"आम्ही पुरतो मातीत
गरज म्हणून बिया
आणि छंद म्हणून संस्कृती
आम्हाला आवडतं
पुन्हा पुन्हा आदिम व्हायला."
दुसर्यांची पुस्तके घ्यायची ,जमलं तर वाचायची आणि नंतर घेणं-देणं नसल्यासारखी परत देऊन टाकायची, या जुन्या पॉलिसीत कुठेतरी फोलपणा जाणवू लागला होता .काही पुस्तकं आपल्या संग्रही असायलाच हवीत असं तीव्रतेनं वाटू लागलं होतं .अशा वेळी आपल्याला कोणतं पुस्तक पटू शकेल/ आवडू शकेल याचा अंदाज घेणं (मुळात सगळा प्रश्न पटण्याचाच.कारण सहजासहजी पटू शकतील अशी पुस्तकं फार कमी . ती कमी म्हणून वाचन कमी ..थोडक्यात सगळाच गोंधळ !),कुठेतरी त्या पुस्तकाविषयी वाचणं किंवा जाणकारांकडून माहिती मिळवून मगच ते पुस्तक घेणं अशा प्रक्रिया पार पाडतच मी पुस्तक विकत घ्यायचो .
जी.एं. च्या 'पिंगळावेळ' विषयी असंच बर्याच ठिकाणी वाचल्यानंतर ते आणायचं मनाशी पक्कं केलं . एखादं पुस्तक घेताना अजून एक-दोन नवी पुस्तकं चाळून ठेवायची , म्हणजे बाय चान्स त्यातलं एखादं पटलं तर पुढच्या वेळी विकत काय घ्यायचं,याचा निर्णय घेणं सोपं जातं .
पिंगळावेळ घेतल्यानंतर कवितेच्या पुस्तकांची रांग बघता-बघता सहज एका पुस्तकाचा ब्लर्ब वाचला .तिथेच वरच्या ओळींत भेटला एक कवी ज्याची कविता सुंदर तर होती पण तिच्या डोळ्यात पाहिल्यावर आतल्या आत खोल खळबळ उठत होती .मुक्तछंद फार वाचत नसलो तरी या मुक्तछंदाने पक्कंच बांधून ठेवलं .
'तत्पूर्वी' हातात घेण्यापूर्वी दासू वैद्य अगदीच ठाऊक नव्हते असं नाही .मला ते अंधूक आठवत होते . औरंगाबादमध्ये असताना सरस्वती भुवनच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात दासू सरांना ऐकलेलं. (त्या कार्यक्रमात स्वागतगीतासाठी तबला वाजवायचा म्हणून मी बळजबरी कसाबसा गेलो होतो, ही गोष्ट अलाहिदा !)
"शर्टाच्या समोरच्या बाजूला चार-पाच बटनं असतात पण मागच्या बाजूला एक एक्स्ट्रा बटन द्यायचं ज्याला पहिल्यांदा सुचलं ,तो खरा प्रतिभावंत." हे त्यांचे शब्द अजूनही लख्खपणे आठवतात . तेव्हा त्यांनी असं बरंच काही सोप्या भाषेत सांगितलं आणि कवितेशी मैत्री होण्याअगोदर एका कवीशी मैत्री झाली .
पण आज वाचलेलं दासू सरांच्या ं कवितेचं रूप अगदीच वेगळं . तेव्हा बाळबोध शब्दांतल्या कविता ऐकवणार्या एका कविच्या आतली तल्खली आता स्पष्ट दिसू लागली होती .
"दरसाल फुगणारी बाईलपोटं मोजायला
उजळणी तरी कुठं होती पाठ ."
असा प्रश्न विचारणारी त्याची कविता आता मेंदुला चांगलीच चपराक बसवत होती .
किंवा
"नाकाने पाणी पिणार्याकडे पाहावे
तशा उत्सुकतेने पाहतात लोक
या जमान्यात
पोस्टकार्ड लिहिणार्या वडिलांकडे"
असं एक म्हणायला साधं विधान करत भवताल न्याहाळायला उद्युक्त करत होती .
