भाग पहिला : http://www.maayboli.com/node/50335
भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/50832
भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/51024
--------------------------------------------------------------
दिवस ८ : गुंजी ते नाभीढांग. अंतर: १९ किमी. मुक्कामी उंची: १३९८० फूट / ४२६० मिटर.
विश्रांतीच्या दिवसानंतर मेडीकल टेस्ट पास झालेले सगळे जण ताजेतवाने होऊन आज पुढच्या प्रवासाला निघणार होते. आजचा मुक्काम नाभीढांगला होता. जवळजवळ ४००० फुट उंची आणि १९ किमोमिटर अंतर आज कापायचं होता. गुंजी ते नाभीढांग प्रवास दोन टप्प्यात विभागलेला आहे. गुंजी ते कालापानी हा साधारण ९ किलोमिटरचा प्रवास आदल्या दिवशीच्याच रस्त्याचा पुढचा टप्पा आहे. अगदी पक्का नाही पण सैन्याची वहानं जाऊ शकतील असा रस्ता आहे. पुढचे १० किलोमिटर तसा सोपा मात्र चढाचा रस्ता आहे. नाभीढांग हा भारताच्या हद्दीतला शेवटचा कॅम्प आहे.
नेहमीच्या प्रथेप्रमाणे पहाटे पाच वाजता बोर्नव्हिटा घेऊन निघालो. कॅम्प बाहेर पडल्यावर एक छोटासा चढ लागला. त्या चढावरच धाप लागून हृदयाचे ठोके वाढले आणि विरळ ऑक्सिजनची जाणिव झाली. पुढे कालच्या सारखाच चढ उतारांचा गाडी रस्ता होता. काही ठिकाणी रस्ता अगदी काली नदीच्या पात्रातून जात होता. आता उगमाच्या जवळ आल्याने नदीचा प्रवाह बराच उथळ होता. अधेमधे नदीला मिळणारे झरे पार करून जावं लागत होतं. पण ते ही फारसं कठीण नव्हतं. पण पाणी मात्र खूपच गार होतं. एकेठिकाणी पार्वते नदीच्या पात्रात जाऊन पाणी स्वतःच्या अंगावर उडवून आला. तिथे कुठलेतरी मंत्रही म्हटले. एकंदरीत पार्वते पुण्य मिळवण्याची कोणतीही संधी सोडत नव्हता. पार्वते, रामनरेशजी आणि अजून एकजण आमच्या थोडेसेच पुढे होते. कमान, अभिलाष काही बाही गोष्टी सांगत होते त्या ऐकत, इकडे तिकडे बघतआमचा कंपू निवांत चालला होता. आमचा वेग तसा बरा होता आणि जवळ जवळ पूर्ण बॅच आमच्या मागे होती. तितक्यात व्यास गुंफा आली. तिथल्या एका पहाडाच्या कपारीत एक गुहा आहे. त्या गुहेत बसून व्यासमुनींनी महाभारत लिहिलं असं म्हणतात.
एव्हडं सगळं जग सोडून त्यांना महाभारत लिहिण्यासाठी ती गुहा का सापडली काय माहीत. हे म्हणजे रिया घरातली सगळी जागा सोडून कुठेतरी दोन सोफ्यांच्या मधल्या फटीत किंवा टेबलाच्या खाली वगैरे जाऊन बसते तसच झालं! शिवाय त्या डोंगरावरचं गुहेचं स्थान बघता ते त्या गुहेत ये-जा कशी करत असतील हा प्रश्नही पडला. सैन्यातली मंडळी तिथे जातात पण त्यासाठी त्यांना 'रॉक क्लाईंबिंग' करावं लागतं. पाच-सहा आठवड्यांपूर्वी त्यांनी अशी चढाई करून गुहेच्या तोंडाशी झेंडा लावला होता. गुहा दाखवण्यासाठी आम्ही पार्वते वगैरे मंडळींना हाका मारायचा प्रयत्न केला पण ते आमच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेले आणि मग म्हणायला लागले आम्हांला व्यासगुंफा दिसलीच नाही!
एक मोठं वळण घेऊन पुढे गेल्यावर कालापानीचा परिसर दिसायलालागला. कालापानीला काली नदीचं उगम स्थान मानलं जातं. कालापानीला आयटीबीपी तर्फे एक लहानसा हायेड्रोइलेक्ट्रीक पॉवर प्लँट लावला आहे. त्यातुन निर्माण होणारी वीज कालापानी कॅम्पमध्ये वापरली जाते. खरतर पाण्याचा प्रवाह लिपुलेखच्या परिसरातल्या कुठल्यातरी हिमनदीतून येतो. पण कालापानीला काली देवीचं जे देऊळ आहे, त्या देवळाच्या गाभार्या खालून निघणार्या प्रवाहाला काली नदीचा उगम मानलं जातं. हे देऊळ खूप सुंदर आहे. आम्हांला इथे पोहोचेपर्यंत साधारण आठ वाजले होते. छान कोवळं ऊन पडलं होतं. गार हवा होती आणि देवळाच्या आवारात कॅसेटवर 'सर्व मंगल मांगल्ये' लावलं होतं. अगदी प्रसन्न वातावरण होतं. दिवाळीच्या पहाटे देवळात जसं प्रसन्न आणि उत्सवी वातावरण असतं तसं वाटत होतं. देवळाच्या बाहेर एका तंबूत आयटीबीपीच्या जवानांनी गरम गरम भजी आणि चहा दिला गेला. तो खाऊन देवळात जाऊन दर्शन घेतलं. आत्तापर्यंतचा प्रवास जसा व्यवस्थित, निर्विघ्न झाला तसाच पुढचाही होऊ देत अशी देवीला प्रार्थना केली.
