याची देही … याची डोळा

Submitted by तोफखाना on 25 March, 2015 - 10:00

वाट पाहणे … किंवा एखाद्याला वाट पाहायला लावणे ह्या सारखी शिक्षा नसेल, आणि एखाद्या निर्णयाची वाट पाहणे म्हणजे काय हे विचारू नका . काय निर्णय येईल, तो आपल्या बाजूने असेल का ? असला तर पुढे काय? नसला तर पुढे काय करावा अश्या असंख्य प्रश्नावली. मग आपणच निकाल आपल्याच बाजूने लागेल असं आपलं सांत्वन करावा असा खेळ सुरु होतो.

क्षणाक्षणांचा विचार करताना
काही क्षण मात्र निस्तब्ध निसटतात

त्या सरकलेल्या , निसटलेल्या
'क्षणांचा' मात्र कोठेच हिशेब लागत नाही

Congrats .... you have been selected in our Company. You can join ....

पुढचे शब्द हवेत विरले होते …. काल पर्यंतचा सगळा प्रवास एका क्षणार्धात लक्ख चमकून गेला. अभियांत्रिकीची ४ वर्षे, CDAC ने ६ महिने केलेली केलेली जीवघेणी कत्तल , प्रोजेक्ट्स ,submission , अथ पासून इति पर्यंत सर्व काही तेही लक्ख.

अंधाऱ्या रात्री बरसणाऱ्या मेघांना आरपार चिरून विद्युल्लतेने आपलं अस्तित्व प्रकट करावं असं. काही क्षणासाठी पण लक्ख .

पुढचे सर्व सोपस्कार उरकले, हालचाली मध्ये आलेला यांत्रिकपणा आता कमी होत आला होता आणि मी अधिक वास्तवात आलो होतो. कारण पण तसं होता इतका अभ्यास तयारी करूनही कुठेच निवड होत नाही म्हणजे काय, आपलं काय चुकत आहे, कुठे कमी पडत होतो काही कळत नव्हतं. मनात नाही नाही ते विचार येत होते आणि जात होते. घरचे 'नको काळजी करू होईल निवड आज नाही तर उद्या' अस म्हणत आधार देतच होते पण कुठे तरी त्यांना पण काळजी होतीच.

वयात आलेली मुलगी आणि न कमवता मुलगा ह्यांची चिंता आई वडिलांची काय अवस्था करत असेल हे आपण आई बाप झाल्याशिवाय कळणार नाही हेच खरे.

माझ्या सोबत निवड झालेल्या मित्र -मैत्रिणीचे अभिनंदन करून पडलो. दीपबंगला चौक ते सदाशिव पेठ हे अंतर मी रोज पायी कापत होतो पैश्यांचा प्रश्न नव्हता पण पोट रिकामं असल्याशिवाय भाकरीची किंमत कळत नाही हीच जाणिव कायम राहावी म्हणून हा अट्टहास. पण त्या दिवशी मी तरंगत होतो चालण्याचा प्रश्नच नव्हता. कोणाला सांगू न कोणाला नाही अस झाला होता. कानामध्ये वारं शिरलेल्या वासरागत अवस्था. 'हॉटेल ललित महल' म्हणजे मी चलता चलता ज्ञानेश्वर पादुका चौका जवळ आलो होतो. इतक्यात आई चा फोन आला 'आज interview होता ना ? काय झालं' …. काय करावं सांगू का नको अश्या मनःस्तिथि असताना एक कल्पना मनातून चमकून गेली आणि आईला म्हणलो "हो … interview झाला निकाल उद्या आहे".

