गुदगुदुल्यांचा शोध पूर्ण (Movie Review - Finding Fanny)

Submitted by रसप on 13 September, 2014 - 04:14

'बीइंग सायरस', 'कॉकटेल' सारखे सिनेमे देणाऱ्या होमी अदजानियाचा आहे, त्यामुळे 'फाईण्डिंग फॅनी' बघणारच, असं काही दिवसांपूर्वीच ठरवलं होतं.

चित्रपटाची कथा काय आहे, हे मी सांगणार नाही कारण ती अगदी थोडीशीच आहे. त्यामुळे एक तर पूर्णच सांगायला लागेल किंवा थोड्यातली थोडीशी सांगितली तर अगदीच थोडी वाटेल. दोन्ही पटत नाही, त्यामुळे टाळतोच. फक्त तोंडओळख म्हणून इतकंच सांगतो की अँजेलिना (दीपिका पदुकोन), फर्डिनंट (नसीरुद्दीन शाह), डॉन पेद्रो (पंकज कपूर), रोझी (डिम्पल कापडिया) आणि सावियो द गामा (अर्जुन कपूर) ह्यांची ही कहाणी. हे पाच लोक 'फॅनी'च्या शोधात निघतात.... बस्स्. इतकंच. ह्यातलं कोण काय आहे? कसा आहे ? 'फॅनी' कोण आहे ? ती मिळते का ? वगैरे प्रश्न पडत असतील, तर पडू द्यावेत. त्याची उत्तरं तुम्हाला चित्रपट पाहुन मिळावीत अशी माझी इच्छा आहे !
निसर्गरम्य गोव्यात घडणारं हे कथानक. गोव्याला 'भूतलावरील स्वर्ग' किंवा 'God's own land' का म्हणतात, हे हा चित्रपट पाहुन कळेल. गोव्याचं इतकं सुंदर दर्शन घडतं की आत्ताच्या आत्ता उठावं आणि निघावं आठवडाभराच्या सुट्टीवर असंच वाटतं. मुख्य म्हणजे, हे सौंदर्य दाखवताना गोव्यातला समुद्र दाखवलेला नाही किंवा अगदीच जर कुठल्या फ्रेममध्ये दिसलाही असेल तरी माझ्या लक्षात राहिला नाही, इतकं किरकोळ. गोव्याचं समुद्ररहित दर्शन हे म्हणजे औरंगाबादच्या रस्त्यावर एकाही खड्ड्यात न जाता गाडी घरपर्यंत पोहोचणं इतकं अशक्यप्राय वाटत असेल, तर मात्र तुम्ही हा चित्रपट ज्या किंमतीत तिकीट मिळेल, त्या किंमतीत काढून बघायला हवा.

दीपिका पदुकोन ह्या चित्रपटाचं मुख्य 'व्यावसायिक' आकर्षण आहे, निर्विवाद. 'फाईण्डिंग फॅनी' मध्ये दिसलेल्या दीपिकाचं वर्णन अगदी अचूकपणे एका शब्दात होतं. 'सेक्सी'. तिचं बोलणं, चालणं, हसणं, बसणं, अगदी काहीही करणं निव्वळ दिलखेचक आहे. गालावरच्या खळीत तर मी किमान अडुसष्ट वेळा जीव दिला. पण पुन्हा पुन्हा जिवंत झालो कारण पुन्हा जीव द्यायचा होता.

रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटाचं अजून एक आकर्षण म्हणजे नसीरुद्दीन शाह व पंकज कपूर ह्या दोन तगड्या अभिनेत्यांना एकत्र पडद्यावर बघणं. लडाखला गेलो असताना हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगांतली अनेक उंच उंच शिखरे पाहिली, अर्थातच दुरूनच. प्रत्येक शिखर दुसऱ्याला मान देऊन उभं असल्यासारखं वाटत होतं. नसीर व पंकज कपूर ही दोन शिखरंही अशीच जेव्हा जेव्हा समोरासमोर आली आहेत, एकमेकांना मान देऊन उंच उभी राहिली आहेत. तसंच काहीसं इथेही होतं. दोघांच्यातले जे काही संवाद आहेत, त्यात कुणीही दुसऱ्यावर कुरघोडी करायला पाहत नाही. दोघेही आपापल्या जागेवरून धमाल करतात.

