भोगीची भाजी...फोटोसहीत

Submitted by सेनापती... on 14 January, 2015 - 11:21

टिपः ही भाजी शमिकाने बनवलेली असून मी फक्त टंकलेखन करून इथे पोस्टण्याचे काम केलेले आहे.
सर्व मायबोलीकरांना संक्रांतीच्या शूभेच्छा...

लागणारा वेळः १ ते १:३० तास (पूर्वतयारी सकट)

लागणारे जिन्नस-

तीळकूट करिता -
१ कप पांढरे तिळ
१/४ कप भाजलेले शेंगदाणे
१ चमचा लाल तिखट
१ वाटी कोरडा कढीपत्ता
१ चमचा गूळ
१ चमचा चिंच (मी कोकम वापरले)
१/४ कप किसलेले खोब
चवीपुरते मिठ

भाजीकरिता

१ बटाटा
२ कोवळ्या शेवग्याच्या शेंगा
२ छोटी काटेरी वांगी
१ गाजर
१ वाटी मटार
१ वाटी मक्याचे दाणे किंवा कणसं
*वाल
*भिजवलेले मूग
*भिजवलेले चणे
(*मिळून १ वाटी)
भिजवलेले शेंगदाणे
अर्धा जूडी पालक
पाव जूडी Kale (मराठी शब्द?) ची भाजी
साखर
चवीप्रमाणे मिठ
१ टेबलस्पून लिंबू रस

फोडणी करिता

३ टेबलस्पून तेल / तूप
१/२ टीस्पून ओवा
१/४ टीस्पून हिंग
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून मोहरी
१ बारिक चिरलेला कांदा

वाटणाकरिता

१ कप खोबरे
१/२ टेबलस्पून जिरे
१/२ टेबलस्पून धणे
१/२ टेबलस्पून लाल मिर्ची पावडर
१/४ टीस्पून हळद
१/२/कप कोथिंबीर
१/२ इंच आलं
४-५ पाकळ्या लसूण
२-४ हिरव्या मिरच्या (तिखटाप्रमाणे)
२ ते २-१/२ टेबलस्पून चिंचेचा कोळ
१-२ टेबलस्पून काळा गोडा मसाला

क्रमवार कॄती-

तीळकूट -

तीळप्रथम ३-४ मिनीटे भाजून घ्यावे. किसलेले खोबरे खरपूस भाजून घ्यावे. भाजलेल्या शेंगदाण्यांची साले काढून टाकावी. कढीपत्ता थोडा शेकवून घ्यावा म्हणजे तिळकूट टिकाऊ बनते. भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे, खोबरे, लाल तिखट, कोरडा कढीपत्ता, १ चमचा गूळ, कोकम आणि चवीपुरते मिठ एकत्र कुटून घ्यावे किंवा मिक्सरवर बारीक करून घ्यावे. तीळकूट तयार.

भाजी:

सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्याव्यात. साधारण मोठ्या फोडी ठेवाव्यात.
वाटण तयार करून घ्यावे.
मोठे पसरट भांडे घेउन तेल तापवून घ्यावे. त्यात हिंग, जिरे, मोहरी,ओवा आणि कांदा घालून परतून घ्यावे.
कांदा थोडा लालसर झाल्यावर त्यात वाटण घालावे.
हळद, गोडा मसाला आणि तयार केलेले तीळकूट घालावे. तेल सूटेपर्यंत परतून घ्यावे.
चिरलेल्या सर्व भाज्या घालाव्यात, वरून चिंचेचा कोळ ओतावा. (माझ्याकडे चिंचेचा कोळ नसल्याने मी वाटणामध्ये ७ - ८ कोकम घातले)
हे सर्व मंद आचेवर शिजू द्यावे, अर्धे शिजल्यावर त्यात मिठ, लिंबू रस घालावा. अधून-मधून ढवळत रहावे.
तयार झाल्यावर वरून कोथिंबीर आणि थोडे तीळ भूरभूरावेत.

