नशा फक्त वाईट गोष्टींचीच चढते असं नाही. चांगल्या गोष्टींची देखिल नशा चढते! आणि मला सध्या पाकिस्तानी टीव्ही मालिकांची नशा चढली आहे. तशा खूप पाकिस्तानी मालिका पाहिल्या नाहीयेत मी अजून, हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच पाहिल्यात पण त्यांनी मला जे दिलं आहे ते आजवर कोणत्याच हिंदी/मराठी/इंग्रजी मालिकेने दिलेलं नाहीये! अर्थात हे माझं मत आहे. आणि ही मालिकांना यशस्वी मानण्याची एकमेव फुटपट्टी नव्हे. कारण कोणाला कधी, कशात काय सापडेल ते सांगता येत नाही. दगडात देव शोधणारी माणसं आपण! चांगल्या कलाकृतीचा माझा निकष एकच – तिने मला लिहायला भाग पाडले का? माझ्यातला कलाकार/लेखिका जागी केली का? सुदैवाने हो! मी पाहिलेल्या जवळपास प्रत्येक पाकिस्तानी मालिकेने मला लिहायला लावले. वाचायला लावले. आणि सुदैव असेही आहे की प्रत्येक मालिका वेगळी होती and each one has set me on a new, different journey! आज मी माझ्या ताज्या प्रवासाबद्दल लिहिणार आहे. मालिका आहे: और जिंदगी बदलती है! लिहिण्याची कारणे: एक लिहावेसे वाटले म्हणून आणि दुसरे म्हणजे हा असा इतका बहुरंगी, बहुढंगी आणि rewarding शोध ह्याआधी मी कधी घेतला नव्हता. त्यामुळे त्याची सविस्तर नोंद करावीशी वाटली. शिवाय ज्या उत्कटतेने आज मला ह्या सगळ्या गोष्टी जाणवत आहेत, काही काळाने ती उत्कटता नाहीशी होईल. मला ती उत्कटता शब्दांत धरून ठेवायची आहे.
ह्या प्रवासात सोबती तीन - मैं, मेरी तनहाई और internet! जादूच्या पेटाऱ्याप्रमाणे माझ्यापुढे माहितीचा खजिना खुला करणाऱ्या ह्या internet ला पहिलं नमन! कारण त्याशिवाय काहीच शक्य झालं नसतं! हा प्रवास कसा सुरु झाला आणि कुठे गेला हे मी जसं घडलं तसं लिहिणार आहे. आपण गप्पा मारत असताना मधेच कधीतरी त्यांचा माग काढला तर मजेशीर वाटतं. पटापट विषयांचे सांधे बदलत आपण आजचा बदलता भारत वरून भेंडीच्या भाजीत कमी पडलेली चिंच यावर कसे येऊन पोचतो हे बघायला मजा येते. हा माझा प्रवास देखिल असाच झाला आहे! कोळ्याच्या जाळ्यासारखा!
तर जिंदगी गुलजार है या मालिकेत फवाद खानचं काम खूप आवडलं होतं. म्हणून मग त्याने काम केलेल्या मालिकांचा शोध सुरु झाला. अजून एक नाव पक्कं लक्षात राहिलं ते होतं सुलताना सिद्दीक्की. पाकिस्तानच्या अनुभवी (veteran) निर्माती/दिग्दर्शिका. या शोधात फवाद खानची एक सुंदर टेलिफिल्म पाहिली, बेहद नावाची. त्यात सापडली नादिया जमील! एक सुंदर अभिनेत्री, चाळीशीतल्या single mom ची भूमिका करणारी. तिचा शोध घेताना लक्षात आलं की तिने याआधी खूप काम केलंय. त्यातून सापडली – और जिंदगी बदलती है! २००० साली पी टीव्ही वर आलेली १३ भागांची मालिका. दिग्दर्शिका मेहरीन जब्बार आणि निर्माती सुलताना सिद्दिकी!
