आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १०

Submitted by स्पार्टाकस on 2 October, 2014 - 22:52

सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात अ‍ॅमंडसेन, रिझवेल्ट आणि हॅन्सन जोडगोळीने ग्जो हेवनच्या आसपास पंचवीस मैलांच्या परिसरात शिकारीसाठी तीन मोहीमा केल्या. या सर्व मोहीमांत अनेक रेनडीयर आणि क्वचित पक्षी त्यांच्या हाती लागले. मागे राहीलेले चार एस्कीमो या सर्व मोहीमांत त्यांच्याबरोबर गेलेले होते! ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अ‍ॅमंडसेन आणि हेल्मर हॅन्सन यांनी एका मोठ्या एस्कीमो तळाला भेट दिली आणि त्यांच्याकडून माशांचा भरपूर मोठा साठा विकत घेतला!

२० नोव्हेंबरच्या सकाळी अ‍ॅमंडसेन आणि त्याचे सहकारी ग्जो वर ब्रेकफास्टच्या तयारीत असतानाच एक एस्कीमो त्यांच्या भेटीला आला. हा एस्कीमो इतरांपेक्षा बराच वेगळा आणि थोडाफार इतर माणसात मिसळलेला होता. त्याला बर्‍यापैकी इंग्लिश भाषा येत होती! आपलं नाव अटंग्ला असल्याचं त्याने अ‍ॅमंडसेनला सांगितलं. हडसनच्या उपसागरातील चेस्टरफील्ड खाडीपासून तीन गोर्‍या माणसांसह आपण कॉपरमाईन नदीपर्यंत गेलो होतो असंही त्याने स्पष्टं केलं. कॉपरमाईन नदीपासून परत फिरल्यावर काही एस्कीमोंकडून त्याला ग्जो बद्दल माहीती मिळाल्यावर तब्बल दोनशे मैलांची पायपीट करुन तो ग्जो वर येऊन पोहोचला होता!

कॉपरमाईन नदीच्या परिसरातील गोर्‍या माणसांची माहीती अ‍ॅमंडसेनला एस्कीमोंकडून पूर्वीही मिळाली होतीच. केप फुलर्टन इथे दोन मोठी जहाजं असल्याचं अटंग्ला कडून समजल्यावर त्यांना संदेश पाठवण्याचा अ‍ॅमंडसेनने विचार केला. अटंग्लाची हा संदेश नेण्याची तयारी होती, पण त्याच्या बदल्यात त्याने मागणी केली ती दारूची! काही वर्षांपूर्वी अमेरीकन संशोधकांबरोबर हडसनच्या उपसागरातून विनीपेग सरोवरापर्यंत मार्ग काढताना त्याने व्हिस्कीची चव चाखली होती आणि आता तो त्यावर हटून बसला होता!

सर्वजण आता आपल्या खुशालीची पत्रं लिहीण्यात गढून गेले होते. २८ नोव्हेंबरला अटंग्लाने सर्वांची पत्रं घेऊन केप फुलर्टनचा मार्ग धरला. अ‍ॅमंडसेनने आधीच्या मोहीमांवर साथ केलेला एक एस्कीमो टोर्ल्नेक्टॉ याचीही त्याच्याबरोबर रवानगी केली होती.

डिसेंबरच्या मध्यावर एक एस्कीमो ग्जो हेवनवर अ‍ॅमंडसेनचे कुत्रे शिकारीसाठी उधार नेण्यासाठी आला होता. हा एस्कीमो अ‍ॅमंडसेनच्या चांगल्याच परिचयाचा होता. त्याच्याकडून अ‍ॅमंडसेनला एक धक्कादायक बातमी मिळाली..

अटंग्ला बरोबर पाठवलेला एस्कीमो टोर्ल्नेक्टॉ याने अ‍ॅमंडसेनने सोपवलेलं पत्र पोहोचवण्याचं काम अर्धवट सोडून एका देखण्या एस्कीमो स्त्री बरोबर दक्षिणेचा मार्ग धरला होता! अ‍ॅमंडसेनचा अटंग्लावर विश्वास नसल्याने त्याने टोर्ल्नेक्टॉ याला पाठवलं होतं, परंतु त्याने अशा रितीने मधूनच पोबारा केला होता!

हे ऐकल्यावर आपली पत्रं सुखरुप पोहोचतील याची सर्वांनी आशा सोडून दिली!

१९०५ च्या जानेवारीत अ‍ॅमंडसेनने ग्जो हेवन इथे वास्तव्यं करुन असलेल्या एस्कीमोंची चक्कं जनगणना करण्याचा बेत केला. एकूण १८ कुटुंबातील ६० एस्कीमो तिथे वस्ती करुन असल्याचं त्याला आढळलं! अर्थात इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या एस्कीमोंच्या वस्तीचं कारण अ‍ॅमंडसेनच्या तुकडीकडून त्यांना मिळणारी कामं आणि त्याचा मोबदला हे उघड होतं.

ग्जो जहाजावर एस्कीमोंचा नेहमीचा राबता असे. हिवाळ्यात अन्नाची कमतरता भासू लागल्यावर तर ते हमखास ग्जो वर चक्कर मारुन काही खाद्यपदार्थ मिळवण्याचा खटपटीत असत. एकदा रेनडीयरचं मांस साठवलेले पाच टीनचे डबे कमी झाल्याचं लिंडस्ट्रॉमच्या ध्यानात आलं. अ‍ॅमंडसेनला ही बातमी कळताच त्याने आपल्या दोन विश्वासू एस्कीमोंना हे चोर शोधून आणण्याची सूचना दिली. दोन्ही एस्कीमोंनी अवघ्या दोन तासात पाच चोर त्याच्यासमोर आणून उभे केले. हे सर्वजण ओग्लुई एस्कीमो होते! त्यांच्यात टेरीयूचाही समावेश होता! अ‍ॅमंडसेनने या सर्वांना सज्जड दम दिला आणि पुन्हा जहाजावर येण्यास सक्तं मनाई केली.

