गेल्यावर्षीची कैलास मानससरोवर यात्रा उत्तराखंडातल्या ढगफुटीमुळे रद्द झाली. दिल्लीला जाऊन वैद्यकीय चाचण्या, विसा वगैरेचे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर परत फिरावं लागल्याने फारच निराशा झाली. शिवाय मिळालेली रजाही रद्द करावी लागली. (त्यात भर म्हणजे विंबल्डनमध्ये अँडी मरे आणि मरीयन बार्टोली ह्यांना एकाच वर्षी जिंकलेलं बघावं लागलं... प्रारब्ध कोणाला चुकत नसतं म्हणतात ते हेच !!) नंतर दुसर्या कुठल्या ट्रेकला किंवा ट्रीपला जावं का असा विचार केला होता पण कैलास मानस नसेल मला इतर कुठे एकट्याने जायची फार इच्छा नव्हती. शिवाय उत्तराखंडात इतकं सगळं घडलेलं असताना घरूनही हिमालयात ट्रेकला जायची परवानगी मिळण्याची फार शक्यता नव्हती. मग सगळं रद्द करून आम्ही ५/६ दिवसांची कूर्ग ट्रीप करून आलो.
'गेल्यावर्षी निवड झालेल्या यात्रींना यंदाच्या निवडीत प्राधान्य देऊ' असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होतं पण तरीही ह्या वर्षी कैलास मानस यात्रेसाठी अर्ज करायचा का ते ठरत नव्हतं. ऑफिसमध्ये पुन्हा इतक्या मोठ्या रजेसाठी परवानगी घ्या, फिटनेससाठी तयारी करा, पुन्हा दिल्ली मग गुजराथी समाज, त्या मेडिकल टेस्ट्स सगळं खरच करावं का प्रश्न पडत होता. मागच्या वर्षीच्या लेखावर रैनाने प्रतिक्रिया दिली होती 'अशा यात्रा घडाव्या लागतात!' आणि त्याची प्रचिती ह्या वर्षी आली. गेल्यावर्षी ३१ डिसेंबरला परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर अर्ज उपलब्ध झाल्या झाल्या लगेच २ जानेवारीला मी तो भरून पोस्टातही टाकला होता. ह्यावर्षी मात्र 'करू सावकाश, काय घाई आहे' करत करत अखेर फेब्रुवारीत तो पाठवला. गेल्यावर्षी मी रोज एकदातरी परराष्ट्र मंत्रालयाची तसेच कुमाऊं मंडल विकास निगमची वेबसाईट, फेसबुकावरचा ग्रुप असं सगळं तपासून बघायचो की काही नवीन माहिती जाहीर झाली आहे का? ह्यावर्षी ह्यातलं काहीही एकदाही केलं नाही किंवा यात्रेबद्दलचं इंटरनेटवरचं कुठलं लिखाणही वाचलं नाही. यात्रींची लकी ड्रॉ पद्धतीने निवड साधारण ४/५ एप्रिलच्या सुमारास होते पण यंदा निवडणूका असल्याने सगळी यंत्रणा त्यात व्यग्र होती. २५ एप्रिलचा दिवस उलटून गेला तरी निवड जाहीर झाली नव्हती. मी ऑफिसमध्ये रजेबद्दलही काही सांगितलं नव्हतं आणि त्यात एका नवीन प्रोजेक्टसाठी पल्याड जायचं घाटत होतं. २७/२८ एप्रिलला फेसबुकावरच्या ग्रुपमध्ये परराष्ट्र खात्याने सांगितलं की यात्रींची निवड ३० तारखेला जाहीर होणार आहे. ३० तारखेला संध्याकाळी इमेलवर कळलं की माझी पाचव्या बॅचसाठी निवड झाली आहे. २४ जूनला दिल्लीला हजर रहायचं आहे आणि २८ जूनला प्रवास सुरू होणार आहे. मायबोलीकर केदारने गेल्यावर्षीप्रमाणे ह्यावर्षीही अर्ज भरला होता. मी त्याला लगेच फोन केला. तर तो नेहमीप्रमाणे सायकलवर होता! त्याला म्हटलं तुझे डिटेल्स दे मी बघतो तुझी बॅच. तर योगायोगाने त्यालाही ह्यावर्षी पाचवी बॅचच मिळाली होती! मग मी आधी घरी विचारलं. घरून गेल्यावर्षीप्रमाणेच जोरदार पाठींबा होता. दुसर्या दिवशी सकाळी सकाळी ऑफिसमध्ये रजा मिळेल का असं विचारलं. पहिल्या अपेक्षित प्रतिक्रिया येऊन गेल्यानंतर मात्र परवानगी मिळाली. कारण वरिष्ठांना गेल्यावर्षी झालेला गोंधळ माहित होता आणि मला जायची किती इच्छा आहे हे ही माहित होतं. शिवाय माझ्याकडे भरपूर रजा शिल्लक असल्याने त्याबाबतही काही प्रश्न नव्हता. त्या नवीन प्रोजेक्टचं काय करायची हे बघायची जबाबदारी वरिष्ठांनी स्वतःवर घेतली आणि मी यात्रेच्या तयारीला लागलो.
