Interstellar - पंचमितींवर भाष्य करणारा द्वीमितीय चित्रपट (a review with spoiler)

Submitted by मामी on 10 November, 2014 - 09:46

पुन्हा एकदा ठळक स्पॉयलर अ‍ॅलर्ट! खालील परिक्षणात अनेक मुद्दे आले आहेत ज्यामुळे चित्रपटाच्या कथेचा अंदाज येऊ शकतो. कृपया खालील परिक्षण आपापल्या जबाबदारीवर वाचणे.

नाहीतर आत्ताच मागे वळा.

Countdown Starts

१०
.

.

.

.

.

.

.

.

.

.

..................

इनसेप्शनसारखा उच्च आणि गहन सिनेमा देणार्‍या दिग्दर्शकानं हा असा सिनेमा का द्यावा? मान्य आहे. चूक माझीही आहेच. मी ही इनसेप्शनचा विचार मनातून न काढता त्याच मोजपट्या घेऊन सिनेमा बघितला. पण खरं सांगू, कोर्‍या पाटीवरही हा सिनेमा खूप परिणामकारक उमटला असताच असं नाही वाटत. एकच आशेचा किरण म्हणजे अप्रतिम बॅकग्राउंड म्युझिक. अतिशय परिणामकारक आहे ते.

आज सकाळीच हा सिनेमा पाहिला आणि दिवसभर त्यावर विचार करत बसले होते. आवडला असता तर सोपं झालं असतं. पण आवडला नाहीये तर नेमका का? नेमकं काय खटकतंय?

एक-दोन नाही अनेक गोष्टी आहेत.

- पुस्तके पाडूनच संदेश का द्यायचा? आजूबाजूला इतकी धूळ आहे त्यावर का लिहित नाही?

- सुरवातीला जेव्हा कूपर नासामध्ये मुलीसकट पोहोचतो, त्यावेळी त्यातील सायंटिस्ट त्याला सांगतात की तू इथे येऊन पोहोचलास त्यामागे काही कारण आहे. हे त्यांनी कशाच्या आधारावर ठरवले? कारण इतर कोणालाही असा काही अनुभव आलेला नसतो.

- जर पंचमितीमधील जगातून कूपर मुलीला सांगत असतो की त्याला तिथे जाऊ देऊ नकोस तर मग पुन्हा कोऑर्डिनेटस का देतो?

- नंतर घड्याळाच्या सेकंद काट्यावरून मुलीला तो नक्की काय संदेश देतो की जेणे करून ती सर्व मानवजातीला एका वेगळ्या ग्रहावर आणून ठेऊ शकते? कारण कूपर केवळ एक इंजिनियर आणि पायलट असतो. अ‍ॅस्ट्रोफिजिसिस्ट नव्हे.

- प्रोफेसर ब्रँड हा शास्त्रज्ञ असूनही त्याला न सुचलेली थिअरी हिरोला कशी कळते? की केवळ वेगळ्या डायमेन्शन मध्ये गेल्यामुळे त्याला सुटकेचा मार्ग सुचतो?

- पृथ्वीवरून नक्की हा ग्रह कसा शोधला जातो? आणि इथे कसे येतात? तो महत्त्वाचा टप्पा का गाळला? ते एकदम चुटकीसरसं सोप्पं का करून टाकलं? ते तर सगळ्यात महत्त्वाचं नाही का?

- नविन जग अगदी बेसबॉल खेळाण्याइतकं परिपूर्ण कसं काय? त्या जगातले इतर काही डिटेल्स न दाखवता फक्त दाखवायला सोप्पं असं बेसबॉल फील्ड का दाखवलं?

- शेवटी तो अ‍ॅमिलिया च्या शोधात निघतो ते तर काय आपलं ठाण्यापर्यंत जाऊन येण्यासारखं सोपं असल्यासारखं दाखवलंय. एकटा उठतो, ती फायटर एरोप्लेनसारखी दिसणारी छोटीशी विमानं असतात त्यातलं एक घेतो अन जातो की पठ्ठ्या! बरं जाणार कशाच्या बळावर? पत्ता कुठे माहित आहे? सिग्नल्स येत होते ते यान अ‍ॅना कडे, नासाकडे सिग्नल्स येत होते ते नासा मागे पृथ्वीवर राहिलेले आणि अ‍ॅमिलिया त्या शेवटच्या ग्रहावर गेली ती एकटीच.