पूर्वी कालापानीला मुक्काम असे. पण आता दिवस वाचवण्यासाठी थेट नाभीढांगलाच नेतात. कालापानीला भारत सरकारची इमिग्रेशनची चौकी आहे. त्यामुळे तिथे थांबायला सांगितलं. तिथे सांगितलं की पासपोर्टची नोंद होईपर्यंत नाश्ता करून घ्या. आम्हांला वाटलं होतं की आधी दिलेली भजी, चहा हाच नाश्ता आहे पण तो आयटीबीपीतर्फे यात्रींना दिलेला खास खाऊ होता. मग परत छोले पुर्या खाऊन घेतल्या. इथे पासपोर्टवर भारताबाहेर पडल्याचा शिक्का मारला गेला. फ्लाईटमध्ये देतात तोच फॉर्म भरायला दिला. फक्त फ्लाईट नंबर मोकळा सोडा म्हणाले. सगळ्यांच्या नोंदी होईपर्यंत पासपोर्ट परत दिले नाहीत आणि पासपोर्ट हातात पडल्याशिवाय पुढे जायचं नाही असं बजावलं होतं. त्यामुळे तिथे जवळजवळ दोन तास बसून रहावं लागलं. पासपोर्ट एकदाचा हातात पडल्यावर पुढचा प्रवास सुरू झाला. आता गाडी रस्ता नव्हता. पाण्याचा प्रवाह खोल खोल जायला लागला. (हो, प्रवाहचं. कारण ह्या परिसरात त्याला 'काली नदी' हे नाव नाहीये.)
इथेच आसपास 'ट्री लाईन' ओलांडली. आता मोठी झाडं, झुडपं सगळं गायब होऊन फक्त खुरटं गवतं तेव्हडं उरलं होतं. इथून पुढे 'ड्राय डेजर्ट / ड्राय माऊंटन्स' सुरू झाले. आपल्याला हिमालयाचं हिरवंगार रूप बघायची सवय असते. त्यामुळे हा परिसर एकदम वेगळाच वाटतो. डोळ्यांना ह्याची सवय व्हावी लागले. थोडं पुढे गेल्यावर पांडव पर्वत लागला. इथे एका डोंगराला पाच सुळके आहेत. म्हणून त्याला पांडव पर्वत म्हणतात. हे मात्र अगदीच ओढून ताणून आणलेलं वाटलं. व्यासगुंफेतून हा पर्वत दिसतच असेल, त्यामुळे त्यावरून व्यासमुनींना पाच पांडवांची कल्पना सुचली असेल किंवा महाभारतातल्या कथेवरून ह्या पर्वताला पांडव पर्वत म्हणत असतील, कोण जाणे!
आत्तापर्यंत ऐकलेल्या/वाचलेल्या/सांगितल्या गेलेल्या माहितीनुसार कालापानी ते नाभीढांग हा प्रवास असदी सहज,सोपा वगैरे असणार होता. पण तस अजिबात नव्हतं. बर्याच चढाच्या आणि ऑक्सिजनची कमतरता असणर्या ह्या टप्प्यात चांगल्यापैकी वाट लागत होती. दमायला होत होतच पण हृदयाचे ठोकेही फार पटकन वाढत होते. थंडी असूनही उन्हाचा चटका बसत होता. सगळ्यांचाच वेग मंदावला होता. साधारण दोन-अडीच तास चालून गेल्यानंतर आयटीबीपीचा एक पोस्ट आला. तिथे चहा मिळाला आणि जवानांनी सगळ्यांना बसून विश्रांती घ्यायला सांगितलं. हा परिसर म्हणजे पार्वतीची नाभी असं मानलं जातं. त्यामुळे नाव नाभीढांग. ह्या पोस्टवर एक सांगलीचा जवान भेटला.
ह्या पोस्टपासून पुढे जवळ जवळ दोन किलोमिटरवर नाभीढांगचा कॅम्प होता. बरेच कष्ट होऊन एकदाचे कॅम्पवर पोहोचलो. हा बॅरॅक सारखा कॅम्प आहे. कॅम्पवरूनच ॐ पर्वताचं दर्शन होतं. साधारणपणे सकाळीच दर्शन चांगलं होतं कारण ११ नंतर पर्वत ढगांआड जातो. पण पासपोर्ट मिळवण्यासाठी दोन तास गेल्याने आम्हांला इथे पोहोचेपर्यंत जवळ जवळ १२:३० वाजले. ॐ पर्वत अर्धवट दिसला.
पण तेव्हा इतकं थकायला झालेलं होतं की फार वाईट वाटून घ्यायची मनस्थिती नव्हती. दिसलं त्यात समाधान मानून घेतलं. थोडंफार जेवण पोटात ढकललं आणि खोलीत जऊन लवंडलो.
