शालिवाहन शके १५७७ मध्ये पौष महिन्यात शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यास जिंकून त्याचा जावळी प्रांत काबीज केला. शिवाजी महाराज आता एक एक किल्ला जिंकून आपले राज्य वाढवत होते. पुढे शके १५८० च्या अश्विनात राजे कर्नाटकाकडे कूच करत होते. हळू हळू हि वार्ता विजापूरच्या दरबारात कळू लागली. बादशाहने शहाजी राजेना पत्र लिहून शिवाजीला रोखण्यास सांगितले. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. तेंव्हा शिवाजी राजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विजापूरच्या इभ्रतीस काळिमा होता.
आता शिवाजीला रोखलाच पाहिजे यासठी बेगम ने दरबार भरवला आणि आपल्या सर्व सरदारांस आव्हान केले कि कोण रोखेल त्या शिवाजीला " कोणीच तयार होत न्हवते…. तेव्हढ्यात एक सरदार उठला आणि म्हणाला मै लावूंगा शिवाजी को… ! जिंदा या मुर्दा ! सर्व दरबार सुन्न झाला अफलखानाने विडा उचलला आणि तो मोठ्या सैन्यानिशी मराठी स्वराज्यावर चाल करून आला.
☼ विजापूर दरबारात आपल्याला सेनापती अधिकार आणि शिवाजी महाराजांना कैद अथवा मारून टाकण्याचा विडा उचलून अफजल्या वाईकडे यावयास निघाला.- वाईतून मग जावळी प्रांतात आला.
☼ शिवरायांचा या आधीचा पराक्रम आणि कोणी अवलियाने (फकिराने) तुझे अनिष्ठ होयील अस सांगताच खान आधीच खचला होता. आपण माघार घ्यायची नाही व बडी बेगमला दिलेला शब्द पाळायचा असा निर्वाणीचा विचार करून त्याने आपल्या त्रेसष्ठ पत्नींना ठार मारले.(क्यारे नावाच्या फ्रेंच प्रवाशाने त्याच्या ग्रंथात त्रेसष्ठ बायका मारल्याचा उल्लेख केला आहे)
☼ अफजल खानाचा मार्ग - डोण नदीला डावे घालून पंढरपूर - माणकेश्वर - करंकभोस - शंभूमहादेव - मलवडी - रहमतपूर मार्गे वाई (तुळजापूर - पंढरपूर येथे तुळजाभवानी व पांडुरंगाच्या देवस्थानाचा उपद्रव केला)
☼ वाई येथे अफजलखानशी दोन हात करण्यास कठीण जायील खान जावळीस यावा यासाठी शिवाजी महाराजांनी खानाचे वकील कृष्णाजी भास्कर यांच्यावतीने खानास निरोप पाठविला " राजा कचदिल आहे, वाईस येवून भेट घेण्यास भितो"
☼ हाती आला ससा । तो जावू कसा द्यावा" असा विचार करून खान जावळीस यायला तयार झाला (माशाला गळाचे आमिष नीट लागले)
☼ शिवाजी राजांनीही आपले वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांच्या मार्फत पत्र पाठविले त्यात लिहिले " जैशे शहाजीराजे तैसे तुम्ही, आपण खानाचा भतीजा होय" असा पत्रव्यवहार करून दोघेही एकमेकांना शब्दांचा, पत्रांचा व्यवहार करून खेळवत होते. पण, इकडे शिवाजी महाराज आपली योजना आखत होते तर खान गुर्मीत शिवाजीला कसा ठार मारू याचा विचार करत होता.
☼भेटीचा दिवस निश्चित करण्यासाठी महाराजांकडे वकील आला त्या दिवशी मार्गशीष शुद्ध पंचमी होती "खानाचे वकील राजीयास जावून भेटले. लौकिक बोलणे जे बोलायचे ते बोलले, एकांती मागती सर्व वर्तमान सांगितले कि आपण बोलल्या प्रमाणे खानास घेवून आलो. आता तुमची त्यांची भेटी एकांती खासे खासे यांची करवितो. तुम्ही हरीफी करून कार्यभाग करणे तो करावा. म्हणोन सांगितले, भेटीस एक दिवस आड करून दुसऱ्यादिवशी दिवशी भेटावे असे केले. राजे गडावरून उतरावे, खानाशी गोठांतून पुढे यावे, उभयतांनी दरम्यान देरे देवून खासे खासे भेटावे" खानास वर्तमान सांगितले व खानानेही ते मान्य केले. { संदर्भ - कृष्णाजी अनंत सभासद बखर } -
► खलबताच्या वेळी भेटीचा दिवस एक दिवस आड करून ठरविला. त्याचे कारण -
१. दुसरे दिवशी चंपाष्टी होती.
