इंग्लंड मधील भत्ताचारी लोक!

Submitted by चिमण on 7 August, 2012 - 13:54

न्यूटन, स्टिफन हॉकिंग, बेअर्ड, ग्रॅहॅम बेल, मॅक्सवेल, डार्विन या सारख्या शास्त्रज्ञांचा, शॅकल्टन, कॅप्टन कुक सारख्या धाडशी माणसांचा व चॅप्लिन, ज्युली अँड्र्यूज सारख्या अभिनेत्यांचा इंग्लंड हा देश असल्यामुळे मला इंग्लंड मधे यायच्या आधी आणि आल्यानंतर काही दिवस इथल्या प्रत्येक माणसाबद्दल प्रचंड आदर वगैरे वाटायचा. इथले सर्व लोक प्रचंड हुशार, कामसू व प्रामाणिक असतील हा गैरसमज त्यातूनच झालेला!

नंतर ऑफिसातल्या लोकांचं वर्तन, पेपरातल्या बातम्या, टाटांनी मारलेली चपराक पहाता इतकं समजलं की मोजके लोक सोडता बाकीचे कामाच्या नावाखाली टाईमपासच करीत असतात. तसं हे विशेष नाही कारण जगात सगळीकडे साधारण अशीच परिस्थिती आहे.

मग विशेष काय आहे? विशेष आहे तो एक ऐतखाऊ कामचुकार समाज! या समाजातले लोक पिढ्यान पिढ्या काम न करता, आयुष्यभर शिट्ट्या मारत आरामात फिरतात. ते सगळे लोक म्युन्सिपाल्टीने दिलेल्या घरात रहातात. अशी घरं पुरविण्याचा म्युन्सिपाल्टींचा खर्च वर्षाला सुमारे २१ बिल्यन पौंड (१६८ हजार कोटी रुपये (१)) आहे. एक सहा मुलांची अविवाहीत आई महिन्याला सुमारे साडेपाच लाख रुपये भाड्याच्या व सुमारे १६ कोटी रुपयांच्या अलिशान घरात रहाते. इथे अजून अशीच उदाहरणं वाचायला मिळतील. हे सगळे पैसे अर्थातच करदात्यांच्या खिशातून येतात. नोकरदार सामान्य माणूस असली घरं फक्त स्वप्नातच बघू शकतो. त्यामुळेच आपण भरलेल्या करांवर आपल्याला न परवडणार्‍या घरात हे ऐतखाऊ आनंदाने रहाताना बघून त्याचा किती संताप होईल त्याची कल्पनाच केलेली बरी!

हे लोक तर्‍हेतर्‍हेच्या सरकारी भत्त्यांवर जगतात, म्हणूनच मी त्यांना भत्ताचारी म्हणतो. वरती दिला आहे तो घरभत्ता! असाच बेकारभत्ता पण असतो. बेकारभत्ता बहुतेक सगळ्या पाश्चात्य देशात मिळतो, पण इथले लोक बेकारभत्ता चालू ठेवण्यासाठी काहीना काही कारणाखाली देऊ केलेलं काम करायचं टाळतात. सध्या २५ वर्षाच्या खालच्या लोकांना आठवड्याला सुमारे साडेचार हजार रुपये तर २५च्या वरती सुमारे साडेपाच हजार रुपये इतका बेकारभत्ता आहे.

शिवाय 'मूल भत्ता' म्हणून एक भत्ता पण असतो. पैशाविना मुलांच्या काळजीत कमी पडू नये या उदात्त हेतुने तो देण्यात येतो. मूल १६ वर्षांचं होईपर्यंत तो मिळतो. पहिल्या मुलासाठी आठवड्याला सुमारे १६०० रुपये तर पुढच्या प्रत्येक मुलासाठी आठवड्याला सुमारे ११०० रुपये इतका तो आहे. साहजिकच या लोकांचा कल जास्त मुलं पैदा करण्याकडे असतो. या शिवाय गर्भारपणात स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी वेगळे पैसे मिळतात. इथल्या सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार १० पोरं असलेलं कुटुंब वर्षाला सुमारे ४८ लाखांपेक्षा जास्त रुपये विविध भत्त्यांपोटी कमवू शकतात.

