ते एक वर्ष

Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2015 - 10:56

"हं! बोल अक्स....काय केलंस वर्षभरात?"

अक्स! अक्स म्हणजे प्रतिबिंब! विनि अक्षयला कॉलेजच्या दिवसांपासून अक्स म्हणायची. विनि म्हणजे निवेदिता! अक्स तिला विनि म्हणायचा. तीन वर्षे एकाच वर्गात राहूनही अक्सने तिसर्‍या वर्षाचा पहिला पेपर सुरू व्हायच्या आधी विनिला प्रपोज केले होते. खरे तर ही तीनही वर्षे तेच दोघे नव्हेत, तर टीचिंग, नॉन टिचिंग स्टाफ आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्यामते त्यांनी एकमेकांचे व्हायलाच हवे होते. एकमेकांना शोभणारे, कायम हसतमुख, जगन्मित्र, डिसेंट, आर्थिक स्तर सिमिलर, जात एकच, शहर एकच, छंदही एकच! छंद म्हणजे काय? तर टू व्हीलरवरून लांब जाणे, बास्केटबॉल आणि अभ्यास सांभाळून सगळ्यांबरोबर फुल टाईमपास! अर्थात सगळेच्या सगळे चांगल्या अर्थाने! त्याशिवाय महत्वाचे म्हणजे एकमेकांना कधीही सोडून न राहणारे! कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये अक्स दिसला तर विनि पाच-दहा फुटांच्या वर्तुळात दिसणारच. कॅन्टीनमध्ये विनि मैत्रिणींबरोबर खळखळून हसताना दिसली तर त्या टेबलवर नसला तर फार तर शेजारच्या टेबलवर अक्स असणारच!

अक्सने प्रपोज केले आणि प्रपोज करताना त्याने योजलेले शब्द होते:

"लग्न कधी करायचंय?"

त्यावर विनिचं उत्तर होतं:

"मला किंवा तुला जॉब मिळाल्यावर"

जगात इतका, एकाचवेळी अनरोमँटिक आणि रोमँटिक, 'प्यार का इजहार' आजवर झालेला नसेल. दोघांच्याही चेहर्‍यावर काहीही विशेष नव्हते. गाल गुलाबी होणे, मान फिरवणे, छातीतील धडधड वाढणे वगैरे प्रकारांना निसर्गाने फाटा दिलेला होता अपवादात्मकरीत्या! शांतपणे दोघे पेपरला गेले होते आणि अक्सला सुचत नसलेले एक उत्तर परिक्षकाची नजर चुकवून विनिने सांगितलेही होते. तो परिक्षक निवृत्तीला आलेला होता. त्याचे लक्ष असते तरी त्याने विचार केला असता, 'च्यायला उद्या जाऊन नवरा बायकोच होणार आहेत, कशाला बिनसवा उगाच'!

दिमाखदार सोहळा झाला लग्नाचा! दोन वर्षांनी! तोवर विनिनेही जॉब केला आणि अक्सनेही! लग्नाला कॉलेज, शाळा आणि नोकरी येथील सर्व लोक होते, नातेवाईकांबरोबरच आणि इतर मित्रपरिवाराबरोबरच!

लग्नानंतर ठरल्याप्रमाणे अक्स आणि विनि वेगळे राहायला लागले. हे दोघांच्याही घरच्यांना मान्य होते. वेगळे म्हणजे काय, तर अक्सच्या वडिलांनी घेतलेल्या फ्लॅटच्या शेजारचा फ्लॅट अक्सने घेतला. म्हंटले तर विनिला सासुरवास होता, म्हंटले तर नव्हता. सासुरवास म्हणजे सासुरवास ह्या अर्थाने नव्हे, तर निव्वळ सासू-सासर्‍यांची सोबत! जॉब दोघांचाही चालूच होता. सुरुवातीला विनिचा पगार अधिक होता. एक दोन वर्षांनी अक्सला चांगली पोझिशन मिळाली त्याच्या कंपनीत. त्याचा पगार अधिक झाला. उत्पन्न वाढले ह्यापलीकडे काहीही फरक पडला नाही. दोन्ही घरात त्याच बायका कामाला होत्या. तीन वर्षांनी मुलगी झाली. तिचे नांव कोमल ठेवले.