नेचिली एस्कीमोंच्या प्रामाणिकपणाची पुन्हा एकदा अ‍ॅमंडसेनला खात्री पटली. एकाही नेचिली एस्कीमोने कोणत्याही वस्तूला हात लावला नव्हता!

जानेवारीच्या अखेरीस एस्कीमोंनी आपला मुक्काम हलविण्याची तयारी सुरु केली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी ग्जो हेवन सोडलं आणि पुढल्या मुक्कामासाठी प्रस्थान ठेवलं. काही एस्कीमो कोणतंही काम न करता सतत आपण गरीब असल्याची बतावणी करत अन्नाची मागणी करत असत. या सततच्या मागणीला वैतागलेल्या अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांना एस्कीमोंपासून सुटका झाल्यासारखं वाटलं नसलं तरच नवल!

अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांनी वसंत ऋतूमधील त्यांच्या मोहीमांची तयारी करण्यास सुरवात केली. हॅन्सन जोडगोळी व्हिक्टोरीया बेटाच्या पूर्व किनार्‍याच्या मोहीमेवर जाणार होती. उत्तर अमेरीकेच्या केवळ याच किनार्‍याचं सर्वेक्षण अद्याप करण्यात आलेलं नव्हतं. या मोहीमेसाठीच ग्जो हेवनपासून १०० मैलांवर केप क्रोझीयर इथे त्यांनी डेपो उभारला होता. मात्रं या मोहीमेसाठी आवश्यक त्या संख्येने कुत्रे त्यांच्यापाशी उपलब्धं नव्हते. गॉडफ्रे हॅन्सन आणि रिझवेल्ट यांनी २५ मैलांवरील एस्कीमोंच्या तळावरुन चार कुत्रे पैदा केले.

या मोहीमेची तयारी सुरु असतानाच अ‍ॅमंडसेनचा जुना एस्कीमो टोर्ल्नेक्टॉ याचा संदेश त्याला मिळाला. आपल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप झाला होता आणि आता परत आपल्याला कामावर घेण्याची त्याने विनंती केली होती. टोर्ल्नेक्टॉ एक अत्यंत कुशल कारागीर होता. अ‍ॅमंडसेनने त्याला पूर्ववत कामावर घेण्याचं आश्वासन दिल्यावर एक दिवस तो ग्जो हेवन इथे परतला.

७ फेब्रुवारीला गॉडफ्रे हॅन्सन स्लेजवरुन मोहीमेसाठी बाहेर पडला. मात्रं अतीथंड हवामानामुळे त्याला फारशी प्रगती करता आली नव्हती. एक दिवस अ‍ॅमंडसेनने एका मोहीमेसाठी उभारलेल्या डेपोमधून काही एस्कीमो अन्न चोरत असल्याची त्याला माहीती मिळाली. टेरीयू आणि त्याचा एक साथीदार यांचा या मागे हात होता. अ‍ॅमंडसेनला हे कळताच टेरीयू आणि त्याचे साथीदार एकाही तळाच्या आसपास आढळून आल्यास त्यांना गोळी घालण्यात येईल अशी धमकी त्याने आपल्या एस्कीमोंमार्फत सर्वांपर्यंत पोहोचवली! अँटन लुंडने मुख्य कोठाराच्या दारामध्ये एक लहानसा डायनामाईट पुरुन ठेवला! डायनामाईटचा स्फोट झाल्यास कोणाला दुखापत झाली नसती परंतु एस्कीमोंना मात्रं कायमची दहशत बसणार होती!

आदल्या वर्षी नोंदवलेली अनेक चुंबकीय निरीक्षणं चुकीची असल्याचं अ‍ॅमंडसेनच्या ध्यानात आलं होतं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अ‍ॅमंडसेनने अच्लिच्टू बेटाच्या परिसरात पुन्हा चुंबकीय निरीक्षणं नोंदवण्याची योजना आखली होती. सुमारे महिनाभराच्या मोहीमेत अचूक निरीक्षणांच्या नोंदीनंतर अ‍ॅमंडसेन ग्जो हेवन इथे परतला.

ग्जो हेवनच्या परिसरात २५ मैलांच्या त्रिज्येत उभारण्यात आलेल्या अनेक इग्लूंमधून अ‍ॅमंडसेनने चुंबकीय निरीक्षणं नोंदवण्याचा सपाटा लावला होता. मार्चअखेरीस हॅन्सन जोडगोळीची व्हिक्टोरीया बेटावरील सफरीची तयारी पूर्ण झालेली होती. २ एप्रिलला त्यांनी आपल्या मोहीमेसाठी ग्जो हेवन सोडलं.

ग्जो हेवन इथे असलेल्या एस्कीमोंकडे अ‍ॅमंडसेनने फ्रँकलीन मोहीमेबद्दल चौकशी केली. त्यांच्यापैकी एका ओग्लूई एस्कीमोने त्याला माहीत असलेली हकीकत अ‍ॅमंडसेनला सांगितली. किंग विल्यम बेटाचा पश्चिमेचं टोक असलेल्या केप क्रोझीयरच्या दक्षिण किनार्‍यावर एका हिवाळ्यात त्यांना एक जहाज बर्फात अडकलेलं आढळलं होतं. जहाजावर कोणीही नव्हतं. एस्कीमोंनी शक्यं असेल तेवढं जहाजाचं लाकूड आणि लोखंड काढून घेतलं. पुढच्या उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर जहाज बुडालं होतं! जहाजावर एस्कीमोंना हवाबंद अन्नाचे डबे आढळले होते. त्या डब्यातील अन्न खाल्यावर एस्कीमोंपैकी अनेकजण गंभीर आजारी झाले होते. त्यापैकी काहीजणांचा मृत्यूही झाला होता!

