द नंबर यू हॅव डायल्ड......

Submitted by बेफ़िकीर on 14 December, 2014 - 15:30

बिलासपूरच्या कोकच्या फ्रॅन्चायझीमध्ये आमच्या कंपनीचा स्टोरेज टँक इन्स्टॉल आणि कमिशन झाला आणि आजवर ज्यांच्याकडे ऑर्डर्सची भीक मागावी लागायची त्यांच्याकडे आता आमचाच स्टोरेज टँक लागल्यामुळे पहिली हक्काची ऑर्डर घ्यायला मी बिलासपूरला गेलो होतो. अर्थात, पहिली ऑर्डर हे काही खरे कारण नव्हते. वार्षिक शेड्युलिंग फायनल करणे, लॉजिस्टिक्स तपासणे, पेमेंट टर्म्स अ‍ॅग्री करणे, सी फॉर्म्स इश्यूअन्सचा पॅटर्न ठरवणे, संबंध दृढ करणे, पहिल्या महिन्याची रेंटल्स मिळवणे आणि येताना रायपूर, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद ह्या पट्ट्यातील जमेल तितक्या प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्सना भेटून शेअर ऑफ बिझिनेस वाढवण्याचा दणकून प्रयत्न करणे ही खरी कारणे होती.

नवीन टँक अगदी मस्त दिसत होता. वीस टन्सच्या हॉरि़झाँटल टँकचा चकचकीत सिल्व्हर कलर मागच्या घनगर्द झाडीने नटलेल्या टेकडीच्या पार्श्वभूमीवर हिरव्या विड्यावरील वर्खासारखा वाटत होता. एकुण त्या कोक प्लँटच्या कामगारवर्गातही सळसळ होती काहीतरी बरेच वेगळे व बरेच मोठे घडल्यामुळे! मला अजिबात ओळखत नसलेले तेथील अनेल लोक मला पाहून हात करत होते, हासत होते, ओळखी करून देत होते.

दोन दिवस टिच्चून चर्चा करून मी संध्याकाळच्या गाडीने परत निघणार होतो. चर्चा यशस्वी झालेली होती. सीझनमध्ये महिन्याला साठ टन्स आणि ऑफ सीझनमध्ये महिन्याला तीस टन सी ओ २ लागणार होता. आधीच इंजिनिअरिंग अ‍ॅप्लिकेशनपेक्षा बेव्हरेज सेगमेंटमध्ये प्राईस जवळपास चार रुपयांनी अधिक असायची. त्यात परत हा प्लँट कोकचा ओन प्लँट नसून फ्रँचायझी असल्यामुळे त्यावरही आम्हाला प्राईस दिड रुपयांनी जास्त मिळाली होती. आणि कळस म्हणजे स्टोरेज आमचे असल्यामुळे त्याचे भाडे वगैरे अ‍ॅग्री झालेले असूनही पुन्हा प्राईसमध्ये आम्ही आठ आणे जास्त मागीतलेले होते तेही मिळाले होते. एरवी त्याकाळी जेमतेम चार रुपये किलो दराने जाणारे प्रॉडक्ट ह्या प्लँटला दहा रुपयांनी विकले जाणार होते. हे सगळे मी व्हर्बली एच ओ ला कळवून वाहवाही मिळवलेली होती. मात्र परतताना मला रायपूर, नागपूर वगैरेला फाटा द्यावा लागणार होता कारण पुण्यात काहीतरी अर्जन्सी उपटलेली होती. पण एखादा दिवसच असा येतो जो तुमच्यावर सुखे उधळतो.

तीन वाजता मी त्या प्लँटमध्येच असताना मला आमच्या बी यू हेडचा साक्षात फोन आला. माझ्या बॉसचा बॉस! मी घाबरलेलो होतो. ह्यांनी लक्ष घालावे असे आपण काय दिव्य नुकतेच केले असेल हे मला आठवत नव्हते.

"भूषण, आय हॅव लेटर इन फ्रंट ऑफ मी विच सेज डिअर मिस्टर कटककर, द मॅनेजमेन्ट इज प्लीझ्ड टू इन्फॉर्म यू दॅट......"

प्रमोशन! मग घरी आणि मित्रांना फोनाफोनी! त्यातच समजले की पुण्यातील अर्जन्सी निवळली. डोक्यावरचा तो ताणही गेला. संध्याकाळी थेट बिलासपूर स्टेशन गाठले आणि २६ तासात पाच राज्ये पालथी घालून देशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीची सर्वात स्वादिष्ट भेळ करण्यासाठी सुविख्यात असलेल्या गीतांजली सुपरफास्ट एक्स्प्रेसची वाट पाहू लागलो. रिअली सुपरफास्ट! शताब्दी, राजधानी आणि ऑगस्ट क्रांती अश्या सर्व नावाजलेल्या ट्रेन्सनी मी अनेकदा फिरलो, पण गीतांजलीतून पार कलकत्त्यापर्यंत एकदोनदा केलेला आणि नंतर बिलासपूर, रायपूर, बिहार येथपर्यंत अनेकदा केलेला प्रवास आजही अंगावर आणि मनावर रोमांच उभे करतो. काय काळ होता तो! आज सांगायला कमीपणाचे वाटते खरे, पण त्याकाळी ट्रेनमध्ये स्मोकिंग अलाऊड असायचे. एसी डब्याचे दार उघडून वॉशबेसिन असते त्या पॅसेजमध्ये आले की धूर काढणारे अनेक जण उभे असायचे. डब्याचे मुख्य दार उघडे असायचे. मला त्याकाळी ट्रेनमध्ये रात्री झोपण्यात कमीपणा वाटत असे. मी रात्ररात्र त्या पॅसेजमध्ये उभा असायचो. एकशे चाळीसने जाणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस, दार उघडे, आपण दारापासून लांब आणि हातात तेव्हा ओढायचो ती विल्स! मग पहाटे तीन वगैरे वाजता कोणतेतरी भुक्कड स्टेशन यायचे. कोणीतरी मातीच्या भांड्यातून त्याहीवेळी चहा विकत असायचे. चाळीस पैश्याचा चहा आणि पुन्हा विल्स! भन्नाट वारा! मुक्कामस्थानी जाण्याची प्रतीक्षासुद्धा इतकी सुपरफास्ट आणि स्वातंत्र्यदायी असायची की क्या कहने! दिवसभर राडारोडा करून आडवी झालेली माणसे, बाहेरचे काहीही दिसत नाही आहे, नुसताच चाकांचा खडखडाट, लांबवर कुठेतरी वाजत असलेल्या आपल्याच ट्रेनचा गूढ, खिळवणारा हॉर्न, मधेच एखादे नगण्य स्टेशन डोळ्यासमोरून एखादी माशी उडत जावी तसे उडत मागे जाताना दिसणे, अचानक दुसराच एखादा हॉर्न खूप लांबून केवळ तीन चार क्षणांत जवळ येणे आणि आपण ज्या 'अप' गीतांजलीमध्ये आहोत तिची जुळी बहिण 'गीतांजली डाऊन' भीतीदायकपणे जवळून पास होणे! मुक्कामस्थानी थांबणे म्हणजे प्रवासात असल्यासारखे वाटावे आणि प्रवास म्हणजे मुक्काम वाटावा असे ते दिवस, असे ते वय, असे तेव्हाचे कायदे आणि अशी ती गीतांजली!

दुसर्‍या दिवशी मुंबईत पोचलो आणि एशियाड धरून पुण्यात!

घरात आई वडिलांना आणि देवाला नमस्कार करून बायको आणि फॅमिली फ्रेंड्जबरोबर थेट बाबा'ज गार्डन! प्रमोशन झाल्याचा आनंद ब्लेंडर्स प्राईडमध्ये भिजवून मऊ करून मग ढोसला तेव्हा कुठे आपले प्रमोशन झाले हे लक्षात आले.