कोमलचे संगोपन आपोआपच एक भागीदारीचा विषय बनला. तिच्यासाठी जागणे, तिच्यासाठी एनर्जी टिकवणे, सगळे तिच्यासाठी करणे! तिचे संगोपन, तिच्यावर फोकस, सबकुछ ती!

तिच्यासाठी दोघांनी आपापल्या इतर जबाबदार्‍या काही प्रमाणात डावलल्या. करिअर दोघांनाही हवे होते, असेही नव्हते की अ‍ॅट द कॉस्ट ऑफ कोमल हवे होते. पण दोघे ते सांभाळू शकत होते.

फार जुने, थोडेसेच जुने, नेहमीचे आणि अलीकडेच झालेले असे सगळेच मित्र वारंवार भेटत असत. सोशल सर्कल मजबूत होते. सासू-सासरे खुषीत होते. कोणालाही कोणाचाही कसलाही त्रास नव्हता.

कोमल पहिलीत गेली. आईला सोडून राहू शकायची नाही. झोपताना आई पाहिजेच. पण मावशीवर फार जीव! त्याच शहरात पंधरा, सोळा किलोमीटरवर गिरिजा राहायची. विनिची सख्खी बहिण! तिलाही आठ वर्षांची मुलगी होती, प्रेरणा! तिला सगळे परी म्हणायचे. कोमल आणि परी जिवाभावाच्या मैत्रिणी आणि बहिणी होत्या. आईला सोडून न राहू शकणारी कोमल एका सुट्टीत चक्क सहा दिवस गिरिजामावशीकडे राहिली. पहिल्या दिवशी अक्स आणि विनिचा पाय निघेना! रात्रीबेरात्री विनिने गिरिजाला फोन केले तर म्हणे कोमल आणि परी चांगल्या मिठी मारून एकाच ब्लँकेटमध्ये झोपल्यात ढाराढूर! दुसर्‍या दिवशी गिरिजाकडचे सगळे उठायच्या आतच हे दोघे त्या घरात दाखल! बघतात तर परी आणि कोमल अजूनही झोपलेल्या! मग त्या उठल्यावर सगळ्यांनी एकत्र ब्रेकफास्ट घेतला आणि कोमलला जाणवले की आपण परीबरोबर मावशीकडे चक्क राहू शकतो. तिने जाहीर केले की अजून काही काळ ती इथेच असेल. कौतुक वाटून दोघे घरी गेले. संध्याकाळी मात्र दोघे वेगवेगळ्या वेळी गिरिजाकडे येऊन गेले कारण दोघांची ऑफिसेस वेगवेगळ्या वेळी सुटली होती. कोमलचा पाय निघत नव्हता. परी कोमलला सोडून काहीही करत नव्हती. त्या रात्री विनिने गिरिजाला एकदाच फोन केला. मग असेच होत राहिले सहा दिवस! दिवसातून दोनवेळा प्रत्यक्ष भेटणे आणि दिवसातून प्रत्येकी तीन तीन फोनकॉल्स! दॅट्स इट!

आई नाही, बाबा नाहीत, कोमल परीबरोबर सहा दिवस तश्शी राहिली.

घरी परत आली तर आईचा फोन घेऊन कैकवेळ परीशी बोलत राहिली. अक्सच्या फोनवरून विनि आणि गिरिजा बोलत राहिल्या कौतुकाने!

मग एका रात्री कोमल पुन्हा एकदा गिरिजाकडे गेल्यानंतर आवरून झाल्यावर एकमेकांच्या मिठीत असताना विनि अक्सला म्हणाली:

"बाहेर पाऊस पडतोय! चल, बाईक काढ, लांबवर जाऊन भिजून येऊ, ऑफीसे गेली खड्ड्यात"

"एकमेकांचे होण्याची सर्वाधिक योग्य वेळ वाया कशाला घालवायची?"

"कारण तहान भागण्यापेक्षा तहान लागलेली असताना ही तहान भागू शकेल हे माहीत असणे अधिक सुंदर असते"

"कोणासाठी?"

"निदान माझ्यासाठी तरी!"

"पण माझ्यासाठी नसेलही"

"तुझ्यासाठी तहान भागणे अधिक सुंदर असते?"

"हो, कारण तहानेचे दुसरे काय होणे सुंदर असते? ती भागण्यापेक्षा?"

