अंबिका

Submitted by मिलिंद महांगडे on 8 October, 2014 - 03:54

अंबिका व्यायामशाळेच्या मैदानात संध्याकाळी पोरं प्रॅक्टीस साठी जमली होती. कुणी कामावरुन आलं होतं, कुणी कॉलेजमधुन, तर कुणी असंच वेळ जात नाही म्हणुन . प्रॅक्टीस सुरु झाली. दिल्या, सत्या, बाळ्या, विक्या आणि असेच बरेच जण प्रॅक्टीस करण्यात गढुन गेले होते. बराच वेळ झाल्यानंतर सुन्या धावत धावत आला.
" साल्या, ही वेळ आहे काय रे यायची ?, पोरींच्या मागे जरा कमी फिरत जा... " दिल्यानेे त्याला चिडवलं
" अबे नाय यार... कॉलेजला जरा काम होतं "
" कसलं काम असतं रे तुझं कॉलेजला ? साला बघावं तेवा पोरीच फिरवत असतो... " दुसरं कोणीतरी बोलंलं.
" नाय रे ... आईशप्पत … ! " सुन्या खरोखरंच सांगायचा प्रयत्न करत होता पण कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. अशी काहीतरी भंकस चालु झाली आणि त्याचा फायदा घेऊन बाकीचेही प्रॅक्टीस सोडुन टाईमपास करायला लागले. सुन्या आला आणि होती नव्हती तेवढी प्रॅक्टीसही बंद पडली. सगळे कोडाळं करुन मैदानात बसुन गप्पा मारायला लागले. एकमेकांची खेचणे, शिव्या घालणे, पांचट जोक मारणे अशी मस्ती चालु असतानाच विक्याने सगळ्यांना शांत केलं. सगळेजण तो बघत असलेल्या दिशेने पाहु लागले. लाईट गेल्यावर चालु असलेला टिव्ही खट्कन बंद पडावा तशी सगळ्यांची मजामस्ती एका झटक्यात थांबली. समोर बघतायत त्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. समोरच्या गेटमधुन मोहन चालत आत येत होता. तो आला आणि मुख्याध्यापक वर्गात आल्यावर जसेे विद्यार्थी एकसाथ उभे राहतात तसे सगळे उभे राहीले. प्रत्येक जण त्याच्याकडे भितीयुक्त आदराने पहात होता. बराच वेळ कुणाला काय बोलावं ते सुचलंच नाही. सगळे त्याच्याकडे पाहत उभे राहीले. शेवटी तोच म्हणाला, " कायरे ? प्रॅक्टीस का थांबवलीत ? " तो इतका सहजपणे बोलला की जणु काही झालंच नाही. पोरांना काय बोलावं तेच कळेना. पोरांच्या अशा वागण्याला कारणही तसंच होतं. मोहन गेली दोन वर्षे अंबिकेत फिरकला नव्हता. आणि तो पुन्हा कधी परत येईल असं कुणालाच वाटत नव्हतं. पण आज तो सर्वांच्या पुढे येऊन उभा राहीला होता. भुत पहावं तशी सगळी त्याच्याकडे पहात राहीली.
" अरे भाई , काय झालाय काय ? असे काय बघताय माझ्याकडे ? " मोहन सगळ्यांकडे बघत म्हणाला. पोरं एकमेकांकडे पाहु लागली. कुणालाच त्याच्याशी बोलायचं धाडस होईना. तरी हिम्मत करुन सुन्या त्याला म्हणाला, " मोहन, यार तु कसा काय आलास प्रॅक्टीसला ? "
" का ? येऊ नको का ? "
" अरे, तसं नाही यार... तु तर जान आहेस आपल्या मंडळाची ...! , तुझ्यामुळे तर हे मंडळ तयार झालंय , खरं तर आम्हालाच समजत नव्हतं की तुला सामोरं कसं जायचं ? दोन वर्षापुर्वी जे घडलं .... " सुन्या अडखळत म्हणाला.
