..... सावळं सौभाग्य......
आज कामात काही लक्ष लागत नव्हतं. डोक्यात नुसता तोच विचार येत होता. काही केल्या विसरायला होईना. जोशी म्हणजे तसा एकदम कमाल माणूस. दिसायला एखाद्या नटासारखा. गोरा, अंगाने बरा, कसला आजार नाही, काही दुखणं नाही. घरची परिस्थिती तर अशी की, देवाने दिलेलं घरात मावत नव्हतं आणि वस्तूंची गर्दीच इतकी की, हवं ते नेमकं हवं तेव्हाच गावत नव्हतं.त्याचे वडील म्हणजे गावाचे सरपंच. त्यामुळे मुळातच घरात सुबत्ता होती. पण जोशी स्वत:ही खूप कर्तबगार होता. हुशार होता.
अचानक एका दिवसासाठी तो गावी गेला आणि लग्न ठरल्याची खबर घेऊनच मुंबईला परतला.
मुळातच जोशी बोलका असल्याने ऑफिस मधल्या सगळ्यांनी लग्नाला हजेरी लावली. माणूस स्वतःच्या लग्नाची जितकी स्वप्न बघतो तितकीच स्वप्न तो स्वत:च्या जवळच्या माणसाच्या लग्नाचीही बघतो.
जोशीसारख्या हिऱ्याला हि कुणीतरी रत्न लाभलं असणार अशी आशा माझ्याप्रमाणे प्रत्येकाला होती. पण सगळंच अपेक्षेबाहेरचं निघालं.
रत्न लाभलेलं होतं. पण त्यात चमक नव्हती. अंधार होता, उजेड नव्हता.
जोश्याची बायको जरा सावळी होती. सावळी काय! जरा जास्तच सावळी होती.
जोश्याची सावली हि त्या सावळीपेक्षा गोरी ठरली असती इतकी ती सावळी होती.
त्याहून मोठा आश्चर्याचा धक्का म्हणजे तरीही जोशीने तिला पसंत केलं होतं आणि तो लग्नाच्या मंडपात खुश दिसत होता.
एकदम असं वागत होता जसं की त्याला अगदी हवं तेच मिळालंय.
आमच्या बँकेच्या नोकरीच्या भाषेत सांगायचं तर, "ज्याला आम्ही डेबिट समजतोय; ते त्याच्यासाठी क्रेडीट होतं."
जोशी रोज भेटायचा. एक दोनदा सहपत्नी जोशीच्या घरी माझे जाणेही झाले होते.आमच्या सौभाग्यवतींनीही तोच प्रश्न मला विचारला होता. पण उत्तर माझ्याकडेही नव्हतं.
एकदा जोशीने ऑफिस सुटताना मला जवळ बोलावलं. ऑफिस सुटलेच होते; त्यामुळे ऑफिसात कुणीच नव्हते. बोलायला निवांत वेळ होता.
जोशी म्हणाला,
"तू माझा खास मित्र. तरीही हल्ली इतका असा बाचकल्यासारखा का होतोस मला पाहिल्यावर? स्वतःहून सांगणार आहेस का?"
"अरे असे काही नाही रे. तुझं आपलं काहीतरीच. मी कुठे बाचकतो?" मी सावरासावर करायचा पोखळ प्रयत्न केला.
खरंतर जोश्याला पाहिले की, मला नेहमी त्याची बायको आठवायची. त्याला हे प्रश्न विचारण्याची हिंमत होत नव्हती आणि म्हणून थोडा बाचकल्यासारखं व्हायचं. पण आज त्याने स्पष्ट विचारून चांगलाच गोत्यात आणलं मला.
"श्री बस इथे.खूप दिवस तुझ्याशी हे बोलायचं होतंच मला. रोज तुझ्या डोळ्यातला तोच प्रश्न बघून बघून मी ही थकलोय आता. आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यांतल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे असतील तरच त्या व्यक्तीच्या नजरेला नजर मिळवता येते. माझ्याकडे तुझ्या प्रश्नाची उत्तरं आहेत. ऐक. मध्ये बोलू नकोस. काही विचारलं तरच उत्तरं दे. मी लताशी लग्न का केलं? तिच्यात असं काय पाहिलं मी? हाच प्रश्न आहे ना तुझा?"
"..." याला मनातलं ऐकू येतं की काय असा प्रश्न पडला मला.
"बरोबर बोलतोय ना मी?"
"नाही रे जोशी. काहीतरीच काय? मी आपला सहजच..."
"श्री, ऐक लेका. ऐक मी सांगतो ते. तुझ्या डोळ्यातले प्रश्न न कळण्याइतका लहान नाहीयेय मी. ऐक मी सांगतो ते."
