"सुल्या? लेका तू?"
सुल्याला रात्री सव्वा अकरा वाजता अध्यात्मिक अनुभुती केंद्रात म्हणजे कॅफे बोमनमध्ये पाहून मी अवाक झालो. एक महिन्यापूर्वीपर्यंत सुल्या आमच्यात असाच बसायचा. रात्रीबेरात्री! एक महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले. तेव्हापासून तो रात्री केंद्रात दिसणे अशक्य आहे हे आम्हाला तिघांनाही माहीत होते. कोणी सुल्याची अपेक्षाही करत नव्हते तिथे. मी, आप्पा आणि गोल असे तिघेही आत्ता इन फॅक्ट सुल्याबद्दलच बोलत होतो. सुल्या आतातरी सुधारलेला दिसतोय, कळले असेल आयुष्य खरे कसे असते ते वगैरे! आणि ज्या खुर्चीवर मी उजवे कोपर रेलून बसलो होतो ती खुर्ची ओढली गेल्यामुळे मी वाकडातिकडा होऊन सावरून मागे बघतो तर सुल्या!
मी, आप्पा आणि गोल हे तिघेच नव्हेत तर अख्खे केंद्र सन्नाटा पसरल्यासारखे सुल्याकडे पाहात होते. एकवेळ आम्ही तिघे केंद्रात दिसायचो नाहीत, पण सुल्या सव्वानऊ ते सव्वा अकरा एकटा बसलेला असायचा केंद्रात! त्या दरम्यान त्याचे तीन चहा, एक बन मस्का आणि चार बिड्या व्हायच्या. येणारेजाणारे नवीन असले तर वळून वळून बघत राहायचे सुल्याकडे! काही नव्या आगंतुकांच्या टेबलांवर चर्चाही व्हायच्या की काय दिवस आले आहेत वगैरे! सुल्या ढुंकून पाहायचा नाही पब्लिककडे! जे त्याच्या फोनमध्ये डोके घालून बसायचा ते आमच्यापैकी कोणी आले तरच बोलू लागायचा.
सगळे अवाक झालेले असताना गोलने सुल्याची काहीही चौकशी न करता सुल्याला थेट फुकटचा सल्ला दिला.
"सुल्या, घरी जा यड्या"
"काशीत गेलं घर, गझनी, एक कटिंग आणि एक लाईट्स दे! माचिससकट!"
सुल्याचे हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच कटिंग आणि एक गोरी पान मार्लबोरो लाईट्स सुल्यासमोर येऊन पडलेली होती. सुल्याने धूर आत घेतला आणि केंद्रातील सुमारे चाळीस जणांचे ऐंशी डोळे गरगरले. सुल्याचा टी शर्ट धूर आत घेताना असाच ताणला जायचा आणि ते दृश्य पापणीही न लवू देता बघणारे अनेकजण केंद्रात होते. सुल्याने काढलेली धुराची वर्तुळे आढ्याला चिकटवलेल्या, आपल्याला आपलेच उलटे प्रतिबिंब दाखवणार्या बाबा आदमच्या जमान्यातील आरश्याला जाऊन थडकली आणि सुल्या हाताने टेबलावर ठेका धरत गाऊ लागला.
"येक रडका नि कडका नवरा, उंद्रावाणी थिजला गं, जागा असून दिसतोय असा की निपचित निजला गं"
ह्या ओळी ऐकून लांबवर चहावाटप करणारा गझनीसुद्धा खदाखदा हसला. गोलने सुल्याला दम भरला.
"भडव्या, उठ आणि निघ! आमच्यावर येईल साल्या"
गोल! ह्याचे नांव संदेश कोरगावकर! माणसाला जेथे जेथे चरबी असणे शक्य आहे तेथे ती असण्याचे वैभव तो शरीरावर नांदवत असे, त्यामुळे त्याला सगळे गोल म्हणत. पण ह्या गोलला सुल्या घाबरायचा नाही. सुल्या जगात कोणालाच घाबरायचा नाही. एक आप्पा सोडला तर! आप्पाला मात्र जरा वचकून असायचा. आप्पाची नेहमी आस्थेने चौकशी करायचा. आप्पाला वाईट वाटलेले त्याला अजिबात चालायचे नाही.
सुल्याने धुराचे दुसरे वर्तुळ गोलच्या चेहर्यावर सोडले व म्हणाला......