नंतरचे चार आठवडे मात्र शब्दश: दिवस मोजले! ऑफिसमध्ये मी माझ्यावरच्या जबाबदार्या हळूहळू दुसर्याला देत होतो कारण माहिनाभराची म्हणजे मोठी सुट्टी होती. शिवाय त्या काळात पुण्यात अशक्य उन्हाळा होता.यात्रेबद्दल गेल्यावर्षी इतकं वाचलं होतं की आता काही म्हणजे काहीच शिल्लक नव्हतं! रोज सकाळी फिरायला जा, मग ऑफिसात जाऊन पाट्या टाका, संध्याकाळी घरी येऊन मालिका बघा, झोपा.. आणि दर शनिवारी सकाळी सिंहगड.. असा दिनक्रम सुरु झाला. गेल्यावर्षीच्या यात्रेची तयारी म्हणून सुरू केलेल्या शनिवार सकाळच्या सिंहगड वार्या वर्षभर सुरू राहिल्या आणि त्याचा मला यात्रेदरम्यान चांगलाच फायदा झाला. मी आणि माझा मित्र गौतम नेहमी असायचो, बाकी काही जणं अधे-मधे यायचे. मधल्या काळाल गौतम 'लग्नाळला' आणि त्याचं लग्न मे अखेरीस असल्याने त्याने मे महिन्यापासून सिंहगड वार्यांमधून ब्रेक घेतला. मग काय.. बायको असतेच हक्काची! शिल्पाला स्वतःला कैलास मानसला जायची खूप इच्छा आहे त्यामुळे तिने लगेच मला त्यातल्या त्यात मदत म्हणून सिंहगडावर कंपनी द्यायची तयारी दर्शवली. ती माझ्याबरोबर अर्ध्या ते पाऊण उंचीपर्यंत यायची आणि तिथे वाचत बसायची आणि मी पूर्ण वर जाऊन यायचो. असे तीन चार शनिवार केले. मधल्या एक-दोन शनिवारी केदारही आला होता. एकीकडे केदार बरोबर फोनाफोनी करून सामानाची जमवाजमव सुरू होती. यंदा दोघं एकत्र असल्याने काही काही गोष्टी आम्ही दोघांत मिळून घ्यायच्या ठरवल्या होत्या.
निघायच्या साधारण आठवडाभर आधी आईला कसलीतरी अॅलर्जी आली. एकंदरीत आईला डॉक्टरकडे अजिबात जायचं नसतं. पण ती अॅलर्जी कमी होत नव्हती आणि तरी ती औषध घेत नव्हती . मग मी जरा आरडाओरडा करून तिला आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तिथे मला उगाच हौस आली आणि त्यांना माझं बिपी मोजायला सांगितलं. तर ते जास्त आलं!!! डॉक्टर म्हणाले गोळी वगैरे घेण्याइतक जास्त अजिबात नाहीये, काळजी करू नकोस, नीट आराम कर, येईल ते आपोआप खाली.. खरतर मी पंधरा दिवसांपूर्वीच रक्तदान केलं तेव्हा व्यवस्थित होतं.. विचार केला..झालं.. गेल्यावर्षी ढगफुटीमुळे आणि ह्यावर्षी आता मेडिकलमध्ये नापास झाल्याने यात्रा रद्द होणार! रात्रभर झोपच नाही लागली मला. आईला म्हटलं बघ तू मला ओरडायला लावलस आणि माझ बिपी वाढलं! दुसर्या दिवशी ऑफीसमधल्या डॉक्टरांकडे जाऊन परत मोजलं. आदल्या दिवशीपेक्षा कमी आलं पण तरी थोडं जास्त होतं! शेवटी घरून बोलणी बसली. म्हटलं जाऊ दे काय व्हायचं ते होईल.. अगदी झालोच रिजेक्ट तरी यंदा अजिबात सुट्टी रद्द करायची नाही.. तिकडेच दुसरा ट्रेक करायचा किंवा शिल्पा-रियाला बोलावून घेऊन ट्रीप करायची.
त्याच सुमारास पुण्यात ‘डीकॅथेलॉन’ची शोरूम उघडली. त्या दुकानातूनही बरीच खरेदी केली. खरतर चांगली सॅकपण घ्यायची होती. पण तिथेही आमची 'कन्या' रास आडवी आली. मेडिकलमध्ये नापास झालो तर सॅक पडून रहाणार आणि पैसे फुकट.. कशाला उगीच खर्च! मग शिल्पाच्या बहिणीकडून तिची ट्रेकींगची सॅक आणली आणि घरातली एक डफल बॅग घेतली. निघायच्या आदल्या दिवशी केदार आणि कुटुंबीयआमच्या घरी आले. घरच्यांची एकमेकांशी नीट ओळख झाली. प्रज्ञाला, केदारच्या बायकोला, जरा काळजी वाटत होती की एव्हडा लांबचा आणि अवघड प्रवास नीट होईल ना वगैरे. नंतर शिल्पा आणि माझी आई म्हणायला लागल्या, 'बापरे आम्हांला काही टेन्शन नाही आलय किंवा तुझी काळजीही नाही वाटत आहे.. आम्ही फारच पाषाणहृदयी आहोत की काय!'
अखेर सगळी कोंबाकोंबी करून सामान भरून झालं आणि आम्ही एअरपोर्टवर पोचलो. रियाला नक्की काय चाललय ते कळतच नव्हतं. एक महिना बाहेर जाण्यातला सगळ्यांत अवघड भाग रिया भेटणार नाही हाच होता! केदार एअरपोर्टला आधीच पोचला होता. मग सामान ओव्हरवेट, ह्या बॅगेतून त्या बॅगेत, थोडं केदारच्या हँडबॅगेत वगैरे सगळे नेहमीचे प्रकार होऊन अखेर आम्ही दिल्लीसाठी प्रस्थान ठेवलं.