"..." चोरी पकडली गेली तर शांत राहणं बेस्ट असतं ह्या मताचा मी तेव्हा शांतच राहिलो.
"श्री, लहानपणापासून मी पुरुषांमध्ये वावरत आलो. पुरुष कोणत्या स्त्री बद्दल काय काय बोलतात हे ऐकत आलो. एखादी देखणी स्त्री प्रत्येक पुरुषाला भावते- जरी ती दुसऱ्याची बायको असली तरीही.
त्यात गैर काहीच नाही. देवाने स्त्री आणि पुरुषांची ठेवणच तशी केलीय. शरीराचीही आणि मनाचीही.
स्त्री आता पुढे गेलीय. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालू लागलीय. सगळं सगळं मान्य आहे मला.
पण स्त्रीला अजूनही मातृत्व चुकलेलं नाही. अंगावर शर्ट-पँट चढवली म्हणजे स्त्रीचा पुरुष होतो का?
कपडे बदलले, केस कापले म्हणून मन बदलता येते का?
उंबरठा ओलांडून बाहेर पडले की, जे काही दिसते ते सगळेच्या सगळे जग स्त्रीसाठी परकेच असते.
घराचा उंबरठा नाही- मी शरीराच्या उंबरठ्याबद्दल बोलतोय. घरातली इतर पुरुष मंडळी अगदी वडीलसुद्धा या जगाच्या यादीतलेच असतात.
वर्तमानपत्रात नाही का वाचत तू? 'एका नराधम बापाने आपल्याच मुलीचा विनयभंग केला'. हे सगळं ऐकायला कितीही भयंकर असलं तरी खरं आहे. ते नाकारता येणारं नाही."
जोश्याने बोलणे ऐकून हल्लीच्या काळातली एखादी स्त्री चवताळून उठली असती. पण मी एक पुरुष म्हणून नाही तर एक माणूस म्हणून विचार केला तर; मला हा सगळं पटत होतं.
त्याच्या बोलण्याच्या मध्ये आपण काही बोलावे याची गरजच नाही वाटली मला.
जोशी बोलत होता.
"संस्कारांचा परिणाम म्हण किंवा बाकी काही म्हण. पण, पुरुषांच्या मनाचा विचार केलास तर एक गोष्ट तुझ्याही लक्षात येईल. इज्जत स्त्री पुरुष दोघांनाही असते पण, पुरुषाची इज्जत हि एक संकल्पना आहे आणि स्त्रीची इज्जत हे एक सत्य आहे. रस्त्यावर चालताना पुरुष कोणत्या स्त्रीकडे आणि कसे बघतात हे तुला माहित आहेच.
मी ऑफिसात असताना माझी बायको घरी काय करत असेल? तिला कुणी त्रास देत असेल तर?
ती बाजारात गेली आणि तिच्यासोबत कुणी काही वेडंवाकडं करायचा प्रयत्न केला तर? असे नाना प्रश्न देखण्या स्त्रीशी लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाच्या मनात सतत येत असतील. नसतील का येत? तुझ्या मनात नाही येत का?"
"..." मनातल्या मनात हो उत्तर देऊन गप्प राहिलो मी. पण त्याने ते ही उत्तर ऐकलं असेल बहुदा.
"मी त्यापासून मुक्त आहे. मी जे बोलतोय ते तुला पुरुषत्वाच्या विरुद्ध वाटेलही. म्हणशील की, मनगटात ताकद नाहीयेय का बायकोचं रक्षण करायची?
मनगटात ताकद आहे रे. जमेल तितका लढेनही मी. पण कितवर? घडलं ते नजरेसमोर घडलं तर काही करता येतं, पण नजरेमागं घडलं तर?"
जोश्याच्या प्रश्नाची उत्तरं नव्हती माझ्याकडे.
"श्री, लता दिसायला सुंदर नसली तरी मनाने सुंदर आहे. नाहीतरी दिसायला सुंदर माणसं तरी सुंदर कुठे वागतात? लता मनाने छान आहे पण सावळी आहे. पण कुणीतरी तिला बघता क्षणीच तिच्या प्रेमात पडेल हि शक्यताच नाही. त्यामुळे मी निर्धास्त आहे. न घाबरता मला जगता येतं. तिला पहायला गेलो तेव्हा तिच्यात मी तिचं 'सावळेपण' पसंत केलं. “
“…”
“मला वाटतं की, तुला आता तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. चल निघतो मी आता. लता वाट पाहत असेल. आज पिक्चर पहायचा प्लॅन आहे आमचा."
जोशीने जे काही सांगितलं. ते ऐकून सगळं सुन्न झालं होतं. विरोधाचा प्रश्नच नव्हता कारण, मला सगळं पटलं होतं. पण तरीही मला वाहिनींची दया येत होती. त्यांना काय वाटत असेल? जोश्यासारखा नवरा मिळाला हे चांगलं की वाईट झालं त्यांच्यासाठी?