एस्कीमोंच्या या माहीतीवरुन एक गोष्ट स्पष्टं झाली होती..
केप क्रोझीयरपासून केंब्रिज उपसागरापर्यंतचा नॉर्थवेस्ट पॅसेजचा मार्ग अद्यापही कोणालाही सापडलेला नव्हता!

मे च्या पहिल्या आठवड्यापासून अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांनी ग्जो हेवन परिसरात विविध कामांसाठी उभारलेली घरं उतरवण्यास सुरवात केली. या उन्हाळ्यात ग्जो हेवन सोडून पश्चिमेच्या दिशेने पुढे मजल मारण्याची अ‍ॅमंडसेनची योजना होती. सर्वप्रथम नंबर लागला तो विल्कच्या मॅग्नेटचा! १५ मे पासून मॅग्नेट खाली उतरवण्यास सुरवात झाली!

२० मे च्या संध्याकाळी विल्क एका टेकडीवरुन चुंबकीय निरीक्षणं नोंदवून परत येत असतानाच दूरवरुन वेगाने येणारी एक स्लेज त्याच्या दृष्टीस पडली. अर्थात ग्जो हेवनच्या परिसरात एखादी एस्कीमो तुकडी परतत असावी असा त्याने तर्क केला. एव्हाना रात्रीचे साडेनऊ वाजले होते. सर्वजण झोपण्याच्या तयारीत असतानाच काही वेळाने ती स्लेज तिथे येऊन धडकली.

त्या स्लेजवरील माणसाला पाहताच सर्वजण ताडदिशी उठून बसले. अटंग्ला!

अटंग्लाने आपल्यासोबत अनेक पत्रं आणली होती. अर्थात नॉर्वेतून कोणाचीही पत्रं येऊन पोहोचणं अशक्यंच होतं. कॅनेडीयन सरकारचं आर्क्टीक हे जहाज केप फुलर्टन इथे होतं. या जहाजाचा कमांडर मेजर मूडी याने अ‍ॅमंडसेनच्या तुकडील सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं होतं. आपल्याजवळील पाच कुत्रेही त्याने पाठवले होते. आर्क्टीकचा कॅप्टन बॅमीयर याच्याकडून पश्चिमेला असलेल्या व्हेल माशांच्या शिकारीसाठी आलेल्या जहाजांबद्दलही बरीच माहीती कळली होती. या जहाजांपैकी इरा हे जहाज केप फुलर्टन इथेच होतं. या जहाजाचा कॅप्टन कोमर यानेही अ‍ॅमंडसेनला आपले पाच कुत्रे पाठवले होते. मात्रं अटंग्ला येऊन पोहोचण्यापूर्वीच गॉडफ्रे हॅन्सन आपल्या मोहीमेवर निघालेला असल्याने या कुत्र्यांचा आता काहीच उपयोग होण्यासारखा नव्हता. अटंग्लाबरोबर पाठवलेली सर्व पत्रं मेजर मूडीने नॉर्वेला रवाना केलेली होती! डेन्मार्कच्या सरकारने अ‍ॅमंडसेनच्या मोहीमेला मदत म्हणून लिओपोल्डहॉन इथे साधनसामग्रीचा डेपो उभारला होता. रशिया आणि जपान यांच्यातील युद्धाचाही त्या पत्रांमध्ये उल्लेख करण्यात आला होता.

ग्जो हेवन इथली आवराआवर सुरु असताना अ‍ॅमंडसेनला एका गोष्टीची सतत काळजी लागून राहीली होती...
केप क्रोझीयरच्या मोहीमेवर गेलेले गॉडफ्रे हॅन्सन आणि रिझवेल्ट अद्यापही परतले नव्हता!

सात आठवडे उलटल्यावरही हॅन्सन-रिझवेल्ट परतले नाहीत याचा अर्थ केप क्रोझीयर इथला डेपो त्यांना सुस्थितीत आढळला असावा असा अ‍ॅमंडसेनने अंदाज केला होता. मात्रं सर्व दिशांनी येऊन धडकणार्‍या एस्कीमोंकडूनही त्यांची कोणतीही बातमी न मिळाल्याने त्याला विशेष काळजी वाटत होती.

२४ जूनच्या सकाळी हॅन्सन आणि रिझवेल्ट ग्जो हेवन इथे येऊन धडकले!

त्या दोघांना पाहताच अ‍ॅमंडसेनने सुटकेचा नि:श्वास टाकला. सुमारे तीन महिन्यांच्या मोहीमेनंतरही दोघेही एकदम तंदुरुस्त अवस्थेत होते!

केप क्रोझीयर इथे उभारण्यात आलेल्या डेपोची अस्वलांनी पार वाट लावली होती! व्हिक्टोरीया सामुद्रधुनीतून पुढे मजल मारणं हे अत्यंत त्रासाचं होतं. गोठलेल्या बर्फावरुन मार्गक्रमणा करणं त्यांना अनेकदा कठीण गेलं होतं. अनेकदा तर दिवसाला जेमतेम २ ते ३ मैल इतक्याच अंतराची त्यांना मजल मारता येत होती. या सामुद्रधुनीच्या पलीकडील परिसरात त्यांची किल्नेर्मियम एस्कीमोंशी गाठ पडली होती. हे एस्कीमो कॉपरमाईन नदीच्या परिसरातील होते. नेचिली एस्कीमोंच्या तुलनेत त्यांची शस्त्रं अधिक मजबूत असल्याचं हॅन्सनला आढळून आलं होतं. या एस्कीमोंबरोबर एक दिवस आराम करुन त्यांनी व्हिक्टोरीया बेटाच्या अनोळखी किनार्‍याचा मार्ग धरला होता. या किनार्‍याचं अद्यापही सर्वेक्षण झालेलं नव्हतं. आपल्या वाटचालीच्या दरम्यान सील, रेनडीयर आणि अस्वलांच्या मुबलक शिकारीमुळे त्यांना अन्नाचा तुटवडा सुदैवाने जाणवला नव्हता.

