"आई, छोट्या मुलांसाठी गोष्टी लिहीते म्हणुन माधुरीआज्जीला खूप मोठी शाबासकी मिळाली.." नीलनं रात्री मला आनंदानं हरखून सांगितलं. मला ही आनंदाची बातमी आधीच समजली होती, पण त्याच्या तोंडून त्याच्या खास विभ्रमांसकट ती ख-या अर्थाने पोचली. नीलला अजून बक्षीस, पुरस्कार हे काही माहिती नाही, त्यामुळे बाबाने सांगितलेली मोठी शाबासकी त्याला बरोबर समजली. ही शाबासकी नीलपर्यंत पोचणं आवश्यकच होतं, कारण त्याला समजायला लागल्यापासून तो सगळ्यात जास्त तिच्याच गोष्टी वाचत आलाय. वाचायला यायला लागण्यापूर्वी गोष्टीच्या नावाच्या वेगवेगळ्या चित्रांखालची 'माधुरी' 'पुरंदरे' ही दोन चित्रे मात्र बहुतेक सर्व पुस्तकांवर नेहमी दिसायची. वाचता यायला लागल्यावर तर इतर लेखकांआधी हेच नाव एकदम जास्त ओळखीचे झाले. आपल्याला या आजीने लिहीलेल्या गोष्टी आणि चित्रे खूप आवडतात हेही समजायला लागलं. शिवाय इतर पुस्तकांवर असतं तसं लेखक आणि चित्रकार अशी दोन वेगवेगळी नावे तिच्या पुस्तकावर नसतात, माधुरीआजी नुसती गोष्टी लिहीत नाही, त्यांची चित्रे पण तीच काढते. आपल्याला खुप आवडणारी.
खरंच, त्या सगळ्या गोष्टी आणि चित्रे फक्त नीललाच नाही, आम्हालासुद्धा आवडतात. रोज झोपण्यापूर्वी एकतरी माधुरीआजीचं पुस्तक वाचल्याशिवाय झोप जशी काही येतच नाही. "राधाचं घर" मधले सगळे कुटुंबिय आमच्याही घरचेच झालेत. 'बाबा', 'नाना', 'आई', 'भाऊ', 'आजी', 'काका'.. यातला शिदूकाका जाम लाडका. राधाच्या खोड्याच काय काढतो, दार लावून एकटाच ढांगचिक ढांगचिक काय नाचतो, दहा तास नुसता भांगच काय पाडतो! आजोबांचं बाबाला 'धांदरटच आहे' म्हणणं, बाबाचं पाडापाडी करणं, आई-बाबांची रुसारुशी, भावांचा दंगा.. हे सगळं या मुलांनाच काय, आम्हा पालकांनाही हवंहवंसं आहे. या नुसत्या चित्रगोष्टी नाहीत, ही जाताजाता मुलांना करून दिलेली "घर" या संस्थेची सुंदर ओळख आहे, तर ते घर कसं असावं, "कुटुंब" म्हणजे काय याच्या आम्हा पालकांसाठीही घ्यावासा धडा आहे, गोड आवरणातून दिलेल्या कानपिचक्या आहेत. यातले पालकही आपल्या सर्वांसारखेच नोकरी-धंद्याची धावपळ असलेले, तरीही मुलांसाठी जमेल तसा वेळ देणारे, मुलंही दंगेखोर पण घरपण अनुभवणारी, आगाऊपणे न बोलणारी, महागडी खेळणी/गॉजेट्स पासून दूर असलेली, खरंतर ठेवली गेलेली.
या सर्व गोष्टी नीलला इतक्या तोंडपाठ आणि हावभावांसह येतात की बस्स. अत्यंत आनंदाची करमणूक असते ती.
'हात मोडला' तर आम्ही चक्क लिहून काढली होती. नील रोज थोडी थोडी सांगत गेला आणि मी दुरेघी वहीत लिहीत गेले. छान अनुभव होता तो. मुळात हात मोडणे या घटनेची इतकी सुंदर चित्रमय गोष्ट होऊ शकते, ह्याचंच मला खुप कौतुक वाचलं होतं. ते आजही तसंच कायम आहे. पण हीच तर माधुरीताईंची खासियत आहे. 'राजा शहाणा झाला' मधून दात घासणे, हात धुणे, अंघोळ करणे, ह्या दैनंदिन बाबींचं महत्व गोष्टीरूपातून काय सुरेख रंगवलंय! मुलांच्या विशिष्ट वयात ह्या बाबी किती डोकेदुखीच्या असतात ते प्रत्येक पालक जाणतो. त्यातही माधुरीताई अशा मदतीला धावून येतात. 'पाहुणी', 'कंटाळा', 'मामाच्या गावाला', 'मुखवटे', 'मोठी शाळा', 'किकीनाक'.. कितीतरी पुस्तकं, रोजच्या विषयांची, मुलांच्या हमखास आवडीची, वाचताना पालकांचाही दिवसभराचा शिणवटा दूर करणारी, मुलांना विचार करायला लावणारी, पण पालकांच्या मागे नस्त्या अवघड-अगम्य प्रश्नांचा ससेमिरा न लावणारी!
