१९९६ सालची हकीगत आहे. मी कुस्रो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथे विद्युत अभियांत्रिकीच्या पदविकेचा अभ्यासक्रम शिकत होतो. शेवटचे सत्र सुरू होते आणि आम्हाला एक विषय निवडून त्यावर सेमिनार सादर करावयाचा होता. त्या काळी ओव्हर हेड प्रोजेक्टर वर स्लाईडस दाखविण्याची पद्धत होती. याकरिता ट्रान्स्परंट शीट (पॉलिथिन पासून बनलेल्या) विकत घेऊन त्यावर फोटोकॉपी करून घ्याव्या लागत. याकरिता ट्रान्स्परंट शीट चे १० रुपये आणि त्यावर फोटोकॉपी करावयाचे ३ रुपये असा प्रति शीट १३ रुपये खर्च येत होता. सेमिनार अहवाल (रिपोर्ट) संगणकावर टंकलिखित करून तो मुद्रित करण्याचा खर्च देखील प्रति पान १० रुपये इतका होता. याशिवाय नंतर ही पाने गोल्डन एंबॉसिंग सह बाईंडिंग करावयाचा खर्च १०० रुपये अथवा अधिक असायचा. अर्थात महाविद्यालयाकडून यापैकी कुठल्याही बाबीची सक्ती नव्हतीच. आपला सेमिनार प्रभावी व्हावा तसेच त्याचा अहवाल देखील आकर्षक दिसावा म्हणून जवळपास सर्वच विद्यार्थी स्वतःच हौसेने इतका खर्च करीत असत. काही जण तर ओव्हर हेड प्रोजेक्टर ऐवजी नव्यानेच आलेले इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्टर भाड्याने आणत व त्यावर स्थिरचित्रे तसेच चलचित्रे देखील दाखवीत.
माझी इतका खर्च करण्याची ऐपतही नव्हती आणि पसंतीदेखील नव्हती. मी विषय निवडला - टेलिव्हिजन. त्याकरिता १८५ रुपयांचे गुलाटींचे पुस्तक विकत घेतले. दूरचित्रवाणी केंद्रावरून प्रसारण कसे होते आणि आपल्या कडील संचात त्याचे ग्रहण कसे होते याचा मुळातूनच अभ्यास केला. स्वतः समजून घेतला म्हणजे तो विषय इतरांसमोर चांगल्या पद्धतीने मांडता येतो. त्यानंतर एकही स्लाइड न बनविता केवळ फूटपट्टी व स्केचपेन्स च्या साहाय्याने काढलेली साध्या कागदावरील तीन रंगीत रेखाचित्रे समोर ठेवून मी सेमिनार सादर केला. इतर विद्यार्थ्यांच्या सेमिनार मध्ये ओ एच पी स्लाईडस चा प्रचंड प्रमाणात वापर होता. शिवाय त्यांच्या कॉम्प्युटर टाईप्ड - इंक जेट प्रिंटेड - गोल्डन एंबॉस्ड बाईंडिंग केलेल्या अहवालासमोर माझा स्वतःच्या हातांनी फॅसिट टाइपराइटरवर टाईप केलेला आणि ट्रान्स्परंट क्लिप फाइलमध्ये लावलेला अहवाल देखील साधा दिसत होता. शिवाय मी कागद देखील इतरांप्रमाणे एक्झिक्युटिव्ह बॉण्ड न वापरता साधेच कॉपी पॉवर वाले वापरले होते. असे असूनही आमच्या परीक्षकांना माझा सेमिनार व अहवाल प्रभावी नाही तरी परिणामकारक वाटला. ६० विद्यार्थ्यांच्या वर्गात मला त्यांनी सर्वात जास्त गुण दिले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणून मला रुपये अडीचशे रोख मिळालेत. अहवाल टंकलेखन आणि गुलाटींच्या पुस्तकाची किंमत असा मी केलेला सर्व खर्च (जो इतर विद्यार्थ्यांनी केलेल्या खर्चाच्या तुलनेत नगण्य होता) वसूल झाला.
हा साधेपणा माझ्यात कुठून आला? तर शालेय पाठ्यपुस्तकांतून १ली ते ७ वी च्या भाषा विषयांत साध्या कथा व लेख असत. तरीही ते समजण्याकरिता त्या सोबत चित्रे दिलेली असत. आठवी पासून कुमारभारती च्या पुस्तकांत आशयघन वैचारिक लेख तसेच विचारप्रवर्तक कथा असत. परंतु त्यांच्या पुष्ट्यर्थ कुठेही चित्रे दिलेली नसत कारण अशा दर्जेदार लिखाणाला अशा कुठल्याही बाह्य आधाराची गरज नसायची, मजकूरच पुरेसा परिणामकारक असे.