२. अफजलखान अजूनही वाई प्रांतात होता त्याला जावळीस यायला वेळ मिळावा. शिवाय अफजलखान व शिवाजी महाराज भेट होणार याची खबर इतर सरदारांत, मुलखांत पोहोचावी, व आपल्या मावळ्यानकडून गुप्त तयारी करून घेण्यास वेळ मिळावा.
☼अफजलखान भेटीची शिवरायांनी केलेली तयारी -
गडाच्या खाली डोंगराच्या चढणीवर एक उत्तम सदर तयार करणेस शिवाजी महाराजांनी "अंबाजी रंगनाथ मलकरे यांना पाठवले (काही ठिकाणी मळेकर, माळेकर असा उल्लेख आहे) [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
सैन्य दूर ठेवले होते ते जवळ आणून सरदारांस ठिकाणे नेमुंन दिली. ढवळे घाटात चंद्रगडावर लोक जमवून ठेवले कारण हि जागा अशी आहे कि येथून आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसतो. आणि येथे सैन्य घेवून जाणे खूपच अवघड आहे. अशा प्रकारे इतर उंच उंच ठिकाणी नाकेबंदी केली.
आपले सैन्य दिसणार नाही असा झाडी झुडपातून दबा धरून मावळे तयार ठेवले व गडावरून तोफेचा आवाज होताच खानच्या सैन्याची धूळधाण उडवावी असा हुकुम दिला.
शिवरायांनी अशी जागा निवडली की सदरेत होणारी मसलत सर्वांना दिसेल, बुरुजावरील तोफ अशी ठेवली कि भेटीचा शामियाना आणि खानाचे सैन्य दोन्ही टप्यात येईल. व सहज दिसतील.
अफजल खान शामियाना बघूनच भूलेल अशा शाही थाटात सदर उभारली. डेऱ्यास सोन्याचे चंदाराई कळस लावला (चंदाराई कळस- चंद्रराव मोऱ्यांचा आणलेला) बाजूने मखमली झालर व पडदे लावले.[संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
तंबूत एक चौथरा बांधला. हा चौथरा ३३ फुट रुंद आणि ४० फुट लाब असा होता. त्याचे कारण असे कि सदरेच्या परिसरात खानाने पुष्कळ लोक आणायचे ठरविले तर अशक्य होते. व दोन्ही बाजूला तुटलेले कडे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक चौथरा बांधला होता.
मुसलमान बैमान आहे…. कदाचित भेटीच्या वेळी दगाफटका करेल याचा अंदाज शिवाजी महाराजांना होता त्यामुळे सावधगिरीचा इशारा देवून शिवाजी महाराजांनी " हैबतराव, बालाजी सिलीमकर, बांदल सरदार यांना सैन्य जर जवळ आणून अफजलखानाच्या संपूर्ण सैन्याला चांगलेच घेरले होते. अफजलखान आता चांगलाच चक्रव्युहात सापडला होता. माघारी फिरणेही आता शक्य न्हवत.
शिवाजी महाराजांनी खुद्द प्रतापगडावरही नियोजन पूर्वक बंदोबस्त आखला होता. दर बुरजास ५० मावळे, मागील व पुढील बाजूस १०० मावळे, दरवाजावर तसेच कचेरी नजीक तोफा ठेवल्या, तोफांचा आवाज होताच सर्वांनी हुशार व्हावे असा इशाराच देवून ठेवला. [ संदर्भ - शिवद्विग्विजय १६५]
भेटीच्या सदरेच्या मागच्या अंगाला एका खोल दरीत, गर्तेत हिरोजी फर्जंद असे विश्वासू ४० माणूस लपविले
शके १५८१ मध्ये मार्गशीष शुद्ध सप्तमी दिवशी भेटीचा संकल्प ठरला. सकाळी पूजा अर्चा करून शिवरायांनी सर्व विश्वासू सरदाराना एकत्र बोलविले, आम्हाला काही दगाफटका झाल्यास काशीस जावून उत्तर कार्य करावे, धर्म हस्तके व गोदानें सुद्धा दिधली.