२६ मे ला हॅन्सन - रिझवेल्ट यांनी परतीची वाट धरली. परत फिरण्यापूर्वी एका केर्नमध्ये आपल्या मोहीमेची साद्यंत हकीकत नोंदवण्यास ते विसरले नव्हते. परतीच्या वाटेवर व्हिक्टोरीया सामुद्रधुनीतील रॉयल जॉग्रॉफीक सोसायटी बेटं त्यांच्या नजरेस पडली. या बेटांचं काळजीपूर्वक सर्वेक्षण करुन त्यांनी नकाशावर त्यांची नोंद केली. पूर्वीच्या कोणत्याही नकाशांत या बेटांचा उल्लेख नव्हता! उत्तर अमेरीकेचा किनारा, व्हिक्टोरीया बेट आणि किंग विल्यम बेट यांच्यामध्ये ही बेटं पसरलेली होती! पश्चिमेच्या दिशेने मार्ग काढताना दृष्टीने या बेटांचं नेमकं स्थान ज्ञात असणं अत्यावश्यक ठरणार होतं!

४ जुलैला लिंडस्ट्रॉम एका एस्कीमोसह बेटाच्या अंतर्भागात मोहीमेवर निघाला. लिंडस्ट्रॉम आर्क्टीकमध्ये आढळणारे जीवशास्त्रीय नमुने गोळा करत होता. आपल्या या संग्रहात आणखीन भर टाकण्याची त्याची योजना होती. मात्रं लिंडस्ट्रॉमची ही मोहीम फारशी यशस्वी ठरली नाही. ९ जुलैला तो ग्जो हेवन इथे परतला. मात्रं आर्क्टीकमध्ये आढळणार्‍या बदकांची ४० अंडी त्याला मिळाली होती!

अ‍ॅमंडसेनने टोर्ल्नेक्टॉला आपल्याबरोबर ग्जो हेवन इथून पश्चिमेला नेण्याचा विचार केला होता. नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडताना एखादा एस्कीमो मदतीला असणं फायद्याचं ठरणार होतं. टोर्ल्नेक्टॉने आधी आनंदाने होकार दिला, परंतु ग्जो हेवन सोडण्याचा दिवस जवळ येत होता तशी त्याची चलबिचल वाढू लागली. अखेर आपण या मोहीमेवर येऊ शकत नसल्याचं त्याने अ‍ॅमंडसेनला सांगितलं. अ‍ॅमंडसेनने त्याच्या ऐवजी टॉनीच या दुसर्‍या एस्कीमोची आपल्या मोहीमेत निवड केली.

जुलैच्या तिसर्‍या आठवड्यात गॉडफ्रे हॅन्सन आणि टोर्ल्नेक्टॉ यांनी किंग विल्यम बेटाच्या पश्चिमेला असलेल्या फीफर नदीतून बोटीने एक लहानशी मोहीम काढली. जीवाष्मांचे नमुने गोळा करण्याची हॅन्सनची योजना होती. त्याच्या जोडीला जहाज जाण्याच्या दृष्टीने मार्ग कितपत मोकळा झाला आहे याचा अंदाज घेण्याचाही यामागे हेतू होता.

२८ जुलैला ग्जो हेवन इथल्या उपसागरातील बर्फ पूर्णपणे वितळला होता! मात्रं अद्यापही बेटाभोवतीच्या सामुद्र्धुनीतील मार्ग बर्फाने रोखलेलाच होता! त्यातच ३१ जुलैच्या रात्री वार्‍याचा जोर वाढला. जोडीला हिमवर्षावही सुरु झाला! रात्रभराच्या हिमवर्षावानंतर सर्वत्र बर्फाचं आवरण दिसून येत होतं.

अ‍ॅमंडसेन आणि त्याचे सहकारी आता ग्जो हेवन इथून निघण्यास अधीर झालेले होते. मात्रं अद्यापही घट्ट बर्फाच्या थराने त्यांची वाट अडवली होती. सुदैवाने काही दिवसातच या गोठलेल्या बर्फाला मोठमोठ्या भेगा पडण्यास सुरवात झाली. उत्तर पश्चिमेच्या दिशेने येणार्‍या वार्‍याने मोकळे झालेले हिमखंड दक्षिणेला वाहून जाण्यास सुरवात झाली!

ग्जो हेवन इथून निघण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला होता!


ग्जो हेवन इथे बर्फातून मोकळं झालेलं ग्जो जहाज

किनार्‍यावरील बहुतेक सर्व सामान जहाजावर चढवण्यात आलेलं होतं. यात सर्वात महत्वाची होती ती ग्जो हेवन इथल्या मुक्कामात विविध ठिकाणाहून करण्यात आलेल्या चुंबकीय निरीक्षणं आणि त्यांच्या करण्यात आलेल्या नोंदी! हे सर्व कागदपत्रं, दारुगोळा, अन्नसामग्री जहाजावर पूर्वनियोजीत जागी ठेवण्यात आली होती. आयत्या वेळी जहाज सोडण्याची वेळ आल्यास किमान १५ दिवस पुरतील इतके अन्नपदार्थ वेगळे काढण्यात आलेले होते. सर्वांचं सामान असलेल्या पिशव्या आणि हे अन्नपदार्थ एका विशिष्ट जागी सुरक्षीत होते! जहाजावरील सर्व बोटी वादळात नष्ट होऊ नये म्हणून पक्क्या बांधून ठेवण्यात आल्या!

ग्जो हेवनच्या किनार्‍यावर आता फक्तं शेवटच्या निरीक्षणाची सामग्री आणि कुत्रे शिल्लक होते! त्यांना अगदी शेवटच्या क्षणी जहाजावर नेण्याचा अ‍ॅमंडसेनचा इरादा होता.

१२ ऑगस्टला अ‍ॅमंडसेन, गॉडफ्रे हॅन्सन आणि लुंड यांनी ग्जो हेवन जवळच असलेल्या अ‍ॅक्सेल स्टीन टेकडीवर चढून आसपासच्या प्रदेशात नजर टाकली. या टेकडीवरुन सामुद्रधुनीच्या पश्चिमेचा बराच भाग दृष्टीस पडत होता. हा सर्व भाग आता मोकळा झाला होता! बर्फाचं तिथे नामोनिशाणही तिथे शिल्लक नव्हतं!