नीलची थोडी समजण्याची पातळी वाढल्यावर त्यांचं 'सिल्व्हर स्टार' खूप दिवस सुरू राहिलं होतं रात्री. ते तसं निराळ्या विषयाचं, मजकुरानंही मोठं आणि आतापर्यंतच्या कौटुंबिक परिघापेक्षा वेगळा, मोठा कॆनव्हास असलेलं. तेव्हापासून जहाज हाही एक जिव्हाळ्याचा विषय झालाय. चित्रांमधूनही किती दिवस जहाजंच उमटतायत, बोलतायत.
पण नीलचं माधुरीआजीशी तो जन्माला येण्यापूर्वीपासूनच नातं जुळलेलं आहे. तो पोटात असताना बाकीच्या पुस्तकांबरोबर 'आई होताना'ही माझ्या सोबत होतं. शिवाय 'वाचू आनंदे'ही जवळ ठेवलेली असायची, मन छान रमून जायचं तेव्हा त्या चारी पुस्तकांत. नील थोडा मोठा झाल्यावर आलेल्या सुटेपणात त्यांच्या 'लिहावे नेटके'नं मला चांगलं कामाला लावलं होतं. दोन मोठे ठोकळे हाताळत मराठी नव्याने शिकताना गणितं सोडवल्याचा सुंदर आनंद मिळाला होता आणि एखादं कोडं डोकं खाजवूनही सोडवता नाही आलं तर हळूच सोबत पुरवलेल्या उत्तरपुस्तकात चोरून उत्तर बघायलाही खुप मजा आली होती. ती पुस्तकं पहिल्यांदा बघितली तेव्हा मी माधुरीताईंना मनोमन कडक सलाम ठोकला होता!
त्यांच्याबद्दल जितकं बोलता-लिहीता येईल, तितकं कमीच आहे खरंतर. कारण त्यांचं लेखन भरपूर आहे, मी फक्त बालसाहित्याचा छोटासा आढावा घ्यायचा माझ्या परिने प्रयत्न केला. त्यांनी सर्वांनाच आयुष्यभर पुरेल इतका आनंद दिलाय, माझ्या लेकराचं आणि अलिकडच्या सगळ्याच लेकरांचं बालपण समृद्ध केलंय. कुणाही चिमुकल्यांच्या वाढदिवसासाठी किंवा सहज भेट म्हणून ही पुस्तके देताना तर खुप समाधान मिळतं. कोणालाही काही भेट देताना, घेणा-यापेक्षा जास्त आधी मला ती भेट आवडली पाहिजे असा माझा हट्ट असतो, माधुरीताईंमुळे तो हट्ट मी मनसोक्त पूर्ण करू शकतेय.
नीलतर्फे आणि आम्हा सर्वांतर्फे 'साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाल्याबद्दल माधुरीताईंचे मन:पुर्वक अभिनंदन. असे अगणित पुरस्कार आणि पावत्या तुमच्यापुढे नतमस्तक होऊन उभे राहोत ही शुभेच्छा. तुम्ही हा आनंदाचा झरा आमच्यासाठी असाच यापुढेही अखंड वाहता ठेवणार आहात, याबद्दल खात्री आहे.
छानच लिहीलय सई, नील मोठा
छानच लिहीलय सई, नील मोठा झाल्यावर वाचेल तेव्हा त्याला प्रत्येक गोष्ट पुन्हा आठ्वुन खुप आनंद होइल
फार सुरेख लिहिल आहेस सई,
फार सुरेख लिहिल आहेस सई,
मस्तच लिहीलय
मस्तच लिहीलय
मस्त लिहिलं आहेस सई.
मस्त लिहिलं आहेस सई.
वाह सई - खूपच सुंदर लिहिलंस
वाह सई - खूपच सुंदर लिहिलंस ...
("पुरंदरे" म्हटल्यावर उगीचच माझी कॉलर ताठ ... )
छान लिहीले आहे. मला ही लेखिका
छान लिहीले आहे. मला ही लेखिका व तिचे काम माहीतच नाही. आता वाचून बघते. मोठ्यांसाठी काही आहे का?
