कोसला

Submitted by टवणे सर on 20 June, 2010 - 01:22

बाई मृताचे धर्म : जिवतां प्रति : कैसे निरूपावे ॥

शंभरातील नव्व्याण्णंवास.. मराठीत क्वचितच एखाद्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच एव्हडी भन्नाट सुरु होते. पुढचे पान अजूनच जबरदस्त. वर लिहिलेली ओळ ह्याच पहिल्या पानावरची. कोसला. म्हणजे कोष.

कुठल्यातरी सांगवी नामक गावातला पांडुरंग सांगवीकर स्वत:ची कथा सांगायला सुर करतो. कथा घडते मुख्यत्वेकरुन ५९ ते ६३च्या पुण्यामध्ये. पण त्याआधी मॅट्रिकचा अभ्यास करताना उंदीर मारणारा पांडुरंग, घरातल्या आई-आजीचे पिचलेपण, त्यातून होणारी भांडणं, मुळची त्रास देण्याची वृत्ती, वडिलांची क्षुल्लक गोष्टीतली लांडी-लबाडी खोटारडेपणा आणि ह्यात तयार होत गेलेला संवेदनशील, भावनाप्रधान व वरुन घट्टपणा दाखवत मिरवणारा पांडुरंग आपल्यासमोर मोजक्या शब्दात उभा राहतो. तिथून पुण्यात आल्यावर पहिल्या वर्षात गावाकडचे बुजरेपण टाळत ’व्यक्तिमत्व’ घडवण्याच्या मागे जाणारा सांगवीकर, गॅदरिंगला कल्चरल सेक्रेटरी होउन पदरचे पैसे खर्च केलेला सेक्रेटरी, अभ्यासाकडे दुर्लक्ष करत ’चमकण्याच्या’ मागे असलेला सांगवीकर, घरुन येणार्‍या पैश्यांची फारशी फिकीर नसलेला आणि आल्या-गेलेल्याला चहा-सिगरेटी पाजणारा सांगवीकर, मेस सेक्रेटरी असताना वर्षाच्या शेवटी जोरदार फटका बसलेला सांगवीकर इंटरच्या आणि ज्युनिअरच्या वर्षात वाहत जातो. मनू मेल्याचे दु:ख पचवण्याची क्षमता नसलेला, मानसिक षंढत्वाची जाणीव होणारा, पैश्याची काटकसर करताना आताच्या त्याच्यासारख्या पैसे खिशात न खुळखुळवणार्‍या मित्रांबरोबर राहूनही एकूणातच सर्वांपासून अलिप्त होत, दूर होत जाण्याचा प्रवास करणारा सांगवीकर आता दिसतो. आणि मग शेवटी एकूणच परिक्षेत पेपर सोडून शिक्षणाला रामराम ठोकून, गावी परत जातो. तिथे वडिलांच्या धंदा-कारभाराला शिव्या देत, थोडेफार त्यातलेच काम बघत, इतर अश्याच शहरात राहून शिकून गावी परतलेल्या कंपूत दिवसचे दिवस ढकलणारा, आता जे होइल ते होवो, सगळेच भंकस, मग का चिंता करा अश्या पराभूत तत्वज्ञानाशी येउन पोचलेला पांडुरंग. इतकीच खरेतर कोसलाची कथा.

