प्रिय राजकीय कार्यकर्त्या,
इतर सर्वांना आदरपूर्वक नमस्कार केला आम्ही! प्रेम नसले की माणूस औपचारीक आदरभाव प्रकट करतो. तुझे आणि आमचे तसे नाही. आपले एकमेकांवर काही फार प्रेम आहे असे मुळीच नाही. पण तुझ्याशी औपचारीकपणे वागावे अशीही आवश्यकता नाही.
यंदाच्या राजकीय मोसमात आम्ही पाच पत्रे लिहायचे काम हाती घेतलेले आहे. त्यातील हे पाचवे पत्र तुला उद्देशून!
ह्याआधीची पत्रे ज्यांना लिहिली त्यांच्यापैकीच एखाद्या कोणाच्या तरी पक्षाचा तू कार्यकर्ता आहेस! मग त्यात मोदी आले, सोनिया गांधी आल्या, पवार साहेब आले आणि उद्धव ठाकरे साहेबही आले. राजसाहेबांचा किंवा इतर कोणाचा कार्यकर्ता असलास तरी हरकत नाही. हे पत्र कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याला लागू आहे.
आमच्यासारखाच एक सामान्य मतदार माणूस अचानक राजकीय कार्यकर्ता का होतो ह्याच्या कारणांचा आम्ही तपास केला तेव्हा असे समजले, की खालीलपैकी एखादे कारण असते:
१. त्या त्या पक्षाचे विचार इतके पटले की त्या पक्षाचे काम करायची तीव्र इच्छा झाली. मग ते विचार त्या पक्षाचे किंवा त्या पक्षाच्या नेत्याचे असोत!
२. शिक्षण कमी असल्यामुळे, सत्तेचे आकर्षण असल्यामुळे, दुसरे काहीच करण्याची पात्रता नसल्यामुळे कोणत्यातरी पक्षात वर्णी लावून घेणे व मिरवत राहणे!
३. कुटुंबात किंवा नातेवाईकांत मुळातच कोणी नेता / पुढारी असल्याने आपसूकच त्या पक्षाचे कार्यकर्ते बनणे!
४. समाजकार्याची खरी ओढ असल्यामुळे एखाद्या चांगल्या पक्षाच्या माध्यमातून समाजकार्य करावे ह्या उद्देशाने कार्यकर्ते बनणे!
५. आपल्याला समाजात एक भक्कम बॅकिंग असावे ह्या उद्देशाने एखाद्या बलवान पक्षाचे कार्यकर्ते बनणे!
ह्यातील काही कारणे उदात्त तर काही स्वार्थापोटी बनलेली कारणे आहेत. पण हे पत्र ह्यातील कोणत्याही कारणाने कार्यकर्ता झालेल्यासाठी आहे.
