संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया

Submitted by लीलावती on 28 February, 2015 - 00:19

आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...

त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.

त्यांच्या काळापेक्षा आता परिस्थिती बरीच सुधारते आहे परंतु बऱ्याच समस्या तश्याच आहेत . . .

हा लेख सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यावर चांगली चर्चा व्हावी म्हणून हा धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी छान पोस्ट!!

रिसर्चसाठी म्हणून प्रत्येक गोष्टीत बाल की खाल काढण्याची सवय लागली आहे. आता स्वतःच्या प्रत्येक विचार आणि कृतीवर नको तितका विचार केला जातो कधी कधी. >>> +१

निदान संशोधन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसावे. तसेच पैसा सुद्धा भरमसाठ नसवा. जेवढा जगण्यासाठी आवश्यक असेल तेवढाच असावा. ह्यायोगे गुणवत्ता आणि पॅशन असलेली लोकच फक्त तिथे येतील. आरक्षण आहे म्हणून किंवा भरमसाठ पैसा मिळतो आहे म्हणून जर लोक संशोधन क्षेत्रात यायला लागली तर एकूणच संशोधनाची क्वालिटी कमी होइल असे माझे मत आहे.

When International job markets slumps, lot of people takes admission to PHDs to be able to live in their desired foreign countries? Do they have passion, persistence? For what?

Some candidates can't secure admission to Govt colleges for graduate studies or couldn't get recruited in campus, later on able to get admissions for masters and eventually PHDs?

आरक्षण आहे म्हणून किंवा भरमसाठ पैसा मिळतो आहे म्हणून जर लोक संशोधन क्षेत्रात यायला लागली तर एकूणच संशोधनाची क्वालिटी कमी होइल असे माझे मत आहे.>>

पी. एच. डी. करणारे बहुतेक जण मी लेक्चरशीप करताना पाहिले आहे. त्यांच्याकडे आधी ग्रॅड वा पोस्ट ग्रॅड ही डीग्री असते पण प्राध्यापक/प्रोफेसर हे पद मिळावे म्हणून लेक्चर् लोक डॉक्टरेट करतात. आणि प्रोफेसर लोकांचे पगार हे नक्कीच चांगले असतात.

भारतात आयटीमधे तरी डॉक्टरेट लोकांची संख्या फार कमी आहे. पण त्यांना पगार नक्कीच छान मिळतो.

आणि बर्‍याच लोकांना डॉक्टरेट ला प्रवेश न घेता अमुक एक विद्यापीठ त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करते.

अवांतर होतय त्याबद्दल क्षमस्व!!

शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, किंवा कॅंपस मधे सिलेक्शन झाला नाही म्हणजे पी.एच.डी (किंवा संशोधन) करायची लायकी नसते किंवा संशोधनासाठी पॅशन नसते असे काही नाही!!! शाळेतल्या मार्कांवर तुम्ही पी.एच.डी साठी लागणारी गुणवत्ता तपासता आहात का??

बी, मी "पैसा भरमसाठ नसवा. जेवढा जगण्यासाठी आवश्यक असेल तेवढाच असावा" असे लिहिले आहे!! चांगला पगार आणि भरमसाठ पैसा ह्यात फरक नाही का??

प्राध्यापक/प्रोफेसर हे पद मिळावे म्हणून लेक्चर् लोक डॉक्टरेट करतात.>>> प्रोफेसर होण्यासाठी डॉक्टरेट ही किमान गरज आहे. पुढे संशोधन करूनच, संशोधनाची गुणवत्ता सिद्ध करूनच प्रोफेसर हे पद मिळवावे लागते.

भारतात आयटीमधे तरी डॉक्टरेट लोकांची संख्या फार कमी आहे.>>> हे कोणत्या आधारावर म्हणता तुम्ही??