रात्री ९ च्या सुमाराला शेवटची यंत्रसामग्री जहाजावर चढवण्यात आली. त्याच बरोबर ग्जो हेवनच्या किनार्‍यावरील कुत्र्यांनाही जहाजावर नेण्यात आलं!

अ‍ॅमंडसेन म्हणतो,
"ग्जो हेवन मधल्या वास्तव्याच्या काळात आम्हाला अनेक कडू-गोड अनुभव आले. या अनुभवातून आम्ही अनेक गोष्टी शिकत गेलो. आमच्यातील संघभावना अधिकच वाढीस लागलेली होती. नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्यात आपण यशस्वी होऊ असा आता आम्हाला आत्मविश्वास आलेला होता.”

ग्जो हेवन इथल्या आपल्या मुक्कामाच्या काळात अ‍ॅमंडसेनचा अनेक एस्कीमोंशी जवळून संबंध आला होता. एस्कीमोंच्या अनेक चालीरितींचा त्याने जवळून अभ्यास केला होता. बर्फात सफाईदारपणे वावरण्यासाठी एस्कीमो वापरत असलेल्या अनेक युक्त्या त्याने या दरम्यान आत्मसात केल्या. एस्कीमोंकडून इग्लू बनवण्याची कला त्याने आधीच शिकून घेतली होती. त्याच्या जोडीला एस्कीमो वापरत असलेल्या शस्त्रांचा आणि सीलच्या शिकारीच्या पद्धतीचाही त्याने सखोल अभ्यास केला होता. सीलचं मांस हे स्कर्व्हीचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध करत असल्याचीही त्याला कल्पना आली होती. वर्षानुवर्षे आर्क्टीक सर्कलमधील थंडगार वातावरणात राहत असूनही सीलचं मांस नियमीतपणे खात असल्यानेच एस्कीमोंचा स्कर्व्हीपासून त्यांचा बचाव होत असल्याचं त्याने अनुमान काढलं होतं. कुत्र्यांना परिणामकारक पद्धतीने हाताळण्याचंही कलाही एस्कीमोंनी पूर्णत्वाला नेली होती. चाणाक्षं अ‍ॅमंडसेनने हे कसबही आत्मसात केलं. आपल्या पुढील सर्व मोहीमांत या ज्ञानाचा त्याला खूप उपयोग झाला!

ग्जो हेवनच्या किनार्‍यावर एस्कीमोंची दाटी झालेली होती!

गेली दोन वर्ष ग्जो हेवन इथे राहत असताना अ‍ॅमंडसेनच्या तुकडीची एस्कीमोंपैकी अनेकांशी चांगली मैत्री झाली होती. त्यांच्यापैकी अनेकांकडून अ‍ॅमंडसेनने अनेक गोष्टी आत्मसातही केल्या होत्या. ग्जो हेवन इथून निघताना अ‍ॅमंडसेनला निरोप देण्यास हे सर्व एस्कीमो किनार्‍यावर हजर होते. त्यांच्यापैकीच एक एस्कीमो अ‍ॅमंडसेनच्या तुकडीचा सदस्य म्हणून ग्जो हेवनहून पुढे जात असल्याने तर एस्कीमोंसाठी हा प्रसंग विशेष अभिमानास्पद होता!

पहाटे ३ वाजता ग्जो जहाजाने ग्जो हेवन सोडलं!
१३ ऑगस्ट १९०५!

ग्जो हेवन इथला मुक्काम संपला होता. आता नॉर्थवेस्ट पॅसेजचं आव्हान समोर उभं होतं.
अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांना त्यात यश येणार होतं का?

अ‍ॅमंडसेनच्या ग्जो जहाजाने ग्जो हेवन बंदर सोडलं तेव्हा हवामान काहीसं प्रतिकूलच होतं. सामुद्रधुनीमध्ये धुक्याचा पडदा होता. वाराही अगदीच मंद गतीने वाहत होता! अर्थात अ‍ॅमंडसेन आणि इतरांना हे नवीन नव्हतंच. बीची बेटापासूनचा प्रवास त्यांनी अशाच हवामानातून आणि कंपास नादुरुस्त असलेल्या परिस्थितीतच पार पाडला होता. अर्थात किंग विल्यम्स बेटापर्यंत पूर्वीही अनेक जहाजं येऊन पोहोचलेली होती. खरी कसोटी सुरु होणार होती ती आता!

जॉन रे ने आपल्या मोहीमेमध्ये उत्तर अमेरीकेची मुख्य भूमी आणि किंग विल्यम बेट यांच्या दरम्यान असलेल्या सामुद्र्धुनीचा शोध लावला होता. पुढे या सामुद्रधुनीला त्याचंच नाव देण्यात आलं. या सामुद्रधुनीतून जाणारा मार्गच नॉर्थवेस्ट पॅसेजचा एकमेव मार्ग असावा असा त्याचा कयास होता. फ्रान्सिस मॅक्लींटॉकनेही आपल्या फॉक्स जहाजातून केलेल्या मोहीमेत या सामुद्रधुनीचा मार्गच नॉर्थवेस्ट पॅसेज पार करण्याचा एकमेव मार्ग असेल असा अंदाज व्यक्तं केला होता. अ‍ॅमंडसेनने हा मार्ग धरला यात काहीच आश्चर्यं नव्हतं!

तीक्ष्ण नजरेच्या लुंड आणि हेल्मर हॅन्सन यांची टेहळणीच्या कामावर नेमणूक झाली होती. स्वतः अ‍ॅमंडसेन आणि गॉडफ्रे हॅन्सन आळीपाळीने सुकाणू सांभाळत होते. रिझवेल्ट आणि विल्क यांच्यावर इंजिनरुममधील मोटरची जबाबदारी होती. लिंडस्ट्रॉम सतत समुद्राच्या पाण्याची खोली मोजत होता! एखाद्या अचानकपणे उचलल्या गेलेल्या सागरतळाला जहाज धडकलं तर ते बर्फात अडकून बसण्याची शक्यता नाकारता येत नव्हती!