उद्या लिपुलेख खिंड ओलांडून तिबेटमध्ये प्रवेश करायचा होता. यात्रेचं वेळापत्रक असं बनवलेलं असतं की एक बॅच तिबेटमध्ये जाते तर दुसरी भारतात परतते आणि हे एकाच वेळी व्हावं लागतं कारण चिनी अधिकार्यांना परत परत फेर्या मारायच्या नसतात. ते अतिशय लहरी असतात. आपल्याला तिथे जायला थोडाजरी उशिर झाला तरी टे निघून जातात आणि बॅच अडकून पडते. शिवाय सकाळचे तीन-चार तासच हवा चांगली असते. नंतर ती बिघडायला लागले. त्यामुळे सकाळी सात वाजता आम्हांला लिपूलेखला पोहोचायचं होतं. त्या हिशोबाने आम्हांला रात्री दोन वाजता नाभीढांगहून निघायचं होतं. आज रात्रीचं जेवण संध्याकाळी सहा वाजताच मिळणार होतं. सीमारेषा ओलांडल्यावर पहिले तीन किलोमिटर आपलं सामान आपल्याला वाहून न्यावं लागतं, नंतर बस मिळते. त्यामुळे पाठीवरची सॅक शक्य तितकी हलकी ठेवा असं सांगितलं होतं. त्यादृष्टीने सामानाची आवराआवरी केली. भीम रोज सामान आवरताना त्याच्या सॅकमधल्या एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी काढून त्यातलं काही हवं आहे का हे विचारत असे (उदा. तिळाच्या वड्या, ऑट्रीविन, मोहोरीच तेलं, हवाबाणच्या गोळ्या)आणि केदार त्याला वरच्या खिशात ठेव उद्या प्रवासात लागेल असं सांगत असे! पण आज वरच्या खिशात काहीही न ठेवण्याची सक्त ताकीद सगळ्यांनी त्याला देऊन सगळं बांधून टाकायला लावलं. मला सकाळी थोडा खोकला येत होता, तो आता चांगलाच वाढला होता. घरून निघाल्यापासून जवळ जवळ बारा दिवस झाले होते. त्यामुळे बरच होमसिकही वाटत होतं. शिवाय आजच्या ट्रेकमध्ये बरेच कष्ट झाले होते. त्यामुळे उद्या घोड्यावर बसून टाकावं असं राहून राहून वाटायला लागलं. तेव्ह्ड्यात डॉक्टर पराग खोलीत येऊन कोणाला त्रास होत नाहीयेना ते विचारायला आला. त्याला सांगितलं की खोकला येतोय खूप. तो म्हणाला औषध पाठवतो. म्हटलं त्याने झोप नाही ना येणार, नाहितर मी लिपूच्या प्रवासात पेंगत राहीन. तो म्हणाला फिकर मत करो, आप लिपू पोहोच जाओगे ठिकसे!
तितक्यात एलओ सरांचा फतवा आला की उद्या सगळ्यांनी घोड्यावर बसलच पाहिजे. मग त्याबद्दल जेवायच्या वेळी चर्चा करायचं ठरलं. सगळ्या चालणार्यांनी ह्याला विरोध केला. मग बरीच बोलाचाली होऊन असं ठरलं की सगळे चालणारे बरोब्बर दोन वाजता निघतील आणि घोड्यावर बसणारे तीन वाजता निघतील. सव्वा वाजता बेड टी येईल.
गरम सुप आणि रात्रीचं जेवण झाल्यावर मला बरच बरं वाटायला लागलं. बाहेर फिरल्यावर उत्साहं आला आणि खोकल्याचं औषधही एकदम रामबाण होतं, दोन तीन तासात खोकला जवळ जवळ थांबलाच. मी घोड्यावर बसायचा विचार झटकून टाकून चालायचं नक्की केलं. बाहेर हवा बरीच ढगाळ आणि थंड झाली होती. हा कॅम्प इतका दुर आणि एकाकी आहे की इथे आम्हांला फक्त डाळ-भात दिला असता तरी कोणीही तक्रार केली नसती. पण इथेही जेवायची व्यवस्था अतिशय चोख होती! रोज रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ असे. इथे ह्या ठिकाणीही त्यांनी बंद डब्यातल्या रसगुल्ले देऊन नियम मोडला नव्हता! साडेसहाला दिवे घालवून सगळ्यांना झोपायला पाठवलं. मला रात्री साडे अकराच्या सुमारास लघवीच्या भावनेने जाग आली. आधीच्या कॅम्पसारखं टॉयलेट खोलीला लागून नव्हतं. बरच दुर होतं. खोलीबाहेर डोकावून बघतो तर पाऊस! मग जॅकेट, बॅटरी, रेनकोट, बुट वगैरे बराच जामानिमा करून चाचपडत चाचपडत जाऊन आलो. म्हटलं हा पाऊस असाच चालू राहिला तर झालंच कल्याण उद्या. थंडी, पाऊस आणि अंधारात ते पंधरा वीस फुट अंतरही नको वाटयत. लिपुलेखच्या नऊ किलोमिटरांचं काय होणार ते भोलेबाबाच जाणे! जाऊ दे होईल ते पाहून घेऊ असा विचार करून परत ब्लँकेटमध्ये गुरफटून गुडूप झोपून गेलो.
दिवस ८ : नाभीढांग ते लिपूलेख. अंतर: ९ किमी. उंची: १६५६८ फूट / ५०५० मिटर.