२४ जून उजाडला तरी पुण्यातही पाऊस नव्हता, दिल्लीत तर अगदी लाही लाही होत होती. आम्ही दिल्लीला उतरलो तेव्हा साधारण ४३/४४ डि.से. तापमान होतं. त्यात आमची टॅक्सी भर दुपारी अडीच वाजता एका चौकात बंद पडली. टॅक्सीवाला म्हणे धक्का मारा जरा. म्हटलं मारतो आता काय! उन्हात गाडीला धक्का मारणे हे पहिले कष्टदायक काम केले! यात्रेचे पहिले तीन दिवस दिल्लीतच असतात. पहिले दोन दिवस वैद्यकीय तपासण्या आणि तिसर्या दिवशी परराष्ट्र मंत्रालयात यात्रेसंबंधी सुचना दिल्या जातात. शिवाय त्या दिवशी डॉलर घेणे, काही राहिलेली बारिक सारिक खरेदी वगैरे गोष्टीही करता येतात. दिल्लीत रहाण्याची (आणि खाण्याची) सोय दिल्ली सरकारतर्फे गुजराथी समाजात केली जाते. या यात्रेची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालय, कुमाऊं मंडळ विकास निगम(केएमव्हीएन), इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि दिल्ली सरकार ह्या सर्वांची असते. दिल्ली सरकारतर्फे तीर्थयात्रा विकास समिती, जातानाचे दिल्लीतले पहिले चार दिवस आणि आल्यानंतरचा एक दिवस व्यवस्था पहाते. तीर्थयात्रा विकास समितीचे प्रमुख श्री. उदय कौशिक ह्यांच ऑफिसही गुजराथी समाजात आहे. एकूणच प्रवास 'यात्रा' म्हणून होत असल्याने बरच धार्मिक वातावरण असतं आणि त्याची सुरुवात गुजराथी समाजातूनच होते. सकाळ संध्याकाळ पुजाअर्चा, आरती, प्रसाद, होमहवन शिवाय एकमेकांना बाकी सगळी अभिवादनं सोडून 'ॐ नमः शिवाय' म्हणणे अशा सगळ्या गोष्टी असतात. (कँटीनमध्ये आम्ही गेलो की तिथली पोरं आपापसात 'ॐ नमः शिवाय वाले आगए' असं म्हणायची!) गेल्यावर्षी माझी ह्या सगळ्या प्रकाराची रंगीत तालिम झालेली असल्याने मी सुरुवातीपासून अजिबात त्रास करून न घेता 'जो जो वांधिल तो ते करो' मोडमध्ये होतो. मुळात कुठल्याच बाजूला विरोध करायला जायचं नाही पण आपल्याला हवं ते, तसच आणि तेव्हडच करायचं हे ठरवून टाकलं होतं.
दुसर्या दिवशी दिल्ली हार्ट अँड लंग्ज इंस्टीट्यूटमध्ये वैद्यकीय तपासण्या झाल्या. तिथे हृदय आणि फुफ्फुसांसंबंधित बर्याच प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. अतिउंच प्रदेशात विरळ हवेचा त्रास होऊ शकतो आणि म्हणून ह्या तपासण्या होतात. साठ जणांच्या बॅचच्या ह्या सगळ्या तपासण्या होईपर्यंत दिवस जातो. त्यात ट्रेडमिल टेस्टच्या इथे एक मशिन बंद पडलेलं असल्याने फक्त एकाच मशिनवर सगळं चाललं होतं. त्यामुळे आमच्या तपासण्या संपेपर्यंत संध्याकाळचे साडेपाच झाले. ट्रेडमिल टेस्ट न खाता करायची असल्याने साडेपाचला दुपारचं जेवण जेवलो!