त्याचे काय आहे, की एकदा माणूस कार्यकर्ता झाला की पक्षाच्या विचारांचा प्रसार करताना, पक्षाच्या विचारांचे, ध्येयांचे, मतमतांतरांचे मनावर इतके बंबार्डिंग होते की माणूस मूळ उद्देश विसरून अस्सल कार्यकर्ताच बनून जातो. हे मनपरिवर्तन अलगदपणे होत राहते. त्या पक्षाच्या विचारांचे पाईक आपले घट्ट साथीदार बनू लागतात. त्या पक्षाच्या विचारांचे विरोधक हे आपले कट्टर विरोधक होऊ लागतात. रोज घडणार्या राजकीय घटनांचा आपल्यासाठी असलेला अर्थ काढण्यात रस निर्माण होऊ लागतो. एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ, अहमअहमिका, स्पर्धा निर्माण होते. विरुद्ध पक्षाचे लोक शोधून शोधून त्यांचा वैचारीक निषेध करण्यात मजा येऊ लागते. आपल्याला एक ओळख प्राप्त होते. अशी ओळख, जी देण्यास आपले आई वडील असमर्थ ठरलेले असतात. आपले शिक्षण असमर्थ ठरलेले असते. तसेच आपले कर्तृत्वही असमर्थ ठरलेले असते. अशी ओळख जिला मुळातच एक वलय असते. भले तो पक्ष गेले कित्येक दशके सत्तेत आलेला नसेल, पण तरीही एक मिनिमम वलय त्या ओळखीला असतेच. त्या ओळखीच्या मागे एक सुप्त सामर्थ्य असते. हे सामर्थ्य ह्या व्यक्तीच्या पाठीमागे आहे हे बघणार्याला लगेच समजते व त्यामुळे त्या बघणार्याचे वर्तनही लगेच बदलते. अचानक तोंडात मोठमोठी नांवे, इतिहासातील संदर्भ, 'आम्ही यंव केले, त्यंव केले'चे तपशील, आत्मस्तुतीचा अव्याहत झरा आणि संधीसाधूपणाची चिन्हे येऊ लागतात. कार्यकर्ता होण्यापूर्वी राजकारण, समाजकारण ह्याच्याशी कदाचित काहीही घेणेदेणे नसलेला एक माणूस अचानक एक ठाम भूमिका असलेला माणूस बनतो. चार लोकं त्याच्याशी बोलायला येतात. येणारेजाणारे रामराम करू लागतात. 'म्युन्सिपाल्टी', काही इतर शासकीय संस्थांमध्ये त्याच्या फेर्या सुरू होतात. 'जानपछान' वाढू लागते. अनेक थोर जण नावाने ओळखू लागतात. 'आपला तो हा आता तिथे नसतो' वगैरे वाक्ये सहज टाकता येऊ लागतात. पक्षाचा थोडाफार निधी अधूनमधून हातात येतो. त्यातून पक्षाचे कार्य करताना सामान्यांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्यांना धीर देऊन आपण कोणी आहोत असे ठसवता येते. लहानमोठी मंडळे काढता येतात. त्यांचे अध्यक्ष होता येते. परिसरातील एखाद दोन उद्घाटने आपल्या 'शुभहस्ते' होतात. वर्गणीची खंडणी करता येऊ लागते. नावावर कोणतेही कर्तृत्व नसताना रस्ता जाम करून गुलाल उधळत किंवा रेकॉर्ड्स लावून बेहोष होऊन नाचता येते. भाषणे देण्याची थोडी थोडी सवय होऊ लागते. पक्षातील थोड्या अधिक वरच्या नेत्यांशी रॅपो डेव्हलप होऊ लागतो. वेषभूषा तर केव्हाच बदललेली असते. माणूस प्रचंड बोलका होतो. प्रचंड आत्मविश्वासयुक्त होतो. पक्षाने काढलेल्या नवीन संघटनांच्या अधिकारीपदी हळूहळू वर्णी लागू शकते. त्यात वादविवाद होऊ लागतात. पक्षांतर्गत राजकारण हा प्रत्येक श्वासाला इंधन पुरवणारा विषय ठरू लागतो. आता कार्यकर्ता होण्याआधी आपण कोण होतो, काय होतो, कुठे होतो आणि का होतो हे आठवेनासे होते. आपली मूळ ओळख आता नामशेष झालेली असते. आपली एकमेव ओळख आता राहिलेली असते. त्यात अग्रस्थानी पक्षाचे निवडणूक चिन्ह असते. त्याखालोखाल पक्षाचे सर्वोच्च नेते, त्यांच्या परिवारातील दुसर्या फळीचे नेते, राज्याचे सर्वोच्च नेते, जिल्हा, शहर, वॉर्ड येथील सर्वोच्च नेते आणि सरतेशेवटी आपले छायाचित्र असते. आपले नांव चांगले सागर, अनिकेत, अथर्व वगैरे असले आणि वय पंचवीसच्या आसपास असले तरी जरा दबदबा निर्माण व्हावा म्हणून नावाच्या मागे किंवा पुढे आबा, भाऊ, दादा, नाना, तात्या, बाबा, साहेब अशी उपनामे लागतात. युवानेता, स्फुर्तीस्थान अश्या पदव्याही लागतात. कधी आपल्या छायाचित्रात आपल्या अंगावर सोन्याची रेलचेल असते तर कधी डार्क गॉगल असतो. कधी दोन्ही हातात मोबाईल फोन्स असतात तर कधी आपला एक हात आकाशाच्या दिशेने उचललेला आणि एक ताठ बोट सूर्याला धमकावणार्या अवस्थेत असते. कधी ह्यातले काहीच नसते तर नुसताच हासरा चेहरा असतो. खाली घोषणा असते. आता आपल्याला ठरलेल्या ठिकाणी पोचायला उशीर होणे हे भूषणावह ठरणार असते. आता आपले एक टपरीवजा ऑफिस असणे ही किमान गरज असते.