" जे झालं ते झालं ... गोली मारो उसको ... आजपासुन मी पण येणार प्रॅक्टीसला. येऊ ना ? " तो हसत म्हणाला.
" बास काय भाई ! तु आलास ... आता आग लावुन टाकु भेंचोद....! " सुन्याने मोहनला उचललं तसं पोरांनी एकच गलका केला .... कानठळ्या बसतील अशा शिट्ट्या वाजल्या ... काय झालं हे बघायला आजूबाजुचे लोक आपापल्या घरांतुन बाहेर आले ...
" ए भिकारचोट पक्या, तुझा डिजे लाव मोठ्याने .... आपला भाई आलाय परत .... आता मारुन टाकु सगळ्या मंडळांची ...! आता फक्त एकच नाव मुंबईभर गाजणार.... अंबिका...! " त्यावर सगळ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
पक्याने पडत्या फळाची आज्ञा समजुन जोरात डिजे लावला ... सगळी पोरं नाचायला लागली , पोरांनी मोहनला खांद्यावर घेतला अन् हंडीचा पहिला थर रचला गेला ...
" कसली अवदसा परत आठवलीय तुम्हाला ? डोकं फिरलंय काय ? एवढं सगळं होऊन पुन्हा तेच ! " लाटलेली चपाती भडभडत्या स्टोव्हवरच्या तव्यावर टाकुन फणकाऱ्याने मोहनची बायको त्याला बोलली. तो मात्र शांतच राहीला. समोर असलेल्या टिव्हीचे चॅनल बदलत बसला. " काय म्हणतेय मी ...? इतकं सगळं झालं तरी तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो...? माणसाचं काळीज आहे की जनावराचं ? " ती तशीच बराच वेळ बडबडत राहीली. मोहन मात्र शांतपणे ऎकुन घेत होता. त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं आणि तिच्याकडे लक्ष न देण्यासाठीच तो टिव्ही लावुन बसला होता. बाजुला त्याची सात वर्षाची मुलगी बसली होती. " मी इतकी जीव तोडुन सांगतेय आणि तुमचं लक्ष कुठंय हो ...? आग लावा त्या तुमच्या टिव्हीला ...! " तिचं तणतणंन चालुच होतं. चॅनल बदलता बदलता मोहन एका न्युज चॅनलवर येऊन थांबला. त्यावरची न्युजरिपोर्टर दहीहंडीची तयारी कशाप्रकारे चालली आहे ते दाखवत होती.
" मी तुम्हाला तिकडे जाऊ द्यायची नाही ... ऐकलंत का ? " ती अक्षरशः ओरडुन म्हणाली. मोहन तसाच उठला, पायात चप्पल घातली आणि चालायला लागला.
" माझ्या पोराचा जीव घेतलाय ह्या अंबिकेने...." ती कळवळुन रडु लागली. पुढचं ऐकण्याआधी मोहन घरातुन केव्हाच बाहेर पडला होता.
मोहन अंबिकेत परत आल्यामुळे पोरांना चांगलाच जोश आला होता. सात वर्षापुर्वी त्यानेच सगळ्यांना एकत्र करुन अंबिका व्यायामशाळेची स्थापना केली आणि तेव्हाच दहीहंडीचा चांगला ग्रुपही तयार झाला होता. एक दोन वर्षातच आठ थर लावणाऱ्या अंबिकेचं नाव सगळ्या मुंबईभर झालं होतं. पुढे हंडीचं बाजारीकरण झालं आणि त्यातुनच सुरु झाली ती थरांची जीवघेणी स्पर्धा ...! पुर्वी सहा - सात थर म्हणजे डोक्यावरुन पाणी ....! पण उंचीची नशा काही वेगळीच असते. आणि ह्या नशेतच मोहनने आपला मुलगा गमावला होता. आठव्या थरावरुन पोरगं खाली कोसळलं ते थेट डोक्यावर पडलं. हॉस्पिटलला नेईपर्यंत उशीर झाला होता. ह्या घटनेला आता दोन वर्षे झाली होती . मोहनच्या बायकोला त्याचा मोठा धक्का बसला. सहा महिने ती त्या धक्क्यातुन सावरली नव्हती. परंतु वेळ ही प्रत्येक जखमावरचं औषध असते. हळुहळु ती मुळपदावर आली. परंतू परवा मोहन अंबिकेत गेला आणि पुन्हा ती बिथरली.
