माधुरीआज्जी.....

Submitted by सई. on 25 August, 2014 - 01:18

amadhuri.jpg

"आई, छोट्या मुलांसाठी गोष्टी लिहीते म्हणुन माधुरीआज्जीला खूप मोठी शाबासकी मिळाली.." नीलनं रात्री मला आनंदानं हरखून सांगितलं. मला ही आनंदाची बातमी आधीच समजली होती, पण त्याच्या तोंडून त्याच्या खास विभ्रमांसकट ती ख-या अर्थाने पोचली. नीलला अजून बक्षीस, पुरस्कार हे काही माहिती नाही, त्यामुळे बाबाने सांगितलेली मोठी शाबासकी त्याला बरोबर समजली. ही शाबासकी नीलपर्यंत पोचणं आवश्यकच होतं, कारण त्याला समजायला लागल्यापासून तो सगळ्यात जास्त तिच्याच गोष्टी वाचत आलाय. वाचायला यायला लागण्यापूर्वी गोष्टीच्या नावाच्या वेगवेगळ्या चित्रांखालची 'माधुरी' 'पुरंदरे' ही दोन चित्रे मात्र बहुतेक सर्व पुस्तकांवर नेहमी दिसायची. वाचता यायला लागल्यावर तर इतर लेखकांआधी हेच नाव एकदम जास्त ओळखीचे झाले. आपल्याला या आजीने लिहीलेल्या गोष्टी आणि चित्रे खूप आवडतात हेही समजायला लागलं. शिवाय इतर पुस्तकांवर असतं तसं लेखक आणि चित्रकार अशी दोन वेगवेगळी नावे तिच्या पुस्तकावर नसतात, माधुरीआजी नुसती गोष्टी लिहीत नाही, त्यांची चित्रे पण तीच काढते. आपल्याला खुप आवडणारी.

खरंच, त्या सगळ्या गोष्टी आणि चित्रे फक्त नीललाच नाही, आम्हालासुद्धा आवडतात. रोज झोपण्यापूर्वी एकतरी माधुरीआजीचं पुस्तक वाचल्याशिवाय झोप जशी काही येतच नाही. "राधाचं घर" मधले सगळे कुटुंबिय आमच्याही घरचेच झालेत. 'बाबा', 'नाना', 'आई', 'भाऊ', 'आजी', 'काका'.. यातला शिदूकाका जाम लाडका. राधाच्या खोड्याच काय काढतो, दार लावून एकटाच ढांगचिक ढांगचिक काय नाचतो, दहा तास नुसता भांगच काय पाडतो! आजोबांचं बाबाला 'धांदरटच आहे' म्हणणं, बाबाचं पाडापाडी करणं, आई-बाबांची रुसारुशी, भावांचा दंगा.. हे सगळं या मुलांनाच काय, आम्हा पालकांनाही हवंहवंसं आहे. या नुसत्या चित्रगोष्टी नाहीत, ही जाताजाता मुलांना करून दिलेली "घर" या संस्थेची सुंदर ओळख आहे, तर ते घर कसं असावं, "कुटुंब" म्हणजे काय याच्या आम्हा पालकांसाठीही घ्यावासा धडा आहे, गोड आवरणातून दिलेल्या कानपिचक्या आहेत. यातले पालकही आपल्या सर्वांसारखेच नोकरी-धंद्याची धावपळ असलेले, तरीही मुलांसाठी जमेल तसा वेळ देणारे, मुलंही दंगेखोर पण घरपण अनुभवणारी, आगाऊपणे न बोलणारी, महागडी खेळणी/गॉजेट्स पासून दूर असलेली, खरंतर ठेवली गेलेली.

या सर्व गोष्टी नीलला इतक्या तोंडपाठ आणि हावभावांसह येतात की बस्स. अत्यंत आनंदाची करमणूक असते ती.

'हात मोडला' तर आम्ही चक्क लिहून काढली होती. नील रोज थोडी थोडी सांगत गेला आणि मी दुरेघी वहीत लिहीत गेले. छान अनुभव होता तो. मुळात हात मोडणे या घटनेची इतकी सुंदर चित्रमय गोष्ट होऊ शकते, ह्याचंच मला खुप कौतुक वाचलं होतं. ते आजही तसंच कायम आहे. पण हीच तर माधुरीताईंची खासियत आहे. 'राजा शहाणा झाला' मधून दात घासणे, हात धुणे, अंघोळ करणे, ह्या दैनंदिन बाबींचं महत्व गोष्टीरूपातून काय सुरेख रंगवलंय! मुलांच्या विशिष्ट वयात ह्या बाबी किती डोकेदुखीच्या असतात ते प्रत्येक पालक जाणतो. त्यातही माधुरीताई अशा मदतीला धावून येतात. 'पाहुणी', 'कंटाळा', 'मामाच्या गावाला', 'मुखवटे', 'मोठी शाळा', 'किकीनाक'.. कितीतरी पुस्तकं, रोजच्या विषयांची, मुलांच्या हमखास आवडीची, वाचताना पालकांचाही दिवसभराचा शिणवटा दूर करणारी, मुलांना विचार करायला लावणारी, पण पालकांच्या मागे नस्त्या अवघड-अगम्य प्रश्नांचा ससेमिरा न लावणारी!

नीलची थोडी समजण्याची पातळी वाढल्यावर त्यांचं 'सिल्व्हर स्टार' खूप दिवस सुरू राहिलं होतं रात्री. ते तसं निराळ्या विषयाचं, मजकुरानंही मोठं आणि आतापर्यंतच्या कौटुंबिक परिघापेक्षा वेगळा, मोठा कॆनव्हास असलेलं. तेव्हापासून जहाज हाही एक जिव्हाळ्याचा विषय झालाय. चित्रांमधूनही किती दिवस जहाजंच उमटतायत, बोलतायत.