विषय संपला!

दुसर्‍या दिवसापासून रहाटगाडगे सुरू! पावणे नऊ वाजता बिलासपूरच्या अग्रवालचा फोन!

"हां कटककरजी, पहूंच गये थे?"

"जी सर, बताईये"

"अरे सुबहसे मै आपको फोन लगारहा हूं, द नंबर यू हॅव डायल्ड आ रहा है"

"बंद करके रख्खा था फोन, जरा सफरसे थक गया था"

"कोई नही, अब पहिला लोड भिजवादीजिये? सीझन तो सामने है?"

"जी जी"

"आज निकलजायेगा?"

"हां निकालदूंगा, एक पीडीसी स्कॅन करके मेल करेंगे?"

"पीडीसी क्यों? ड्रायव्हरके हाथमे थमादेंगे आपका पेमेंट? जितना क्वाँटिटी रिसिव्ह होता है उस हिसाबसे"

"सर वो तो समझादिया ना मैने आपको? अपना अ‍ॅग्रीमेन्ट भी हुवा है ना अब फॉर्मल?"

"चलो भाई आप सक्ती बरतते रहो! पीडीसी किसको आपको मेल करना है, नॉयडा को?"

"मुझेही करदॉजिये सर"

"चलो? करदेते है? कितनेका, डेड लाखका चलेगा?"

"फिलहाल एक सत्तर करदीजिये, अगले लोडमे अ‍ॅडज्स्ट करलेंगे"

"ठीक है, और कुरियर किसको करना है?"

"कुरियर सीधा नॉयडा जानेदीजिये सर, वही डिपॉझिट होगा चेक"

"चलो? लेकिन भेजना जरूर हां! ऐसा न हो के पता चला......"

"नही नही, निकलजायेगा सर"

"कबतक आयेगा?"

"आज निकलेगा शाममे, तो कल, परसो, नरस सुबहे मिलजाना चाहिये"

"यार यही तो दिक्कत है ना! माल लेना तो तुम्हीसे पडेगा! टँक जो तुम लोगोंका है! और माल आते आते चार दिन निकलजायेंगे!"

"सर अब ये सब तो लॉजिस्टिक्समे अ‍ॅग्री होही चुका है ना?"

"हां भैय्या आप तो पहले दिनसे अ‍ॅग्रीमेंटपे उंगली रखके सुनाने शुरू होगये हो"

"ऐसा नही है सर! "

"और ये साडे तीन चार दिनोमें सेफ्टीभी तो खुलेगी? समर चल रह अहै"

"नया टँकर है सर, इन्सुलेशन परफेक्ट है"

"देख लो भैय्या, प्लँट रुक गया तो मजबूरन सिजिलको बोलना पडेगा"

"अरे सर अभी टँक लगनेके बाद पहिला लोड भी नही भेजा हमने और आप सिजिलकी बात कर रहे हो!"

अग्रवालने कसनुसे हसत पण टेन्शनमध्ये फोन ठेवून दिला. माझे डोके सकाळी सकाळी फिरले. च्यायला अजून एक लोड नाही घेतले तर धमक्या सुरू! मी प्लँटला फोन लावायच्या आधी रतनलाल केमिकल्सला फोन लावला. हे रतनलाल केमिकल्स खरे अहमदाबादचे! वेगवेगळ्या इन्डस्ट्रिअल केमिकल्स आणि गॅसेसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, ट्रान्स्पोर्टेशन असे बरेच काही करत असणारे! त्यांचे आमच्या प्लँटपासून २५ किलोमीटरवर म्हणजे जेजुरी येथे एक स्वतःचे लहानसे रिफिलिंग स्टेशन होते. ते मुंबईहून कार्बन डायऑक्षाईड आणून जेजुरीतल्या त्यांच्या टँकमध्ये तो अनलोड करत असत. नंतर त्या टँकपासून लहान लहान सिलिंडर भरून पुण्यात आणि बारामतीला वेल्डिंग करणार्‍यांसाठी तो पाठवत असत. थोडक्यात, ते कार्बन डायऑक्साईडचे डीलर होते आणि आम्ही मॅन्युफॅक्चरर! आम्ही इतक्या जवळ असून ते आमच्याकडून सी ओ २ घेत नव्हते कारण त्यांची एक विचित्र अट होती., त्यांचे स्वतःचे दोन सी ओ २ टँकर्स होते, एक अकरा टनाचा आणि एक साडे सहा टनाचा! त्यांची अट अशी होती की आज त्यांचे टँकर्स ते त्यांच्या स्वतःच्या कामासाठी मुंबईपासून जेजुरी ह्या फिरतीवर ठेवत असल्यामुळे त्या टँकर्सची आयडल कॉस्ट त्यांना पडत नाही आहे. आयडल कॉस्ट म्हणजे इन्शुअरन्स, मेन्टेनन्स आणि ड्रायव्हरचा व क्लीनरचा पगार! त्यांनी आमच्याकडून माल घेतला तर त्यांचे टँकर्स पडून राहतील आणि त्यामुळे त्यांची ओव्हरऑल कॉस्ट वाढेल. आता आम्ही इतके जवळ होतो की त्यांची ट्रान्स्पोर्टेशन कॉस्ट मजबूत कमी होणार होती. पण बिझिनेसचा एक रुल आहे. जो ह्या निसर्गाचाही रूल आहे. 'बळी तो कान पिळी'! आम्हाला ऑर्डर्स हव्या होत्या आणि खरे तर आम्हाला चांगले टँकर्सही हवे होते. बर्‍यापैकी चर्चांच्या फेरी झडल्यानंतर मी दोन अशी अ‍ॅग्रीमेन्ट्स बनवली जी एकमेकांपासून सर्वार्थाने स्वतंत्र होती. एक अ‍ॅग्रीमेन्ट होते त्यांचे टँकर्स आम्ही भाड्याने घेऊन आमच्या मालाची वाहतूक करण्यासाठी वापरायचे व त्याचे त्यांना भाडे द्यायचे. दुसरे अ‍ॅग्रीमेन्ट असे होते की त्यांनी आमचा माल विकत घ्यायचा! ही दोन्ही अ‍ॅग्रीमेन्ट संपूर्ण तपशीलात केली गेली व ती म्युच्युअली अ‍ॅक्सेप्टही झाली. त्यानंतर त्यांचे टँकर्स रोज सकाळी आमच्या गेटबाहेर येऊन हजेरी द्यायचे. आम्ही सांगितले की कोल्हापूरला माल घेऊन जा तर कोल्हापूरला घेऊन जायचे. मुंबईला तर मुंबईला! हैदराबादला तर हैदराबादला! पण रतनलालना स्वतःला माल हवा असेल तर मात्र ते त्यांच्याच टँकरमधून आमच्याकडून माल भरून घेऊन आधी जेजुरीला तो अनलोड करून पुन्हा रिकामा टँकर ट्रीपसाठी आमच्याकडे पाठवून देत. त्यांच्या स्वतःकडेच माल अनलोड करण्यासाठी जर त्यांचा टँकर वापरण्यात आला तर त्याचे भाडे अर्थातच आम्ही त्यांना देणे लागत नसू!