आणि बर्‍याच लोकांना डॉक्टरेट ला प्रवेश न घेता अमुक एक विद्यापीठ त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करते.>>> त्याला मानद अथवा ऑनररी डॉक्टरेट म्हणतात. एखाद्या व्यक्तिचे एखाद्या क्षेत्रातील अफाट काम पाहून ही डॉक्टरेट दिली जाते. अशा व्यक्ती नावापुढे "डॉ" लावू शकत नाहीत (लावणारे लावतातही पण ते चालत नाही)

मस्त चर्चा चालू आहे.
स्त्री असल्या कारणाने शिक्षणाची संधीच नाकरली जाणे हे संतापजनक आहे. पण इथेच आणखी दोन निरीक्षणेही वाचनात आली -
१. संशोधनक्षेत्रात स्त्रियांच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे.
२. या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रचंड प्रमाणात आर्थिक गुंतवणूकीची आवश्यकता असते.
१ आणि २ हे संधी नाकारण्याचे आधार असू शकतात. यावर उपाय म्हणून संशोधनक्षेत्रातल्या शिक्षणासाठी बाँड लिहून घेण्याची सोय असते का? की अमूक एक वर्षं मी हे प्रोजेक्ट कोणत्याही वैयक्तिक कारणास्तव सोडू शकत नाही अशी लेखी हमी. म्हणजे ज्या स्त्रिया खरोखरीच संशोधनासाठी तयार आहेत त्यांना संधी नाकारली जाणार नाही. की यातही काही वेगळ्या अडचणी आहेत? कोणत्या?

सुमुक्ता, मी आयटी मधे काम करतो. अनेक मोठमोठ्या कंपन्यांमधे मी नोकरी केलेली आहे. अनेक देशात कामानिमित्त फिरलेलो आहे. माझ्या अनुभवाच्या बेसिसवर मी हे म्हणत आहे की आयटीमधे खूपच कमी डॉक्टरेट झालेले बघायला मिळतात.

माहितीबद्दल धन्यवाद.

>>When International job markets slumps, lot of people takes admission to PHDs to be able to live in their desired foreign countries? Do they have passion, persistence? For what?>>

या कॅटेगरीत स्त्री/पुरुष दोन्ही बघितलेत. अगदी लेक्चररच्या जॉबमधे ९ महिन्यात ग्रीनकार्ड होते म्हणून , ग्रीनकार्ड होण्यासाठी पोस्ट डॉक हे देखील बघितले आहे. नोकरी मिळे पर्यंत पीएचडी, नंतर अर्धवट सोडणे हे सर्वकाही होते. पण ते स्त्री/पुरुष दोघेही करतात.

रैना आणि आशुडी, रिझर्वेशन आणि बाँड हे दोन्ही वेगळे मुद्दे मांडल्याबद्दल धन्यवाद!

रिझर्वेशनच्या फायद्यांबरोबरच त्याचे तोटेही बरेच असतात... त्यामुळे तो ऑप्शन 'रोगापेक्षा इलाज भयंकर' असा होणार नाही ह्याचा विचार करायला हवा. बॉड फक्त स्त्रियांकरता न ठेवता सगळ्यांसाठी ठेवायलाही हरकत नाही. वर कोणीतरी लिहिलच आहे की आर्थिक स्थैर्य हवे म्हणून पुरूष ह्या क्षेत्रातून बाहेर पडण्याचं प्रमाणही बरच आहे.

'रीएन्ट्री क्रायटेरिया' प्रत्येक क्षेत्रात हवा. >>>> ह्यालाही अनुमोदन. आज कोणी कोणत्याही कारणासाठी मोठा ब्रेक घेणं शक्य आहे का? काही काही कंपन्या वर्ष/ दोन वर्षांच्या रजा देतात मात्र त्या पॉलिसीही मार्केट कंडीशनप्रमाणे बदलत असतात. शिवाय जरी त्याच कंपनीत पुन्हा आलं तरी गोष्टी बर्‍याच पुढे सरकलेल्या असतात. त्यामुळे त्या व्यक्तींना प्रॉडक्टीव्ह व्हायला बराच वेळ जातो. ह्याला उपाय काय माहित नाही कारण रजा घेणे हा व्यक्तीचा निर्णय होता आणि ती सोय कंपनी देते आहे त्यामुळे शिवाय वर रिएंट्री करायला वेळ कंपनीने का द्यावा? शेवटी त्यांनाही व्यवसाय करायचा आहे.