लाख व्हिडीओ की एक दुवा अर्थात युट्युबवर ह्या मालिकेचे सगळे भाग सापडले! एकीकडे thanksgiving च्या सुटीचे वेध लागलेच होते! त्यामुळे बिनधास्त मालिका बघायला घेतली आणि त्यात पार गुंतून गेले! आधी पाहिलेल्या पाकिस्तानी मालिकांमुळे उर्दूशी परिचय होताच पण ह्या मालिकेने एक नवा आश्चर्याचा धक्का दिला! ८०% मालिका चक्कं स्पेनमध्ये घडते! २००० साली स्पेन मध्ये मालिकेचं शूटिंग? Just as a side reference, २००० साली आपल्याकडे “क्यूंकी सांस भी कभी बहू थी” ही पहिली पीळ मालिका सुरु झाली होती. Anyway, दुसऱ्याच भागात जेव्हा मालिका माद्रिदमध्ये पोहोचली तेव्हा मी उत्सुकतेपोटी पाकिस्तान आणि स्पेनचे आंतरराष्ट्रीय संबंध गुगलून पाहिले! No surprise, ते नेहमीच मधुर राहिले आहेत. आणि याची मुळे स्पेनच्या इतिहासात आहेत. त्याबद्दल पुढे येईलच. हम्म, म्हणजे ह्या आपल्या शेजारी राष्ट्राबद्दल आपली माहिती कमी आणि गैरसमज जास्ती अशीच परिस्थिती आहे!
I almost binge watched और जिंदगी बदलती है! और जिंदगी बदलती है च्या शेवटच्या भागाचा शेवटचा सीन! ओह! संपली?? इथे संपली? अजून एक भाग राहिला तर नाही? अशीच reaction होती माझी! ही गोष्ट म्हणजे मी आत्तापर्यंत पाहिलेल्या सगळ्या पाकिस्तानी मालिकांचा USP म्हणायला हवा! आपल्याकडच्या निर्बुद्ध मालिका आणि चित्रपटांनी आपल्याला happy ending पाहण्याची सवय लावली आहे – आणि ते सर्व (ओढूनताणून आणलेल्या) सुखाने नांदू लागले. पिरिएड! अंत में सबकुछ ठीक हो जाता है और अगर सब ठीक नहीं है तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! पण खऱ्या आयुष्याच्या कहाणीत हे असं नसतं. अनेक गोष्टी राहून जातात, माणसं प्रश्न मागे सोडून जातात, नाती एका वळणावर (खुबसुरत मोडपर) येऊन संपतात (तुटत नाहीत)! ह्या अपूर्णतेची एक गोडी असते. खूपशा पाकिस्तानी मालिकांमध्ये सीन पूर्ण होण्याआधीच संपतो! अजून महत्वाचं असं काहीतरी बोलणं राहिलं आहे अशा वेळी! मग? पुढे काय होतं? काही वेळा पुढच्या भागात/सीनमध्ये उत्तरं मिळतात आणि काही वेळा, गा. जा. भ.! याची सवय नसते आपल्याला! म्हणून सुरुवातीला विचित्र वाटतं! पण एकदा यातली गम्मत कळली की मज्जा येते! तुम्ही कल्पना करू लागता आणि नकळत अधिक गुंतत जाता मालिकेत! ह्या अशा रिकाम्या जागा चांगल्या पुस्तकांमध्ये पण असतात. आणि त्या जेव्हा मालिकेत असतात तेव्हा पुस्तक वाचल्याचा आनंद मिळतो!
आत्ता लिहिताना मला हे जाणवतंय की हा शोध इतका ताजा आहे तरी मला कळत नाहीये की काही गोष्टी ह्या मला नेमक्या कधी कळल्या, जाणवल्या? आणि मी हे सगळं काय कसं आणि किती लिहू! (इथे मला धूप किनारे ह्या क्लासिक पाकिस्तानी मालिकेमधला माझा अत्यंत आवडता डायलॉग आठवतोय! “अच्छा लगने लगा है? हां, होता ये है के बहोत सी चीजें गैरमेहसूस तौर पे हमारे करीब आ जाती है| कोई एहसास भी नहीं होता| और जब पता चलता है तब हम बहोत involve हो चुके होते हैं!” – डॉ. एहमर) आयुष्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा असतात की आपण त्यात कधी आणि कसे गुंतत जातो हे मागे वळून बघताना समजत नाही! उदा. प्रेम, मैत्री! आज माझ्या ज्या घट्ट मैत्रिणी आहेत त्यांच्याशी इतकी अशी घट्ट मैत्री कधी आणि कशी झाली? It’s a very gradual process. तो असा एक क्षण नसतो! और जिंदगी बदलती है! मला अशीच हळूहळू उलगडत गेली! पहिल्यांदा पाहून संपवली ती केवळ कथेची उत्सुकता म्हणून! त्यावेळी बाकीच्या गोष्टी खुणावीत होत्या पण त्यापेक्षा कथा सगळ्यात महत्वाची वाटत होती.