छान लिहिलंयस सई.
छान लिहिलंयस सई.
माधुरीआज्जी.. सई, खूपच छान
माधुरीआज्जी..
सई,
खूपच छान लिहिलं आहे.
मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची पुस्तकं मुलांसोबत होती / असतात.
साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल माधुरीताईंचे अभिनंदन!
धन्यवाद सई, मस्त आणि समयोचित.
धन्यवाद सई,
मस्त आणि समयोचित. फार गोड पुस्तकं आहेत ती. माझी मुलगी सुद्धा 'राधाचं घर', 'कंटाळा', मोठ्ठी शाळा, मुखवटे, किकीनाक, लालू बोक्याच्या गोष्टी, चित्रवाचन, राजा शहाणा झाला हे सर्व (आमच्याकडुन वाचून घेत) मोठी होते आहे. गेल्या सहा वर्षात कितीदा वाचली गणतीच नाही. अजूनही वाचतो. चित्र पाहतो. इथल्या प्रगत देशातील छान कागदाने, उत्तम छपाईने, हाताळण्यायोग्य जाड पुठ्ठ्याने भारावून जाऊन, मराठी पुस्तकं मागे पडतील की काय ही माझ्या मनातील भीती अस्थानी ठरली. ही पुस्तकं सुरवातीपासून आमच्या टॉप टेन मध्ये आहेत. देश बदलला, सरावाची भाषा बदलली तरीही.
राधाचं घर मी माझ्या, इतरांच्या, कोणाच्याही मुलांवर ट्राय मारुन पाहिले आहे. मुलांना फार आवडते.
मयेकरांच्या विद्यार्थ्यांनाही ती पुस्तकं आवडल्याचे त्यांनी आवर्जून कळवले होते.
मलाही ती पुस्तकं भेट द्यायला फार आवडतात.
अशिव्नीमामी,
मोठ्यांसाठी
- पिकासो
- वेटिंग फॉर गोदो चा मराठी अनुवाद
- वाचू आनंदे (४ भाग)
- लिहावे नेटके (२ भाग)
मायबोलीच्या एका दिवाळी अंकात अनीशाने त्यांची मुलाखत घेतली होती ना ?
सई मस्त लिहिलय.. मादाम माधुरी
सई मस्त लिहिलय.. मादाम माधुरी फेलिसितास्याँ.. किती बहुआयामी व्यक्तिमत्व आहे..
दोघी मधले 'फाल्गुन मास येता' गाणार्या मादाम खर्या की अशा छान छान गोष्टी लिहिणार्या मादाम खर्या की फ्रेंच शिकवताना एकाच शब्दाला ४-५ प्रतिशब्द सांगणार्या मादाम खर्या..
Alliance Française de Pune ला आम्हाला मा. नंदिता वागळे (ह्या सुद्धा तितक्याच मस्त) prediploma शिकवायच्या . त्याना कधी क्लास घ्यायला जमणार नसेल तर मा. माधुरी क्लास घ्यायच्या. ते २ तास एकदम मंतरलेले असत. १३-१४ वर्षांपूर्वी त्यांनी जवळजवळ वीस मि. घेतलेली prediploma ची तोंडी परिक्षा आजसुद्धा लक्षात आहे.. मा. माधुरी शिकवताना विचारांना ईतकी चालना देतात की बास..
@सई : अवांतराबद्द्ल क्षमस्व..
मला ही लेखिका व तिचे काम
मला ही लेखिका व तिचे काम माहीतच नाही. आता वाचून बघते. >>
अमा, नक्की वाचा. पुस्तकांबरोबरच त्यांची गाणीही नक्की ऐका. चंद्रकांत काळेंच्या शेवंतीचं बन, अमृतगाथा, साजणवेळा, प्रीतरंग या कार्यक्रमांसाठी त्यांनी गायलेली गाणी अप्रतीम आहेत.
http://vishesh.maayboli.com/n
http://vishesh.maayboli.com/node/1299
सापडली.. ही ती मुलाखत.
अगदी पोहोचल... मस्त लिहील
अगदी पोहोचल... मस्त लिहील आहेस ... माझ्या मुलाचा पण 'यश' लाडका आहे ...आणी ते चित्र वाचाय्चे पुस्तक .. कसले गोडु होते ...
मस्त लिहिलंयस सई.
मस्त लिहिलंयस सई.
मस्तच
मस्तच
फार सुरेख लिहिलं आहेस, सई.
फार सुरेख लिहिलं आहेस, सई. मस्त.
खुप खुप आभार
खुप खुप आभार सर्वांचे.