तर अशी ही अ‍ॅग्रीमेन्ट्स सुरळीत चालू असताना नवनवे प्रकार होऊ लागले, जे अगदीच अनपेक्षित नसले तरी इतक्या लगेच होतील असे वाटले नव्हते. आम्हाला अनेक गोष्टी अपेक्षित होत्याच, पण त्यावर आमच्याकडे सोल्यूशन्सही होती, जसे, समजा रतनलालचा एक टँकर आम्ही भरला आणि आमच्या कोल्हापूरच्या कस्टमरला पाठवला तर रतनलालचा ड्रायव्हर कोल्हापूरला आम्ही किती रेटने माल विकला हे रतनलालच्या साहेबांना सांगणारच हे आम्हालाही अपेक्षित होते. पुढे कधीतरी काही कारणाने संबंध ताणले गेले तर हे रतनलालवाले आपल्याला बायपास करून आपल्याच कस्टमर्सना जाऊन ऑफर्स देतील हेही मी जाणून होतो. पण त्या गोष्टीला आत्तापासून घाबरण्याचे कारण नव्हते. शेवटी आम्ही मॅन्युफॅक्चररर्स होतो आणि ते डीलर! दुसरे म्हणजे पेमेंट्स! आमच्या मालचे पेमेंट आम्हाला अ‍ॅडव्हान्समध्ये मिळेल असे अ‍ॅग्री झालेले होते आणि त्यांच्या टँकरचे भाडे आम्ही त्यांना तीस दिवसांनी द्यायचे असे अ‍ॅग्री झालेले होते. जर काही कारणाने नॉयडाहून त्यांचा भाड्यासाठीचा चेक यायला थोडा वेळ लागला तर ते लगेच इथे मालाचे पेमेंट थांबवतील अशी मला भीती होती. पण त्यावर मी करडी नजर ठेवणार होतो. तिसरे म्हणजे ट्रानस्पोर्टेशन हा असा व्यवसाय आहे ज्यात कोण कधी खरे बोलतोय आणि कधी खोटे बोलतोय हे समजत नाही. म्हणजे, जर रतनलालने आम्हाला खोटे सांगितले असते की दोन्ही टँकर पुढचे तीन दिवस मेन्टेनन्समध्ये आहेत तर आम्ही ते खोटे असल्याचे सिद्ध करू शकलो नसतो. ते टँकर रस्त्यात चालताना दिसले असते तर ते लोक असे म्हणू शकले असते की ते गॅरेजला चालले आहेत. त्यांच्या प्लँटमध्येच उभे दिसले तर ते म्हणाले असते की कोणतेतरी पार्ट्स यायचे आहेत म्हणून थांबले आहेत. एवढे करून रतनलालचा पुण्यातला हेड काणे अगदी खरे बोलला तरीही जर कुठेतरी हायवेवरून ड्रायव्हरच खोटे बोलत असला तर कोणीच काही करू शकत नसे.

काणे!

एक नंबरचा हरामखोर माणूस! दुसरा शब्द नाही. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक सिच्युएशनमध्ये फक्त स्वतःचे महत्व वाढवून ठेवणे आणि आपल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही हे सतत प्रत्येकावर ठसवत राहणे हे हा माणूस मन लावून करत असे. त्याचा दुराभिमान इतका पराकोटीला पोचला होता की ज्या कंपनीचा तो पगार घेत असे त्या कंपनीचे कामही त्याला स्वतःच्या अस्तित्त्वापेक्षा कमी वाटत होते. फक्त आणि फक्त हेडऑफीस, म्हणजे अहमदाबादला बसणारा त्याचा बॉस शहा आणि कंपनीचे एम डी, श्री. मेहता ह्यांच्याशिवाय कोणालाही तो जुमानत नसे. ह्याशिवाय दुसरे म्हणजे वरकमाईमध्ये त्याला दिलचस्पी होती, पण 'गळ्यात जानवं आहे, असल्या गोष्टी काणे करत नाही' हे स्वतःच सांगत फिरायचा. तो दिवसातून किमान पन्नासवेळा स्वतःचाच उल्लेख काणे असा करत असे. तिसरे आणि महत्वाचे म्हणजे हेरगिरी करत राहणे! कोणाची गाडी कुठून कुठे गेली, का गेली, आपल्या कंपनीसाठी किंवा आपल्यासाठी त्यातून काय साध्य करता येईल असे तो सतत बघत राहायचा. कोणालाही भेटताना त्याचा पहिला हेतू स्वतःच्या कंपनीपेक्षाही स्वतःचे महत्व ठसवणे, आहेत ती इक्वेशन्स स्पॉईल करून ठेवणे आणि जमल्यास काहीतरी पदरात पाडून घेणे हे तो करत असे.

कंपनीमध्ये अशी माणसे अनेकदा असतात. हेरगिरी अनेकजण करतात, तो एक भागच असतो बिझिनेसचा! स्वतःचे महत्वही सगळेच वाढवतात, अनेकदा त्याचा उपयोग कंपनीलाच होतो. अनेकजण असेही असतात जे थोडी वरकमाई मिळते का ते बघतात. पण काणेने सर्व मर्यादा ओलांडलेल्या होत्या, तिसरी सोडून! वरकमाईच्या बाबतीत तो जे करत असे ते पूर्ण दक्षपणे करत असे. डोळ्यावर येईल असे काहीही करत नसे. पण हेरगिरी आणि आत्मस्तुती इतकी करत असे की त्याच्याशी डील करणे म्हणजे आपण एखाद्या रणांगणात धोरणी सेनापती म्हणून उतरलो असल्यासारखे समोरच्याला वाटू लागायचे. जगात काही चांगले लोक, चांगले हेतू असणारे उद्योगधंदे, चांगले वागू पाहणारी व्यवस्थापने असू शकतात हे जणू तो विसरूनच गेलेला होता. काणेशी डील करणे म्हणजे काहीतरी विचित्र सेटिंग्ज किंवा विचित्र अंडरस्टँडिग्ज करून धंदा करावा लागेल असेच पहिल्या भेटीपासून वाटत असे आणि अश्या प्रकारच्या कोणत्याही अंडरस्टँडिग्जना आमच्या हजारो कोटींची अजस्त्र उलाढाल असलेल्या कंपनीत काहीही स्थान नव्हते.

बिलासपूरची ऑर्डर मला मिळण्याच्या अगोदर सुमारे वर्षभरापासून आमचे आणि रतनलालचे दुहेरी काँट्रॅक्ट अस्तित्तात होते आणि तितक्याच कालावधीत माझे काणेशी अनेकदा वाजलेले होते. आमच्या मालाचे पैसे ते वेळेवर देत नव्हते. हे भांडणाचे पहिले कारण होते. आम्ही नॉयडाहून त्यांच्या टॅकरच्या भाड्याचा चेक रिलीज करण्यापूर्वीच ते त्यांचे भाडे ते आम्हाला देणे लागत असलेल्या मालाच्या पैशांमधून वळते केल्याच्या अकाउंटिंग एन्ट्रीज करत होते. हे भांडणाचे दुसरे कारण होते. रोज उठून अकाऊंट्स रिकन्साईल करण्याचा तगादा लावण्याचा मला वैताग आला होता. हे दुहेरी कंत्राट लवकरात लवकर संपावे अशीच इच्छा मला होत होती. मी अगदीच पेटून उठलो तर तीन लाखाच्या समोर एक-सव्वा लाखाचा चेक देऊन पुन्हा तेवढ्या रकमेचा माल उचलायला ते घाई करायचे. त्यावर ठाम नकार दिला की टँकरची सर्व्हिस लगेच बिघडायची.

