स्पार्टाकस - मलाही कोतबो : शेरलॉक होम्स

Submitted by स्पार्टाकस on 5 September, 2014 - 00:03

एलिमेंट्री... माय डिअर फोक्स!

काय..पटली ना ओळख... माझी ओळख पटायला हे एकच वाक्य पुरेसं आहे ना? काय म्हणता अजून ओळख पटली नाही?? अहो मीच तो.. २२१ बी बेकर स्ट्रीट वाला..

झालय काय, गेल्या कित्येक दिवसांपासून मला कोणाशी तरी बोलायचं आहे हो! मनातली मळमळ कोणाला तरी सांगायची फार इच्छा आहे! गेल्या कित्येक दिवसांपासून त्या नारदासारखा मी सगळ्या मराठी साईट्स वर घिरट्या घालत असतो. कोणाजवळतरी मन मोकळं करता येईल म्हणून.. पण कोणी ऐकूनच घेईना.. सगळ्यांना दुसर्‍याचं ऐकण्यापेक्षा स्वतःच बोलण्यात जास्तं रस! तरी ते काका सांगतात हां, खोटं कधी बोलू नये, नाहीतर तोंडाचा कॅन्सर होतो, पण ऐकतो कोण? नारदाचं बरं आहे. तो काडी टाकून सटकून जातो आणि इतर जण मग बसतात भांडत नाही तर तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा याची चर्चा करत! आपलं तसं नाही ना.. मला प्रॉब्लेम दिसला की तो सोडवल्याशिवाय राहवतच नाही. आणि माझी गोची होते ती नेमकी तिथेच!

आता तुम्ही विचाराल मी इतक्या मोठ्या-मोठ्या केसेस हाताळल्या, मग माझी गोची ती काय होणार? रिटायर झाल्यापासून मधमाशा पाळणे हाच माझा एकमेव छंद होता हे तुम्हाला माहीतच आहे. जोडीला टाईमपास म्हणून टी.व्ही. पहायला सुरवात केली आणि...

जगातला सर्वात यशस्वी डिटेक्टीव्ह मीच आहे असा माझा समज पहिल्या फटक्यातच धुळीला मिळाला!

इतक्या वर्षांच्या अनुभवानंतरही मी बांधलेले सर्व अंदाज.... याने असे गोल-गोल हात फिरवत म्हटलं, कुछ तो गडबड है... की समजावं, आपण गेलो बाराच्या भावात! याने केसच्या मध्यावर एखाद्यावर आरोप केला की तो नि:श्वास टाकत असणार... चला सुटलो.. कारण कुछ तो गडबड है!

बरं याचे नखरे ते किती. एवढा मोठा तो ब्युरो! दार तोडायला वेगळा माणूस, दरवेळेला गाडी चालवायला वेगळा माणूस, भल्या थोरल्या टीममध्ये दोन-तीन पोरी आणि वर तो साळुंख्या डॉक्टर. अहो डॉक्टर कसला, मुडदेफरास आहे नुसता! आणि वर त्या नळ्यांमधून कायकाय उकळत बसतो! च्यायला आमच्यावेळेला हे असलं नव्हतं! मी आणि वॉटसन सगळी कामं करायचो! कालाय तस्मै नम:!

आणि सगळ्यात शेवटी शिक्षा एकच... फाशी! मधेआधे काही नाहीच!

परवा वैतागून वॉटसनला माझं फ्रस्ट्रेशन सांगितलं तर खो-खो हसला! वर म्हणाला, 'तू सुखी आहेस होम्स! तुला मराठी आणि हिंदी सिरीयल बघाव्या लागत नाहीत! लग्नं न केल्याचा फायदा आहे हा!'

एवढं काय असतं म्हणून सिरीयल बघायला सुरवात केली आणि स्वतःला विनाचौकशी मेंटलमध्ये घेऊन जावं अशी तीव्र इच्छा झाली. शेरलॉक होम्स असूनही मला न सोडवता येण्यासारखे क्लिष्ट गुंते निर्माण करणार्‍या निर्माता-दिग्दर्शक-लेखकांच्या पायाचं तीर्थ घेऊन त्यांच्याच नावाने तर्पण करण्याची इच्छा झाली मला! अरे इतका गुंता निर्माण करणं माझ्या बापाला, त्या डॉयल्यालाही जमलं नाही रे! आणि आता हे सॉल्व्ह कसे करणार?

सध्या माझ्यापुढची एक केस म्हणजे कोण त्या जान्हवीची खोई हुई याददाश्त कधी आणि कशी परत येईल? मी विचार करुन-करुन थकलो.. सगळ्या केसेसचा रेफरन्स, सगळी लायब्ररी उलटीपालटी केली तरी याचं उत्तर काही सापडत नाहीये.. वॉटसनला विचारलं तर म्हणाला, कशाला डोक्याला ताप करुन घेतोयस.. त्या मंजिरीच्या केसमध्येही असाच गुरफटला होतास. काय झालं शेवटी? आले मांडलेकराच्या मना तिथे कोणाचे चालेना! तू आपल्या मधमाशा सांभाळ.. यांना चॅनलवाले बघून घेतील..

वॉटसनचं म्हणणं पटलं मला शेवटी.. चला येतो आता.. बरं वाटलं तुमच्याशी बोलल्यावर. पण त्या जान्हवीचं नक्की काय होणार ?

तुमचा,
शेरलॉक होम्स
२२१ बी, बेकर स्ट्रीट

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेरलॉक होम्स ला CID मुळे कोतबो...कल्पना मस्त आहे >> +१ भारी लिहिलय..
ले मांडलेकराच्या मना तिथे कोणाचे चालेना! >>>> Biggrin Biggrin

जान्हवी नशीबवानच म्हटली पाहिजे. इतकी जगप्रसिद्ध व्यक्ती थेट लंडन सोडून गोखल्यांच्या घरी येऊन तिच्या "हाताबाहेर गेलेल्या" केसची फाईल तपासतो म्हणजे त्या मुलीच्या भाळी सुखाचा टिळाच लागला असे म्हणावे लागेल. आता ती "श्रीरंग" वरून "श्री" पर्यंत केव्हा यायचे ते येवो...पण जेव्हा येईल तेव्हा स्पार्टाकस यानी आग्रहाने आणलेल्या शेरलॉक होम्स यांच्या "२२१ बेकर स्ट्रीट, लंडन" इथे एक पोस्ट कार्ड...आभाराचे....पाठविले जाईल हे नक्की.

अगदी सहजगत्या लिहिलेले "कोतबो" लिखाण वाटले, स्पार्टाकस....सुंदर.

रंजिता.....अगदी अगदी....मला खरंच आनंद झाला, कबूल करतोच मी. जान्हवीसाठी शेरलॉक होम्स ही कल्पनाच इतकी नावीन्यपूर्ण आहे की या क्षणी मला वाटले बरे झाले जान्हवीची बुद्धी गायबली....

....आता कधीका येईना ! ती सुखी होईतोपर्यंत आपण बघत राह्यचे (च).

सर्वांचे मनापासून आभार !!
विनोदी लेखन हा माझा प्रांत नाही. हा पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे अर्थातच धाकधूक होती. अजूनही बरंच काही लिहीता आलं असतं असं आता वाटतं :).

मस्तच आहे. हा लेख लिहिला त्यावेळीस कदाचित अस्मिता नव्हती. तिच्या केसेस सोडवण हि शेरलोक होम्स साठी दिव्य आहे. Lol