और जिंदगी बदलती है! पाहून संपली. पण मला जाणवत होतं की ह्यातून मला अजून बरंच काही मिळवायचं आहे. शिकायचं आहे. बरेचसे संदर्भ कळले नव्हते. एका चांगल्या दर्जेदार कलाकृतीचं एक वैशिष्ट्य हेही असतं की it carries a lot of naunces, lot of layers to it. आणि मालिका, सिनेमासारख्या दृक्श्राव्य माध्यमात तर अशा खुपच गोष्टी असतात ज्यांच्यामागे काही विचार असतो, कारण असते, निराळा अर्थ दडलेला असतो. अगदी हिरोच्या शर्टाच्या रंगापासून ते एखाद्या सीनमध्ये background ला असणाऱ्या चित्रामध्ये, गाण्यामध्ये, संवादामध्ये अनेक जागा पेरलेल्या असतात. तुम्ही डोळसपणे ऐकू/पाहू लागलात की त्या दिसायला लागतात. मग ती गोष्ट आपल्याला अधिक उमजू लागते. मी जेव्हा और जिंदगी बदलती है! पुन्हा पहायला लागले तेव्हा मला अशा अनेक जागा सापडल्या. बरेच संदर्भ जे मला अगोदर माहिती नव्हते ते मी शोधून काढले. एकलव्यासारखी शोधत शिकले! उर्दू, spanish भाषेतल्या शब्दांचे, गाण्यांचे, कवितांचे अर्थ, इतिहास, भूगोल, चित्रकार, चित्रकला खूप काही. I felt like Alice in Wonderland! ह्या सगळ्या शोधात मला एक कळलं की ह्या जगात माहिती (information) असतेच पण माहितीची जाणीव झाली की त्याचं ज्ञानात रुपांतर होतं! ह्या गेल्या काही दिवसांतल्या शोधाने मला खूप काही दिलं आहे. आयुष्यात पहिल्यांदाच असा शोध घेतला मी. And I can not explain how happy it has made me! I hate spoilers! त्यामुळे मी गोष्ट किंवा पात्र ह्यांच्याबद्दल कोणतेही डीटेल्स देणार नाहीये ज्याने मालिकेतला रस कमी होईल. उलट माझी इच्छा अशी आहे की ही मालिका प्रत्येकाने पहावी आणि ती पाहताना ह्या सगळ्या माहितीने मालिकेचा अधिक चांगला आस्वाद घेता यावा! तर पेश है और जिंदगी बदलती है! चे अनेक शोध!
मालिकेतली एक protagonist Univeristy of Madrid मध्ये history of art शिकवते आणि ती तिच्या कामासाठी स्पेनच्या Andalusia भागात जाते. ह्या संपूर्ण भागाचं फार सुंदर चित्रण मालिकेत केलं आहे. I knew almost nothing about history and geography of Spain! त्या दोन्हीविषयी अधिक वाचताना कळलं की Andalusia हा स्पेनचा एक मोठा आणि स्वतंत्र/स्वायत्त भाग (autonomous region) आहे. कोणे एके काळी ह्या भागावर मुसलमानांची राजवट होती आणि ह्या भागाला इस्लामिक स्पेन म्हणूनही ओळखले जाते. अर्थात इथल्या भाषेवर, संस्कृतीवर मुसलमानी/अरेबिक संस्कार आहेत (तरीच पाक- स्पेन मधुर संबंध). ह्या भागात बांधल्या गेलेल्या अनेक वास्तूंना आता world heritage site चा दर्जा प्राप्त झाला आहे.जगभरातून लाखो पर्यटक इथे भेट द्यायला येतात. स्पेनची राजधानी माद्रिद शहर हे स्पेनच्या मध्यवर्ती भागात आहे. Prado (Museo del Prado) हे जगातील सर्वोत्तम संग्रहालय माद्रिद येथे आहे. ह्या संग्रहालयात मुख्यत्वे गोया (Fransisco De Goya) ह्या spanish चित्रकाराची चित्रे आहेत. त्यातील French revolution आणि duchess of Alba ची चित्रे सगळ्यांत प्रसिद्ध आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ मालिकेत पात्रांच्या तोंडी येत राहतात. ह्या रसिकतेचे मला फार कौतुक वाटले! मालिकेतल्या protagonist ला एक इतिहासाची प्राध्यापिका बनवून त्याद्वारे प्रेक्षकांची अभिरुची वाढवण्याचा प्रयत्न फार स्तुत्य आहे! आणि हे कुठेही जाणवत नाही किंवा बोअर होत नाही हे विशेष!