लिपूलेख ते तकलाकोट अंतर: १८ किमी (३ किमी ट्रेक / १५ किमी बस) उंची: १२९३० फूट / ३९४० मिटर
दिड वाजता उठलो तेव्हा नशिबाने पाऊस थांबलेला होता. वारा मात्र होता. सामान बांधलेलच होतं. बरेचसे कपडे अंगात घातलेलेच होते. त्यामुळे फक्त बुट चढवले आणि तयार झालो. निघायच्या आधी गरम गरम दुधात कॉर्नफ्लेक्स घालून दिलं. हिमालयात कुठेतरी, बर्फाळ थंडीत, मध्यरात्री, मिट्ट काळोखात ते कॉर्नफ्लेक्स इतकं चविष्ट लागलं की बस! सगळे चालणारे जमल्यावर बरोबर दोन वाजता सुरुवात केली. लिपूलेखपर्यंत नऊ किलोमिटरच्या अंतरात आम्हांला एक किलोमिटर उंची गाठायची होती. ह्यावरून पायथागोरस साहेब चढाची कल्पना देऊ शकतील! कमानने बॅटरी हातात धरली होती. त्या प्रकाशात फक्त पुढची चार पावलं अंतर तेव्हडं दिसत होतं बाकी सगळा मिट्ट काळोख! पुढे मागे बॅटर्यांची लुकलुकणारी रांग दिसत होती. कुठे जातोय, किती चढतोय, बाजुला डोंगर आहे, दरी की झरा वगैरे काही समजत नव्हतं. एका अर्थी ते अज्ञातलं सुख बरच होतं. ह्या रस्त्यावर सैन्याने छोटे छोटे दिवे लावले आहेत. पण त्यांचा प्रकाश फक्त दिव्याखालीच पडतो. चढ होता, उंची वाढतच होती. त्यामुळे धाप लागणे, दम लागणे वगैरे होत होतच. थांबत, मधे मधे घोटभर पाणी पित आम्ही पुढे चाललो होतो. तीन किलोमिटर गेल्यानंतर आयटीबीपीचा पोस्ट लागला. तिथे सगळ्यांना पाच मिनीटं थांबायला सांगितलं. घोड्यावरून निघालेली मंडळीही हळूहळू येऊन पोहोचत होती. घोड्यावर बसूनही नंदादेवी काकूंना खूपच धाप लागली त्यामुळे त्या एका कट्ट्यावर झोपल्या होत्या. खरतर तिथे कोणाला तसं पडेललं बघणं भितीदायक होतं. मला कोणीतरी समोर येऊन लिमलेटच्या गोळ्या दिल्या. अंधारात कोण होतं वगैरे काही दिसलं नाही पण मी आपल्या निमुटपणे त्या खाऊन घेतल्या. नंतर तसच पुढे चालत राहिलो. पहाट झाली तसं फटफटायला लागलं. आजुबाजूचे मोठे मोठे डोंगर, खोल दर्या, बर्फाळ शिखरं वगैरे दिसायला लागली. हिमालयाचं हे अगदी वेगळं आणि जरासं गुढ, भितीदायक रूप होतं!
एकेठिकाणी रस्त्यात आयटीबीपीचे जवान थांबलेले दिसले. त्यांनी सगळ्या यात्रींना थांबवलं. साधारण पाच वाजले होते आणि अजून फक्त दिड किलोमिटर अंतर राहिलं होतं. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना तिथेच थांबवलं. लिपुलेख साधारण ५००० मिटर उंचीवर येतं. तिथल्या विरळ हवेत फार वेळ थांबणं योग्य नाही आणि म्हणून लवकर वर पोहोचण्यापेक्षा खालीच विश्रांती घेणं चांगलं.
दुरवरून जी पायवाट येताना दिसते आहे ती आम्ही चढून आलो.
खरं सांगायचं तर ह्या ब्रेकमुळेच माझी लय बिघडली. साधारण सहाच्या सुमारास आम्ही पुढे निघालो. आता मघासारखा वेग घेताच येईना. फार दम लागत नव्हता पण पाय उचलत नव्हते. केदार घोड्याची शेपूट धरून पुढे गेला. मी माझ्या वेगाने हळूह्ळू पुढे सरकत होतो. मधे कमानची तब्येत बिघडली. त्याला अल्टीट्युड सिकनेसमुळे म्हणा किंवा बाकी कशाने म्हणा एकदम उलटी झाली. तो आदल्या दिवशीपासूनच थकलेला दिसत होता. दोन दिवसांपूर्वीची ओली पार्टी एकंदर त्याला महाग पडत होती. अभिलाष विचारायला आला की घोड्यावर बसायचं आहे का? म्हटलं नको आता पाऊण किलोमिटर अंतरासाठी कशाला घोड्यावर बसा. तसाच पुढे चालत राहिलो. एक मोठी चढण चढून गेल्यावर लिपूलेखचा सगळ्यात वरचा पॉईंट दिसायला लागला. जेमतेम अर्धा किलोमिटर अंतर राहिलं होतं. धापा टाकत, खोल श्वास घेत पुढे जात होतो. हातातल्या काठीचा उत्तम आधार मिळत होता. एक आयटीबीपीचा अधिकारी येऊन म्हणाला घोड्यावर बसणार आहेस का? म्हटलं नाही. तसं होत काही नाहीये, फक्त फार वेगात जाता येत नाहीये. तो म्हणाला हरकत नाही, अजिबात काळजी करू नकोस, मोजून चार पावलं चालून अर्धा मिनिट थांब तरी पोचशील वेळेत. एक उजवीकडचं वळण गेल्यावर हिय्या करू निघालो ते एकदम सीमेपाशी येऊनच थांबलो. सगळ्यात उंचीवरच्या त्या ठिकाणी पोहोचून फारच भारी वाटलं. एका बाजूला भारत आणि एक अरूंद बोळकांडी ओलांडून पलिकडे तिबेट! वर पोहोचलेले सगळे यात्री वाटेच्या आजुबाजूला बसले होते. आज आम्हांला घोडेवालेआणि पोर्टरचा निरोप घ्यायचा होता. ते परत येताना इथे भेटणार होते. त्यांना अर्धे पैसे द्यायचे होते. त्यावरूनही बरीच चर्चा झाली होती की अर्ध्यापेक्षाही कमीच पैसे द्या म्हणजे ते नक्की परत येतील वगैरे. आम्हांला आमच्या पोर्टर, घोडेवाल्यांनी अजिबात कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नव्हता. अतिशय प्रामाणिक होते ते. शिवाय केवळ तीन महिने चालणारं हे काम त्यांच्या रोजी रोटीचं होतं त्यामुळे ते परत न येण्याची शक्यता आम्हांला वाटत नव्हती. मी आणि केदारने त्यांना अडवून न धरता अर्धे पैसे देऊन टाकले. आता आमची सॅक आमच्या जवळ होती. तिथे बसल्या बसल्या काही फोटो काढले.