झपझप पाय टाकत रूम आलो, ऑफर लेटर आणि बाकीचे सामान घेऊन शिवाजी नगर बस स्थानका मध्ये आलो पण गाडी उशिरा होती. रात्रीच्या वेळ असून हि जेवणावर वासना नव्हती. मन तर आधीच पुढे धावत होतो. आई बाबांना प्रत्यक्षात कधी जाऊन सांगतो अस झाला होतं. थोड्या वेळाने गाडी आली रात्र असल्याने गर्दी अशी फारशी नव्हती खिडकी जवळ जाऊन बसलो, गाडी निघाली पण रात्र असूनही झोप येत नव्हती. रात्री गाडी जेवणा साठी कुठेतरी थांबली घरी जाण्यास अधीर झालं होतं पुढे धावत होतं. एकूण ५ तासांच्या प्रवासानंतर मी उरतलो.

सकाळचे५. १० वाजले होते, घर स्थानकापासून जवळ असल्याने आणि एक अनामिक उत्साह अंगात होता, एका ओढीने मी निघालो होतो. सकाळच वातावरण आणि थंडी असल्याने थकवा जाणवत नव्हता, घराजवळच्या मंदिरात काकडा चालू होता वातावरण प्रसन्न होतं. आई बाबांना उठवाव का नाही म्हणून बाहेर थांबलो होतो. ५ मिनिटामध्ये आई उठली आणि भांडी कुंडी, पाणी भरणे अशी कामं सुरु झाली, मी दारामध्ये जात हळूच आई ला हाक मारली. माझा आवाज एकूण आई एकदम दचकून बाहेर आली दरवाज्यामध्ये मला पाहून म्हणाली

"तू तर पुण्यात होता इकडे कसा आलास …… का आलास? ……. interview होता ना काय झाला? ……. तुला बर नाही का?…… निघायच्या फोन का नाही केला ? …… काही बोलत का नाही …. अहो बाहेर या … बघा हा पुण्याहून आला आहे "

शेवटच्या वाक्याने आई ने बाबांना बाहेर बोलावल.

मी हळूच ब्याग पुढे केली हळूच ऑफर लेटर काढलं, पुढे केलं "माझी निवड झाली आहे … हे ऑफर लेटर अजून २ महिन्यांनी join करा अस सांगितलं आहे "

पहाटेच वातावरण आता अधिकच शांत झाला होतं… त्या अवस्थेत आई ने ऑफर लेटर हातात घेतल आणि एकदम मला पोटाशी धरून डोक्यावरून हाथ फिरवला. तो थरथरता स्पर्श अंगावर शहारे आणत होते, डोळ्यात आनंदाश्रू होते. बाबा शांत होते पण त्यांना पण आनंद झाला हे त्यांचा कृती मध्ये दिसत होते, बाबांनी अंघोळ करून लेटर घेतलं देवापुढे दिवा लाऊन लेटर तिथे ठेवलं. बाबांची प्रतिक्रिया आनंदित आणि संयमित होती.

थोड्या वेळाने माझ्या मनात विचार आला "काल जर फोन करून आई बाबांना हि बातमी सांगितल असता तर ह्या भावना, तो स्पर्श, तो आनंद काय मला फोन वर दिसला असता का,अनुभवता आला असता का ?" तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी काही गोष्टीना मात्र पर्याय नाही हे अधिक प्रकर्षाने जाणवल, त्या गोष्टी अनुभवाव्याच लागतात.

काल दिवसभर ची धावपळ आणि रात्रीचा प्रवास आणि जागरण ह्यांनी प्रभाव दाखवायला सुरवात केली होती … तो मायेचा स्पर्श आणि तो आनंद मनात घेऊन पलंगावर आडवा झालो. डोळे झाकल्या-झाकल्या झोपने अंगावर पांघरून घालण्यास सुरवात केली होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

हा प्रसंग अगदी मनात घर करून गेलेला आहे. आज इतकी वर्ष होऊन सुद्धा हा प्रसंग काल घडल्यासारखा डोळ्यासमोर उभा अहे.

ते अश्रू , तो स्पर्श आज ही जाणवतात.

केवळ अप्रतिम... . आयुष्यात काही गोष्टींचे मोल मोजमाप करताच येत नाही... तसाच प्रसंग आहे हा...ती अनुभूतीच घ्यायला हवी.. वाचून सुधा भावना पोचल्या...