हा साधेपणा कुठे हरवत चालला आहे. कलाकृतींच्या प्रदर्शनात साधेपणा असेल तर त्या प्रभावी वाटत नाहीत असे अनेकांना वाटते. परंतु हे समजून घ्यायला हवे की कलाकृती प्रभावी हवी की परिणामकारक? अनेकदा एखाद्या वक्त्याचे मोठे एखाद्या विषयावर आलंकारिक भाषेत मोठे प्रभावी भाषण होते पण त्याचा परिणाम काय होतो? लोक त्याला चांगला हशा व टाळ्यांचा प्रतिसाद देतात पण त्या भाषणातील विचार किती अमलात आणतात? करोडो रुपये खर्चून चित्रपट बनविले जातात, पण कथेतला आशय लोकांवर किती परिणाम करतो? विनोदी चित्रपट व उपग्रह वाहिन्यांवरच्या कॉमेडी सर्कशी पाहताना तर हे फारच जाणवते. विनोद करताना त्यांना कसरती कराव्या लागतात तरी पुन्हा मागून नकली हसू ऐकवावे लागते. जर विनोदी संवाद आहे तर प्रेक्षक हसतीलच ना? त्यांना हसा असे सुचविण्यासाठी नकली हसू भरायची गरज का लागते? तसेच टाळ्यांचे. गिव्ह हिम / हर अ बिग हॅंड हे वाक्य तर रिअलिटी शो मध्ये अनेक वेळा ऐकू येते. अरेच्च्या! कौतुकास्पद करामत असेल तर आपणहूनच टाळ्या वाजतील, मागणी का करावी लागतेय?
शाळेत असताना एक विनोद वाचलेला आठवतोय - एक विद्यार्थिनी चित्र काढते आणि शिक्षिकेला तपासण्यासाठी देते. शिक्षिका विचारतात, कसलं चित्र आहे? विद्यार्थिनी म्हणते - हत्तीचं. शिक्षिका उत्तरता - मग तसं बाजूला लिही ना की हे हत्तीचं चित्र आहे म्हणून. मला कसं कळणार ते कसलं चित्र आहे? थोडक्यात काय जर तुमची कलाकृती काय आहे, कशाबद्दल आहे हे रसिकांपर्यंत पोचवायला ती असमर्थ ठरत असेल तर तिला बाहेरून अशी वेगळी लेबले लावावी लागतात. करोडो खर्चून चित्रपट बनवायचा, वर त्यातून आम्ही काय संदेश देतोय, तो किती चांगला आहे हे सांगायला देशातल्या विविध शहरांत त्याचे प्रमोशन करत फिरायचे हे कशासाठी? चित्रपट बघितल्यावर कळेलच ना तो कसला संदेश देतोय ते? त्याकरिता स्पॉटबॉयपासून निर्मात्यापर्यंत झाडून सर्वांनी मुलाखती देत का सुटायचे?
सध्या झी जिंदगी वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या साध्या परंतु आशयघन मालिका पाहताना आपल्या देशी कलाकृतींमधला फोलपणा प्रकर्षाने जाणवू लागलाय. खोट्या डामडौलाच्या प्रभावातून बाहेर येऊन अशा कुठल्याही बाह्य आधाराशिवाय आंतरिक साधेपणातील परिणामकारकता आपल्या देशातले कलाकार (खरेतर कलेचे सादरकर्ते व्यावसायिक) कधी समजून घेणार?
दिखावेका जमाना है भाई! मीही
दिखावेका जमाना है भाई! मीही त्याच कॉलेजमधून ८८ साली यांत्रिकी अभियांत्रिकीची पदविका पूर्ण केली. तेव्हा 'लेसर' ह्या विषयावर मी सेमिनारसाठी लेख लिहिला होता आणि तो चक्क स्वतः लिहिलेला होता. मीही एक चित्र स्वतःच ड्रॉईंग बोर्डवर काढून ते एक्स्प्लेन केले होते. चांगले गुण मिळाले होते. वाडियातील तेव्हाचे शिक्षकही साधेसुधे असत बिचारे! मात्र पुढे अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यावर सगळे विश्वच बदलले. मुंबई, दिल्लीची कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली अतीश्रीमंत मुले, त्यांची वाहने, सवयी, वस्तू ह्या सर्वांमुळे न्यूनगंड झपाट्याने आला. साधेपणा त्यागावा लागला. खर्च वाढला. डिग्रीचा प्रोजेक्ट खर्चिक झाला. तुमचा लेख वाचल्यावर सगळे आठवले व वाटले की खरंच त्या खर्चाची आवश्यकता नव्हती.
