मावळतीची दिशा ..!!

Submitted by विस्मया on 4 August, 2009 - 11:39

" काय रे, किती वेळ एकटक पाहतोहेस त्या समुद्राकडे ? "
तिच्या या प्रश्नावर त्याने मान न वळवता एक हुंकार भरला.

" आठवते का ग? आपण तास न तास इथे येऊन बसायचो नाही इथे ? तेव्हांपासून हा अस्साच आहे. कसलाही बदल नाही त्याच्यात !"

त्याच्या केसातून हात फिरवत ती म्हणाली " त्याला काय झाले बदलायला?"
तिच्या चेह-यावर हसू विलसत होते " तू मात्र बदललास.. आठवतेय ना..चांदण्या वगैरे आणून द्यायच्या बाता मारायचास "

आता मात्र त्याने मान वळवून तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात रोखून पाहत मिस्किलपणे तो म्हणाला
"अजूनही आवडतात का ग चांदण्या ?"

ती मान गुडघ्यात खुपसून स्वतःशीच हसत राहिली. त्यालाही मौज वाटली.

" किती वेडे होतो ग आपण ? "

" मला तरी अजून तो वेडेपणाच आवडतो..."
"बघ हं..."
" ए चुप्प बस..कुणी बघेल ना "
"आता काय धाड भरलीये? कुणाची भीती आहे?"
"भीती नाही साहेब.. लोक हसतील ना.."
"लोकांचे काय घेऊन बसलीस ?"
"हुं.. तुला काय रे.. पण वयाला शोभलं तरी पाहिजे ना "

तिच्या शेवटच्या वाक्याने तो एकदम ऒफमूड झाला. मावळतीच्या साक्षीने चेह-यावरचे रंग उतरत गेले.

" सॊरी हं.. तुझा मूड घालवला "
"इट्स ओके.. पण जाऊ दे आता.. मूड गेला तो गेलाच.. आता ही ट्रीप स्पॊईल झाली आपली "

तिच्या डोळ्यात आभाळ उतरलेले !!

त्यालाही वाईट वाटले.

" सॊरी गं.. इतकी वर्षे झाली पण माझ्यातही काही बदल नाही झाला. बघ दुखावलीस तू पुन्हा "

मळभ साफ झाल्यासारखे हसत तिने एक टप्पल दिली त्याला.

" आपली मुलं काय म्हणत असतील रे ?"
"काय म्हणणार ? म्हातारा म्हातारी नाही तर कटकट नाही आठवडाभर.. नाहीतर म्हणत असतील, या वयात लफडी करतात !"

" ए चल, आपली मुलं असे काही नाही म्हणणार रे..."
" हं"
"का रे?"

"तुलाही माहित आहे. महिन्याच्या सुरूवातीला पैसे मागावे लागतात. पेन्शन दहा दिवसात संपते. घरात काय हव काय नको आजही तूच पाहतेस. वेळ जावा म्हणून मी ही किराणा भरत होतो. पण आता ते माझेच काम झालेय. मागितल्याशिवाय पैसे मिळत नाहीत "

" जाऊ द्या हो. इतरांसारखी नाहीत आपली मुलं. व्यसन नाही. उलटं बोलणं नाही, वेगळं राहण्याचा हट्ट नाही.."

" वेगळं राहायला परवडत नाही आणि घरकामाला आपल्यासारखे जोडपे मिळत नाही "

"सोडा ना हो.... आपण एन्जॊय करायला आलोय ना.. जुने दिवस आठवायचे.. भूतकाळात हरवून जायचं..काय ठरवलं होत निघताना ?"

अरे तुरे चे पुन्हा नकळत... अहो जाहो झाले होते...!

"हो ना.. पण कुणीतरी विचारले का..बाबा पैसे देऊ का? मी ही नाही मागितले.. तिरिमिरीत शेवटचे फिक्स डिपॊझिट तोडले.. सांगितले नाही तुला तेव्हां"
" अगबाई ! अहो, काय केलेत हे.. माहित आहे ना स्वप्नाची शाळेची फी भरायचीय.. राज ची तारांबळ उडेल हो अगदी !"

"अग तुला कशाला त्यांची काळजी ? आपण कधी जगायचे आपले आयुष्य ? केले कि त्यांच्यासाठी सर्व .. उडवायला पैसे असतात.. तेव्हां काही बोललो कि राग येतो..आणि आता बापाच्या फिक्स डिपॊझिट वर डोळा का ?"

"अहो, मुलांना दुःखी करून आपण कसे एन्जॊय करू शकतो ? त्यांच्या चेह-यावरच्या काळज्या पाहून का आपल्याला बरं वाटणार आहे ? आपलं काय संपलं आता.. मुलांच्या आयुष्यातच पुनःप्रत्ययाचा आनंद शोधायचा आपण आता "

तो तिच्याकडे पाहत राहिला. ..

स्वतःचे अस्तित्त्व मुलांच्यात विलीन केलेल्या तिच्या चेह-यावर मावळतीच्या तांबूस छटा खुलून दिसत होत्या. संध्याकाळची ओहोटी सुरू झाली होती. रात्री चंद्र उगवल्यावर हा समुद्र असा नसेल...नकळत त्याला वाटून गेले !

वाळूत कितीतरी तरूण जोडपी बसली होती. स्वतःशीच हसत त्यांच्यावरून त्याची नजर फिरली.. यातले काही असेच आपल्यासारखे पुन्हा येऊन बसतील इथे ..

छत्रीचा आधार घेत सावकाश उठत त्याने तिला हाताचा आधार दिला. उठताना होणारे गुडघ्याचे कष्ट बाजूला सारत तिने चष्मा साफ करीत डोळ्यावर चढवला.

पायाला जाणवणारा वाळूचा मऊ स्पर्श अनुभवत त्यांची पावले पुन्हा चालू लागली.. मावळतीच्या दिशेने !!

Maitreyee Bagwat
http://maitreyeebhagwat.blogspot.com/

गुलमोहर: 

खुप छान... अजून थोडी फुलवता आली असती... पण काही गोष्टी थोड्क्यात बरंच काही सांगून जातात...
सुंदर कथा! पुलेशु...

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

नाही आवडली. एकांगी आणि नकारात्मक वाटते. आहे त्यात आनंद मानता येत नाही का? प्रत्येक वाईट गोस्टीला मुलगा आणि सुनच जवावदार असतात असे सुचवायचे आहे का? टाळी एका हाताने कधि वाजत नाही मैत्रेयी.

वैशाली
तुझी प्रतिक्रिया मोलाची आहे. अनुभवविश्वात फरक असल्याने असे होत असावे नाही का ? जे पाहण्यात आले त्याप्रमाणे लिहीले गेले.. प्रत्येकाचे अनुभव वेगळे !

" वेगळं राहायला परवडत नाही आणि घरकामाला आपल्यासारखे जोडपे मिळत नाही >>>
ही पण एक सत्य बाजू आहे, नाण्याच्या दोन बाजूतली.

Pages