काही करून वहिनींना भेटायचं आणि जाणून घ्यायचंच असं ठरवलं. योग्य वेळेची वाट पहात होतो.
दिवसामागून दिवस जात होते. ऑफिसात सगळे टिंगल करायचे.
म्हणायचे कि, "जोश्याची पोरं बुद्धीबळासारखी होणार."
जोशी खुश होता. पण त्याची ख़ुशी मला नेहमी त्या सावळ्या सौभाग्याची आठवण करून द्यायची.खुपदा जोश्याच्या घरी जावूनही मला वहिनींकडे हा विषय काढणे जमत नव्हते.
पण एकदा दिवस तसा आला आणि मला जोश्याच्या घरी जायची संधी मिळाली.
घरी गेलो तर जोशी घरात नव्हता. असेलच कसा? तो नसणार घरात हे माहित होतं म्हणूनच मी तिथं गेलो होतो.
वहिनींनी दार उघडलं.
"अय्या तुम्ही? या ना. असे उभे का दारात? हे आताच बाहेर गेलेत."
"हो का?" उगाच मला काहीच माहित नसल्याचा आव आणून मी विचारले आणि जाऊन सोफ्यावर बसलो.
"अजून अर्धा तास तरी लागेल यायला. ते येईपर्यंत वाट पहावी लागेल तुम्हाला भावोजी. थांबा हा. मी चहा घेऊन आले."
"वहिनी अहो राहू दे चहा. मघाशी झालाय माझा चहा. लाजत नाहीयेय मी. पण खरंच घेतलाय मी चहा मघाशी."
थोडा वेळ वहिनींशी गप्पा मारल्या. हिंमत जमवत होतो. शेवटी मुद्द्यावर यायची वेळ आली.
"वहिनी, माझं तुमच्याकडेच जरा काम होतं. एक प्रश्न होता. पण, त्या आधी एक वचन हवं होतं."
"वचन? कसलं?" सावळ्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह हजार झालं.
"मी जे काही बोलेन ते आपल्या दोघांतच राहील. जोश्याला तुम्ही काही सांगणार नाही. कबुल?"
"अ...अ....अ...ठिक आहे. कबुल. बोला."
"एक प्रश्न विचारायचा होता. वाईट वाटून घेणार नाहीत अशी आशा करतो."
"..." नजरेनेच होकार दिला वहिनींनी.
"आमचा जोश्या तसा देखणा आणि तुम्ही..."
"..." असे स्पष्ट विचारायला नको होते आपण असं माझं मलाच वाटू लागलं. पण नशीब! वहिनीनी शांततेला सोडून बोलायला सुरुवात केली.
"भावोजी, आलं माझ्या लक्षात तुम्हाला काय विचारायचंय ते. आमचे हे दिसायला देखणे आणि मी हि अशी सावळी. ह्यांना म्हटले तर एखादी सुंदर मुलगी मिळाली असती पण तरीही त्यांनी माझ्याशी लग्न का केलं? असंच ना?"
वहिनींनी ओळखलं आणि मला हलकं झाल्यासारखं वाटू लागलं. नाहीतर हा असा प्रश्न कसा विचारायचा हा प्रश्न मला पडला होता.
"खरं सांगू का? जो प्रश्न तुम्हाला पडलाय तो मलाही पडला होता. ज्या दिवशी हे मला पहायला आमच्या घरी आले होते; तेव्हा मला ते न आवडण्याचा प्रश्नच नव्हता. शोधूनही एखादा दोष सापडणार नाही असे आहेत ते. पण, त्यांच्यासमोर मला माझ्या अश्या रुपाची लाज वाटू लागली. नकार येईल अशी खात्री होती. पण होकार आला आणि आनंद गगनात मावेना. पण नंतर आश्चर्य वाटू लागले की होकार आलाच कसा? काय पाहिलं नक्की त्यांनी माझ्यात. खूप विचारावेसे वाटले ह्यांना. पण हिंमत नाही झाली.
आमचं लग्न झालं. आम्ही दोघं कधी एकत्र बाहेर फिरायला गेलो की कुणी हि पुरुष माझ्याकडे बघत नसत. तशी त्याची लहानपणापासूनच सवय होती मला. ह्यांच्या कुणी पाहुण्याने, नातेवाइकाने, मित्राने ही कधी माझ्या रुपाची प्रशंसा केली नाही. जो तो कौतुकाचा भुकेला असतो. मीही होते. पण, प्रशंसा मी नेहमी ऐकली ती दुसऱ्यांबद्दल. बाकी ती नि मी नेहमी परकीच.
