‘थक्क, थुंय्य !!
आज धुळवड ! एकाकी आयुष्यात भूतकाळातील आठवणी पींजून काढणं हा हमखास विरुंगळा.
ढगाळ वातावरण. आजुबाजूला निरव शांतता. थंडीमुळे सणाची सुरवात नक्कीच उशिरानी होणार.
बाहेर तर पडायच नाहिए, रंग केव्हांच उडून गेलेत अन् परत भरणारही नाहीए. फक्त आठवणींचा
पींजा उडणार - धुरकट-मळकट, मन व्यापून टकणार्र ! धनुष्याच्या तांतीवर घासटून आदळणार्या
घोट्याच्या धुंद तालावर __ थक्क_थूंय्य !
दिवा लावून संगणकावर आठवणी पिंजायच ठरवल. जवळची खिडकी उघडली. आजकाल कुठलाही संदेश न आणणारी
कबुतर थैमान घालतात म्हणून बंद ठेवलेली. सैरावैरा वाढलेल्या कडुलिंबाची कोवळ्या पानांची फादी
हाताला येईल इतकी जवळ. आजुबाज्जूच्या इमारती आणि रस्त्याला लागून भरमसाठ वाढलेल्या
रबराच्या झाडाची मोठी-दाट पानं, अन् शेजारी ताडमाड काटॆरी झाडाची जाळी.आकाश फारसं दिसत नव्हत.
जे दिसत होत ते धूसर-काळ्या ढगांनी व्यापलेल होत.
लहानपणि उन्हाळ्याच्या सुरवातीला, कापूस पिंजणार्या कारागिरांच्या फेर्या असायच्या. खांद्यावर लटकवलेल्या धनुष्याच्या
चामडी- बकरी-शेळीच्या आतड्याच्या वादीवर घोटा मारून जाहिरात करायचे आगमनाची. मुसलमानी पेहराव - लुंगी आणि उघड्या
छतिवर अंगात नक्षिकाम केलेल जाकिट - थक्क-थुंय्य !
पन्नाशी उलटून गेली तरी धडधाकट शरिरयष्टि. सोबत पाण्यासाठी अल्युमिनियमचा टमरेल आणि भिवया,मिशा, दाढी आणि केसाळ
छातिवर पिंजलेल्या कापसाचे कपटे अशा ववतारातला अबदुल अजून डोळ्यासमोर आहे, काम द्या म्हणून गळ घालायचा. आजकाल
मशीनवर करवून घेतात लोक. पण मशीनमुळे खूप कापसाच नुकसान होत हे घ्याकि लक्षात. आणि कुटुंब कस पोसायच मी?
मग दिवस ठरला कि सकाळी नऊ ला सुरवात. गाद्या,रजआ,उषा वगैरे आठ-दहा नग निवडलेले असायचे. एका मोकळ्या केलेल्या खोलीत
कोपर्या लगतच्या भक्कम खुंटीला लहान धनुष्य टांगून त्याच्या वादीला पिंजायच धनुष्य अडकवायच जमिनीवर पलथी मारून बसल्यावर
स्प्रिंग सारख हातानी खालिवर - समांतर नाचवून बघायच अन् उंची ओके केली कि कामाला लागायच. त्या खोल्लीत आम्हा मुलांना मज्जाव असायचा
- धुरळा उडायचा म्हणून. तरिही खोलीच्या एकुलत्या खिडकीतून थोडावेळ बघत असू आम्ही भाऊ. धाकट्या दोन भावांच्या ओणव्या पाठींवर
हात रेटून उडी मारून. त्यांनापण कंबरेला धरून उंच गजाला क्षणभर लटकुन डोकवायची सहकार म्हणून संधि द्यायची!
उषा,गाद्या,रजयांचे खोळ टाके उसवून पूर्वतयारीत कापूस गाठोड्यातून बांधून ठेवलेला असायचा. काही खोळ नवीन तर इतर धुवून स्वच्छ
करण्याच कंत्राट मोठ्या बहिणींचे होते. थक्क-थुंय्यच्या तालावर आसपास नाचत असायच आम्ही.
अबदुलनी बरोबर आणल्ला डबा आईच घेऊन ठेवायची आणि जेवणासाठी काम थांबल कि ते ग्गरम करवून द्यायची - घरी केलेल्या निवडक ताज्या
पदार्थाची भर घालून. त्याच्या डब्यात मांसाहारी खीमा असायचा म्हणून तो गरम करण्याच काम मोलकरीण करायची. तो वास अजूनही दरवळतो मनांत !
संध्याकाळ होताहोता सर्व कापू पिंजून झालेला असायचा. त्यावेळी अबदुलची बायको आणि मुलगी त्याच्या मदतीला हजर व्हायची
- दाभणासारख्या सुया, ट्वाईनचा धागा, कात्रि वगैरे घेऊन. घराच्या बाहेरच्या अंगणात मोठ्या जाजमावर एकएक खोळ उलटून अंथरून त्यावर
लखलखित पांढरा शुभ्र मऊ कापूस रचला कि दोघी सराईतपणे खोळ कापसाच्या थरासकट उलटा गुंडाळून आत कापूस भरून घ्यायच्या.
मग शिवण मारून खोळाच तोंड बंद केल कि काठीचे रट्टे मारून कापूस सर्वदूर सारखा केला कि टाके घालायचे - तो आतल्याआत गोळा होऊ नये म्हणून.
टाक्यांतल अंतर किति-कस ते आईच सांगायची. गाद्यांच्या टाक्यांना ठिगळ लागल कि नाही हे बहिणी तपासून घ्यायच्या.