"शानपत्ती शिकवायची नाही. मी समर्थ आहे. गझनी, अॅश ट्रे दिला नाहीस तर कुठेही झटकीन राख"
अॅश ट्रे येऊन आदळला. जळती मार्लबोरो अॅश ट्रे वर ठेवत सुल्याने दोन्ही हात मागे घेतले आणि खांद्याखाली पोचलेले मुलायम केस अंबाड्यासारखे बांधून टाकले. केंद्रातील नवोदितांना सुल्याचा तो प्रोफाईल पाहून कसेबसे झाले.
सुल्याचे पूर्ण नांव होते सुलक्षणा आनंद मोकाशी!
सुल्या मुलगी होती.
आयुष्यात मुलीसारखा वागला नव्हता पण तो! मुलींशी पटलेच नाही कधी त्याचे! सवयी मुलांसारख्या, कपडे मुलांसारखे! हिंडायचाही अश्या ठिकाणी जिथे बायका हजार वेळा विचार करून न जायचा निर्णय घेतील. त्याला कोणी 'अगं' म्हंटलेलं चालायचं नाही. 'ए सुल्या' अशीच हक मारली पाहिजे. घरी आई वडील आणि मोठा भाऊ होता. तिघांनी सुल्यापुढे हात टेकून जमाना झालेला होता. पुरुषाची नजर बरोबर कळायची. कोणी जवळीक दाखवायला आला तर सुल्या चारचौघांदेखत असे कही बोलायचा की त्या माणसाला वाटावे की त्याला धरतीमातेने पोटात घ्यावे.
सुंदर, सेक्सी आणि सुशिक्षित असूनही सुल्याने वयाच्या सत्ताविसाव्या वर्षापर्यंत लग्नच केले नाही. कारण काय तर म्हणे बांधून का घ्यायचे स्वतःला? आपण चौघे तर रोज भेटतोच ना? आम्ही चौघे रोज बिड्या फुंकायला केंद्रात भेटणे हा लग्नाला पर्याय कसा काय ते काही आम्हाला समजत नसे. शेवटी आजीने मरणासन्न अवस्थेत शेवटचे बजावले की नातजावई पाहिल्याशिवाय शांती मिळणार नाही. आजीवर भारी जीव! त्यामुळे तयार झाला लग्नाला. त्याच दिवशी रात्री केंद्रात सुल्याने वाक्य टाकले.
"शिपूसकर हे आडनांव आपण लावणार नाही"
"म्हणजे?"
"शिपूसकर हे आडनांव लावण्यासाठी आपण जन्माला आलेलो नाही"
"कोण शिपूसकर? तुला कोण म्हणतंय शिपूसकर आडनांव लाव?"
"त्या बजरबट्टूचे आडनांव शिपूसकर आहे."
"कोण?"
"ज्याच्याशी मी लग्न करतोय तो!"
सुल्याच्या लग्नाची बातमी आम्हाला अशी समजली. मार्लबोरो कंपनीचा धंदा लकडी पुलापाशी एका रात्री अचानक का वाढला ह्यावर त्यांच्या मार्केटिंग टीमचे वाद झाले असतील दुसर्या दिवशी!
"आजी भूत होणार आहे. मला ते नको वाटले म्हणून मी लग्न करतोय"
वर्धन शिपूसकर! हा माणूस आम्हाला भेटला त्याचदिवशी आम्ही ताडले. बिचारा आयुष्यातून उठला. सज्जन, उदात्त स्वप्ने डोळ्यात मिरवणारा, बत्तीस वर्षांचा वर्धन केवळ करिअर करायचे म्हणून अविवाहीत राहिला होता. तो स्थळे बघायला लागल्यावर चौथे स्थळ सुल्याचे आले. सुल्या त्याहीदिवशी टी शर्ट आणि जीन्स घालून गेला. पायावर पाय टाकून भावी सासर्यांशी राजकारणावर चर्चा करून अला. वर्धनने विचारले की हॉबीज काय आहेत? सुल्या म्हणाला 'आय स्मोक'!
लग्न मोडले. म्हणजे ठरलेच नाही. पण सुल्याच्या घरी सगळ्यांनी मिळून अभूतपूर्व आकांडतांडव केले. शेवटी शिपूसकरांना सगळे काही खरे सांगण्यात आले. शिपूसकरांनी विचार केला की मुलगी संगतीने बिघडली असली तरी घर चांगले आहे. मूलबाळ झाले की येईल ताळ्यावर! वर्धनला पन्नास स्थळे आली असती. पण सुल्याचे एक होते. बघणारा बघतच राहील असे व्यक्तिमत्त्व होते. घायाळच व्हायचं पब्लिक! वर्धनचा पंचाहत्तर टक्के जीव सुल्याच्या फिगरमध्ये अडकला आणि उरलेला पंचवीस टक्के जीव स्वप्नात! होकार मिळाला. होकार मिळाला हे आम्हाला कळाले तेव्हा आमच्या प्रत्येकी एका डोळ्यात आनंदाश्रू आणि दुसर्यात दु:खाश्रू होते.