"अंहं! प्रयत्न कर! शिखरावर पोचल्याचा आनंद शिखराकडे वाटचाल करण्याच्या आनंदापेक्षा कमी असतो हे समजेल"

"समजा असला, तरी शिखरावर पोचल्यावर होणारा आनंद शिखराकडे वाटचाल करण्याच्या आनंदापेक्षा कमी असतो हे माहीत असले तर संपूर्णतेची आस हवीच कशाला?"

"आपण संपूर्ण होऊ शकतो हे निसर्गाला सिद्ध करून दाखवल्यानंतर त्यातील किती आणि कोणत्या भागाचा सराव करायचा हे आपल्या हातात असते म्हणून"

"मग त्यापेक्षा आणखी एक मूल?"

"पुरुषांना मुक्काम आवडतो, स्त्रीला प्रवास"

"पुरुषांनाही प्रवास आवडतो"

"पण त्या प्रवासाचा उद्देश मुक्कामाला पोचणे हा असतो. स्त्रीला प्रवासच प्यारा असतो"

"एक आई हे बोलत आहे?"

"सध्या तरी एक आई हे बोलत नाही आहे"

"म्हणजे तुझी भूमिका काळानुरूप बदलणार तर"

"मी बदलते म्हणूनच तू तुझे बदलणे झाकू शकतोस"

"तत्त्वज्ञानावर चर्चा आहे का आज?"

"सिरियसली! आपण कॉलेजचे दिवस परत उपभोगू शकतो की नाही?"

"त्यात स्पाईस असेल?"

"एक्झॅक्टली! तेच म्हणतीय मी! त्यात तुझ्यादृष्टीने स्पाईस नसेल. माझ्यादृष्टीने असेल"

"आपल्याकडे भली मोठी करोला कार आहे"

"तिला छत आहे. पाऊस लागणार नाही"

"पावसात भिजलीस तर अधिक बहरशील?"

"बहरेन की नाही हेच बघायचे आहे"

"बहरणे संपले आहे?"

"एखादी गोष्ट सुरू होते तेव्हाच संपलेली असते"

"तू मूड घालवतीयस"

"मूड? आत्ता कोमल इथे असती तर?"

"तर यांत्रिकपणे आपण एकमेकांचे झालो असतो ती झोपल्यावर"

"आणि यांत्रिकपणाला परीपूर्णता मानले असते आपण?"

"निरुत्तर करण्याचा क्षीण प्रयत्न"

"काही असो! प्रेमात नावीन्य टिकवण्याबद्दल तुला काय वाटते?"

"कोणतीही गोष्ट स्वतःलाच नियंत्रीत करता यावी हा अट्टाहास का?"

"म्हणजे?"

"कॉलेजच्या काळातले नावीन्य नसेल, कोमल नसतानाचे नावीन्य नसेल, पण आजही काहीतरी नवीन आहेच ना?"

"नाही, आज नवीन इतकेच आहे की काहीही नवीन नाही आहे हे तू स्वतःला समजावण्यास फक्त ह्या क्षणापुरता यशस्वी झाला आहेस. आणि हो, जसा तू रोजच होतोस तसा!"

"गुड नाईट विनि! आय ऑलरेडी हॅव इनफ हॅपनिंग्ज ऑन माय वर्क फ्रंट"

"सो डू आय"

"सो इट्स फाईन! मला वाटते आजची रात्र निव्वळ चर्चेची रात्र आहे आणि त्यात मला स्वारस्य नाही"

"तुझेच स्वारस्य का महत्वाचे?"

"का नसावे?"

"का असावे असा विचार कितीवेळा केलास?"

"मला वादात रस नाही"

"शांतपणे विचार करून उत्तर देऊ शकतोस की?"

"एकमेकांचे होण्यास कोणताच प्रतिबंध नसेल तर तो मुद्दामहून का आणायचा?"

"आणि का नाही आणायचा? स्वतःहून आणलेला प्रतिबंध स्वतःच मोडीत काढून आपण एकमेकांचे झालो हा अनुभव किती रोमँटिक असेल!"