तपासण्या करताना रांगेत उभं राहून सहप्रवाश्यांची ओळख होत होती. ह्यावर्षीच्या बॅचचं सरासरी वय जास्त होतं. निम्मे लोक पन्नाशीच्या पुढचे होते. बॅचमध्ये डॉक्टरही एकच होत्या. यंदा गुजरातपेक्षा महाराष्ट्रातून आलेल्या यात्रींची संख्या जास्त होती. अर्थात त्यातले सगळे मराठी भाषिक नव्हते. दिल्ली, राजस्थान, हरीयाणा, उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंड, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि यंदा गोव्याचेही एक यात्री होते. महाराष्ट्रातल्या यात्रींपैकी प्रसाद रानडे मुंबईचे होते. एकदम टाईमपास माणूस.कामानिमित्त बारा गावांच पाणी प्यायलेला. पहिल्याच दिवशी माझ्याशी आणि केदारशी ह्यांच्या मस्त गप्पा झाल्या आणि आम्ही त्यांना आमच्या कंपूत हळूच ओढलं. (त्यांच्या एक दोन कमेंट्स ऐकून त्यांना लवकरच मायबोलीवर आणायचं हे ही आम्ही ठरवून टाकलं.) दिल्लीमध्ये सगळ्या ठिकाणी यात्रींचं फक्त पहिलं आणि मधलं नावच वाचलं जायचं, आडनाव वगळलं जायचं. त्यामुळे 'बाळकृष्ण विनायक' असं नाव बर्याचदा ऐकू आलं. हे फर्स्ट अँड मिडल नेम असलेला मनुष्य फक्त आणि फक्त मराठीच असला पाहिजे अशी मला खात्री होती. तर त्यांचं आडनाव होतं चौबळ. स्टेट बँकेतले उच्चपदस्थ चौबळ साहेबही मुंबईचेच. चौबळ साहेबांचं व्यक्तिमत्त्व एकदम भारदस्त होतं आणि एव्हडे उच्चपदस्थ असूनही ते एकदम साधे होते. अगदी सैन्यातून निवृत्त झालेले शोभतील असे कोल्हापुरचे मराठे काका होते. आमच्या बॅचमधले वयाने सगळ्यात मोठे ६९ वर्षांचे ठाण्याचे विनोद सुभाष काका होते. मुळचा पुण्याचा पण मुंबईत काम करणारा विशाल होता. त्याच्या हट्ट्याकट्ट्या शरीरयष्टीमुळे आम्ही त्याचं नाव नंतर 'भीम' ठेवलं. (त्याचे प्रश्न ऐकून केदारला वारंवार एका मायबोलीकराची आठवण यायची!). तळेगावचे ओक काका होते. पुण्याचे काटदरेक काका होते. दिल्लीत रहाणारा एका मोठ्या वृत्तपत्रात काम करणारा अँग्री (नॉट सो) यंग मॅन सौम्या होता. नंतर ह्याच्या आणि आमच्या अनेक विषयांवर खूप चर्चा झाल्या. पत्रकार असल्याने त्याच्याकडे सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी असायच्या. आमच्या बॅचमधला सगळ्यात लहान यत्री २७ वर्षीय गाझियाबादवासी श्याम गर्ग होता. पोरगेलसा श्याम आणि भरभक्कम भीम अशी जोडी पहिल्या दिवसापासून जमली. दोघेही एकमेकांच्या खोड्या काढायची एकही संधी सोडायचे नाहीत. दोन-तीन गुज्जू जोड्या होत्या. गुजराथच्या मीनाबेन, गुप्ते बाई आणि मयुरीबेन, दिल्लीच्या निलम आणि अंजू, उत्तराखंडच्या नंदादेवी अशा एकट्या आलेल्या काकू होत्या. त्यातल्या मयुरीबेन डॉक्टर होत्या. त्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण नक्की कुठल्या भाषेत घेतलं होतं कोण जाणे. त्यांना प्रश्न हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये विचारला तरी त्या उत्तर गुजराथीतच द्यायच्या. थोडफार आपल्याला कळतं पण एकदा अगदीच काही न कळल्यावर मी त्यांना सांगितलं की बाई हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोला कृपया! दिल्लीचे चैनाराम, हैद्राबादचे बद्रीप्रसाद, आमच्या बॅचचे ऑफिशियल पंडीत रामनरेशजी, बंगलोरचा फनीकुमार, दिल्लीचा विपूल वगैरे काका लोकं होते. कृष्णा आणि श्यामला म्हणून एक कर्नाटकी जोडपं होतं. त्यांना म्हणे दिल्लीत येईपर्यंत माहितच नव्हतं की ह्या यात्रेत इतकं चालावं लागतं. त्यांनी दिल्लीत आल्यावर आणि मेडीकल पास झाल्यावर बुट, कपडे वगैरे खरेदी केली. जिथे तिथे आपले फोटो काढून घेणारा नुकतच लग्न झालेला कर्नाटकी बसवप्रभू होता. मुळचे पंजाबी पण बरीच वर्ष गोव्यात असलेले बन्सलजी होते. तमिळनाडूमधला व्यापारी पलानी होता. ह्या पलानीला केदार तमिळ भाषिक आहे असं वाटायचं आणि तो केदारशी तमिळमध्ये बोलायला सुरुवात करायचा. थोड्यावेळाने केदार त्याला 'मला कळत नाही रे तू काय म्हणतोस..' असं मराठीत सांगायचा! त्यांच्या गप्पा एकूण एकदम मजेशीर असायच्या. त्यात केदारला बन्सलजी तमिळ आहेत असं वाटलं आणि तो त्यांना 'ह्या पलानीला तुमच्या भाषेत नीट समाजावून सांगा' असं