राजस्थानी बिर्याणी

Submitted by संपदा on 30 September, 2014 - 06:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

गट्टे बनवण्यासाठी -

१. बेसन - २०० ग्रॅम.
२. कणीक - २ टेबलस्पून.
३. हळद - १/२ टीस्पून.
४. तिखट - चवीनुसार १ टीस्पून.
५. मीठ - चवीनुसार.
६. ओवा - १/२ टीस्पून.
७. जिरे - १/२ टीस्पून.
८. तेल - १ टीस्पून.
९. पाणी - आवश्यकतेनुसार

भातासाठी -

१. तांदूळ - २ कप भरून.
२. मीठ - चवीनुसार.

ग्रेव्हीसाठी -

१. भाजलेल्या सुक्या लाल मिरच्या - ४-५ ( मूळ कृतीत १०-१२ दिल्या आहेत , पण आम्ही ४- ५ च वापरल्या तरीही ग्रेव्ही बरीच तिखट झाली होती Happy )
२. दही - १०० ग्रॅम.
३. उभा चिरून तळलेला कांदा - पाऊण कप.
४. तमालपत्र १-२.
५. आले लसूण पेस्ट - २ टेबलस्पून.
६. धने जिरे पावडर - १ टेबलस्पून.
७. दालचिनी - १ मोठा तुकडा.
८. बिर्याणी मसाला - १.५ टेबलस्पून. ( हा मसाला ऑप्शनल आहे Happy )
९. हळद - १/२ टीस्पून.
१०. मीठ - चवीनुसार.
११. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना - दोन्ही मिळून अर्धी वाटी.
१२. केशराच्या १० काड्या घातलेले गरम दूध - १/२ वाटी.
१३. तूप - २ टेबलस्पून.

स्मोक्ड फ्लेवर द्यायला -

१. कोळसा.
२. लिंबू अर्धे कापून.

डेकोरेशनसाठी -

१. तळलेले काजू - २-३ टेबलस्पून.

क्रमवार पाककृती: 

१. सर्वप्रथम गट्टे बनवण्यासाठी बेसनात कणीक, हळद , तिखट, ओवा,मीठ,जिरे, तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचा गोळा बनवावा. मग त्याचे समान भाग करून प्रत्येक भागाचे लांबट ऊंडे ( रोल्स ) करून घ्यावेत. हे ऊंडे वाफेवर उकडून घ्यावेत. उकडून थंड झाल्यावर त्याच्या जरा जाडसर चकत्या कापाव्यात. गट्टे तयार झाले.

२. एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात गट्टे व काजू परतून घ्यावेत. ५- ६ गट्टे डेकोरेशनसाठी बाजूला काढून ठेवा.

३. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी मिक्सरमध्ये लाल मिरच्या, तळलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, दही, मीठ, धने जिरे पावडर बारीक वाटून घ्यावे.

४. पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात खडा गरम मसाला व हळद घालून त्यावर वाटलेली पेस्ट घालावी. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना घालून परतावे. ग्रेव्ही तेल सोडू लागल्यावर त्यात परतलेले गट्टे घालून गॅस बंद करावा.

५. बिर्याणीसाठी जसा भात बनवतो तसा बनवून घ्यावा. तांदूळ उकळत्या पाण्यात घालून , भाताची कणी पूर्ण शिजायच्या आधी पाणी काढून टाकावे. तयार भात चाळणीमध्ये उपसून ठेवावा.

६. आता ज्या भांड्यात बिर्याणी बनवायची आहे त्याला तुपाचा हात लावून घ्यावा. सर्वात खाली भाताचा थर घालावा. त्यावर तयार ग्रेव्ही, थोडा तळलेला कांदा घालावा. परत भाताचा थर घालावा. पुन्हा ग्रेव्ही, कांदा घालून सर्व मिश्रण संपेपर्यंत असे थर तयार करावेत. सर्वात वर तळलेले काजू, केशरयुक्त दूध व थोडे तूप घालून झाकण लावावे. साधारण १/२ तास मंद आचेवर बिर्याणी शिजू द्यावी.

७. बिर्याणी सर्व्ह करायच्या आधी त्याला स्मोक्ड फ्लेवर द्यायचा आहे. त्यासाठी कोळसा गॅसवर पेटवून घ्यावा. बिर्याणीमध्ये कापलेले अर्धे लिंबू ठेवून त्यावर कोळसा ठेवावा. त्यावर थोडे तूप टाकून झाकण बंद करून ठेवावे. साधारण १० मिनिटांनी कोळसा काढून घेऊन लिंबू बिर्याणीवर पिळून ते टाकून द्यावे. बिर्याणी गरमागरम सर्व्ह करावी.

Rajasthani_Biryani_A.jpgRajasthani_Biryani_2_a.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

बिर्याणीबरोबर शॅलो फ्राईड वांग्याचा दह्यातील रायता सर्व्ह करण्यास सांगितले होते. मी मात्र कांद्याची दह्यातील कोशिंबीरच बनवली होती.

बिर्याणी खाऊन झाल्यावर लक्षात आले की ही पाककृती मायबोलीकरांसाठी द्यायला हवी. म्हणून केवळ एकच फोटो उपलब्ध आहे. पुढच्यावेळी स्टेप बाय स्टेप फोटो काढण्यात येतील :).

माहितीचा स्रोत: 
मातोश्रींनी पाहिलेला कुकरी शो - ई टीव्ही गुजराती रसोई शो - शेफ जमीला वोरा.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटतेय गट्टे की बिर्याणी.. करून बघणार नक्की!

फोटो मोठा टाक जमलं तर..

मस्त! बकाबक खावीशी वाटतेय भुकेल्या पोटी. Happy

अवांतर- प्लेटमधील क्वांटीटी मात्र पोहे सर्व्ह केल्यासारखी वाटतेय, तुलनेत रायताच जास्त! बिर्याणी म्हटली की जरा ताटभर असती तर जरा आणखी नजर तृप्त झाली असती Happy

ओके, मला बिर्याणी म्हटलं की पैला डोळ्यासमोर चिकन बिर्याणी येते, अन त्यातला चिकनचा भला मोठा पीस बाजूला सारला तर मूठ्ठीभरही भात शिल्लक राहणार नाही. म्हणून माझा क्वांटीटीचा बेंचमार्क वेगळा Happy

असो, ई टीव्ही गुजराती रसोई शो, म्हणजे आपण शाकाहारी असाल, तर चिकनचा विषय इथे नकोच Wink

नाही रे बाबा, मी शाकाहारी नाही. पण ई टीव्ही गुजराथी वरील सर्व रेसिपीज शाकाहारी आणि त्यातून सध्या नवरात्र. मग काय करणार ;).

फोटो थोडा मोठा टाक. मंजूडी + १

कृती मस्त आहे एकदम. पण समहाउ गट्टे विशेष आवडत नाहीत त्यामुळे करुन बघायचा मुहूर्त कधी लागेल माहीत नाही Happy

मस्त खमंग वास आला की इथपर्यन्त!!

गट्टे की सब्जी खाल्ली होती ..पण गट्टे की बिर्यानी.. वॉव!! Happy

करायला काही स्किल्स नाहीत पण वेळखाऊ आहे नक्कीच. त्यात वर सांगितल्याप्रमाणेच गट्टे बनवून ज्या भाज्या घालणार असू (कांदा, गाजर, फ्रेंच बीन्स इ) त्या सगळ्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत. मसाला काय हे नक्की माहित नाही.

मस्तं पाककृती! फोटो बघितल्यावर खाविशी वाटली.

आयती मिळाली तर बहार येईल.

मस्तच ! नक्की करणार... Happy
>>>बिर्याणीबरोबर शॅलो फ्राईड वांग्याचा दह्यातील रायता सर्व्ह करण्यास सांगितले होते>>> ह्याची पण रेसिपी लिहिणार का प्लीज ?