फटाके

Submitted by मिलिंद महांगडे on 22 October, 2014 - 13:17

फटाक्यांची लांबलचक माळ त्याने जमिनीवर पसरवली. त्याच्या एका हातात पेटवलेली अगरबत्ती होती. त्यातुन निघणारा धुर नागमोडी वळणे घेत वर जाऊन हवेत कुठेतरी अदृश्य होत होता. त्याचबरोबर त्यातुन मोगऱ्याचा मंद सुगंध फटाक्यांच्या दारुच्या वासात मिसळत होता. फटाक्यांच्या त्या माळेला पेटती अगरबत्ती लावण्यापुर्वी आठवणीने त्याने तिची वात खुडली. मागच्या अनुभवावरुन तो हे शिकला होता. पुर्वी एका फटाक्याची वात न खुडताच त्याने तो पेटवला आणि त्या क्रूर फटाक्याने त्याला हलायला पुरेसा वेऴही दिला नव्हता. ' ढाम्म.... ' त्याच्या कानाच्या बाजुलाच तो फुटला. बराच वेळ त्या कानाने त्याला काही ऐकु येत नव्हते. परंतु आता त्याने ती खबरदारी घेतली होती. सावकाशपणे तो खाली वाकला. पेटती अगरबत्ती त्या खुडलेल्या वातीच्या जवळ आणली. हावरटपणे त्या वातीने अगरबत्तीची ती आग आपल्याकडे ओढली .... सुरसुर पेटत ती फटाक्याच्या दिशेने वेगाने जाऊ लागली. तो चलाखीने बाजुला झाला आणि तडातड फटाक्यांची माळ वाजली .....
फटाक्यांच्या त्या आवाजाने संजू झोपेतुन जागा झाला. त्याला स्वप्न पडलं होतं. आज दिवाळीची पहीली पहाट होती. कालपर्यंत उत्साहात असणारा संजू आज मात्र जरासा निराश होता. निराशेपेक्षा त्याला राग जास्त आला होता. तो तसाच अंथरुणात पडुन होता. आज आपण उठायचंच नाही असं मनाशी ठरवुन तो तोंडावर चादर घेऊन तसाच पडुन राहीला.
" संजू , उठ बाळा , आज दिवाळीचा पहीला दिवस आहे. " पणत्या पेटवता पेटवता आई त्याला हाक मारत होती . त्याने चादरीच्या कोपऱ्यातुन पाहीलं, बाबा गॅलरीत आकाशकंदिल लावत होते. आकाशकंदिल लावुन झाला, त्यातल्या बल्बचे बटन दाबले अन् लाल - पिवळा प्रकाश सर्वत्र पसरला. त्यासरशी संजू अंथरुणातुन उठला. काही वेळापुर्वी केलेला निश्चय तो साफ विसरला होता . आकाशकंदिलाच्या प्रकाशातच काहीतरी जादू असावी. पहीली अंघोळ मस्तपैकी सुगंधी उटणे लावुन , उरकुन तो बाबांच्या शेजारी जाऊन बसला. बाबा सकाळचा पेपर वाचत बसले होते.
" बाबा, फटाके .... " त्याने सुर लावला. आधी तर त्यांचं लक्षच गेलं नाही. ते तसेच पेपर वाचत बसले.
" बा बा..... फ टा के...... " ह्यावेळी आणखी मोठ्याने सुर लावला. बाबांनी त्याच्याकडे पाहीलं.
" हं... आज संध्याकाळी आणुया . " एवढं बोलुन त्यांनी परत पेपरमधे डोकं घातलं. तेवढ्याने संजूचं समाधान झालं आणि तो खेळायला पळाला.
" माझ्या बाबांनी काल मला खुप फटाके आणले. चल तुला दाखवतो. " संजूचा मित्र अभि त्याला म्हणाला. दोघेही त्याच्या घरी गेले. दोन मोठे बॉक्स भरुन अभिच्या घरी फटाके आणले होते ... पाऊस, भुईचक्र, फुलबाज्या, रॉकेट., लवंगीच्या माळा, नागाची गोळी, टिकल्या, बंदुक.... सुट्टे फटाके असे बरेच प्रकार पाहुन संजूचे डोळे चमकले. प्रत्येक प्रकार हातात घेउन तो कुतुहलाने पाहु लागला.
" तुला माहितीये ? हा ना, आकाशात जाऊन सात वेळा फुटतो ... ” एका मोठ्या फटाक्याकडे बोट दाखवुन अभि त्याला म्हणाला. संजू डोळे विस्फारुन ते पहात होता.
" हा ..? " एका वेगळ्याच फटाक्याकडे पहात संजूने विचारलं.
“ हा ? हा कलरवाला रॉकेट आहे ”
“ आणि हा ? ”
" हा ...? मला पण माहीत नाई . माझे काका अमेरीकेत असतात ना, त्यांनी पाठवलाय . आज संध्याकाळी बाबा आले की आम्ही हे फटाके फोडणार ... " अभि भलताच खुशीत येउन ते सांगत होता . संजू त्याच्याकडे असुयेने पाहु लागला. आपले पण कोणी काका अमेरीकेत असते तर किती बरं झालं असतं ? असा एक निरर्थक विचार त्याच्या मनात चमकुन गेला. ते दोघे समोर मांडलेले फटाके बघत असताना ,