सांगायला लागला. बर्याच बहुभाषिक चर्चेनंतर कोण कुठलं आणि कुठली भाषा बोलतं ते स्पष्ट झालं! रघू आणि हायमा नावाचे अमेरिकावासी बंधू-भगिनी चौथ्यांदा यात्रेला निघाले होते. याआधी तीनदा ते नेपाळमार्गे जाऊन आले होते आणि आता त्यांना भारताच्या बाजूने जायचं होतं. शिवाय मध्यप्रदेशातून आलेले अजून एक बंधू-भगिनी होते. त्यांच्या दोघांच्या चेहेर्यावर कायम बध्दकोष्ठता झाल्यासारखे भाव असायचे. त्यातला तो माणूस नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकारची टोपी घालून फिरायचा. आम्ही त्याचं नाव टोपीवाला ठेऊन दिलं. टिपीकल हरीयाणवी व्यक्तिमत्त्वाचे मित्तलजी होते. बहूतेक त्यांना मी अजिबात आवडायचो नाही. ते माझ्याकडे कायम खाऊ का गिळू नजरेने बघत असायचे! त्यात पुढे माझ्या पोर्टरने त्यांची टोपी हरवली. बिहारी शेतकरी रामसेवकजी होते. साठीच्या पुढचे रामसेवकजी दुसर्यांदा यात्रेला निघाले होते. यंदाच्या हंगामातला १०२ क्विंटल मका विकला आणि ते पैसे घेऊन यात्रेला आलो असं सांगत होते. म्हणे मुलांना त्यांचे पैसे कमावता येईल इतकं शहाणं केलं आहे, त्यामुळे हे पैसे माझे मी खर्च करणार. उत्तरप्रदेशातून आलेला आचारी टेकचंद होता. माणसाकडे फक्त बघून, त्याच्या दिसण्यावरून कधीही मत बनवू नये ही जी शिकवण आपल्याला मिळते त्याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे टेकचंद आणि रामसेवकजी! नेहमी झब्बा-पायजमा घालणारे, कुठलेही हायफाय बुट, सॅक, कॅमेरा, इतर आयुधं न वापरणारे, इतकच काय पण पोर्टर न घेता आपली सॅक आपण वागवणारे हे दोघे चालण्यात वाघ होते! संपुर्ण यात्रेत सगळ्यात पुढे, मेडिकली एकदम फिट आणि स्वभावाने अतिशय साधे. आमच्या बॅचमधली सगळ्यात 'महत्त्वाची' व्यक्ती म्हणजे कायम अतिसेवाभावी वर्तन करणारे उत्कलजी पटेल! सगळ्या बॅचची काळजी ह्यांच्या शिरावर आहे अशा थाटात त्यांचा कारभार सुरु असायचा. पण त्यात 'नारायणा'सारखी अगदी निष्पाप वृत्ती मात्र नव्हती. येता जाता काहीही झालं की जोरात 'नम: पार्वती पदे.. हरहर महादेव!!!!!!!!!!' असं ओरडायची ह्यांना सवय होती. पुढे केदारने ह्यांचं नाव 'पार्वते' ठेवलं. अशा विविधढंगी, विविधप्रांती बॅचची मोट बांधणार होते आमचे लायजनींग ऑफिसर श्री. राजेंद्र कटारीया. भारत सरकारचे प्रतिनिधी असणारे हे एलओ कर्नाटक केडरचे अस आय.ए.एस ऑफिसर आहेत आणि त्यांनी युपीए सरकारातल्या रेल्वेमंत्रालयात मंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून काम केलं आहे. प्रत्येक बॅचच्या 'एलओ'कडे डिप्लोमॅटचा पासापोर्ट असतो त्यांना total diplomatic immunity असते.
वैद्यकीय तपासण्यांदरम्यान एलओ सरांशी जुजबी बोलणं झालं. दुसर्या दिवशी आयटीबीपीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी मिटींग घेऊन फायनान्स, फूड, लगेज वगैरे कमिट्या स्थापन केल्या. मला ऑफिसमध्ये 'हल्या हल्या' छाप काम करून इतका वैताग आलेला होता की मी कुठल्याच कमिटीत नाव दिलं नाही. पण उगीच 'यंग हो इसलिए' लगेज कमिटीत जायला नको म्हणून मी 'डिसिप्लीन' कमिटीत नाव दिलं.
वैद्यकीय चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आणि आमच्या बॅचमधल्या ९ जणांची निवड होऊ शकली नाही. पलानी, ओक काका आणि काटदरे काकांबद्दल वाईट वाटलं. काटदरे काकांना हिमालयातल्या बर्याच ट्रेक्सचा अनुभव होता. पण वैद्यकीय चाचण्यांच्या निकषांमध्ये ते बसू शकले नाहीत. खरतर मयुरीबेनचंही ब्लडप्रेशर जरा बॉर्डरवर होतं आणि आयटीबीपीचे डॉक्टर त्यांना परवानगी नाकारत होते. पण एलओ सरांनी त्यांना गुंजी पर्यंत सुट देण्याची विनंती केली कारण त्या आमच्या बॅचमधल्या एकमेव डॉक्टर होत्या. गुंजीला तशीही पुन्हा चाचणी होतेच. तिथे काही त्रास आहे असं वाटलं तर तिथून परत पाठवू अशा मांडवलीवर मयुरीबेनची निवड झाली. साठपैकी नऊ जणं गळल्यावर आम्ही ३८ पुरूष आणि १३ बायका असे ५१ यात्री झालो. एलओंना धरून आमची ५२ जणांची बॅच निश्चित झाली. आत्तापर्यंतच्या पाच बॅचपैकी आमची सगळ्यात लहान बॅच. आमच्या आधीच्या चौथ्या बॅचमधले साठही जण वैद्यकीय चाचण्या पास झाले होते.
