"बाळू आलाय"
कोणीतरी कोणालातरी म्हणाले आणि वयात आलेली मुलगी दोन चार दिवसात कंप्लीटली वेगळी दिसायला लागावी तसे ऑफीस दिसू लागले.
"बाळू आलाय?"
"बाळ्या? कुठेय बाळ्या?"
"त्याला अरबी अश्व लावणार आहे आज मी"
"कॅन्टीनला चरतंय भडवं"
"आलेत का बाळासाहेब?"
"कोण म्हणलं बाळू आलाय?"
"बाळू कस्काय आला मधीच?"
"बाळ्याला लाथ घालून हाकलून द्या"
"अरे मग बाळूलाच रास्ता पेठेत पाठव वैद्य, तू डेटा भरत राहा"
डिपार्टमेन्टमध्ये असलेल्या प्रत्येकाने आपापली पोझिशन, लिंग व बाळूशी त्याचा असलेला 'ऑफिशियल' संबंध ह्यांचा क्षणार्धात मिलाफ घडवत आपापल्या मुखातून काही नैसर्गीक उद्गार बाहेर काढले.
मी नवीन जॉईन झालेलो होतो. मी जॉईन झाल्यापासून दिवसातून छत्तीसवेळा 'बाळू' हे नांव वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या टोनमध्ये आणि वेगवेगळ्या मूडमधल्या माणसाकडून ऐकत आलो होतो. कोणी प्रचंड सुखी असला तर तो 'बाळ्याला सांग रे समोसे आणि जिलबी आणायला' असे म्हणायचा आणि कोणावर त्याचा बॉस शाब्दिक चढलेला असला तर तो 'बाळ्याला घोडा लावणार आहे आज मी' असे म्हणून भडास काढायचा. कोणी अगदीच सोम्यागोम्या किंवा प्यून वगैरे होता तो बाळूलाही बाळासाहेब म्हणत असे. आणि मी ह्या क्षणापर्यंत बाळू ही व्यक्ती पाहिलेली नव्हती. जो माणूस ऑफीसच्या कणाकणात एखाद्या इन्फेक्शनसारखा भिनलेला होता तो इतके दिवस ऑफीसपासून लांब कसा काय होता हे मला समजत नव्हते.
मला एकुण रागच आला बाळूचा! एक तर नांव बाळू! त्यात त्याला उद्देशून लोक कसेही बोलतात ह्याचा अर्थ तो काही कोणी मोठा मॅनेजर नसणार! आणि ऑफीस असं सळसळतंय जणू बाळू आला म्हणजे डायरेक्टरच आले.
मी मख्ख चेहरा ठेवून इकडेतिकडे पाहात राहिलो. मात्र शेवटी आमच्याच टीममधला विवेक पक्याला म्हणाला.......
"ए पक्या, बाळूला म्हणाव आयशरचं बुश आण तिकडून"
आपल्या टीमच्या दृष्टीनेही बाळू महत्वाचा आहे म्हंटल्यावर तर माझं टाळकंच सरकलं! च्यायला होता कुठे हा बाळू इतके दिवस? आणि आज नुसता आल्याचं समजलंय तर पब्लिक इतकं का पेटलंय?
काही वेळाने वादळ शांत व्हावं तसं जो तो आपापल्या कामात रमून गेला. मला कोणालातरी विचारावेसे वाटत होते की बाळू बाळू म्हणतात तो कुठे आहे! पण मनात म्हंटलं आपण त्या माणसाचं नांव नको काढायला. पुन्हा ऑफीस ढवळून निघायचं!
आणि सव्वा दहा वाजता एक व्यक्तिमत्त्व दारात आलं डिपार्टमेन्टच्या! अंगावर बारीक लायनिंगचा पण जांभळा वगैरे शर्ट! काळी पँट! कंबरेला तिसर्याच रंगाचा बेल्ट! शूज मात्र भारीतले! चकाचक दाढी! रापलेला व कधीकाळी उजळ असेल असे स्पष्ट करणारा मध्यमवयीन चेहरा! डोळ्याला भडक गॉगल! जाडजूड मिश्या! बुटकेपणा सोडला तर कुलदीप पवारच! हातात दोन बॅगा! थेट माझ्या टेबलवर! गॉगलही न काढता माझ्याकडे खंग्री नजर लावलेली. वयाने मी निश्चितच फारच लहान होतो.