कंपनी जितकी मोठी असते तितक्या तिच्यात प्रोसीजरल हॅझार्ड्स असतात. आमच्या कंपनीला छत्तीस लाख रुपये खर्च करून स्वतःसाठी दोन नवे टॅंकर्स बनवून घेणे अवघड नव्हते. खरे तर आमच्याकडे असलेल्या पाच टँकर्सपैकी तीन आमचेच होते आणि दोन रतनलालचे! पण कंपनी मोठी असली की सतरा ठिकाणाहून अ‍ॅप्रूव्हल्स आवश्यक होतात आणि प्रत्येकजण त्यात स्वतःच्या डोक्यानुसार ताशेरे झाडतो. शेवटी प्रस्ताव कुठेतरी अडकतो. कोणी असेही म्हणतो की बाजारात भाड्याने मिळणारे टँकर्स घ्या की! आम्ही तेच केलेले होते. पण ह्या दुहेरी कंत्राटाचे दुहेरी फायदे आम्ही व रतनलाल ह्या दोघांनाही मिळण्याऐवजी फक्त रतनलालवाले ते फायदे उपटू पाहात होते. काहीजणांची नीयतच खराब असते तसे झाले होते ते! बरं कंपनी तर चक्क लिमिटेड कंपनी होती ती!

तर बिलासपूरची पहिली ऑर्डर मिळाली आणि ती प्लँटला कळवण्याआधी मी रतनलालच्या काणेला कळवणे रास्त मानले कारण टँकर त्वरीत मिळणे अत्यावश्यक होते. काही प्रॉडक्ट्स अशी असतात की प्रॉडक्टच्या गुणवत्तेपेक्षा किंवा किंमतीपेक्षाही लॉजिस्टिक्सच अधिक महत्वाची ठरू शकतात. टँकरच आला नाही तर बिलासपूरला काय पाठवणार! बरं आमच्या टँकर्सपैकी एखादा पाठवणे शक्य नव्हते की नॅशनल पर्मिट्समधून मिळणारी सर्व पाचच्या पाच राज्यांची परमिट्स महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरातची घेतलेली होती. छत्तीसगडचे परमिट रतनलालकडे होते.

काणेला फोन लावला तर...... द नंबर यू हॅव डायल्ड......!!!!!!

आपल्याला हे जाणवत नाही, पण अनेकदा फोन ही जितकी मोठी सुविधा असते त्यापेक्षाही मोठा न्यूसन्स असतो तो! पाहिजे त्या माणसाशी संपर्कच होऊ न शकणे हा मनस्तापदायक प्रकार असतो आणि नको ती माणसे नको त्या वेळी आपल्याला संपर्क करणे हा त्याहून मोठा मनस्तापदायक प्रकार असतो.

त्या सकाळी पावणे नऊ ते साडे नऊ ह्या अवधीत काणेला केलेले चारही कॉल्स आणि दोनही टेक्स्ट मेसेजेस व्यर्थ गेले. तो कव्हरेजमध्येच नव्हता. मात्र त्याच अवधीत मला सिटिबँक, रिलायन्स, कोणत्यातरी रेकॉर्डेड अनाऊन्समेन्ट्स असले अत्यंत अनावश्यक असे अनेक कॉल्स आले.

शेवटी मी प्लँटला फोन लावून प्रॉडक्टची कोकसठी सुटेबिलिटी चेक केली. सुदैवाने त्यादिवशीचे सँपल व्यवस्थित आलेले होते. कोक बिलासपूरसाठी 'टँकर' हा एक भाग बाजूला ठेवून आवश्यक असलेले उरलेले सर्व सेटिंग करण्यात माझा दिड तास गेला. ह्यात प्लँटला इमेल, नॉयडाला इमेल, बिलासपूरच्या पीडीसीचा स्कॅन नॉयडाला फॉरवर्ड करणे, डी ओ बनवून घेणे हे सगळे प्रकार आले.

आता फक्त एकदाचा टँकर आला की तो भरून निघणार! एरवी सकाळी पावणे आठला रांगेत उभा असणारा टँकर आज स्वतःहून तर आलाच नव्हता, पण त्या ड्रायव्हरचाही मोबाईल नंबर लागत नव्हता. शेवटी मी हिय्या करून मनाची तयारी केली. काही कारणाने आज टँकर आलाच नाही तर सरळ बिलासपूरला एक व्यवस्थित इमेल करून परिस्थिती सांगायची आणि एक दिवस वाढवून घ्यायचा. शेवटी थातुरमातुर बोलण्यापेक्षा खरे सांगितलेले कोणीही अ‍ॅप्रिशिएट करते. मात्र दरम्यानच्या काळात मी रतनलालच्या काणेला एक इमेल तेवढी पाठवली होती की तुम्ही संपर्कक्षेत्रात नाही आहात आणि आम्हाला त्वरीत टँकर हवा आहे.

काणेंच्या इतर सहकार्‍यांपैकी तिघांचे नंबर्स माझ्याकडे होते. पण तिघेही काणेंच्या संस्कारातच वाढलेले होते. काणेकडून नक्की डायरेक्शन मिळेपर्यंत कोणालाही कसलीही कमिटमेंट द्यायची नाही हे तिघांनाही ज्ञात असल्यामुळे तिघेही मला अगदी नम्रपणे पण धूर्तपणे पत्ता लागू देत नव्हते की टँकर आत्ता ह्या क्षणी आहे कुठे आणि काणे आत्ता ह्या क्षणी आहे कुठे!

शेवटी वैतागून मी काणेच्या अहमदाबादला बसणार्‍या बॉसला, शहाला फोन केला. त्याला विशेष गांभीर्य समजले नसले तरी एक खूप मोठी ट्रिप आपल्या टँकरला मिळेल ह्याचा आनंद तेवढा झाला आणि 'मी जेजुरी प्लँटला टँकर असला तर पाठवायला सांगतो' असे म्हणून त्याने फोन ठेवला. मी दहा मिनिटांनी पुन्हा जेजुरीला फोन लावला तर तिथली प्यादी आपले तेच रडगाणे गात होती. 'साहेब टँकर पाठवायच्या ऑर्डर्स अहमदाबादहून आलेल्या आहेत, पण टँकर आत्ता एक्झॅक्टली कुठे आहे ते समजलेले नाही आहे".

जगात कित्येकदा अशी परिस्थिती येते. आपल्याला माहीत असते की समोरचा खोटे बोलत आहे. आपल्याला ते माहीत आहे हे त्याला माहीत असते. आणि पुन्हा त्याला ते माहीत आहे हे आपल्याला माहीत असते. अश्या सिच्युएशनमध्ये कोणी कधी फसू नये. चक्क तोंडावर आरोप करता येत नाही कारण सगळेच बिनसायची शक्यता असते आणि धड रागावर नियंत्रणही ठेवता येत नाही.

द नंबर यू हॅव डायल्ड!

ह्या रेकॉर्डचा मला इतका तिटकारा त्या आधी कधीही आलेला नव्हता.

आणि अचानक काणेचा फोन आला. तोच नेहमीचा आवाज, ज्यात मला माझ्या कंपनीत झाट कोणी हात लावू शकत नाही ही उद्दामपणा खुल्लेआम डोकावत असे आणि प्रत्येक वाक्य असे की समोरच्याची चिडचिडच व्हावी. टोन कायम विचित्र सर्कॅस्टिक आणि उगाचच आक्रमक! व्यावसायिक विश्वात चांगले संवाद होऊ शकतात हे माहीतच नसल्यासारखा आवेश कायमचा!

"बोला साहेब, आज काणेची सारखी आठवण काढताय कळलं! पार शहासाहेबांचा फोन आला होता, म्हणाले कटककरने ऑर्डर सोडली आहे टँकर पाठवायची"

"तुम्ही होतात कुठे काणे?"

"बनेश्वरला गेलो होतो. माणसाला पर्सनल लाईफ असतेच की काहीतरी! तिथेनेमकी रेंज नाही."

"बरं आता ७२७० अर्जंटली पाठवा प्लँटला, मोठी ट्रिप आहे"

"कुठे जायचंय?"