स्वताची तयारी करताना दाडी लांब होती ती लहान केली, अंगात चिलखत व जरीची कुडती घातली. डोक्यात बखतर टोप घातला. डाव्या हातात बिचवा लपविला तर अस्तनीत नवटाकी पट्टा घातल, पायात चोळणा घालून कास कसली. अशा मजबुतीने राजे गडाखाली येण्यास तयार झाले.
राजे आई जीजावूंचा आशीर्वाद घेण्यासाठी निघाले, सर्व सरदार आजूबाजूला जमले होते. त्यावेळी राजेंनी आपल्या मातोश्रींकडे संभाजी राजेंना हवाली केले. व म्हणाले "काही वावडे झाल्यास घाबरे न होता, गर्दी करून शत्रूस बुडवावे. राज्य रक्षावे." सभोवारच्या सरदारांना म्हणाले … " तुम्ही सर्व शूर पराक्रमी आहात आमची मदार तुमच्यावरच आहे….सर्वांनी आपली शर्त करावी, राज्य वृद्धीस न्यावे ते तुमचेच आहे. मातोश्रींचा आशीर्वाद घेवून राजे निघाले ते खानच्या भेटीला.
☼ भेटीचा प्रसंग -
अफजलखान प्रचंड सैन्यानिशी येत होता हे दिसताच शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांनी खानकडे निरोप पाठविला कि "भेटीसाठी इतके लोक कशाला, राजे आपणाला घाबरतात. इतका जमाव पाहून राजे घाबरून माघारी जातील. व आपली भेट होणार नाही. आपण सोबत एक अंगरक्षक घेवून यावा व बाकीचे लोक परत पाठवावे. खानाला हे पटले व तो पालखीसोबत दोन हुद्देकरी सशत्र, कृष्णाजी पंत, व बरोबर सय्यद बंडा नावाचा पटाईत सरदार होता.
खान सदरेजवळ येतोय हे शिवरायांना वरून दिसत होते. खानच्या मनात दगा आहे हे शिवराय जाणून होते त्यांनी तसा सर्वांना सावधगिरीचा इशारा दिला होता.
प्रतापगडाच्या पलीकडे नेताजी पालकर व मोरोपंत पिंगळे हे सैन्य घेवून सज्ज होते. तोफेचा आवाज होताच हे खानवर तुटून पडणार होते. [ संदर्भ - कृष्णाजी अनंत सभासद बखर]
गडाच्या भोवती रानभर मावळे पेरले होते. सदरेच्या बाहेर एक रणशिंग घेवून मावळा उभा केला होता. "भेट घडताना माझे काहीही होवूदे पण तू शिंग वाजवून सैन्यास इशारा दे" अस शिवरायांनी त्याला सूचना केली होती. शिंगवाल्याचा इशारा होताच गडावरील तोफ डागावी व तोफेच्या इशाऱ्याने सैन्याने शत्रूवर तुटून पडावे अशी योजना होती.
अफजलखान सदरेजवळ येताच शामियाना पाहून थक्क झाला. खानाने राजांना लवकर भेटावयास असा निरोप पाठवला. राजे गड उतरून आलेच होते. राजेंच्या सोबत विश्वासू जीवा महाला (यांचे उपनाव सकपाळ. जावळी प्रांतात मौजे कोंडवली येथे राहणारे जीवा महाले ) होता. तर खानासोबत त्याचा अंगरक्षक सय्यदबंडा उभा होता. मनासारखे सर्व जुळून आले होते जीवामहाला व संभाजी कावजी राजेंसोबत शामियानाच्या दिशेने निघाले.
