स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कास्टन

Submitted by kulu on 26 December, 2014 - 06:29

उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला जाण्याचा योग आला. तिथे राहुन टुरिस्टांचा एक आणि स्विस लोकांचा एक, अशी स्वित्झर्लंड ची दोन्ही सुंदर रुपं पहायला मिळाली. मुळात दिनेशकडुन खुप ऐकलं होतं. त्यामुळे बघायची खुप उत्सुकता होतीच. पण मी बैठ्या प्रकृतीचा (आळशी म्हटलं तरी चालेल) असल्याने आयती संधी आल्याशिवाय कुठेही जाणं जमत नाही Proud सुदैवाने माझी घरमालकीण मार्था ही भटक्या प्रवृत्तीची असल्याने तिने पुर्ण स्वित्झर्लंड पालथा घातला आहे. त्यामुळे तिने मला प्रवासाचे पुर्ण प्लॅन बनवुन द्यायला सुरुवात केली. शिवाय "उठ जरा बुड हलव. मी सांगतेय तो भाग बघुन ये आज" हे पालुपद असायचंच! त्यामुळे सुर्यप्रकाश आहे असं बघायचं, मार्थाकडुन प्लॅन बनवुन घ्यायचा आणि भटकायला सुरु करायचं असा सपाटाच लावला मी. शिवाय वयाने २५ च्या आतला असल्याने मला विशेष सवलतीचा पासही मिळालाय, त्यामुळे मी पुर्ण स्वित्झर्लंड मधे कुठेही पब्लिक ट्रान्स्पोर्ट त्या पास मुळे वापरु शकतो. पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे या देशाला निसर्गाने भरपुर दान दिलंय आणि सुदैवाने या देशाची झोळी फाटकी नसल्याने जे निसर्गदत्त आहे ते तसंच्या तसं जपलं देखील गेलंय!

मार्थाने पहिला प्लॅन बनवुन दिला तो, ती जिथे वाढली त्या अप्पेनझेल या कॅन्टॉन मध्ये जाण्याचा (मार्था भारतात असती तर कोल्हापुरात परफेक्ट फिट झाली असती, मी पण माझ्या विदेशातील मित्रांची भारत दर्शन टुर पन्हाळ्यापासुनच सुरु करतो Wink ), त्या ट्रिप चे फोटो इथे देतोय. अप्पेनझेल कॅन्टॉन मधलं आल्प्सचं कळसुबाई शिखर म्हणजे "होहेर कोस्टन" असं म्हणायला काही हरकत नाही. तिथुन समोर आल्प्स खाली स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियाचा भाग दिसतो!

माझ्या मोबाईलचा कॅमेरा आणि माझी फोटोग्राफी हे दोन्ही अतिसामान्य आहेत. माबो तल्या खुप चांगल्या फोटोग्राफर्सनी अशा ठिकाणी जायला हवे. कारण स्वित्झर्लंड चा निसर्ग दोन प्रकारचा आहे एक म्हणजे "सुंदर" आणि दुसरा म्हणजे "अतिसुंदर"

१. अतिशय सुंदर सोनसळी दिवस. अप्पेनझेल कॅन्टॉन चे हे अप्रतिम दर्शन. छोट्या छोट्या हिरव्या टेकड्या उजळुन निघाल्या होत्या. मला नेहमी वाटतं की हे युरोपातलं ऊन म्हणजे शुध्द सारंगाचं, विंदांच्या शब्दात सांगायचं तर "शिरशिरणारं" ऊन!

२. स्वित्झर्लंड मध्ये प्रत्येक कॅन्टॉन मध्ये घरांची रचना वेगवेगळी आहे! अप्पेनझेल मधले हे टिपिकल घर. मुळात शेतकरी आणि गुराख्यांचा प्रदेश. त्यामुळे घराला लागुनच गोठा.

३. होहेर कास्टन च्या पायथ्याशी पोहोचलो. इथुन वर न्यायला केबल कार आहे. ती दिसतेय बघा.

४. आता केबल कार मधला प्रवास सुरु झाला. जसजसे वर जाऊ तसतसे खाली निसर्गाचा पट उलगडत जातो!

५. हा ऑस्ट्रियाचा भागही एका बाजुला दिसतो

६.पोहोचलो बरं वर आता

७. तिथे वर हे फिरते रेस्टॉरंट. तिथे बसुन स्विस रोष्टी आणि रिवेल्ला चा आस्वाद घेत भोवतालचा आल्प्स बघता येतो. ३६० डीग्री व्ह्यु!

८. आणि वरुन दिसणारा हा नजारा

९. हा माझा सगळयात आवडता नजारा. अगदी कोंदणात बसवलेल्या निळ्याशार स्फटिकाप्रमाणे मधे दोन कड्यांच्या मध्ये अलगद विसावलेले हे तळे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा धन्यवाद Happy
सई भाग २ दिला नाही कारण इस्पिक एक्का यांची चायना टुर मस्त सुरुय ना सध्या. मग ती टुर संपली की याचे भाग टाकतो. एकाच वेळी माबोवर चायना, स्विस असा भडीमार नको Happy

कुलु, स्वप्नभूमीची सफर अन तीही तुझ्यासारख्या स्वप्नाळू मनाच्या मुलाकडून ! क्या बात है ! मस्त फोटोज अन लिखाण.

विमानाने झुरिक येथे पोचल्या वर स्वित्झर्लंड ची अंतर्गत टूरची आणि राहण्याची व्यवस्था करणार्‍या व्यावसायिक टूर कंपन्या आहेत का?

अजय अभय अहमदनगरकर, निरु, plooma, ऋन्मेऽऽष धन्यवाद! Happy

विमानाने झुरिक येथे पोचल्या वर स्वित्झर्लंड ची अंतर्गत टूरची आणि राहण्याची व्यवस्था करणार्‍या व्यावसायिक टूर कंपन्या आहेत का?>>>>> बर्याच आणि सगळ्या प्रकारच्या, बजेट नुसार, विभागानुसार. मुळात टुरीजम वर अवलंबुन असल्याने अतिशय सुखकारक प्रवास घडवुन आणणार्‍या अनेक कंपन्या आहेत. विमानतळावर माहिती मिळतेच!

Pages