एका माणसाचा एक कार्यकर्ता झालेला असतो. अश्या लाखो, करोडो कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आपल्या पक्षाची पालखी ठेवून त्यात बसून राष्ट्रीय नेते आणि संस्थापक लोक ह्या समाजाला दिशा देतात. राजकारण करतात. विकास करतात. निर्णय घेतात. गाजतात, पडतात, ज्येष्ठ होतात, महान होतात, दिग्गज होतात आणि स्वर्गवासीही होतात.
सगळे मोदी, सगळे गांधी, सगळे ठाकरे आणि सगळे पवार ह्याच कार्यकर्त्यांच्या जीवावर हे सगळे होतात.
हा कार्यकर्ता मग वकूबानुसार, नेत्याशी असलेल्या घसटीनुसार, वक्तृत्वानुसार, कर्तृत्वानुसार आणि नशिबानुसार वरवर चढतो किंवा आहे तिथेच राहतो, काहींची तर पक्षातून हकालपट्टीही होऊ शकते. काही स्वतःहून पक्ष बदलतात. काहीजण असे असतात की ते ज्या पक्षात असतात तो पक्ष बाकीच्यांना योग्य वाटू लागतो.
प्रिय कार्यकर्त्या, स्व. बाळासाहेबांच्या हयातीत जेव्हा राजसाहेब विभक्त झाले तेव्हा शिवसैनिकांच्या मनात कोणते तुफान उभे राहिले असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. कालपर्यंत बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करून दिवसाची सुरुवात करणारे आजपासून नवनिर्माणाच्या प्रवाहात सूर मारू लागले. मतदार चकीत झाले होते, संभ्रमीत झाले होते. कार्यकर्ते थिजले होते. किंकर्तव्यमूढ झाले होते. आणि नेते? नेते भाषा करत होते चिकन सूप आणि वडापावची! नेते भाषा करत होते वजाबाकीच्या राजकारणाची! नेते भाषा करत होते स्वतंत्र संसार थाटण्याची! पण तो घरचा मामला होता. ज्यांचे राजसाहेबांवर अधिक प्रेम होते ते मनसेत गेले, बाकीचे होते तिथेच राहिले. तो अध्याय संपला. मनसेची काही स्थानिक ठिकाणी सत्ताही आली, शासनकारभार असमाधानकारकही ठरला. राजसाहेबांचा करिष्मा सीमीतही झाला. शिवसेनाच खरी ताकद आहे असेही सिद्ध होऊ लागले.
पण प्रिय कार्यकर्त्या, मला सांग, मनात एक जखम राहिलीच ना? आपण आलो शिवसेनेकडे आणि आता आहोत मनसेमध्ये! ही भावना मन पोखरत राहिलीच ना? कालवर ज्यांच्या खांद्याला खांदा लावून मराठी माणसासाठी सत्तेला धडका दिल्या, त्यांना आजपासून पाण्यात पाहायचे. त्यांना शत्रू क्रमांक एक मानायचे. वरवर मानायचे की आतूनही मानायचे? पूर्ण विभक्त झाल्याचे पटवून घ्यायचे की राज आणि उद्धव कधीतरी एकत्र येतील असे स्वप्न बोलून दाखवत राहायचे आणि स्वतःलाही आशा दाखवत राहायचे?