शिवाजी महाराज शामियाना जवळ येताच त्यांनी सय्यद बंडाला दूर करा. आम्हाला त्याची भीती वाटते खानाने हसत हसत त्याला दूर केला खान मनात खूप खुश होता कि माझ्या अंगरक्षकाला शिवाजी इतका घाबरला तर मला किती घाबरला असेल. खान गुर्मीत शिवाजी राजांकडे पाहत होता. खान म्हणाला हाच का शिवाजी. तेंव्हा राजेंनी हि हा खानच असल्याची खात्री करून घेतली
खानाने राजीयांची मुंडी कवटाळून बगलेखाली धरली - [संदर्भ - सभासद बखर व शिवदिग्विजय]
राजांना थोडे घेरी आल्यासारखे झाले, यावेळी राजेंच्या मनास रामदास स्वामींची आठवण झाली. महाराजांचे मन जरा ठिकाणावर येते न येते इतक्यात खानाच्या कमरेत भली मोठी जमदाड होती. तिचे म्यान टाकून खानाने ती राजीयाच्या कुशीत चालविली. पण राजीयाच्या अंगावर जरीची कुडती होती. त्यावर ती खरखरली अंगास लागली नाही. खानाने दगा केला हे पाहून, मोठ्या हिमतीने सर्व ताकत एकटवून डावे हाती बिचवा होता तो राजांनी खानाच्या हृदयाखाली पोटी मारला. व 'एकांगी करून खानावर तडाख्याचा वार केला. त्या जोरावर एकाच तडाख्यानिशी खानची आतडी बाहेर आली. - [संदर्भ - हनुमंत स्वामींची बखर व रायगडची बखर ]
खान ओरडला "दगा दगा दगा…। इतक्यात खानाचे कृष्णाजी पंत तिथे आले त्यांनी राजांवर वार केला. परंतु तो कारीगार झाला नाही व लागू पडला नाही. इतक्यात राजांनी दुसऱ्याने पट्याचा वार खानवर केला त्याच बरोबर खानची आतडी बाहेर आली. खान पुरा झाला खाली पडला. कृष्णाजी पंतांनी राजांशी पुन्हा लगट केली पण राजेंनी त्यास दूर होण्यास सांगितले. कृष्णाजी पंत निघून न जात भोयांस आत बोलावले व खानाला पालखीत बसवू लागले. तेवढ्यात संभाजी कावजी व जीवा महाला तिथे होते. संभाजी कावजींनी भोयांचे पाय तोडले व खानाची पालखी अडवली. त्यांनी खानाचे मुंडके कापले. इकडे खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा राजेंवर चाल करून आला. वर्मी घाव मारणार इतक्यात जीवा महालांनी सय्यद बंडाचा हात वरच्यावर कलम केला व राजीयास वाचविले "यावरून एक म्हण प्रसिद्ध झाली "होता जीवा म्हणून वाचला शिवा" [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
[ टीप - अफजलखानाचे वकील कृष्णाजी भास्कर शिवाजी महाराज यांच्या हातून मारला गेल्याचा हनुमंत स्वामींची बखर, रायगडची बखर, कृष्णाजी अनंत सभासद बखर, शिवदिग्विजय या समकालीन साहित्यात कोणताच पुरावा नाही ]
खान पडला वार्ता सगळीकडे पसरली, रणशिंग वाजताच तोफेचा आवाज झाला. आणि एकच कापाकापी उडाली. मराठ्यांचे सैन्य खानच्या सैन्यावर तुटून पडले तुफान युद्ध झाले. खानाचे सीने जीव तोडून पळत होते. या घनघोर युद्धात शिवरायांचे दोन सरदार शामराज पद्मनामी व त्रिंबक भास्कर कामी आले [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
अफजलखानाचा मुलगा फाजलखान कोयना काठाने निसटून जात असता खंडोजी काकडे(खोपडे) या सरदाराचे हाती सापडला. पण खंडोजीने धनाच्या मोहास पडून त्यास सोडून दिले. हि वार्ता राजांस कळताच तात्काळ खंडोजीला पकडून त्याचा शिरच्छेद करण्यात आला. [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
प्रतापगड युद्धात महाराजांना हजार बाराशे उंट, चार हजार घोडे, तीन लाखांचे जवाहीर, सात आठ रोकड राज्यांच्या खजिन्यात जमा झाली. कापड हत्यारे लुट मिळाली ती निराळीच.
अशी हि अफजलखान वधाची गोष्ट शके १५८१ विकारी नाम संवछरी मार्गशीष सप्तमी गुरवारी घडली.
☼ प्रतापगडाचे युध्द झाल्यावर युद्धात कमी आलेल्या व पराक्रम गाजवलेल्या सर्वांना महाराजांनी बक्षिसे आणि मदत दिली. काही दिवसांनी अफजलखानाचा मदतगार खंडोजी खोपडा पकडला गेला राजांनी त्याचे शीर कलम केले.
