मेथीची गोळाभाजी

Submitted by योकु on 8 January, 2015 - 13:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- एक जुडी मेथी
- शिजवलेली तूरडाळ / घट्ट वरण; पाउण ते एक वाटी
- तेल
- मोहोरी
- हळद
- हिंग
- ७/८ लसणीच्या पाकळ्या
- २/३ सुक्या लाल मिरच्या

क्रमवार पाककृती: 

> मेथी नीट निवडून, धूवून, चिरून घ्यावी
> थेंबभर तेल तापवावं, त्यात २ मोहोरिचे दाणे, हळद घालावी. मग मेथी घालून परतावं. झाकण घालून वाफ आणावी.
> मीठ घालावं. पाणी जरा आळू द्यावं.
> मग शिजलेलं वरण घालावं. तिखट हवं असेल तर आता थोडसं लाल तिखट घालावं (तिखट मसाला नको) नीट मिक्स करावं.
> ही भाजी तयार आहे.
> लहान कढल्यात तेल तापवावं, एक ते दीड पळी. मोहोरे घालावी. मग त्यात लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात. लालसर होऊ द्याव्यात. लाल मिरच्यांचे तुकडे घालावेत, हिंग घालावा अन ही चरचरीत फोडणी भाजीवर घालावी.
> गरम भाजी, फुलके, भाकरी बरोबर खावी Happy
> सकाळी केलेली भाजी उरली तर संध्याकाळी पाणी घालून पातळसर वरण करावं, गरम, वाफाळत्या भातबरोबर मस्त लागतं.

#####
या प्रमाणातली भाजी २/३ लोकांना एकावेळेसच्या जेवणाकरता, बाकी मेन्यू असेल तर भरपूर होईल.

फार काही खास कृती नाही; बेसन लावण्या ऐवजी वरण लावलं इतकाच काय तो फरक. भाजी दिसायला मात्र छान हिरवी-पिवळी दिसते. लसूण मात्र नीट लाल तळला गेला पाहीजे. काही लोक यात तांदूळाच्या कण्याही घालतात. का ते माहीती नाही; बहुधा क्वांटीटी वाढवायला करत असावेत.

हा फोटू -

IMG_0041.jpg

वाढणी/प्रमाण: 
लागेल तसं
माहितीचा स्रोत: 
आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अख्खे तांदूळ घातले तरी चालते. पण खूप शिजवावे लागते. म्हणजे एकजीव होऊन भाजी मिळुन येते.. डाळ तांदूळ फुगुन भाजीही प्रचंड प्रमाणात होते. चपाती कमी आणि भाजी जास्त करुन संपते

मी जनरली मेथी धुवून, चिरून कुकरला लावते. त्याचवेळी तूरडाळ, तांदूळ आणि मेथीदाणेही घालते. शिट्टी पडल्यावर गरम असतानाच थोडं डाळीचं पीठ लागून मग फोडणी बिडणी सोपस्कार.

लसणाच्या फोडणीचं वर्णन तोंपासु आहे. डाळमेथी हा प्रकार अत्यंत आवडता असल्याने या पद्धतीने करून बघेन नक्की.

सायो, आम्ही पण डाळ आणि मेथी एकत्र कूकरला शिजवून घेतो मात्र मेथीदाणे किंवा तांदळाची कणी घालत नाही.

अगं म्हणजे कण्या न घालता करते ती भाजी.
मीही नाही घालत कण्या. अंबाडीतही नाही.

बाकी डाळ घालायची तर अशीच करते. अशीच पालकाचीही किंवा पालकमेथी मिक्सही.

हो, बाई म्हणतात तसं मी फक्त डाळ आणि मेथी एवढंच शिजवून घेते. डाळीचं पीठ पण नाही लावत.

रच्याकने, डाळ-मेथी तुरीऐवजी मसुराच्या डाळीत केली तर लवकर शिजते आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही.

माझी आई मेथीच्या भाजीत फक्त बेसन लावून गोळाभाजी करते. वरून फोडणी वगैरे तसंच. पण बाकी काही घालत नाही, लागतही नाही. मी तिच्यासारखीच करते अर्थात. मी तर मेथी आधी शिजवूनही घेत नाही. इतकं काही कडू लागत नाही, शिवाय गूळ असतो त्यामुळे छान चव येते. खाताना वरून घातलेल्या फोडणीतला कुरकुरीत लसूण आला की कसलं भारी वाटतं! Happy

कोरडी नाही. म्हणजे कोरडी पण करता येते. पण ही वर लिहीली त्याची कन्सिस्टन्सी वेगळी. आईतरी त्यालाच गोळाभाजी म्हणते. आमच्याकडे माहेरी फॉर सम रिझन पालेभाज्यांत वरण घालून नाही करत. पालेभाज्यांच्या वेगळ्या रेसीप्या, वरण आमट्या वेगळ्या. Happy

मूळ रेसीपीवर सगळं अवांतरच टाईप करतेय मी तर. योकु, अशीही करून बघेन. चांगलीच लागेल. Happy

आमच्याकडे माहेरी फॉर सम रिझन पालेभाज्यांत वरण घालून नाही करत. >> +१०० सासर माहेर सर्व जागी पालेभाजी वेगळी, आमटी वेगळी. आमच्याकडे फक्त टीव्हीत संजीव कपूर असा वागतो. तो असल काही करायला लागला की आजी चॅनेल बदलून टाकायची Wink

योकू करून बघेन. (एकटी असेन तेव्हा.)

हो वरील सर्व प्रकार छान होतात, पण तुरीच्या डाळीशी मेथीचे एक क्लासिक नाते आहे... फारच मस्त होते ही गोळाभाजी...याकू--धन्स

मी तुर डाळे च्या ऐवजी मुग डाळ (साल असलेली) वापरते..
तांदुळ कधी टाकुन पाहिले नाहित आता करते..
फोडणी करतांना लसुण , मिरची सोबत शेंगादाणे ( आधी शेंगादाणे, मग मिरची आणि मग लसुण) पण टाकावे .. मस्त खरपुस लागतात

मस्तच....मी पण अशीच करते डाळ मेथी....
कधी कधी मूग डाळ वापरते.... पीत्ताचा त्रास होत नाही....फ़ोटो कमाल...बघुनच तोंपासु

Pages