कुरमुर्‍याचा चिवडा

Submitted by मामी on 23 September, 2014 - 08:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुरमुरे (एक मोठे पाकीट), भरपूर / आवडीनुसार लसूण, आवडीनुसार कढिपत्ता, आवडीनुसार/ चवीनुसार/ घरातल्या माणसांच्या वयोगटानुसार हिरव्या तिखट मिरच्या, हळद, मीठ, हिंग, मोहरी.

ऑप्शनल : शेंगदाणे, डाळे, सुकं खोबरं.

क्रमवार पाककृती: 

कुरमुरे नीट निवडून, पाखडून घ्या. कढिपत्ता नीट धुऊन सुकवून घ्या. मिरच्या धुवून, सुकवून बारीक कापा. डोळे चोळा ........ यचे असतील तर हात साबणानं धुवून घ्या आणि मग चोळा. लसणाचं म्हणाल तर घालाल तितका थोडाच. लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्या किंवा ठेचून घ्या.

एका मोठ्या कढईत कुरमुरे घालून व्यवस्थित भाजून घ्या. अधूनमधून चार कुरमुरे तोंडात टाकून पहात रहा. कुरकुरीत भाजले गेले, थोडा रंग पालटून सावळ्यावर गेले की परातीत पसरून काढा. (कुरमुरे पसरा.)

मग त्या कढईत २ ते ४ चमचे तेल घाला. त्यात मोहरी, हिंग, हळद, मीठ, लसूण, कढिपत्ता, मिरच्या घालून लसूण चांगला लाल होईपर्यंत परत परत परता. मिरचीच्या खकाण्यानं जीव हैराण झाला तर चिवडा झाल्यावर दुपारच्या चहाच्या वेळी बकाणे भरताना किती मजा येईल याचं स्वप्नरंजन करा. निरुपा रॉय या आद्यखोकलेश्वरीचं स्मरण करत गॅसपाशीच उभे रहा.

लसूण लाल झाला की त्यात भाजलेले कुरमुरे घालून पुन्हा पाच-सात मिनिटे परतत रहा. सर्व कुरमुर्‍यांना हळद लागली की गंगेत घोडं न्हालं असं समजून पुन्हा परातीत घालून थंड होऊ द्या. मग लगोलग चहा करायला घ्या. गरमागरम चहा आणि झणझणीत, लसणीच्या चवीचा गरमागरम कुरमुर्‍याचा चिवडा खाल्ला की आत्मा थंड होतो असा स्वानुभव आहे.

उरलाच तर गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

टाकणारे! धीर धरा.

वाढणी/प्रमाण: 
ख्यॅ! ख्यॅ!! ख्यॅ!!!
अधिक टिपा: 

१. पावसाळा संपल्याने ओले, चिकट, चेमट, खवट असे शब्द मोडीत निघाले आहेत. हा काळ चिवड्याचा.

२. शेंगदाणे, डाळे, खोबरं वगैरे वजनदार मंडळी कुरमुर्‍यांना हलके समजून त्यांच्यात न मिसळता डब्यात खाली बसणे पसंत करतात. दरवेळी डबा हलवून त्यांना बाबापुता करून वर आणावे लागते आणि हे करताना वर पंखा सुरू असेल तर (किंबहुना नसेल तरीही) काही कुरमुरे हवेत उड्या मारत जमिनीवर जाऊ बघतात. मी काय म्हणते... हवेत कशाला हे नसते उपद्व्याप? त्यापेक्षा माझं ब्रीदवाक्य लक्षात ठेवा : शेंगदाणे टाळा, कुरमुरे सांभाळा!

३. यात पनीर घातलेले नाही याची कृपया नोंद घ्या आणि पनीरकरता बटाटे, अंडी वगैरे ऑप्शन्स देऊ नका. कुरमुर्‍यांकरताही ऑप्शन्स देऊ नका. मुळात ऑप्शनच देऊ नका. जर ऑप्शन द्यायची इतकी खुमखुमी असेल तर वेगळी पाककृती लिहा.

माहितीचा स्रोत: 
कुरमुर्‍याचा साग्रसंगित चिवडा करणारी आई आणि डबा हलवून हलवून खाण्याचा कंटाळा आलेली मी.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुरमुरे म्हणजेच चुरमुरे(भेळेत वापरतात ते), भाजके पोहे नव्हेत (जे दिवाळीच्या किंवा लक्ष्मीनारायण चिवड्यात वापरतात ते) असे गृहित धरून खालचे वाक्य लिहित आहे.
- आम्ही पुण्याचे पेठी लोक याला भडंग असे म्हणतो. चिवडा हा फक्त भाजक्या किंवा नुसत्या पोह्याचा. त्यात डाळ-दाणे-खोबरं हवंच. भडंग हा चिवड्याचा भाऊ असून खुद्द चिवडा नव्हे. खास भडंगाचे वेगळे गब्दुल चुरमुरेही बाजारात मिळतातच.

त.टी. - पुण्यातल्या दुकानांत, पुणेकरांच्या घरात हा चिवडा हवा असल्यास भडंग या नावाने मागावा. अपेक्षाभंग होणार नाही.

पण एकुणात तोंपासु प्रकर्ण Happy Happy

भडंग वायला. कुरमुर्‍याचा चिवडा वायला.
भडंग म्हणजे खणखणीत लाल तिखटवाला असतोय. चिवडा नाजुकसाजुक हळदीनं माखलेला चवीला पण जरा सौम्य.