नंतर येतो तो 'अक्षमता भत्ता' म्हणजे जे लोक काही कारणामुळे काम करण्यास असमर्थ आहेत अशा लोकांना दिलेला भत्ता! थापा मारून याचाही लोक फायदा घेतात. एक बाई आपल्याला क्रचेस घेतल्याशिवाय चालताच येत नाही आणि १० मीटर चालल्यावर प्रचंड वेदना होतात अशा बंडला मारून तो भत्ता घेत होती. रोलरकोस्टरची राईड घेतानाचे तिचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर तिला मिळालेले पैसे परत करायला लागले.

बाकी रहातो तो वेळी अवेळी लागणारा डॉक्टरांचा व औषधपाण्याचा खर्च! इंग्लंड मधे रहाणार्‍या सर्वांना डॉक्टरांचा काहीही खर्च नाही. औषधपाण्याचा खर्च (डॉक्टरांनी काही प्रिस्क्रिप्शन दिलं तर) एका विशिष्ट आकड्याच्या (सुमारे ६०० रुपये) पुढे कधीच जात नाही.. मग ते औषध कितीही महाग असो. गर्भार बायका, साठीच्या पुढचे म्हातारे, १८ वर्षाच्या आतील मुलं अशांना ते फुकट मिळतं. पण बेकारभत्ता मिळणार्‍यांना देखील ते फुकटच आहे.

असे ऐषोआरामी लोक दिवसभर काय करणार? चकाट्या पिटणे, ड्रग्ज व दारु झोकून दंगामस्ती करणे या शिवाय दुसरं काय? फावल्या वेळात चुकार पोरंपोरीं पोरं पैदा करण्याचं उदात्त कार्य करतात! अनुज बिडवेचा खुनी, कियारन स्टेपलटन हाही अशाच कुटुंबातला एक बेकार तरुण! तो धरून एकूण सहा भावंडं आहेत. आई वडील आणि पोरं म्युन्सिपाल्टिने दिलेल्या घरात रहातात. जवळपास त्यांचे इतर नातेवाईक रहातात. त्या सगळ्यांपैकी कुणीच फारसं कामबिम कधी केलेलं नाही.

तो स्वतःला सायको किलर म्हणवतो. पोलिसांना व कोर्टाला खून करण्यामागे काही विवक्षित प्रेरणा, उद्देश, द्वेष, जातीय द्वेष, गरीबी असं काहीही आढळून आलेलं नाही. केवळ चीप थ्रिल मिळविण्यासाठी केलेला एक निरर्थक खून! त्यानं अनुजला का मारलं याचं उत्तर त्यानं कोर्टात 'आय ऑनेस्टली डोन्ट नो' असं दिलं आहे.

या वरून काही चांगल्या उद्देशाने केलेल्या कायद्याचं पर्यवसान समाजकंटक निर्माण करण्यात होऊ शकतं हे मात्र दिसून येतं.

त्यातली जमेची बाजू इतकीच की स्टेपलटनला पकडणे, खटला उभा करून, सुनावणी होऊन जन्मठेपेची शिक्षा फर्मावणे हे सगळं अवघ्या ७ महिन्यात उरकलं. त्याबद्दल मला तरी ब्रिटिश पोलिसांचं आणि न्यायसंस्थेचं कौतुक वाटतं.

(१) एक पौंड = सुमारे ८० रुपये असा सध्याचा भाव आहे.

=== समाप्त ===

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईथे सिंगापुरला घरांची अशीच हालत आहे. पीआर घर घेतात आनि भाडयावर देउन स्वता:च्या देशात जाउन मजेत रहतात. पण त्यामुले बाकिच्यांचे हाल होतात.

अरे चिमण उसगावात पण तीच स्थिती आहे.
मग टी पार्टी वाल्यांना मत द्या. Light 1

जगात काही लोक अत्यंत दयाळू आहेत. अगदी संत! कुणि कितीहि अपराध केले तरी त्याला क्षमा करा!
निदान इंग्लंडमधे गैरफायदा घेणार्‍यांना पकडून त्यांच्यावर लगेच कारवाई तरी केली. नशीब तिथले अतिदयाळू लोक मधे पडले नाहीत, अमेरिकेत तेहि मधे पडतील.