"हे माझं टेबल आहे"
मी सटकन् माझे कागद गोळा करत उठलो आणि बाजूला झालो. मागून चित्रे खेकसला.
"बाळ्या! सिनियर इंजिनियर आहेत ते! नवे जॉईन झालेत! एम फोर लेव्हलला आहेत ते"
बाळ्याने गॉगल काढला. त्याच्या चेहर्यावर अविश्वास होता. त्याने न शोभणारा नम्रपणा देहबोलीत ओतत तीच जागा मला देऊ केली. मला एक अक्कल नाही. मी म्हणालो......
"नाही नाही, तुम्ही बसा ना, मी दुसरीकडे बसतो"
कंपनीत असे सौजन्याने वागून चालत नसते हे न समजण्याचे आमचे वय! बाळ्या बिनदिक्कत बसला आणि चित्रेही गप्प बसला. मी एम फोर म्हणून जॉईन झाल्याचा चित्रेला राग आहे हे मला फार नंतर समजले. त्या लेव्हलला यायला त्याला सोळा वर्षे लागली होती म्हणे! त्यामुळे कधीही कोणाच्याही लेव्हलबद्दल असे थेट बोलले जात नसते अश्या ऑफीसमध्ये माझी लेव्हल मात्र चित्रे येताजाता सगळ्यांना ऐकवायचे.
पण बाळ्या आणि बसणे हे दोन शब्द एकत्र येणे कोणालाही मान्य नव्हते. बाळ्या आल्याचे समजल्यावर ऑफीसमध्ये दंगल झाली. बाळ्या जी कामे करून आला होता त्याचे रिपोर्टिंग करायला तो प्रत्येक टेबलपुढे धावत होता. तिथे त्याला नवीनच काम मिळत होते. त्यात नवीन टेबलवरचे लोक त्याच्यासाठीच्या कामाची लिस्ट त्याला ऐकवत होतेच. ज्या सिनियर मॅनेजरसमोर बसायला डेप्युटी मॅनेजर टरकायचा तिथे बसून बाळू चहा भुरकत होता हे दृश्य पाहून मी चक्रावलो. ते सिनियर मॅनेजरही तावातावाने बाळूशी बोलत होते. इतका रस घेऊन हा माणूस हनीमूनला बायकोशीही बोलला नसेल लेकाचा!
बाळू स्थूल होता. अविरत प्रेशरमध्ये असलेला माणूस इतका खुशालचेंडू, स्थूल, सतत हसरा चेहरा असलेला असा कसा काय हे मला समजेना! सगळ्यांची सगळी कामे समजावून घेऊन तो एका अश्या टेबलवर जाऊन बसला जेथील मनुष्य सध्या टूरवर होता.
बाळूचे खरे स्थान मला समजले. बाळूला टेबल नव्हते. बाळूला फक्त कामे होती. कोणतीही कामे! कोणाचा तरी बर्थ डे आहे, समोसे आणि जिलबी हा ठरलेला नाश्ता सिक्युरिटीवाल्याला भ्रष्ट बनवून गेटमधून आत आणणे हे बाळूलाच जमायचे. महिंद्राची लाईन उद्या बंद पडतीय, मेन कनेक्टिंगचे शंभर सेट रात्रीत नेऊन कांदिवलीला पोचवायचेत, बाळूला शोधा! एक्झिबिशन आहे, स्टॉल उभारून सजवायला बाळू! आंध्रात एच एम टी चे बुश का मार खाते हे रिबोअरर्सशी बोलून शोधण्यासाठी बाळूला पाठवा. बी एस आर मीटिंगमध्ये सगळा डेटा भरायचाय? बाळू! झेरॉक्स? बाळू! कुरिअर? बाळू! साहेबांच्या घरून बॅग आणायचीय? बाळू! मोठ्या साहेबांचे घर शिफ्टिंग आहे? बाळू! मॅडम एकट्याच रात्री थांबून काम करणारेत? सोबतीला बाळू! नाशिकला व्हॉल्व्ह पाठवायचेत? बाळू! नगरहून सँपल आणायचंय? बाळू! कलिना सांताक्रूझवरून इन्व्हॉइसेस आणायचीयत? बाळू!