प्रत्येकाच्या डोळ्यात मला प्रश्नच दिसले.
पण आमचे हे सगळं कळूनही शांत असायचे. नेहमी खुश असायचे. जसे ह्यांना जे हवं होतं तेच मिळालं होतं त्यांना."
वहिनींचे बोलणे ऐकून मलाच भिरभिरायला होत होते. सगळं कळूनही कशी शांत राहू शकते ही बाई? ग्रेट. बरेच दिवस मनात ठेवले होते त्यांनी हे सगळे. आज मी मार्ग करून दिला म्हणून झरा वाहू लागला होता.
त्या बोलत होत्या.
"लग्नानंतरचे बरेचसे दिवस रडून काढले..यांच्याशी बोलावं याची सोय नव्हती. पण मधुचंद्राच्या पहिल्याच रात्री पर्यंतच रडता आलं.
रडून रडून गप्प बसले. विचार केला. उलघडा झाला आणि मोकळी झाले.
मी का रडतेय?
माणूस रडतो कधी? काही कमी मिळाले की ना? पण माझ्याकडे काय कमी आहे?
मधुचंद्राच्या पहिल्याच रात्री मी पहिल्यांदा ह्यांच्या प्रेमात पडले. संसाराबाबत निश्चिंत झाले.
त्या रात्रीच्या ह्यांच्या स्पर्शात एकदाही मला माझ्या रंगाची आठवण होऊ दिली नाही.
फक्त त्याच दिवशी नाही तर लग्नानंतर कधीही.
काय हवे असते एखाद्या पत्नीला स्वतःच्या साथीदाराकडून?
तो कमावता असावा, कर्तुत्ववान असावा, प्रेमळ असावा. सर्वात महत्वाचे तो खरा 'साथीदार' असावा.
एखाद्या स्त्रीच्या स्वतःच्या साथीदाराकडून ज्या काही अपेक्षा असतात त्या सर्व ह्यांनी पूर्ण केल्या.
एखाद्या स्त्रीचे जे स्वप्न असते ते सगळे मिळाले मला - चांगलं सासर, लाखात एक नवरा.
मग मी का म्हणून रडावे?
जगाला आणि मला वाटणारा माझा अवगुण माझ्यासाठी गुण ठरला. तरीही मी रडावे?
चांगलं वाईट यांच्या व्याख्या आपण ठरवतो. किंबहुना आपणच ठरवाव्यात. जगाच्या निर्णयावर स्वतःचे निर्णय घेऊ नये.
माझ्याकडे कमी आहे हे जगाने मला नजरेने सांगावे. पण मी ते का ऐकावे?
तुम्ही मला 'महान' म्हणाल पण, मी महान नाही. यात माझा असा स्वतःचा स्वार्थ आहे."
"..." भुवया वर करून मी प्रश्नार्थक चेहरा बनवला.
"आमचे हे खूप भितात- सगळ्याच गोष्टींना. म्हणजे ते भित्रे आहेत असे नाही. पण, त्यांना स्वतःच्या गोष्टी खूप आवडतात.
'आपलं जे काही आहे ते कुणी हिरावून तर नाही घेणार ना?' हा प्रश्न माणसाला नेहमी छळत असतो.
चुकून जरी याचं उत्तरं हलकंसं 'हो' असं मिळालं की माणूस बिथरतो आणि अजून काळजी करू लागतो.
यांच्या भीतीत 'मला' गमावण्याची भीती नाहीयेय आणि हिच गोष्ट मला हवी आहे.
कारण ती मला सौख्य देते. हे मला सांभाळतात - फुलासारखं.
कुणीतरी किंमत देणारं असलं की स्वतःच्या अवगुणांचा विसर पडतो.
मी सावळं असल्याने ते आनंदी राहत असतील तर मला ते नेहमी हवंय.
ते माणूस म्हणून अजिबात वाईट नाहीत. जशी इतर सामान्य माणसं असतात, अगदी तसेच आहेत ते.
उलट माझ्या सावळं असण्याने ते निश्चिंत असतात.
चांगलं असतं तेच चोरीला जातं, वाईटावर कुणीही वाईट नजर टाकत नाही.
ते मला पहायला आले तेव्हा त्यांनी माझ्यात स्वतःसाठी 'मोकळं आणि निर्धास्त आयुष्य' पाहिलं आणि म्हणून मला पसंत केलं.
त्यांचा स्वार्थात माझं चांगलं झालं. मला हवं ते मिळालं आणि बहुतेक त्यांनाही."
"अरे श्री! तू कधी आलास? पट्ट्या सांगायचं तरी यायच्या आधी. मी गेलोच नसतो बाहेर." बोलता बोलता मधेच जोशीने घरात प्रवेश केला.