सुल्याचे लग्न एका टेरेसवर झाले. जेवायला ज्यांना बोलावले होते ते सगळेजण एका वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरीक होते. आम्ही तिघे, सुल्याच्या घरचे आणि शिपूसकरांकडचे पासष्ट असेही काही नागरीक त्यात स्वतःचे पोट भरून गेले. केंद्रातर्फे गझनी आला होता. त्याला बराच वेळ सुल्या कुठला ते समजलेच नव्हते. सुल्याला साडी नेसवण्यात आली होती. आयुष्यात पहिल्यांदा आमचा तिघांचा जीव कळवळला होता. ही अशी दिसते? साडी नेसल्यावर? अरे काय ह्या मुलीचे करायचे? अक्कल नाही का? स्वतःचे रूप काय आहे हेही समजत नाही? सत्ताविसव्या वर्षी ही अशी दिसते तर विसाव्या वर्षी कशी दिसली असती? आता ह्या सुल्याने आयुष्यभर साडीच नेसली तर बरे पडेल त्याच्या संसारासाठी! सुल्या साडीमध्ये बुजला होता. ती साडी सावरणे हे एक मोठेच प्रकरण झाले होते त्याच्यासाठी! आपोआपच चेहर्यावर पराकोटीचे सलज्ज भाव आले होते. एकुणात, सुल्या गेला आणि सुलक्षणा सुधारली असे आम्ही मान्य केले.
केंद्र सुने सुने झाले. काही जुन्याजाणत्यांना माहीत होते की सुल्याचे लग्न झालेले आहे. ते काहीच म्हणत नव्हते. जे अधूनमधून येणारे होते ते आम्हाला तिघांनाच बघून गोंधळत होते. एकवेळ आम्ही नसलो तरी सुल्या असायचा ह्याची त्यांना सवय झालेली होती. सुल्याची काहीच बातमी मिळेना! त्याच्या घरी, म्हणजे सासरी पाय टाकायची आमची हिम्मत होत नव्हती. साल्याने फोनवरही संपर्क ठेवला नाही. आम्ही अनेक मेसेजेस केले, सहा सात कॉल्सही केले. सुल्याचा काहीही रिसपॉन्स नाही. शेवटी त्याच्या माहेरी गेलो तर ते म्हणाले म्हणे बरे चालले आहे तिचे! सिमल्याला जाऊन आले. आता सुलक्षणा घरात चंगली राहात आहे. स्वयंपाक तिला येतच होता. हळूहळू रुळतीय.
'रुळतीय' हा शब्द ऐकून बाहेर येऊन आम्ही कैक वेळ हसत बसलो होतो. त्या रुळतीय शब्दावर दोन रात्रींचे चहा निघाले अक्षरशः!
गझनी टेबलपाशी येऊन नुसताच 'सगळं ठीक आहे ना' असं खुणेने विचारून जायचा. त्याच्या मनात काय चाललेले असेल ह्याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. त्याला वाटत असावे की लग्न लवकरच मोडणार आणि सुल्या इथे यायला लागणार!
सुल्याने संपर्क ठेवू नये ह्याचा इतका कमालीचा संताप आला होता आम्हाला, की काय सांगावे! सुल्याची आजी अजूनही जिवंतच होती. सुल्या सासरी किती वाजता उठत असेल, बिड्या फुंकण्याची तल्लफ कशी निभवत असेल, कोणाशी कसा वागत असेल असे हजार प्रश्न मनात होते. आम्ही आपले इमाने इतबारे केंद्रात बसत होतो. आत्मिक उन्नतीच्या मार्गावरून हटण्याचा आमचा इतक्यात कोणताही विचार नव्हता. एकदाच फक्त गोल ढसढसा रडला होता सुल्या संपर्क ठेवत नाही म्हणून! आप्पाचेही डोळे भरून आले होते. गझनी उदासपणे चहा वाटत फिरत राहिला होता.
सुल्याच्या गप्पा काहीच्या काही असायच्या. एक बडा कापला की अख्खे गाव जेवते येथपासून ते सत्यनारायणाची दक्षिणा गुरुजींना का मिळावी इथपर्यंत काहीही! आपण बसलोयत कसे, करतोय काय, घातलंय काय, कशाचं काही नाहीच!