पण ह्या सगळ्या स्थित्यंतरात कोसला ह्या कलाकृतीने किती एक गोष्टी वाचकाच्या समोर आणल्या आहेत. कोसलाची भाषाशैली. सुरुवातीला उदाहरणार्थ, वगैरेचा अतिरेक करुन तेव्हाच्या रुळलेल्या कादंबरीय भाषेला छेद देत कोसला सुरु होते. कोसलात कुठेही, 'आई म्हणाली, "..." - मग अवतरणचिन्हात संवाद वगैरे भानगड नाही. संपूर्ण गद्य सलग शैलीत लोकांमधील संवाद, पांडुरंगाची मानसिकता (पुस्तक प्रथमपुरुषी निवेदनशैलीत आहे) एकामागोमाग येत राहतात. पण वाचकाला कुठेही तुटकता येत नाही, गोंधळ उडत नाही. असे लिहिणे खरेच फार अवघड आहे. कोसलात कुठेही शिवीगाळ नाही, लैंगिक-कामुक वर्णने नाहीत, मध्यमवर्गीय कुटुंबातून ज्या श्लीलाश्लीलतेच्या मर्यादा बोलताना पाळल्या जातात त्या मर्यादेत संपूर्ण पुस्तकभर भाषा आहे. पण कुठेही ती भाषा मिळमिळीत होत नाही. तसेच रुक्ष मन:स्थिती, वास्तवता दाखवण्यासाठी भडक शब्दांची साथ घेत नाही. तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब कोसलात पडत राहते, आजूबाजूला दिसत राहते. वेगवेगळ्या कुटुंबामधून, आर्थिक स्तरांतून आलेली मुले-मुली, त्यांची राहण्याची-वागण्याची पद्धती, पांडुरंगचा श्रीमंत-गरीब असणाची वर्षे, त्याचे बदलणारे मित्र आणि सिगारेटी कथानक पुढे नेत राहतात. डायरीच्या रुपातून एक आख्खे वर्ष समोर येते. भविष्यातल्या इतिहासकाराच्या नजरेतून आजच्या समजाची टर उडवली जाते. महारवाड्यातल्या वह्यातून जगण्याचं एक तत्त्वज्ञान बाहेर येतं.
पण ह्या सगळ्यातून एक समान धागा, सूत्र वा विचार येत राहतो तो पांडुरंगला पडलेल्या प्रश्नांचा - जगण्याचे प्रयोजन, असण्याचे प्रयोजन, असलोच तर मी असाच का वा दुसरा एखादा तसाच का - शोध, त्यांची न मिळणारे उत्तरे, उत्तरं न शोधता त्यापासून दूर दूर पळणारा पांडुरंग आणि मृत्युमुळे हे सुटेल काय ह्याची खोल मनात तळ करुन असलेली त्याची आशा हे कादंबरीत जागोजागी येत राहतात. ’भटकते भूत कोठे हिंडते?’ अश्या एका तिबेटी प्रार्थनेपासून ह्या प्रश्नाच्या मृगजळामागे पांडुरंगाचा प्रवास सुरु होतो. मनीच्या मृत्युंनंतर तो हे प्रश्न थेट विचारतो. पण तेव्हडेच. बाकी सगळीकडे अप्रत्यक्षपणे, माहिती असून तो प्रश्नांना सामोरा जात नाही. उत्तरं वांझोटीच असणार आहेत असा एक विश्वास त्याला आहे. आणि म्हणुनच त्याच्या हाइटन्ड मोमेन्ट्सनंतर तो भरार पाणी ओतून रिकामा होतो. उदाहरणार्थ, सांगवीकरच्या तिसर्‍या वर्षाच्या खोलीचे एक गहिरे चित्रण करुन, एका स्वप्नातून उभी केलेली हॉस्टेलच्या आयुष्यातली क्षणभंगुरता पण तरिही एकमेकांबरोबर व्यतीत केलेला प्रचंड वेळ ह्या सगळ्याचा अंत एका वहिवाल्याच्या वहीनं होतो:
क्रम संपता दोन्ही भाई भांडती हो भांडती
आत्मा कुव्हीचा नाही कोनी सांगाती हो SSS सांगाती
अन्‌ आत्मा कुव्हीचा नाही कोणी सांगाती SS
पण ह्या इंटेन्स/तीव्र वातावरणात सुर्श्याचा एक जोक लगेच पुढे येतो: ’एकजण अचानक माझ्या खोलीवर टकटक करून बळजबरीनं आत आला. तो म्हणाला, एक्स्क्यूज मी. ही माझी पुर्वीची खोली. आहा. हीच खोली. काय ते दिवस. हीच ती खिडकी. हेच बाहेरचे झाड. असंच माझं टेबल खिडकीशी असायचं. आहा. हीच कॉट. अशीच माझीही होती. हेच माझं कपाट. ह्या कपाटात मी कपडे ठेवायचो. आहा, आणि ह्यात अशीच लपून बसलेली नागडी मुलगी.’ बदबदा पाणी ओतून पांडुरंग रिकामा.

पांडुरंगाची सगळ्याला क्षुल्लक ठरवण्याची वृत्तीच्या मागे मी का जगतोय वा काय अर्थ आहे का ह्याला हा धागा जास्त दिसतो. त्यातून तो सुरुवातीला गावाला, गावातल्यांना, त्यांच्या मानसिकतेला शिव्या देत शहरात रमून जायचा प्रयत्न करतो तर कादंबरीच्या शेवटाला शहराला शिव्या देत गावच बरा म्हणत येतो. नॉस्टॅल्जिया त्याला तो येवून देत नाही, पण खोल तळाशी कुठेतरी त्याला एक एक सोडून जाणारा मित्र, खोली, वर्षे अस्वस्थ करत जाते. शेवटाला तो सगळंच सोडून फक्त प्रवाहात तरंगणारी काडी व्हायला तयार होतो.