डिम्पल कापडिया हा रोल तिच्याचसाठी असावा इतकी रोझी'च्या भूमिकेत फिट्ट बसली आहे. एका दृश्यात अपेक्षाभंगाचं व अपमानाचं दु:ख तिने अतिशय सुंदर दाखवलं आहे.

दुसरीकडे अर्जुन कपूर त्याला कुठलाही रोल दिला तरी काहीही फरक पडणार नाही, हे दाखवून देतो. चविष्ट जेवणाचा मनापासून आस्वाद घेत असताना अचानक दाताखाली खडा येऊन होणारा रसभंग अर्जुन कपूर पडद्यावर येऊन वारंवार करतो. त्याच्याकडे पाहुन हा अजून 'टू स्टेट्स'मध्ये आहे की 'गुंडे'मध्ये आहे की 'इशक़जादे'मध्ये की अजून कुठला आलेला असल्यास त्यात आहे हे कळत नाही. त्याच्यासाठी सगळी पात्रं सारखीच आहेत.

निखळ विनोदांची पेरणी करतानासुद्धा हास्याचा खळखळाट घडवला जाऊ शकतो, हे जर तुम्ही विसरला असाल तर तुम्ही 'फाईण्डिंग फॅनी' बघायलाच हवा. बऱ्याच दिवसांनी असा खळखळून हसवणारा हलका-फुलका चित्रपट आला आहे. विनोदाची पातळी कंबरेखाली गेलेली असताना किंवा विनोदाच्या नावाने नुसता पाचकळपणा चालत असताना किंवा एखाद्याच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगल्याशिवाय विनोदनिर्मिती होत नसताना आलेला 'फाईण्डिंग फॅनी' मला तरी काही काळासाठी का होईना बासुदा, हृषिदांच्या जमान्यात घेउन गेला. मध्यंतरापर्यंत तर मी हा चित्रपट आजपर्यंत मी पाहिलेला सर्वोत्तम विनोदी चित्रपट ठरवला होता. पण मध्यंतरानंतर जराशी लांबण लागली आणि काही दृश्यं व विनोद वरिष्ठांसाठीचे असल्याने मी गोल्ड मेडलऐवजी 'सिल्व्हर' दिले आणि असं म्हटलं की,' हा आजपर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम विनोदी चित्रपटांपैकी एक आहे.'

आजकाल चित्रपटाचं संगीत मेलडीपासून दूर गेलं आहे. ह्या निखळ विनोदाला जर तरल, गोड चालींच्या संगीताची जोड मिळाली असती तर कदाचित मी हा चित्रपट पाठोपाठचे शोसुद्धा पाहिला असता, असा एक अतिशयोक्तीपूर्ण विचार मनाला स्पर्श करतो आहे. गोव्यातल्या कहाणीत 'माही वे' वगैरे शब्दांची गाणी का हवी? असा विचार करायला हवा होता. पण ते किरकोळ.

होमी अदजानियाने ह्या चित्रपटापासून माझ्या मनात तरी अशी 'इमेज' तयार केली आहे की केवळ त्याच्या नावावर चित्रपट बघायला जावा. 'बीइंग सायरस'मध्ये सायकोलॉजिकल थ्रिलर एका वेगळ्या पद्धतीने हाताळल्यावर, 'कॉकटेल'सारखा व्यावसायिक विषयही त्याने खूप संयतपणे हाताळला आणि एक निखळ विनोदी चित्रपट केला आहे. भीती एकच. 'सायरस'मध्ये असलेल्या सैफबरोबर त्याने 'कॉकटेल' केला आणि 'कॉकटेल'मधल्या दीपिकाबरोबर 'फाईण्डिंग फॅनी' केला. आता समीकरण पुढे नेण्यासाठी पुढील चित्रपट अर्जुन कपूरबरोबर करू नये !

download_0.jpg

हा चित्रपट मुळात इंग्रजीमध्ये बनला आहे. हिंदीतला चित्रपट डब केलेला असेल हे माहित नव्हतं त्यामुळे जुळवून घेईपर्यंत जरासा वेळ गेला. पण जर इंग्रजीत पाहिला तर जास्त मजा येईल, असंही वाटलं.