मालिकेतल्या दुसऱ्या एका पात्राला उर्दू गझल, साहित्य संगीत ह्याची फार आवड आहे. एकूणच ह्या मालिकेतली पात्र साहित्य, संगीत,कला यांची जाण असलेली, आदर करणारी आहेत. आणि केवळ उर्दू साहित्य नाही तर spanish साहित्यदेखिल! (आपल्याला जाणीव नसते पण spanish ही जगात अनेक देशांत बोलली जाणारी भाषा आहे. विशेषतः अमेरिका खंडात, दक्षिण अमेरिकी देशांत.) आणि त्या दोन्हीचे संदर्भ जागोजागी येत राहतात! प्रसिद्ध उर्दू कवी मुहम्मद इक्बाल यांना Andalusia मधली प्रसिद्ध मशीद पाहून स्फुरलेली एक दीर्घ कविता आहे the mosque of Cordoba म्हणून. त्यात त्यांनी ह्या मशिदीच्या (आता त्या जागी कथीड्रल उभे आहे) सौंदर्याचं, इस्लाम धर्माच्या वैशिष्ट्यांचं वर्णन केलं आहे. ही कविता एक classic मानली जाते. आणि spanish साहित्याचं म्हणाल तर मला नेरुदा हे नाव फक्त ऐकून माहिती होतं. पण त्यांना साहित्याचं नोबेल मिळालं आहे आणि त्यांच्या प्रेमकविता इतक्या सुंदर आहेत हे माहितीच नव्हतं! हे सगळे संदर्भ कळल्यावर त्या संवादांना अधिक अर्थ प्राप्त होतो!
ह्या मालिकेचं पार्श्वसंगीत देखिल खूप संदर्भ घेऊन येतं! काही वेळा अतिशय चपखल अर्थाची गझल वाजते. उदा. ढूँढोगे अगर मुल्को मुल्को! या शिवाय बरेच spanish गाण्यांचे tracks आहेत पण त्यातले दोन मुख्य म्हणजे Buena Vista Social Club चं Dos Gardenias आणि Armik चं Alone with you! ह्या दोन्ही वरून मी ह्या दोघांची बाकीची सगळी गाणी शोधून काढली! शिवाय बाकीची गाणी देखिल सुरेख आहेत. मला ह्यातल्या कोणत्याच गाण्यांविषयी माहिती नव्हती. पण एका लाडवावरून अख्ख्या मिठाईच्या दुकानाचा पत्ता सापडावा असं झालं! आणि आता spanish चा एक शब्द न कळता मी Buena Vista Social Club मोठी fan झाले आहे! ह्या क्लब मागे देखिल मोठा इतिहास आहे ज्यात आत्ता मी शिरत नाही! Armik तर काय spanish guitar वाजवतो! पूर्ण instrumental. संगीताला भाषेचं बंधन नसतं हेच खरं! Armik चा Alone with you track मालिकेच्या शेवटी शेवटी एके ठिकाणी जेव्हा वाजतो ना तेव्हा त्याचा अर्थ लक्षात येऊन “आई गं!” असं होतं!! It means a lot at that point!
ही मालिका खूप मेहनत घेऊन बनवली आहे. बरेचदा एखादी गोष्ट पुन्हा पाहताना त्यातल्या त्रुटी लक्षात येतात. पण और जिंदगी बदलती है! ची पटकथा इतकी गोळीबंद आहे की कोणतीच गोष्ट खटकत नाही! सुरेख संवाद आणि प्रेमात पडावं अशा सगळ्या व्यक्तिरेखा! सगळे कलाकार आपली भूमिका अक्षरशः जगले आहेत! इतके ते खरे वाटतात. They all have very different nature but the kind of sophistication, finess and emotional maurity they all display is phenomenal! सगळे नेहमी बरोबरच वागतात असं नाही. चुकतात, एकमेकांशी भांडतात पण कुठेही अतार्किक वागत नाहीत. आपल्या स्वभावानुसार, नैसर्गिक वागतात. उगीच गैरसमजाचे धुके पांघरून, ओढूनताणून आणलेल्या situations निर्माण करत नाहीत. समोरासमोर आल्यावर जाब विचारून मोकळे होतात. प्रत्येकाचं दुसऱ्याशी एक प्रेमाचं, जिव्हाळ्याचं उत्कट असं नातं आहे. आणि खऱ्या नात्यांत असंच घडत ना बरेचदा! प्रेमाची माणसं,नाती खूप चिवट असतात. मालिकेतले काही प्रसंग तर इतक्या उच्च दर्जाच्या EQ ने हाताळले आहेत ना त्याला तोडच नाही! सलाम! लेखिका आणि दिग्दर्शिका दोघींनाही! अवांतर: पाकिस्तानी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बहुतांशी स्त्रियांचंच राज्य आहे!