विनोदांना कृत्रिम हासणे, गिव्ह हिम अ बिग हँडचा अतिरेक ह्या सगळ्याचा उबग आलेला आहे. इतकेच काय, विनोदासाठी असलेले शोज आता मुळीच विनोदी वाटत नाहीत.
लेख किंचितसाच विस्कळीत वाटला पण भावनांशी सहमत!
सर्वत्र भडकपणाने गुणवत्तेची जागा घेतल्यासारखे वाटत आहे आता!
अश्या कित्येक गोष्टी आहेत. भेटल्यावरचे एकमेकांना केले जाणारे अभिवादन, चेहर्यावरील भाव, अती व्यावसायिकता, हे सगळेच तद्दन दिखाऊ वाटते आहे.
<< मीही त्याच कॉलेजमधून ८८
<< मीही त्याच कॉलेजमधून ८८ साली यांत्रिकी अभियांत्रिकीची पदविका पूर्ण केली. >>
समकालीन नसलो तरी आपण एकाच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत हे जाणून आनंद झाला. क्या जमाना था वह? मी तीन महिन्याचा रु.९३/- चा (अक्षरी रुपये त्र्याण्णव फक्त) रेल्वेपास काढून आकूर्डी रेल्वे स्थानकावरून पुणे जंक्शनपर्यंत प्रवास करीत असे. म्हणजे दिवसाचा जाऊन येऊन प्रवास खर्च फक्त १ रुपया.
आता आमच्या शेजारी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील आणि पिंपरी चिंचवड ही महाविद्यालये आहेत. विद्यार्थी एक तर भाड्याने सदनिका घेतात आणि पुन्हा फिरण्याकरिता साठ हजार रुपयांच्या फटफट्या आणि इंधनाकरिता खर्च करतात. माझा तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम दहा हजार रुपये महाविद्यालयीन शुल्क आणि पाच हजार रुपये इतर खर्च यातच पूर्ण झाला. आताच्या विद्यार्थ्यांचा तर इतका मासिक खर्च असावा.
<<लेख किंचितसाच विस्कळीत वाटला पण भावनांशी सहमत! >>
अतिशय घाईत लिहीला. इथे एका सन्माननीय सदस्येने मला स्मायलींचा वापर करण्याचा आग्रह केला तसेच
<<२ वर्ष ५० आठवडे झाले तरी एकदाही स्मायली टाकली नाही कम्माल आहे.!! >> मी इतक्या कालावधीत स्मायलींचा वापर न केल्याबद्दल आश्चर्य देखील व्यक्त केले. तेव्हा स्मायलींची गरज काय याचा विचार करता मला जे सूचले ते मी या लेखात लिहीले आहे.
सहमत आहे चेतन
सहमत आहे चेतन गुगळे!
(माझ्यावेळी तर एका वर्षाची फी फक्त ७६३ रुपते होती. असो).
खासकरून विनोदांसंदर्भात!
टीव्हीवर जे कार्यक्रम विनोदी कार्यक्रम म्हणून प्रक्षेपित होतात त्यात कपिल शर्माच्या कार्यक्रमांसारखे काही कार्यक्रम ठळकपणे समोर येत राहतात. त्यात अनेक पात्रे पुरुष असून स्त्री वेशात वावरतात. मुळात ह्यात विनोद काय आहे हे समजत नाही. हा बावळटपणा वाटतो. त्यात दादी वगैरेसारखी पात्रे आलेल्या पाहुण्याच्या गालाचे चुंबन घेऊन लिपस्टिकच्या खुणा उमटवून कृत्रिम हशा आणि टाळ्या मिळवतात. हे बीभत्स आहे असे कोणालाच वाटत नाही का? परवा कपिल शर्माने 'हॅपी न्यू इयर'च्या संचाला आमंत्रित केले व मधेच एक प्रश्न विचारला की ह्या चित्रपटात इतके डान्सेस आहेत तर तुम्ही सगळे नाचून घामाघूम होत असाल. मग कोणाचा बॉडी ओडर सर्वात खराब आहे? ह्यावर सिद्धू, प्रेक्षक आणि हॅपी न्यू इयरची सर्व टीम हासली. एकुण किळसवाणेच प्रकार अधिक होताना दिसत आहेत. एकमेकांना फाडकन तोंडात मारणे, स्त्री वेष धारण करणे, किळसवाणे वेष धरण करणे, बीभत्स हालचाली करणे, अती अंगाशी आल्यासारखे करणे, ह्या सगळ्यामध्ये मुळात स्क्रिप्टच फालतू असते. त्यावर काहीच काम झालेले दिसत नाही. हल्ली विनोदांचा गाजणारा प्रकारही वेगळाच आहे. त्यात निव्वळ शाब्दिक कोट्या किंवा थेट वैयक्तीक टीका आहे. विनोदाच्या नावाखाली जजेसची खिल्ली उडवली जाण्याचाही अतिरेक झालेला आहे. कपिल शर्मा प्रेक्षकांच्या शारीरिक व्यंगावरही ताशेरे झाडून हशे मिळवत आहे.