एकदा मात्र एक विचित्रच प्रसंग घडला होता. आप्पाने मोबाईलवर कोणत्यातरी नटनटीच्या किसचा फोटो गोलला हळूच दाखवला. गोलने तो मला दाखवला आणि मी बघेपर्यंत आणि कोणाला काही समजायच्या आत सुल्याने माझ्या हातातून मोबाईल हिसकावला. सुल्याने तो फोटो पाहिला तेव्हा आम्ही तिघेही हादरलेलो होतो. आम्हाला वाटले की सुल्या आता आप्पाचाही मुलाहिजा न बाळगता आप्पाला तिथल्यातिथे खडे बोल सुनावणार! पण निराळेच घडले. एक क्षणभरच, अगदी एक क्षणभरच सुल्याच्या चेहर्यावर लज्जा पसरल्याचे आम्ही तिघांनीही पाहिले. खटकन् आप्पाकडे बघत लाल झालेले गाल फुगवून आणि ओठ मुडपून सुल्याने हळूच हसत मान फिरवली होती. खोटे कशाला बोला? सुल्याचे ते लाजणे म्हणजे अफाटच होते. तो एक क्षण आठवला की आजही असे वाटते की साला मुलीसारखा राहिला असता तर कत्ले आम झाले असते जगात! त्या एका क्षणानंतर कितीतरी वेळ आम्ही तिघे आपल्याबरोबर एक मुलगी बसलेली आहे आणि आपण वाटेल तसे वागायला नको अश्या विचारांनी थिजलेलो होतो. सुल्यानेच त्या परिस्थितीचा कायापालट करताना गझनीला एक दणकेबाज हाक मारून बन-मस्का सांगितला होता.
सुल्याचे शिवाजी महाराजांवर फार प्रेम! म्हणजे भक्तीच! सगळे किल्ले भटकला होता. लव्ह, रोमान्स, सेक्स हे विषय सुल्याला निशिद्ध होते. एकटाच बाईकवर बसून यायचा आणि जायचा. दररोज सगळ्यांचा सगळाच कोटा ठरलेला असल्याने रोजचे बिल एक जण द्यायचा. चार दिवसातून एकदा सुल्याला बिल द्यावे लागायचे तेव्हा गझनीच्या हातात नोटा कोंबत सुल्या म्हणायचा......
"उद्या ह्या गोलकडून पैसे घे, काय? नाहीतर हा साला पळून जातो काही वेळा आधीच"
सुल्याच्या दुसर्या दिवशी गोलचा नंबर असायचा बिल भरायचा.
लग्न ह्या विषयावर सुल्याची मते अतिशय श्रवणीय होती.
"लग्न? कसलं लग्नं? वाय झेड कन्सेप्ट आहे साली! दोघांना एकत्र राहायला भाग पाडायचं आणि मजा मारत बघत बसायचं! मी एकटा राहतोय, हा आप्पा एकटा राहतोय, काय अडतंय कोणाचं?"
सुल्याला बाकी व्यसन नव्हते.
आपण केंद्रात आता कशाला येतो असे विचार आमच्या मनात येऊ लागले होते. कालच आमचा विषय चालला होता की शिपूसकरांच्या घरीच जाऊन थडकू. आप्पाचा नेहमीप्रमाणे विरोध होता. त्याला वाटत होते की सुल्याला बिघडवण्यात आपला सहभाग आहे असे सगळेजण मानतील. आणि आज पाहतो तर सुल्या केंद्रात!
"काय झालं रे सुल्या?"
"लग्न मोडलं"
"मोडलं?"
"येस्स्स्स्स! नाऊ आय अॅम अ फ्री सुल्या"
सुल्याचे इंग्लिश काहीही होते.
"सुल्या तुला कळतंय का काय बडबडतोयस ते? नीट सांग"
केंद्रातून चौघे बाहेर पडेपर्यंत सुल्याने एक अवाक्षर सांगितले नाही लग्न का मोडले ह्याबद्दल! अकरा चाळीसला आम्ही चौघे बाहेर आलो तेव्हा सुल्या पायरीवर बसला. आम्हीही बसलो. सुल्या बोलू लागला.