माणसाचा विकसित म्हणवला जाणारा मेंदू आणि त्याच्या वर्तनामधला विरोधाभास उपरोधाने सजवून सांगत होती --
"एक नदी निर्मळ वाहत असेल
तर तिला आम्ही आटवतो- गोठवतो
मग कुठे मिळतो विकसित मेंदुला वाव ,
ओसाड रिकाम्या पात्राचे
संशोधन करून
शोध लावता येतो
कधीकाळी वाहणार्या
पाण्याच्या अस्तित्वाचा "
त्यानंतर काही कविता पुस्तक चाळताचाळताच अख्ख्या वाचून झाल्या .
"प्रत्येक क्षणातून जाणवंत राहतं
मुलीचं मोठं होणं
मात्र कुणालाच दिसत नाही
मला शिवलेला
मुलगी मोठी झाल्याचा कावळा."
हे शब्द वाचल्यानंतर तर तडक पुस्तक घेऊन घरी आलो आणि रातोरात वाचून टाकलं .
वाचता-वाचता असं जाणवलं की, बर्याच कवितांचा रोख सामाजिक विषयांकडे असला तरी या कविता तथाकथित 'गळेकाढू' प्रकाराच्या वेशीपर्यंत कधीही जात नाहीत.
असे विषयही जाणिवे-नेणिवेपर्यंत पोचवू शकणारी कवीची विलक्षण हातोटी काही कवितांमध्ये दिसते .
"ज्यांच्यात काही विकत घेण्याची
ताकदच निर्माण होऊ शकली नाही
त्यांनी पाच रूपयाला
हंडा भरून पिण्याचं पाणी विकत घ्यावं
हे एकेक दिवस जिवंत राहण्याची
परवानगी घेतल्यासारखं "
"दगडी शस्त्र हातात घेऊन
शिकारी मागं पळणारा
नंगा माणूसच आवृत्त होतोय
टॅंकरमागे पळणार्या माणसाच्या निमित्तानं ."
इतिहासाच्या पुनरावृत्तीची साक्ष देणारे असेही काही शब्द .
असेही काही आदिम प्रश्न !
पुढे देशाच्या राजधानीत फिरत असताना उमगलेलं काहीतरी . काहीश्या तिरपट आणि मार्मिक शब्दांत -
"हे शहर पाहताना
कवीच्या नव्हत्याच पोरकट अपेक्षा ,
शेवटी राजधानी म्हणजेसुद्धा
जगण्यासाठी धडपडणार्या लोकांचंच एक गाव
फरक एवढाच ,
दर पाच वर्षांनी
सामान्य लोकांवर फवारल्या जाणार्या
औषधाचं संशोधन करण्यासाठीची खलबतं
इथं अव्याहत चालू असतात ."
वाचताना अनेक कवितांची सुरूवात अगदी साध्या शब्दांनी होते पण बघता बघता त्यांच्यात एक सूर सापडू लागतो .प्रत्येक कवितेला फक्त स्वतःचे टप्पेच लाभलेत असं नव्हे स्वतःची अशी वळणंही लाभली आहेत .कवितेची अशी वळणं तिला अजून ठसठशीतपणे स्मरणात ठेवायला भाग पाडतात .
'लाल पोपटी पानातून' सारखी एक कविता
"अचानक उसळलेल्या दंगलीसारखा
रखरखत्या उन्हात वादळवारा "
अशी सुरू होऊन
"खोड-फांद्या काढून झाल्यावर
पानं काढण्यासाठी
चित्रकाराला हिरवा रंगच
सापडू नये
तशी निष्पर्ण झाडं उभी "
अशा वळणावर येते तेव्हा आपल्याच आजुबाजुला पानगळ सुरू झाल्यासारखी वाटते .