☼ थोड्याच दिवसांनी शिवाजी राजेंनी प्रतापगडावर मोठा उत्साह साजरा केला. आई भवानीने आम्हाला यश दिले म्हणून राजेंनी आपली ती कुलस्वामिनी तिचे दर्शन वारंवार घडावे याकरता गंडकी शिळा आणून एक हुशार कारागीर तुळजापूरास पाठवून तेथील देवीच्या ध्यानाप्रमाणे मूर्ती घडवून घेतली. व तिची प्रतापगडावर मंदिर बांधून राजेश्री मोरोपंत पिंगळे यांच्या पत्नीच्या हस्ते प्रतापगडी स्थापना केली [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
मराठ्याच्या पोराने पादशाही सरदाराला सबंध गिळून टाकला हि वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. सर्वत्र कीर्तिवंत राजा अशी ख्याती झाली. डोंगरातल्या उंदराने विजापूरच्या वाघाला खाउन टाकला म्हणून बेगम खूपच हताश झाली. विजापूरचे सिंहासन डळमळू लागले.
बखरकार सांगतात, अफजलखान मारला गेला हि बातमी चौथ्या दिवशी विजापुरास कळली, ती ऐकताच आदिलशहा ताक्तावरून उठून खेद करू लागला… बडी बेगम अल्ला !! अल्ला !! खुदा ! खुदा ! करून रडत अंग पलंगावर पडली. पुढे तिने तीन दिवस पाणीही ग्रहण केले नाही.
इकडे जीजाउंना इतका आनंद झाला कि त्यांना तो त्रैलोक्यात मावेना. शिवाजी राजांचा दरारा इतका वाढला कि, चारी दिशांच्या शत्रूंना नीट झोप लागेना. प्रतापगडाच्या पराक्रमानंतर राजांच्या विजयाचा घोडा चौकुर उधळला. आणि यशवंत राजा, कीर्तिवंत राजा म्हणून लोकप्रिय झाला.
लेखक / कवी - गणेश पावले
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान.
[टीप - वरील लेख हा अफजलखानाचा वध . वि. ल. भावे यांच्या पुस्तकावरून हनुमंत स्वामींची बखर, रायगडची बखर, कृष्णाजी अनंत सभासद बखर, शिवदिग्विजय इत्यादींचा आधार घेवून लिहिलेला आहे. ]
चांगला विस्तृत लेख आहे.
चांगला विस्तृत लेख आहे. प्रसंग समोर उभा करतो.
राजे आई जीजावूंचा आशीर्वाद घेण्यासाठी निघाले, सर्व सरदार आजूबाजूला जमले होते. त्यावेळी राजेंनी आपल्या मातोश्रींकडे संभाजी राजेंना हवाली केले. व म्हणाले "काही वावडे झाल्यास घाबरे न होता, गर्दी करून शत्रूस बुडवावे. राज्य रक्षावे."
>>> हे कुठल्या संदर्भातून घेतले आहे? की मनचे लिहिले आहे? त्यावेळी जिजाउ राजगडी होत्या आणि राजे प्रतापगडी. सईबाईंचे नूकतेच निघन झाले होते त्याकरिता ते राजगडी येउन दिवस कार्य पुर्ण करून परत आले होते.
अरे व्वा गणु नेहमीप्रमाणे
अरे व्वा गणु नेहमीप्रमाणे मस्तच
मी यासन्दर्भात असे ही वाचले
मी यासन्दर्भात असे ही वाचले आहे की अफजलखानाचा वध झाल्यानंतर , सर्वांना योग्य त्या कर्तबगारीनुसार बक्षिसे वाटण्यात आलीत, त्यावेळी जीवा महाले याला सुरवातीला एक गाव इनाम म्हणुन जाहीर करण्यात आले त्यास ते मान्य होइना . जीवा महाले चे एकच म्हणणे होते " होता जीवा , म्हणुन वाचला शिवा " मग पाच गावे देण्याचे जाहीर केले गेले , पण जीवा महाले त्याचा हेका सोडीना मग शिवाजी महाराजांनी , आपले राजकीय गुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांना याबाबतीत सल्ला विचारला. त्यावर रामदास स्वामींनी " जीवा महाले याचे शीर कलाम करण्यात यावे "
असा महाराजांना सल्ला दिला होता त्याचे कारण " अशी माणसे स्वराज्याला धोकादायक असतात , त्यांना वेळीच आवर घालावयाचा असतो " असे रामदास स्वामींचे म्हणणे होते. आता ही सत्य घटना की दन्त्कथा हे ठावुक नाही
छान
छान
@ सेनापती..जी... राजे
@ सेनापती..जी...