मला camera, shots, angle हे असं सगळं technical समजत नाही आणि शिवाय युट्युबवर उपलब्ध असलेली मालिकेची प्रिंट देखिल मधेमधे दगा देते. पण एवढं नक्की जाणवतं की सगळ्या गोष्टी कलात्मकतेने चित्रित केल्या आहेत. आणि हो उत्कृष्ट निर्मितीमूल्ये! माद्रिद आणि तोलेदो (Toredo) शहराचं सौंदर्य, Andalusia च्या वास्तूंची भव्यता आणि कलाकारांच्या चेहऱ्यावरच्या भावना दाखवणारे close ups आणि still shots सगळ्यांवर घेतलेली मेहनत कळून येते! ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलताय त्या व्यक्तीकडे पाठ करून आणि कॅमेराकडे तोंड करून म्हटलेले निर्बुद्ध संवाद कुठेही नाहीत. कित्येकदा तर कलाकार अख्या सीनमध्ये कॅमेराकडे बघत देखिल नाहीत! हा finess आपल्या मालिकांमध्ये कधी येणार बरे?
फलश्रुती:
१. खयाली पुलाव: मालिका बघताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. एका चांगल्या पटकथेपेक्षाही ज्या गोष्टीने मला भुरळ घातली ती होती याआधी न पाहिलेली संस्कृती आणि life style!. Pakistani immigrants staying in Spain हा premiseच खूप नाविन्यपूर्ण होता. आपल्या देशात तर कितीतरी वेगवेगळया संस्कृती, भाषा एकत्र नांदतात आणि आता तर बरीच सरमिसळ होत असते. ह्या अशा पार्श्वभूमीवर कितीतरी छान पटकथा रचता येतील. वेगवेगळी नाती दाखवता येतील. एक बंगाल मध्ये राहणारं मराठी कुटुंब आणि त्यांचे बंगाली शेजारी! किंवा मराठी आई आणि पंजाबी बाबांची एक मुलगी शिकायला राजस्थानला जाते तिथे तिला एक मराठी रूममेट भेटते. किती दिवस आपल्या मराठी मालिका सासू-सून-जावई-नवरा-बायको- ऑफिस –बॉस ह्या दुष्टचक्रात अडकून पडणार? अशा intercultural, interlinguistic scripts करता येणार नाहीत का? दुसरी गोष्ट जी मला बऱ्याच पाकिस्तानी मालिकांमध्ये आढळली ती म्हणजे रसिकता आणि उच्च साहित्यिक अभिरुची. मालिकेसाठी खास बनवलेली गाणी किंवा पार्श्वसंगीत म्हणून वापरलेली गाणी आणि पात्रांच्या तोंडी उर्दू साहित्याचे संदर्भ! It shows that the person behind the screen has a very elite taste in literature. समजा आपल्या मालिकेत एखादे बंगाली पात्र दाखवले तर त्यातून बंगाली भाषेची, टागोरांच्या कवितांची, रविंद्रसंगीताची ओळख होईल! हे असे वेगळ्या वाटेवरचे प्रयोग व्हायला हवेत!
२. My musings: A great piece of art always inspires you to dream! Now I am dreaming of waking up in Madrid one day and walking down to Prado! And yes, I have already decided to learn Udru! मुझे उर्दू की बाकायदा तालीम हासिल करनी है! इन्शाल्ला!
Finally found a link with a "little better" video quality playlist! Here it is http://www.desidramas.com/category/dramas/hum-tv/aur-zindagi-badalti-hai...
छान लेख! नक्की बघणार ही
छान लेख! नक्की बघणार ही मालिका!
.
.
जिज्ञासा , खुपच सुंदर लेखन,
जिज्ञासा , खुपच सुंदर लेखन, या मालिकाच इतक्या सुंदर आहेत की कुणीही नाट्यप्रेमी रसिक यांच्या प्रेमात पडेल. कलाकारांचा अतिशय साधेपणा, थोडक्यात मालिका संपविणे, त्यांचे नैसर्गिक दिसणारे चेहरे, हावभाव सर्वच अगदी मन मोहुन टाकणारं. मुख्य म्हणजे केकता कपुरच्या सीरीयल्स प्रमाणे काही घटना घडल्यावर ते एकेका चेहर्यावर ३-३ वेळा फोकस मारणे ह्याचा नामोनिशान सुद्धा या मालिकेत आढळत नाही. भारतीय सीरीयल्स प्रमाणे गरज नसताना भारंभार कलाकार भरजरी कपडे घालुन फक्त उभे ठेवले जात नाहीत. जितक्या पात्रांची ज्या ज्या सीनसाठी गरज आहे तितकेच कलाकार दिसतात.