सोबतीला बाजरीची भाकरी असल्यास उत्तम. दही भातात देखील घालून ही भाजी मस्त लागते किंवा नूसतीच भाजी देखील अप्रतीम लागते. विविध भाज्या आणि दाणे असल्याने प्रत्येक घासागणिक चव बदलते. Fountain of Taste in Mouth:P

वाढणी: ४-६ व्यक्तींकरिता

तळटीपः
ह्या भाजीत 'चूका' भाजी देखील घालते. आपण आवडीप्रमाणे यात भाज्या बदलू शकतो.
तीळ देखील काळे वापरलेले चालतील.
चणे काळे किंवा काबूली कूठलेही चालतील.
आलं-लसूण न घालताही ही भाजी करती येते.

माहितीचा स्त्रोत - शमिकाची मावशी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा
फोटो काय अप्रतिम
त्यांना अभिनंदन सांगा

रोहन आणि शमिका.... तृप्त झाले मन. फोटो तर अप्रतिम आले आहेतच शिवाय एकूण एक पदार्थ इतके ताजे आहेत की शिजून पुढे आलेली प्लेट पाहण्यापूर्वी पूर्वतयारीकडेच सारे लक्ष केन्द्रीत झाले.

तुम्हा दोघानांही संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मस्त आलाय फोटो भाजीचा. Happy

आम्ही पण केलीये आज भोगीची भाजी. आमच्या भाजीत गाजर, वांगं, मटार, सोलाणे, मुळा, बटाटा, मेथी, पातीचा कांदा, फ्लॉवर, ऊसावरच्या शेंगा, डिंगर्‍या, मशरुम्स, पेरु, स्वीट कॉर्न्स आणि बेबी कॉर्न्स आहेत. आई करते त्यात मशरुम्स नसतात आणि बोरं आणि ऊसाचे तुकडे पण असतात.

बाकी जिन्नस म्हणजे थोडा काळा मसाला, आलं-लसूण /लसणीची पात, धण्याची पुड, मीठ, गुळ आणि भरपुर तिळाचं कुट. सोबत बाजरीच्या भाकर्‍या, हिरव्या मिरचीचा खरडा आणि खिचडी.

मस्त आहे रेसीपी.
आमच्याकडे वांगी, वाटाणे, गाजर, आणि ओला पावटा (मस्ट आहे) घालून ही भाजी करतात. पालेभाजी घालून कधी खाल्ली नाही.

सायो, बटाटा काळा पडू नये म्हणून तो चिरून पाण्यात वेगळा ठेवला होता. :p..
भाजी सुंदर दिसते आहे.. Happy

सेनापती, फोटो जबरदस्त!! तों.पा.सु.

तुझी कृती वेगळी वाटते आहे. हे वाटण घालून जितक्या भाज्या जमतील तितक्यांची भाजी करणार नक्की.

तुला आणि शमिकाला संक्रांतीच्या शुभेच्छा.
सुंदर दिसतय प्रकरण. चवही खासच असणार हे फोटोतुनच कळतंय. सुगरण आहे शमिका.
कापाकापी चिराचिरीला तरी मदत केलीस की नाही? का फक्त फोटोच काढलेस?

खुप चविष्ट आणि सुंदर दिसतेय भाजी.
जाईला अनुमोदन, किती सुबक चिरून, कापून, मांडून ठेवलिये पूर्वतयारी Happy

हंगामातल्या सगळ्या उपलब्ध शेंगभाज्याही असायला हव्या होत्या यात.. आणखी छान झाली असती मग. नेक्स्ट टाईम अ‍ॅड करायला सांगा Happy

मी जरा अशीच असतील त्या भाज्या घालून भाजी केली.. अगदी पालक, पातीचा कांदा, लाल माठ, कांदा, बटाटा, वांगं, टोंमॅटो, पावटे, मटार.. खूप घाईत केली. साग्रसंगीत पुढच्या वेळेस..

सेनापती आणि राणी सरकार(शमिका :डोमा:) यांना प्रथम संक्रांतीच्या शुभेच्छा!
रेस्पी आणि फोटो दोन्ही मस्त चविष्ट!

Pages