" ह्या वर्षी आपण रेकॉर्ड करायचा .... नऊ थरांचा ...! " मोहन ने घोषणा करुन टाकली. पोरं त्याच्या तोंडाकडे बघतच राहीली. एवढं होऊनही ह्या माणसात केवढा उत्साह आहे? " अरे, बघताय काय ? चला प्रॅक्टीसला लागा... आपल्या पहील्या थरावर बाज्या आणि बाकीचे पंधरा जण, दुसऱ्यावर संजय आणि त्याच्या बरोबरचे दहा जण ...." मोहन ने प्रत्येक थराचा एका ग्रुप लिडर बनवला आणि त्याच्याबरोबर त्या ग्रुपला नेमुन दिले होते. शिवाय थरांच्या बाजुने कोण कोण उभं रहाणार ...., वरच्या थरांवर चढायला मदत कोणकोण करणार ..., खाली एखादा पडला तर झेलायला कोण असणार, याची सगळी आखणी झाली होती आणि त्याप्रमाणे प्रॅक्टीसही जोरात सुरु होती. वजनाने हलका आणि सडपातळ असल्याने मोहन स्वतः सातव्या थरावर होता.
जोरदार प्रॅक्टीसला चालू होती . हा हा म्हणता दहीहंडी दोन दिवसावर आली.
" यार मोहन, प्रॅक्टीस तर जोरात चालु आहे पण तु म्हणतोस तसं नऊ थर लावायचे असतील तर आपल्याला तीन एक्क्यावर भागणार नाही. काहीतरी वेगळं करायला पाहीजे .... " सुन्या काळजीच्या सुरात म्हणाला.
" हम्म्... त्याचा विचार मी केलाय .... बघु कसं होतंय ते "
" नायतर आपण आपले आठ थरच लावु .... काय बोल्तो ...? "
" नाय.... थर लागले तर नऊच... नाय तर नाय... " मोहनच्या ह्या निर्धारापुढे सुन्याला काय बोलावं ते कळेना. त्याच्या मनात काय आहे हे कुणालाच कळत नव्हतं. राहीलेले दोन दिवसही निघुन गेले आणि शेवटी तो दिवस आला. सगळ्या पोरांच्या अंगात अंबिका व्यायामशाळेचे पिवळे टिशर्ट होते. नेहमीप्रमाणे बापुशेटचा ट्रक पोरांनी खच्चुन भरलेला. ट्रकच्यामागच्या भागात पोत्यात कापुस भरावा सगळी पोरं भरलेली , ट्रकच्या टपावर चाळीतव्या काही टवाळ पोरांनी आधीच जागा पटकावली होती. गाडीच्या केबिन मधे लहान लहान पोरं-पोरी बसली होती. मोहन आणि सुन्याही त्यातच बसले होते. ट्रक निघतानाच पोरांनी जय अंबिकेचा जयघोष केला.