- आणि ती तिथे काय करतेय ते म्हातार्‍या मर्फला कुठुन कळलं?

- डॉ. मॅन बरोबरच्या संघर्षात (टिपिकल मारामारी वगैरे दाखवून) उगाच वेळ वाया घालवला आहे. अगदीच गरज नव्हती त्याची.

महत्त्वाचं म्हणजे कुठेही बुद्धीला चॅलेंज नाहीये. सगळ्या कन्स्पेट्स विज्ञानकथांतून अनेकदा आलेल्या आहेत. वेगळ्या ग्रहावरच्या वेगळ्या जगांच्या त्या दोन संकल्पनाही खूप सुलभ वाटल्या. यापेक्षा अधिक गुंतागुंतीची जगं शब्दरुपात वाचली आहेत. अगदी मॅजिक फारअवे ट्री सारख्या लहान मुलांच्या पुस्तकातून ते फिलिप पुलमनच्या ट्रिलॉजीमध्ये कितीतरी गुंतागुंतीची जगं दाखवली आहेत.

ती ग्रॅव्हिटी ही पाचवी मिती मानण्याची कन्सेप्ट मला पूर्ण कळली नाही. हा माबुदोस. पण ती पुस्तकं पडतात, धूळ आत येते या घटनेवरून हिरो ग्रॅव्हिटीच्या थिअरीपर्यंत कसा पोहोचतो हे मला कळलं नाही. (कोणाला कळलं असेल तर सांगा.)

सिनेमात नक्की कशावर भर द्यायचा आहे? मानवी भावभावना आणि बेसिक इन्स्टिंक्ट अनादी काळापासून त्याच राहतात? की प्रेम ही भावना प्रबळ आहे? की काल-प्रवास शक्य आहे हे दाखवायचं आहे? की इतर काही जगं अस्तित्वात असू शकतात हे दाखवायचं आहे? की मानव जातीचा भविष्यकाळ दाखवायचा आहे? की समांतर जगाच्या संकल्पनेवर भाष्य करायचं आहे? की काळ आणि ग्रॅव्हिटीच्या आणखी दोन मिती असलेल्या पंचमितीय जगाची आणि आपल्या त्रिमितीय जगाची सांगड घातलेली दाखवायची आहे?

वर उल्लेखलेल्या अनेक बाबींशिवायही एक आणखी काहीतरी अगदी समोर आहे पण हातून सुटतंय असं वाटत होतं. काय तेही नेमकं लक्षात येत नव्हतं. आज संध्याकाळी कालचा अर्धवट वाचून बाजूला ठेवलेला संडे टाईम्स पुरा करताना ते कोडं अचानक सुटलं. त्यात या सिनेमावरच्या एका लेखात लिहिलं आहे की पटकथेचा सहलेखक शास्त्रज्ञ डॉ. किप थॉर्न यांनी अट घातली होती म्हणे की जे सायन्टिफिकली प्रुव्हन असेल तेच दाखवायचं.

"..... Also preserved were the guidelines we laid down from the outset. First, that nothing would violate established physical laws. Second, that all the wild speculations, and there certainly are some here, would spring from science and not from the fertile mind of a screenwriter."

नो इमॅजिनेशन???? असं का? सिनेमात कल्पनाशक्तीवर बंधनं आहेत. तिला पूर्ण मोकळी सोडली नाहीये आणि तेच खटकत राहतं. प्रत्यक्ष आईन्स्टाईननं म्हणून ठेवलंय की “Imagination is more important than knowledge. For knowledge is limited to all we now know and understand, while imagination embraces the entire world, and all there ever will be to know and understand.” आतापर्यंतचे अनेकानेक विज्ञानिक शोधही आधी कल्पनेत साकार झाले आहेत आणि मग नंतर कधीतरी प्रत्यक्षात आले आहेत. सायंटिफिक थिअरीच मांडायची होती तर एक रिसर्च पेपर लिहायचा होता ना! गेलाबाजार एखादी डॉक्युमेंटरी काढायची. सिनेमा का काढला? 'जेणुं काम तेणुं थाय' हेच खरं.