"नॉट रिअली"

"हेच मी म्हणत आहे. अंतिम ध्येयाची प्राप्ती होत आहे हे तुझ्या दृष्टीने महत्वाचे, ती प्राप्ती होताना आपण पुन्हा एकदा फसव्या का होईनात पण त्या जुन्या पद्धतीने एक काळ जगत आहोत हे माझ्यादृष्टीने महत्वाचे"

"तुम्ही बायका स्वतःच ज्या गोष्टीला फसव्या गोष्टी मानता त्यांच्याच प्रेमात का फसता?"

"तुम्ही बायका? तुम्ही म्हणजे? किती बायकांचा अनुभव आहे तुला?"

"व्हॉट द हेल विनि!"

"तुला कधी कोणी दुसरी आवडलीय?"

"झोप विनि! तू आता काहीही बोलत आहेस"

"सांग ना?"

"काय?"

"तुला कधी कोणी दुसरी आवडली आहे?"

"नो! नेव्हर"

"मला आवडला आहे"

अक्स ताडकन उठून बसला. त्याच्या चेहर्‍यावर अविश्वास, भडका आणि अलिप्तता ह्यांचा संगम होता.

"कोण? कोण आवडला आहे?"

"परीचे बाबा! गिरिजाचा नवरा! राजन"

"राजन"

"राजन"

"तुला........तुला राजन आवडला आहे"

"येस्स, मला राजन आवडला आहे"

"का?"

"कारण त्याला स्त्री जास्त समजली आहे"

"यू आर व्हॉट! आय मीन........व्हॉट बुलशिट यू आर टॉकिंग?"

"आत्ता परी आणि कोमल दोघीच घरात आहेत"

"म्हणजे?"

"राजन आणि गिरिजा पावसात वॉकला गेले आहेत"

"हे तुला कोणी सांगितले?"

"गिरिजा"

"आपल्याला तिथे जायला पाहिजे, कोमल उठली तर?"

"कोमल! कोमल उठली तर रडेल, आक्रोश करेल, तिला कळेल की आई बाबा नेहमी बरोबर असतातच असे नाही, तिचा आक्रोश थांबल्यावर ती झोपेल, गालावर अश्रू वाळतील, पण अक्स, आपण? अरे आपण सगळे कोमलवर का उधळत आहोत? अरे आपण पण कोणीतरी आहोत ना? अरे आपण आहोत म्हणून कोमल आहे ना? अरे कोमल माझ्या पोटचा गोळा आहे. तू ज्या बाईच्या पोटचा गोळा आहेस ती तिच्या नवर्‍याच्या कुशीत शेजारी निवांत पहुडलेली आहे अक्स! अक्स, मला तुझ्या कुशीत पहुडता येत नाही कारण तुला माझे सर्वस्व हवे असते. आणि एकमेकांचे सर्वस्व आपल्याला प्राप्त होऊ शकते ही शक्यताच........नेमकी हीच बाब माझ्यासाठी तुझे होण्यासाठीची अत्यावश्यक बाब होती! अरे मी त्या शक्यतेवर प्रेम केले अक्स! तू परीपूर्णतेवर!"

"इनफ विनि! तुला आणि मला व्यवस्थित माहीत आहे. कवितेला आयुष्यात स्थान नाही. तू जर आत्ता माझी काही कारणाने होऊ शकत नसलीस तर उद्या माझी इच्छा उफाळलेली असेल."

"आणि उद्याही मी तुला उद्देशून हेच सगळे म्हणाले तर तिसर्‍या दिवशी तू तिसरीकडे चौथ्या नजरेने बघशील"

"धिस इज जस्ट.........आय मीन........ रिड्डिक्युलस"