" अभि, सगळा पसारा काढुन बसु नकोस. संध्याकाळी काढ ते ... आता ठेव. मार खाशील नाईतर .... " आतुन अभिच्या आईचा ओरडण्याचा आवाज आला . अभि घाईघाईने तो समोर मांडलेला पसारा आवरु लागला. त्यात संजूच्या हातात असलेलं भुईचक्र त्याने हिसकावुन घेतलं आणि पिशवीत टाकलं. संजूचा हिरमोड झाला. तो तसाच उठला अन् काहीश्या रागातच घरी आला.
" आई, बाबा कधी येणार ? " तोंड वेंगाडून त्याने विचारलं .
" संध्याकाळी येतील .... " करंज्यामधे सारण भरता भरता आई त्याला म्हणाली.
" आज मला फटाके पाहीजेत. माझ्या सगळ्या मित्रांकडे बघ किती फटाके आहेत , आणि माझ्याकडेच काही नाही ... मला फटाके पाहीजेत. " त्याने हट्टच धरला.
" हो.... हो… बाबा आणणार आहेत हा आज फटाके तुला.… " त्याची समजूत काढून आई आपल्या दिवाळीच्या फराळाच्या कामाला लागली. संजू कसनुसं तोंड करुन पुन्हा बाहेर आला. आता संध्याकाळपर्यंत काय करायचं ...? काहीच टाईमपास नाही. फटाके असले असते तर, निदान ते बघण्यात वेळ गेला असता. पाच दिवसात रोज किती किती फटाके वाजवायचे त्याची वर्गवारी करता आली असती. आपण पण मित्रांना आपल्याकडचे फटाके दाखवले असते . पण छे ...! वैतागुन त्याने टिव्ही लावला. समोर एका फिल्म मधलं फटाके फुटण्याचा सीन चालु होता. त्याने चॅनल बदलला. , पुढच्या न्युज चॅनलवरचा रिपोर्टर फटाक्यांच्या दुकानासमोर उभा राहुन मार्केट मधे कोणकोणते नवनवीन फटाके आले आहेत त्याची माहीती देत होता. त्याने पुन्हा रागाने चॅनल बदलला. पुढच्या चॅनलवर कुठेतरी फटाक्यांच्या फॅक्टरीला आग लागल्याचा व्हीडीओ चालु होता. ते पाहुन तर संजूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने रागाने टिव्ही बंद केला आणि रिमोट सोफ्यावर फेकला. घड्याळात पाहिलं , संध्याकाळ व्हायला अजून पाच - सहा तास होते . बाबा कधी येणार ? आणि त्यांनी आठवणीने फटाके आणले तर बरं ! विचारांचा भुंगा त्याच्या डोक्यात फिरू लागला . वैतागून तो गॅलरीत जाऊन उभा राहीला. पलीकडच्या झोपडपट्टीतली त्याच्या वयाची लहान लहान पोरं सुट्टे लवंगी फटाके वाजवत होती. संजू ते पहाण्यांत दंग झाला. ती मुलं फटाक्यांसोबत वेगवेगळे प्रयोग करत होती. कधी ते फटाक्यावर धुळ मातीचा ढिगारा टाकुन तो पेटवत, फटाका फुटला की फिल्म मधे दाखवतात तसा बॉम्ब फुटल्याचा भास होत होता. धुळीचा लहानसा ढग तयार होत होता आणि लगेच विरतही होता. ते दिसायला अतिशय गमतीदार दिसत होतं. , कधी कधी ती मुले दोन - तीन सुट्ट्या फटाक्यांच्या वाती एकमेकांवर पिळुन एकत्र फोडत होते. त्यामुळे एकाच वेळी दोन तीन फटाक्यांचे आवाज येत, असे वेगवेगळे प्रयोग केल्यावर त्यांच्याकडचे सगळे फटाके संपले. मग कुणीतरी टिकल्यांची बंदुक आणली आणि त्यांचा चोर पोलिसचा खेळ सुरु झाला. दोन गट पडले. ते एकमेकांना लपत छपत टिकल्यांच्या बंदुकांनी गोळ्या मारत होते, थोड्या वेळाने त्यांना त्याचाही कंटाळा आला. मग ती मुलं न फुटलेले फटाके शोधत फिरू लागली . त्यातली दारू काढून ती पेटवण्याचा खेळ सुरु झाला . तेही मजेदार होतं . तो पहात असताना आतून आईची हाक ऐकू आली .