बाकी रैनाची पहिली पोस्ट अगदी टिपीकल रैना स्टाईल.. Happy

बॉन्ड ठेवला तर तो सगळ्याच उमेदवारांसाठी ठेवावा लागेल.
रिझर्वेशनचा मुद्दा आला म्हणून - इथे अ‍ॅफर्मेटिव अ‍ॅक्शन सदरात स्त्री, मायनॉरीटी वगैरे कॅटेगरीत फंडिंग करणार्‍या कंपनीची अट म्हणून प्रोफेसरच्या हाताखाली रिसर्च टीमवर काम करणारे बघितले आहे. हे प्रोजेक्ट्स संरक्षण क्षेत्रात काम करणार्‍या कंपन्यांचे होते. त्यामुळे सिटिझन, सिक्युरीटी क्लिअरन्स वगैरे रुटिन होते.

There have been several discussions about enforcing a bond for candidates pursuing a PhD in CSIR labs, and as far as my knowledge goes, it has been concluded that it is illegal to enforce any such rule.

It would be great if the discussion takes into account the ' entry' of female candidates, rather than the 're-entry'.

माफ करा बी. तुम्ही आयटी लिहिलत आणि मी आयआयटी वाचलं चुकुन. गैरसमजाबद्दल क्षमस्व.

When International job markets slumps, lot of people takes admission to PHDs to be able to live in their desired foreign countries? Do they have passion, persistence? For what? >>> या कॅटेगरीत स्त्री/पुरुष दोन्ही बघितलेत. अगदी लेक्चररच्या जॉबमधे ९ महिन्यात ग्रीनकार्ड होते म्हणून , ग्रीनकार्ड होण्यासाठी पोस्ट डॉक हे देखील बघितले आहे. नोकरी मिळे पर्यंत पीएचडी, नंतर अर्धवट सोडणे हे सर्वकाही होते. पण ते स्त्री/पुरुष दोघेही करतात. >> बरोबर आहे. मी "माझ्या मते" आदर्श परिस्थिती काय असायला हवी हे सांगितले. तसे होतेच असे नाही. इनफॅक्ट तसे होतच नाही.

पीएचडी करताना शिष्यवृत्ती असेल तर बॉंड लिहून घेता येउ शकतो. एखादा विद्यार्थी स्वखर्चाने पीएचडी करत असेल तर बॉंड कसा काय लिहून घेता येइल? परदेशात स्वखर्चाने पीएचडी करणारे लोकही पुष्कळ असतात. पण पोस्टडॉ़क च्या बाबतीत मात्र बॉंड लिहून घेणे चूक ठरू शकते. बॉंडची टर्म संपल्यावर नोकरीची गॅरंटी कोण देणार?

रैनाचे ' 'उमेद' मात्र गमावू नका' मोठ्ठ्या अक्षरात लिहायला हवे.

जिज्ञासा, तुझ्या मागील एका प्रतिसादात तु जराशी निराश वाटलीस. खुप महत्वाचे काम करताय तुम्ही लोक, धीर कमी होऊ देऊ नका. अरे, तुम्ही लोक अशी गोष्ट शोधणार आहात जी जगात त्याआधी कदाचित कोणालाच ठाऊक नसणार आहे.. आणि नंतर त्याचा उपयोग कदाचित अख्ख्या जगाला होणार आहे. ते संशोधन जरी पुर्ण झाले नाही तरी त्याचा उपयोग करुन पुढे कोणी पुर्ण करु शकेल हेही किती प्रचंड काम असेल तुमचे.

आज कोणतेही औषध घेताना नेहमी विचार येतो संशोधकांनी संशोधन करुन हे जगात आणले नसते तर? आणि मग त्यांना शतशः धन्यवाद दिले जातात. (अवांतर: सर्व पॅथींवर विश्वास आहे, वापरतो, गुण येतात).
हेच इतर संशोधन क्षेत्रातील लोकांना पण गोष्टींना पण लागु आहे ज्याचा आज आपण विनासायास वापर करुन आयुष्य सोपे करतोय.

रजा घेऊन पुन्हा काम करु शकत नाही हे माहीत नव्हते, ते बदलायला हवे. जर शंशोधन करणार्‍या व्यक्तिची पुण्हा कष्ट घ्यायला तयारी असेल तर का चालु नये कळत नाही.

माफ करा बी. तुम्ही आयटी लिहिलत आणि मी आयआयटी वाचलं चुकुन. गैरसमजाबद्दल क्षमस्व.>> टु एर इज ह्युमन. प्लीज क्षमा वगैरे मनापासून नको Happy छान लिहिता तुम्ही.