'फाईण्डिंग फॅनी' हा कुठला आत्मशोध नाही. पडद्यावर कुणाला काय मिळतं, काय नाही ह्यापेक्षा प्रेक्षकाला दोन घटका निर्भेळ आनंद मिळतो, हे जास्त महत्वाचं आहे. कामाच्या व्यापात गुरफटल्यावर आपल्याला अधूनमधून एक बेचैनी जाणवत असते. काही तरी हवं असतं, पण काय ते कळत नसतं. अश्यातच ३-४ दिवस लागून सुट्ट्या येतात आणि मित्रांसह एका सहलीचा प्लान बनतो. सहलीहून परतल्यावर आपल्याला समजतं की इतके दिवस आपल्याला काय हवं होतं.
गेले अनेक दिवस मीसुद्धा चित्रपटात काही तरी शोधत होतो. काय ते कळत नव्हतं. मी एक 'फाईण्डिंग फॅनी' शोधत होतो. काल तो शोध पूर्ण झाला. आता मी पुन्हा एकदा मसालेदार खाण्याला पचवायला तयार आहे.

रेटिंग - * * * *
http://www.ranjeetparadkar.com/2014/09/movie-review-finding-fanny.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स सीम.... ( चालेल का हा शॉर्ट फॉर्म ? ) ..... त्याला असं वाटलं असेल रिअल लाईफ मधे काय माहीत दीपी मला टिकवेल की नाही..म्हणुन मुव्ही मधे अगदी एक मिनिटासाठी का होईना लग्नाच्या सीन मधे गेस्ट अपीअर्न्स केला असेल Wink

हाहाहा तिने नाय करू बाई त्याच्याशी लग्न. काबील आहे पण तिच्यासारखा पॉलिश्ड नाही वाटत. रणबीर, सिद्धार्थ नंतर तिला अच्छे दिन आयेंगे ह्या आशावादाची फार गरज आहे.
(सीम चालेल की!)

हाहाहा तिने नाय करू बाई त्याच्याशी लग्न. काबील आहे पण तिच्यासारखा पॉलिश्ड नाही वाटत.>>>>>>>>>>>. असं नको बोलु गं..होईल तो पॉलिश्ड. :)....रणबीर दिपी साठी ठिक होता पण सिद्धार्थ बीयरवाला तर एक नंबर डंब बांडगुळ वगैरे वाटतो.....

साधना, छान लिहिले आहेस. तू लिहिलेले इतर दोन्ही चित्रपट आवडते. लूटेरा चा नंबर मी पहिला ( या तीन मधे ) लावेन.

लुटेरा बघून मला उगाच दुखी वाटलेले. गाणी छान. (
अस्थानी आहे पोस्ट पण वरच्या पोस्टी वाचून रहावले नाही) Happy

झंपी, लुटेरा पाहुन वाईट का वाटले? उलट एका आनंदी नोटवर चित्रपट संपतो.

हिरोच्या नशीबी त्याच्या कर्माने आलेले मरण होतेच, त्याला ते मिळते. पण एकेकाळी उत्फुल्ल आयुष्य जगलेली आणि आजारपणामुळे जगायची उमेद संपलेली, खरेतर आता मरायचेच म्हणुन डलहौसीला आलेली नायिका शेवटी नव्या उमेदीने घराबाहेर डोकावते हा शेवट मला खुप आवडला.

दिनेश, तुम्ही हा चित्रपट अजुन पाहिला नाही. सो, नंबरिंग चित्रपट पाहुन ठरवा Happy

सिनेमा अतिशय आवडला.

चित्रपट जेमतेम दोन तासात पटकन संपतो, पण पुढचे कित्येक तास अंतर्मुख करतो! कित्येक पदर, nuances, छोटे छोटे संवाद नंतर आठवत राहतात आणि त्यांचा एक नवीन अर्थ सापडत जातो.

चित्रपटातलं 'मेलेलं मांजर' मला सेन्ट्रल कॅरॅक्टरसारखंच वाटलं. ते एक रूपक आहे. मेलेल्या नात्यांचं (असं मला वाटलं!) सगळ्यांनी एखाद्या मेलेल्या नात्याला काही ना काही कारणाने कवटाळून ठेवलेलं आहे. पण ते मेलेलं आहे. मृत. संपलेलं आहे. हे एकदा मान्य केलं की त्याच्या पाशात न गुंतता पुढे जाणं, जे जिवंत समोर हात पसरून स्वागतासाठी उभं आहे त्याच्याकडे जाणं हा प्रवास सोपा आणि लॉजिकल होतो.