मतदारांना काय उत्तर द्यायचे? ओळखीपाळखीच्यांना, नातेवाईकांना, घरच्यांना काय सांगायचे? आपले विचार क्षणात बदलले म्हणून? ते बदललेले असतात का? की नसतातच? की आपणही इतके स्वार्थी झालेलो असतो की तत्त्वे गेली खड्ड्यात, राजकारण महत्वाचे हे आपल्यालाही मान्य झालेले असते?
प्रिय कार्यकर्त्या, मतदार द्यायचे त्यांना मत देतातच, नेते करायचे ते करतातच, आव्हान उभे ठाकते तुझ्यापुढे! रक्तापासून सगळे बदलावे लागते तुला.
ह्या लोकसभेच्या निवडणूकीत तर इतिहासच घडला. प्रदीर्घ काळ देशावर राज्य केलेला काँग्रेस पक्ष हारला आणि भाजपची स्पष्ट बहुमतातील सत्ता आली. शेंबड्या पोरालाही कोणी 'अबकी बार' म्हणून विचारले तर तेही 'मोदी छलकाल' असे बोबड्या भाषेत बोलू लागले. मोदी सरकार आले. मोदी सगळे जग फिरून आले. चार चार, पाच पाच महिने झाले तरी रोज येणार्या त्यांच्या बातम्यांमुळे ते अधिकच लोकप्रिय होऊ लागले. कधी एकदा आपल्याइथे निवडणूका होतात आणि आपण मोदींना मत देतो असे मतदारांना होऊ लागले.
आणि महाराष्ट्रात निवडणूका आल्या.
सोनियांचे अभारतीयत्व हा मुद्दा करून काँग्रेसपासून फुटून पुन्हा काँग्रेसशीच हातमिळवणी करून सत्ता भोगणारा राष्ट्रवादी हा एक पक्ष होता. त्या पक्षाने सत्ता भोगली असली तरी काँग्रेसचा वरचष्मा आणि शासनशैली त्याला अजिबात मान्य नव्हती. थेट टीका होत होती एकमेकांवर! मोदी लाटेवर स्वार होऊन अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेले. स्वतःहून मातोश्रीवर न जाण्याचा त्यांचा निर्णय बाळासाहेबांच्या हयातीत अशक्यप्राय होता हे अनेकांनी बोलून दाखवले. त्यांच्याशी बोलायला युवराजांना धाडण्यात आले आणि जहरी अपमान करण्यात आला.
जागांची बोलणी सुरू झाली ती संपेचनात! तासातासाला निरनिराळ्या बातम्या येऊ लागल्या. राष्ट्रवादी आणो काँग्रेस ह्यांच्यातही एकमत होईना, शिवसेना आणि भाजप ह्यांच्यातही! प्रथम त्या सर्वांच्या मनातील सत्तालालसा पाहून मतदार मजा चाखू लागले. हास्यरस वाहू लागला. थोडे दिवसांनी टिंगल होऊ लागली. टवाळी होऊ लागली. व्हॉट्स अॅप, फेसबूक येथे यथेच्छ टीका होऊ लागली. तरी नेत्यांची डोकी ठिकाणावर येईनात!