"अरे नाही रे. असंच इथे जवळच काम होतं. म्हटलं आलोच आहोत तर, भेटून जावं. पण जातो आता. बराच उशीर झालाय."
कसाबसा तिथून निघालो मी.
जोश्यांनी आणि वहिनींनी दोघांनी हि मला हलवून सोडलं होतं.
पण एक शिकलो.
'दोघांचे स्वार्थ एकमेकांना पोषक असतील तर संसार सुखाचा होतो.
एकाचा स्वार्थ दुसऱ्याच्या स्वार्थाच्या विरुद्ध असला की संसारात ठिणग्या उडतात, वणवे पेटतात.'
मागे वळून त्या घराकडे पाहिलं.
त्या सावळ्या सौभाग्याने त्या घराला सावरलं होतं.
पण पुढच्याच क्षणी मनात भीतीची एक लाट आली.
पुढे जर कधी कुणी जोश्यासमोर वहिनींचे कौतुक केले तर???
>>>पुढे जर कधी कुणी
>>>पुढे जर कधी कुणी जोश्यासमोर वहिनींचे कौतुक केले तर....???????????>>>
कोंणी नसेल केल तर तुम्ही करुन बघा............
कहानी मे नया Twist आ जायेगा................
प्रयत्न करुन बघायला हरकत नाही तुम्हाला जर कोणी जोशी समोर असेल तर.
पु.ले.शु........
पण थोडी काल्पनिक वाटली.
अजिबात पटली नाही काळी आहे
अजिबात पटली नाही
काळी आहे म्हणून त्या स्त्रीकडे कोणीच पाहणार नाही हि कल्पनाच चुकीची वाटली
पझेसिव माणसाला कधीही संशय पछाडू शकतो, बायको काळी कि गोरी हा प्रश्नच नाही.
काही विचार पट्त नाही.
काही विचार पट्त नाही.
संपूर्ण कथा पटेलच असे नाही पण
संपूर्ण कथा पटेलच असे नाही
पण मी पुरुषाच्या मनात स्वतःच्या बायकोवरून जी काही चलबिचल चालू असते, ती मांडण्याचा मी पयत्न केला आहे.
स्त्री काळी असली म्हणून तिच्याकडे कुणी आकर्षित होणारच नाही असे माझे म्हणणे नाही.
पण सुंदर रूप जास्त आकर्षित करते, याला कुणाचा विरोध आहे का?
मानवी मन आपल्या अंदाजाच्या मुठीत बसूच शकत नाही
कथा अजिबात पटली नाही. कथेतले
कथा अजिबात पटली नाही. कथेतले बरेचसे मुद्दे कंडीशनिंगचा भाग बनून येतात. सावळी आहे म्हणून सुंदर नाही, हा त्यातलाच एक मुद्दा.
लता मनाने छान आहे पण सावळी आहे.पण कुणीतरी तिला बघता क्षणीच तिच्या प्रेमात पडेल हि शक्यताच नाही.
>> का? सावळ्या मुलींच्या प्रेमात आजवर कुणी पडलंच नाही?????
मी ऑफिसात असताना माझी बायको घरी काय करत असेल, तिला कुणी त्रास देत असेल तर,
ती बाजारात गेली आणि तिच्यासोबत कुणी काही वेडंवाकडं करायचा प्रयत्न केला तर असे नाना प्रश्न देखण्या स्त्रीशी लग्न झालेल्या
प्रत्येक पुरुषाच्या मनात सतत येत असतील.
>?>>> सावळी बायकोची कुणी छेडछाड करतच नाही का? हा मुद्दाच मुळी खूप हास्यास्पद आहे.
चांगलं असतं तेच चोरीला जातं, वाईटावर कुणीही वाईट नजर टाकीत नाही.
>> पुन्हा एकदा, सावळं असणं म्हणजे वाईट हे म्हटलं गेलं आहे. या असल्या सोयी समजूतीच फेअरनेस क्रीमवाल्यांच्या रोजीरोटी बनत असतात.
जोशीबुवांचा लग्नाचा हेतू काय होता ते माहित नाही? पण बायकोच्या "इज्जतीविषयी" फारच पझेसिव्ह दिसत आहेत. पूर्ण कथेमधे बायकोच्या इज्जतीबद्दलच बोलताना दिसत आहेत. बायकोदेखील तेच बोलत आहे. लग्न म्हनजे बायकोच्या इज्जतीचे रक्षण एवढाच अर्थ माहित आहे का? समजा, बायकोवर दुर्दैवाने विनयभंग अथवा असाच काहीतरी प्रसंग आला तर जोशीबुवा काय करणार आहेत?