"बिलासपूर"

"बिलासपूरला टँकर कसा जाईल साहेब आज?"

माझ्या मेंदूतून पहिली चमक निघाली. काणेसमोर बोकड कापावा लागणार उगाचच! स्वतःची लाल झाल्याशिवाय दुसर्‍याची काळीही न म्हणणारी जात!

"का?"

"एवढ्या मोठ्या ट्रिपला ड्रायव्हरकडे दहा हजार अ‍ॅडव्हान्स द्यावा लागतो, डिझेल भरून द्यावं लागतं चार पाच हजाराचं! भाडं कुठे आलंय तुमच्या हेड ऑफीसहून गेल्या महिन्याचं?"

"काणे, तेच तेच विषय बोलण्यात आपण किती महिने घालवायचे आहेत? आमच्या मालाचे तुमच्याकडे पावणे तीन लाख येणे आहे"

"ते रिकन्साईल कुठे झालंय?"

"अहो रिकन्सिलिएशनने पडला तरी दहा वीस हजाराचा फरक पडणार ना?"

"ते सगळं बघायला लागेल"

"ते सगळं बघायला लागेल म्हणजे? आज बिलासपूरची ट्रीप आलीय आणि आता हिशोबाला बसायचंय का काणे?"

"साहेब तुम्ही फार प्रेशर टाकता हे बरोबर नाही बरं का?"

"प्रेशर काय टाकतो काणे? सिंपल गोष्ट आहे. अ‍ॅग्रीमेन्टचा टँकर आहे, तो ट्रीपला मागवतोय, प्रेशर काय?"

"तुम्हाला सगळंच सिंपल आहे हो! दहा हजार कोटीची कंपनी आहे तुमची! इथे आम्हाला लोकांचे पगार करायचे का टँकरला डिझेल द्यायचं हा प्रश्न आहे"

"काणे, मला काहीही समजत नाही आहे. तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे? टँकर मिळेल का नाही मिळणार?"

मी आवाज चढवल्यावर काणेही जरा सटपटला. नक्कीच त्याच्या बॉसने त्याला 'बिलासपूर ट्रीप घालवू नको' असे सांगितलेले असणार! काणे नरमाईने म्हणाला......

"टँकर पाठवतो साहेब मी! पण ह्या ट्रीपनंतर मात्र मला भाड्याचा चेक लागेल. आणि आज आम्हाला एक लोड हवंय ते त्या टँकरमधून आधी द्या, मग तो रिकामा करून परत पाठवतो."

"तुमचं लोड तुमच्या दुसर्‍या टँकरने घ्या ना काणे?"

"दुसरा सहा टनाचा आहे फक्त"

"अहो मग आमचा घ्या मोठा"

"म्हणजे तुम्ही त्याचं भाडं लावणार आम्हाला"

"काणे, तुमचा मोठा टँकर आज बिलासपूरसाठी जर भरणार नसेल तर मी तुम्हाला आज लोड देणार नाही. आणि माझ्या टँकरला पाच हजाराचे स्पेशल परमीट छत्तीसगड बॉर्डरवर काढायला लावून तो पाठवेन"

"मग तसं करा"

हरामखोर काणे उद्गारला!

माझे बी पी अधिकच वाढलेले होते. मी त्या क्षणी वापरू शकत असलेले शेवटचे अस्त्र वापरले.

"मी मेल केली आहे तुम्हाला, कॉपी तुमच्या आणि माझ्या एच ओ ला पण आहे. टँकर येणार आहे का नाही त्याचे मेलवर उत्तर द्या मला"

दोघांनीही फोन काचकन् बंद केले. मी जितक्या शिव्या काणेला मनातल्या मनात दिल्या असतील तितक्याच त्यानेही दिल्या असतील हे मला माहीत होते.

अश्या वेळेसचा मनःशांतीचा हमखास उपाय म्हणून एक विल्स पेटवली आणि एक कटिंग चहा मारला. त्या चहाने पोटातून भगभग सुरू होईपर्यंत काणेच्या एका प्याद्याचा फोन आला.

"साहेब ७२७० पाठवतोय, आम्हाला एक लोड मिळेल का?"

जगात आई बहिणीवरून शिव्या का निर्माण झाल्या असाव्यात ह्याचे उत्तर मला मिळाले.

"नाही मिळणार! टँकर येतोय का नाही ते सांगा"

"नाही टँकर चाललाच आहे साहेब तुमच्याकडे, पण मग आमच्या बारक्या टँकरमध्ये द्या ना आम्हाला लोड"

"ठीक आहे, दोन्ही पाठवा"

"साहेब बारका टँकर नाही का बिलासपूरला पाठवता येणार?"

"पित्रे, तुम्हाला वाटतंय का ते तुमच्या, आमच्या आणि बिलासपूरच्या कंपनीला परवडेल?"

"नाही नाही, विचारलं मी फक्त साहेब"

तोही फोन मी काचकन् बंद केला.

एकदाचा टँकर निघाला हे तरी कन्फर्म झालेले होते.

साध्या साध्या गोष्टींसाठी इतके झुंजावे लागणे हा आपल्याकडचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. देअर इज नो रिस्पेक्ट फॉर द अ‍ॅग्रीमेन्ट, वर्ड ऑर द लिव्हिंग पर्सन्स! अर्धा दिवस जर फक्त एक अ‍ॅग्रीमेन्टमधला टँकर प्लँटकडे वळवण्यात घालवावा लागत असेल तर बिझिनेस डेव्हलपमेन्ट काय घंटा करणार?

तिकडून बिलासपूरवाले डोके फिरवत होतेच अर्ध्या अर्ध्या तासाला! त्यांनाही एकदाचे शांत केले की बाबांनो तुमचा टँकर आज संध्याकाळी ठरल्याप्रमाणे निघेल.

अर्ध्या तासाने प्लँटमधून फोन आला. ७२७० आलाय. म्हंटलं भरा आता तो आणि कोक स्टँडर्डने भरा आणि द्या पाठवून!

ह्या संपूर्ण घटनाक्रमात सर्वाधिक डोके कशामुळे फिरले असेल तर 'द नंबर यू हॅव डायल्ड'ने! माणसे कशी वागणार आहेत ते नंतरचेच, आधी माणसे भेटतच नाही आहेत ह्यामुळे पित्त खवळते त्याचे काय?

पण रामकहाणी तर ह्यानंतरच होणर होती.

एकदाचा संध्याकाळी पावणे सहाला प्लँटमधून फोन आला.

"बिलासपूर बाहेर काढलाय. १०,४०० भरलाय."

"का? अकरा टन बसतं की त्यात?"

"ड्रायव्हर म्हंटला व्हेपर आहे आत"

"व्हेपर आपल्या टँकर्समध्ये नसते का? ड्रायव्हरच्या मर्जीवर कंपनी चालवायचीय का?"

"जाऊदे साहेब, पुन्हा अर्धा टन भरायचा म्हणजे दोन तास जाणार"

"ह्याला काही अर्थ नाही आहे. काढा आता आहे तसा टँकर!"

७२७० नावाचं धूड कंपनीतून बाहेर पडलं! ते डिझेल भरायला आणि अ‍ॅडव्हान्स घ्यायला पुन्हा जेजुरीलाच जाणार होतं! म्हणजे अजून साधारण दिड तासाने ते अ‍ॅक्च्युअली बिलासपूरच्या वाटेला लागेल हे माझ्या लक्षात आलं! दोन तासांनी मी त्या धुडाच्या ड्रायव्हरला मी फोन लावला तर 'द नंबर यू हॅव डायल्ड'!

आता मी सरकलोच. काणेला फोन लावला आणि सांगितलं.