ज्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या टेबलवर सहज बसू शकत होता त्या बाळूला टेबल असणे शक्यच नव्हते.
बाळू कंपनीच्या आत कोकरू होता आणि कंपनीच्या बाहेर कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर! ह्या दोन्ही भूमिका बॅलन्स करताना प्रवेशद्वारात त्याला एक क्षणभर स्वतःच्या चेहर्यावरील आविर्भावांमध्ये जे बदल करावे लागायचे तेवढेच पुरे व्हायचे त्याला!
काहीकाही वेळा बाळू कंपनीच्या आत असतानाच चुकून विसरून जायचा की आपण आत्ता कोकरू होणे आवश्यक आहे. चहा केव्हाही मागवणे फक्त सिनियर मॅनेजरलाच शक्य होते. बाकी सर्वांना मिळणारे चहा म्हणजे दिवसातून दोनदा, सकाळी साडे दहा आणि दुपारी साडे तीन! बाळू मिळेल त्या टेबलवर ब्सून सिनियर मॅनेजर साहेबांचे नांव सांगून तीन चार चहा मागवायचा. सिनियर मॅनेजर बिचारे कूपने फाडून देऊन टाकायचे चहावाल्याला. बाळूला बोलायचे नाहीत. बाळू एक कप चहा घेऊन आपल्या, म्हणजे त्याक्षणी त्याच्या असलेल्या टेबलवर जाऊन तंद्री लावून चहा पीत बसायचा. तेव्हा तो जिथे बघायचा तिथे ऑफीसची एक मळकटलेली भिंत होती. ती भिंत दिसायला अत्यंत मळकट होती. पण ती नसती तर तिला लागून असलेल्या कित्येक जुन्या कपाटांमध्ये ऑफीसचे कित्येक रटाळ आणि आज अर्थहीन असलेले इतिहास फायलींच्या स्वरुपात साचवता आले नसते. बाळूमध्ये आणि त्या भिंतीत हे एक खूप मोठे साम्य होते. बाळूच्या अविकसित मेंदूत गेल्या चौदा वर्षातील ऑफीसमधील असे कित्येक प्रसंग साचलेले होते जे आज पूर्णतः संदर्भहीन होते. पण ज्या ज्या क्षणी त्या घटना घडत होत्या त्या त्या क्षणी बाळू उपलब्ध असणे ह्या गोष्टीला ऑफीसचे सर्वोच्च प्राधान्य होते. त्या क्षणी बाळू नसता तर ऑफीसचे अक्षरशः हाल झाले असते आणि नंतर बाळू टिकलाच नसता नोकरीवर! बाळूला समजत होते. अचानक लागलेल्या आगी विझवण्यासाठी आपण उपलब्ध असणे आणि नंतर दुसरी आग लागेपर्यंत विस्मरणात जाण्यास आपण सिद्ध होणे ह्या दोनच क्षमतांवर आपली ही नोकरी टिकून आहे.
बाळू हा त्याच्या नोकरीच्या पहिल्याच दिवसापासून कोणत्याही ऑफीसमधील एक बाळू नावाचे व्यक्तीमत्त्व झालेला होता. प्रातिनिधिक बाळू!