अर्थात कथा म्हणून आवडली नसली तरी शेवटचा पॅरा मात्र आवडला. पण वरच्या अख्ख्या कथेचा डोलारा मात्र अजिबात समधानकारक वाटत नाही,
पु.ले,.शु.
परत कारण तेच. टायटल मधे
परत कारण तेच. टायटल मधे टिंबे.
पास.
काहीही
काहीही
काइपण....
काइपण....
अजिबात आवडली नाही पटण्यासारखी
अजिबात आवडली नाही
पटण्यासारखी तर नाहीच नाही
तुमच्या थिअरी ने तर आफ्रिके
तुमच्या थिअरी ने तर आफ्रिके मधे लग्नच होणार नाहीत...छेडछाड पण होणार नाही .. .....:अओ: कैच्याकै..
नको होऊदेत आफ्रिकेमध्ये लग्न.
नको होऊदेत आफ्रिकेमध्ये लग्न. ते तिथले पीस ईथे ईम्पोर्ट करतील.
कथेचा बेसच अत्यंत तकलादू असल्याने पटतच नाहिये.
>>तुमच्या थिअरी ने तर आफ्रिके
>>तुमच्या थिअरी ने तर आफ्रिके मधे लग्नच होणार नाहीत...छेडछाड पण होणार नाही .. ..... कैच्याकै.>>>> उदयन +१
मी कुणी मोठा लेखक नाही.( कथा
मी कुणी मोठा लेखक नाही.( कथा वाचल्यावर तुम्हा सर्वांना अंदाज त्याचा आला असेलच )
कथा लिहिण्यासाठी जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा सर्व कथा मला विचित्र स्वभावावरच लिहायच्या होत्या.
त्यामुळे कथेतल्या ह्या व्यक्तिरेखा तुम्हाला विचित्र वाटणे साहजिकच आहे.
खरंतर कथा मायबोली वर पोस्ट केल्यावर त्यावर इतक्या कमेंट आल्या हे मी पाहिलेच नव्हते.
आज पाहिल्या तर ५४ कमेंट्स आल्या आहेत.... कमेंट्स माझ्या बाजूने नाही हि बाब निराळी.....
पण असो. बऱ्याच जणांना शिर्षकातल्या टिंबांमुळे जो काही त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो.
आता कथेबद्दल थोडे सांगतो.
कथेतला जोशी हे एक विक्षिप्त पात्र आहे. पण असाच एक जोशी प्रत्येक पुरुषाच्या मनात वावरत असतो.
आपली बायको सुंदर असली (दिसायला), तर तिच्या पाहणारे पुरुष (अगदी स्वतःचा मित्र सुद्धा ) तिच्याकडे कोणत्या नजरेने बघतात हे मायबोलीवरच्या पुरुषांना मी स्पष्ट समजून सांगावे असे मला वाटत नाही.
आता प्रश्न आहे तो काळ्या शब्दाचा...(सावळ्या हा शब्द मी मुद्दाम वापरलेला होता, कारण काळ्या हा शब्द वापरून मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. 'सावळ्या' हा शब्द वापरूनही मी माझ्या हेतुत सफल झालेलो नाही हे हि मला माहित आहे)....
आफ्रीकेतल्या बायकांचा तुम्ही जो विचार केलात त्याबद्दल खरंच तिथल्या बायका तुमच्या आभारी असतील..
लग्नाआधी जेव्हा मुलीचे फोटो दाखवले जातात तेव्हा एखादी गोरी मुलगी आणि एखादी सावली (काळी) मुलगी असे दोन फोटो तुम्हाला दिले, तर त्यातली कोणती मुलगी तुम्ही दिसल्या क्षणी पसंत कराल? हा प्रश्न सर्व पुरुषांनी स्वतःला प्रामाणिकपणे विचारावा.
'संशय' हि गोष्ट माणसाला नात्यासोबत मोफत मिळते. याच संशयाला हल्ली तुम्ही insecure नेस म्हणता.
जोशीचे विचार विक्षिप्त असले तरीही पुरुषाच्या मनात आपल्या बायकोच्या सुरक्षिततेबद्दल नेहमीच एक भीती असते. (कुणी मान्य करा अथवा ना करा.... हे एक सत्य आहे.)
सावळ्या बाईच्या प्रेमात कुणी प्रेमात पडूच शकत नाही असे मी अजिबात म्हणनार नाही.
कारण तसे असते तर जगातल्या सगळ्याच सावळ्या व्यक्ती प्रेमापासून वंचित राहिल्या असत्या.
पण पाहताच क्षणी प्रेमात पडण्यासाठी चेहरा हेच एक मोठे कारण असते. (याला हि विरोध आहे का?)
फुलांच्या गुच्छातून बायका एखादे सुंदर फुल निवडतात.