बाफ आल्यापासून चर्चा वाचत आहे. मूळ लेखही वाचला. दोनदा प्रतिसाद टाईप करून टाकला नाही. मलाही स्वाती, पराग, नी, बुवां सारखंच वाटलं की चर्चा काही ठराविक आणि मर्यादित मुद्द्यांभोवती फिरते आहे. भावनाविवश न होता प्रॅक्टीकली विचार केला तर स्त्रियांचे संशोधन क्षेत्रांमधे कमी असण्याच्या प्रमाणाचे कारण खालील मुद्द्यांमुळे असू शकेल -

१. लिंगभेदामुळे संधी नाकरली जाणे
२. राजकारण (किंवा राजकारणाशी दोन हात करण्याची इच्छाशक्ती कमी पडणे अथवा इतर कारणांमुळे तसं करण्याची इच्छा नसणे).
३. सोशल कंडीशनिंगमुळे घरातून, समाजाकडून आणि स्वतःकडून असलेल्या (कधी कधी अ-वास्तव) अपेक्षा (लग्न, मुलं बाळं व त्यामुळे बदलणार्‍या प्रायॉरीटीज)
४. आर्थिक कारणे जसे की इतर क्षेत्रांपेक्षा पगार कमी असणे.
५. या क्षेत्रात आर्थिक गुंतवणूकही भरपूर लागते. स्त्री संशोधक असल्यास एवढी मोठी गुंतवणूक करणारे तुलनेने कमी असतात.

या किंवा अशा अडचणींवर इथल्या स्त्री संशोधकांनी कशी मात केली? यापेक्षा अजून काय वेगळ्या अडचणी आल्या? आवडीचा विषय संशोधनासाठी मिळाला का स्त्री म्हणून त्यात मर्यादा आल्या? सेमीनार्स/कॉन्फरसेसमधे, रीसर्च पेपर्स वाचताना स्त्री संशोधक म्हणून प्रतिसाद कसा होता?

संशोधक ही एक वृत्ती आहे, गुण आहे. हा गुण मुलींमधे वाढवा जेणेकरून पुढे त्या हे क्षेत्र निवडतील यासाठी काय करावे? थोडक्यात मुलींनी या क्षेत्रात यावे म्हणून त्यांना लहानपणापासून कसे प्रोत्साहन द्यावे? इथल्या स्त्री संशोधकांनी ज्या अडचणी सांगितल्या, त्यामुळे मुलींनी या क्षेत्रात येऊ नये असे त्यांना वाटते का? का तरीही स्त्रीयांनी या क्षेत्रात जरूर यावं असं मत आहे?

हे प्रामाणिक प्रश्न आहेत. माझी स्वतःची लेक, तिच्या मैत्रीणी, माझ्या मैत्रीणींच्या लेकी आता २-३ वर्षात 'करीअर' निवडतील. त्यांना जरूर पडल्यास मार्गदर्शन करता येईल म्हणून शेवटी इथे लिहीलं.

सेमीनार्स/कॉन्फरसेसमधे, रीसर्च पेपर्स वाचताना स्त्री संशोधक म्हणून प्रतिसाद कसा होता? >> प्रतिसाद केलेल्या कामावरच असतो त्यामुळे तो चांगलाच मिळतो. सुरुवातीला कधी कधी पुरूष संशोधकांची प्रतिसाद व्यक्त करायची शैली ऑफेन्सिव्ह वाटू शकते उदा: आवडल तरी चटकन फ* म्हणणार. सुरूवातीला सवय नसते. शरीरशास्त्रावर बोलताना फार क्रूड होतात कधी कधी. हळूहळू मुलींना नीरक्षीरविवेक जमतो - मुद्दा काय त्यावर फोकस ठेवायचा.

माझ्या क्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी आहे आणि पुरूष वरिष्ठांना जाणीव आही, त्यांना हे बदलायचे आहे. त्यामुळे मेल कलीग्ज ही कॉन्फरंस नंतर लहान मुलीप्रमाणे मी हॉटेल शटल मध्ये बसेपर्यंत थांबणे वगैरे बारीकसारीक प्रकार ही करतात. पण असे प्रत्येकीचे अनुभव असे नसतात. जिथे मुलींचे प्रमाण जास्त आहे तिथे काम चांगले असूनही ह्या वर्षी जॉब मार्केटवर ही मुलगी नको म्हणून तिला नॉनकंस्ट्र्क्टीव्ह रिव्ह्यूज देणे इ. प्रकार घडतात. ह्यात स्वतःचा मेंटर ही कधी कधी सामील होतो. हे डिप्रेसिंग ठरू शकते.