"अक्स! इट्स टाईम! तू आणि मी एकमेकांचे मोजमाप करण्याची वेळ आली आहे. आपण नेमके का एकत्र आलो होतो, का एकत्र होतो, का एकत्र आहोत, का एकत्र असण्यात धन्यता मानणार आहोत, वगैरे वगैरेचे मोजमाप करायला हवे आहे. अरे, एक आई असून मी सांगते अक्स, की हे लाईफ इज नॉट अबाऊट कोमल! इट्स अबाऊट यू अ‍ॅन्ड मी! आपण नेमके काय एन्जॉय करतोय? सांग ना? आपण नेमके, म्हणजे नेमके, एक्झॅक्टली........एन्जॉय काय करतोय? कोमलचे असे, कोमलचे तसे, कोमलचे कसे? हेच? हेच? हे एन्जॉय करतोय? मान्य आहे की ती आपल्या प्रेमाचे प्रतीक आहे. अरे पण ती मोठी होत आहे. तिला तिचे नशीब रेखाटून मिळालेले आहे ऑलरेडी अक्स! ती त्यानुसार दिवस बघत आहे. पूर्वी कित्येक बालकांच्या आया बाळंतपणात जायच्या, वडील खूप लहानपणी जायचे. अक्स, कोमलला आपण दोघेही आहोत. अरे, अरे आपले काय? आपण कधी जगणार? मी तिची आई आहे. मीच तुला सांगतीय की माझ्या रक्तातला एक अन् एक थेंब तिला नुसते पाहिले की फुटणार्‍या पान्ह्यासारखा उचंबळून येतो. अरे पण ती एक परिणाम आहे. आपण ही भूमिका कधी घेणार? आपलेही काही दिवस होते. आपलाही एक काळ होता अक्स! तेव्हा कोमल नव्हती. तेव्हा आपल्याला मुलगीच होईल हेही जगाला माहीत नव्हते. तेव्हा तुझे आणि माझे लग्न होईल हेही कोणाला माहीत नव्हते. इतकेच काय तुला आणि मलाही माहीत नव्हते. अक्स! इट्स टाईम! तुझ्यादृष्टीने संसार परीपूर्ण झालेला आहे. माझ्यादृष्टीने मी एक आई आणि एक पत्नी म्हणून परीपूर्ण झालेली आहे. अक्स, तुझ्यातील तो अजाण विद्यार्थीही परिपक्व झालेला आहे आता! कॉलेजच्या रियुनियनला गेलास तर तू एखाद्या परिपक्व संसारी पुरुषासारखा वागशील त्याच जुन्या मित्रांशी! पण अक्स, माझ्यातील ती अल्लड प्रेयसी नाही रे मरू शकलेली! किंबहुना, मला आजही तिचाच हेवा वाटतो की ती कधीकाळी अस्तित्त्वात होती आणि मी तशी कधीच होऊ शकत नाही आहे आता. अक्स, बनव ना मला तशी? आणि शक्य नसले ना? तर मी तुला काही मागचा काळ पुन्हा आणायला सांगत नाही आहे. अरे मला माझा मेहुणा आवडतो वगैरे विधाने निव्वळ माझी ही भूमिका मला जस्टिफाय करता यावी म्हणून मी म्हणाले होते रे! जर तुला तो रोमॅन्टिक काळ पुन्हा आणता येत नसला ना अक्स? तर ........तर आज मला तू कोणताही आनंद देण्याच्या भानगडीत पडू नकोस. मी तुझा संसार बघेन, मी आपली मुलगी बघेन, सगळे बघेन. पण अक्स, आत्ता तुझ्या बिछान्यावर असलेली स्त्री ही तेव्हाची विनि नसेल. अक्स, पुरुषांना सेक्सपलीकडे अक्कल नसते. आणि बायकांना सेक्समध्ये अक्कल नसते. पण मला आहे. मी तुझ्यापासून झालेल्या मुलीला जन्म देऊन तिला अतिशय नीट वाढवत आहे. तुझ्या कुटुंबाशी मी अतिशय व्यवस्थित वागत आहे. सगळे ठीक आहे. पण मला, माझ्यातल्या मला, ती विनि हवी आहे आज! बोल, देऊ शकतोस?"

"........"

"देऊ शकतोस का?"

"........"

"नाही ना?"

"देऊ शकतो, पण त्यात काही अर्थ असेल का?"

"अरे त्यात काही अर्थ नसेल असे तू मानणे हाच तर बेसिकली प्रॉब्लेम आहे. तू देऊ शकतोस का?"

"नाही! आय हॅव अ बिग कार फॉर यू! आय डोन्ट हॅव अ बाईक"

"सेम हिअर! आय हॅव अ फॅब्युलस बॉडी फॉर यू, बट नॉट अ माईन्ड अक्स"

"मीनिंग?"

"एक वर्ष! एक वर्ष आपण वेगळे राहू"

"व्हॉट! यू आर किडिंग ऑर व्हॉट?"

"नो आय अ‍ॅम नॉट! लेट एव्हरीवन नो दॅट अक्स अ‍ॅन्ड विनि हॅव सेपरेटेड! व्हाईल, इन फॅक्ट, वुई हॅव नो डिफरन्सेस"

"फॉर व्हॉट????????"