थोड्यावेळाने परतून येणारी बॅच क्रमांक तीन आलेली असल्याचा संदेश वॉकीटॉकी वर आला आणि त्या बाजूने चीनी गाईड आणि अधिकारी वर येऊन पोहोचले. आयटीबीपीच्या अधिकार्यांनी त्यांच्याशी आमच्या एलओची ओळख करून दिली आणि सगळ्या यात्रींना रांगेने सीमा ओलांडून पलिकडे सोडायला सुरुवात केली. एकंदरीत तिथे सावळा गोंधळ सुरू होता. दोन्ही बाजूंचे अधिकारी, घोडेवाले, पोर्टर, गाईड, दोन्ही बॅचेसचं सामान आणि बारक्या रस्त्याने एका बाजून जाणारे आणि दुसर्या बाजूने येणारे यात्री.
खालच्या फोटोत उजव्या बाजूला भारत आणि डाव्या बाजूला चीन.
परतणार्या यात्रींना आयटीबीपीचे जवान तसेच लेडी कॉन्स्टेबल्स खूपच मदत करत होत्या. आम्हांला प्रवासासाठी शुभेच्छा देत होत्या. पलिकडे गेल्यावर तीव्र उतरंड आहे. साधारण किलोमिटरभर गेल्यावर परतणार्या बॅचच्या एलओ, सास्वती डे, भेटल्या. दोन्ही एलओंनी आपापसात सल्ल्यांची देवाणघेवाण केली. तिसर्या बॅचच्या जातानाच्या प्रवासात एक घोडा काली नदीत पडून वाहून गेला. मग ह्या सास्वती मॅडमनी पुढाकार घेऊन वर्गणी गोळा केली आणि घोडेवाल्याला घोडा विकत घेण्यासाठी आर्थिक मदत दिली. त्यामुळे सास्वती मॅडमचं आमच्या पोर्टर आणि घोडेवाल्यांनी अगदी तोंडभरून कौतूक केलं होतं. आमच्या एलओ पेक्षा त्या खूपच ज्युनियर होत्या (ऐकीव माहिती, वयवर्ष अठ्ठावीस फक्त) २००८च्या बॅचच्या. पण एकंदरीत त्यांचे नेतृत्त्वगुण आमच्या एलओपेक्षा खूपच चांगले असावेत असं वाटलं.
पुढे गाडी रस्ता लागला पण तिथल्या जीपवाल्याने सांगितलं खाली तुमची बस उभी आहे तिथे जा. सामान घेऊन तो तीन किलोमिटरचा उतार उतरणं नको झालं! म्हणजे आधीच्या चढाचा जितका आला नाही तितका वैताग ह्या उताराचा आला! खाली दोन साध्या बस उभ्या होत्या. सगळे यात्री येईपर्यंत बराच वेळ गेला. शेवटच्या काही यात्रींना जीपने आणलं. मग चिनी अधिकार्याने सगळ्यांचे पासपोर्ट तपासले. आम्ही बर्याच कहाण्या ऐकल्या होत्या की चिनी अधिकारी लहरी असतात, तुम्ही नुसतं खोकलात तरी तब्येत बरी नाही असं कारण सांगून तुम्हांला परत पाठवून देतात वगैरे. आम्हांला सुदैवाने तसा काही अनुभव आला नाही. तपासण्या झाल्यावर बस निघाल्या. बस सुटल्यावर जवळजवळ सगळे जण पेंगायला लागले. ह्या सीमेपासून तकलाकोट २५-३० किलोमिटरवर आहे. हे ह्या भागातलं मोठं शहर आहे. सगळ्यांत आधी आम्हांला कस्टम ऑफिसमध्ये नेलं. तिथे सामानाची तपासणी करून एकदाचे आम्ही गेस्ट हाऊसला जाऊन पोहोचलो. हे शहरातलं गेस्ट हाऊस असल्याने अगदी व्यवस्थित खोल्या आहेत. एक जुनी आणि एक नवी इमारत आहे. आम्हांला जुन्या इमारतीत खोली मिळाली. त्यावेळी तिथे दुपारचे साडे बारा म्हणजे भारतातले सकाळचे दहा वाजले होते. इथल्या आणि भारतातल्या वेळेत अडीच तासांचा फरक आहे. जेवण दोन वाजता मिळेल म्हणे. आता इथे केएमव्हीएन, आयटीबीपी सारखी चोख व्यवस्था, प्रेमळ स्वागत काही नव्हतं. तुम्ही परक्या देशात आलात हे लगेच जाणवलं. आम्ही रात्री दोन वाजता निघालेलो, मध्ये काही खाणं पिणं नाही आणि आता जवळ जवळ बारा तासांनी जेवण मिळणार होतं. आमचं मुख्य सामान ताब्यात मिळाल्यानंतर त्यातला कोरडा खाऊ खाल्ला आणि गरम पाण्याने अंघोळ केली. दोन वाजता जेवण तयार झालं. जेवण तसं यथातथाच होतं पण मिळेल ते खाऊन सगळे झोपायला पळाले. चिन सरकारतर्फे प्रत्येक बॅचकरता एक हिंदी आणि एक इंग्रजी येणारा तिबेटी गाईड नेमलेला असतो. आमच्या गाईडची जेवताना ओळख झाली. गुरू हिंदीभाषिक आणि एक इंग्रजी भाषिक बाई (तिचं नाव विसरलो) असे दोन गाईड होते. गुरूचं आणि आमच्या बॅचचं शेवटपर्यंत जमलं नाही. पहिल्या दिवशीपासूनच हे जाणवत होतं.