"बिड्या बंद केल्या. सलवार कमीज घालू लागलो. पोळ्या लाटू लागलो. हसत खेळत राहू लागलो. तरी अनेकदा चुकायचे. तोंडातून चुकीचे शब्द जायचे. चारचौघात बोलताना एकदम विचित्र वागायचो. कोणाशीही कशावरही गप्पा मारायला लागायचो. मग हळूहळू सगळे समजावून सांगायचे. मग स्वतःमध्ये बदल करायचो. वर्धन चांगला भिडू आहे तसा. समजून घ्यायचा मला! एक महिना झाला, सिमला कुलू मनालीला जाऊन आलो, पण भिडूने माझ्या म्हणण्याखातर संयम बाळगला. पण नाही रे गोल! परवा सासू म्हणाली आता लवकर बातमी द्या. लग्न उशीरा झालेले आहे म्हणे! मला आधी कळलंच नाही यार? कसली बातमी पाहिजे आंटीला नेमकी? तर तिला नातू पाहिजे होता. नातू म्हणजे काय मस्करी आहे का? एक तर आधी मी त्या घरात जाऊन अडकलेला. त्यात मला हे लोक दिवस घालवायला लावणार. मी आपला सरकतोय पोट सांभाळत नऊ महिने! हे नुसते मिरवणार! का अडकायचे मी? आणि नात झाली तर काय? तेही एक आहेच ना? मी थेट अंकलला सांगितले. आंटीला कंट्रोल करा म्हणालो. तर बावचळलंच पब्लिक यड्या! म्हणे म्हणजे काय? म्हंटलं म्हणजे काय काय म्हणजे काय? बाळबीळ नाही पाहिजे आपल्याला! म्हणे त्याशिवाय स्त्रीच्या आयुष्याला काय अर्थ आहे? च्यायला माझ्या आयुष्याचा अर्थ मला हवा तसा असला की बास ना यार? आलो निघून! मागून तो वर्धन भिडू माझ्या बापाला टेकला. म्हणे मुलीला समजावून सांगा. माझ्या बापाच्या बापाला जे शक्य नाही ते माझा बाप काय करणार? मी उलटा टाकला. म्हंटलं हे आधी ठरलेलंच नव्हतं की बाळ व्हावं. म्हणे हे कोणी ठरवतं का? मग लग्न म्हणजे काय वाय झेड सारखे राहायला लागायचे का काय काही न ठरवता? आमच्या घरी मासळी बाजार! आईला फिट! दादा कडकडतोय! आजी पडल्या पडल्या आक्रोश करतीय! बाप भंजाळलेला! वर्धनला सुधरेना! शेवटी मी निक्षून सांगितलं! एक वेगळी बाई ठेव. तिला काय मुलंबिलं व्हायची ती होऊदेत. तर म्हणे मग तू कशाला हवीस? म्हंटलं इथे कोणाचं खेटर अडलंय? तर गेला भिडू पकून! तिकडून फोन! लग्न मोडले म्हणून समजा. पळापळ! आमचं पब्लिक तिकडे मिनतवार्या करायला पोचलं! चार तासांनी परत आलं आणि म्हणालं, तू आयुष्यभर घरीच बस. म्हंटलं लई वेळा! कानाखाली आवाज काढला बापानी माझ्या! मी निघालो. भटकलो तो थेट रात्रीच घरी. आडवा झालो. आज सकाळी उठून दिवसभर भटकलो. अजून घरीच गेलेलो नाही. डायरेक्ट केंद्रावर आलोय. आप्पा, तुझ्याकडे राहतो मी आज, काय?"
सुन्न! आम्हाला सुल्याचे काहीही पटलेले नव्हते. पण आप्पा सगळ्यात सुन्न! आधी तो स्वतः एका रूमवर एकटाच राहायचा. त्यात ती रूम अगदी म्हणजे अगदीच सोज्वळ लोकांच्या विभागात होती. त्यात आप्पा रोज रात्री साडे अकराला परतायचा ह्यावरच काही पब्लिक नाराज होते. त्यात आज बारा वाजत आले होते. त्यात सुल्या ही मुलगी आहे हे दोनशे मीटर्सवरूनही बघणार्याला मंद प्रकाशातही समजले असते. त्यात ती आणि आपण आपल्या रूमवर दोघांनीच राहायचे म्हणजे लोक काय म्हणतील? आप्पाला नकार कसा द्यायचा तेच समजत नव्हते. शेवटी तो ठामपणे म्हणाला......
"यडा झाला का सुल्या तू? तू आणि माझ्या रूमवर? लेका मारेल मला तिथलं पब्लिक! आणि घरी का जात नाहीस? घरात घेतील की तुला?"
माझ्याकडे किंवा गोलकडे येण्याचा विषयही सुल्याने काढला नाही. पहिल्यांदाच सुल्याच्या डोळ्यात पाणी आलेले दिसले. खिन्नपणे उठून बाईकवर टांग मारून बसला. बाईकला किक घातली. बाईक वळवून घेतली. हेल्मेट घालण्याआधी मागे बघत आप्पाला उद्देशून म्हणाला......