धन्यवाद सीमंतिनी :). अजून अनुभव किंवा काही सांगण्यासारखं असेल तर नक्की इथे सांग. बाकी लोकांकडूनही वाचायला मिळालं तर बरं.

नीधप,

>> वरती कुणीतरी संशोधन क्षेत्रातील स्त्रियांनी ब्रह्मवादिनींसारखा गट तयार करावा असे काही म्हणले आहे ते मला
>> काळाची गरज का या प्रश्नापेक्षा जास्त ऑफेंडिंग वाटले.

तो सत्पुरुष मीच! Happy

गृहस्थाश्रम म्हंटला की जबाबदाऱ्या आल्याच. बायकांना कार्यक्षेत्र आणि गृहस्थाश्रम दोघांनाही एकाच वेळी कसा न्याय देता येईल? एकंदरीतच बायकांचे विकल्प (चॉईस) कमी असतात, शिवाय लवचिक नसतात. जे काही करायचंय (कार्य वा गृहस्थी) ते बायकांना लहान वयातच ठरवावं लागतं. नंतर रूळ बदलून बघू असं करता येत नाही. त्यामुळे एखादा बायकांचा संघ असेल तर निदान ओळख (=आयडेंटिटी) तरी मिळेल. हा काही उपाय नव्हे हे मान्य. सैनिकाला गणवेश देण्यासारखा हा प्रकार आहे.

ऑफेंडिंगचं म्हणाल तर संघातल्या बायकांना असे प्रश्न विचारण्यात येणार नाहीत (अशी आशा आहे) :
>> त्यामुळे बाई कितीका काम करेना, कुठल्याका पोझिशनला असेना तिला घराबद्दल कोणीही टोकू शकतो.

आ.न.,
-गा.पै.

अंजली - काही प्रश्नांची उत्तरे इथे देते

संशोधक होण्यासाठी आधी स्वतंत्र विचार करायला, प्रश्न पडायला शिकले पाहिजे. हा गुण लिंगनिरपेक्ष आहे. हा मुलीच न्व्हे तर मुलांमधेही वाढवला पाहिजे. संशोधन म्हणजे नक्की काय असतं, विविध विषयांतलं संशोधन (शास्त्र, समाजशास्त्र, भाषा, मानव्य) कसं चालतं हे साध्या सोप्या शब्दांमधे त्यांच्यापर्यंत पोचवणारे कार्यक्रम, पुस्तके हा एक मार्ग आहे. (मागे वळून बघता मला इतिहासाची खूप आवड होती पण आर्किऑलॉजीत कायमची पडले ती अशा साध्या रंजक दोन पुस्तकांमुळे - दॅट वॉज अ ट्रिगर पॉइंट)
आर्थिक परतावे कमी व बेभरवशी नोकरीच्या संधी हे यात पडतानाच माहित होतं. कितीही टफ असलं तरी याबद्दल माझी तक्रार अजिबात नाही. समाजशास्त्रातले परतावे हे शास्त्रशाखेपेक्षाही कमी व बेभरवशी असतात तरीही.

कितीही अडचणी असल्या तरी जास्तीत जास्त मुलींनी - खरंतर ज्यांना आवड आहे, क्षमता आहे अशा सगळ्यांनीच - या क्षेत्रात आलं पाहिजे असं वाटतं. त्यातल्या खाचाखोचांची, अडचणींची जाणीव जरूर करून देते पण यात येऊ नका असं कधीच सांगत नाही. आणि ज्याला ती अंतरीची हाक खरीखुरी ऐकू आलेली असते तो/ती येतात पण,

स्त्री म्हणून काम करताना मला हवा तोच विषय मी निवडला. सुदैवाने मी विद्यार्थीदशेत मुलामुलीत भेद न करणार्‍या संस्थेत शिकले याचाही त्यात वाटा होता. स्त्री म्हणून काम करताना मुलांपेक्षा जास्त उरस्फोड करावी लागली - संसाराची व्यवस्था दोन महिने माझ्या अनुपस्थितीत लावताना आणि घरापासून दूर काही वर्षे नोकरी करताना. पण मी ते कुटुम्बसदस्यांच्या मदतीने केलं - त्यांना आवडलं की नाही हे न विचारता मी हा असा निर्णय घेतला तर साथ देतील का असं विचारलं. होकारार्थी उत्तर आल्यावर बाकी कसलीही गिल्ट कधीच वाटून घेतली नाही. हे नोकरीबाबत. संशोधनाच्या कामाबाबत मी तेही विचारलं नाही कारण मी ते करणारच हे कधीच आणि कायमचंच स्पष्ट आहे. फक्त एकमेकांच्या सोयी बघून तारखा ठरवल्या.