“ ह्या कारंजा बघ कशा झाल्यात ? ” आईने बशीत कारंजा दिल्या . त्याने कशीबशी एक करंजी खाल्ली . खरं तर करंज्या म्हणजे त्याचा आवडीच्या ! पण त्याला आज त्या गोड लागेनात . इतक्यात खालून कॉलनीतल्या पोरांचा आवाज आला . त्याचे मित्र विकी , मन्या , अभि त्याला बोलावत होते . त्यांनी भरपूर दगड आणि माती आणली होती . किल्ला करण्यासाठी . त्यांची दुपार किल्ला बनवण्यात गेली . किल्ल्याला नागमोडी पायऱ्या , मध्ये मध्ये वाघ सिंहांच्या गुहा केलेल्या , जागोजागी मावळ्यांचा खडा पहारा उभा केला . हत्ती , घोडे उभे केले. किल्ल्याच्या पायथ्याला हिरवीगार शेती केली. त्यात सलाईनचं कारंजं उभं केलं . किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी शिवाजी महाराजांची रेखीव मूर्ती स्थापन केली आणि किल्ल्याला वेगळंच तेज प्राप्त झालं . तोपर्यंत फटाक्यांच तर संजू साफ विसरून गेला . तो गेरूने किल्ला रंगवण्यात गढून गेला होता. पण मधेच मन्याने विचारलं , “ दिवाळी झाल्यावर ह्या किल्ल्याचं काय करायचं ? ”
“ काय करायचं म्हणजे ? ह्या गुहेत ना एक मोठा फटाका लावून फोडायचा … ” कोणीतरी म्हणालं .
“ ए नाय रे …. आपला किल्ला फोडायचा नाही … ” पोरांची भंकस सुरु झाली . त्यात फटाक्यांचं नाव निघालं आणि इतका वेळ विस्मरणात गेलेला फटाक्यांचा भुंगा पुन्हा संजूच्या डोक्यात शिरला . संध्याकाळ झाली होती . सगळी मुलं तयार व्हायला आपापल्या घरी गेली . संजूही गेला .
“ आई , बाबा कधी येणार ? ” त्याचा परत तोच प्रश्न .
“ येतील रे… जर धीर धर … आणि हा काय अवतार केलायस ? जा तोंड हात पाय धु … जा लवकर . ”
संजू पाय ओढत ओढत बाथरूम मध्ये गेला . नंतर सगळं आवरून पुन्हा बाबांच्या वाटेला डोळे लावून बसला . आता केव्हाही बाबा येतील आणि त्यांनी फटाके आणले असतील , मग कित्ती मज्जा !!! संजू मनातल्या मनात विचार करू लागला . त्याला पुन्हा खालून अभिचा आवाज आला . त्याच्या बरोबर त्याचे बाबा होते त्यांच्या हातात एक मोठी पिशवी होती .
“ खाली ये ना .… आम्ही फटाके फोडतोय … “ अभि बोलावत होता . त्याचे बाकीचे मित्रही फटाके फोडायला खाली जमा झाले . आधी तर संजूला खाली जाउच नये असं वाटत होतं . बाकीचे फटाके फोडणार आणि आपण नुसतं बघत बसायचं ? हे म्हणजे आपल्याला भूक लागली असून सुद्धा आपण स्वतः न जेवता दुसऱ्या एखाद्या जेवणाऱ्या माणसाला फक्त बघण्यासारखं आहे …. पण आईच म्हणाली कि तो एवढं बोलावतोय तर जा … म्हणून तो नाईलाजाने खाली गेला . अभि आणि त्याच्या बाबांनी भरपूर फटाके आणले होते . अभिने पाउस लावला , वर उंच जाणारा पावसाच्या प्रकाशात त्याचे डोळे दिपले . भुईचक्र एखाद्या चक्रम माणसासारखे वाट फुटेल तिकडे पळत होते . लवंगी स्वतःच्याच तोऱ्यात असल्यासारख्या तडतडत होत्या . फुलबाज्यातून उडणाऱ्या चांदण्या वर उडून खाली जात होत्या . अभि आणि बाकीचे सगळे आनंदाने ओरडत होते . संजू फक्त ती आतिषबाजी लांब उभा राहून पहात होता . सगळ्यांचे फटाके संपले आणि ते जायला निघाले . आता संजू एकटाच उरला होता . त्याची नजर गेट कडे लागली होती . अजूनही त्याचे बाबा आले नव्हते . शेवटी कंटाळून तोही परत फिरणार इतक्यात त्याला एका कोपऱ्यात लवंगी फटाक्यांच्या २-३ माळा पडलेल्या दिसल्या . मघाशी अभिच्या पिशवीतून त्या पडलेल्या असाव्यात , त्याने विचार केला . आपण त्या घेऊया का ? अशाही त्या तशाच पडलेल्या आहेत . आणि आजूबाजूला दुसरा कोणीही नाही . त्या लवंगीच्या माळा आपण घेतल्या तर काय फरक पडणार आहे ? त्या माळा त्याला खुणावत होत्या . त्याचं एक मन त्या फटाक्यांकडे धावत होतं तर दुसरं मन ते करण्यापासून त्याला परावृत्त करत होतं . दुसऱ्याचे पडलेले फटाके कसे घ्यायचे ? बाबा ओरडतील . पण आज बाबांनी फटाके आणले नाही तर ? शेवटी त्याच्या एका मनाने दुसऱ्यावर विजय मिळवला . संजू त्या माळांच्या दिशेने जाऊ लागला . तो त्या माळांना हात लावणार इतक्यात बिल्डींगच्या गेटचं लोखंडी दार वाजलं . गेटमधून त्याचे बाबा आत येताना त्याला दिसले . त्याने पाहिलं बाबांच्या हातात दोन मोठ्ठ्या पिशव्या होत्या …