"मी एक स्वतंत्र स्त्री आहे अक्स! मी वेगळी राहणार आहे काही दिवसांतच"

आणि विनि खरंच वेगळी राहायला लागली.

ते एक वर्ष अक्ससाठी कसे गेले आणि विनिसाठी कसे गेले ......

==============================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा नंबर पहिला!!!!!!!!!!येस्स्स्स्स्स
आता निवांत वाचते

नीटंसं नाही कळलं बेफी.. परत वाचुन बघते.
पण हा मनाचा गोंधळ प्रत्येक स्त्री चा कधी ना कधी होतंच असतो,.. मग ते तिने मान्य करो वा न करो.
वर्षभर वेगळं रहाणं.. खुप मोठं असेल कदाचित, पण कधी कधी एक दिवस तरी फक्त आणि फक्त स्वतःसाठी मिळावा असं वाटतच.

आयला भारी हो बेफी....
माझा अक्स आणि माझ्या बायकोची विनी होउ घातलीये बहुदा असं वाटायला लागलयं हे वाचल्यावर !!

बेफिकीर,

पूर्वी बायका माहेरपणाला का जायच्या ते या कथेतून कळतं. Happy

आ.न.,
-गा.पै.

बेफी, विनीची अतृप्ती अगदी समजली. Happy

पण संवादात्मक कथांमध्ये पात्रांच्या तोंडी चमकदार आणि/किंवा पल्लेदार वाक्यं लिहायचा मोह टाळायला हवा असं मला वाटतं. त्यामुळे कथा बेगडी वाटायला लागते. कथेतल्या किमान एका पात्राशी वाचकाने 'आयडेन्टिफाय' करायला हवं, तरच कथा 'भिडते' - ते होत नाही अशाने.

(उदा. :
"अंहं! प्रयत्न कर! शिखरावर पोचल्याचा आनंद शिखराकडे वाटचाल करण्याच्या आनंदापेक्षा कमी असतो हे समजेल"
>"समजा असला, तरी शिखरावर पोचल्यावर होणारा आनंद शिखराकडे वाटचाल करण्याच्या आनंदापेक्षा कमी असतो हे माहीत असले तर संपूर्णतेची आस हवीच कशाला?"
>"आपण संपूर्ण होऊ शकतो हे निसर्गाला सिद्ध करून दाखवल्यानंतर त्यातील किती आणि कोणत्या भागाचा सराव करायचा हे आपल्या हातात असते म्हणून"

असं शब्दबंबाळ कुठले पार्टनर्स - तेही इतक्या इन्टिमेट क्षणी बोलतील?)

स्पष्ट लिहिलं म्हणून राग मानू नका, पण मला हे तुमच्या कथांत अनेकदा जाणवतं म्हणून राहवलं नाही.
हे माझं वैयक्तिक मत आहे आणि तुमचा वाचकवर्ग मोठा आहे याची मला हे लिहिताना जाणीव आहेच.
पण तुमचे 'जर्म' अनेकदा खूप टचिंग असूनही संवाद फार 'सेरीब्रल' झाल्यामु़ळे 'पोचत' नाहीत असं मला प्रकर्षाने वाटतं.
'सगळ्याच कथांनी भावनिक आवाहनच करायला हवं का?' असं कदाचित तुम्ही विचाराल. 'सगळ्या कथांनी भावनिक आवाहन करायला हवंच' असं त्याचं माझ्यापुरतं उत्तर आहे.

स्वाती_आंबोळे ,

>> संवादात्मक कथांमध्ये पात्रांच्या तोंडी चमकदार आणि/किंवा पल्लेदार वाक्यं लिहायचा मोह टाळायला हवा असं
>> मला वाटतं.

सहमत. भाषा सहज तोंडी खेळणारी हवी.

आ.न.,
-गा.पै.