सेमिनार्स, कॉन्फरन्सेस मधे संशोधक म्हणून सादरीकरण करताना मी स्त्री आहे का पुरुष हे दुय्यम ठरतं - निदान माझ्या आणि टॉपच्या संशोधकांसाठी (दोज हू मॅटर) असाच इतके वर्षांचा अनुभव आहे. याव्यतिरिक्त काही वेगळे प्रतिसाद मिळतात. त्यात बरेचदा - बाई असून इतकं केलं.. छाप भावना व्यक्त होते. ती माझ्यासमोर व्यक्त झाली तर लगेच तिथे प्रतिवाद करून मी बाई किंवा पुरुष असणं आणि केलेलं काम याचा संबंध नसून त्या प्रॉब्लेमसाठी जेवढं काम आवश्यक आहे ते केलं आहे असे ठामपणे सांगते. मला बाई म्हणून जर नकारात्मक प्रतिसाद आवडत नसतील, नको असतील तर बाई म्हणून कौतुकही नकोच. लिंगनिरपेक्ष कौतुक मनापासून आवडतं, चालतं.

राजकारण सगळेच करतात, मला तितकंसं जमत नाही व आवडत नाही. पण मला इतरांच्या राजकारणाचा उप्द्रव होऊ नये यासाठी जे राजकारण करावं लागतं ते मी करते. सर्व्हायव्हल साठी. मी काही तत्वांना मानते आणि त्याप्रमाणे वागते. त्यामुळे माझ्या काही मोठ्या संधी हातच्या गेल्या आहेत. पण त्यात बाई असण्याचा संबंध होता असं वाटत नाही.

लिंगभेदाचा त्रास माझ्या संस्थेबाहेर मला काही प्रमाणात झालेला आहे, विशेषतः नोकरीसाठी भारतात बरेच ठिकाणी आधी मुलांचा विचार होतो. एकाच क्षमतेची मुलगी वा मुलगा असल्यास मुलाला प्राधान्य दिल्याच्या घटना बघितल्या आहेत. शिवाय उत्खनन वगैरे तथाकथित 'हार्डकोअर' फील्डवर्क अजूनही पुरुषी वर्चस्वाखाली आहे. फील्डमधे बाईकडून ऑर्डर्स स्वीकारताना मजूरांनाही त्रास होत असतो. टीम लीड करताना बाईला अजूनही दुप्पट कडक रहावे लागते, जास्त कॉम्पीटन्ट रहावे लागते. शिवाय खूप मोठे नेटवर्किंग हे सेमिनार्सव्यतिरिक्त रात्री बेरात्री जागून झालेल्या ओल्या पार्ट्यांमधून होत असते. तशा नेटवर्किंगमधे बर्‍याच बायका मार खातात कारण काही ठराविक भरवशाची लोकं सोडली तर कुणाही पुरुषांबरोबर असल्या नेटवर्किंगमधे सामील होणं जवळजवळ अशक्य असतं.

सोशल कंडिशनिंग व घरसंसार आघाड्यांवरची लढाई कुणाच बाईसाठी सोपी नाही (पुरुषांच्या तुलनेत), मीही आवश्यक तिथे पडेल त्या वास्तव अवास्तव किंमती मोजल्या आहेत. माझ्या इतर स्त्री सहकार्‍यांसारख्याच.

भारतात स्त्री म्हणून जन्माला येणं हे एक सामाजिक पंगुत्व असल्यासारखं आहे. कितीही राग आला, नैराश्य आलं तरी तुम्हाला तुमच्या अडचणींसकट सामावून घेणारी आणि समान संधी उपलब्ध करून देणारी व्यवस्था इतक्या सहजी निर्माण होणार नाहीये. पण म्हणून प्रयत्न करूच नयेत असं नाही. मला माहितेय मी अडथळ्यांची शर्यत बहुदा हरण्यासाठीच खेळतेय. पण त्याचा कितीही मनस्ताप झाला तरी मला ती पळायची आहे हा माझा निर्णय आहे. याचा अर्थ मी त्या अडथळ्यांविषयी बोलूच नये, आहे ते नशीबात मुकाटपणे स्वीकारावं असं नाही.

