत जमा करावी, त्याची सर्व बँक खाती गोठवून त्याच्या इतर वैयत्तिक व्यवसायाच्या आर्थिक नाड्या आवळाव्यात, त्यानंतर दिल्लीतल्या प्रगती मैदानसारख्या मोठ्या जागेत त्याच्याच नावाने एक आगळावेगळा सोहळा आयोजित करावा, सुदेशच्या या घोटाळयामुळेच आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने आपल्या देशावर पुढील ऑलम्पिक स्पर्धेत घातलेल्या बंदीमुळे देशातील अनेक तरुण होतकरू खेळाडूंचे जे नुकसान होणार आहे, ज्यांना पदकांपासून वंचित राहावे लागणार आहे, अशा तीन खास खेळाडूंना आमंत्रित करून त्यांना त्यांची भडास सुदेशवर काढावयास लावावे, सर्वप्रथम सुदेशला क्रीडांगणाच्या प्रवेशद्वारावर उघडा बांधण्यात यावे आणि क्रीडांगणात प्रवेश करताना प्रत्येक प्रेक्षकाने त्याला एक-एक जोरदार लाथ मारूनच आत प्रवेश करावा, संपूर्ण क्रीडांगण भरल्यावर मात्र त्याच्या तोंडाला काळे फासून पाच गाढवांच्या रथातून मानाने मैदानाच्या मध्यभागी आणून एका खांबाला बांधून ठेवावे, त्यानंतर पहिल्यांदा देशातील सर्वोत्तम गोळाफेक खेळाडूला बोलावून त्याला सुदेशच्या डोक्याचा वेध घेत गोळा फेकण्यास सांगावा, त्यानंतर धनुर्विध्येतील खेळाडूला बोलावून त्याला सुदेशच्या मान ते बेंबी या लक्षाचा वेध घ्यायला लावावे, सर्वात शेवटी त्याला एका लाकडाच्या फळ्यावर पालथा पाडून बांधून ठेवावा आणि त्याच्या पार्श्वभागाचे टार्गेट बनवून पिस्तुल आणि रायफल शुटींगमधील मातब्बर खेळाडूला गोळ्या झाडण्यास सांगावे, या शिक्षेशिवाय सुदेशला दुसरी कोणतीही योग्य शिक्षा असूच शकत नाही. असे मी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या मनातल्या या शिक्षेचे पुन्हा एकदा जोरदार जोरदार स्वागत केले आणि ती केस तिथेच संपली.
उपस्थित जनसमुदायाच्या जोरदार प्रतिसादाने माझा कॉन्फीडन्स आणखी वाढला आणि मी अधिक त्वेषाने पुढच्या केसकडे वळलो, पुढची केस होती पुण्यातल्या एका प्रसिद्ध बेकरी बॉंबस्पोटातील प्रमुख सूत्रधार आरोपी हातीम फुटकळ याची, त्याच्याकडे पाहताच मला स्पष्ट जाणवले कि आपण केलेल्या या देशविघातक कृत्याबद्दल त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा कोणताही लवलेश नाही, त्याचे तरुण वय आणि आपल्या बुद्धिमत्तेचा वापर त्याने बॉम्बस्पोटासारख्या विघातक कामासाठी वापरला होता, त्यामुळे त्याच्या सुपीक मेंदूचा त्याला अतिशय गर्व आणी माज होता, तो माजच उतरवणे फार गरजेचे होते, मग मी शिक्षा सुनवायला सुरवात केली, सर्वप्रथम पुण्यातच हातीमच्या तोंडाला काळे डांबर फासून याची स्वारगेट ते पुणे स्टेशन या गजबजलेल्या रस्त्यावरून एका माजलेल्या बोकडावरून नागडा बसवून धिंड काढावी आणि रस्त्यावर ती बघायला जमलेल्या सर्वघर्मीय लोकांनी एकत्र येउन आपापल्या चपला-बूट काढून त्याचे थोबाड फोडावे, त्यानंतर एक मोठ्या धारदार तलवारीने त्याचे डोके मधोमध फोडावे आणि ज्या मेंदूचा त्याला फार गर्व आणि माज होता तो मेंदू बाहेर काढून त्याचा भेजा फ्राय बनवून तो त्याच बोकडांला खायला घालावा, त्यानंतर एका मोकळ्या मैदानात हातीमचे धड व याच्या सर्व साथीदारांना एकत्र दोरीने बांधून त्यांना त्यांनीच तयार केलेल्या बॉम्बने उडवून देण्यात यावे, आणि स्पोटानंतरचा सगळा मलबा गोळा करून आपल्या शेजारच्या