राजे आई जीजावूंचा आशीर्वाद घेण्यासाठी निघाले, सर्व सरदार आजूबाजूला जमले होते. त्यावेळी राजेंनी आपल्या मातोश्रींकडे संभाजी राजेंना हवाली केले. व म्हणाले "काही वावडे झाल्यास घाबरे न होता, गर्दी करून शत्रूस बुडवावे. राज्य रक्षावे." सभोवारच्या सरदारांना म्हणाले …
[संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
जयंत शिंपी जी…. तुम्ही जी
जयंत शिंपी जी….
तुम्ही जी माहिती लिहिलीय ती मी पहिल्यांदाच ऐकतोय…। मी नक्कीच यावर अभ्यास करेन आणि खरे काय ते सांगण्याचा प्रयत्न करेन
प्रीतीजी धन्यवाद __/\__
प्रीतीजी
धन्यवाद __/\__
@ jayantshimpi | जी तुम्ही
@ jayantshimpi | जी
तुम्ही लिहिलेली माहिती हि विचार करताच चुकीची वाटतेय…
शिवरायांचे १० अंगरक्षक होते. अंगरक्षक हे जीव कि प्राण असतात. ते असला फालतू मोह कधीच करणार नाहीत. "शिवाजी राजाचा अंगरक्षक" हीच पदवी त्याला आनंदाने जगायला पुरेशी आहे.
समर्थ हे शिवरायांचे राजकीय गुरु असले तरी ते असा सल्ला कधीच देणार नाहीत. ( समर्थांचे शत्रू पाहता हि दंतकथा त्याचं प्रचलित केली असेल यात शंका नाही) शिवाजी महाराजांचा अंगरक्षक हा स्वार्थी असूच शकत नाही. होता"जीवा म्हणून वाचला शिवा" हि म्हण लोकांनी प्रचलित केली कारण प्रसंगच तसा होता.
अफजल खानच्या तोडीचा ताकतवार अंगरक्षक हा संभाजी कावजी होता.
तर सय्यद बंडाच्या तोडीचा अंगरक्षक जीवा महाले होता.
अफजल खानाला मारायला राजे १० अंगरक्षक घेवून गेले होते.
पण भेटीच्या वेळी फक्त जीवा महाला आणि शिवाजी महाराजांचे वकील तेथे उपस्थित होते.
इतका विश्वासू सरदार अस करेल यावर कुणाचाही विश्व्वास बसणार नाही.
पण एक मात्र खर आहे की,
शिवाजी महाराजांच्या हुकुमाची अवज्ञा केल्याबद्दल जीवा महाला याला शिवाजी महाराजांनी स्वतापासून दूर ठेवला. म्हणजे अंगरक्ष पदावरून काढून टाकले.
पण शीर कलम केले असा उल्लेख इतिहासात कुठेच नाहीय.
त्यामुळे हि दंतकथाच असावी…. नाही नाही आहेच
-धन्यवाद
गणेश पावले
ग.पा. सहमत !
ग.पा. सहमत !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहमत! काही कारणास्तव नंतर
सहमत! काही कारणास्तव नंतर बेबनाव झाले असतील पण वरील कथा चुकीची वाटते.
छान माहितीपुर्ण लेख आणि काही
छान माहितीपुर्ण लेख आणि काही प्रतिसाद!!!
छान, खुप दिवसांनी अशी भारदस्त
छान, खुप दिवसांनी अशी भारदस्त भाषा वाचली !
छान. आवडले!
छान. आवडले!
हा जीवा महाला डोंबारी होता ना
हा जीवा महाला डोंबारी होता ना
सारिका नक्की काय अभिप्रेत
सारिका
नक्की काय अभिप्रेत आहे.
माफ करा पण मी अफजलखानाचा वध .
माफ करा पण मी अफजलखानाचा वध . वि. ल. भावे हे पूस्तक वाचलेले नाही. ही संदर्भ पूस्तक आहे की कथा-कादंबरी? भावेंनी कूठले संदर्भ वापरले आहेत?