चिनी सरकारला चिनमधल्या वास्तव्याचे, बसचे आणि तीन दिवसांच्या जेवणाचे ८०० अमेरिकन डॉलर द्यावे लागतात. केदार फायनान्स कमिटीत असल्याने ते डॉलर जमा करायचं काम त्याच्यावर आलं. त्याचे तास दोन तास त्यात गेले. मी मात्र जेवण झाल्या झाल्या झोपायला गेलो. चांगली तीन चार तास गाढ झोप झाल्यावर बरं वाटलं. . केदारने चहाच्या पुड्या आणलेल्या असल्याने आमच्या मस्त टीपार्ट्या चालायच्या. संध्याकाळी आसपास पाय मोकळे करून आलो आमचं हॉटेल होतं तो मुख्य रस्ता होता. तो चांगलाच मोठा म्हणजे चार पदरी, सिमेंटचा होता. गर्दी अजिबात नव्हती. आजुबाजूला दुकानं, बॅंका, पोस्ट ऑफिस, सरकारी ऑफिसं वगैरे होती. ह्या सगळ्या ठिकाणी काम करायला चिनी लोकं होती. पण बांधकाम, दुकानदारी, रस्त्यांची कामं वगैरे तिबेटी लोकं करताना दिसत होती. तिबेटी परंपरा, भाषा, पद्धती वगैरे मोडून काढून तिथे चिनी गोष्टी रुजवण्याचे पध्दतशीर प्रयत्न चिन सरकारतर्फे सुरू असतात. शिवाय दारू, सिगरेट कुठल्याही बंधनाशिवाय खुलेआम सगळीकडे विकली जात होती. घेणार्यांचे वय कुठेही तपासलं जाताना दिसत नव्हतं. 'लोकांना व्यवसानाधीन केलं की त्यांची सारासार विचार करायची बुद्धी नष्ट होते आणि मग त्यांच्यावर सत्ता गाजवता येते' हा सरळ सोपा मार्गे चिन तिबेटमध्ये वापरत आहे असं वाचनात आलं होतं. त्याचं थोडफार प्रत्यंतर इथे येत होतं.
हा तकलाकोटला काढलेला एकमेव फोटो :
दुसर्या दिवशी तकलाकोटमध्ये विश्रांतीचा दिवस होता.कैलास परिक्रमेकरता वेगळा पोर्टर आणि घोडा इथे करावा लागतो. त्याकरता पैसे तकलाकोटलाच भरावे लागतात. भारतातल्याप्रमाणेच इथेही दोन्ही घ्यायचं हे माझं आधीच ठरलेलं होतं. पण मागच्या अनुभवावरून केदारने आता घोडा न घेण्याचं ठरवलं. हे पैसे चिनी चलनात म्हणजे युवानमध्ये द्यावे लागतात. त्यामुळे दुसर्या दिवशी बँकेत जाऊन पैसे बदलून घेणे हा मुख्य कार्यक्रम होता. हे पैसे बदलायचं कामही फायनान्स कमिटीवर ढकलायचा प्रयत्न झाला पण केदारने ठाम विरोध केला आणि आम्हीही जमेल तशी साथ देऊन प्रत्येकाने आपले पैसे आपण बदलून आणू असं ठरवलं. आम्ही सगळे मिळून बँकेत गेलो आणि बघितलं तर तिथल्या बाईला अजिबात इंग्लिश कळत नव्हतं. मग त्या गुरूला बोलावून आणलं. शेवटी आम्ही दहा पंधरा जणांनी असं ठरलं की अनिरुद्ध आणि श्रुती कडे सगळ्यांनी पैसे जमा करायचे आणि त्यांनी ते बदलून आणायचे. कारण रांगेत सगळ्यात पुढे तेच होते.आम्ही अर्धे पैसे तिथे बदलले आणि उरलेले अर्धे पुढे असलेल्या नेपाळी मार्केटमध्ये बदलले. नेपाळी मार्केटमध्ये चलनाच्या दरावरून पण घासाघीस चालू होती! तिथल्या पोस्टऑफिसमध्ये चक्कर टाकली. रानड्यांनी तिकडून घरी कार्डे पाठवली. (ती आम्ही परतल्यानंतर महिन्याभरानंतर मिळाली!) नंतर इकडे तिकडे टंगळमंगळ करून हॉटेलवर परतलो. अनिरुद्ध आणि श्रुतीने एकदम व्यवस्थित सगळ्यांच्या पैशांची पुडकी, त्यावर हिशोबाची चिठ्ठी वगैरे तयार करून ठेवलं होतं. अगदी गुज्जुभाई बिझनेसवाले शोभले!
दुपारी खोलीत थोडावेळ आराम करून पुन्हा बाहेर पडलो. आता हाती युवान आलेले असल्याने लोकं आजुबाजूच्या दुकानांमधून, नेपाळी मार्केटमधून जोरदार खरेदी करत सुटले होते! खरतर तिथल्या मालाचा दर्जा फार काही उच्चबिच्च नव्हता पण भरपूर घासाघीस करून खरेदी होते आहे म्हणून सगळे पेटले होते आणि आमचे एलओ त्यात आघाडीवर. मी काहीच घेतलं नाही. 'आधी दर्शन कैलासाच, मग दुकानदाराचं!' असा विचार करून मी जी काय थोडीफार खरेदी करायची असेल ती परत येताना करायची असं ठरवलं होतं. मानस सरोवराचं पाणी घेऊन येण्यासाठी बाटल्या तकलाकोटहूनच घ्याव्या लागतात. तिथे त्यासाठी कॅन मिळतात ते घेऊ नका कारण ते फुटून जातात असं सास्वती मॅडमनी लिपुलेख ओलांडताना सांगितलं होतं. त्यामुळे लेमनेड, पेप्सी वगैरेच्या लहान लहान बाटल्या विकत घेऊन त्या रिकाम्या करून घेतल्या. रात्री आम्हांला परत ते चिनी पद्धतीचं भारतीय जेवण जेवणं नको वाटत होतं. म्हणून नेपाळी मार्केटमध्ये काही मिळतय का पहायला गेलो तर तिथे खाण्यायोग्य काहीच वाटलं नाही. मग फक्त मिठ घातलेला चिनी चहा घेतला आणि परतलो.