एव्हाना अबदुल कुंचा घेऊन खोली जैसेथे करायचा. जॅकेट चढवून बाहेर आलाकि त्याचा अवतार बघून हसू यायच. तुटक्या मराठीत आम्हाला उद्देशून म्हणायचा
- "घाम गाळला नाही तर पोटाला अन्न मिळ्त नाही अन् झोप येत नाही मुलांनो"
या धनुष्यावर मी असंख्य आठवणी पिंजून काढला आहेत. पण कापूस अजूनही धुरकट-मळकट आहे; मनात सगळे कोपरे व्यापून धुरळा तरंगतोच आहे.
पुन्हापुन्हा कानावर पडावा त्या धनुष्याचा टणत्कार, नाचाव त्या तालावर, आणि, दिसावा घामानी भिजलेला
आनंदी अबदुल ! !
‘थक्क, थुंय्य !!
Submitted by bnlele on 9 March, 2015 - 01:41
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आठवण. हल्ली हे पहायला पण
छान आठवण. हल्ली हे पहायला पण मिळणार नाही.
छान !! मस्त लिहिलय !!
छान !!
मस्त लिहिलय !!
अशी उजळाणी कर्रून मनाला थोड
अशी उजळाणी कर्रून मनाला थोड समाधान होत आणि प्रतिसाद वाचून हुरूप येतो- ऒषधी परिणाम !
आभार.
अर्रे खूप छान लिहिलंयस,
अर्रे खूप छान लिहिलंयस, भाऊकाका.. खूप मस्त वाटलं.. आपल्या ,'त्या' जुन्यावाल्या घरांतील सर्व खोल्यांमधे डोकवून आले पटकिनी..
अजून लिही तुझ्या लहानपणच्या आठवणी..
आणी हो!! ते टायटल ही अगदी बरोब्बर जमलंय.. टू गुड!!!
मस्त आठ्वण. आता हे कापूस
मस्त आठ्वण. आता हे कापूस पिंजणं सहसा नाही पहायला मिळत.
पण कधी कधी असं एकदम पुरातन काळात जाऊन बागडून यायला छानच वाट्तं.
छान लिहिलयं!
छान लिहिलयं!
अबदुलच रेखाचित्र माझ्या
अबदुलच रेखाचित्र माझ्या धाकट्या भावानी काढल.
त्याची लिंक - https://mail.google.com/mail/u/0/?ui=2&ik=be6da0ef1c&view=att&th=14c02df...
वा सुंदर उतरवलाय
वा सुंदर उतरवलाय शब्दात
पुलेशु
छानच लिहिलंय.. त्यांना
छानच लिहिलंय.. त्यांना पिंजारी म्हणतात ना ?. आम्ही पण त्यांच्याकडून घरीच गाद्या करून घ्यायचो.
सुरेख लिहीलय! गाद्या जुन्या
सुरेख लिहीलय!
गाद्या जुन्या झाल्या, त्यात कापसाचे गोळॅ जाणवायला लागले की आम्ही दुकानात नेऊन द्यायचो गादी , उशा वगैरे पिंजायला.
तिथे आम्ही पाहिलेलं तो एक काठी गादीवर आपटून आपटून बहूतेक कापूस मोक ळा करत असावा.
मी घरी धुणं वाळ त घालायच्या काठीने तोच उद्योग गादीवर केला अन् वरचा बल्ब फोडला! आईबाबांनी चांगलीच शाबासकी
दिल्याचं आठवतय
फारच आवडलं लिखाण. सगळं
फारच आवडलं लिखाण. सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.
आमच्या लहानपणी सुद्धा असे पिंजारी येत, मग ते अंगणातल्या अंगणात गादी मोकळी करून तोच कापूस पिंजून किंवा थोडीफार भर घालून लगेच गादी बनवून देत.
रम्य ते बालपण.
फारच हृद्य आठवण. मी पण बालपणात पोहोचले माझ्या.
पिंजारीच ते पण तो व्यवसाय
पिंजारीच ते पण तो व्यवसाय मशीन-युगात लुप्तप्राय आहे.
आता धनुष्याचा नाद नाही, तो ताल नाही वीट येईल अशी घरघर आहे !
एकदा वाटत आपण सर्वच पिंजारी
एकदा वाटत आपण सर्वच पिंजारी आहोत: शब्द पिंजून अर्थ शोधतॊ अन् खोळात- गद्याच्या किंंवा कवितेच्या भरतो,
मन मोकळ इथे माय्रबोलीवर शय्याच टाकून उघड्या डोळ्यांनी विश्व निरखतो, नवीन गाद्या किंवा नवजात शिशु करिता तयार मऊ रजया किंवा नाजुक _रेशमी लोड बघतो !
मायबोलीच्या भव्य पुरातन वृक्षावर असंख्य घरटी आहेत - वाद नाही केवळ संवाद आहेत, मज्जाव कुणालाच नाहीए,
विषयावर बंधन नाही, अफाट फांद्या आहेत. पिकली पानं गळत नाहीत, नवि पालवी सदैव वरच्या टोकांवर येते.
सुशासन, अन्यत्र नको शोधायला, मिळतो मंत्र जगण्याला.
आपले हे विश्व वेगळे, असंख्य इथे रंग वेगळे.
नांदू आपण सगळे,सगळे !
वाह! काका सुरेख पोस्ट आहे
वाह! काका सुरेख पोस्ट आहे शेवटची.
सुंदर लिहिलंय .... शेवटचा
सुंदर लिहिलंय ....
शेवटचा परिच्छेदही मस्तच ...
सुंदर लिहिलंय. आमच्याकडे अजून
सुंदर लिहिलंय. आमच्याकडे अजून अधूनमधून कधीतरी पिंजारी येतो.