बाळूची कोणालाही अजिबात कीव यायची नाही. त्याची कारणे होती. बाळू अजिबात गरीब नव्हता स्वभावाने! तो पक्का होता. त्याचे महत्व त्याला नीट समजायचे म्हणून पक्का होता असे नव्हे. त्याला पगार, ऑफिशियल किंवा खासगी कामांसाठी काही खास आर्थिक मोबदला आणि टायमिंग वगैरेच्या बाबतीतील नियमांबाबतची शिथिलता ह्याव्यतिरिक्तही काहीतरी हवे असायचे. ते म्हणजे काहीही असू शकायचे. सगळ्या ऑफीसर्ससाठी दिल्लीहून नवीन बॅग्ज आल्या तर एक बाळूला मिळायची. दुसर्या कोणत्याही बी एस आर ला ती मिळायची नाही. हेही काही विशेष नाही. पण बाळूला बारीकसारीक गोष्टी हव्या असायच्या. कोणाचे पेन, कोणाची कसलीशी वस्तू! म्हणजे बघा, बीएसआर म्हणून त्याला पगार होता. ऑफीसच्या कामांसाठी फिरण्यासाठी सर्व अलाऊंन्सेस असायचे. त्याशिवाय तो काही पैसे वर मागून घ्यायचा तेही मिळायचे. मोठ्या साहेबांचे किंवा इतर कोणाचे पर्सनल काम असले तर खास वेगळा मोबदला मिळायचा तोही मिळायचाच. त्याशिवाय त्याची भिरभिरती नजर अजून काय मिळू शकेल हे पाहात फिरायचीच. आणि त्याशिवाय तो ऐन वेळेला असे काहीतरी मागायचा की त्या गोष्टीला नाही म्हणताच यायचे नाही. त्यामुळेच बाळूला सगळे हक्काने आणि तोंडावर शिव्या देऊ शकायचे.
बाळूच्या व्यक्तीमत्त्वामध्ये एक दुर्मीळ निर्लज्जपणा होता. त्याची चूक किंवा लबाडी, लबाडी म्हणजे तो चोर वगैरे नव्हता, अशीच वागण्यातील लबाडी, शोधली तर तो खदखदून आणि स्वतःवर खुष होऊन हसायचा. त्यामुळे त्याच्यावर रागवलेला आणखीन रागवून त्याला आणखी शिव्या द्यायचा. शिव्या देतानाच पुढचे कामही सांगायचा. बाळू म्हणजे राम तेरी गंगा मैली होती. कोणीही यावे, शिव्याशाप देऊन पाप करावे, ते बाळूने ऐकताच ते पाप नष्ट व्हावे, बाळूलाच पुढचे काम सांगितले जावे आणि बाळूने वाहत वाहत पुढे निघावे.
एकदा एका क्लोज्ड हॉलमध्ये स्टँडिंग मीटिंग भरली. बाळूने समोसे आणि जिलबी आणलेली होती. मोठे साहेब सगळ्यांना मन्थ एन्डचे लोड किती आहे हे समजावून सांगत होते आणि टारगेटच्या धमक्या खास पॉलिश्ड इंग्लिशमधून ऐकवत होते. बाळूला इंग्लिश भाषेशी घेणेदेणे नसल्याचे सर्वांना ज्ञात होते. बाळू एकटाच समोसे खाऊ लागलेला होता, साहेबासमोरच! शेवटी बाळूचे ते समोरच उभे राहून खाणे पाहून साहेबाने लाजलज्जा वाटून बोलणे थांबवले आणि खाद्यपदार्थांकडे हात दाखवत सर्वांना घ्यायला सांगितले. हळूहळू सर्वांनी समोसे उचलायला सुरुवात केली आणि वातावरण थोडे इन्फॉर्मल झाले. पण बाहेर जायची अजून परवानगी नव्हती. जिलब्या खाऊन हात चिकट झालेले असल्याने बाळूने चित्रेच्या मागे उभे राहून त्याच्या शर्टला स्वतःचे हात पुसले. थोड्या वेळाने मोठे साहेब हॉलच्या बाहेर पडल्यावर चित्रेने उरलेल्या सर्वांसमोर बाळूला अर्वाच्य शिव्या दिल्या तेव्हा बाळू स्थितप्रज्ञासारखे उरलेले समोसे स्वतःच्या घरी न्यायच्या असलेल्या एका पिशवीत ढकलत होता. जणू चित्रे हा रस्त्यावरचा एक वेडा असून तो असाच शून्यात पाहात बरळतो असे बाळू दाखवत होता. अख्खी जनता चित्रेला हसत असताना मला खरे तर चित्रेच्या शर्टबद्दल वाईटही वाटले आणि बाळूचा रागही आला, पण बाळूचे ते उरलेले समोसे घरी नेण्याचे कार्य पाहून मलाही हसूच आले शेवटी!