सिनेमाच्या अनेक अ‍ॅनोमली असलेल्या, अनेक ब्लॅकहोल असलेल्या आणि अनेक ठिकाणी वार्प झालेल्या पटकथेपुढे कोणी कशी कामं केली आहेत, कोणाची निवड योग्य नव्हती, चित्रिकरण कसं आहे वगैरे बाकी सगळे डिटेल्स अगदी नगण्य आहेत.

सिनेमात एका दृश्यात रोमेली एका कागदावर वर्महोलची कल्पना स्पष्ट करून दाखवताना कागदावरचे द्विमितीय दोन बिंदू कागद दुमडून ते त्रिमितीत कसे एकत्र येतात हे दाखवतो. तसंच काहिसं तर झालेलं नाही ना सिनेमाचं? सुरवातीला शेवट आणून चिकटवला आहे. त्या दोन बिंदूच्या मधे आपण एका मोठ्ठ्या ब्लॅकहोलची सफर करून येतो.

* शीर्षकातील द्विमितीयचा अर्थ सपाट असा घ्यावा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

---

मामी, फार अपेक्षेने बघितलास का ?
कधी कधी कथाकल्पनेवरचे आपले इमॅजिनेशन फार उच्च होते आणि दिग्दर्शक त्यात कमी पडतो. पण एवढेच असते कि त्याच्याकडे सर्व साधने असतात, आणि तो चित्रपट निर्माण करू शकतो.. त्याच्या कल्पनेप्रमाणे.
आपल्याला पडणारे प्रश्न इतके बेसिक असतात कि त्या चित्रपटाच्या कथे, पटकथेशी संबंधित कुणाच्याही डोक्यात ते का येत नाहीत, तेच कळत नाही.

- पुस्तके पाडूनच संदेश का द्यायचा? आजूबाजूला इतकी धूळ आहे त्यावर का लिहित नाही?
Morse Code. Also, the books he push from the shelf have the authors whose names start with alphabet - S T A Y. First one was Sir Artur Connon Doyle and so on.

झरबेरा, मोर्स कोड वगैरे हे कळले गं. पण ते उगाच एक गिमिक म्हणून आणल्यासारखं वाटलं. डिटेक्टिव स्टोर्‍यांमधे असतात ना तसं काहीतरी. कोणीतरी लिहिलंय ना की खून कोणी केला हे कळल्यावरही पटकन फोनवर न सांगता इथे तिथे भेटायला बोलावतात आणि मधल्यामध्ये स्वतःचा खून करवून घेतात. तसं झालंय. अरे बाबा, लिही की त्या धूळपाटीवर! ती पुस्तकं पडलेली लहानपणापासून पाहत राहूनही त्या मुलीला अनेक वर्षे त्यामागिल अर्थ कळत नाही ना रे भाऊ!

एकेक लिहिते.

- प्रोफेसर ब्रँड हा शास्त्रज्ञ असूनही त्याला न सुचलेली थिअरी हिरोला कशी कळते? की केवळ वेगळ्या डायमेन्शन मध्ये गेल्यामुळे त्याला सुटकेचा मार्ग सुचतो? >> कदाचित पाचव्या मितीमधे माझा गोंधळ झाला असेल Happy पण त्याने कुठे न सुचलेली थिअरी सुचवलीये. त्याने फक्त black hole मधे किंवा event horizon मधे मिळणारा data पाठवला. ब्रँड चे समीकरण मर्फ बदलते/ सोडवते.