आणि या दयाळू लोकांबद्दल मला संशय आहे कारण मी एक विनोद ऐकला, पण त्यात बरेचसे सत्यहि आहे.

एकदा एक शहाणा माणूस नि एक अति दयाळू असे रस्त्याने जात असता त्याम्ना एक भिकारी दिसला. शहाण्या माणसाने विचारले का भीक मागतोस? तो म्हणाला काय करू, नोकरी गेली, पैसे संपले, खायला काही नाही आता नोकरी शोधायला पण त्राण नाही. शहाण्या माणसाने त्याला १० डॉ. दिले (त्यात पोटभर खाऊन थोडे पैसे उरू शकतात) नि म्हणाला खा, नि नोकरी शोध.

अति दयाळू माणूस म्हणाला १० डॉ. मधे काय होणार, त्याला जास्त पैसे द्यायला पाहिजे होते. शहाणा माणूस काही बोलला नाही. दुसर्‍या दिवशी तोच भिकारी परत दिसला. आता तो अतिदयाळू म्हणाला, पहा मी तुला सांगितले होते १० डॉ. ने होणार नाही. त्याला शंभर डॉ. तरी द्यायला पाहिजेत. तो शहाणा माणूस म्हणाला बरं तू १०० डॉ. दे.
नि त्या अतिदयाळू माणसाने शहाण्या माणसाच्या खिशात हात घालून त्या भिकार्‍याला १०० डॉ. दिले!

म्हणजे यांचा सगळा दयाळूपणा दुसर्‍याच्या जीवावर!

मला तर फारच राग येतो. मी नि माझ्यासारख्या अनेकांनी परदेशातून इथे येऊन, किंवा इथल्या लोकांनी सुद्धा, खूप श्रम करू, अभ्यास करून, थोडेफार पैसे मिळवले नि आता या अतिदयाळू माणसांना त्यातून कर घेऊन फुकट्यांना पोसायची हौस!

कधी काळी खूप श्रीमंत असताना काहीतरी कायदे करून ठेवले, आता दिवाळे वाजायची वेळ डोळ्यासमोर दिसत असूनहि काही बदल करायचे नाहीत.

असे म्हणतात की एकेकाळी अतिश्रीमंत नि अत्यंत बलशाली भारताने जुन्या कल्पनांपासून प्रगति न केल्यामुळे त्यांच्यावर हजारो वर्षे त्यांच्याहून कनिष्ठ लोकांनी राज्य केले. अमेरिका , इंग्लंडचे त्याच कारणांमुळे तसेच होणार आहे.

विकसित देशात भत्ते हे आवश्यकच आहेत. जर भत्ते नाही दिले तर गुन्हेगारी वाढेल. भत्ते न देता कायदे कडक केले तर लोक एकटे राहायला लागतिल. सिंगापुर , हॉगकॉन्ग, मकाउ सार्ख्या देशात भत्ते कमी असल्याने जनन दर ( birth rate) १.१ आला आहे. जनन दर २.१ असेल तर लोकसंख्या तेवढीच रहाते. रहाणिमानाचा खर्च जास्त असल्याने बरेच जण एकटे रहातात किंवा लग्न करुन मुल होउ देत नाहित, त्यामुळे ह्या तीन प्रदेशात स्थानिक लोक झपाट्याने कमी होत आहेत. हॉगकॉन्ग, मकाउ चीन मध्ये असल्याने बरेच चिनी लोक स्थलांतर करतात त्यामुळे लोकसंख्या तेवढीच रहाते. सिंगापुर मध्ये जगभरातुन लोक येतात आणि सरकार त्याना देशाचे नागरिकत्व देते. आजच्या घडीला सिंगापुर मध्ये निम्मी लोक दुसर्या देशात जन्माला आलेले आहेत. निम्मी जनता परदेशी असल्यामुळे सामाजिक घडी विसकटली आहे.
विकसित देशामुळे लोकाचे आयुश्यमान वाढले आहे. त्यामुळे तुतीय आणि चतुर्थ श्रेणीतिल लोकाकडे सत्तरीनंतर पैसा उरत नाही. ( विकसित देश असल्याने दवाखाने आणि इतर सुविधासाठी बर्रच पैसा लागतो). ह्या वयात बाकी काम मिळत नसल्यामुळे ही मंडळी restaurant मध्ये भांडी घेउन धुवायाची कामे करावी लागतात. Singapore hawker center मध्ये खरकटी उचलणे, भाडी घासणे ह्या कामासाठी ८० टक्याहुन जास्त लोक ७०+ आहेत.
म्हातारे झाल्यावर सरकार पुरेसा भता देत नसल्यामुळे आत्महत्या करतात. As per Singapore Government record, ५% लोकाचा म्रुत्यु अनैसर्गिक कारणामुळे होतो . त्यातले बरेच जण आत्महत्या करतात. ( कायदे कडक असल्याने खुन, गोळीबार वगैरे होत नाहीत, रस्ते चांगले असल्याने अपघात पण कमीच, थोड्याफार प्रमाणात फाशी दिली जाते.)