एकदा आमच्या टीमच्याच कामानिमित्त बाळू स्टेशनपाशी चालला होता. काहीतरी वस्तू कोणालातरी नेऊन द्यायची होती. माझ्याकडेही एक काम होते ज्यात एक वस्तू एका तत्सम विभागातून घेऊन यायची होती. मी बाळूला परस्पर सांगितले की तिकडे जातच आहात तर थोडे पुढे जाऊन हेही घेऊन या! बाळूने ठाम नकार दिला. मी त्याला कन्व्हिन्स करू लागलो तर त्याने काय करावे? ज्याने त्याला स्टेशनपाशी जायला सांगितले होते त्याला जाऊन म्हणाला की हे साहेब जे काम सांगतायत ते मला शक्य नाही, त्यामुळे मी स्टेशनलाही जाणार नाही. आता काही संबंध आहे का? त्या माणसाने मला विनंती केली माझे काम मी कसेही निपटवावे आणि बाळूला नुसते स्टेशनला जाऊ द्यावे.
माझ्यात आणि बाळूमध्ये एक अंतर पडले ते त्या दिवशी! त्या दिवसापासून मी ठरवले की काहीही झाले तरी बाळूला काम सांगायचे नाही. मी क्षुल्लक कामासाठी लांब लांब जाऊ लागलो. कोणाला काही बोलता येईना! कारण ऑफिशियली ते काम बाळूचे नसायचेच! आणि मी तर काही ऑफीसची गाडी मागत नव्हतो. माझा मी जाऊन येत होतो. अर्थात, मी माझ्या मनात घेतलेला हा निर्णय बाळूला ज्ञात होऊन त्याची विवेकबुद्धी वगैरे जागृत होईल असे मला मुळीच वाटत नव्हते.
त्यानंतर असाच एक प्रसंग झाला. कोणीतरी उगाच मला खिजवायला आले आणि म्हणाले, ऑल इन्डिया ओईएम सेल्स तू बघतोस आणि तो बी एस आर असून कॉन्फरन्सला चाललाय बघ!
तो म्हणजे बाळू! कॉन्फरन्सला मुळात ओईमवाले नसायचेच. कॉन्फरन्स रिप्लेसमेन्ट मार्केटवाल्यांचीच असायची. चांगल्या चांगल्या शहरांत मोठमोठ्या हॉटेल्समध्ये अडीच दिवस नुसता दंगा! त्या कॉन्फरन्सला माझा नंबर लागावा अशी माझी इच्छाही नसायची. ह्याचे कारण तेवढेच अडीच दिवस ऑफीसमध्ये अगदी निवांत जायचे, कारण बहुतेक सगळे जण कॉन्फरन्सला गेलेले असायचे. पण त्या कॉन्फरन्सला बाळूला नेण्याचे कारण मला ज्ञात होते. कामाला एक हक्काचे माणूस पाहिजे होते सगळ्यांना! बाळूला ही भूमिका अर्थातच मान्य होती. तो उत्साहाने कॉन्फरन्सला गेला. पहिल्या दिवशीची मीटिंग झाली. संध्याकाळी कॉकटेल्स सर्व्ह झाली. बाळू अजिबात घ्यायचा नाही. कॉकटेल्स सर्व्ह झाल्यावर म्युझिक सुरू झाले, पण नाचणार कोण? कंपनीचे पार एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आलेले!
बाळू!