- शेवटी तो अ‍ॅमिलिया च्या शोधात निघतो ते तर काय आपलं ठाण्यापर्यंत जाऊन येण्यासारखं सोपं असल्यासारखं दाखवलंय. एकटा उठतो, ती फायटर एरोप्लेनसारखी दिसणारी छोटीशी विमानं असतात त्यातलं एक घेतो अन जातो की पठ्ठ्या! बरं जाणार कशाच्या बळावर? पत्ता कुठे माहित आहे? >> नासाकडे सिग्नल्स येत होते ते नासा मागे पृथ्वीवर राहिलेले पण नासाचेच लोक हे नवीन space station (?) बांधून होते तेंव्हा हि माहिती असणार ना तिथे ?

- आणि ती तिथे काय करतेय ते म्हातार्‍या मर्फला कुठुन कळलं? >> मर्फ एवह्ढी म्हातारी झालेली दाखवली आहे त्यामूळे मधल्या काळात worm hole मधून संदेश पाठवायचे तंत्र नीट झाले असेल का ?

सिनेमात नक्की कशावर भर द्यायचा आहे? मानवी भावभावना आणि बेसिक इन्स्टिंक्ट अनादी काळापासून त्याच राहतात? की प्रेम ही भावना प्रबळ आहे >> मला शेवटचे वाटले. प्रेम हि quantum भावना असावी Wink तो मधे एक संवाद पण आहे ना कि प्रेम हि एकमेव गोष्ट काळाबरोबर बदलली नाही, वय बदलले तरी.

https://www.yahoo.com/movies/spoiler-alert-some-theories-about-that-inte... हे वाचून बघा.

पत्ता कुठे माहित आहे? वगैरे वगैरे >>
कूपर हा शनीजवळच्या स्पेस स्टेशनवर आहे. शनीजवळचे वर्महोल अजूनही तसेच आहे. कूपरने स्वतःच गॅर्गॅचुआत जाण्यापूर्वी एमिलीला एडमंड्स ग्रहाकडे स्लिंग्शॉट केले असल्यामुळे त्याला तिचा पत्ता कुठे माहिती आहे हा प्रश्न उद्भवतच नाही. इन फॅक्ट ती एक्झॅक्ट्ली कुठे आहे हे बहुतेक त्याला आणि ट्रेसलाच माहिती असण्याची शक्यता जास्त आहे.
आणि आजच्या काळातच आपण इतके कनेक्टेड असताना १०० वर्षांनंतर पृथ्वीवरचा डेटा त्यांना तिकडे कसा मिळेल हा प्रश्न भारतात अपलोड केलेला यूट्यूब व्हिडिओ अमेरिकेत कसा दिसेल इतपत भाबडा वाटतोय.

जर या सिनेमात वापरलेल्या वैज्ञानिक संकल्पना माहित नसतील तर संपूर्ण सिनेमा डोक्यावरून जाऊ शकतो. त्याकरता आधी त्या संकल्पनांबद्दल आणि सिनेमाबद्दल नेटवर वाचून मग तो बघू शकता.

धन्यवाद, मामी.

ह्या संकल्पनांबद्दल सोप्या भाषेत लिहले तर फारच बरे होईल.

कोणी व्यवस्थित चित्रपटाची स्टोरी सकट (स्पॉयलर अलर्ट देउन) परिक्षण लिहील का ?

हाय स्पॉयलर अलर्ट
http://popwatch.ew.com/2014/11/07/interstellar-plot-explained/
http://www.firstshowing.net/2014/spoiler-alert-excellent-interstellar-ti...
http://www.comicbookmovie.com/fansites/mrsundaymovies/news/?a=110826

सिनेमा सुध्दा तीन वेळा पहावा लागेल कदाचित.> +१

ह्या सिनेमात कुणीतरी बरा पटकथा लेखक घ्यायला हवा होता. सिरीयसली एक संवाद असा आहे: आय कॉल इट घोस्ट बट इट इज लाईक अ पर्सन ट्राईंग टू टॉक टू मी....
(तिथेच माझ्या मनात 'हमको हमीसे चुरा लो' मधली ऐश्वर्या रुंजी घालू लागली.एक गाणे असावे असा सीन!)

अॅन शास्त्रज्ञ वाटते का असले फोल प्रश्न मला पडत नाहीत कारण माझा बॉलीवूड पाया पक्का आहे. (शुश्मिता केमिस्ट्री शिकवू शकते तर अॅन साधी अंडी उबवू नाही शकणार!)