इतकेच काय तर आता अमिताभ बच्चन ग्रेट आहे हे दाखवण्याच्य हव्यासाचाही प्रचंड उबग आलेला आहे. तोही कुठल्याही ऐर्यागैर्यासोबत नाचतो वगैरे!
मायबोलीवर सुरुवातीचा बराच काळ
मायबोलीवर सुरुवातीचा बराच काळ मीही स्मायली वापरत नव्हतो कारण आधी मला काही स्मायलींचे अर्थ माहीत नव्हते, नंतर ते कसे काढायचे ते माहीत नव्हते आणि शेवटी का काढायचे ते कळत नव्हते. नंतर हळूहळू प्रतिसादात स्मायली वापरायला शिकलो आणि आता सर्रास वापरतो. ह्याचे कारण येथे शब्दांचा वापर करून दुसर्याचा अपमान करणे हे विशेष प्रभावी वाटत नसले तर ते काम स्मायलीद्वारे करता येते हे समजले आहे.
मात्र मूळ लेखनाच्या धाग्यात मी स्मायली वापरत नाही, ह्याचे कारण हेच की स्मायली वापरले तरच आपल्या म्हणण्याची दखल घेतली जाईल हे अजब अलिखित गृहीतक अजिबात पटू शकत नाही.
(मराठीचा अभिमान - ह्या लेखाच्या 'फक्त शीर्षकात' मात्र मी जाणीवपूर्वक स्मायलीचा वापर केलेला आहे)
लेख आणि प्रतिसाद दोन्ही
लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.
लेख आणि प्रतिसाद दोन्ही
लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.
प्लस वन
आणि पटलेही ..
चांगला लेख आणि त्यावरचे
चांगला लेख आणि त्यावरचे प्रतिसादही छान. हे कॉमेडी शो म्हणजे खरच अत्याचार असतात..मी जे काही ४-६ वेळा पाहिले त्यावरून मला कपिल शर्मा हा बर्यापैकी हुशार वाटतो मात्र तो तरी रोज उठून कुठून नवे जोक आणणार? स्त्री वेश, गालगुच्चे वगैरे प्रकार खरच किळसवाणे असतात.
धन्यवाद बेफिकीर << ह्याचे
धन्यवाद बेफिकीर
<< ह्याचे कारण येथे शब्दांचा वापर करून दुसर्याचा अपमान करणे हे विशेष प्रभावी वाटत नसले तर ते काम स्मायलीद्वारे करता येते हे समजले आहे. डोळा मारा>>
नेमक्या ह्याच कारणांकरिता मला स्मायली वापरायला आवडत नाही. जर कोणाविषयी काही मतभेद, नाराजी व्यक्त करायची असेल तर ती उघडपणे करावी ना. उगाच अर्जूनाने शिखंडीच्या पदराआडून भीष्मांवर शरसंधान केले तसा प्रकार स्मायलीआड राहून करून स्वतःवर भित्रेपणाचा शिक्का का मारून घ्यावा? थेट आणि परखडपणे व्यक्त व्हावे.
अमिताभ बच्चन व विनोदी कार्यक्रमांबाबत व्यक्त केलेल्या ताशेर्यांबाबत सहमत.
साती, ऋन्मेssष आणि साकल्य आपलेही आभार.
मी जे काही ४-६ वेळा पाहिले
मी जे काही ४-६ वेळा पाहिले त्यावरून मला कपिल शर्मा हा बर्यापैकी हुशार वाटतो मात्र तो तरी रोज उठून कुठून नवे जोक आणणार?
>>>>>
सहमत आहे, मागणी वाढली दर्जा घसरला. मी फार आधी कॉमेडी सर्कस बघायचो तेव्हा काही निवडक लोकांचेच स्किट बघायचो, तेव्हा हा एक अग्रस्थानी होता. पण त्यानंतर हा सध्याचा त्याचा शो मी कधीच बघत नाही कारण हे वरचेच.