खूप दिवसांपासून काही व्यक्तींविषयी ऋण व्यक्त करायचं होतं ते इथे थोडं अवांतर वाटलं तरी लिहून टाकते.
जेव्हा या विषयात मुलींनी जावं की नाही हा विचारसुद्धा भारतात फारसा कुणी करत नव्हते, जेव्हा पाश्चात्य देशातही या विषयात मुलींना फील्डवर गेले तरी फक्त अ‍ॅन्टिक्विटीज साफ करणे, नोंद करणे अशी कामे सर्रास करावी लागत तेव्हा इरावती कर्वे आमच्या संस्थेत दाखल झाल्या. त्यांच्या लिखाणावरून लक्षात येतं की गुजरातमधल्या फील्डवर्कला त्या पुरुष सहकार्‍यांबरोबर एकाच खोलीत रहात असत, बरोबरीने कष्ट उपसत असत. निश्चितच अनेक ठिकाणच्या फील्डवर्कला असेच झाले असणार. एरवी एखाद्या विवाहित बाईने असे वागणे हे गहजब निर्माण करणारे ठरले असते पण इरावतीबाईंच्या व कुटुम्बाच्या सामाजिक स्थानामुळे बहुदा तसे झाले नसावे. यामुळे फायदा मात्र असा झाला की पुरातत्व विभागाचे संस्थापक सदस्य असलेले सर्व महनीय विद्वानांनी स्त्रियांना फील्डमधे समान स्थान असावे हे मानसिकतेत रुजवून घेतले असणार. इरावतीबाईंनंतर येणार्‍या स्त्री संशोधिकांनाही सर्व वरिष्ठांनी समानतेची वागणूक दिली व त्यांच्या अडचणी समजावून घेत संशोधनाचे विषय दिले असे उपलब्ध माहितीवरून व काही जणींनी सांगितलेल्या किश्शांवरून दिसते. याचा दूरगामी फायदा म्हणजे आमच्या संस्थेत मुलींना लिंगभेदाचा सामना संशोधनात फारसा करावा लागत नाही. संस्थेच्या सर्वोच्चपदी अजून एकदाही कुणीही स्त्री आलेली नाही आणि बायकांना त्रास होतच नाही असंही मी शंभर टक्के म्हणणार नाही पण भारतातल्या इतर संस्थांपेक्षा परिस्थिती नक्कीच बरी आहे. (त्यामुळेच संस्थेच्या बाहेर पडलं की जास्त त्रास होतो)

मस्त पोस्ट वरदा.

त्याचा कितीही मनस्ताप झाला तरी मला ती पळायची आहे हा माझा निर्णय आहे >>> Happy

मस्त पोस्ट वरदा

मला माहितेय मी अडथळ्यांची शर्यत बहुदा हरण्यासाठीच खेळतेय. पण त्याचा कितीही मनस्ताप झाला तरी मला ती पळायची आहे हा माझा निर्णय आहे. याचा अर्थ मी त्या अडथळ्यांविषयी बोलूच नये, आहे ते नशीबात मुकाटपणे स्वीकारावं असं नाही. >> कुडोस Happy

चर्चा फार आवडली. कालपर्यंत वाचताना मला जवळपास सगळ्यांचेच म्हणणे पटल्यासारखे वाटत होते. परस्परविरोधी मुद्देसुद्धा, निव्वळ मांडण्याच्या शैलीमुळे नव्हेत तर त्यातील गाभा संयुक्तिक वाटल्यामुळे पटत होते. पण हे कालपर्यंत झाले. धागा प्रकाशित झाल्यानंतर पहिल्या दिवशी डॉ. गोडबोलेंचा लेख वाचला तेव्हा तो खूप भावला होता. पण ही चर्चा आज वेगवेगळी वळणे घेऊन अश्या टप्प्यावर आली की तो लेख पुन्हा वाचला. आता मात्र दोन प्रश्न पडलेले आहेत.