बाळू डान्स फ्लोअरवर त्या दिवशी एकटा, खरोखर एकटा नाचला! लोक त्याचे नाचणे पाहण्यासाठी शेवटी गोळा झाले. असे म्हणतात की बाळू अगदी गल्लीतले टपोरी नाचतात तस्साच नाचला. मला तर अजूनही कल्पना केली की हसूच येते. मोठमोठे लोक एकमेकांशी बोलत आहेत आणि अख्खी मिडल मॅनेजमेन्ट डान्स फ्लोअरभोवती जमा झाली आहे आणि फ्लोअरवर बाळू बेभानपणे एकटाच नाचत आहे.
बाळूच्या हाय प्रेशर टास्क्सच्या आयुष्यात असे क्षण दुर्मीळ असावेत आणि ते घालवण्याइतका तो मूर्ख नव्हता. कंपनीतील डायरेक्टरचीही नोकरी एकवेळ सुरक्षित नव्हती पण बाळूची मात्र होती! आजही बाळू त्याच कंपनीत आहे.
शेवटी एकदाच माझे प्रमोशन झाले आणि माझे अधिकार आमच्या टीममध्ये सर्वाधिक झाले. अर्थातच माझ्याकडे बघण्याचा इतरांचा आणि बाळूचाही दृष्टिकोन बदलला. आता बाळूसारख्या बी एस आर्सच्या काही किरकोळ व्हाऊचर्सवर किंवा येण्याजाण्याच्या पासवर माझी सही चालू शकत होती. पण बाळू माझ्याकडे येत नव्हता आणि मी त्याला काम सांगत नव्हतो.
मात्र अहमदनगरचा प्लँट आणि माझा निकटचा संबंध यायला लागला. तसाच नाशिकचा प्लँट आणि माझाही!
ह्या दरम्यान आमच्या टीममधील काहीजण बाळूला परस्पर आमच्या कामासाठी नगर आणि नाशिकला पाठवू लागले. त्या टीमचा हेड आता मी असल्याने बाळू पंगा घेत नव्हता. किंबहुना मला माहीत नसतानाच बाळू अनेक कामे आमच्या टीमसाठी परस्पर करू लागला होता. त्याला माझी भीती वाटत होती. पण माझ्यावर स्वतःच्याच कामाचे प्रेशर इतके होते की बाळू हा विषयही माझ्या डोक्यात नसायचा.
आणि एक दिवस बातमी आली. बाळूचा साडू अपघातात गेला. त्याचे कुटुंब वार्यावर पडले. त्याची बायको, म्हणजे बाळूची मेहुणी आणि तिची दोन मुले ह्यांना आता आर्थिक आधार नव्हता.
बाळूने मोठी रजा काढली. त्याने बरेच प्रयत्न करून त्या कुटुंबाला विमा वगैरे मिळवून दिला. सगळे लागीलाग लावून तो पुण्यात परतला तेव्हा मात्र मी त्याची आस्थेने चौकशी केली. बाळूही नीट बोलला.
त्यानंतर त्याला वारंवार नगरला जावे लागले. ह्याचे कारण आमचे काम नव्हे, तर त्या साडूचे घर नगरला होते. पण आमची कामे इतकी नव्हती की बाळूला दर आठवड्याला नगरला पाठवता येईल. मग ज्यांच्यासमोर चहा भुरकायला बसायचा त्या सिनियर मॅनेजर साहेबांना त्याने विनंती केली औरंगाबादचे एक ऑफिशियल काम मला द्या आणि येताना मी नगरला जाऊन येतो. त्यांनी ती परवानगी नाकारली.
दुपारी चार वाजता बाळू माझ्यासमोर येऊन बसला. त्याच्या डोळ्यांत पाणी होते. हे तेच टेबल होते जे एके दिवशी मी बाळूला पाहून सोडून उठलो होतो. आज बाळू समोर बसला होता. पण मला दिसत होते त्याच्या डोळ्यातील पाणी!
"काय झाले?"