माधुरीताई आणि त्यांच्या सर्वच क्षेत्रातल्या भरा-या ह्यावर खरंतर डॉक्टरेट होऊ शकेल आणि तरीही खुप काही बाकी उरेल. भव्य अजस्र वृक्षांच्या छायेत राहूनही त्यांच्या बरोबरीने तितकाच भव्य झालेला हा सर्वस्वी स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेला वृक्ष आहे. त्यांच्याबद्दल काही लिहिणं माझ्या अगदी आवाक्याबाहेरचं आहे, पण आमच्या कृतज्ञतेची पोचपावतीही द्यायची होती म्हणुन हा खटाटोप केला. आम्ही राहू न राहू, पण त्यांच्या पुस्तकांनी वेळोवेळी केलेली सोबत माझ्या लेकासोबत आजन्म राहणार आहे ही सत्य गोष्ट आहे.
मोबाईलवरून टाईप केलंय, त्यामुळे व्याकरणाच्या चुकांबद्दल मनापासून क्षमस्व.
अमा, माधुरीताईंना वाचा, पहा आणि ऐकासुद्धा
रैना, डिट्टो!
लंपन, विषयांतरासाठी ऑल्वेज वेलकम
सई, अनेकानेक धन्यवाद ह्या
सई, अनेकानेक धन्यवाद ह्या लेखाकरता.
खरेतर माधुरी 'आज्जी' असा मथळा वाचून वेगळेच काही असेलसे वाटले होते.
माधुरीताईंचे 'साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाल्याबद्दल मन:पुर्वक अभिनंदन...
माझ्या आठवणी-प्रमाणे अर्धसत्य मधे ओम पुरीच्या आईचे काम पण केलंय त्यांनी.
मस्त लिहिलं आहेस सई.....आवडल.
मस्त लिहिलं आहेस सई.....आवडल.
खूप छान लिहिलं आहेस सई एक्दम
खूप छान लिहिलं आहेस सई
एक्दम टची!
खूप छान लिहिलं आहे! बातमी
खूप छान लिहिलं आहे! बातमी ऐकून आनंद झालाय पण त्यांनी लिहिलेली छोट्यांची पुस्तकं काही वाचायचा योग आला नाहीये अजून! मात्र त्यांचे नक्षत्रांचे देणे मधले performances, लेख, कविता वाचन आणि गेल्या वर्षी उंच माझा झोका पुरस्कार स्वीकारताना त्यांनी मांडलेले विचार यातून त्यांच्या प्रतिभाशाली आणि चतुरस्र व्यक्तीमत्वाची ओळख आहे.
छान लिहीलंय!
छान लिहीलंय!
माधुरीताईंची बालसाहित्यसंपदा
माधुरीताईंची बालसाहित्यसंपदा -
ज्योत्स्ना प्रकाशन -
१. परी, मी आणि हिप्पोपोटॅमस
२. लालू बोक्याच्या गोष्टी
३. आमची शाळा
४. राधाचं घर - ६ पुस्तकांचा संच
५. किकिनाक
६. कंटाळा
७. मोठी शाळा
८. मामाच्या गावाला
९. पाहुणी
१०. मुखवटे
११. हात मोडला
१२. चित्रवाचन
१३. राजा शहाणा झाला
१४. मासोळी आणि चिमुकलं पाखरू
१५. कागदी खेळ
१६. कसे बनवायचे पेपर पॉप-अप्स
१७. लिहावे नेटके - ३ पुस्तकांचा संच (मोठ्यांसाठीही उपयुक्त)
१८. वाचू आनंदे - बाल - २, कुमार - २
प्रथम प्रकाशन -
१. बाबाची मिशी
२. काकुचं बाळ
(आत्ता इतकीच आठवतायत)
ऊर्जा प्रकाशन -
१. सिल्व्हर स्टार
२. त्या एका दिवशी
राजहंस प्रकाशन -
१. सुपरबाबा आणि इतर कथा
२. शाम्याची गंमत व इतर कथा
३. जादूगार व इतर कथा
४. झाडं लावणारा माणूस
आणखीही काही असतील.. ही सगळी पुस्तके पुण्यात 'इकॉलॉजिक'कडे उपलब्ध आहेत. बहुदा ताईंच्या सन्मानार्थ पुढचे काही दिवस काही सवलतही ठरवलेली आहे. इतर तपशील हवे असतील तर संपर्कातून देऊ शकेन.