पण नीलचं माधुरीआजीशी तो जन्माला येण्यापूर्वीपासूनच नातं जुळलेलं आहे. तो पोटात असताना बाकीच्या पुस्तकांबरोबर 'आई होताना'ही माझ्या सोबत होतं. शिवाय 'वाचू आनंदे'ही जवळ ठेवलेली असायची, मन छान रमून जायचं तेव्हा त्या चारी पुस्तकांत. नील थोडा मोठा झाल्यावर आलेल्या सुटेपणात त्यांच्या 'लिहावे नेटके'नं मला चांगलं कामाला लावलं होतं. दोन मोठे ठोकळे हाताळत मराठी नव्याने शिकताना गणितं सोडवल्याचा सुंदर आनंद मिळाला होता आणि एखादं कोडं डोकं खाजवूनही सोडवता नाही आलं तर हळूच सोबत पुरवलेल्या उत्तरपुस्तकात चोरून उत्तर बघायलाही खुप मजा आली होती. ती पुस्तकं पहिल्यांदा बघितली तेव्हा मी माधुरीताईंना मनोमन कडक सलाम ठोकला होता!

त्यांच्याबद्दल जितकं बोलता-लिहीता येईल, तितकं कमीच आहे खरंतर. कारण त्यांचं लेखन भरपूर आहे, मी फक्त बालसाहित्याचा छोटासा आढावा घ्यायचा माझ्या परिने प्रयत्न केला. त्यांनी सर्वांनाच आयुष्यभर पुरेल इतका आनंद दिलाय, माझ्या लेकराचं आणि अलिकडच्या सगळ्याच लेकरांचं बालपण समृद्ध केलंय. कुणाही चिमुकल्यांच्या वाढदिवसासाठी किंवा सहज भेट म्हणून ही पुस्तके देताना तर खुप समाधान मिळतं. कोणालाही काही भेट देताना, घेणा-यापेक्षा जास्त आधी मला ती भेट आवडली पाहिजे असा माझा हट्ट असतो, माधुरीताईंमुळे तो हट्ट मी मनसोक्त पूर्ण करू शकतेय.

नीलतर्फे आणि आम्हा सर्वांतर्फे 'साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाल्याबद्दल माधुरीताईंचे मन:पुर्वक अभिनंदन. असे अगणित पुरस्कार आणि पावत्या तुमच्यापुढे नतमस्तक होऊन उभे राहोत ही शुभेच्छा. तुम्ही हा आनंदाचा झरा आमच्यासाठी असाच यापुढेही अखंड वाहता ठेवणार आहात, याबद्दल खात्री आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामा, मनापासून धन्यवाद.. इथे फक्त मुलांसाठीचीच पुस्तकं लिहिली. मोठ्यांसाठी अजून बराच खाऊ आहे त्यांचा.
अल्पना, इथला माधुरीताईंचा गोतावळा बघून मस्त वाटतंय Happy

नी, मस्त. त्यांचा दरारा वाटतो हे बाकी खरंच.

"टीव्ही दाखवत भरवायचे नाही" हे सांगणं सोपं आहे, पण मुलांचं लक्ष गुंगवून ठेवायला कय करणार? मग यश, राधा वगैरेंच्या गोष्टी चालू झाल्या. सुनिधीची पुस्तकांची पहिली ओळख यशबरोबर झाली. मग यशचे कारनामे ऐकत ऐकत आम्ही जेवण करायला सुरूवात केली. आजही ती कंटाळा आला की तिची पुस्तकांची बॅग उचकते आणि हाताला लागेल त्या पुस्तकामधलं वाचत बसते. गोष्टी पाठ असतात, चित्रामुळे पानं समजतात. एकही अक्षर वाचता येत नसताना तरीही बोट ठेवून गोष्ट सांगणारी लेक पाहिली की फार फर समाधानी वाटतं. जगातली इतर कुठलीही वस्तू असलं समाधान देऊ शकत नाही.

चित्रवाचन हे पुस्तक पण असलंच अफाट आहे. ते सुनिधी तासनतास बघते आणि तरीही तिला दरवेलेला नवीन काहीतरी सापडतं.

थँक यू माधुरीताई!!

अरे वा, फार मनापासून लिहिलयस सई.
खरोखर पुस्तकं म्हणजे खजिनाच. त्यातून मुलं, आई, बाबा, आजी सगळ्यांना एकत्र आणणारी अशी पुस्तकं तर मनाच्या सात कप्यात विराजमान होतात.
अभिनंदन माधुरीताई ___/\___

सई फारच सुंदर आणि नीट तपशीलात लिहिलं आहेस साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्काराच्या निमित्ताने. त्यांचं चतुरस्त्र व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी आहे..त्यांचं गाणं, नाटकांमधला सहजसुंदर वावर , व्युत्पन्नता आणि मग हे बालसाहित्यातलं योगदान. एक परिपूर्ण चित्र आहे हे .

आज अक्षरधारा पुस्तकप्रदर्शनात आदरणीय माधुरीताई ना भेटायचा योग आला ज्ञानेश ने त्याना मी " mask ,mama's village " ही पुस्तके वाचली असे सान्गितले. मराठी वाचता येत का अस विचारल्यावर त्याने मराठी लगेच वाचून दाखवल . आम्ही नवीन घेतलेल्या पुस्तकापैकी "big school " पुस्तकावर माधुरीताई नी सही आणि शुभेच्छा दिल्या

इतकी मोठी व्यक्ती सहज साधेपणे भेटली याचे खूप अप्रूप वाटले.

Pages