"साहेब नगरचे काम काढा की काहीतरी अर्जंट? हिचा भाचा आजारी आहे. मला जायलाच हवं आहे"
"बाळू, तुम्ही तसेच का जात नाही रजा काढून?"
"रजा देत नाहीयेत साहेब मला"
"का?"
"संपल्यायत"
"मग?"
"साहेब काहीतरी काम काढा ना अर्जंट?"
"इंद्राच्या टेबलवर जाऊन बसा, मी हाक मारतो"
ताडकन् बाळू उठला आणि लांब असलेल्या इंद्राच्या टेबलवर कामात गर्क असल्याचे नाटक करत बसला. मधूनच माझ्याकडे पाहात होता हे मी पाहात होतो.
त्याला रजा नाकारणार्या सिनियर मॅनेजरने फोन खाली ठेवला आणि त्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात मी ह्या कोपर्यापासून त्या कोपर्यात बसलेल्या बाळूला सर्वांदेखत विचारले.
"बाळू? नगरला एक अर्जंट सँपल द्यायचंय टुलिंगचं! जमणारे का?"
बाळूने त्याच्या त्या साहेबांकडे पाहिले तसे मीही पाहिले. त्यांनी मला नजरेने विचारले. मी त्यांना बसूनच एक्स्प्लेन केले आणि त्यांना ते पटले. त्यांनी परवानगी दिली तसा बाळू सुसाट नगरला सुटला.
त्यानंतर सहा महिन्यांनी मी नोकरी सोडली तेव्हा सेन्ड ऑफला तो आलाच नव्हता.
आज सोळा वर्षांनी त्याच कंपनीतील एकांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला भेटला.
मधे काही दिवस गेलेच नसल्याप्रमाणे हसला. किंवा आम्ही रोजच भेटत असल्याप्रमाणे!
मला राग आला. काहीतरी तरी वाटायला पाहिजे ना की आपण इतक्या दिवसांनी भेटतोय वगैरे! कुठे असता, काय करता, काहीच नाही. काय कसं काय? निवांत! बास!
मी का त्याचा इतका विचार करायचो हे समजत नाही. पण तसं समजतंही! आपल्यापेक्षा अधिक महत्वाच्या माणसाचा नेहमीच माणूस विचार करतो.
बाळू खराखुरा आहे. त्याचे नांवही बाळूच आहे. आडनांव येथे लिहीत नाही.
सत्य बाळू!
==============
-'बेफिकीर'!
छान जमलंय. तुम्ही लिहिलेली
छान जमलंय.
तुम्ही लिहिलेली व्यक्तिचित्रं वाचायला आवडतात.
छान लिहिलय.. हे वाचताना मला '
छान लिहिलय.. हे वाचताना मला ' नारायण' ची आठवण झाली..
आवडलं.
आवडलं.
मस्त.
मस्त.
मस्त!
मस्त!
उत्तम व्यक्तिचित्रण बेफि.
उत्तम व्यक्तिचित्रण बेफि. खरोखर आणि खुमासदार देखिल!
सत्य बाळु ???
बाळु खरे नाही ना
बेफी, तुम्ही वैतागणार, पण
बेफी, तुम्ही वैतागणार, पण सांगितल्याशिवाय राहवत नाहीये, हे वाचतांना परत नारायण आठवलाच..
मला नाही आठवला नारायण!
मला नाही आठवला नारायण!:)
चांगलं उतरलं आहे
चांगलं उतरलं आहे व्यक्तिचित्र.
मधे काही दिवस गेलेच नसल्याप्रमाणे हसला. किंवा आम्ही रोजच भेटत असल्याप्रमाणे! >>> येथेच थांबायला हवं होतं असं वाट्लं.
मलाही नाही आठवला नारायण. पण बापू काणेची थोडी आठवण झाली. दोन्ही व्यक्तिरेखेतलं साम्य तसं अगदीच नगण्य आहे तरीही.
मस्त व्यक्तिचित्रण..
मस्त व्यक्तिचित्रण..