दिपिका आवडण्यासारखीच आहे. ती सेक्सी तर दिसलीच आहे, पण चलाखही आहे आणि निस्वार्थीही. तिच्या पहिल्या सिनेमापासून मला ती आवडते (तिला 'तेलकट' म्हणत असत, तरी :)). अतिशय सहज वावर असतो तिचा. अर्जुनच या व्यक्तिरेखेत फिट्ट बसतो. (रणवीर सिंगला ही भूमिका झेपली नसती). नसिरुद्दीन डोळ्यांनी बोलतो!! पंकज कपूर त्याचे पात्र जगला आहे. पण मला सर्वात आवडली ती डिंपल! डिंपलने तिच्या एकूणच चित्रपट कारकीर्दीत जे रोल केले आहेत- हिरॉइनपासून ते आत्ता प्रौढ नायिकेचे, त्यामध्ये ही नायिका उभी करणं सर्वात जास्त डेअरिंगचे काम आहे आणि ते तिने कोणतीही inhibitions न पाळता केले आहे, म्हणून मला सर्वात जास्त ती आवडली.

स्पॉयलर*************************************
एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे. ज्यांनी चित्रपट पाहिलेला नाही पण ज्यांना पहायचा आहे त्यांनी हे पुढचं वाचू नये.

पंकज कपूर चित्र रंगवून गाडीच्या डिक्कीत ठेवतो आणि नंतर मरतोच. त्याचं चित्र कोण विकतं? कोण विकत घेतं? त्याचे पैसे कोणाला मिळतात? हा एकच थ्रेड जुळला नाही असं वाटलं.

स्पॉयलर*************************************

एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे. ज्यांनी चित्रपट पाहिलेला नाही पण ज्यांना पहायचा आहे त्यांनी हे पुढचं वाचू नये.

पंकज कपूर चित्र रंगवून गाडीच्या डिक्कीत ठेवतो आणि नंतर मरतोच. त्याचं चित्र कोण विकतं? कोण विकत घेतं? त्याचे पैसे कोणाला मिळतात? हा एकच थ्रेड जुळला नाही असं वाटलं.>> +१

अजुन एक स्पॉयलर

कोणीतरी मला म्हणाले.. "डिंपलच फॅनी असते". मलातरी तसे अज्जिबात वाटले नाही. अजुन कोणाला वाटले का?

फुले बांधलेल्या कागदावर लिहलेल असते "सोल्ड बाय अननोन पर्सन" आणि त्या पर्सनला भरपूर रक्कम मिळते (एकूण सिनेमा बघता ते दीपिकाचे काम वाटते ;)). ते कोण करते ई. हे मला तरी फार महत्त्वाचे नाही वाटले. त्याचा फुले बांधलेल्या कागदावर उल्लेख सिम्बॉलिक आहे - त्या पेंटिंगमुळे (आणि पेंटरमुळे) झालेली निराशा आता रद्दीत जमा झाली आहे. ती रद्दी असली तरी लीड पेयर पुढच्या आयुष्याला लागली एवढाच अर्थ मी घेतला.

फॅनी हे दोन अर्थाने आहे - एक नाव म्हणून आणि दुसरे "बुड/ बम/बेस / बॉटम" ह्या अर्थाने आहे. प्रत्येकाला आपला बेस सापडतो त्या अर्थाने फॅनी. डिम्पल फॅनी नाही पण ... ती नाही असे ही नाही Happy

त्या पर्सनला भरपूर रक्कम मिळते (एकूण सिनेमा बघता ते दीपिकाचे काम वाटते डोळा मारा)>> हे पटण्यासारखे आहे Proud

त्या पेंटिंगमुळे (आणि पेंटरमुळे) झालेली निराशा आता रद्दीत जमा झाली आहे. ती रद्दी असली तरी लीड पेयर पुढच्या आयुष्याला लागली एवढाच अर्थ मी घेतला. >> मस्त! थँक्स.