सेनापतीजी वि. ल. भावेंनी
सेनापतीजी
वि. ल. भावेंनी १८४१ ला प्रतापगडाच्या युद्धा विषयी अभ्यासपूर्ण लिखाण केलेय.
सभासद बखर, शिवद्विगीजय आणि शिवभारत या तीन ग्रंथांचा आभ्यास करून १८४१ ला हे पुस्तक लिहिलंय
सारिका जी हो, जीवा महाला हे
सारिका जी
हो,
जीवा महाला हे डोंबारी समाजाचे शूरवीर लढवय्या होते.
जीवा महाला यांचे मूळ नाव सकपाळ, हा जावळी प्रांतात मौजे कोंडिवली या गावाचा.
शिवाजी महाराजांनी जीवा महाला यांची निवड करण्यासाठी एक खास कारण होत.
कारण -
१. दोन्ही बाजूची म्हणजे अफजल खान आणि शिवाजी महाराजांची ताकत समान समान करण्यासाठी. जीवाला महालाला निवडले
कारण
अफजलखानकडे सय्यद बंडा हा पट्टा चालवण्यात तरबेज होता. तो एका दमात, दोन पावलात २० फुट उडी मारत होता. तर आपल्याकडे तसा कोणी न्हवता. पण राजेंना जेंव्हा कळले कि जीवा महाला नावाचा डोंबारी पट्टा चालवण्यात पटाईत आहे त्याची उडी जवळ जवळ १० ते १५ फुट होती.
२. शिवाजी महाराज जेंव्हा शामियान्याच्या दरवाजात आले तेंव्हा त्यांनी सय्यद बंडाला पहिला आणि आपण याला घाबरतो. याला दूर उभा करावा अशी अफजल खानाला आज्ञा केली तर खानाने त्याला २० फुटावर उभा केला.
तर महाराजांनी जीवा महालाला १० फुटांवर उभा केला.
जेंव्हा शिवरायांनी अफजलचा कोथला काढला तेंव्हा सय्यद बंडा चालून आला. तो आधीच २० फुटावर होता तर जीवामाहाला १० फुटावर जवळ उभा असल्याने त्याने सय्यद बंडाला अडवून त्याचा हात कलम केला
म्हणून "होता जीवा, म्हणून वाचा शिवा"
मी सभासद बखर आणि शिवभारत
मी सभासद बखर आणि शिवभारत वाचलय.
त्यात असे उल्लेख कूठेही नाहीत. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिवदिग्विजय वाचलेले नाही. त्याबद्दल माहिती काढतो.
मी पण सभासदाची बखरच वाचलीय
मी पण सभासदाची बखरच वाचलीय सेना. त्यानुसार अफजलवधाच्या वेळी जिजाऊ राजगडावर होत्या.
अजून कुठल्यातरी एका पुस्तकात असाही उल्लेख वाचला होता की महाराजांनी अफजलखानाचे शिर जिजाऊंना दाखवण्यासाठी म्हणून संभाजी कावजींबरोबर राजगडावर रवाना केले, तिथेच आऊसाहेबांच्या आज्ञेनुसार त्या शिरावर योग्य ते अंत्यसंस्कार करण्यात आले. तर खानाचे धड प्रतापगडापाशीच दफन केले गेले.
कवी गणेश पावले, आपणही स्वतः
कवी गणेश पावले, आपणही स्वतः हे तिनही संदर्भ वाचून बघावेत (वाचले नसल्यास) ही विनंती.
(No subject)
दहशतवाद असाच संपवायचा असतो.
दहशतवाद असाच संपवायचा असतो. हा धडा सर्व राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांनी दिला आहे.
वाघनखांचा उपयोग केलेला का
वाघनखांचा उपयोग केलेला का त्यावेळी ???
नितीनचंद्र +१
नितीनचंद्र +१
गणेश पावले, चिरपरिचित कथा
गणेश पावले,
चिरपरिचित कथा आहे. तरीही परत वाचायला आवडली!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक शंका आहे. तुम्ही म्हणालात :
>> काही दिवसांनी अफजलखानाचा मदतगार खंडोजी खोपडा पकडला गेला राजांनी त्याचे शीर कलम केले.