उपयुक्त फीडबॅक बाई! Happy

ह्या दृष्टिकोनातून विचार केलेलाही होता. शिवाय, इतरांच्या कथा, टीव्ही / सिनेमातील संवाद ऐकताना हे मनात यायचेही! पण 'विशेषतः अश्या विषयांवरती स्वतः लिहिताना' हे टाळण्याचा विचार अवलंबला नाही. ह्याचे कारण असे की सहज बोलले जातील असे संवाद वाचकांना भावनेची तीव्रता जाणवून देण्यास अपयशी ठरले तर, असे मनात यायचे. मात्र अनेक कथा-कादंबर्‍या ज्या 'अश्या' विषयांवर नाही आहेत (लगेच आठवणारी उदाहरणे हाफ राईस, श्रीनिवास पेंढारकर, व इतर अनेक) त्यांच्यात सहज सुलभ संवाद होते. (नसतातच असे तुम्हाला म्हणायचे आहे असा समज नाहीच). फक्त काही अतिशय सूक्ष्म (किंवा तुलनेने सूक्ष्म) भावनिक बारकावे मांडणारी कथा / कादंबरी असेल तर अश्या प्रकारचे लिहिणे हे 'सेफ राहण्यासारखे' वाटते. ह्या अश्या वाटण्यात वाचक समोर ठेवणे आहे हे मान्य आहे व मी जे लिहितो ते वाचकांनी गौरवावे म्हणूनच लिहितो हे मी स्वतःच नेहमी स्पष्टपणे म्हणत आलोही आहे. Happy

लक्ष ठेवत राहावेत.

सर्व प्रतिसाददात्यांचे आभार! 'त्या एक वर्षात' नेमके काय झाले ह्याबाबत एक अत्यंत उत्तम सांगाडा मनात तयार होता, किंबहुना तोच कथेचा गाभा होता व त्यावरूनच हे सगळे कथानक सुचले होते. पण अचानक मनात आले की त्या एका वर्षात काय झाले हे नाहीच सांगितले तर काय होईल तेही बघावे. अर्धवट राहिल्यासारख्या वाटणार्‍या ह्या कथानकातील भावनांशी कोणी स्वतःच्या मनस्थितीची तुलना करू शकते का / करू इच्छिते का ते तपासावे. बहुधा काहींनी तसा विचार केलेला दिसत आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो मनात असूनही शब्दबद्ध करायला विसरून गेलो.

कथेमार्फत कथेतील पात्रांसोबतच कथालेखकही (/लेखिकाही) वाचकांशी बोलत असतो. असे म्हणता येईल की ह्या सर्व पात्रांवर माझ्यातील लेखक हावी झाला आहे. किंवा, मला माझ्या वाचकांसोबत जो संवाद साधायचा आहे तो साधण्यासाठी मी ह्या कथेचा माध्यम म्हणून वापर केलेला आहे. त्यामुळे, मी विचारार्थ आणलेला मुद्दा हा पुरेपुर पटण्याजोगा असावा ह्या दिशेने प्रयत्न करताना मला ते संवाद तश्या शैलीत लिहिणे हे सेफ राहण्यासारखे वाटते. (ह्या कथेतील मुद्दा - एका आम स्त्रीला संसार, मुले, नोकरी, नवरा, घरचे ह्या सगळ्याच्या पलीकडे असलेले काहीतरी हवे असू शकते व ते तीव्रपणे हवे असू शकते. ही घुसमट कदाचित अनेकवेळा बोलून दाखवली जात नाही. ती बोलून दाखवणे व ती स्वीकारार्ह असल्याचे इतरांना आपल्या शब्दयोजनेच्या - तथाकथित - सामर्थ्यावर मान्य करायला लावणे, हा मुद्दा).

हे करताना कथेचे नैसर्गीकपण मार खाणार हे माहीत असते. कदाचित असेही असेल की कथेचे नैसर्गीकपण जपून असे मुद्दे पूर्णपणे पटतील अश्या शैलीने मांडणे ही पुढची पायरी असेल व तेथवर माझा प्रवास अजून झालेला नसेल किंवा ती माझी क्षमता नसेल.

तुमच्या फीडबॅकमुळे हे सगळे इथे लिहिले गेले हेही चांगले झाले.

Thanks for taking the feedback in the right spirit. Happy

>> कथेतील पात्रांसोबतच कथालेखकही (/लेखिकाही) वाचकांशी बोलत असतो.
होय.