जसजशी अंतिम घटिका जवळ येऊ लागली तसतसे एकापेक्षा एक सुपिरियर नेते चर्चेत सहभागी होऊ लागले. प्रत्येकाला इगो होता, स्वार्थ होता, गरज होती, मजबूरी होती, पण समीकरणापासून प्रत्येकजण तितकाच लांब होता. मिनिटामिनिटाला सेल फोन्स, सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष चर्चेतून डेव्हलपमेंट्स येऊन आदळत होत्या. मतदारांचे हासणे, टिंगल आता थांबली होती, त्याची जागा रोषाने घेतली होती. प्रतिमांचा चक्काचूर होत होता. नेत्यांची छी थू सुरू झाली होती. भाषेने व्यावहारीक व सांसदीय ह्या पातळ्या धुडकावून अर्वाच्यतेची पातळी गाठली होती. टीव्हीवर सगळ्या वाहिन्यांवरून विश्लेषक घसा कोरडा करून स्वतःचे म्हणणे मांडत होते.
प्रिय कार्यकर्त्या, आम्ही सामान्य मतदार आमची मते केव्हाच ठरवून मोकळे झालेलो होतो. युती किंवा आघाडीला आपण ज्या पक्षासाठी मत द्यायचो त्याच पक्षाला मत द्यायचे किंवा मतच द्यायचे नाही. नेते त्यांच्या जागी ठाम होते, मतदार त्यांच्या जागी ठाम होते. पण फ्रायिंग पॅनमध्ये जिवंतपणी तळण्यात येत असलेल्या खेकड्याप्रमाणे तडफडत आणि तळमळत होतास तू!
तुझा आवाज संपलेला होता. तुझ्याकडे कोणतीही भूमिका उरलेली नव्हती. आमचे नेते काय ते ठरवतील म्हणताना 'आमचे' आणि 'नेते' ह्या दोन शब्दांमध्ये तू मनातल्या मनात हरामखोर, स्वार्थी, अडेलतट्टू, बाराबोड्याचे असे अर्वाच्य शब्द मनातल्या मनात उच्चारू लागला होतास. तुझ्या हृदयाची धडधड वाढलेली होती. कोणावर आणि कशावर संतापावे हे तुला समजत नव्हते. शिवसेनेचा कार्यकर्ता शिवसेनेच्या दुसर्या कार्यकर्त्याशी खासगीत बोलताना 'धाकट्या साहेबांचे चुकत आहे' असे म्हणून बघत होता. मनसेचे कार्यकर्ते सेनेच्या कार्यकर्त्यांना हसू लागले होते. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बारामतीच्या दिशेने डोळे लावून बसलेला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांना अस्मान ठेंगणे झाल्यासारखी त्यांची देहबोली होती.
आणि शेवटी एकाच दिवशी, एकाच तासाच्या अंतराने दोन बातम्या येऊन धडकल्या. युती तुटली. आघाडी तुटली.
हल्लकल्लोळ झाला. धुमसत्या मनांना आता आऊटलेट मिळाले. आजवर ज्यांना शिव्यांची लाखोली वाहून कोडगे बनवले त्यांच्यापेक्षा कोणी नवीन समूह आता शिव्या देण्यास मिळालेला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संभावना 'मरून पडलेला साप' अशी झाली. मोदी अफजलखान ठरले. त्यांच्या बापाचा उल्लेख केला गेला. मोदींनी 'मी सेनेबाबत बोलणार नाही' असे म्हणत भावनिक आवाहन करून मने जिंकण्याचा स्वस्त प्रयत्न करून पाहिला. प्रचार सुरू झाला कधी आणि संपला कधी हेच समजले नाही. जिभांनी ताळतंत्रे सोडलेली होती. कालवर ज्यांना खांद्यावर बसवून नाचत होतो त्यांना पायदळी तुडवायचे आदेश वरून आलेले होते. प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेनेचे समोरासमोर आलेले कार्यकर्ते एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात अंगार घेऊन प्रचार करत होते. किंबहुना, प्रचार करण्यातील उर्मीही धड जिवंत वाटत नव्हती. उद्धवजी जे बोलतील तो आपला मूड असायला पाहिजे असे सेनेच्या कार्यकर्त्यांना वाटवून घेणे आवश्यक ठरले होते. हेच होत होते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे, काँग्रेसच्या आणि भाजपच्याही! पृथ्वीराज चव्हाणांवर राष्ट्रवादीवाले जहरी टीका करत होते. राष्ट्रवादीने तर म्हणे आपल्या कार्यकर्त्यांना असा गुप्त संदेश दिला होता की खरा प्रचार भाजपचाच करा. न भूतो न भविष्यती असा संभ्रमाचा तो धुरळा, प्रिय कार्यकर्त्या, तुझ्या मनात तू जपलेल्या सर्व खर्याखोट्या निष्ठा, ध्येये, स्मृती ह्यांना नेस्तनाबूत करून गेला. तुझ्याकडे आता मुद्दे नव्हते. शिव्या होत्या. तुझ्याकडे मतदारांवर खैरात करण्यासाठी आश्वासने नव्हती, सूडभावना शिंपडत होतास तू! आजवर आपण जे म्हणत होतो ते आपल्याला म्हणायचे होते की आज आपण जे म्हणतो आहोत ते आपल्याला म्हणायचे होते हेच तुला समजत नव्हते. नेत्यांबरोबरच, प्रिय कार्यकर्त्या, छी थू तुझीही होत होती. ती तुला जाणवत होती. नेत्यांना कोणी प्रत्यक्षपणे तसे म्हणू शकत नव्हते.
कार्य करताना एक 'मोटिव्ह' नावाची चीज असते. ह्या निवडणूकीआधीच्या नेत्यांच्या वर्तनामुळे तुझ्या मनातील मोटिव्हच आमूलाग्र बदलला. आम्ही मतदार वाट पाहात होतो १५ ऑक्टोबरची, नेते वाट पाहात होते १९ ऑक्टोबरची, पण प्रिय कार्यकर्त्या, तू वाट पाहात होतास तुझी बदललेली भूमिका तुला स्वतःलाच मान्य होण्याची!
ठरल्याप्रमाणे मतदान झाले, मतमोजणी झाली, अक्षरशः 'निकाल' लागले महाराष्ट्राच्या राजकारणाचे! पॉलिटिक्स अॅट इट्स वर्स्ट!
आधीची संभ्रमावस्था शतपटीने वाढली. नेमका मतदानाचा कौल तर लक्षात येत होता की भाजप-सेनेला जनतेने मतदान केलेले आहे. पण चौरंगी लढती झालेल्या होत्या. कोणीच कोणाचे नव्हते. आम्ही ह्या राज्याचे मतदार अजूनही होतो. नेते त्यांच्या त्यांच्या पक्षाचे अजूनही होते. तू तुझ्या पक्षाचा कार्यकर्ता अजूनही होतास. पण नवीन शासनव्यवस्थेत तू कोण होऊ घातला होतास हेच तुला समजत नव्हते.
प्रिय कार्यकर्त्या, नक्कीच तुला वाटले असेल की लाथ मारावी ह्या राजकारणावर आणि साधे आयुष्य जगावे. आपली तुंबडी भरणारे आणि पोळी भाजणारे नेते प्रत्येकच पक्षात असतात हा साक्षात्कार तुला नव्यानेच झालेला असावा. ज्या ठाकरेंसाठी जिवाचे रान केले त्यांनी युती तोडून मोदींवर अर्वाच्य टीका केली. ज्या भाजपसाठी वर्षानुवर्षे शिवसेनेच्या उमेदवाराला जिंकवत आणले त्या भाजपच्या मोदींना ग ची बाधा झाली आणि युती तुटली तरी ते मागे हटेनात! ज्या साहेबांसाठी काँग्रेसचा प्रचार केला त्यांनी तर चक्क भाजपलाच बाहेरून पाठिंबा दर्शवला, तोही बिनशर्त! आणि ज्या काँग्रेससाठी राष्ट्रवादीचा प्रचार केला ते सेनेला पाठिंबा देऊ शकतीलही अशी अफवा कानावर आली.
