भोगीची भाजी...फोटोसहीत

Submitted by सेनापती... on 14 January, 2015 - 11:21

टिपः ही भाजी शमिकाने बनवलेली असून मी फक्त टंकलेखन करून इथे पोस्टण्याचे काम केलेले आहे.
सर्व मायबोलीकरांना संक्रांतीच्या शूभेच्छा...

लागणारा वेळः १ ते १:३० तास (पूर्वतयारी सकट)

लागणारे जिन्नस-

तीळकूट करिता -
१ कप पांढरे तिळ
१/४ कप भाजलेले शेंगदाणे
१ चमचा लाल तिखट
१ वाटी कोरडा कढीपत्ता
१ चमचा गूळ
१ चमचा चिंच (मी कोकम वापरले)
१/४ कप किसलेले खोब
चवीपुरते मिठ

भाजीकरिता

१ बटाटा
२ कोवळ्या शेवग्याच्या शेंगा
२ छोटी काटेरी वांगी
१ गाजर
१ वाटी मटार
१ वाटी मक्याचे दाणे किंवा कणसं
*वाल
*भिजवलेले मूग
*भिजवलेले चणे
(*मिळून १ वाटी)
भिजवलेले शेंगदाणे
अर्धा जूडी पालक
पाव जूडी Kale (मराठी शब्द?) ची भाजी
साखर
चवीप्रमाणे मिठ
१ टेबलस्पून लिंबू रस

फोडणी करिता

३ टेबलस्पून तेल / तूप
१/२ टीस्पून ओवा
१/४ टीस्पून हिंग
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून मोहरी
१ बारिक चिरलेला कांदा

वाटणाकरिता

१ कप खोबरे
१/२ टेबलस्पून जिरे
१/२ टेबलस्पून धणे
१/२ टेबलस्पून लाल मिर्ची पावडर
१/४ टीस्पून हळद
१/२/कप कोथिंबीर
१/२ इंच आलं
४-५ पाकळ्या लसूण
२-४ हिरव्या मिरच्या (तिखटाप्रमाणे)
२ ते २-१/२ टेबलस्पून चिंचेचा कोळ
१-२ टेबलस्पून काळा गोडा मसाला

क्रमवार कॄती-

तीळकूट -

तीळप्रथम ३-४ मिनीटे भाजून घ्यावे. किसलेले खोबरे खरपूस भाजून घ्यावे. भाजलेल्या शेंगदाण्यांची साले काढून टाकावी. कढीपत्ता थोडा शेकवून घ्यावा म्हणजे तिळकूट टिकाऊ बनते. भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे, खोबरे, लाल तिखट, कोरडा कढीपत्ता, १ चमचा गूळ, कोकम आणि चवीपुरते मिठ एकत्र कुटून घ्यावे किंवा मिक्सरवर बारीक करून घ्यावे. तीळकूट तयार.

भाजी:

सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्याव्यात. साधारण मोठ्या फोडी ठेवाव्यात.
वाटण तयार करून घ्यावे.
मोठे पसरट भांडे घेउन तेल तापवून घ्यावे. त्यात हिंग, जिरे, मोहरी,ओवा आणि कांदा घालून परतून घ्यावे.
कांदा थोडा लालसर झाल्यावर त्यात वाटण घालावे.
हळद, गोडा मसाला आणि तयार केलेले तीळकूट घालावे. तेल सूटेपर्यंत परतून घ्यावे.
चिरलेल्या सर्व भाज्या घालाव्यात, वरून चिंचेचा कोळ ओतावा. (माझ्याकडे चिंचेचा कोळ नसल्याने मी वाटणामध्ये ७ - ८ कोकम घातले)
हे सर्व मंद आचेवर शिजू द्यावे, अर्धे शिजल्यावर त्यात मिठ, लिंबू रस घालावा. अधून-मधून ढवळत रहावे.
तयार झाल्यावर वरून कोथिंबीर आणि थोडे तीळ भूरभूरावेत.