दुसर्या दिवशी पासून कैलास आणि मानससरोवर परिक्रमा सुरू होणार होत्या. पूर्वी बॅच विभागून अर्धे लोकं कैलास परिक्रमेला आणि उरलेले अर्धे मानससरोवराला आणि मग परत येऊन उलट, असं करत असत. कारण त्यावेळी एका ठिकाणी ६० जणं रहायची सोय नव्हती. पण आता मात्र मोठी गेस्ट हाऊस बांधलेली असल्याने पूर्ण बॅच एकत्रच जाते. परिक्रमे दरम्यानच्या कॅम्पवर आपण भारतातून आणलेल्या शिध्याचा स्वंयपाक करण्यासाठी नेपाळी आचारी बरोबर घ्यावे लागतात. त्यांचे पैसे कॉमन फंडमधून देतात. त्यांना भारतीय पद्धतीचं जेवण बनवता येतं. आमच्या ५० जणांसाठी मिळून ४ आचारी नेमले.
आमच्या बॅचमधला रघू इथे भारताच्या बाजूने पहिल्यांदा येत असला तरी एकंदरीत चौथ्यांदा कैलास मानस यात्रेला येत होता. आधी तो नेपाळमार्गे जाऊन आला होता. संध्याकाळी त्याने सगळ्यांना आधीचे अनुभव तसेच परिक्रमेतली महत्त्वाची ठिकाणं, नैसर्गिक तसेचआध्यात्मिक वैशिष्ट्ये सांगितली. हे पाहून आमच्या गुरूचं डोकं फिरलं. नंतर तो रघूला दरडावून गेला की यात्रेचा गाईड मी आहे इतर कोणी नाही! गुरूचं आधीच आमच्या बॅचशी फार जमत नव्हतं, ह्यानंतर तो अजूनच पेटल्यासारखं करायला लागला. येता जाता भारताला, केएमव्हिएनला नावं ठेव, यात्रींचा अपमान कर वगैरे प्रकार करायला लागला. सगळे सोडून देत होते पण पुढे मात्र ठिणगी पडलीच.
तकलाकोट शहरातून उद्या निघायचं होतं. आमचं सगळ्यांचच अॅक्लमटायजेशन व्यवस्थित झालेलं असल्याने कोणाला विरळ हवेचा काही त्रास होत नव्हता. पण इथून पुढचे कॅम्प पुन्हा दुर्गम भागात होते. शिवाय डोलमा पास ह्या यात्रेतला सगळ्यात अवघड आणि उंचीवरचा ट्रेक आता दोन दिवसांवर येऊन ठेपला होता. त्यामुळे व्यवस्थित विश्रांती घेण्याच्या दृष्टीने सामान सुमान आवरून सगळे अगदी वेळेवर निद्राधीन झाले.
----------------------------------------------
भाग पाचवा : http://www.maayboli.com/node/51433
अप्रतीम आणी गुढ. खूप काही
अप्रतीम आणी गुढ. खूप काही लिहावेसे वाटते पण शब्द सुचत नाहीत. धन्यवाद पराग.:स्मित:
मी पण इथे बसून ट्रेक करतेय
मी पण इथे बसून ट्रेक करतेय असं वाटतंय
पराग, मस्तच!
लिहिताना लेखकाला जो
लिहिताना लेखकाला जो पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला असेल... तेवढाच वाचकालाही मिळतोय, प्रत्यक्ष अनुभव घेतला नसला तरीही !
पराग, लवकर लव्कर पूढचे भाग
पराग, लवकर लव्कर पूढचे भाग लिही.
मस्त लिहितोयस./
मस्त चाललीये यात्रा. यावेळेस
मस्त चाललीये यात्रा. यावेळेस दोन भागांमध्ये खूपच गॅप झालीये.
हा पण भाग मस्त
हा पण भाग मस्त
सुंदर! गॅप पडूनही लिंक मात्र
सुंदर!
गॅप पडूनही लिंक मात्र लगेच लागली... असच लिहित रहा.
धन्यवाद. यावेळेस दोन
धन्यवाद.
यावेळेस दोन भागांमध्ये खूपच गॅप झालीये.>>>> आडो, हो ना ! ऑफिसमध्ये काम आणि दिवाळी त्यामुळे वेळ लागला. पण पुढचे भाग लिहितो लवकर.
हा भागही मस्तच!!!!!!!!!! खुप
हा भागही मस्तच!!!!!!!!!!
खुप दिवसापासुन वाट बघत होतो, पण........
देर आए, दुरूस्त आए |
अदम, इतके छान लिहितोस ना.. ..
अदम, इतके छान लिहितोस ना.. .. तुझ्या लिखाणात एक अविट गोडी असते!!!
हा भाग पण मस्त! आता पुढचा
हा भाग पण मस्त! आता पुढचा कधी? वाट बघतोय.
मस्त लिहीला आहेस हाही भाग
मस्त लिहीला आहेस हाही भाग ..