जिंदगी गुलझार है! , हमसफर,
जिंदगी गुलझार है! , हमसफर, आईना दुल्हनका, थकन, मस्ताना माहि, काश मैं तेरी बेटी न होती.!!!!!!!!!!!!ग्रेट मालिका.
भारतीय सीरीयल्स प्रमाणे गरज
भारतीय सीरीयल्स प्रमाणे गरज नसताना भारंभार कलाकार भरजरी कपडे घालुन फक्त उभे ठेवले जात नाहीत. जितक्या पात्रांची ज्या ज्या सीनसाठी गरज आहे तितकेच कलाकार दिसतात.>>>>>>>>>>>>>>१००००+ अनुमोदन
काल-परवा वीकांताला ही मालिका
काल-परवा वीकांताला ही मालिका बघून संपवली. छान वाटलं बघायला. इथे मालिकेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! स्पेनचं शूटींग फार छान केलय पण तूनळी वरच्या प्रिंटवर बघायला काही मजा नाही. अर्थात मी काही तुझ्याएवढा बाकी होमवर्क काही केला नाही पण एक छान वेगळी मालिका बघायला मिळाली हे खरं!
मालिका सुंदर असेलच पण तू ज्या
मालिका सुंदर असेलच पण तू ज्या उत्कटतेने लिहिलंयस त्याला तोड नाही.
एखादी कलाकृती पाहून इतकं भारावून जायला होत असेल तर नक्कीच ती कलाकृती उत्तम असेल.
आत्तापर्यंत एकही पाकिस्तानी मालिका पाहिली नाहीये पण आता ही मालिका पहावी अशी उत्सुकता वाटतेय.
तू ज्या उत्कटतेने लिहिलंयस
तू ज्या उत्कटतेने लिहिलंयस त्याला तोड नाही. >> +१
आता पाहून संपवली. धन्यवाद एक
आता पाहून संपवली. धन्यवाद एक खूप छान मालिका सुचविल्याबद्दल. आणि लिखाण तर वा म्हणूनच तर मालिका बघाविशी वाटली ना.
साती, सहमत. जिज्ञासा, तुम्ही
साती, सहमत.
जिज्ञासा, तुम्ही इतकं सुरेख लिहिलंय .माबोवरून(कविताच्या धाग्यामुळे) या मालिका पहाण्याची उत्सुकता होती. .नंतर व्यसनात रुपांतर होऊ लागतेय.हमसफर ठीक होती.बेहद टेलिफिल्म फार छान होती .त्या नायिकेने सुरेख काम केलेय.त्यानंतर जिंदगी गुलजार पाहिली ,पण रटाळ वाटली. दास्तान पाहिली.छान होती.
हमसफर आणि जिंदगी गुलझार है
हमसफर आणि जिंदगी गुलझार है नंतर कोनती पाकिस्तानी टीव्ही सिरियल बघावी विचारच करत होते. आता ही बघीन नक्की.
एकदा पूर्ण रविवारचा दिवस
एकदा पूर्ण रविवारचा दिवस 'जिंदगी गुलजार है' होती, मी विचार केला की चला सलग पूर्ण बघूया पण खूप स्लो वाटली मला. बोअर झाले मी आणि दुपारी बाहेर जाणे पसंत केले.
हमसफर आवडली त्यात मध्ये काही एपिसोड मुद्दाम बघायचे टाळले होते.
जिज्ञासा लेख मात्र सुरेख,
जिज्ञासा लेख मात्र सुरेख, ओघवता आहे.
अरे वा! छान वाटतंय सगळे
अरे वा! छान वाटतंय सगळे प्रतिसाद वाचून! सगळ्यांचे आभार!
रायगड, हर्मायनी तुम्हाला मालिका आवडली हे वाचून आनंद झाला! माझ्या लेखाचा एक उद्देश पूर्ण झाला! युट्युब वरच्या भागांची quality फार चांगली नाहीये. जर पुढे मागे जिंदगी ने ही सिरीयल दाखवली तर फार छान होईल!