समुद्रतळाची खोली सतत बदलत असल्याचं लिंड्स्ट्रॉमला आढळून येत होतं. कधी दहा फॅदम आणि माती तर कधी आठ फॅदम, पुन्हा दहा फॅदम असा सतत प्रकार सुरु होता. किंग विल्यम बेटाच्या दक्षिणेला असलेल्या सिम्प्सन सामुद्रधुनीत पाण्याची खोली दहा फॅदम असली तरी तळाला कधी माती तर कधी वाळू असा प्रकार होता. अशा तर्‍हेने मार्गक्रमणा करत त्यांनी बूथ पॉइंट गाठला. बूथ पॉईंटपाशी असलेल्या बर्फातून मार्ग न सापडल्यामुळे तिथे थांबण्यावाचून गत्यंतर नव्हतं.

एका मोठ्या खडकापाशी अ‍ॅमंडसेनने नांगर टाकण्याची सूचना दिली. या खडकाच्या आडोशाला थांबल्यामुळे धोकादायक रितीने हालचाल करत असलेला एखादा हिमखंड अचानकपणे जहाजावर येऊन धडकण्याचा धोका टळणार होता!

बूथ पॉईंटच्या समोरच टॉड बेटं नजरेस पडत होती. या बेटांभोवती अद्यापही बर्फ होता! या बेटांच्या पश्चिमेला खुला समुद्र असल्याचं दृष्टीस पडत होतं, पण तिथवर पोहोचायचं कसं?

टॉड बेटं ही तीन लहान बेटं आहेत, परंतु आकाराने लहान असली तरीही या बेटांच्या परिसरात बराच बर्फ जमा झालेला होता. धुक्याचा पडदा दूर झाल्यावर तीक्ष्ण नजरेच्या अँटन लुंडला बेटांच्या किनार्‍याजवळून जाणारी पाण्याची एक लहानशी पट्टी आढळली. त्या संपूर्ण परिसरात केवळ त्याच भागात पाणी दिसत होतं. परंतु पाण्याची ही चिंचोळी खाडी जहाज जाण्यासाठी पुरेशी रुंद आणि खोल होती का याचा कोणालाच अंदाज येत नव्हता. अर्थात प्रत्यक्षं तिथे पोहोचल्याशिवाय नेमकी काय परिस्थिती आहे हे कळ्णार नव्हतं.

सावधपणे मार्गक्रमणा करत ग्जो ने त्या लहानशा खाडीत प्रवेश केला. जहाजाच्या दोन्ही बाजूंना जेमतेम काही फूट जागा शिल्लक राहत होती. खाडीच्या तळाची खोलीही सतत बदलत असल्याचं लिंडस्ट्रॉमच्या ध्यानात आलं. एका ठिकाणी तर ही खोली जेमतेम दहा फूट होती! सुदैवाने कोणतीही अडचण न येता ग्जो ने बेटाचा दक्षिण किनारा गाठला. या किनार्‍याला वळसा घालून पुढे आल्यावर पश्चिमेला असलेला खुला सागर दृष्टीस पडताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला!

संध्याकाळच्या सुमाराला ग्जो ने हल पॉईंट ओलांडला. इथेच हॅन्सन जोडगोळीला फ्रँकलीन तुकडीतील दोन सदस्यांचे सापळे सापडले होते.

अ‍ॅमंडसेन म्हणतो,
"हल पॉईंटहून जाताना आम्ही सर्वजण डेकवर हजर होतो. सुमारे ५० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या फ्रँकलीनच्या दोघा सहकार्‍यांना श्रद्धांजली वाहताना आमच्या मनात अनेक भावनांची दाटी झालेली होती. एखादा शब्द बोलून त्यांच्या चिरविश्रांतीत व्यत्यय आणण्याची आमची इच्छा नव्हती. मूकपणेच आम्ही तो भाग पार केला. त्यांच्या नशिबी दुर्दैवी मृत्यू आला होता. आमच्या भविष्यात काय लिहीलं होतं?"

अ‍ॅमंडसेनच्या तुकडीतील एस्कीमो टॉनीच हा त्या प्रदेशातच राहणारा असल्याने त्याला परिसराची खडान् खडा माहीती होती. वाटेत आढळणार्‍या बेटांची तो नावं सांगत होता. तिथे असलेला एस्कीमो कँपही त्याने ओळखला. एव्हाना सिम्प्सन सामुद्रधुनीतील एटा बेट आणि उत्तर अमेरीकेचा किनारा यावर पुन्हा धुक्याचं साम्राज्यं पसरण्यास सुरवात झाली होती. धुक्यातून पुढे जाण्यात काहीच अर्थ नसल्याने ग्जो ने एस्कीमोंच्या तळाची वाट धरली.

एस्कीमोंच्या नजरेला हे जहाज पडलं होतंच. अचानक एका क्षणी धुक्यातून एक लहानशी कयाक बोट त्यांच्या समोर प्रगटली. टॉनीचचा दोस्तं एस्कीमो तिथे आला होता! त्याच्यापाठोपाठ इतरही अनेक एस्कीमो आपापल्या बोटीतून जहाजापाशी आले. हे अ‍ॅमंडसेनचे जुने मित्रं नेचिली होते! त्यापैकी एका होडीतून अ‍ॅमंडसेन आणि हॅन्सन एस्कीमोंच्या तळावर निघाले.

एस्कीमोंनी अ‍ॅमंडसेनचं आनंदाने स्वागत केलं. अ‍ॅमंडसेनला बरंचसं रेनडीयरचं मांस आणि सॅल्मन मासे त्यांनी भेट म्हणून दिले. दुसर्‍या दिवशी सकाळी दोघं ग्जो वर परतले तेव्हा एक वेगळाच पेच त्यांची वाट पाहत होता.