फुलासारख्या निरागस गोष्टीतही जिथे आपण रंग रूपावरून तुलना करतो, मग त्या तुलनेतून माणूस कसा सुटेल??
जोशीचा विक्षिप्त पणावाचण्यासाठी तुम्ही जो वेळ दिलात (फुकट घालवलात???) , त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
मी अजुन हि काही कथा, काही परीच्छेद लिहिल्या आहेत. (ज्या तुम्हाला सहजिकच निरर्थक,तुच्छ वाटू शकतात.)
त्या वाचायच्या असतील तर माझी website वाचू शकता.
www.kshanaapule.com
ही कथा जशीच्या तशी फेसबुकच्या
ही कथा जशीच्या तशी फेसबुकच्या 'क्षण तुझे माझे' ह्या गृपमध्ये वाचली होती. तुम्हीच लिहिलीय का तिथे??
योडी: मी "क्षण तुझे आणि माझे"
योडी:
मी "क्षण तुझे आणि माझे" पेज चा admin आहे आणि हि कथा मीच लिहिली आहे.
आशिष राणे, मला तुमची कथा अगदी
आशिष राणे, मला तुमची कथा अगदी पटली.
'दोघांचे स्वार्थ एकमेकांना पोषक असतील तर संसार सुखाचा होतो.
एकाचा स्वार्थ दुसऱ्याच्या स्वार्थाच्या विरुद्ध असला की संसारात ठिणग्या उडतात, वणवे पेटतात.'
हे अगदी खरे. प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट स्वार्थासाठी करतो. लग्न करताना का नाही, कमी शिकलेली, गॄहकॄत्यदक्ष नसलेली, तोन्डाळ, खूप बुटकी, कुरुप अशी मुलगी का नाही निवडत? मुली सुद्धा असा मुलगा का नाही निवडत?. फेसबुक वर एक गोष्त वाचली होती, कॉफी कप बद्द्लची तसंच आहे सगळ्यांचं. प्रत्येकाला चांगलं तेच हवं असतं. आणि ज्यांच्यात इनसेक्यौरिटी असते ते नक्कीच असे वागु शकतात.
नाही तितकीशी बरी
नाही तितकीशी बरी वाटली.......बेस्ट लक फॉर नेक्स्ट वन
खुप छान
खुप छान आहे...................... आम्हीपण प्रयत्न करतोय
प्रिय आशिष राणे कथा छान
प्रिय आशिष राणे
कथा छान आहे....पण मी ही कथा व.पुं च्या एका पुस्तकात वाचली आहे....may be I am wrong....पण तरी ही.........
Prasann Harankhedkar : गैरसमज
Prasann Harankhedkar :
गैरसमज झाला आहे तुमचा. कथा मीच लिहिली आहे.
तुम्ही हि कथा तुम्ही बहुतेक फेसबुक वर वाचली असाल.
मी "क्षण तुझे अन माझे" पेज चालवतो. त्याच्या माध्यमातून हि गोष्ट खूप ठिकाणी पोहोचली होती.
व. पु माझे आवडते लेखक. बहुतेक त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा प्रभाव जाणवत असेल माझ्याही लेखनात .
----------------------------------------------------------------------------------------------
वेलः
प्रत्येकाला चांगलं तेच हवं असतं.
आईशपथ नाहीच पटली …. सुंदर
आईशपथ नाहीच पटली ….
सुंदर मुलींवर समाज नजर टाकतो म्हणजे सुन्दर मुली वाईट कि समाज ??
समाज लाख सुंदर मुलीचं कौतुक करतील म्हणून मुलगी का बधेल ती थोडच नवर्याला सोडून निघून जाणार ??
कुणी सौन्दर्याच कौतुक केलंही तर तो फार मोठ्ठा गुन्हा आहे काय ?
आणि खूपच सावल्या मुलीपेक्षा थोडी जरी वरचढ असती तर लगेच तिच्या सोबत काहीतरी वाईट झालंच असतं कशावरून ?
जगातल्या सगळ्याच सुंदर मुली नवर्याशी दगा करतात किंवा वाइटाला बळी पडतात का ?
आणि खूप सावळ्या मुलीकडे कुणीच वाईट नजर टाकणार नाही पण तीच स्वतःच काय तिचं मन महत्व ठेवत नाही काय ??
आणि जो मनुष्य लग्नाच्या आधीपासून अश्या विचारांचा आहे तो बायको कशीही असली तरी निर्धास्त जगू शकेल काय ??
कठीण आहे बुवा सर्व
मयी : कथेतला नवरा जे काही
मयी :
कथेतला नवरा जे काही वागले ते बरोबर वागला असे माझे म्हणणे नाहीच आहे. मी कथा एका विचित्र स्वभावावरच लिहिली आहे. अश्या स्वभावाची व्यक्ती या जगात नाहीच आहे हे अमान्य आहे का तुम्हाला?