" सुन्या मी थोडा बदल केलाय .... " मोहन त्याच्याकडे पहात म्हणाला. सुन्याच्या चेहऱ्यावर लहानसे प्रश्नचिन्ह उमटले " ऐक,आपण आपल्या जागांची आदलाबदल करु. मी तुझ्या जागी आठव्या थरावर जातो. "
" का रे? काय झालं ...? "
" नववा थर रचण्यासाठी .... " मोहनच्या डोळ्यात पक्का निर्धार दिसत होता. सुन्या त्यावर काहीच बोलला नाही. त्याला विचारुनही काही फायदा नव्हता. थोड्याच वेळात ते मानाच्या हंडीपाशी पोहोचले. भला मोठा जनसागर लोटला होता. एका मंडळाची सलामीची तयारी चालली होती. त्यांचे दोन थर रचुन झाले होते. हळुहळु थर वाढत होते. परंतु सातव्या थरापर्यंत ते गेले आणि पत्त्यांचा बंगला कोसळावा तसे कोसळले. कुठुनतरी पाण्याचा फवारा आला. जोरजोरात डिजे सुरु झाला. एकमेकांच्या अंगावर कोसळलेल्या पोरांना शक्या तितक्या जलद गतीने बाजुला खेचण्याचे काम काही लोक करत होते. बाकीची मंडळे प्रतिक्षेत होती... अंबिका व्यायामशाळेचे गोविंदा पथक मानाच्या हंडीपाशी पोहोचले.
आता सर्वजण गोल उभे राहीले. मोहन विक्याच्या खांद्यावर बसला. त्याच्या सुचना सगळे कान देऊन ऐकु लागले. पहीला पायाचा थर गोल करुन उभा राहीला. मोहनने पुढची शिट्टी वाजवली. लगेचच दुसऱ्या थराची पोरं त्यांच्या खांद्यांवर जाऊन चढुन उभी राहीली. असं करता करता पाच थरांचा पिरॅमिड उभा राहीला. आता डिजे आपोआप बंद झाला. लोंकांचं पाणी मारणं बंद झांलं. सगळे एकटक त्यांच्याकडे पाहु लागले. आता एक्के लावले जाणार होते. हळुहळु एक एक एक्का वर चडु लागला. पहीला दिल्या गेला. त्यानंतर मोहनने खुण केल्यावर सुन्या वर चढायला तयार झाला. तो वर चढणार तेवढ्यात त्याने मोहनकडे पाहीलं आणि त्याच्या पायाखालची जमिन सरकल्यासारखं त्याला वाटलं. मोहनच्या खांद्यावर त्याची सात वर्षाची मुलगी अंबिका होती. त्याला काय बोलावं ते कळेना. तो नुसता डोळे विस्फारुन मोहनकडे पहात राहीला.
" सुन्या, चल लवकर... " मोहनने घाई केली.
" अरे पण, मोहन हे काय ? हा तुझा नववा थर ? तुझं डोकं फिरलंय की काय ? "
" मी करतोय ते बरोबर आहे ... "
" मोहन यार, माझे पाय थरथरतायत.... "
" नेहमी जसा एक्का लावतोस तसा लाव . चल... टेंन्शन नको घेऊ "
" अंबिकेला काही झालं तर ? "
" काही होत नाही . तु जास्त विचार करु नकोस "
दोघे एकामागुन एक चढत गेले. मोहनच्या खांद्यावर त्याची सात वर्षांची मुलगी अंबिका डोक्याला लहानसं हेल्मेट घालुन बसली होती. तिने मोहनच्या कपाळाला बांधलेल्या फडक्याला घट्ट पकडलं होतं. दिल्या सहाव्या थरावर पोचला आणि बसुन राहीला. त्याच्या खांद्यावर सुन्या बसला. मोहन त्याच्या मागोमाग होताच ! त्याच्या खांद्यावर अंबिका घट्ट धरुन बसली होती. तो दिल्यापर्यंत आला. त्याची नजर तो बिलकुल ढळुन देत नव्हता. तो सुन्याच्या खांद्यावर चढला. आत तो अत्युच्च शिखरावर होता . खाली सगळे त्याला मुंग्यांप्रमाणे दिसत होते. हीच ती उंचीची नशा ! त्याने मनाची एकाग्रता केली. सुन्याच्या लटपटणाऱ्या खांद्यावर तो स्वतःचा आणि अंबिकेचा तोल सांभाळत बसुन होता.