फुले बांधलेल्या कागदावर लिहलेल असते "सोल्ड बाय अननोन पर्सन"

>> तुमच्या निरीक्षणशक्तीला सलाम.

माझा सगळ्यात आवडलेला कॅरॅक्टर म्हणजे फर्डि - नसरुद्दिन शहा...
सेक्सी दिपिकापेक्षा याच्या अभिनयावरुन नजर हटत नव्हती. Happy

फुले बांधलेल्या कागदावर लिहलेल असते "सोल्ड बाय अननोन पर्सन" आणि त्या पर्सनला भरपूर रक्कम मिळते (एकूण सिनेमा बघता ते दीपिकाचे काम वाटते डोळा मारा).
अगदी अगदी.... कारण अर्जुन कपूर कडे काहीच नव्हते. तिने विकुन त्याला पैसे दिले असतील.

सही पर्स्पेक्टिव्ह आहे पौर्णिमा, सिमंतिनी.. Happy

मी पुन्हा पाहिला तेव्हा अनेक गोष्टी पुन्हा नव्याने समोर आल्यागत वाटल्या. अशा सिनेम्यांत पुन्हा पुन्हा नव्याने काहीतरी सापडणं, आणि सोबत नासिरसारख्यांचा अभिनय आणि देहबोली बघणं हा सुखद अनुभव खराच..

आज पाहिला 'फाईंडिंग फॅनी'. चित्रपट आणि रसप ह्यांनी लिहिलेले परीक्षण मला अगदी विसंगत वाटले. हा निखळ विनोदी चित्रपट नाही तर डार्क ह्यूमर आहे, ट्रॅजिकॉमेडी आहे.

साजिराची पोस्ट आधी वाचायला आवडली असली तरी कळली नव्हती पण चित्रपट पाहून अगदी पूर्णच उमजली. क्या बात है ! खूप सुंदर लिहिलं आहे. पौर्णिमा आणि सीमंतिनीच्या पोस्ट्सही खूप आवडल्या. ह्या पोस्ट्स आधी वाचल्यामुळे अपेक्षाभंग झाला नाही त्यामुळे चित्रपट आवडलाच. चित्रपटात ऐकताना/बघताना गाणी खटकली नाहीत. सगळ्यांचीच कामं भन्नाट ! ( अर्जुन कपूर सोडून. त्याचं काम चांगलं झालं आहे पण असामान्य नाही. )

'वेटिंग फॉर गोडो' सतत डोकावतो. अर्थात ती एक पूर्णपणे absurd कलाकृती आहे तर चित्रपटात शेवटी गोष्टी जुळवत आणल्या आहेत त्यामुळे कथा म्हणून शेवटी काहीच हाती लागले नाही असे वाटत नाही.अ‍ॅब्झर्ड प्ले मध्ये वैचारिक खाद्य भरपूर गवसत असलं तरी लौकिकार्थाने 'दी एंड' होत नसल्याने अस्वस्थता घेरुन राहते तसे ह्यात होत नाही. त्यातल्या मरणांची भिती वाटत नाही, जगणं नव्याने समोर येतं आणि चित्रपटगृहाबाहेर पडताना एक हलकं हसू घेऊन आपण बाहेर पडतो.

अतिशय बोर आणि फसलेला सिनेमा आहे. पैसे वाया गेले.
निरर्थक आणि आपल्याशीच सुसंगत न वागणारी पात्र. कथा, पटकथेचा गोंधळ.

हल्ली प्रमोशन करुन काहीही विकता येते, हा सिनेमा म्हणजे त्याचेच उदाहरण आहे.

या चित्रपटात बेकेटच्या वेटिंग फॉर गोदोचा संदर्भ अनेकदा डोकावतो. व्लादिमिर, वारंवार पडणारी स्वप्ने, बोट दाखवून जाणारा मुलगा, एस्त्रोगोन आणि पोझ्झोची येणारी आठवण हे सगळं गोदो. >> स्वप्ने नि बोट दाखवून जाणारा मुलगा जो शेवटी अर्जुन कपूरकडे बघत हसत निघून जातो तेंव्हा वाटलेले त्याची आत्ता ट्युब पेटली.

साजिरा, साधना नि पूनम ने लिहिलय त्याला पूर्ण अनुमोदन.

Pages