वैद्यकीय तपासण्या आटोपून गुजराथी समाजात परतलो आणि मग आम्ही चौघा-पाच जणांनी लगेच चांदनी चौकाकडे मोर्चा वळवला. तसही संध्याकाळी तिथे करण्यासारखं काही नव्हतं आणि टेस्ट पास झाल्यामुळे सगळे उत्साहात होते. पुजेमधली हनुमान चालिसा ऐकली आणि निघालो. गेल्यावर्षी घाईघाईत चांदनी चौकात येऊन गेलो होतो. ह्यावर्षी वेळ होता आणि कंपनीही होती. दिल्ली मेट्रो खूपच सोईची आणि उत्तम आहे. दिल्लीतल्या चांदनी चौक, राजीव चौक ह्यांसारख्या ठिकाणी जागा ताब्यात घेऊन मेट्रोचं बांधकाम करता येऊ शकत असेल तर भारतात कुठेही काहीही बांधता येणं शक्य आहे, प्रश्न आहे तो फक्त राजकीय इच्छाशक्तीचा! पुण्यातल्या मेट्रोचं भिजत घोंगडं आणि मुंबई मेट्रो सुरू व्हायला झालेला उशीर पाहून तर हे फार प्रकर्षान जाणवलं. मी लालकिल्ला पाहिलेला नव्हता. त्यामुळे आधी लाल किल्ल्याकडे वळलो. प्रचंड उकडत होतं आणि तहान तहान होत होती पण तरी पार आतपर्यंत लांब चक्कर मारली. दिवाने-आम, दिवाने-खास, बाकी जुन्या इमारती, बादशाहाची बसायची जागा वगैरे बर्याच गोष्टी पाहिल्या. अशा ऐतिहासिक वास्तू पाहून खूप काही वाटतं पण नक्की काय ते सांगता येत नाही. साडेसात वाजता लाईट अँड साऊंड शो होता पण तेव्हडं थांबायचं त्राणच राहिलं नाही. लाल किल्ल्याच्या आतली प्रशस्त हिरवळ, मोकळी जागा आणि दार ओलांडून बाहेर पडल्यावर चांदनी चौकात इंच इंच लढवूया परिस्थिती. सिस गंज साहिब गुरुद्वारा, जामा मस्जिद, गौरी शंकर मंदिर, चर्च, जैन मंदिर अशी सगळी एकत्र नांदणारी प्रार्थनास्थळं. इमारतींच्या मधून-मधून जाणार्या 'गल्ली'ही म्हणता येणार नाही इतक्या लहान लहान बोळकांड्या. सर्व प्रकारच्या, किंमतीच्या, दर्जाच्या खाण्या-पिण्याची चंगळ. एका अगदी लहानश्या बोळकांडीतून आत शिरलो. दोन्ही बाजूला टपरी वजा दुकाने. खेटून दोन माणसं शेजारी उभी राहू शकतील इतकीच जाग. दुकानदाराने थोडं पुढे वाकून हात लांब केला की तो समोरच्या दुकानातलं सामान काढू शकेल इतपतच. पण ती दुकान होती कॅमेर्याची. म्हणाल तो ब्रँड, म्हणाल ती कॅमेर्यांची मॉडेल, म्हणाल त्या स्पेसिफिकेशनची लेन्स, म्हणाल त्या अॅक्सेसरीज तिथे उपलब्ध होत्या! केदारने नवीन लेन्स घेतली. आम्हांला जरा शंका आली. विचारलं लेन्स खराब झाली तर काय, त्या माणसाने डिलरशिपचं कार्ड काढून दिलं, म्हणाला कुठल्याही शोरूममध्ये जाऊन हे दाखवा, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आम्ही ऑथोराईज्ड डीलर्स आहोत. वर त्याने कोकही पाजलं! अजून एक अशीच गल्ली म्हणजे पराठेवाली गल्ली. दोन-दोनशे वर्ष जुनी दुकानं, आज पाचव्या सहाव्या पिढ्या ती चालवत आहेत. चिनूक्सच्या लेखाची आठवण झाली. त्यात उल्लेख असलेली ओल्ड फेमस जलेबीवाला, घंटेवाला, रबडी भंडार वगैरे दुकाने दिसली. घंटेवाल्याकडे कचोरी आणि पराठेवाल्या गल्लीत तुपात तळलेले पराठे खाल्ले. पुदिना आणि बेसन पराठे खूप आवडले. लस्सी प्यायली. (केदार उगीच जास्त गोड आहे वगैरे म्हणत होता, पण मी लक्षं दिलं नाही त्याच्याकडे.) शिवाय हल्दीराममध्ये जाऊन दहीभल्ले आणि पापडीचाट खाल्लं. मला खरतर ते चिनूक्सच्या लेखात लिहिलेलं 'खुर्चन' पण खायचं होतं. पण ते म्हणे फक्त सकाळीच मिळतं. 'अब इतने रात को कहां मिलेगा खुर्चन' असं अगदी दिल्ली ढंगात सांगून त्या दुकानदाराने आमची बोळवण केली. इतके वर्ष जुना हा परिसर, पिढ्यांन पिढ्या पहिलेला. अनेक घटना पचवलेला. एकंदरीत ह्या जागेत काहितरी वेगळं आहे.