'बारव' कवितेतलं सुरूवातीचं वळण नुसता आशयच नव्हे तर शब्द आणि स्वरूपाच्या दृष्टीनेही जीवघेणं -
"इतिहासातल्या राज्यकर्त्या बाप्याने
स्वतःच्या तहानेकरिता पोसली बाई
आणि
बाईच्या तहानेकरिता बांधली बारव
बाईची गोष्ट संपते इथेच
राज्यकर्ता बाप्या मात्र
चिकटून बसला
इतिहासाच्या पानांना शाईसारखा "
अशा वळणावळणांनी कविता पुढे जात राहतात तेव्हा एका वळणावर कवी म्हणतो -
"लिहू देत प्रत्येकाला स्वतःच्या वकूबाप्रमाणं
काळ ठेवीन ना जपून
महत्वाच्या ओळी वॉचपाकीटात"
कवी आणि कवित्वाच्या अस्सलपणाविषयी बोलणार्या अशा कविता हा या संग्रहातला अजून एक वेगळा खजिना म्हणावा लागेल .
फोटोतल्या कविला स्वतःच्या जयंतीच्या दिवशी लोक हारतुरे घेऊन येतील ,तेव्हा कुठेही पळून जाता येणार नाही अशी खंत मांडणारी कविता कवित्वाचे बरेच रंग सहज दाखवून जाते .
"धान्य निवडणार्या
आईच्या जवळ येऊन
बिनधोक चिमण्या टिपायच्या दाणा
तसे अव्यक्तातले पक्षी
न घाबरता कवीजवळ येतात
तोपर्यंत मरण नाही कवीला
कवी मरत नाही
कुठल्यातरी मानवी रोगानं ,
पक्षी नुस्तेच उडून जातात
कवीच्या डोक्यावरून
उतरत नाहीत त्याच्या खांद्यावर
तेव्हा कवी होतो घामाघूम "
निर्मितीविश्वातली अव्यक्त खळबळ मांडणार्या ह्या ओळी वाचल्यानंतर इतकं सगळं सोसुनही जगाकडून याची खरोखरच किमंत ठेवली जाते का , असा प्रश्न पडत राहिला ं . ग्रेसांचे शब्द आठवले -
"माझ्या पेशींतलं रक्त झडत राहिलं ,माझ्या ह्रदयाचे तुकडे पडत राहिले आणि तुम्हाला साधी एक झुळुकही जखम करत नाही ."
कवी कितीही घामाघूम झाला तरी जगाला मात्र झुळका हव्या असतात बहुधा ,फक्त गोड शब्दांच्या !
काही ओळी व्यक्तिशः मला फार जवळच्या वाटल्या .
"कॅम्पस अलगद बुडून गेलाय अंधारात
स्ट्रिटलाईटची अंधार फोडण्याची व्यर्थ धडपड
रस्ते वांझ ठरलेत
सुब्बालक्ष्मीच्या व्यंकटेश स्तोत्रात
मशिदीतली अजान निःसंकोच मिसळून गेलीय"
अगदीच सुब्बालक्ष्मीचं व्यंकटेश स्तोत्र नाही तरीपण एकीकडे शुभंकरोती आणि दुसरीकडून मशिदीच्या घुमटाबाहेर अलगद येणारा 'अल्लाह' चा स्वर एकमेकांमध्ये गुंफले गेले की गडद होत जाणारी संध्याकाळ कशी अंतर्बाह्य ढवळून काढते ,हे मी स्वतः अनुभवलेलं आहे .
किंवा 'कॅम्पस' आणि 'अंधार न हटवू शकणारे पिवळे दिवे' असं वाचताक्षणी युनिव्हर्सिटी आणि औरंगाबादच्या बहुतांश गल्लीबोळातून निथळणारा पिवळसर प्रकाश डोळ्यासमोर उभा राहतो . प्रत्येकासाठी या ओळी वाचल्यानंतर उमटणारे संदर्भाचे तरंग वेगवेगळे असू शकतील . माझ्यामधल्या बर्यांच कोपर्यांत मात्र तोच मंद प्रकाश आणि तेच स्वर निनादत राहतील ,हेही तेवढंच खरं !