"ड्रायव्हरचा फोन लागत नाही आहे. तो केव्हा कुठे पोचलेला आहे हे मला समजले नाही तर जमायचे नाही"

"बघतो"

काणे प्रथमच सरळ बोलला. काणे सरळ बोलला हे मल जाणवलेसुद्धा नाही इतका मी त्या विचारांत गुंतलेलो होतो. दरम्यान, बिलासपूरला मी टँकर ड्रायव्हरचा मोबाईल नंबर, टँकरचा रजिस्ट्रेशन नंबर, इन्व्हॉइस नंबर आणि क्वाँटिटी एवढी डिटेल्स इमेल केली आणि फोन करूनही कळवली.

एक दिवस! पूर्ण मनस्तापाचा एक दिवस स्मृतीतून ढकलत मी पर्सनल आयुष्याकडे वळलो.

बिलासपूरला असतानाच्या दिवसाने माझ्यावर सुखे उधळली होती. आजच्या दिवसाने मनस्ताप आणि उच्च रक्तदाब दिला होता. उद्या काय होणार होते ह्याचे टेन्शन अंधारात भिरकावून मी झोपी गेलो.

सकाळी उठलो तर बॉसचा फोन! म्हंटलं बोंबललं काहीतरी!

"अरे वो देविंदर है ना, हां गुडमॉर्निंग, वो देविंदर है ना टॅक्सेशनका, वो बाँबे आ रहा है आज! तुम अभी निकलो और शाममे उससे मिलो. वो ट्रेडिंग करना पडा तो प्रोसीजर और टॅक्सेशन कैसे रहेगा समझके लो"

"जी सर"!

बिलासपूर, रतनलाल, काणे आणि ७२७० हे सगळे आता कालचे झाले होते. आजचे प्राधान्य निराळे होते. मी नऊ वाजता बस पकडलीही मुंबईची!

अडीच वाजता बॅलार्ड इस्टेट! अधेमधे काणेला एक दोन फोन केले व विचारले की गाडी कुठे आहे. काणे म्हणाला तोही कशाततरी प्रचंड अर्जन्सीमध्ये फसलेला आहे, पण थोड्या वेळाने सांगेल. गाडी गेलेली आहे म्हंटल्यावर मीही जास्त विचार केला नाही.

देविंदरशी मीटिंग झाली. तपशील बॉसला इमेल केला. साडे सहाला दादरला आलो. एका बारमध्ये गेलो. काही इतर फोन केले. बिलासपूरवाल्यांचे मात्र मोजून चार फोन आले होते दिवसभरात! त्यांना सांगितले की मी प्रवासात होतो आणि संपर्क नव्हता, पण गाडी काल गेलेली आहे आणि परवा सकाळी पोचेल. शेवटी एकदा दिड पेग पोटात गेल्यावर काणेची आठवण आली. काणेला फोन लावला.

'द नंबर यू हॅव डायल्ड'

हातातली पेटलेली विल्स ही विल्स नसून काणेचा देह आहे असे समजून मी ती अ‍ॅश ट्रे मध्ये चिरडली आणि वाढती किक अनुभवत बसून राहिलो.

कधीतरी दहा वाजताची एशियाड घेऊन मध्यरात्री घरी परतलो. सगळे काही विस्मृतीत ढकलून झोपी गेलो. आजचा दिवस प्रवासात गेल्यामुळे विशेष मनस्ताप झाला नव्हता.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो आणि नेहमीच्या कामाला लागलो. आजच्या ऑर्डर्स कोणत्या, स्टॉक किती, टँकर्स कोणकोणते आहेत वगैरे! अचानक बिलासपूरचा फॉलो अप फोन आला. थोड्या वेळात स्टेटस कळवतो असे सांगून मी तो ठेवला आणि काणेला फोन करणार त्याच क्षणी......

काणेचा फोन आला.

"साहेब जरा प्रॉब्लेम झालेला आहे"

मी प्रार्थना केली की हा प्रॉब्लेम बिलासपूरला गेलेल्या ७२७० ला झालेला नसो!

"काय झालं?"

"तुमची गाडी परवा रात्री निघाली, पण आज पहाटे तिला अ‍ॅक्सीडेंट झाला आहे"

"कुठे??????"

"तेच कळत नाहीये कारण मला तिथल्या लोकल पोलिसचा फोन आला होता! कुठेतरी अमरावती-नागपूर्च्या मधे आहे ते ठिकाण"

"काय झालण काय अ‍ॅक्सीडेंट म्हणजे?"

"समोरून ट्रकवाला येऊन धडकला"

"मग?"

"मग काय आता ते सेटल करायला लागेल ना?"

"हो पण म्हणजे काय म्हणायचे काय आहे? गाडी पुढे जातीय का नाही?"

"आता गाडी पुढे नाही पाठवता येणार साहेब! मी ती गाडी सोडवून इकडेच आणतो"

"ड्रायव्हरला काही झालंय का?"

"किरकोळ मुका मार लागलाय"

"पण मग गाडी का नाही पाठवता येणार?"

"गाडी चौकीवर आहे कटककर साहेब! त्या चौकीचा मी इन्स्पेक्टर नाहीये इथून ऑर्डरी सोडायला"

नेहमीचा काणे डोकावला! माझा संताप झाला होता. मी काणेला सांगितले की गाडी पोलिसांतून सोडवून पुढे पाठवा तर म्हणाला लिक्विड सी ओ २ आहे त्यात! स्थानिक लोक घाबरलेले आहेत सेफ्टी उडल्यामुळे. म्हंटलं सेफ्टी कशी उडली, तर म्हणे धडक बसल्यामुळे!

सेफ्टी व्हॉल्व्ह उडला की एका वेळी सुमारे तीनशे किलो लिक्विड हवेत जाते. ज्यांना तो काय प्रकार आहे ते माहीत नसते त्यांच्यात घबराट पसरू शकते. पण समहाऊ मला काणे कधीच विश्वासार्ह वाटलेला नव्हता.

मी भयानक भडकून फोन बंद केला आणि आधी बिलासपूरला कळवले. ते लोक प्रचंड संतापले पण अपघात म्हंटल्यावर काही करता येईना! शेवटी त्यांच्यातील दोघे म्हणाले की आम्ही अपघातस्थळी जाऊन टँकर सोडवता येतो का ते पाहतो, पोलिसांची काय मागणी आहे तेही बघतो.

मी काहीच करू शकत नव्हतो. एक तर हा आमच्या कंपनीचा टँकर नसल्याने पोलिसांकडे मी रिप्रेझेंटेशन करूच शकत नव्हतो. काय होता तो भरवसा आता काणेवरच होता. आता मी काणेला फोन करायचा सपाटा सुरू केला. तिसर्‍या फोनला काणे भडकला. मला म्हणाला

"साहेब तुम्ही फोन करून माझा जो वेळ घेत आहात आणि जे बीपी वाढवत आहात ना? त्यामुळे जायचा असेल तरी टँकर जाणार नाही असे होईल"

मग मी काणेला सुपरडुपर फैलावर घेतला. पार राशनपाणी घेऊन चढलो तर माझ्या सुमारे सहाव्या सातव्या वाक्याला त्याने फोनच आदळून टाकला. मी मेल लिहायला धावलो.

एक मेल बिलासपूरला केली की अपघातामुळे कदाचित टँकर येणार नाही, आम्ही दुसरा टँकर उद्या पाठवू शकू.

दुसरी मेल रतनलालच्या अहमदाबाद ऑफीसला केली की असे असे झाल्यामुळे आम्हाला कस्टमर गमवावा लागेल, तेव्हा युस्शपातळीवर हालचाली करून स्टेट्स समजत राहील आणि टँकर तिथे पोचेल ह्याची व्यवस्था करायला काणेला सांगा. त्याच मेलची कॉपी आमच्या नॉयदा ऑफिसलाही दिली.