"घरातल्यांनी हाकलून दिलंय! आता मला कॉल करू नकोस. आप्पा, आयुष्य तुझ्याबरोबर काढायचं होतं यड्या मला! असंच लग्नाशिवाय! मला पोरगी तूच बनवावस असं वाटायचं! पण तूही गांडूच निघालास! कधी कळलंच नाही का रे तुला माझ्या मनातलं? चल, गुडबाय"
ती बाईक गेली त्या दिशेने तिच्या मागून तीन बाईक्स सुसाट पाठलाग करत निघाल्या.
======================================================
-'बेफिकीर'!
छान जमली आहे कथा!!!!!!
छान जमली आहे कथा!!!!!!
विशिष्ट प्रतिसाद वाचण्यात
विशिष्ट प्रतिसाद वाचण्यात येईपर्यंत कथा गंडली आहे वगैरे असं अज्जिबातच डोक्यात आलं नाही. आणि आत्ता ही तसं वाटत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ते खोटं नव्हे. आपण रोज अनेक कन्फ्युज्ड व्यक्ती पहातच असतो आयुष्यात. मग कथेत पण असं एखादं पात्रं आलं तर खटकू नये.
वास्तविक जीवनात सुद्धा एखाद्या व्यक्तिकडे बोट दाखवून आपण ' हा ना पुरता गंडलाय' असं सहज म्हणून जातो, पण त्या मागे त्या व्यक्तिचं भावविश्व काय आहे, तो कशातून गेलाय्/जातोय याचा आपण एक क्षणही विचार करत नाही. ही तर कथा.
मस्त जमुन आलिये कथा....अगदि
मस्त जमुन आलिये कथा....अगदि बेफिमस्त
बेफिकिर मि तुम्च्य बहुतेक कादम्बर्या वाचल्याय.... खुपच छान...असेच लिहित रहा
धन्यवाद नरेश माने, दक्षिणा,
धन्यवाद नरेश माने, दक्षिणा, असुमो!
दक्षिणा,
माझ्या मनातून हळूहळू हा विचार जात आहे की सुल्या ही कथ गंडली आहे. तुमचेही विशेष आभार!
मला आवडली कथा. टोम बोय
मला आवडली कथा.
टोम बोय सारख्या रहाणार्या मुली चे अगदी तन्तोतंत वर्णन तुम्ही केलेले आहे.. काही जणीना असे एकदा तरी जगून बघावेसे वाटते. पण हिम्मत नसते. सुल्याची एक गोष्ट मला आवडली. ती जशी आहे तशी तिला स्विकार्णारा पाहिजे.. मग खरे तर ह्या तिघां पैकी एखादा निश्चितच असू शकतो. पण सुल्यामधली स्त्री सुलभ लज्जा म्हणा किवा नकाराची भीती यामुळे ती पुढे जाउ शकली नसावी असे मला तरी वाटले..
असा एक बंडखोर सुल्या
असा एक बंडखोर सुल्या प्रत्येकीत असतोच असतो ! सुलक्षणा मात करते इतकच ..>>> एकदम पटेश. मी स्वतः कॉलेजमधे असताना अशीच होते
आता मात्र सुलक्षणा झाले आहे.
मस्त कथा.आवडली
मस्त कथा.आवडली
बेफी, मला व्यक्तीचित्रण
बेफी,
मला व्यक्तीचित्रण गंडलेले वाटले नाही. मला सुल्या हे पात्र कनफुज्ड वाटले- बंडखोर वाटले नाही. ऑथेंटिक वाटले नाही ते 'बंडखोरी' या अर्थाने. जोडीला नॉर्मल टॉम बॉय असणे वेगळे आणि हे वेगळे असे वाटत राहिले. सहज टॉमबॉइशपणा (सॉरी! विचित्र मराठी झालयं!) नाही वाटला. असे वाटले की सुल्या घरच्या मंडळींना रिअॅक्ट करत आलेय्/करत आहे.
>>जोडीला नॉर्मल टॉम बॉय असणे
>>जोडीला नॉर्मल टॉम बॉय असणे वेगळे आणि हे वेगळे असे वाटत राहिले. सहज टॉमबॉइशपणा <<<
मला तुमचे म्हणणे कालच लक्षात आलेले होते. म्हणूनच मी जरा विचार करत होतो तितक्यात शुगोल आणि दाद ह्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. त्यात लिहिलेले आहे की सुल्या (व्यक्तीचित्रण नव्हे, कथेतील पात्र कथेतील वास्तवात) कन्फ्युझ्ड आहे. ते वाचून माझ्या मनात विचार आला की लिहिताना मलाही सुल्या किंचित (कथेतील वास्तवात) गोंधळलेला दाखवायचा होता. एखादवेळेस हा आफ्टरथॉटही असेल असाही विचार करून पाहिले. पण तोवर दक्षिणांचा प्रतिसादही आला आणि जरा निर्धास्त झालो.