असो .
कहर म्हणजे 'दगडाखाली ओल शिल्लक ठेवणार्यांना ' हा संग्रह अर्पण करण्यात आलाय . म्हणजे तुमच्या-आमच्यासारख्यांना थोडाफार वाव आहे म्हणायचा !
'तूर्तास' येथेच थांबतो .
धन्यवाद .
--सुशांत..
सुंदर ओळख घडवलीत धन्यवाद
सुंदर ओळख घडवलीत धन्यवाद
खूप छान ओळख करून दिलीत.
खूप छान ओळख करून दिलीत.
धन्यवाद हर्पेनजी ,धादीपक .
धन्यवाद हर्पेनजी ,धादीपक .
अति अति सुंदर!!!!
अति अति सुंदर!!!!
किती सहजसुंदर शब्दात
किती सहजसुंदर शब्दात दासुंच्या कवितेचा परिचय दिलाय! त्यांच्या कविता यथार्थदर्शी असुनही कुठेच आक्रस्ताळ्या होत नाहीत. आतला काव्यात्मक गाभा ओल
टिकवून असतो.त्यांच्या त्या लक्षणीय सादगीच्या शैलीचे,
काव्यसंग्रहाचे मार्मिक शब्दात परीक्षण...
खूप आवडला परिचय सुशांत,
खूप आवडला परिचय सुशांत, कवितेची ओळख करून देताना आधी ती आपली करून घ्यावी लागते..दासूंच्या कवितेत खोल उतरून लिहिले आहे तुम्ही.
बी, भुईकमळजी , भारतीताई खूप
बी, भुईकमळजी , भारतीताई खूप खूप आभार .
खरंतर परीक्षण वगैरे नव्हे पण अगदीच राहावेना म्हणून लिहिलंय ...:)
कवितेची ओळख करून
देताना आधी ती आपली करून
घ्यावी लागते.. <<अगदी अगदी .
_/\_
छान लिहिलंय
छान लिहिलंय
सुंदर लिहिलंय !!
सुंदर लिहिलंय !!
सगळ्यात आधी बी चे आभार.
सगळ्यात आधी बी चे आभार. ह्या लेखा ची लिन्क दिल्याबद्दल.
आणि सुशांत, तुमचे खूप खूप आभार.. खरच हे मिळवून वाचण्यासारखं आहे... समृद्धं करणारं आहे.
बी तुमचे अनेक आभार .
बी तुमचे अनेक आभार .
ललिता-प्रीति ,Maithili ,दाद धन्यवाद .
हो दाद, खरंच समृध्द करणारं आहे हे . फार समृध्द वाचनानुभव .
खूप सुंदर लेख.
खूप सुंदर लेख.
धन्यवाद माधवजी .
धन्यवाद माधवजी .
सुंदर ओळख. पुस्तक मिळवून
सुंदर ओळख. पुस्तक मिळवून वाचण्यास उद्युक्त करणारी!
खूप छान सांगितले दादा
खूप छान सांगितले दादा
सुशांत सर,
सुशांत सर,
अप्रतिम रसग्रहण!!
प्रत्येक कडव्यातून कवीने जे मांडलय त्याने हृदयाला जाळ्या पडत आहेत आणि तुमच्या शब्दांनी त्या जाळी जाळी झालेल्या हृदयातून रक्त अजूनच त्वेषाने वाहू लागलं आहे.
ग्रेस च्या या दोन ओळी मी नक्षत्रांचे देणे या भागात ऐकल्या होत्या... कुठेतरी त्या जाळीला एक मोठं भगदाड पडल्याची जाणीव दिलीत....
वाह!!! फार उत्कटतेने लिहीले
वाह!!! फार उत्कटतेने लिहीले आहे.