ओ बेफी, ह्या
ओ बेफी,
ह्या व्यक्त्तीचित्रणांच्या पुस्तकाचे मनावर घ्या च बरं...
भारी आहे हा बाळु !
मला नारायण अजिबात नाही आठवला...नारायण स्वभावाने मुळचाच गरिब.
सांगकाम्या असणे हा एकमेव कॉमन फॅक्टर आहे....
बाळु थोडासा गरिब आहे, पण बेरकी सुद्धा आहेच आहे.
-प्रसन्न
वा, छान जमलेय. अश्या बाळूला
वा, छान जमलेय.
अश्या बाळूला प्रत्यक्ष अनुभवले नाही कधी पण तरी नजरेसमोर आलाच.
तुमचाच 'पानसे' आठवला बेफी.
तुमचाच 'पानसे' आठवला बेफी.
मित+++१ मलाही वाचताना पानसे
मित+++१
मलाही वाचताना पानसे आठवत होता
मित >१, व्यक्तिचित्र फार
मित >१, व्यक्तिचित्र फार सुरेख रेखाटता तुम्ही बेफि!
व्यक्तिचित्रण आवडल बेफि ..
व्यक्तिचित्रण आवडल बेफि ..
पहीला पॅरा वाचला अन परमब्रत
पहीला पॅरा वाचला अन परमब्रत चट्टोपाध्याय चा Hercules आठवला!!
मला परोपकारी गंपू आठवला
मला परोपकारी गंपू आठवला
दर एक दिवस आड तुमचे एखादे
दर एक दिवस आड तुमचे एखादे व्यक्तिचित्र इथे असतेच याची फार सवय झाली आता.
बाळू वाचला,पटला. तसं एकदम फार काही विशेष कंटेंट नाही या लेखात. पण तुमच्या लिहिण्यात जबरदस्त ताकद आहे. एखाद्या व्यक्तित काही विशेष शोधणं हे तुम्हीच करावं आणि तुम्हीच लिहावं.
मुख्य म्हणजे तुमच्या लिखाणात कुठेही एकांगिपणा नसतो.
आवडलंच.
ता.क. - लेख वाचताना मला कुणाचीही आठवण आली नाही.
एखाद्या व्यक्तित काही विशेष
एखाद्या व्यक्तित काही विशेष शोधणं हे तुम्हीच करावं आणि तुम्हीच लिहावं. >> हो ना. आपल्या आसपास असणा-याच व्यक्ती पण त्यांच्यातीला वेगळेपण शोधुन त्यांचे व्यक्तिचित्रण करावे ते बेफिंनीच.
मला कधीकधी संशय येतो की बेफिंना खरच इतक्या व्यक्ती भेटल्यात की त्यांच्या लेखणीतुन जन्मल्यात?
छान जमलंय व्यक्तिचित्रण,
छान जमलंय व्यक्तिचित्रण, अक्षरशः बाळू डोळ्यापुढे उभा केलात.
छान लिहीले आहे बेफी. आवडले.
छान लिहीले आहे बेफी. आवडले.
छान लिहीले आहे बेफी. आवडले!
छान लिहीले आहे बेफी. आवडले!
छान लिहिलय. पानसे आठवला.
छान लिहिलय. पानसे आठवला.
एखाद्या व्यक्तित काही विशेष
एखाद्या व्यक्तित काही विशेष शोधणं हे तुम्हीच करावं आणि तुम्हीच लिहावं.>>>>>> +१
छान लिहीलय..
छान लिहीलय..
छान लिहिलय.
छान लिहिलय.
आपल्यापेक्षा अधिक महत्वाच्या
आपल्यापेक्षा अधिक महत्वाच्या माणसाचा नेहमीच माणूस विचार करतो. >> मस्त!!
हे आवडलं.
हे आवडलं.
<तुमचाच 'पानसे' आठवला बेफी>
<तुमचाच 'पानसे' आठवला बेफी> मला सुध्दा!
नेहमी प्रमाणे झकास जमले आहे!
Pages