लेखातील स्माईलीबाबत मी
लेखातील स्माईलीबाबत मी त्यादिवशीच एका ठिकाणी प्रतिसादात तशी सूचना केली होती. कारण ते लिखाण हलकेफुलके नर्म विनोदी होते पण त्यात अध्येमध्ये स्माईली जबडा वर खाली करत हसणार्या. अर्थात लेखिकेने सूचनेला मान देत तसा बदलही केला.
प्रतिसादाबाबत मात्र योग्य ठिकाणी स्माईली असाव्यात, खास करून कोणाशी चर्चा करताना वा संवाद साधताना. कारण या इथे समोरच्याला आपले फक्त लिहिलेले शब्द वाचता येतात. आपल्या आवाजाचा टोन आणि चेहर्यावरचे एक्स्प्रेशन्स नाही. त्यामुळे स्माईली अश्यावेळी त्या शब्दांमागील योग्य त्या भावना पोहोचवायचे काम करतात. समोरच्याचे बोलणे योग्य त्या स्पिरीटमध्ये न घेतल्याने गैरसमज होताना पाहिलेत.
बेफिकीर आणि चेतन, दिखाऊगिरीचा
बेफिकीर आणि चेतन,
दिखाऊगिरीचा जमाना आहे हे तुम्हा दोघांचं निरीक्षण समर्पक आहे. दिखाऊ पद्धतीचं सादरीकरण बाजारबाजीसाठी (मार्केटिंग) ठीक आहे. पण अभियांत्रिकी विदामंथनार्थ (सेमिनार) भपका टाळायला हवा. कारण विदामंथनात श्रोत्यांचे लक्ष एकाग्र होणे अभिप्रेत असते. भपक्यामुळे नेमका त्यातच व्यत्यय येतो.
आ.न.,
-गा.पै.
<< विदामंथनात श्रोत्यांचे
<< विदामंथनात श्रोत्यांचे लक्ष एकाग्र होणे अभिप्रेत असते. भपक्यामुळे नेमका त्यातच व्यत्यय येतो. >>
धन्यवाद पैलवान. सहमत आहे.
चेतन जी..सहमत!अन्तर्मुख
चेतन जी..सहमत!अन्तर्मुख करणारा लेख आहे
ही दिखावु गिरी सगळ्या क्षेत्रात घुसली आणि फ़ोफ़वली आहे.
प्रेम व्यक्त करायचय- येता जाता लव्ह यु म्हणा,
राग आला- सतत हेट यु म्हणा
आंनद- धिंगाणा घाला
दुख:- सगळ्या जगाला वेठिस धरा
अनंत गोष्टी आहेत.
आचार, विचार, पोषख, शिक्षण, ..कुठे ही साधे पणा चालत नाही..सगळा कसा भव्या दिव्य म्हणजे शोई हव.
येथे शब्दांचा वापर करून
येथे शब्दांचा वापर करून दुसर्याचा अपमान करणे हे विशेष प्रभावी वाटत नसले तर ते काम स्मायलीद्वारे करता येते हे समजले आहे >>>
धन्यवाद Nira.
धन्यवाद Nira.
सर्वसाधारण विचार कळला. बर्याच
सर्वसाधारण विचार कळला. बर्याच अंशी पटला. काही ठिकाणी देखाव्याची, त्यातून होणार्या परिणामांची गरजही असते. साधेपणा (च) हवा असंही नाही. जिथे ज्याची गरज आहे, तिथे ते केलं तर ते अवाजवी वाटत नाही. जर कृती 'जेन्युईन' असली तर बेगडी वाटत नाही. अकारण भपका जसा भडक वाटतो, तितकच अस्थानी साधेपणा चा अतिरेक (ह्याला काहीतरी पर्यायी शब्द सापडला असता तर बरं झालं असतं) सुद्धा अयोग्य वाटतो.
<< तितकच अस्थानी साधेपणा चा
<< तितकच अस्थानी साधेपणा चा अतिरेक (ह्याला काहीतरी पर्यायी शब्द सापडला असता तर बरं झालं असतं) सुद्धा अयोग्य वाटतो. >>
पर्यायी शब्द सापडला नाही तरी हरकत नाही पण एखादं उदाहरण (म्हणजे तुम्हाला कुठे असा अस्थानी साधेपणा चा अतिरेक दिसला ते) देऊन स्पष्ट केलंत तर जास्त परिणामकारक ठरेल. मला स्वतःला असं एक उदाहरण ठाऊक आहे पण ते चित्रपटातलं - थोडासा रूमानी हो जाए मधली नायिका बिन्नी (अनिता कंवर).