आपल्याला दोन्ही आवडीचे. आयते मिळाले तर दोन्ही मिक्स करून पण खाऊ. Happy

हीच ती वेळ हाच तो क्षण... भडंग/ चिवडा खाण्याचा!!
कृती वाचूनच तोंडाला भैंकर पाणी सुटलं.

मिरच्यांपेक्षा लाल तिखट घातलेली लाल भडंग खायला जास्त आवडते.
एके ठिकाणहून खाऊ म्हणून आलेल्या भडंगीत टोमॅटोची पावडार घातलेली होती. ती आंबटगोडतिखट भडंग एकदम मस्तचविष्ट लागत होती. त्या टोमॅटो पावडरीविषयी कोणाला अधिक माहिती असेल तर लिहा, म्हणजे ती आणवून लगोलग भडंग करता येईल.

करुन पहायची इच्छा आहे .... फाटकासमोर वाहने उभी करु नयेत - पाटी समोर गाडी ोउभी करतात ....पावसाली हवेमुले मुरमरे सादललले आहेत चालतील का?

निरुपा रॉय या आद्यखोकलेश्वरीचं स्मरण!!!

त्या जयसिंगपूरच्या रस्त्यावरच्या लालेलाल भडंगाची आठवण आली...
शिवाय गोरे बंधू भडंग, मस्त मजेचे डॉन भडंग...
भडंगाचा विजय असो.

त्या जयसिंगपूरच्या रस्त्यावरच्या लालेलाल भडंगाची आठवण आली... >> अंबा भडंग! तिखट!

त.टी. - पुण्यातल्या दुकानांत, पुणेकरांच्या घरात हा चिवडा हवा असल्यास भडंग या नावाने मागावा. अपेक्षाभंग होणार नाही.
<<
पुणेकरांच्या घरात मागावा?? बाप्रे!
मागताना कसली अपेक्षा ठेवावी? तु.क. मिळण्याची का 10.gif

*

मामी,

मिरच्यांसोबत कांदेही तळून घातलेत तर मज्जा येते. कांदे लांबट कापून वाळवून ठेवलेत तर कमी तेलात तळले जातात. अन सुंदर लागतात.

टिपा मस्त. Lol रेस्पी आवडली.

मुरमुरे संपले. या पध्द्तीनं राइसपफ सिरिअलचा चिवडा करून बघते.

haayllaa!!!!!!!!!!!!!

me paravaach kelay ani kadhi nahi te farfar farmaas vagaire zalay agadi! bakaaNaa maaralyaawar navaryaane ekadam "ahaa!!" kelaM!

fakt lasoon nahi karan saabaancha chaaturmaas ahe.

Happy

,'निरुपा रॉय या आद्यखोकलेश्वरी' मेले नुस्ती हसून हसून.. शिव्वाय ख्खोकला ही आला Lol

मामे.. कब आऊं Wink

तू साखर नाही घातलीस ही गोष्ट मला फार्रच आवडली... मस्त झणझणीत लागत असेल यार!!!

मस्त...

लक्ष्मीबाई धुरंधर.. याला "विलासी छबीना" म्हणतात. मग त्यात बदाम, पिस्ते, काजू, बेदाणे, चिलगोजा वगैरे घालून नावाला पोहे वा कुरमुरे टाकतात.

मिरच्यांपेक्षा लाल तिखट घातलेली लाल भडंग खायला जास्त आवडते.>>>> +१
सांगलीचे 'गोरे बंधू'चे भडंग फार फेमस. अजून एक 'भोरे बंधू' (कुणीकडचे माहिती नाहीत) सुध्दा फेमस आहेत.

अजून एक 'तो भडंग' की 'ती भडंग' की 'ते भडंग'...हा युगानु युगे न सुटलेला प्रश्न आहे. Happy

मस्त!
तरीही आम्ही सांगलीचे लोक(!) हा चिवडा/भडंग करताना (आणि "ते" भडंग. "तो" भडंग नव्हे.:फिदी: ) वेगळ्या पद्धतीने करतो.
म्हणजे घरी करताना खालील पद्धतीने करतो. गोरे आणि भोरे यांची काय पद्धत असेल ती असेल!
आधी चिरमुरे( हो...तिकडे चिरमुरेच म्हणतात.) जाड बुडाच्या कढईत भाजून घ्यावे. बाजूला ठेवावेत.
जर ते कुरकुरीत असतील तर भाजू नयेत.
आता कढईत जरासं तेल घालून मोहोरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी.
या फोडणीत गरम असतानाच १ चमचा डाळीचं पीठ(बेसन) घालावं. ते चांगलं खमंग परतत रहावं. करपणार नाही इकडे लक्ष द्यावं . यातच तिखट, मीठ व पिठी साखर(आवडत असल्यास) घालून गॅस बंद करावा.
(फोडणीत डाळीचं पीठ घालायचं असल्याकारणाने कढिलिंब, दाणे इ.इ. सेपरेट तळून घ्यावे. व नंतर मिक्स करावं.)
हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चिरमुरे घालून हाताने डाळीच्या पिठाची फोडणी सर्व चिरमुर्‍यांना चांगली चोळून घ्यावी. चांगलं मिक्स झालं की डब्यात भरून ठेवावं. पाहिजे तेव्हा फक्की मारावी.
आणि हो ....त्या रेडिमेड भडंगात लाल रंग वापरतात.
त्यापेक्षा आपली ही घरगुती पद्धत ब्येश्ट!

आम्ही सान्गलीचे लोक 'ते' भडन्ग म्हणतो. (अनुस्वार कसा द्यायचा?)
भडन्गाला लाल तिखट आणि मेतकूट पाहिजेच.

Pages