दिल्लीतल्या तिसर्या दिवशी परराष्ट्र मंत्रालयात जायचं होतं. परराष्ट्र मंत्रालयातले कैलास मानससरोवर यात्रेचे प्रमुख श्री. विजय, केएमव्हिएनचे अधिकारी, आमचे एलओ आणि आयटीबीपीचे अधिकारी तिथे उपस्थित होते. त्यांनी सगळ्यांनी बर्याच सुचना दिल्या. मुख्य म्हणजे चीनमध्ये जाऊन कुठल्याहीप्रकारे राजकीय बाबींवर भाष्य करणं टाळा तसच प्रवासात दिलेल्या सुचना कटाक्षाने पाळा हे सांगितलं. विसा काढण्यासाठी दिलेले आमचे पासपोर्ट परत मिळाले तसच भारतातल्या बाजूच्या व्यवस्थेसाठी केएमव्हिएन जे पैसे घेतं ते ही त्यांनी जमा केले. परराष्ट्र मंत्रालयात गेलोच होतो तर तिकडे परराष्ट्र मंत्र्याना भेटणं शक्य आहे का, त्यांच्या लोकांना भेटण्याच्या काही ठरविक वेळा असतात का? ह्याची चौकशी केली. पण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज त्यांच्या पहिल्या परदेश दौर्यावर बांग्लादेशला गेल्याचं समजलं. पहिल्या बॅचला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी त्या स्वतः हजर होत्या. (सुषमाजी खरच भेटल्या असत्या तर सरकारने २०२४च्या ऑलिंपीक यजमानपदासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती त्यांना करायची असं मी ठरवून ठेवलं होतं. परत कधी संधी मिळाली तर बघू आता.. !) यात्रेच्या कालावधीतले एकूण आठ दिवस चीनमध्ये असतात. तिथल्या रहाण्या-खाण्याचा आणि प्रवासाचा खर्च म्हणून तब्बल ८०१ अमेरिकन डॉलर चीन सरकारला द्यावे लागतात. आठपैकी तीन दिवसांचं जेवण चीन सरकारतर्फे दिलं जातं. परिक्रमेचे पाच दिवस मात्र आपली आपल्याला सोय करावी लागते. तिथल्या कँपवर स्वंयपाकघर आणि भांडी असतात. त्यामुळे नेपाळी स्वैपाक्यांच्या मदतीने जेवण बनवता येतं. त्याचा शिधा मात्र भारतातून घेऊन जावा लागतो. ह्या सगळ्या खर्चासाठी, तसच कॅम्पवरच्या कर्मचार्यांना टीप देण्यासाठी प्रत्येक बॅच वर्गणी काढते. आमच्या बॅचनेही प्रत्येकी तीन हजार रूपये वर्गणी गोळा केली.
परराष्ट्र मंत्रालयातलं काम संपल्यावर पुढचं काम बँकेत जाऊन डॉलर घेणे हे होतं. चौबळ साहेबांनी जवळच्या एसबीआयच्या शाखेत आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली होती. मी पुण्याहूनच डॉलर नेलेले असल्याने मला बँकेत जायची गरज नव्हती. त्याऐवजी मी माझ्या आता नॉएडात असणार्या एका मैत्रिणीला भेटायला निघालो. खरतर केदारकडेही डॉलर होते. पण तो फायनान्स कमिटीत असल्याने त्याला संपूर्ण बॅचच्या चीनमधल्या खर्चासाठी लागणारे डॉलर घ्यायचे होते. इतक्या लोकांचे पैसे घ्यायचे असल्याने बँकेत खूप वेळ गेला. दरम्यान केदारच्या कुठल्यातरी बोलण्याने टोपीवाल्याच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांची जरा बाचाबाची झाली. नंतर टोपीवाला पूर्ण प्रवासभर केदारवर आणि मी केदारचा मित्र म्हणून माझ्यावरही खार खाऊन होता! फूड कमिटीतली मंडळी ठरवलेल्या यादीप्रमाणे चीनमध्ये लागणारा शिधा घेऊन आली. काही सामान/खाद्यपदार्थ गुजराथी समाजातर्फे दिलं जातं.
दिल्ली मेट्रो आता थेट नॉएडा पर्यंत जाते. हा मेट्रोप्रवास जरा मोठा म्हणजे साधारण पाऊण तासाचा होता. मधे एका स्टेशनला दिल्लीची हद्द ओलांडून मेट्रो उत्तर प्रदेशात शिरली. उत्तर प्रदेशात गेल्यावर बदल जाणवले. रिक्षांचे मिटर लगेच बंद, तोंडाला येईल ते भाडं, पाट्या लिहायची पद्धत वेगळी, अखिलेश सरकारच्या जाहिराती करणारे फलक वगैरे दिसायला लागले. माझी मैत्रिण आहे मराठी पण तिचा नवरा पंजाबी सरदार आहे. त्यामुळे त्यांच्या घरी सगळे शुद्ध हिंदीत बोलत होते. मी गेल्या गेल्याच सांगितलं की माझ्या बम्बैय्य हिंदीचा राग वगैरे मानू नका. सगळ्यांशी भरपूर गप्पा झाल्या. हे कुटूंब मुळचं पाकिस्तानातलं. फाळणीच्या वेळी भारतात आलं. त्यांचे त्यावेळचे काही अनुभव ऐकले. फारच कठिण परिस्थिती होती तेव्हा! निघताना तिने हळूच सांगितलं जाताना मोठ्यांना नमस्कार कर कृपया. म्हटलं तसही मराठी लोकांना उत्तर भारतीयांपेक्षा आदर-सत्कार, तेहजीब, पायलागू वगैरेची समज जरा कमीच. शिवाय आधीच सुनेचा मित्र आणि त्यात पायाही न पडता गेला म्हणून तुला बोलणी-बिलणी नको बसायला!