आणि लॉग आऊट व्हायला जाणार तर काणेची मेल!

त्याने मेल अ‍ॅड्रेस केलेली होती माझ्या नॉयडाच्या बॉसला आणि कॉपी मला आणि त्याच्या अहमदाबादह्या बॉसला!

मेल काय? तर म्हणे तुमचा पुण्याचा माणूस आम्हाला अतिशय हॅरॅस करत आहे, प्लीज हा माणूस बदला, आम्ही फेड अप झालेलो आहोत.

मी समाधीस्थ बसतात तसा मिनिटभर शांत बसून राहिलो. माझा संताप मनात मावत नव्हता. माझा बॉस त्या मेलकडे ढुंकूनही पाहणार नाही हे मला माहीत होतेच आणि झालेही तेच! पण काणेचे मला आश्चर्य वाटले. स्वतःची चूक झाकण्यासाठी त्याने दुसर्‍या कंपनीतील माणसाल त्याच्या व्यवस्थापनासमोर असे बदनाम करणे हे माणूसकीहीनतेचे आणि अव्यावसायिकतेचे निषेधार्ह लक्षण होते. माझा विश्वासच बसत नव्हता की हा माणूस अशी मेल लिहील. मला माझ्या बॉसने तर साधे एक फोन करूनही विचारले नाही की काणे काय बडबडतोय मूर्खासारखा! पण काणे माझ्या मनातून उतरला तो उतरलाच! अ‍ॅग्रीमेन्ट्स संपायला एखाद अमहिना राहिला असेल. मी निश्चय केला की वाटेल ते झाले तरी अ‍ॅग्रीमेन्ट एक्स्टेंड करायचेच नाही.

जवळपास तासाभराने मी काणेला फोन लावला. कारण टँकरचे स्टेटस समजणे तर अत्यावश्यक होते.

'द नंबर यू हॅव डायल्ड......'

मग मी ७२७० च्या ड्रायव्हरला फोन लावला.

'द नंबर यू हॅव डायल्ड......'

तोंडत येणार्‍या शिव्या आवरत्या घेऊन मी शांत स्वरात बिलासपूरच्या संपर्कात राहिलो. रतनलालच्या जेजुरी प्लँटला फोन करण्यात अर्थ नव्हता, गुरुवार असल्याने आज तिथे सुट्टी असणार होती.

शेवटी मला काहीच फीडबॅक मिळेना तसा मात्र मी भडकलो आणि रतनलालच्या अहमदाबादच्या शहाला उद्देशून मेल लिहिली. कॉपी टू काणे आणि माझा बॉस!

त्यात लिहिले की एक लाख पासष्ट हजार रुपयांचे इन्व्हॉईस घेऊन निघालेला ७२७० हा अ‍ॅग्रीमेन्टमधील टँकर आत्ता नेमका कुठे आहे हे आम्हाला समजलेले नाही. स्थानिक व्यक्तीशी संपर्क होऊ शकत नाही. टँकर बिलासपूरला अजिबात पोचू शकत नाही इतकेच कन्फर्मेशन काणे ह्यांनी सकाळी आम्हाला दिलेले आहे. ह्या सर्व बाबी अत्यंत अस्वीकारार्ह असून आमचा संपूर्ण माल त्याच क्वॉलिटी स्टँडर्डने ताबडतोब आमच्या प्लँटमध्ये येऊन परत द्यावा व सेफ्टी उडालेल्या मालाची किंमत बिलासपूरच्या इन्व्हॉईस रेटने द्यावी. हे पुढील चोवीस तासात झाले नाही तर संपूर्ण एक लाख पासष्ट हजाराची डेबिट नोट आम्ही तुमच्यावरच काढू.

मी हा इमेलचा बाँब टाकला आणि त्याचा साधा आवाजही झाल्याचे मला ऐकू आले नाही सुनसान शांतता! अजूनही काणे आणि ड्रायव्हर 'द नंबर यू हॅव डायल्ड मोडमध्येच! आता तर अहमदाबादचा शहाही त्याच मोडमध्ये गेलेला! माझा रतनलाल ह्या कंपनीवरचा उरलासुरला विश्वास संपला.

मी खरोखरच डेबिट नोट तयार केली. ती सिस्टीममध्ये घेतली नाही, पण कंप्युटराईझ्ड डेबिट नोट इमेल तेवढी केली रतनलालला!

कधीतरी संध्याकाळी काणेचा मला निर्लज्जपणे फोन आला. म्हणे आज दिवसभर मी रेंजमध्ये नव्हतो, टँकर आता परत बोलावला आहे आणि इंदापूरपर्यंत पोचलेला आहे. उद्या आम्ही त्यात असलेला माल आमच्या जेजुरी प्लँटमध्ये अनलोड करून घेतो आणि त्याचे इन्व्हॉईस तुम्ही आमच्यावर रेज करा.

मी थिजलो होतो. टँकर मला न विचारता उलटा आला कसा? उलटा येऊ शकतो तर पुढेच, बिलासपूरलाच का गेला नाही? जेजुरीत किती माल अनलोड करणार? उडालेल्या मालाचा हिशोब काय? जेजुरी आणि बिलासपूरच्या रेट आणि फ्रेटमध्ये असलेल्या प्रचंड तफावतीचे काय? आमच्या अकाऊंटमधून बिलासपूर इन्व्हॉईसची एन्ट्री कशी घालवणार?

मी पुन्हा काणेला तोंडभरून नांवे ठेवून फोन आदळला.

सेल्स रिटर्न ही मोठी प्रोसीजर आहे. त्यात एक्साईजवाले इन्व्हॉल्व्ह्ड होतात. कोणत्याही बिझिनेसमध्ये एक्साईज ही एक हॉरिबल गोष्ट आहे. आणि इथे तर सरळ सरळ गफलाच वाटला असता त्यांना! चांगली दहा रुपये बेसिक प्राईस आणि पाच रुपये फ्रेट असलेले इन्व्हॉईस एकदम कॅन्सल करून रतनलालच्या नावाने रु. ३.९५ प्रती किलोचे फालतू इन्व्हॉईस का बनवले? पुन्हा रतनलालला भाडे लागू होत नाही ते वेगळेच! आणि पुन्हा क्वाँटिटीत तफावत? कोण रिस्क घेणार एक्साईजला उत्तरे देण्याची? त्यामुळे सेल्स रिटर्न अश्या प्रकारच्य अप्रॉडक्ट्समध्ये फक्त क्वॉलिटी ग्राऊंड्सवर करता येत असे, म्हणजे माल रिजेक्ट वगैरेच झाला तर! ही तर तशी केसच नव्हती. कारण माल बिलासपूरला आधी पोचल्याचे सिद्ध करावे लागले असते.

बिलासपूरवाल्यांनी आमच्या हेड ऑफीसकडून रिटन कफर्मेशन घेतले की काही कारणाने आम्ही शेड्यूल पाळू शकलो नाहीत तर ह्या सीझनचे पुढचे तीन महिने आमच्या स्पर्धकाकडून माल घेऊन ते आम्ही दिलेल्या स्टोरेज टँकमध्ये अनलोड करू शकतात. अपमान होता हा खरे तर आमचा! माझा बॉस रतनलालवर भडकला व त्याने शहाला ढोस दिला.