बाबासाहेब पुरंदाऱ्यांच्या शिवचरित्रात खंडोजी खोपडेचा उजवा हात आणि डावा पाय कलम केल्याचं वाचलेलं आठवतं. खरंतर महाराज त्याचं डोकंच उडवणार होते, पण तो पडला बाजी जेध्यांचा जावई. बाजी म्हणजे बडं प्रस्थं. बाजींमार्फतच त्याने प्राणांची याचना केली, म्हणून महाराजांनी त्याला जिवंत सोडला. नंतर बाजी नाराज झाले तेव्हा त्यांची समजूत काढतांना महाराज म्हणाले की वचन दिल्याप्रमाणे गर्दन मारली नाही. मात्र आमच्यावर उगारला तो हात आणि आमच्याविरुद्ध टाकला तो पाय हे फक्त कलम केले.
आ.न.,
-गा.पै.
होय खंडोजी खोपडेचा चौरंग केला
होय खंडोजी खोपडेचा चौरंग केला होता. गर्दन नव्हती मारली.
आता ही सत्य घटना की दन्त्कथा
आता ही सत्य घटना की दन्त्कथा हे ठावुक नाही हे मी अगोदरच सांगितले आहे
या निमित्ताने आणखी शोध घेता येतो कि काय हे पहावे धन्यवाद
अफझुल्ल्या असे जर वाचले किंवा
अफझुल्ल्या असे जर वाचले किंवा ऐकले तर माझ्या डोळ्यापुढे हत्तीच येतो झुलत झुलत गवत खाणारा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
औरंग्या असे वाचले आहे का ?
औरंग्या असे वाचले आहे का ? समर्थ रामदासांनी लिहले आहे. संपुर्ण वाचा म्हणजे मुसलमानी राजांविरुध्द समर्थ किती कडक लिहित असत याचा बोध होईल.
देवची तुष्टला होता | त्याचे भक्तीस भुलला |
मागुता क्षोभला दुखे | आनंदवनभुवनी ||२६ ||
कल्पांत मांडला मोठा | म्लेंच्छ दैत्य बुडवाया |
कैपक्ष घेतला देवी |आनंदवनभुवनी ||२७||
बुडाले सर्व ही पापी | हिंदुस्थान बळावले |
अभक्तांचा क्षयो जाला |आनंदवनभुवनी || २८||
पूर्वी जे मारिले होते | ते ची आता बळावले |
कोपला देव देवांचा | आनंदवनभूवनी ||२९ ||
त्रैलोक्य गांजिले मागे |ठाउके विवेकी जना |
कैपक्ष घेतला रामे | आनंदवनभुवनी ||३०||
भीम ची धाडिला देवे | वैभवे धाव घेतली |
लांगूल चालिले पुढे | आनंदवनभुवनी ||३१ ||
येथून वाढला धर्मू | रमाधर्म समागमे |
संतोष वाढला मोठा | आनंदवन भुवनी ||३२ ||
बुडाला औरंग्या पापी | म्लेंच संहार जाहाला |
मोडली मांडली छेत्रे | आनंदवनभुवनी || ३३ ||
बुडाले भेदवाही ते | नष्ट चांडाळ पातकी |
ताडिले पाडिले देवे | आनंदवनभुवनी ||३४ ||
गळाले पळाले मेले |जाले देशधडी पुढे |
निर्मळ जाहाली पृथ्वी | आनंदवनभुवनी ||३५ ||
उदंड जाहाले पाणी | स्नान संध्या करावया |
जप तप अनुष्ठाने |आनंदवनभुवनी ||३६ ||
नाना तपे पुरश्चरणे |नाना धर्म परोपरी |
गाजली भक्ती हे मोठी | आनंदवन भुवनी ||३७||
लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |
चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||३८ ||
बंडपाषांड उडाले |शुध आध्यात्म वाढले |
राम कर्ता राम भोक्ता | आनंदवनभुवनी ||३९||
देवालये दीपमाळा |रंगमाळा बहुविधा |
पूजिला देव देवांचा | आनंदवन भुवनी || ४०||
रामवरदायीनी माता |गर्द घेउनी उठिली |
मर्दिले पूर्वीचे पापी | आनंदवनभुवनी ||४१||
प्रतेक्ष चालिली राया | मूळमाया समागमे |
नष्ट चांडाळ ते खाया | आनंदवनभुवनी || ४२ ||
Pages