ह्या शोधांमध्ये एक महत्वाचा शोध राहीला! दिग्दर्शिका: मेहरीन जब्बार! तिच्या बाकीच्या मालिका बघते आहे. त्याही छान आहेत. She has covered a wide range of topics! आणि औ.जिं.ब.है ची टीम तिच्या बऱ्याच मालिकांतून दिसते!
जिज्ञासा, मेहरीन जब्बार ची
जिज्ञासा, मेहरीन जब्बार ची कहानियाँ बघितलीस का? ती बघायचा विचार आहे. हो, सर्व टीम इतरही मालिकांमध्ये आहे असं दिसतय. औ.जिं.ब.है मध्ये नादिया जमिल चं काम मला खूपच आवडलं - खूपच संयमित आणि नैसर्गिक अभिनय!
जिज्ञासा.... टीव्ही
जिज्ञासा....
टीव्ही चॅनेल्सवरील एखाद्या मालिकेविषयी चांगले लिहायचे असे मनी आल्यावर ते किती उत्तमरितीने सादर करता येते याबाबत तुमचा हा लेख उत्कृष्ट उदाहरण ठरेल...नव्हे, ते आहेच. लेखातील भाषा केवळ ओघवती नसून त्यामध्ये मालिकेविषयीची आत्मियता पूरेपूर उतरली आहे. एखाद्या कथानकाची पूर्तता १३ भागांमध्येच करायची ही प्रथा खूप चांगली असल्याने ती बंदिस्त तर होतेच शिवाय दिग्दर्शकाला फाफटपसारा मांडण्याची बिलकुल संधी मिळत नाही, किंबहुना गरजही भासत नाही.
"...और जिंदगी बदलती है! पाहून संपली. पण मला जाणवत होतं की ह्यातून मला अजून बरंच काही मिळवायचं आहे. शिकायचं आहे....." तुमच्या लेखातील ही कबुली फार आवडली मला. सामंजस्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अधिकाधिक पातळीवर करायची असेल तर अशा मालिकांमधून निघणार्या सारापासून खूप काही शिकायला मिळते.
रायगड, मी काही भाग बघितले
रायगड, मी काही भाग बघितले कहानियाँचे. प्रत्येक भागात वेगळी स्टोरी. जे बघितले ते आवडले आहेत सो फार!
नादिया जमील माझी अत्यंत आवडती अभिनेत्री झाली आहे! What a fine actor and a serious learner!
http://www.dawn.com/news/1082748
जिज्ञासा.. छान लिहिलंय...
जिज्ञासा.. छान लिहिलंय...
मस्त लिहीलयस़ गुलजार है आणि
मस्त लिहीलयस़
गुलजार है आणि हमसफर खूप आवडत्या मालिका. ही बघण्याचा प्रयत्न केला पण प्रिंट खूप खराब आहे यू ट्यूबची. चांगली आली तर नक्की बघेन.
अशोक मामा, तुमच्या
अशोक मामा, तुमच्या अभिप्रायाबद्दल खास धन्यवाद
चैत्राली, चिवा धन्यवाद!
चिवा, वर जी लिंक आहे त्यावरचे व्हिडिओ बघणेबल आहेत. प्रिंट खराब आहे पण it is good enough to understand and appreciate the serial. जमलं तर नक्की बघ!
जिद्न्यासा, तुझा हेवा वाटतोय!
जिद्न्यासा, तुझा हेवा वाटतोय! सुंदर लिहीले आहेस.
जिज्ञासा छान लिहिलंस. मी
जिज्ञासा छान लिहिलंस. मी टीव्ही बफ् नाही. पण चान्स मिळाला तर जिन्दगी बघते.
तू उल्लेखल्या बर्याच कारणांसाठी. अगदी खूपश्या सीरियलात दाखवलेली ती घरं..........आपल्याकडच्या पूर्वीच्या घरांना असायचे तसे अंगणाबाहेर मोठ्ठे दिंडी दरवाजे. फक्त यांचे पत्र्याचे/अॅक्रेलिक...........आपले ला़कडी. छान साधी पण मोठी घरं.
बायकांचे साधे किंवा प्रसंगानुरूप पण सुंदर कपडे. संयत अभिनय.
एक वेगळ्याच प्रकारचं कल्चर ........आपल्या शेजारी राष्ट्राचं.........पहायला मिळतं.
बहुतेक सिरियलात घरातल्या घरातच मुलामुलींचे विवाह जमवण्यासाठीची चाललेली इन्टरेस्टिन्ग धडपड .
खाला आणि आपा यांच्यातली खलबंतं!
आणि अधून मधून होणारं कराची, इस्लामाबादचं दर्शन.