प्रश्न मुलगी सुंदर किंवा सावली असण्याचा नाहीये. प्रश्न आहे तो आकर्षणाचा.
सुंदर गोष्टीकडे लोक जास्त आकर्षित होतात. स्पष्ट सांगायचे तर, सुंदर गोष्टीच चोरीला जाण्याची शक्यता असते. मी तीच भीती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
अशीच एक कथा - व. पु. काळे
अशीच एक कथा - व. पु. काळे ची वाचल्याची आठवते, सन्दर्भ थोडा वेगळा होता. त्या गोष्टित ती बायको नवर्या वरील प्रेमाचे सतत नाटक करत असते. बाकी कथेची मान्ड्णी खूप सारखी वाटली..
'दोघांचे स्वार्थ एकमेकांना
'दोघांचे स्वार्थ एकमेकांना पोषक असतील तर संसार सुखाचा होतो.
एकाचा स्वार्थ दुसऱ्याच्या स्वार्थाच्या विरुद्ध असला की संसारात ठिणग्या उडतात, वणवे पेटतात.'
>>>>>>>>>>
छान सहमत!
बरेच प्रतिसादकांचा "सावळी" या शब्दामुळे गोंधळ उडालाय. कारण सावळी व्यक्तीही नाकीडोळी नीटस आणि सुडौल बांध्याची असेल तर आकर्षक ठरतेच. इथे सावळी म्हणजे कमी देखणी वा अनाकर्षक असे घेऊन कथा वाचावी.
कथेतील संकल्पनेत जे मांडलेय तसा विचार कोणी पुरुष करू शकेल का वगैरे मुद्दे मांडताना आपण एक कथाच वाचत आहोत हे लक्षात ठेवल्यास असेही होऊ शकते एवढे पुरेसे ठरावे. कथा म्हणजे दर दुसर्याच्या आयुष्यात घडणारी सर्वसामान्य गोष्ट असावी हा हट्ट कशाला? कधी चित्रपट बघताना तरी आपण हा हट्ट ठेवतो का?
मला कथा म्हणून आवडली. वेगळा विचार आणि मांडणी सुद्धा छान आहे.
अवांतर - राजपाल यादवचा एक चित्रपट होता, (हो हो, राजपाल यादव हिरोच होता) त्यात त्याची बायको देखणी आणि लंबू असल्याने त्याच्या डोक्यातील विचारांचे थैमान रेखाटलेय.
अवांतर - राजपाल यादवचा एक
अवांतर - राजपाल यादवचा एक चित्रपट होता, (हो हो, राजपाल यादव हिरोच होता) त्यात त्याची बायको देखणी आणि लंबू असल्याने त्याच्या डोक्यातील विचारांचे थैमान रेखाटलेय.>>>फिल्मचे नाव आहे मै मेरी पत्नी और वो. यात राजपालची हिरोइन (पत्नी) रितुपर्णा सेनगुप्ता दाखवलीये...
स्नेहनिल, येस्स
स्नेहनिल, येस्स
ऋन्मेऽऽष अनुमोदन.
ऋन्मेऽऽष अनुमोदन.
सावळ्या मुली सुंदर नसतात...
सावळ्या मुली सुंदर नसतात... आणि त्यांच्याकडे पाहत नाही... हे पटत नाही.... कथेचा बेस जमला नाही.
कमी देखणी वा अनाकर्षक >> सौ
कमी देखणी वा अनाकर्षक >> सौ जोशी या अनाकर्षक आहेत हे मान्य केले तर त्या माहेरी निरक्षर आणि/किंवा गरीब होत्या हे मान्य करावे लागेल. फेयर अँड ढवळी सारखी क्रीमे त्यांना माहित नसावी. त्यामुळे ह्या कथेत फक्त 'दोघांचे स्वार्थ एकमेकांना पोषक असतील तर संसार सुखाचा होतो.' एवढच मांडले गेले.
पुढच्या भागात सौ जोशी ह्यांना एक किलो फेयर आणि ढवळी क्रीम देणारा प्रियकर भेटतो. (नुसत्या कौतुकाने काय होत? तकदीर बदलते देर नही लगती असे मानणारा प्रियकर हव्वाच. वाटल तर त्याने सौ जोशी यांना राहुल रॉयने अनु अग्रवालला शिकवले तसे टायपिंगही शिकवावं. इथे एखादे गाणे टाकल तरी चालेल.) मग जोशी संसारात 'एकाचा स्वार्थ दुसऱ्याच्या स्वार्थाच्या विरुद्ध असला की संसारात ठिणग्या उडतात, वणवे पेटतात.' हे घडल असा भाग जरूर लिहा.