’कोसला’ने एक पुस्तक म्हणुन मला स्वत:ला प्रचंड आनंद दिला आहे. पांडुरंग पलायनवादी आहे का? हो, आहे. निराशावादी आहे का? हो, आहे. तो रुढार्थाने आदर्श व्यक्तिमत्व आहे का? नाही. पण म्हणुन मला कोसला कमअस्सल वाटत नाही. अशी माणसेदेखील असतात, आहेत. कोसलातला पांडुरंग पराभूत होतो, निराश होतो, सत्यापासून पळून जातो म्हणुन कोसला दुय्यम वा अवाचनीय ठरत नाही. उलट एक अतिशय समृद्ध, सकस साहित्यकृतीचा अनुभव वाचकास नक्कीच देते. कोसलातील कित्येक प्रसंगांचे वर्णन अफाट आहे. कुठेही जडबंबाळ, बोजड, अलंकारीक भाषा नाही. वाक्य पण सगळी छोटी-छोटी तुकड्यात. पांडुरंगाला सुर्श्या पहिल्यांदा भेटणे आणि त्यांची दोस्ती होणे हे केवळ ’पण सुरेश सारखा माझ्या डोक्याकडे पहात होआ. शेवटी तो म्हणाला, तुमची बाटली फुटली वाटतं? हे थोरच आहे. मग आमची दोस्ती झाली.’ इतक्याच मोजक्या संवादातून उभे करतो. कोसलामधला विनोद पण सहसा न आढळणार्‍या पद्धतीचा आहे. तो होतो, घडवून आणला जात नाही आणि विनोद केल्यावर लेखक 'बघा मी कसा विनोद जुळवुन आणला' असे न करता मॅटर ऑफ फॅक्टली पुढे जातो. उदा. तांबेचे कविता करणे, त्याच्या जीवनात उद्दिष्ट्य असणे आणि महान नाटके लिहिणे: तांबेच्या नाटकातला एक प्रवेश -
प्रभाकर: (मागे सरुन) सुधा याचं उत्तर दे.
सुधा: अरे पण प्रभा, माझे वडिल माझ्याबरोबर होते, आणि तू हाक मारलीस.
प्रभाकर: (पुढे येत) असं होय? मला वाटलं तू मला माकड म्हणालीस ते मनापासूनच.
हे असले भयंकर लिहीत कोसला तुम्हाला बुडवून टाकते. मावशीच्या नवर्‍याने ’इतिहासच घे बीएला, इतिहासाच्या प्राध्यापकाला दरवर्षी नवीन वाचायला लागत नाही’ असे सांगणे, इचलकरंजीकर, रामप्पा, ते दोघे, सिगरेटी, मद्रास, चतुश्रुंगी-वेताळ टेकड्या, अजंठ्याची सहल सगळेच महान - ओघवते - प्रवाही. अजंठा तर केवळ महान. मनू मेल्यावरची पांडुरंगची तगमग, घरातल्या सर्वांवरचा राग, आपण काही करु न शकण्याचे, क्षुद्र असण्याची जाणीव, पलायनाचे मार्ग शोधणे हे सगळे पुन्हा-पुन्हा येते. तो एके संध्याकाळी पावसात भिजून हॉस्टेलवर परतल्यावर पांडुरंगला झालेला साक्षात्कार की गेली चार वर्षे राहिलेली ही जागा, इतक्या मित्रांसोबत काढलेला वेळ, कुणाचेच कुणी नाही. सगळेच इथे तात्पुरते. आपले काहीच नाही. आणि मग कादंबरीत क्वचितच येणारा थेट प्रश्न - ’मग सगळ्या आयुष्यात हेच - आपल्या कशालाच किंमत नाही’. आणि मग शेवटच्या पेपरात पाय लांब करुन दोनच प्रश्नांची उत्तरं लिहून बाहेर पडलेला सांगवीकर. मी प्रत्येकवेळी हा भाग वाचताना शहारतो - घाबरतो. केवळ उरतो.

भटकते भूत कोठे हिंडते?
पूर्वेकडे? की उत्तरेकडे.
पश्चिमेकडे? की दक्षिणेकडे.
देवांचे अन्न पृथ्वीच्या कोपर्‍याकोपर्‍यांत विखुरले आहे आणि तुला
ते खाता येत नाही, कारण तू मेलेला आहेस
ये, हे भटकत्या भुता, ये. म्हणजे तुझी सुटका होईल आणि तू
मार्गस्थ होशील.

तिबेटी प्रार्थना.
(कोसलातील दुसर्‍या पानावरुन).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मतं मांडली गेली, छान चर्चा. फक्त J D Salinger ह्या अमेरिकन लेखकाच्या The catcher in the Rye ह्या कादंबरीवरून कोसला बेतली गेली आहे असं मत अनेक समीक्षकांनी नोंदवलं होतं. त्याबद्दल इथे कोणी काहीच लिहिलं नाही. असं का?
प्रभाकर [बापू] करंदीकर

ट्यागो | 10 July, 2012 - 22:04
'कोसला' आवडण्याचं कारण म्हणजे त्यातला वाया जाण्याचा फेज.
तो काळ फार विचित्र असतो, किंचित दिर्घही..
पण पोकळीसारखा.
पुन्हा मागे वळून पहावं तर अस्पष्ट आठवणारा.
तो ज्याला लख्ख आठवतो तो 'कोसला' लिहतो,
बाकीचे निव्वळ आवड-नावडण्याची कारणे..

(काल अचानक 'लख्ख' फिदीफिदी झालेला विचार)>>>

हे सार आहे कोसलाचं!
सहीच!
कॉलेजजीवनात थोडंतरी वाया गेलेल्या प्रत्येकाला आवडेल कोसला.

कोसलातला मनू (बहीण) गेल्याचा प्रसंग डोळ्यात पाणी आणतो.
अजूनही तो प्रसंग आठवला की माझ्या जिवाची कालवाकालव होते. डोळे ओथंबून येतात.

हे लिहीतेवेळीही तेच झाले आहे.

Pages