म्हणजे असे, की सुल्या (कथेत) ऑथेंटिक टॉमबॉय नसणे हा एक सुल्याचाच प्रॉब्लेम आहे, असे बघितले जावे असे मला म्हणायचे आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण कथेतला आप्पा सुल्याला
पण कथेतला आप्पा सुल्याला रात्री मुक्कामाला यायला नाही म्हटत असेल तर तो टॉमबॉय सुल्या बायको मटेरियल म्हणून स्वीकारणारही नाही असे वाटले. मैत्रिण म्हणून असे बिनधास्त व्यक्तीमत्व बघणे वेगळे आणि आयुष्यभरासाठी आपल्या कुटुंबाचा एक्स्टेंडेड भाग बनवणे वेगळे. यात आप्पा/ वर्धन (आधीचा) हे एकत्र कुटुंबातले नसते तर संसार अजूनही चालू राहिलाही असता (या सगळ्याला वैयक्तीक मत चे शेपूट जोडून घ्यावे.)
>>सुल्या (कथेत) ऑथेंटिक
>>सुल्या (कथेत) ऑथेंटिक टॉमबॉय नसणे हा एक सुल्याचाच प्रॉब्लेम आहे, असे बघितले जावे असे मला म्हणायचे आहे.>>
हो. मला तरी तसेच वाटले. पण इतरांच्या कॉमेंट्समधे बंडखोर सुल्या वगैरे आले . मला वाचल्यावर सुल्याची कीव येत होती.
फ़क्त त्याच्या मुलांचा पेहराव
फ़क्त त्याच्या मुलांचा पेहराव वापरण्याने अथवा सिगरेटी फुंकून रात्रीबेरात्री बाईकवर घरी जाण्यामुळे त्याला बंडखोर म्हणत नाही आहे तर एकन्दरीतच स्वतःच्या कनफ्यूजड़ निर्णयानंतरही (जो स्वाभाविकही असू शकेल) चला आता केले आहेच तर निस्तरू असे न मानता सुलक्षणाच्या तात्पुरत्या स्वीकारलेल्या भूमिकेतून बाहेर् पडून पूर्ववत सुल्या होण्याचे दाखवलेले धारिष्टय यातून बंडखोर हे विशेषण लावण्यात आले.
कित्येकदा निर्णय बुध्दीचा वापर करून घेण्याऐवजी हृदयाचे ऐकुनही घेतले जातात आयुष्यात, त्यातून मुलासारखा असलेला वावर व् आप्पाचा रोजचा सहवास यामुळेही थेट काही विचारण्यात आडकाठी येत असावी !
एनीवेज सुल्याच् व्यक्तिचित्रण थेट घुसल !
धन्यवाद !
सुप्रियाताई, तुमचं हे वाक्य
सुप्रियाताई,
तुमचं हे वाक्य अगदी अक्षरश: सत्य आहे :
>> असा एक बंडखोर सुल्या प्रत्येकीत असतोच असतो ! सुलक्षणा मात करते इतकच ..
यासंबंधी माझी रिक्षा फिरवतो
:
>> आपण पुरुष असतो तर काय मजा आली असती हा विचार (जवळपास प्रत्येक) बाईच्या मनात कधीतरी
>> येतच असणार.
आ.न.,
-गा.पै.
बेफिकीर, सुल्या हे पात्रं
बेफिकीर,
सुल्या हे पात्रं आजिबात गंडलेलं दिसंत नाही. सीमा गैलाड गंडलेली वाटते. दोघींच्या बाह्य वर्तनात मात्र विलक्षण साम्य आहे. पण इथेच साम्य संपतं.
सुल्याला काय पाहिजे ते चांगलं माहितीये. पण कसं मिळवायचं ते कळंत नाहीये. म्हणून तिच्या जिवाची तगमग होतेय. ती कुचंबणा अप्पाने समजून घ्यावी अशी तिची अपेक्षा आहे. याउलट सीमाला आपल्याला नक्की काय हवंय याची स्पष्ट कल्पना नाहीये. त्यामुळे सीमा आयुष्यात एकेक गोष्टी चाचपून ( = ट्राय करून) पाहते आणि अखेरीस वैफल्यग्रस्त होते. त्यामानाने सुल्याचं वैफल्य बऱ्यापैकी निस्तरणीय आहे.