होरपळले दोघेच, तू आणि महाराष्ट्र! बाकी सगळे थोतांड असते रे! मोठमोठे दाखले भाषणांमध्ये देणे, निवर्तलेल्या नेत्यांच्या नावाने भावनिक आवाहने करणे, ही सगळी थोतांडे असतात. सत्य एकच असते. 'आम्हाला सत्ता द्या'! त्याहीपेक्षा सत्य एकच असते, 'फक्त आम्हाला सत्ता द्या'!
अरे अब्जावधी रुपयांचा चुराडा झालेल्या ह्या निवडणूकीत नेते तर दलालच ठरले, पण तुझे काय? तू कोणाचा कोण? उद्या झाली पुन्हा भाजप शिवसेना युती तर तू काय करणार आहेस? घेतला भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा तर तू काय करणार आहेस?
प्रिय कार्यकर्त्या, स्वतःच्या तकलादू पण वरवर महान, उदात्त भासणार्या नीतीमत्तेचा लिलाव करण्यासाठी नेत्यांनी नेमलेला कमिशनवरचा भडवा आहेस तू! आज आम्ही हे विकत आहोत, तेव्हा आमच्यावतीने आज तू हे विक! उद्या आम्ही वेगळे काहीतरी विकू, तेव्हा उद्याचे उद्या बघू!
प्रिय कार्यकर्त्या, पत्राचा उद्देश इतकाच, की नको रक्त आटवूस स्वतःचे! अरे ही जात 'कधी मरून न पडणार्या' सापाची आहे. 'नोटा' नावाचा विनोद मतदारांच्या थोबाडावर फेकून आणि प्रत्यक्ष काही नोटा तुझ्या आणि मतदारांच्या स्वस्त निष्ठेवर फेकून कायमस्वरुपी सिंहासने आपल्या नावची करणार्यांची ही जात आहे. आम्ही दुतर्फा उभे राहून सलाम झोडू! ते पालखीतून हात हालवतील. आणि तू भोई बनून चालत राहशील. पालखीतील माणसे बदलली, प्रत्यक्ष पालखी बदलली तरी तुला बदलता येणार नाही.
प्रिय कार्यकर्त्या, नक्की कसले कार्य करतोस तू? कसले कार्य केलेस तू? कोणाचे, कोणासाठी, कशासाठी?
तुझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांच्या छाताडावर त्यांच्या सिंहासनांचे पाय रोवलेले आहेत, जरासा सरकलास तर कोसळतील सगळे एकजात!
करून बघ एकदा अशी मजा!
प्रिय कार्यकर्त्या, होऊन बघ एकदा तुझ्या मनाचा नेता तूच!
===========================================
-'बेफिकीर'!
ती कारणांची यादी अपुर्ण वाटते
ती कारणांची यादी अपुर्ण वाटते आहे,
त्यात नेत्यांकडुन काही कामं (कॉनट्रॅक्ट्स - सटर फटर का होइना पण फायदेशीर )पदरात पाडुन घेणं.
देणग्या (खंडणी) वर थोडा फार ताव मारता येणं,
फुकट मिळणारी दारु - मटण इ इ (तसं पाहता हे फुकट नहिये कारण कार्यकर्ता नेत्यांच काम पण करतो)
असो
बाकी ४ क्रमांकच कारण तर फक्त सिनेमात पहिलय, समाजसेबा करणारे कार्यकर्ते आनंदवन किंवा तत्सम संस्थेत असतिल, राजकिय पक्षात बहुतेक नसावेत..
कालची माझी फेसबूक पोस्ट
कालची माझी फेसबूक पोस्ट आठवली
--------------------------------------------
काही लोकांना आपली राजकीय पार्टी जिंकल्याचा आनंद स्वत:ला लहानपणी चमचागोटी स्पर्धेत बक्षीस मिळाल्याच्या आनंदापेक्षा जास्त का होतो?
कारण कोणीही जिंको कोणीही हरो, फरक असा आपल्या आयुष्यात ना गेल्या साठ वर्षात पडलाय ना गेल्या चार महिन्यात.