शत्रू देशाच्या हद्दीत फेकून देण्यात यावा आणि या सगळ्या शिक्षेचे लाईव्ह कवरेज संपूर्ण जगभर दाखवावे, जेणेकरून सीमेपलीकडून छुप्या मार्गाने घुसखोरी करणाऱ्या धर्मांध दहशतवाद्यांना त्याची चांगलीच जरब बसेल. असं म्हणून माझं बोलणं संपताच जो काही टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला तो थांबता थांबेना, बाहेर ही फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली, आता मात्र मी एक अर्ध्या तासाचा ब्रेक जाहीर करून पुन्हा पुढच्या चौथ्या केसच्या सुनावणीसाठी उपस्थित होईन असे जाहीर केल्यावर कडकडाट थांबला, मलाही चहाची खूपच तलफ आली होती, ती भागवून मी पुढच्या केसच्या शिक्षा सुनावणीसाठी हजर झालो.
पुढची केस होती एक अतिशय बनेल, बदमाश आणि स्वतःला देव म्हणवून धेणाऱ्या एका हरामखोर पण साधूच्या वेषातील अट्टल गुन्हेगार घासाराम बापुची तो नेहमी स्वतःला कृष्णाचा अवतारच समजत असे पण वेळेला द्रौपदीच्या मदतीला मदतीला न जाता तो अंधश्रद्धाळू, खुळचट बायका-मुलींची अब्रू लुटण्यात आणि त्यांच्या असहाय भोळसटपणाचा फायदा उठवण्यातच स्वतःला धन्य समजत होता, घासाराम आणि त्याचा पोर सवाई दोघेही मिळून विवाहित अबला स्त्रियांना देवाच्या प्रसादाच्या नावाखाली एक विशिष्ठ प्रकारचे पेय पाजून त्यांची अब्रू लुटत आणि भोळ्या भाबड्या स्त्रियांना वाटे की इतकी वर्ष आपल्याला मुल होत नव्हत पण बापूंच्या अंगाऱ्याचा मात्र लगेच गुण येउन भराभर पोरं होऊ लागली पण हि सगळी पोरं या घासीरामाची आणि त्याचा पोर सवाईची आहेत हे समजून यायला आणि श्रद्धाळूंचे मनपरिवर्तन होण्यात बराच काळ गेला पण तोपर्यंत मात्र दोघे बाप-लेक मिळून खुलेआम दिवसातून आठ-आठ वेळा हनिमून साजरा करतच होते पण आता डीएनए सारख्या टेस्टचा आधारे भक्कम पुराव्यानुसार दोघांचाही भांडाफोड झालाच होता, त्यामुळे मला त्यांना शिक्षा सुनावायला फारसे कष्ट पडलेच नाहीत, मी आदेश दिला सर्वप्रथम घासारामाच्या देशभरातल्या सगळ्या आश्रमांवर छापे टाका, तिथल्या सर्व कर्मचाऱ्याना अटक करून त्यांची कसून चौकशी करा आणि दोषी आढळणाऱ्याना त्वरित फाशी द्या, सर्व आश्रम बंद करून तेथे सापडलेल्या सगळ्या करोडोतल्या रकमा सरकारजमा कराव्यात आणि त्यातून दुष्काळी भागात जलसंवर्धन योजना आखाव्यात, तसेच या ढोंगी बाबाचे संन्यासी रूप पालटण्यासाठी त्याचे डोक्यावरचे आणि दाढीचे सर्व केस खेचून उपटून काढावेत आणि ज्या स्त्रिया वा मुली-बाळी बाबाच्या पाशवी वासनेला बळी पडल्या असतील त्यांना प्रामुख्याने हे काम करू द्यावे, नंतर त्याचे सगळे कपडे फाडण्यात येउन त्याला नागडा मुंबईतील बीकेसीच्या मोकळ्या मैदानावर मध्यभागी उभा करावा, त्याच्या उघड्या सर्वांगावर दगडांचा मारा करून त्याला रक्तबंबाळ करावा, नंतर एका मोठ्या टाकीमध्ये मीठ आणि लाल तिखट मसाला घेऊन त्यात त्याला तासभर बुडवून ठेवावा, त्यानंतर त्याला एका उघड्या जीपच्या मागे उलटा बांधून मुंबईतल्या खड्ड्यांच्या रस्त्यावरून चर्चगेट ते बोरीवली चार वेळा तरी फरफटत न्यावा आणि त्यातूनही जरी ती वाचलाच तर त्याचे मुंडकं धडावेगळ करून त्याला माहीमच्या खाडीत फेकून द्यावे तरच अशा साधूंच्या वेशातल्या लिंगपिसाट ढोंगी, भोन्दु, बाबा, बापू, आणि महाराजांना जरब बसेल.