आ.न.,
-गा.पै.
गामा, सुल्या सुचल्याच्या
गामा,
सुल्या सुचल्याच्या क्षणापासून मला वाटत होते की इतर कोणी नाही पण तुम्ही सीमा गैलाड नक्की प्रतिसादात आणणार.
असो.
दोघींतला फरकही तुम्हीच दाखवलेला आहेत, त्यामुळे थांबतो.
सुल्या मुलगी होती>> या
सुल्या मुलगी होती>> या वाक्यानंतर कथा परत पहिल्यापासून किती जणांनी वाचली?
मी तर वाचली राव! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अविकुमार | 12 February, 2015
अविकुमार | 12 February, 2015 - 11:05 नवीन
सुल्या मुलगी होती>> या वाक्यानंतर कथा परत पहिल्यापासून किती जणांनी वाचली? स्मित मी तर वाचली राव! स्मित
>> मी पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त कथा नेहमीप्रमाणेच ...
मस्त कथा नेहमीप्रमाणेच ...
सुल्या मुलगी होती>> या
सुल्या मुलगी होती>> या वाक्यानंतर कथा परत पहिल्यापासून किती जणांनी वाचली? मी तर वाचली राव! स्मित
>> मी पण स्मित
धन्यवाद बेफिकीर!
धन्यवाद बेफिकीर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आ.न.,
-गा.पै.
मी पण पुन्हा वाचली
मी पण पुन्हा वाचली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वाती२ >>> +१११११ पुरुष
स्वाती२ >>> +१११११
पुरुष म्हणजे तो बंडखोर , शिव्या देणारा , बिड्या फुक्णारच असला पाहिजे का ?
सुल्याचे फक्त एवढेच गुण दिसताहेत . पुरुषी कणखरपणा, घरातल्यांनी बाहेर काढलं तर स्वताच्या हिमतीवर स्वतःची सोय करण, आपलं प्रेम व्यक्त करण असं काही सुल्यात दिसत नाही . दुसरी गोष्ट म्हणजे सुल्या कमावतो कि घरच्यान्च्याच जीवावर ऐश करतो ते नाही सांगितलंय
मस्तच !!
मस्तच !!
Kharach chan lihata tumhi.
Kharach chan lihata tumhi. Tumace khare nav kalel ka. Tumachi ekadi kadambari asel tar sanga . mala vacayachi ahe.
Please
सुल्या छान जमली आहे. सुल्या
सुल्या छान जमली आहे. सुल्या हे पात्र मुलगी असल्याने मला (कदाचित सगळ्यांनाच) कथा आवडली असे मला वाटते. अशी एखादी बेदरकार मैत्रीण आपल्याला पण हवी असे कथा वाचल्यानंतर वाटले.
खरेतर सारासार विचार केल्यास अस वर्तन काही बरोबर नाही हे कोणीपण सांगेल. तरी असं एखाद पात्र असल्यास त्याबद्दल एक अनामिक ओढ वाटते.
'हे पात्र आपल्या अगदी जवळच नसावं (उदा. बहिण, बायको) पण नुसतच लांबून पाहत राहावं लागेल इतक लांबही नसावं.' (जसं त्या अड्ड्यावरील इतर लोक सुल्याला लांबून पाहात असतात) अस वाटलं मला! चांगल्या आचार विचाराचा सुशिक्षित तरुण आहे मी. तरी मला का अस वाटलं.? अस पात्र असूच नये अस का नाही वाटलं.?
काय पण विरोधाभास आहे हा मानवी मनाचा !!
' शिवाजी जन्मावा पण शेजाऱ्याच्या घरात ' म्हणतात ना ! तोच हा विरोधाभास !
अप्रतिम सुरवात
अप्रतिम सुरवात ................
मस्त! अगदी बेफि स्टाईल.+१
मस्त! अगदी बेफि स्टाईल.+१
मि हि बरेच दिवस आधि वाचलि
मि हि बरेच दिवस आधि वाचलि आहे, खुप छान लिहिलेलि आहे, मि नविन अस्ल्या मुळे प्रतिसाद आता देते आहे, प्रतिसाद कसा देतात समजल्यावर. खुप छान.
नेहमी प्रमाणे मस्तच... बेफि
नेहमी प्रमाणे मस्तच... बेफि तुमच्या कथा भन्नाट असतात... हटके एकदम...भारी वाटत वाचताना .. आणि वाचकांच्या प्रतिक्रिया पण छानच असतात वाचायला ...कथा आणखी एकदा वेगळ्या दृष्टी कोनातून वाचली जाते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages