तंदूरी गोभी

Submitted by इब्लिस on 26 September, 2014 - 12:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फ्लॉवरचा गड्डा सुमारे १/२ किलो

मॅरिनेटसाठी :

घट्ट दही २०० ग्राम
२ चमचे एव्हरेस्ट चिकन तंदूरी मसाला
२ चमचे आलंलसूण वाटण
चमचाभर लोणी किंवा तेल
मीठ
लिंबाचा रस.

क्रमवार पाककृती: 

खालील फोटोत दिसताहेत तशी कोबीची (हो आमच्याकडे फुलकोबी म्हणतात. जास्त कीस काढू नये.) सुमारे १ इंच साईजची फुलं खुडून/कापून स्वच्छ धुवून घ्यावीत.

मॅरिनेशनसाठीचे सगळे साहित्य एकत्र मिसळून त्यात फ्लॉवरचे तुकडे टाकावेत, व नीट मिसळून घ्यावेत. इच्छा असेल तर अर्धा तास झाकून ठेवावे.

मॅरिनेटेड कोबी

बेकिंग ट्रेवर अ‍ॅल्युमिनियम फॉइल टाकून तिला तेला/लोण्याचा हलका हात लावून त्यावर हे तुकडे ठेवावेत.

२०० डीग्री सेल्सिअसवर २ मिनिटे प्रिहीट केलेल्या ओव्हनमधे सुमारे ७-८ मिनिट सर्वात वरच्या कप्प्यात ठेवावे. (मला क्रिस्पि आवडते म्हणून) पैकी ४ मिन्टांनी फ्लॉवर उलटवणे अपेक्षित आहे.

कोबीच्या निबरपणानुसार कुकिंगटाईम कमीजास्त लागू शकतो. हे मासे वा चिकन नाही त्यामुळे काडी टोचून मऊ पडलंय का ते पाहू नये. काडी टोचली जाणार नाही.

बशीत काढून त्यावर लिंबू पिळून थोडा चाट मसाला भुरभुरावा. सोबत कांद्याचे काप घेऊन फोटो काढावा, व इथे झब्बू द्यावा.

घ्या तोंडी लावायला :
तंदूरी कोबी

मी गार्लिक ब्रेड घेतला होता सोबतीला.
गार्लिक ब्रेड

वाढणी/प्रमाण: 
आवडलं तर दोघांसाठी.
अधिक टिपा: 

१. मॅरिनेट तयार झाले की चाखून पहावे. आपल्याला आवडेल अशी चव आली की त्यात फ्लॉवरचे तुकडे घालावेत. जास्त वेळ मुरल्यावर चव वाढते का, ते उद्या सकाळी मला समजेल Wink
२. वरच्या कप्प्यात कोबी होत असताना खालच्या कप्प्यात गार्लिक ब्रेड तयार होतो.
३. फोटोत ब्रेड गोरा दिसत असला तरी तो होल व्हीट ब्राऊन ब्रेड आहे. त्याला बटर + लसूण पेस्ट + कोथिंबिर मिक्स लावून, फॉइलमधे गुंडाळून भाजून घेतले आहे.
४. "लागणारा वेळ" तंदूरी कोबीचा (गार्लिकब्रेडसह) फन्ना उडविण्यासाठी लागणार्‍या वेळेसकटचा आहे.

माहितीचा स्रोत: 
पाकिटावरील कृती. माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, साती, धन्यवाद!
तुमचा प्रतिसाद येण्याच्या दरम्यानच्या काळात रेस्पी एडिटल्याबद्दल क्षमस्व. बशीत पडलेले डाग कस्ले? असा प्रश्न आल्यावर, 'तो चाटमसाला स्प्रिंकल केलाय' हे सांगण्याऐवजी रेस्पित अ‍ॅड केलं इतकेच.

आमच्याकडे कॉलिफ्लॉवर रोस्ट म्हणतात Wink मस्त लागते चव. (थोडाफार मॅरिनेशनमधे फरक असतो आणि क्रिस्पी करायची की नाही हे ज्याच्यात्याच्या आवडीप्रमाणे)

मस्तं रेस्पी! फोटोपण आवडले.

एका देशी हॉटेलात खाल्ल्यापासून बरेचदा होते. फुलकोबीचे तुकडे मीठ घालून उकळवलेल्या कढत पाण्यात २ मिनिटं घालून ठेवले की बेकिंग टाइम कमी करता येतो.

याचं आणखी एक व्हेरिएशन खाल्लं. तंदूरी चिकन मसाला, सावरक्रीम, आलं, हिरवी मिर्ची, कोथिंबीर आणि पुदिना यांच्या वाटणात मुरवलेले आणि मग ब्रॉइल केलेले तुरेपण सही लागले.

मृअक्का,
नेक्स्ट टाईम ते ब्लांच करण्याचं बघतो. ती आयडिया डोक्यात नाही आली. त्याने जरा सक्युलंट होईलसे दिसतेय.

ते दुसरं मॅरिनेट अफगाणी मलई टिक्क्याचं आहे. ती रेस्पी केली होती, पण सजवून फोटो काढण्याचा वेळ लोकांनी न दिल्याने नेक्स्ट टाईम करीन तेव्हा देईन.

श्रीयु,
नक्किच करता येईल, पण अंमळ तेलकट होईल. नॉनस्टिक तव्याला तेलाचा हात देऊन भाजून पहा. थोडे शिजल्यावर चिमट्यात धरून वा काडी टोचून स्मोकी फ्लेवरसाठी डायरेक्ट गॅस फ्लेमवर थोडं जाळून घ्या.

श्रीयू, आप्पेपात्र आहे का? त्यात तुर्‍याच्या दांडक्या वर ठेवून करून बघा. त्याआधी फुलकोबी मिठाच्या पाण्यात ५ मिनिटं उकडून, निथळून मग त्याला मसाला चोपडा. आप्पेपात्राच्या एका खड्ड्यात व्यवस्थीत मावेल एवढा मोठा तुरा ठेवला तर फार बारके तुरे करत बसावे लागणार नाहीत. थोड्या तेलात खमंग होतील.

तव्यावरपण चांगले होतील. नॉनस्टीकपेक्षा लोखंडी तवा असेल तर चव जास्त छान लागेल. रेसेपी छान आहे.

सेम मी चुलीवर ग्रिल करते, थोडे लक्ष द्यावे लागते पण अल्टीमेट होते. जरा जपावे लागते कारण फ्लॉवर आधी मऊ पडतो आणि स्टिकवरून पडतो, जाळीवर ठेवल्यास उलटायला त्रास होतो

इब्लिस तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेय!

सेम मॅरिनेशन ( तंदूरमसाला ऐवजी मा.मसाला) वापरून चिकनपीस निर्लेप तवा/मा.वेवर करते.जास्त करून निर्लेप तवाच वापरते.अर्धा चमचा तूप टाकते.

मस्त! Happy

मी हे तव्यावरच करते. सोबत पनीर, बटाटा, कांदा, सिमला मिरची, बेबी कॉर्न - हे सगळं पण घालते. (मोठे तुकडे करून)

रेसिपी छान आहे . मात्र प्रेझेंटेशन मध्ये मार्क कापलेत>> पण तरीही छान दिसतय, नाही का गं?

कौतुकाबद्दल धन्यवाद!

प्रेझेंटेशनच्या टीप्स द्या पाहू पटापट. काय हवं होतं अजून त्यात?

केल्तं काल इब्लिस भौ. एक नं झाल्तं.. पण तव्यावर व्हायला जरा वेळ जास्त लागला..
पुढल्या वेळेस म्रुण्मयी यांनी सांगितलेली आयडीया करुन बघेन..
खाटूक मूटूक नसल्यामूळे घरी पसंतीस उतरलेली डीश.. Happy

Pages

Back to top