मानुषी, अनघा , आबासाहेब आणि Mo आपल्या प्रतिसादाबद्दल हार्दिक आभार , आणि सहमत सुद्धा Happy

काही गोष्टी ह्या केवळ अनुभवातूनच समजता येतात , पण हल्ली स्मार्ट फोन युग आहे लोकांना नैसर्गिकते पेक्षा virtual गोष्टी अधिक 'खऱ्या' वाटतात Sad

हे माझे वयक्तिक मत आहे

खूप आवडलं आणि भावलं सुध्द्दा. कारण हे मी विरुद्ध भुमिकेतुन अनुभवलं आहे .

माझा मुलगा होता पुण्याला शिकायला अणि आम्ही ठाण्याला. असेच कॅम्पस प्लेसमेंटचे दिवस होते शेवटच्या सेमचे. मी रोज संध्याकाळी त्याला खुशालीचा फोन करीत असे तसाच त्या दिवशी पण केला. पण त्याने फोन घेतला नाही आणि मेसेज केला बिझी आहे थोड्या वेळाने फोन करतो म्हणून. आमची जेवण वैगेरे झाली आणि साडे नऊच्या सुमारास बेल वाजली. आत्ता कोण ? असा विचार करत दार उघडलं तर मुलगा दारात उभा. मला काही कळेचना हा आत्ता कसा आला ? काय झालं असेल? मनात नाना वाईट विचार आले पण ते त्याला माझ्या चेहर्‍यावरुन कळू नयेत म्हणून मी पाणी आणायला आत गेले. मुलगा हॉल मधुनच म्हणाला " आई मला जेवायला नकोय. तु जरा बाहेर ये." ... मी अधिकच काळजीत पडले. पण बाहेर त्याच्या समोर येऊन बसले. मग मुलाने बॅग मधुन प्लेसमेंट लेटर आणि चितळ्यांच्या आंबा बर्फीचा बॉक्स काढुन आमच्या हातात दिला. त्या क्षणी त्याचा चेहरा जो काय उजळला होता तो मी जन्मात विसरु शकणार नाही. टेस्ट कशी झाली, इंटरव्ह्यु ला काय काय विचारलं, मी काय काय उत्तर दिली, कंपनी कशी आहे वगेरे स्टोरी सांगतानाचा त्याचा उत्फुल्ल आवाज मला आत्ता सुध्दा ऐकु येत आहे. देवाला नमस्कार करुन झाल्यावर तो आम्हाला नमस्कार करण्या साठी वाकला तेव्हा काल परवा पर्यंत आमच्यावर अवलंबुन असणारा हा मुलगा स्वतःची भाकरी स्वतः मिळवण्या एवढा मोठा झाला ह्या विचाराने डोळे भरुन आले. त्याच्या डो़क्यावरुन हात फिरवताना त्याच्या डोळ्यात मला दिसत होता आनंद आणि आत्मविश्वास. आणि माझ्या डोळ्यात त्याला दिसलं असेल फक्त प्रेम.

ह्या सगळ्या चिरंतन आनंद देणार्‍या क्षणांना प्रत्य़क्ष भेटीमुळेच मूर्त रुप मिळाले. फोनवर त्याने ही बतमी सांगितली असती तर ह्या अविस्मरणीय क्षणांना आम्ही दोघे ही पारखे झालो असतो.

तोफखाना , हेमा,

तुम्ही दोघानीही खूप सुंदर, ह्रुदयस्पर्शी लिहिलय... आम्हाला दोन्ही भुमिका अनुभवायला मिळाल्या..

हृद्य आहे .. Happy

>> काल परवा पर्यंत आमच्यावर अवलंबुन असणारा हा मुलगा स्वतःची भाकरी स्वतः मिळवण्या एवढा मोठा झाला ह्या विचाराने डोळे भरुन आले.

Happy