ग्जो हेवन इथून अ‍ॅमंडसेनबरोबर निघालेला टॉनीच दोन दिवसांतच बोटीवरच्या आयुष्याला कंटाळला होता! आपल्याला पुढे येण्याची अजिबात इच्छा नसल्याचं त्याने अ‍ॅमंडसेनला स्पष्टं सांगून टाकलं! सुदैवाने त्याची जागा घेण्यास एक चुणचुणीत तरुण तयारच होता! हा तरूण एका जाणत्या एस्कीमोचा सावत्र मुलगा होता. आपल्या सावत्र मुलाला अ‍ॅमंडसेनबरोबर जाण्यास सुदैवाने त्याच्या बापाने कोणतेही आढेवेढे न घेता तात्काळ होकार दिला!

एव्हाना धुकं पूर्णपणे नाहीसं झालं होतं. एस्कीमोंची ही अदलाबदल करुन मन्नी या आपल्या नव्या एस्कीमो सहकार्‍यासह अ‍ॅमंडसेनने पुढची वाट पकडली.

सिम्प्सन सामुद्रधुनीतील एटा बेट आता त्यांच्यासमोर उभं ठाकलं होतं! या बेटाच्या उत्तरेला किंग विल्यम बेटापर्यंत असणारी खाडी आणि दक्षिणेला उत्तर अमेरीकेच्या मुख्य भूभागापर्यंत असलेली खाडी या दोन्ही खाड्या अत्यंत चिंचोळ्या होत्या. यापैकी एटा आणि किंग विल्यम बेटांच्या दरम्यान असलेल्या खाडीतून ग्जो सारख्या लहान जहाजालाही जाणं अशक्यं असल्याचं हॅन्सन जोडगोळीला आपल्या मोहीमेदरम्यान ध्यानात आलेलं होतं. त्यामुळे त्यांची सर्व मदार दक्षिणेला असलेल्या अमेरीकेच्या मुख्य भूभागाला एटा बेटापासून अलग करणार्‍या खाडीवरच होती!

अत्यंत सावधपणे मार्गक्रमणा करत ग्जो ने एटा बेटाच्या दक्षिणेला असलेल्या या खाडीत प्रवेश केला. पाण्याची खोली मापत असलेल्या लिंडस्ट्रॉमला खाडी अधिकाधीक उथळ होत असल्याचं जाणवत होतं. एका ठिकाणी तर खाडीतील पाण्याची खोली जेमतेम नऊ फूट असल्याचं त्याला आढळलं! काही क्षणांतच ग्जो तळाशी असलेल्या मातीत रुतून बसणार अशी त्याची खात्री झाली होती! सुदैवाने पुढे खाडीचा तळ काहीसा खोल असल्याचं त्याला आढळून आलं! सावधपणे टेहळणी करणार्‍या हेल्मर हॅन्सनला मात्रं पुढे काही अंतरावर खुला समुद्र असल्याचं नजरेस पडलं होतं. सुदैवाने कोणतीही अडचण न येता अ‍ॅमंडसेन आणि गॉडफ्रे हॅन्सन एटा सामुद्रधुनीतून ग्जो ला खुल्या समुद्रात नेण्यात यशस्वी झाले!

एटा सामुद्रधुनीतील चक्रव्यूहातून बाहेर पडल्यावर सर्वजणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला, परंतु आता दुसरंच संकट त्यांची वाट पाहत होतं.

बर्फ!

अवघ्या चार-पाच तासात दक्षिणेच्या दिशेने येणारे हिमखंड त्यांच्या वाटेत येऊ लागले! दक्षिणेला असलेला समुद्र पूर्णपणे बर्फाने भरलेला होता! या बर्फाने भरलेल्या सागराच्या काठाने खुल्या समुद्रातून जाणारी वाट उत्तर-पश्चिमेच्या दिशेला जात असल्याचं अ‍ॅमंडसेनला आढळून आलं!

किंग विल्यम बेट सोडल्यावर क्वीन मॉड आखातातून किनार्‍या-किनार्‍याने प्रवास करण्याची अ‍ॅमंडसेनची मूळ योजना होती. पण वाटेत आडव्या ठाकलेल्या बर्फामुळे आता त्याला आपला मार्ग बदलावा लागणार होता! या हिमखंडाशी समांतर जात ग्जो ने उत्तर-पश्चिमेची वाट धरली. सुदैवाने इथे उथळ पाण्याची भीती मात्रं नव्हती!

१५ ऑगस्टच्या सकाळी ग्जो एका नवीन द्वीपसमुहाच्या प्रदेशात पोहोचलं होतं. या बेटांनी उत्तर - दक्षिण अशी जणू संरक्षक फळीच उभारलेली होती! या द्वीपसमुहाच्या उत्तर आणि दक्षिणेला गोठलेला बर्फ असल्याने त्यांना बगल देऊन पुढे सटकणं ग्जो ला अशक्यंच होतं. या बेटांच्या भुलभुलैयातून मार्ग काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता!

या बेटांपैकी दोन बेटांच्या दरम्यान सुमारे पाव मैलाची खाडी असल्याचं गॉडफ्रे हॅन्सनला आढळून आलं, ग्जो जहाजाचं इंजिन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करुन त्याने बेधडकपणे जहाज त्या खाडीत घातलं! सुदैवाने कोणतीही अडचण न येता अथवा कुठेही न आपटता जहाज त्या दोन बेटांमधून पुढे निसटलं!

बेटांच्या चक्रव्यूहात ग्जो आत तर शिरलं होतं! आता बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधणं आवश्यंक होतं!