' सर्वांनी शांत रहा, अंबिका व्यायामशाळा थर रचत आहे ' माईकवरुन सुचना आली. लोकांनी श्वास रोखले. हळुहळु दिल्या उठला. , त्याच्यानंतर सुन्या उठायचा प्रयत्न करु लागला पण टेन्शनमुळे त्याला निट उठता येईना.

" सुन्या गोंधळु नकोस, आरामात उभा रहा. तु करु शकतोस ", मोहन त्याला धीर देत होता. कसाबसा जोर लावुन दिल्याच्या हाताचा आधार घेत तो थरथरत उभा राहीला. खाले लोक पडणाऱ्यांना सावरण्यासाठी हात उंच करुन उभे राहीले. आता मोहन त्याच्या खांद्यावरुन हळुहळु सरळ रेषेत उठु लागला , उठताना खांद्यावर अंबिका असल्याने त्याचा तोल जाताजाता त्याने स्वतःला सावरलं . खालच्या उभ्या असलेल्या लोकांचा काळजाचा ठोका चुकला. आता मोहन पुर्णपणे उभा राहीला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता खांद्यावरच्या अंबिकेच्या पायावर दोन टिचक्या मारल्या. हि तिच्यासाठी खांद्यावर उभी रहायचा खुण होती. ती अलगद सरळ रेषेत उठली. मोहनने तिचे दोन्ही पाय खांद्यावर घट्ट पकडले होते, तरी तिचे पाय थरथरत होते. ती पुर्ण उभी राहीली, आणि कृष्ण जसा बासरी वाजवतो, तशी बोटांची रचना केली. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर काय झालं कळालं नाही. भुकंप झाल्यासारखे पायाखालचे सगळे थर गडगडले, वरचे चारही एक्के एका क्षणासाठी हवेत होते. त्यानंतर ती रांग जशीच्या तशी बाणासारखी खाली आली. एकच कल्लोळ उडाला. एकमेकांच्या अंगावर लोळत थरांवरची पोरं खाली खाली जात राहीली. मोहन, सुन्या त्या गोंधळात गर्दीत चेंगरले गेले. मोहनच्या खांद्यावर अंबिका नव्हती. कुणाचा पाय तोंडावर, कुणाचं डोकं खाली आणि वर पाय, कुणी साफ आडवा झालेला , कसल्याही अवस्थेत पोरं एकमेकांवर पडली. ठरल्याप्रमाणे काही लोक एकमेकांच्या अंगावर पडलेल्या पोरांना खेचुन बाजुला करण्याचे काम करत होते., खाली पडलेल्यांना उचलत होते. सर्व जण एकमेकांपासुन बाजुला झाले. मोहन इकडे तिकडे पाहु लागला. अंबिका त्याला कुठेच दिसेना ... ह्या भल्या मोठ्या कोलाहलात ती कुठे पडली असेल ? ती नीट असेल ना ? की आपल्या पहील्या मुलाप्रमाणे तिही .....? नाही .... नाही ....! विचार करुन तो वेड्यासारखा तिला शोधत फिरु लागला, तिला हाका मारु लागला. पण ती कुठेच दिसेना. तो सुन्याला शोधु लागला , त्याचाही कुठे पत्ता नव्हता. इतक्यात चारी बाजुंनी टाळ्यांचा कडकडाट ऐकु आला. त्याने पाहीलं, सुन्याच्या खांद्यावर उभी राहुन अंबिका सर्वांना अभिवादन करत होती .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओं एम जी..................
शब्द निघाला मनातुन.

Happy Happy Happy

थरारक शेवट! अस वाटलं होत की अंबिकाचा पण तिच्या भावासारखाच शेवट होईल, आणि मोहन घामाघुम होउन झोपेतुन उठेल.

Pages