माझ्या या निर्णयाचे जनसमुदायाने असे काही उत्स्पुर्तपणे स्वागत केले की टाळ्यांचा आणि शिट्ट्यांच्या जल्लोष थांबता थांबत नव्हता, मग मीच पुढाकार घेऊन सगळ्यांना शांत राहण्याचे आवाहन करून आपण आता पुढच्या केसच्या निकालाकडे वळत असल्याचे सांगितल्यावर समुदाय शांत झाला तेव्हा मला सकाळचा तो मंदिरातला मारुतीने तथास्तु म्हणत हात उंचावून दिलेला आशीर्वादाचा प्रसंग पुन्हा आठवला आणि मी माझ्या कामात पूर्णपणे यशस्वी होत असल्याची खात्री पटली, राष्ट्रपतींनी केलेली माझी शिफारस त्यांनी टाकलेल्या माझ्यावरच्या विश्वासाला मी पूर्णपणे न्याय देतोय व गुन्हेगारासाठी जनतेच्या मनातल्या शिक्षाच मी फक्त जाहीर करतोय आणि त्यामुळे जनतेचं पूर्ण समाधान होत असल्याचं पाहून मला माझा स्वतःचाच अभिमान वाटू लागला व मी पुढच्या आणि आजच्या दिवसातल्या शेवटच्या केसकडे वळलो.
ती केस होती वाहतूक विभागातल्या एका रामा नरहरी डुकरे नावाच्या हरामखोर, लाचखोर, भ्रष्टाचारी पोलीस हवालदाराची, मुख्य सिग्नलच्या थोडं पुढे एखाद्या गाडीच्या किव्वा झाडाच्या मागे लपून उभं राहून अचानक जर कोणी सिग्नल जंप केला तर त्याला पकडून त्याच्याकडून पावती न फाडता मोठमोठ्याने हुज्जत घालत, धमकावत, कोर्टाची भीती दाखवून त्याच्याकडून चिरीमिरी वसूल करणे हा त्याचा रोजचाच धंदा, अनेकदा त्याची कम्प्लेंट वरपर्यंत गेल्याने वरिष्ठांकडून त्याला बऱ्याचदा त्याची कानउघाडणी होऊन देखील तो सरळ होत नव्हता, मंत्र्याचा नातेवाईक, जात आणि वर्दी या तीन गोष्टींच्या पुण्याईवर त्याचा हा लुटमारीचा व्यवसाय अगदी राजरोसपणे चालू होता, पण शेराला सवाशेर भेटतो, तसंच एका चाणाक्ष लॉ च्या विध्यार्थ्याने मात्र त्याला असा काही जाळ्यात अडकवला कि त्याची पुरती हवाच निघून गेली, एरवी वाघासारखा मुग्रूरीने, वर्दीचा माज दाखवत बोलणाऱ्या हवालदार डुकरेचा पुरता उंदीर झाला होता, उलट यातून सुटण्यासाठी ती त्या विध्यार्थ्यालाच भलीमोठ्या रक्कमेची लाच देऊन प्रकरण मिटवू पाहत होता, यावरून त्या सिग्नलवर त्याचा किती जम बसला होता याची चांगलीच कल्पना येत होती, पण त्या हुशार विध्यार्थ्याने मोबाईलमधले क्लिपिंग आणि बोलण्याचे रेकोर्डिंग असे भरभक्कम पुरावे सादर केल्यामुळे माझ्यासाठी निर्णय देणं अगदी सोपं काम होतं, तसा मीही या हवालदाराचा एक दोनदा वाईट अनुभव