खूप वर्षं झाली जाऊन त्यामुळे नीट आठवत नाही पण आम्ही बद्रीनाथ ला गेलो असताना (गढवाल मंडल विकास निगम बरोबर) एका छोट्या ट्रिप करता गेलो होतो तिथून पुढे .. काही अंतर बसने आणि मग पुढे चालत .. एक ग्लेशियर दिसलं .. पुढे कुठल्या तरी नदीच्या पात्रावर मोठा बोल्डर होता त्यावरून पलिकडे जायला .. त्याची स्टोरी अशी म्हणे की पांडव स्वर्गाच्या वाटेला तिकडून गेले आणि नदीचं पात्र ओलांडण्याकरता भीमाने तो मोठा दगड असा आडवा पाडला द्रौपदी ला जाता यावं म्हणून .. नीट आठवत नाही पण बहुदा तिकडे एक गुहा ही होती तीच व्यासगुंफा ज्यात व्यासांनीं महाभारत लिहीलं अशीही गोष्ट सांगितल्याचं आठवतंय .. तर अशा नक्की किती गुंफा आहेत व्यासांनीं लेखनासाठी शोधून काढलेल्या कोणास ठाऊक ..
पण असंही असू शकेल की मला नीट आठवत नाही आणि त्या रस्त्याने तुम्ही बघितलेल्या व्यासगुंफा ला जाता येत असेल .. मी घरी विचारून कन्फर्म करून सांगते .. आमच्या मातोश्रींनीं दोन्हीं गुंफा बघितलेल्या आहेत जर मला आठवतंय तसंच असेल तर ..
वा! वा! मस्तच मधे बरेच दिवस
वा! वा! मस्तच
मधे बरेच दिवस गेल्यामुळे धागा उघडल्यावरही हे सविस्तर वाचावं की नुसतंच चाळावं? - असा विचार आला. कारण लिंक लागणार नाही असं वाटलं. पण न वाचणं हे पण मनाला पटेना
म्हणून वाचायला सुरूवात केली. आणि रंगून जायला झालं.
तुझ्या आणि केदारच्या वर्णनात काही बेसिक गोष्टी सोडल्या (म्हणजे गावांची/कॅम्प्सची नावं, निघायच्या वेळा इ.) तर अजिबात रिपिटिशन्स नाहीयेत. हे फार भारी आहे!
तुझ्या आणि केदारच्या वर्णनात
तुझ्या आणि केदारच्या वर्णनात काही बेसिक गोष्टी सोडल्या (म्हणजे गावांची/कॅम्प्सची नावं, निघायच्या वेळा इ.) तर अजिबात रिपिटिशन्स नाहीयेत. हे फार भारी आहे! >>>> म्हणून तर तोच प्रवास वाचतानाही वेगळा प्रवास वाटतोय.
दोघांनी ओरिजिनॅलिटी मस्त राखली आहे.
सशल, बद्रिनाथजवळच्या व्यास
सशल, बद्रिनाथजवळच्या व्यास गुंफेबद्दल एक सहयात्रीही म्हणत होते. गाईड म्हणाला की बद्रीनाथ तिथून जवळ आहे आणि बद्रिनाथपासूनही चिन बॉर्डर खूप जवळ आहे. त्यामुळे दोन्ही कडून दिसणारी गुंफा एकच आहे. तू आईला पण विचार नक्की.
आता पुढचा कधी? वाट बघतोय. >>> दामले, टाकलेला आहे.
ललिता, केश्विनी,बी आणि नरेश माने, धन्यवाद.
बोलले आईशी .. बद्रीनाथ जवळही
बोलले आईशी ..
बद्रीनाथ जवळही एक गुंफा आहे जी व्यास गुंफा आणि ज्यात व्यासांनी गणपतीला महाभारत सांगितलं ती आहे .. कैलास च्या वाटेवर जी आहे त्यात त्यांनीं तपश्चर्या केली म्हणे ..
ह्या बद्रीनाथ जवळच्या गुहे बद्दल कथा अशी की व्यासांनीं म्हंटलं मी फक्त एकदाच काय ते सांगेन .. लक्ष देऊन ऐक .. बाजूला मंदाकिनी नदी खळखळत होती .. त्यामुळे गणपतीला ऐकण्यात थोडा प्रॉब्लेम येत होता .. आणि एक श्लोक अॅक्च्युअली मिसींग आहे म्हणे महाभारतातून .. तर ह्यामुळे गणपतीने चिडून मंदाकिनी नदीला शाप दिला आणि त्यामुळे ती गुप्त झाली .. मग पुढे कुठेतरी ती परत वर येऊन गंगेला मिळते ..
कैलास वाटेवर जी गुहा आहे त्यात म्हणे एक पुजारी रोज जातो दिवा लावायला ..
खरंखोटं कैलास आणि व्यास जाणे ..
मस्त वाटतं पण भारीच कष्ट
मस्त वाटतं पण भारीच कष्ट आहेत या यात्रेत. मी तरी वाचनावरच समाधान मानणार आणि वाचन खूप आनंद देतंय.
मस्त वाटतं पण भारीच कष्ट आहेत
मस्त वाटतं पण भारीच कष्ट आहेत या यात्रेत. मी तरी वाचनावरच समाधान मानणार आणि वाचन खूप आनंद देतंय. >>
मलाही थोडं असंच वाटलं. म्हणजे सगळं पाहायला आवडेल पण जिवाला एवढा जास्त त्रास करुन घेण्यात काय अर्थ आहे ;). सरळ घोड्यावर बसून किंवा सोप्पं नेपाळमार्गे जास्तीत जास्त बस आणि गरजेपुरतं चालणं असं करुन कैलास आणि मानससरोवर पाहायला आवडेल.
नुस्ती गडबड, एखाद्याठिकाणीही उसंत नाही अश्यापेक्षा जरा निवांतही जायला आवडेल.
नो डाऊट, केदार, परागनी जे केलं त्यातही एक थ्रिल असेल!! आणि दोघांचेही लेख अगदी मनापासून एंजॉय करतेय. अनयाच्या लेखांचीही आठवण होतेय.