मस्त लेख. आपल्याकडे अशा
मस्त लेख. आपल्याकडे अशा मालिका कधी येतील ते देवापरमेश्वरालाच माहित.
किती सुंदर आणि ओघवते लिहीले
किती सुंदर आणि ओघवते लिहीले आहेस!! मालिका पाहायची उत्सुकता निर्माण झाली आहे पण मला उर्दू कळणं अवघड वाटते आहे.. पण एकदा पाहू बघते.
तू ज्या उत्कटतेने लिहिलंयस त्याला तोड नाही. >> +११११
आशुडी, नंदिनी,
आशुडी, नंदिनी, धन्यवाद!
आपल्याकडे अशा मालिका कधी येतील ते देवापरमेश्वरालाच माहित.>> खरंय! किमान प्रादेशिक वाहिन्यांनी तरी हे दैनंदिन मालिकांचं ओझं झुगारून नवीन प्रयोग केले पाहिजेत. एक स्लॉट ठेवला रोज २६/५२ भागांच्या मालिकांसाठी तरी खूप आहे. प्रतिमा कुलकर्णी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की त्या मालिकांपासून दूर गेल्या कारण डेली सोप्स. We are driving away all the talent and also making talented people do stupid stuff! दुसऱ्या दिवशी रद्दीत जाईल असा एपिसोड बनवला जातो. कारण तसा बनवण्यावाचून पर्याय नाहीये.
मानुषी, अगदी करेक्ट वर्णन! आणि उर्दू भाषा! It literally grows on you!
बस्के, नक्की बघ! AZBH is not high on Urdu. Urdu, English, Spanish सगळ्या भाषा आहेत त्यात! आणि संदर्भाने सगळ्याचे अर्थ लागतात!
पाहिली. आवडली..
पाहिली. आवडली..
तू लिहिलंस म्हणून पाहिली. धन्यवाद गं..
चिवा, धन्यवाद इथे आवर्जून
चिवा, धन्यवाद इथे आवर्जून कळवण्यासाठी
किती सुरेख लेख जिज्ञासा!
किती सुरेख लेख जिज्ञासा! अजूनही ह्या सिरीयल युट्यूब वर असतील का बघायला पाहिजे, मी पाकिस्तानी सिरीयल मध्ये फक्त धुपकिनारे च बघितली आहे कॅसेट मिळवून बरेच वर्षापूर्वी.
धन्यवाद धनुडी!
धन्यवाद धनुडी!
नाही ना! आत्ता सध्या तरी युट्यूबवर ही मालिका कुठेही सापडत नाहीये मला. मेहरीन जब्बारच्या युट्यूब चॅनलवर मी विनंतीवजा कॉमेंट लिहीली आहे एक ही मालिका अपलोड करण्यासाठी. बघूया, कधी अपलोड झाली तर इथे नक्की लिंक देईन.
युट्युबवर हमसफर आहे. मी
मस्त लिहीलंय.
युट्युबवर हमसफर आहे. मी बघितली ह्याच आठवड्यात, पंधराव्या एपिसोडपासून. मला ते आधीचं बघायचं नव्हतंच. मी टीव्हीवर पण स्किप केलेले ते आरोप, जुदाई भाग. एकतर तेव्हा आपली दिवाळी होती त्यात सॅड ट्रॅक, त्यामुळे काही दिवस हमसफर त्यावेळी बंद ठेवलेली. आता खुप दिवसांनी फवाद माहीरासाठी हमसफर परत बघावीशी वाटत होती.
युट्युबवर सगळे एपिसोडस आहेत, मला ती मुलीसाठी त्याला भेटायला येते तेव्हापासून बघायचे होते. त्यामुळे१५ व्या एपिसोडस पासून बघितले.
शेवटच्या भागाचे डायलॉग्ज सॉलिड आहेत, फवादचा अभिनय जबरदस्त. माहीराला जास्त रडण्याचंच काम आहे, ते तिने जबरदस्त केलंय. फार गोड दिसतात दोघे एकत्र.
अजून कुठला दोघांचा एकत्र प्रोजेक्ट आहे का जि. पेअर हवी त्यांची मात्र.
जिंदगी गुलजार है प्रचंड स्लो वाटली. ती जोडीही आवडली पण एकदा रविवारी दिवसभर ती मालिका दाखवली, विचार केला बघुया. बोअर झाले मी, नाही बघु शकले. हमसफर बेस्ट वाटली मला, फ्लो छान आहे.
शेवटचा पॅरा रीपिट झाला, मी मागे इथे कमेंट लिहीलेली, विसरुन गेले.