१. मूळ लेखाचे शीर्षक 'स्त्री शास्त्रज्ञ ही काळाची गरज' आहे. ती काळाची गरज आहे ह्या मुद्याच्या समर्थनार्थ खालील विधाने आहेत.

>>>स्त्रियांचा शास्त्रातील सहभाग इतका महत्त्वाचा का?' या प्रश्नाचे उत्तर सरळच आहे- 'व्यक्ती तितक्या प्रकृती!' त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची, स्त्री अथवा पुरुष, संशोधन करण्याची पद्धत वेगळीच. कलेप्रमाणे संशोधन क्षेत्रातही सर्जनशीलतेला अत्यंत महत्त्व आणि वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची आपली शैली! तेव्हा स्त्रियांनी संशोधनात भाग न घेतल्याने शास्त्राचे जग जगातील ५० टक्के बौद्धिक क्षमतेला मुकते आणि या वैविध्यालाही! कुठलाही व्यवसाय करताना ५० टक्के भांडवल कपाटात बंद करून कुणीच ठेवत नाही, मग मानवजातीच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याच्या या प्रयत्नात आपण आपले संपूर्ण बौद्धिक भांडवल का वापरीत नाही?<<<

पहिल्यांदा हा पन्नास टक्क्यांचा अतिशय आवडलेला मुद्दा आता मला एक 'अचूक उत्तर न देणारा' मुद्दा वाटू लागला आहे. केवळ स्त्रियासुद्धा मोठ्या प्रमाणावर शास्त्रज्ञ झाल्यामुळे जर फक्त संशोधनाचे क्वान्टम वाढणे हा मुद्दा असेल तर तो काही 'स्त्री-स्पेसिफिक' वाटत नाही. (अर्थात, स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर शास्त्रज्ञ होण्यामुळे काहीतरी निराळेच, अकल्पित असे संशोधन घडेल असा माझा ग्रह नाही, पण दिलेले कारण आता ठिसूळ वाटत आहे). किंबहुना, 'अधिक शास्त्रज्ञ होणे ही काळाची गरज' ह्या शीर्षकाचा लेखही थोडाफार असा होऊ शकला असता.

२. वर झालेल्या चर्चेत 'स्त्री शास्त्रज्ञ ही काळाची गरज' ह्या विषयावर अत्यल्प चर्चा झाल्यासारखे वाटत आहे. संशोधनातील स्त्रियांच्याच (इतर क्षेत्रातील स्त्रियांच्या तुलनेत) खास समस्या कोणत्या किंवा संशोधन क्षेत्रातून सर्वदृष्टींनी यशस्वी करिअर मिळवण्यासाठी किती लढा असतो वगैरे विषयांवर भरपूर चर्चा झालेली दिसत आहे. डॉ. गोडबोलेंचा लेख पटलेल्या प्रतिसाददात्यांनी व त्यातील संशोधकांनी व खास करून त्यातीळ स्त्रियांनी कृपया आपले मत मांडावे, की मूळ लेख हा 'स्त्री शास्त्रज्ञ संख्येने कमी असण्याची खंत' ह्या स्वरुपाचा आहे की 'स्त्रियांनी शास्त्रज्ञ व्हावे ही काळाची गरज' ह्या विषयावरचा आहे.

संशोधन क्षेत्रातील सर्वांच्या बुद्धीमत्तेबद्दल अतीव आदर आहे वगैरे पुस्तकी विधाने करून 'मी वरील प्रतिसाद देण्यात काहीतरी अपराध केला आहे' अशी भावना स्वतःच्याच मनात मला निर्माण होऊ द्यायची नाही. आदर आहेच व असायलाच हवा.

आता ह्यावर जर असा प्रतिवाद होणार असेल की 'येथे चर्चा संशोधन क्षेत्राबाबत आहे म्हणून तोच विषय घेतला आहे, इतर क्षेत्रात तसे नसते असे म्हणायचे नाही' वगैरे, तर मग पुन्हा शीर्षक दिशाहीन करणारे (मला) वाटत आहे. 'संशोधन क्षेत्रात स्त्रियांची संख्या कमी असणे खेदजनक' असे काहीतरी शीर्षक उचित वाटेल.

Anjali, you have asked very relevant and precise questions.
Varada, very good post! I was waiting for someone to write what you have written. Thats the spirit! 3 cheers!

Pages