सई, तुझ्या प्रत्येक वाक्याला
सई, तुझ्या प्रत्येक वाक्याला अगदी अगदी झालं. मी आयामला काल बातमी वाचून दाखवल्यावर तोही खूप खुश झाला होता. अगदी घरच्या कुणाला तरी प्राइझ मिळालं की काय अशा आनंदात त्यानी ती बातमी त्याच्या शाळेत पण सांगितली.
राधचं घर, यश सिरीज, राजा शहाणा झाला, लालू बोक्याची गोष्ट, किकीनाक या पुस्तकांमूळे तर आयामला मराठी वाचायची आवडायला लागलं.
छोटंसं छान मनोगत.
छोटंसं छान मनोगत.
सई, लेखासाठी आभार
सई,
लेखासाठी आभार
माधुरीताईंचं बालसाहित्य मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Jyotsna-Prakashan/
येत्या एकदोन दिवसांत यादी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
हॅनाची सूटकेस - http://kharedi.maayboli.com/shop/Hanachi-Suitcase.html
लिहावे नेटके - http://kharedi.maayboli.com/shop/Lihave-Netake.html
वाचू आनंदे (बालगट) - http://kharedi.maayboli.com/shop/Vachu-Aanande.html
वाचू आनंदे (कुमारगट) - http://kharedi.maayboli.com/shop/Vachu-Aanande-Kumargat.html
किती मस्त लिहिलं आहेस सई !
किती मस्त लिहिलं आहेस सई !
पुस्तकांची यादी दिल्याबद्दल
पुस्तकांची यादी दिल्याबद्दल धन्यवाद, सई
माधुरी पुरंदरे यांच्या
माधुरी पुरंदरे यांच्या साहित्य वाटचालीविषयी "ललित" मधून पूर्वी वाचायला मिळत होतेच....मला वाटते त्याना ललितचा कोठावळे पुरस्कारही बालसाहित्य योगदानाबद्दल लाभला होता. आता साहित्य अकादमीने त्यांच्या याच योगदानाबद्दल पुरस्काराची जी मोहोर उमटवली आहे त्यामुळे त्यांच्या साहित्यसेवेचा यथोचित गौरव झाला आहे असेच सर्वत्र मानले जात आहे. वरील लेखात प्रवासाचा छान आणि भावुक आढावा घेतल्याचे जाणवते.
दुसरे असे की, सई यानी थेट कबूल केलेली गोष्ट म्हणजे माधुरीताईंच्या गोष्टी आणि चित्रे फक्त मुलालाच नव्हे तर आईवडिलानाही तितक्याच आवडतात. हे फार महत्त्वाचे वाक्य आहे. मी बर्याच ठिकाणी पाहिले आहे की अगदी नाईलाजास्तव गोष्टीची पुस्तके घरी आणली जातात...कित्येकदा नाईलाज झाला आहे म्हणून. पालकांची, त्यातही बाबाची...अशी कल्पना की आणली आहेत आता पुस्तके, तर बघत बसू दे पोर. पण त्याचवेळी जर बाबाने वेळात वेळ काढून किमान अर्धाएक तास त्या चित्राच्या दुनियतून मुलाबरोबर सफारी घडविली तर उलटपक्षी तो मुलगा जास्तच अशा अवांतर वाचनात रंगून जाईल. लेखामध्ये सई यानी छान मांडला आहे हा मुद्दा ज्याबद्दल त्या अभिनंदनास पात्र आहेत. चित्रगोष्टीतून माधुरीताईनी मुलांना करून दिलेली घराची सुंदर ओळख आहे, हे जितके खरे तर तर ते घर कसं असावं याचाही पाठ पालकांसाठीही दिला आहे.
कुटुंब स्वतंत्र असो वा एकत्र कुटुंबातील असो....चित्रगोष्टीतून मुलांमुलींना त्याची व्याख्या समजावून सांगण्यासाठी पालकांनी स्वतःच.....कारण इथे तेच शिक्षक आहेत.... या चित्रगोष्टी माध्यमाचा जरूर वापर करावा असे या निमित्ताने म्हणावे लागेल.
सई यानी पुस्तकांची यादी दिलेली आहेच...त्याचा उपयोग होऊ शकेल.
सई, मस्त.... रैना,
सई, मस्त....
रैना, मोठ्यांसाठी मधे ’लस्ट फॉर लाइफ' चा अनुवाद कसा विसरलीस?
माधुरीताईंना गेले कैक वर्ष बघतेय. सुरूवातीला थोडी आदरयुक्त भितीच होती मग ती भिती निघून गेली काही वर्षांपूर्वी. मग त्यांच्याशी जे काय थोड्या वेळांना गप्पा मारण्याचे क्षण आले त्यामधे अजून फार जास्त गंमत येत गेली.
Pages