घेतलेला होताच, त्यामुळे इतर वाहनधारका प्रमाणेच मलाही माझ्या मनातला राग एकदा काढायचा होताच, मी त्याला माझी शिक्षा सुनवायला सुरवात केली, सर्वात आधी त्याची बोलण्याची मस्ती उतरवण्यासाठी त्याची जीभच छाटावी, ज्या वर्दीच्या जोरावर तो माज करतो त्या पट्ट्यानेच त्याला तासभर फटके मारावेत, नंतर त्याला टायरमध्ये घालून दंडुक्याने फोडून काढावे व तो जो डावा हात उलटा करून तो नेहमी लाच घेतो त्या हाताची चारही बोटे तोडावीत, त्यानंतर त्याला काच घासायच्या पॉलिश पेपरने घासून काढावा, नंतर एका मोकळ्या मैदानावर नेऊन दोरीच्या सहाय्याने क्रेनने जमिनीपासून दीड-दोन फुटांवर उलटा लटकवावा आणि ज्या ज्या वाहनधारकांकडून त्याने लाच स्वीकारली असेल त्यांना सर्वांना बोलावून त्याच्या थोबाडात एक एक सणसणीत लाथ मारावयास सांगावी,
शिक्षा ऐकतांना माझ्या प्रत्येक वाक्याबरोबर जनतेचा जल्लोष वाढतच होता त्यामुळे मलाही स्पुरण चढलेच होते, मी आता माझ्या स्थानावरून उठून स्वतःपासूनच त्याची अमलबजावणी करण्यासाठी त्याच्या जवळ गेलो आणि जोर काढून एक लाथ त्याच्या थोबाडीत मारली, पण तो मात्र आता बायकी आवाजात किंचाळला, एरव्हीचा त्याचा तो माजोरडा आवाज आता एकदम बायकी कसा येऊ लागला, म्हणून मी थोडा दचकलो आणि भानावर आलो तर माझी बायको आपल वाकडं झालेलं थोबाड चोळत घाबऱ्या घुबऱ्या नजरेने माझ्याकडे पाहत असलेली मला दिसली, मी किलकिल्या डोळ्यांनी ते पाहताच पूर्ण भानावर आलो आणि चांगलाच घाबरलो, आता काही माझी धडकत नाही, बायको काही मला सोडत नाही, याची खात्री पटून मी उठलो आणि माफी मागण्यासाठी म्हणून तिच्या जवळ जाऊ लागलो, तर ती भीतीने आणखीच मागच्या मागे सरकू लागली, तेव्हा मला पक्की खात्री पटली माझं हे असं रौद्र रूप ती प्रथमच पाहत होती, तिच्या साठी हा मोठा शॉक होता, खर तर ती नेहमीप्रमाणे मला जेवल्यानंतर भांडी घासण्यासाठी म्हणून उठवायला आली होती पण आज मात्र माझ्या स्वप्नाने मला पूर्णपणे तारून नेलं होतं आणि त्याच क्षणाला मी मनाशी अगदी पक्क केलं, की यापुढे आपला रोजचा भूळसटपणा सोडून असंच बाणेदारपणे वागायचं नाही तर आपली किमत कमी होते, जी आज माझी वाढली होती, माझ्या बायकोच्या भेदरलेल्या नजरेत.
मस्तं!
मस्तं!
हा हा हा .... काय मस्त
हा हा हा ....
काय मस्त कल्पनाविश्व आहे !!!
छान आहे कथा.
छान आहे कथा.