सोबतीला बाजरीची भाकरी असल्यास उत्तम. दही भातात देखील घालून ही भाजी मस्त लागते किंवा नूसतीच भाजी देखील अप्रतीम लागते. विविध भाज्या आणि दाणे असल्याने प्रत्येक घासागणिक चव बदलते. Fountain of Taste in Mouth:P

वाढणी: ४-६ व्यक्तींकरिता

तळटीपः
ह्या भाजीत 'चूका' भाजी देखील घालते. आपण आवडीप्रमाणे यात भाज्या बदलू शकतो.
तीळ देखील काळे वापरलेले चालतील.
चणे काळे किंवा काबूली कूठलेही चालतील.
आलं-लसूण न घालताही ही भाजी करती येते.

माहितीचा स्त्रोत - शमिकाची मावशी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो. पा. सु.

खुप खुप छान भाजी केली आहे.. मेहनतही भरपूर त्याप्रमाणे चवही खास असणारच

वॉव, मस्त आहे कलरफुल फोटो, आणी टेस्टी आहे रेसिपी.
तुला आणी शमी ला मकर संक्रांती च्या शुभेच्छा!!!

सर्वांना धन्यवाद. Happy खरच बराच खटाटोप आहे म्हणून वर्षातून एकदाच बनते ही भाजी. Wink तसीच ऋषीपंचमीची भाजी देखील.

@सिंडरेला.. होय केल घरी होता म्हणून वापरलाय.

@सायो.. गूड कॅच. बटाटा काळा पडेल म्हणून कापलाच नव्हता.

मला वाटतय या भाजीत फार्रफार पूर्वी बटाटा असेल का? बटाटा हा परदेशी पाहूणा नंतर सामील झाला असेल जसा तो अनेक ठिकाणी, अगदी उपवासाच्य पदार्थांमध्येही सामील झाला तसा.

@सस्मित.. जमेल तेवढी मदत केली. Wink

वाह..काय कमाल दिसतीय भाजी...बघुनच पोट भरले...
चव तर अप्रतिमच असणार....इतका चवदार मसाला वापरल्यावर....

<<<<हा तर मराठी उंधियु आहे. >>>> + 1

वाह..काय कमाल दिसतीय भाजी...बघुनच पोट भरले...
चव तर अप्रतिमच असणार....इतका चवदार मसाला वापरल्यावर....

<<<<हा तर मराठी उंधियु आहे. >>>> + 1

आरती.. Proud

हा तर मराठी उंधियु आहे.
>>> आपल्याकडे या भाजीचे नाव भोगीची भाजी असेच आहे. गूजरात सीमेवर देखील त्याला उकडहंडी (जमिनीखाली मडक्यात भरून उ़कडतात म्हणून) असे म्हणतात. उंधुयू म्हणजेच मराठी भोगीची भाजी.

मस्त रेसिपी आहे आणि फोटो बघून तर लगेच करावीशी वाटतेय Happy
भाज्यांचे काँबिनेशन उपलब्धतेनुसार बदलून नक्की करुन बघणार.

मस्त दिसतेय. आज जमेल का माहीत नाही पण जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या घेऊन करेन नक्की.

मस्त !

आज केलीय. मस्त झालीय.
शॉर्टकट क्वीन असल्याने वरचे वाटणातले ( कोथिंबीर सोडून ) आणि कोरड्या मसाल्याचे असे सगळे जिन्नस भाजून घेऊन एकत्रच पाणी न घालता वाटले. काळा मसाला आणि दाण्याचे कूट वेगळे घातले.
तिळकूटाची रेसिपी जास्त प्रमाणात दिलीय तरी एकंदरीत मी अंदाजे केलेल्या मसाल्याने भाजी फार उग्र होईल असं वाटल्याने अर्धा मसाला फ्रीजमध्ये ठेवला.खोबरंही जरा कमी घेतलं. अजून एकदा भाजी करता येईल आता.
भाज्याही थोड्याफार वेगळ्या घातल्या.

rsz_img_20160114_202342.jpg

मस्त. फोटो भारी आहेत!
(भाज्यांच्या यादीत कांद्याचं नाव नाही, पण फोटोत कांदा दिसतो आहे?)

Pages