>> >> हे सगळे इथे लिहिले गेले हेही चांगले झाले.
अगदी.
Happy

छान आहे कथा , आवडली Wink
खरतर हि प्रत्येक स्त्रीची शोकांतिका आहे , लग्न झाल्यानंतर तिला पत्नी,सून,आई, वाहिनी हि नाती जपावी लागतात आणि त्याच बरोबर कर्तव्य हि .... पण तिच्या मनातली प्रेयसी हि कायम मनातच असते...
विनी सारखा धाडसी निर्णय मात्र कुणी घेऊ शकत नाही Happy
पु.ले.शु

बेफी कथा आवडली. थोड्या फार फरकाने प्रत्येक स्त्री ची अशीच घुसमट होत असावी असं वाटतं. फक्त कथा हळू हळू पुढे जाताना मनात शिर्षक 'एक वर्ष' घर करून राहतं आणि त्या अनुषंगाने कथा वाचताना एका कॉर्नरला अचानक संपतेच. पण प्रतिसाद वाचल्यावर सावरतो Happy

नेह्मी प्रमाणे वेगळी कथा आनी वेगळा विषय ........
खरतर हि प्रत्येक स्त्रीची शोकांतिका आहे , लग्न झाल्यानंतर तिला पत्नी,सून,आई, वाहिनी हि नाती जपावी लागतात आणि त्याच बरोबर कर्तव्य हि .... पण तिच्या मनातली प्रेयसी हि कायम मनातच असते... >>>>>+१०००००००००
पण या शोकांतिकेशी ईतरांना काहीही देण घेण नसतं .......

आणि विनि खरंच वेगळी राहायला लागली.

ते एक वर्ष अक्ससाठी कसे गेले आणि विनिसाठी कसे गेले ......>>>>>>>>>> कोमलचं काय??? माहीतीये कथा आहे ते पण हा ही प्रश्न आलाच मनात.

बेफि, अपेक्षाभंग झाला. Sad

विनीची अतृप्ती समजली पण ही अतृप्ती एकाएकी मुलगी ६ वर्षांची झाल्यावर उफाळून आली हे नाही झेपले. ती अतृप्ती, मुल साधारण २ वर्षाचे झाल्यावर हळू हळू लहान-मोठ्या प्रसंगातून बिल्ट होताना दाखवली असती तर.. ...

>>आईला सोडून राहू शकायची नाही. झोपताना आई पाहिजेच.>> हा असा पॅटर्न ६ वर्षासाठी सेट करायचा आणि अचानक मुलगी एकटी राहू शकते हे लक्षात आल्यावर नवर्‍याकडून इंन्स्टंट बदलाची अपेक्षा करायची हे नाही पटले. ६ आणि ८ वर्षाच्या मुली घरी एकट्याच आहेत हे समजूनही विनी आरामात आहे हे आधीच्या पॅटर्नशी विसंगत आहे. १०-११ वर्षाच्या आतल्या दोन मुली घरी एकट्या आणि केअरगिव्हर पावसात भिजायला हे वर्तन, स्वतःची कपल म्हणून स्पेस जपणार्‍या, मूल हे सेंटर न समजता एक्सटेंशन समजणार्‍या कुणालाही खटकेल. पण विनीला खटकते नाही. ती अक्सलाच अक्कल शिकवत रहाते हे नाही पटले. मी स्वतंत्र आहे म्हणणे, तडकाफडकी वेगळे राहूया म्हणणे, वेगळे रहायला लागणे यातुन खरेच रिलेशनशिप सुधारते का?
अजून एक म्हणजे शब्दबंबाळ बोलणे आणि तडकाफडकी निर्णय हे दोन्ही एकत्र जमून येत नाही.

स्वाती२,

पटले तुमचे म्हणणे! Sad

अधिक विचारपूर्वक लिहिणे आवश्यक आहे.

प्रत्येक पात्राच्या वर्तनाची पटेल अशी कारणमीमांसा हा कथेचा भाग बनवणे आवश्यक आहे.

मनापासून धन्यवाद! Happy

स्वाती यांच्या अभिप्रायाशी एकदम सहमत आहे. कारण इतके दिवस जबाबदारीने वागणारी व्यक्ती तडकाफ़डकी असा निर्णय घेइल असे वाटत नाही.

खरतर हि प्रत्येक स्त्रीची शोकांतिका आहे , लग्न झाल्यानंतर तिला पत्नी,सून,आई, वाहिनी हि नाती जपावी लागतात आणि त्याच बरोबर कर्तव्य हि .... पण तिच्या मनातली प्रेयसी हि कायम मनातच असते...