- एक भोळाभाबडा प्रश्न
- एक सामान्य नागरीक
----------------------------------------------
अर्थात हि पोस्ट सक्रिय कार्यकर्त्यांसाठी नसून सोशलसाईटसवर तावातावाने आपल्या आवडीच्या राजकीय पक्षाचे समर्थन करत भांडणार्यांसाठी होती.
असो, सरते शेवटी मानवी स्वभावाच्या मुळाशी याची सारी उत्तरे सापडतील असे वाटते.
परमपुज्य पांडुरंगशास्त्री
परमपुज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांचा एक सिध्दांत आहे. ३० टक्के नेते असतात आणि ७० टक्के त्यांचे फॉलोअर्स असतात. जर ३० टक्के नेते मंडळींपैकी ५० टक्के नेते जर स्वार्थ रहित केवळ जनतेच्या हिताचे कार्य करतील आणि जनतेला त्यांचे म्हणणे पटत असेल तर हे पन्नास टक्के म्हणजे १५ + ७० = ८५ टक्के समाज उत्तम दिशेने वाटचाल करतो. या उलट जर ५० टक्के नेते जर स्वार्थी असतील आणि त्यांचे म्हणणे समाजाला पटवुन देत असतील तर १५ + ७० असा ८५ टक्के समाज अधोगतीला जातो.
आपण कोणत्या नेत्याला फॉलो करायचे आपण ठरवायचे.
बाब्बो... आम्हाला १५०० रु रोज
बाब्बो...
आम्हाला १५०० रु रोज मिळत होता निवडणुकीत, उमेदवारचं काम करायला. येव्हढं मोठं पत्र कधी वाचायचं ? त्यापरिस कुठं निवडणुक असल तर कळवा
निवडणुका पाच वर्षात फक्त तीन
निवडणुका पाच वर्षात फक्त तीन होतात. पोट निवडणुका झाल्या तर एखादी जास्त. खुप झाल तर एक महिना प्र्त्येक निवडणुकीत तुम्ही म्हणता तसा १५०० रुपये रोज मिळण्याची शक्यता आहे.
६० महिन्यात फक्त तीन महिने काम मिळाल तर तुमच भागेल की कायम काम देणार सरकार तुम्हाला हवय ?
पेड कार्यकर्ते ही मानसीकता म्हणजे निवडणुकीचा गैर प्रकार मानायला हवा. कोणत्याही पक्षाने केला तरी गैरच.
इथल्यांचे काय काही जण इथेही
इथल्यांचे काय
काही जण इथेही तोच प्रकार करतात
बेफिकीर, >> उदात्त भासणार्या
बेफिकीर,
>> उदात्त भासणार्या नीतीमत्तेचा लिलाव करण्यासाठी नेत्यांनी नेमलेला कमिशनवरचा भडवा आहेस तू!
हे वाक्यं ज्याम पटलं. हेच वाक्य महाभारतीय युद्धापूर्वी कुरुक्षेत्रावर जमलेल्या प्रत्येक क्षत्रियास लागू होत होतं. हेच वाक्य सेतू ओलांडून लंकेवर चालून जाणाऱ्या प्रत्येक वानरास आणि अस्वलास लागू होत होतं.
इथे मी श्रीराम, सीता, रावण, हनुमान, बिभीषण, सुग्रीव, वाली, श्रीकृष्ण, द्रौपदी, पांडव, कौरव, इत्यादि व्यक्तींचा मानभंग आजिबात करू इच्छित नाही. नियतीचे फासे असे पडत गेले की परिस्थितीच तशी आली.
गीता माणसाला आश्वासक का वाटते या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तर ते परिस्थितीत सापडतं. ईश्वरेच्छा बलीयसी!
आ.न.,
-गा.पै.
जबरदस्त पत्र .शेवटच्या तीन
जबरदस्त पत्र .शेवटच्या तीन ओळी आवडल्या.