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके मिलिंद,

इथे मला अमिताभचा एक चित्रपट आठवला, `मै आझाद हू'. त्यातही कित्येक दिवसांचा भूकेला अमिताभ रस्त्यावरचे अर्धवट खाऊन टाकलेले सफरचंद अश्याच मनाच्या चलबिचलीनंतर जाऊन ऊचलणार इतक्यात, शबाना त्याला हाक मारते.

Happy

कधी ते फटाक्यावर धुळ मातीचा ढिगारा टाकुन तो पेटवत, फटाका फुटला की फिल्म मधे दाखवतात तसा बॉम्ब फुटल्याचा भास होत होता. धुळीचा लहानसा ढग तयार होत होता आणि लगेच विरतही होता. ते दिसायला अतिशय गमतीदार दिसत होतं. ,
कधी कधी ती मुले दोन - तीन सुट्ट्या फटाक्यांच्या वाती एकमेकांवर पिळुन एकत्र फोडत होते. त्यामुळे एकाच वेळी दोन तीन फटाक्यांचे आवाज येत,
मग कुणीतरी टिकल्यांची बंदुक आणली आणि त्यांचा चोर पोलिसचा खेळ सुरु झाला. दोन गट पडले. ते एकमेकांना लपत छपत टिकल्यांच्या बंदुकांनी गोळ्या मारत होते,
मग ती मुलं न फुटलेले फटाके शोधत फिरू लागली . त्यातली दारू काढून ती पेटवण्याचा खेळ सुरु झाला .

>>>>>>>>

मस्त, हे सगळे करून झालेय.
यात भर टाकायची म्हणजे,

सर्व कचरा एकत्र करून जाळायचा, मग त्यात एखादा बाँम्ब टाकून ब्लास्ट करायचा आणि मस्त जळत्या कागदांना हवेत उडताना बघायचे.
आपापसात गट बनवून कॉलमच्या आड लपून एकमेकांवर पेटत्या लवंग्या किंवा छोट्या ताजहालच्या माळेच्या सुट्ट्या फटाक्या फेकणे.
पेटती माळ गच्चीवरून हवेत भिरकावणे, अशी की ती खाली मैदानातच पडावी. हवेत तडतडणारी माळ बघणे रॉकेटपेक्षा जास्त आनंद देते. कमी बजेटमध्ये हे जास्त महत्वाचे.
माळेतला सिंगल फटाका मधोमध मोडून त्याची सुरसुरी तयार करणे.
वगैरे वगैरे...
असो, कथा आवडली Happy