दुसर्‍या दिवशी सकाळीच मी जेजुरीला जायला निघालो. जाताना वाटेत काणे, शहा आणि ७२७० चा ड्रायव्हर हे तिघेही पुन्हा एकदा 'द नंबर यू हॅव डायल्ड' मोडमध्ये होते. पण आता मी जेजुरी प्लँटमध्ये घुसणारच होतो. प्रत्यक्ष काय तो प्रकार बघायचा होता मला!

जेजुरीला पोचलो तर ७२७० मस्तपैकी मागे स्क्रॅपच्या ढिगार्‍यात उभा! कोणी मला भेटायच्या आधी मी टँकरचे निरिक्षण केले तर सेफ्टी व्हॉल्व्ह मोडलेला, बाकी टँकर ठीकठाक!

तेवढ्यात पित्रे प्रकटला. काणेच्या उपस्थितीत हा कटककर नावाचा इसम आपल्याला झेलायला लागणार ह्याचे बर्डन त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट झाले. ते मीच घालवले. मी त्याला म्हणालो की काणे पोचेपर्यंत मी बाहेर जाऊन एक सिगारेट ओढून येतो. त्यावर मात्र अगदी दिलदार चेहरा करून हसून वगैरे 'हो हो, अवश्य साहेब' म्हणाला. कारण त्याचे टेन्शनच गेलेले होते ना?

मी बाहेर आलो आणि समोरच्या टपरीवर गेलो. तो माणूस मला ओळखत असे. मी रतनलालला जायचो तेव्हा त्याच्या टपरीवर हमखास चहा आणि सिगारेट घ्यायचो. तो बिचारा चांगला होता. त्यानेच मला विश वगैरे केले. अचानक माझी ट्यूब पेटली.

मी त्याला म्हणालो......

"काय हो? हा रतनलालचा मोठा टँकर आज किती वाजता परत आला?"

"कुठला?"

"तो आत उभा आहे तो?"

"तो गॅसचा का?"

"हां!"

"काय माहीत"

"तुम्ही किती वाजता दुकान उघडलंत?"

"साडे आठ"

"म्हणजे साडे आठच्या आधीच आलेला असणार"

"कुठला टँकर म्हन्ताय?"

"शर्मा चालवतो तो"

मला ड्रायव्हरचे नांव माहीत होते.

"शर्माचा? शर्माचा टँकर हितंच आहे की परवाधरनं"

माझ्या हातातील कप हिंदकळला, चहा माझ्याच मनगटावर सांडला. मी डोळे विस्फारून म्हणालो......

"काय म्हणालात?"

"७२७० म्हन्ताय ना?"

"हो"

"त्याचंच तर लफडं नाय होय झालं? कुटून माल भरून आलेला होता तो गेटमधून आत घेताना ते वर असं हे नसतं का?"

त्याने सेफ्टी व्हॉल्व्हसारखा आकार हाताने करून दाखवला.

ते पाहून मी म्हणालो......

"हां, सेफ्टी व्हॉल्व्ह"

"हा सेफ्टी सेफ्टी! ते धडकलं की ह्या झाडाला आन् जो माल उडलाय! पार एम आय डी सी हादरली अख्खी! लय वेळ नाटक चाललं होत त्ये! व्हॅनबीन आली डिपार्टमेंटची! आन् मग पब्लिक घाबरलवतं त्यान्ला पांगवलंन्! मग गाडी खाली केली हितं!"

काणे!

मला रिप्लेस करायला माझ्या बॉसला सांगत होता.

त्याक्षणी माझ्यासमोर काणे असता तर मी काय केलं असतं ते मला सांगता येत नाही. टँकर जेजुरीतून बाहेर पडलेलाच नव्हता. ड्रायव्हरच्या चुकीमुळे तिथेच सेफ्टी व्हॉल्व्ह फुटून अर्ध्याहून अधिक माल हवेत गेला होता आणि कसाबसा उरलेला तीन, साडे तीन टन स्वतःच्या टँकमध्ये अनलोड केला होता रतनलालवाल्यांनी!

मी तत्क्षणी तो प्रकार बॉसला सांगितला. रतनलालचे फ्रेट पेमेंट आम्ही ताबडतोब स्टॉप केले. त्याचदिवशी रतनलालच्या एच ओ ला लीगल नोटीस पाठवली आमच्या एच ओ ने!

बरीच वर्षे झाली ह्या घटनेला! मी ती नोकरी सोडूनच आता दोन वर्षे झाली.

नंतर म्हणे दिड एक वर्षांनी काणे आणि शहाचे इतर कश्यावरून तरी वाजले. काणेने राजीनामा नाट्य करून पाहिले तर चक्क त्याचा राजीनामा स्वीकारला गेला. काणेची चरबी उतरली. मला फोन आला होता त्याचा! म्हणाला एक मराठी माणूस म्हणून फोन करतोय, तुमच्या कंपनीत काहीतरी बघता का?

मराठी माणूस! मी हासलो त्याच्या त्या उल्लेखावर! फोन बंद केला.

त्यानंतर आजतागायत मी काणेसाठी 'द नंबर यू हॅव डायल्ड......'ह्याच मोडमध्ये आहे.

=====================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफि
कथा वाचताना आपला (जनरल मायबोली क्राउड) हुन जो वेगळा अनुभव आणि वेगळे विश्व आहे हे हटकुन जाणवते. मनात राहिलेली एक बोच या कथेत छान प्रगट झाली आहे. कथा वाचताना एक शंका आली ती अशी..
त्यादिवशी मॅन्युफॅक्चरिंग मधुन ट्रक निघताना त्यात थोडा कमी लिक्वीड कार्बन डाय ऑक्साइड भरला गेला.
नंतर बरोबर फॅक्टरीच्या दाराशी त्याची सेफ्टी वाल्व उडाली.
हे सर्व झाले हे आपले प्रमोशन झाल्यावर पहिली ऑर्डर भरतानाच
कदाचित या दोन घटनांचा सम्बंध नसेल पण आपल्या ऑफिस मधुन काणेशी हस्तांदोलन करुन कोणी
असे काही केले असेल का?
(जास्त विचार करु नका हल्ली tv वर खुप रहस्य्पट पाहुन मी थोडेशी पॅरेनॉइड झाले असेन, पण तरी सांगितल्या शिवाय राहावले नाही.)
सेल्स मध्ये चढाओढ खुप असते आणि बॅकस्टॅबींग सुद्धा म्हणुनच वाटले की इतक्या सर्व मिस्टेक्स इतरांकडुन का व्हाव्यात. ( बाय द वे इथे एक आमचा मित्र GE चा प्लान्ट मॅनेजर आहे कधी पण त्याच्याकडे गेलो की त्याचा ट्रक कुठे आहे वेदर कसे आहे डिलिवरी कधी हे फोन वर चालु असते. आम्ही त्याला यावरुन सतवायचो पण आता सतावणार नाही.)

माझा व्यावसाइक अनुभव इतक्या परिणामकारकपणे आणि इतक्या सहज शैलीत मला तरी व्यक्त करता येणार नाही म्हणुन कथा खुप आवडली.

@ निलिमा....

"बाय द वे इथे एक आमचा मित्र GE चा प्लान्ट मॅनेजर आहे कधी पण त्याच्याकडे गेलो की त्याचा ट्रक कुठे आहे वेदर कसे आहे डिलिवरी कधी हे फोन वर चालु असते. "

अगदी... असाच अनुभव आणि असेच कामाचे दडपण एकेकाळी भोगलंय...(अनुभवलंय ह्या पेक्षा...खरोखरच भोगलंय)

"आम्ही त्याला यावरुन सतवायचो पण आता सतावणार नाही."...

अजिबात सतावू नका. प्रत्येकाचे कामाचे जग वेगळे असते आणि जबाबदारी पण वेगळी असते. सगळेच तुमच्या सारखे समजूतदार नसतात.

Pages