हॅन्सनने दक्षिणेचा मार्ग धरला. सुदैवाने इथे पाण्याची खोली तेरा फॅदम होती. एव्हाना खाडी अधिकच चिंचोळी झाली होती. सागरातून वर डोकं काढणारे अनेक लहानमोठे खडक आजूबाजूला पसरले होते. यातून पुढे मार्ग काढणं अत्यंत कठीण असलं, तरी त्याला इलाज नव्हता!

ग्जो ने पश्चिमेचा मार्ग धरला. एव्हाना सागरतळाची खोली तेरा फॅदमवरुन पाच फॅदमवर येऊन पोहोचली होती!
या परिसरातील सागराचा तळ हा खडकांनी भरलेला आहे असं लिंडस्ट्रॉमला आढळून आलं. जहाजाच्या आजूबाजूलाही अनेक खडकांचं जाळं पसरलेलं होतं. या जाळ्यातून एखादा माणूस दारुने झिंगलेल्या अवस्थेत जसा चालेल तशीच ग्जो ची मार्गक्रमणा सुरु होती! टेहळणी करणार्‍या हेल्मर हॅन्सन आणि लुंड यांचं सतत ओरडून सूचना देणं सुरु होतं! या भागातून पुढे सरकतानाच दोन बेटांमधील एक लहानशी खाडी अ‍ॅमंडसेनच्या नजरेस पडली. त्याने जहाज या खाडीच्या दिशेने वळवण्याचा निर्णय घेतला. ही खाडीच पुढे आपल्याला खुल्या समुद्रात पोहोचवेल अशी त्याला आशा होती.

हळूवारपणे पुढे सरकत ग्जो ने ती खाडी ओलांडली, पण अ‍ॅमंडसेनच्या अपेक्षेप्रमाणे खुल्या समुद्रात न पोहोचता जहाज अधिकच लहान बेटांच्या पसार्‍यात येऊन पोहोचलं!

बेटांच्या या जंजाळातून मार्ग काढणं अधिकच कठीण होतं! अ‍ॅमंडसेनने लिंडस्ट्रॉम आणि एस्कीमो मन्नी यांना एका लहानशा बोटीतून जहाजाच्या पुढे जाण्याची सूचना दिली. समुद्राच्या पाण्याची खोली मोजत राहणं आणि जहाज जाईल इतपत रुंद पाण्यातून जहाजाला मार्गदर्शन करणं ही कामगिरी या दोघांवर सोपवण्यात आली होती.

बोटीत उतरल्यावर मन्नीने इतक्या सफाईदारपणे आणि वेगाने त्या दगडातून बोट चालवण्यास सुरवात केली की काही वेळातच आपला ग्जो शी संपर्कच तुटण्याची लिंडस्ट्रॉमला भीती वाटू लागली! मन्नीला मात्रं त्याची पर्वा नव्हती! आपण कोणत्याही खाडीतून बोट नेऊ शकतो असं त्याने लिंडस्ट्रॉमला छातीठोकपणे सांगितलं! अखेर लिंडस्ट्रॉमने त्याला जोरदार दम भरल्यावर त्याचा वेग कमी झाला!

मन्नीच्या मार्गदर्शनाखाली कोणतीही अडचण न येता अखेर ग्जो व्हिक्टोरीया सामुद्रधुनीत पोहोचलं! ज्या सामुद्रधुनीतून बेटांच्या त्या भुलभुलैयातून ते बाहेर पडले होते, त्याला अ‍ॅमंडसेनने नॉर्थईस्ट पॅसेज सर्वप्रथम ओलांडणार्‍या वेगा जहाजाचा कॅप्टन पॅलँडर याचं नाव दिलं. दिवसभर दमछाक करणार्‍या त्या लहान द्वीपसमुहाला वेगा मोहीमेचा प्रमुख नॉर्डेन्स्कीओल्ड याचं नाव दिलं!

व्हिक्टोरीया सामुद्रधुनीत पोहोचल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. व्हिक्टोरीया सामुद्रधुनीतही बर्फ पसरलेला होता, परंतु जहाजाला अटकाव करण्याइतका तो अजून गोठला नव्हता! लिंड्ट बेटाजवळील गोठलेल्या बर्फाच्या उत्तरेला असलेल्या लहानशा खाडीतून मार्ग काढत ग्जो पुन्हा एकदा खुल्या समुद्रात पोहोचलं. दुसर्‍या दिवशी सकाळी शिड उभारताना एका डोलकाठीला बांधलेलं शिड पकडून ठेवणारं उपकरण अचानक तुटल्याने अ‍ॅमंडसेनने तो बेत रहीत केला. केंब्रिजच्या उपसागरात आश्रय घेऊन दुरुस्तीचा त्याचा विचार होता, परंतु उथळ पाण्यात जहाज घालण्याची त्याची तयारी नव्हती.

व्हिक्टोरीया बेटाच्या दक्षिणेला असलेल्या केप कॉलबॉर्न इथे ग्जो ने नांगर टाकला!
१७ ऑगस्ट १९०५!

नॉर्थवेस्ट पॅसेजच्या आतापर्यंत अजिंक्य असलेल्या किंग विल्यम बेट ते व्हिक्टोरीया बेटादरम्यानच्या सागरावर अखेर अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने मात केली होती!

केंब्रिज उपसागर आणि केप कॉलबोर्न हे बेरींग सामुद्रधुनीच्या मार्गे पॅसिफीकमधून आर्क्टीकमध्ये प्रवेश करणार्‍या जहाजांनी गाठलेले सर्वात पूर्वेकडील प्रदेश होते! आतापर्यंत अटलांटीकमधून नॉर्थवेस्ट पॅसेजमध्ये प्रवेश केलेलं एकही जहाज इथे पोहोचलेलं नव्हतं!

केप कॉलबॉर्न

अर्थात अद्याप बराच दूर असलेला अलास्काचा उत्तर किनारा गाठेपर्यंत नॉर्थवेस्ट पॅसेजवर विजय मिळवण्याची कोणालाही खात्री देता येत नव्हती!

क्रमशः

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ९                                                                                         आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ११

Group content visibility: 
Public - accessible to all site users