कुपर पायलट का शेतकरी का इंजिनियर हे घोळ मी मनातल्या मनात घालत नाही कारण जर शारुख जतहैजा मध्ये दोन प्रोफेशन करू शकतो - गायक आणि मेजर - तर हॉलीवूड हिरोने तीन केलेच पाहिजे!!

डॉ. मॅन बरोबरची मारामारी तर फार अत्यावश्यक आहे कारण हॉलीवूड-बॉलीवूड यांच्या मधील सीमारेषा पुसट करणारा ऐतिहासिक क्षण (अर्थात! बर्लिन भिंत पडणे हे पण ह्या घटनेइतके मोठे नाही!!)
शास्त्रीय कन्सेप्टस चे नाविन्य व व्हिज्युअल इफेक्ट ह्यामुळे कदाचित हा सिनेमा ऑस्कर पर्यंत जाईल, जिंकेल पण स्टोरी म्हणजे पार गोधडी झाली आहे.

शेवट वीर-झारा च्या तोडीचा.

(घरचे ज्युनियर आता पडलेली पुस्तके आवरत नाहीत. मलाही आवरू देत नाहीत. मी सुटकेचा निश्वास टाकला.)

सीमंतिनी .... Biggrin

(घरचे ज्युनियर आता पडलेली पुस्तके आवरत नाहीत. मलाही आवरू देत नाहीत. मी सुटकेचा निश्वास टाकला.) >>>> धिस इज टू गुड. Rofl

झरबेरा .............. पोस्टस का काढल्या??????

मधले मधले लॉजिकल घोळ झाले होते ते मला समजून घ्यायचे होते.

असो लॉजिक आणि सायंटिफिक थिर्‍या बिर्‍या असतील त्या वायल्या. ते समजून घेण्याकरता पुन्हा एकदा सिनेमा पाहण्याची मात्र शिक्षाच आहे.

पोस्टस का काढल्या??????

टु मच स्पॉयलर Sad Sad
तेव्हा जस्ट पाहून आलेले घरी आणि मोबाईल वरून भरभर लिहित गेले. एक्साईटमेंट Proud

घाई घाईत भरपूर गोष्टी राहिल्या. नंतर सविस्तर लिहेन.

(घरचे ज्युनियर आता पडलेली पुस्तके आवरत नाहीत. मलाही आवरू देत नाहीत. मी सुटकेचा निश्वास टाकला.) >>> Lol खास सीमंतिनी टच!

मामी, शीर्षक लैच भारी... Happy

बाकी चित्रपट कसा आहे याची भरपुर समिक्षा लोक करताहेतच. मला आवडला पण मी सायन्स फिक्शनच्या वाटेला फारशी गेलेच नाही कधी, त्यामुळे जे काय चाल्ले होते ते बरेच म्हणायचे.

अपोलो मिशनचे उल्लेख ऐकुन आणि त्यामागचा उद्देश ऐकुन जाम हसले. अर्थात खखोदेजा. पण एक हॉलिवुडपट असे बोलतोय याची गंमत वाटली.

इतर सायन्टीफिक बाबी कितपत ख-या वगैरे चर्चा मला जमायची नाही पण अन्नधान्याची जी स्थिती दाखवलीय ती अग्दी पटली. दुस-या एका रिव्युत अमानी प्राणि, झाडे नाहीत असे जे निरिक्षण नोंदवलेय ते माझ्या तेव्हा लक्षात आले नाही पण वाचल्यावर लगेच लक्षात आले. चित्रपटात निसर्गाची जी काय अवस्था दाखवलीय त्या अवस्थेकडे आपण अतिशय वेगाने धावतोय यात शंका नाही. या एका बाबतीत मात्र चित्रपट अतिशय प्रामाणिक आणि येऊ घातलेल्या भयाण वास्तवाला धरुन असा आहे.