अनिवासिय भारतियासाठी मात्र हे देश चांगले. ह्या तिन देशात कर खुप कमी असतात त्यामुळे हातात चांगले पैसे मिळतात. बाकी विकसित देशात तुम्ही ४०% पेक्षा जास्त पगार कर म्हणुन देत असता. ज्या प्रमाणात भत्ते त्या प्रमाणात कर. !

ईथे सिंगापुरला घरांची अशीच हालत आहे. पीआर घर घेतात आनि भाडयावर देउन स्वता:च्या देशात जाउन मजेत रहतात. पण त्यामुले बाकिच्यांचे हाल होतात>>> कैच्याकै

सिंगापुर चे नियम अती कडक आहेत, इथे पीआर घर घेण्यापुर्वी बाहेरच्या देशातली घरे विकावी किंवा दुसर्‍याच्या नावे करावी लागतात, आणि इथे घर घेऊन भाड्यावर देऊन दुसर्या देशात/भारतात राहता येत नाही.

शिवाय ईथे पीआर बेकार भत्ता प्रकार नाहिच.

उगा उचलली जीभ....

भारतात स्वातंत्र्यसैनिक पेन्शन ही अशीच एक भ्रष्टाचारी योजना आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरी स्वातंत्र्यसैनिकांची संख्या म्हणावी अशी कमी झालेली नाही. उ.प्र., बिहारमधून अनेक स्वा.सै.पेन्शनर्स असे आहेत की ते स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी जन्मलेही नव्हते किंवा अगदीच लहान होते. आईवडील तुरुंगात असताना जन्म झाल्यामुळे अतिशय आबाळ झाली म्हणून व्यंग आले, शिक्षण होऊ शकले नाही म्हणून हलाखीची परिस्थिती आली, आईच्या पोटात असताना आईला ब्रिटिशांकडून मारझोड झाली म्हणून गर्भ अशक्त निपजला वगैरे अनेक कारणे दिली गेली आहेत. त्यात गोव्याच्या मुक्तिलढ्यात भाग घेतला असे दाखवणारेही आहेत. (गोवा स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन मिळते.) अलीकडे तर आणीबाणीत कारावास भोगलेल्यांनाही पेन्शन लागू करण्याचा सरकारी इरादा प्रसिद्ध झाला होता.
आपल्याकडे कोणतेही सर्टिफिकेट मिळू शकते, कसलेही वेरिफिकेशन होऊ शकते. कोणताही दाखला, ओळखपत्र मिळू शकते.

++१११ हीरा

अव्वल नम्बरचा भ्रष्टाचार आहे स्वासै स्कीम म्हणजे.
अचाट पेन्शन मिळते कित्येक लबाडांना. खरे स्वातंत्र्यासाठी झोकून देऊन काम केलेले किती तरी वीर राजकिय ओळखी नाहीत किंवा पेन्शनसाठी लाळ घोटाळणे शक्य नव्हते/तत्वात बसत नव्हते म्हणून खंगून मेले.

Pages