(तिथेच माझ्या मनात 'हमको हमीसे चुरा लो' ....तर हॉलीवूड हिरोने तीन केलेच पाहिजे!! >> Lol हे भारीय चित्रपटापेक्षा .
तसंही माझं इंग्लिश कपिल शर्मा इतकच अगाध आहे. आणि थेटर मधे बघताना रिवांइन्ड ही करता येत नाही चित्रपट. Proud पण माझाही बॉलीवूड पाया पक्का आहे. Happy

> नो इमॅजिनेशन???? असं का? सिनेमात कल्पनाशक्तीवर बंधनं आहेत. तिला पूर्ण मोकळी सोडली नाहीये आणि तेच खटकत राहतं. प्रत्यक्ष आईन्स्टाईननं म्हणून ठेवलंय की “Imagination is more important than knowledge. For knowledge is limited to all we now know and understand, while imagination embraces the entire world, and all there ever will be to know and understand.”

Happy
ट्रुथ ईज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. किपला अजून बरच काही करायचं होतं पण करु दिलं नाही म्हणून त्याचं नाव त्यानी लेखकांमध्ये येऊ दिलं नाही. त्याची बस चालली असती तर सिनेमा इतका मेलोड्रॅमॅटीक झाला नसता. प्रेमाची इतकी जबरदस्त पॉवर दाखवली असतांना त्यात इमॅजिनेशन नाही असं कसं म्हणता येईल?

> आतापर्यंतचे अनेकानेक विज्ञानिक शोधही आधी कल्पनेत साकार झाले आहेत आणि मग नंतर कधीतरी प्रत्यक्षात आले आहेत. सायंटिफिक थिअरीच मांडायची होती तर एक रिसर्च पेपर लिहायचा होता ना! गेलाबाजार एखादी डॉक्युमेंटरी काढायची. सिनेमा का काढला? 'जेणुं काम तेणुं थाय' हेच खरं.

आणि जितके साकारले त्यापेक्षा कितितरी जास्त नाकारले. विज्ञानाशी फारकत घेतलेले अनेक चित्रपट असतातच की. यातही अनेक अनावश्यक गोष्टी आल्या आहेत आणि त्याचमुळे थोडा बट्याबोळ झाला (बट्याबोळ थोडा असु शकतो का?)
मॅन-कूपर लढाई २००१ मधील HAL वर आधारल्या सार्खी वाटली - पण ईथे KIPP ला थोडंच वापरता येणार होतं ...

मामी तुम्ही परत पहाच एकदा.

आधिच्यांनी जे सांगितले आहे त्यात थोडी भर घालतो - मी कुठलाही रिव्हु न वाचता एका आठवड्यानंतर पहायला गेलो होतो.

- नविन जग अगदी बेसबॉल खेळाण्याइतकं परिपूर्ण कसं काय? त्या जगातले इतर काही डिटेल्स न दाखवता फक्त दाखवायला सोप्पं असं बेसबॉल फील्ड का दाखवलं?
>> ते नविन जग नाही तर स्पेस स्टेशन आहे. गुरुत्वाकर्ष्णावर विजय मिळवल्यामुळे त्याना ते साध्य करता आले आहे. ते केले आहे मर्फनी आणि तिला ते करायला मदत त्याने ब्लाक होल मधला डेटा पाठवुन केली.

- प्रोफेसर ब्रँड हा शास्त्रज्ञ असूनही त्याला न सुचलेली थिअरी हिरोला कशी कळते? की केवळ वेगळ्या डायमेन्शन मध्ये गेल्यामुळे त्याला सुटकेचा मार्ग सुचतो?
>> त्यानी फक्त डेटा पाठवला. खरे समिकरण मर्फ आणि प्रोफेसरचेच होते. त्या ग्राव्हिटी च्या शोधामुळे इतके मोठे स्पेस स्टेशन अंतराळात पाठवता आले.

- डॉ. मॅन बरोबरच्या संघर्षात (टिपिकल मारामारी वगैरे दाखवून) उगाच वेळ वाया घालवला आहे. अगदीच गरज नव्हती त्याची.
>> गरज होतीच - कितीही मोठा माणूस झाला तरी त्याचा स्वार्थ जागाच असतो हे दाखवायचे होते.