संध्याकाळी गुजराथी समजात दिल्ली सरकार तर्फे 'बिदाई'चा कार्यक्रम होता. प्रत्येक बॅचला दणक्यात सेंडऑफ दिला जातो. शिवाय दिल्ली सरकारतर्फे रकसॅक, रेनकोट, ट्रॅकसुट, टॉर्च, पुजेचे सामान, पाऊच वगैरे भेटवस्तूही दिल्या जातात. दिल्लीतल्या यात्रींना दिल्ली सरकारतर्फे यात्रेकरता मदत म्हणून तीस हजार रूपये रोख दिले जातात. इतरही बरीच राज्यसरकारे (उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड, छत्तिसगढ, कर्नाटक, गोवा आणि तमिळनाडू सुद्धा!) अशी मदत देतात. महाराष्ट्र सरकार मात्र काही देत नाही. त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या यात्रींनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून दिलं. बिदाईला दिल्ली सरकारातले सचिव आले होते. जोरदार भजनं, गाणी वगैरे झाली. यात्रींचा गळ्यात हार घालून, टिळे लावून सत्कार केला गेला. एकंदरीत उत्तर भारतात कैलास मानस सरोवर यात्रेचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे सगळ्या यात्रींना खूप मानसन्मान मिळतो. सेवा केली जाते. पण आपल्याला मात्र फार अवघडल्यासारखं होऊन जातं. 'बिदाई'च्या कार्यक्रमादरम्यान प्रचंड उकडत होतं आणि भजनांचा फार जोरात आवाज होता. आम्ही बराच वेळ बाहेर बसलो होतो. जेवण मात्र छान होतं. तो कार्यक्रम सुरु असताना शिल्पाचा फोन आला. एकदम घाईघाईने बोलत होती. मी विचारलं की काय झालं ? म्हणे तू बिदाईत बिझी असशील ना! मी म्हटलं बिझी काय असायचंय? तुला काय वाटलं विदाई म्हणजे मी कोणाच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडतो आहे की काय. आधी ती ते इमॅजीन करून खूप हसली मग म्हणे त्या कैलासालाच सांग आता की मला सरळ बोलायची बुद्धी दे म्हणून!
जेवण झाल्यावर एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पाडायचा होता तो म्हणजे सामान भरणे. यात्रींना वीस किलो सामान घेऊन जायला परवानगी असते. ते एक किंवा दोन बॅगांमध्ये भरून पावसापासून संरक्षण करण्यासाठी युरीया बॅग (प्लॅस्टीकच्या पोत्यात)मध्ये कोंबायचं असतं. हे सामान खेचरांवर बांधलं जातं आणि रोजच आपल्याला मिळेल ह्याची शाश्वती नसते. यात्री आपल्याबरोबर एक छोटी सॅक ठेवतात ज्यात पैसे, महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे, औषधे, एक कपड्यांचा जोड, थोडा खाऊ, रेनकोट वगैरे अगदी गरजेचं सामान असतं. सगळं सामान प्लॅस्टीकच्या पिशव्यांमध्ये बांधून ठेवायला लागतं. म्हणजे अगदी पाणी आत गेलच तरी सामान ओलं होत नाही. मी आणि केदारने युरीया बॅगांऐवजी रविवारपेठेतून मोठ्या सिंथेटी़क कापडाच्या शिवलेल्या आणि चेन / हँडल असलेल्या बॅगा आणल्या होत्या. एक तर त्या चांगल्या दणकट होत्या, चेन असल्यामुळे त्यांची तोंडं आवळत बसायला लागत नव्हती आणि विचित्र रंगांच्या होत्या त्यामुळे सामानाच्या ढिगात पटकन ओळखू यायच्या. कुठल्या बॅगेत काय ठेवायचं आणि कुठलं सामान दिल्लीतच ठेऊन द्यायचं ह्यावर बरच विचार मंथन करून झाल्यावर अखेर बॅगा भरून झाल्या. पण वाईट गोष्ट म्हणजे माझी काळी सॅक त्या रविरवारपेठी बॅगेत मावेचना! मग बरीच फाईट मारून ती सॅक युरीया बॅगेत कोंबली आणि दिल्ली सरकारने दिलेली सॅक बरोबर ठेवायची म्हणून घेतली. हे लिहिलं तीन चार ओळीत असलं तर ह्या सगळ्या प्रक्रियेला तब्बल तीन तास लागले! दरम्यान जे लोकं गुजराथी समाजात उतरले नव्हते ते सगळेही त्या रात्रीच्या मुक्कामासाठी तिथेच आले कारण दुसर्या दिवशी पहाटे साडेचारला सामान द्यायचं होतं आणि सहाला निघायचं होतं. सहाव्या बॅचचे काही अतिउत्साही यात्री दोन दिवस आधीच दिल्लीत आले होते. त्यामुळे गुजराथी समाजाच्या त्या हॉलमध्ये 'जागा मिळेल तिथे पथार्या' अशी परिस्थिती होती. जेमतेम तीन तास झोप झाली असेल नसेल तो लोकं उठायला लागली. पूर्ण यात्रेतलं आमचं सुत्र म्हणजे जाग आली की प्रातर्विधी आणि शक्य असेल तर अंघोळ उरकून घ्यायची. नंतर हवं तर परत झोपता येतं. पण उशीर झाला की रांगा लागतात आणि टॉयलेट, बाथरूम घाण होतात! आंघोळ करता करता लोक बाथरूममध्ये नाचतात की काय अशी मला शंका यायची कारण एक जण जरी आधी जाऊन आला तरी बाथरूमचा कोपरा अन् कोपरा ओला झालेला असायचा! लगेज कमिटी सामान द्यायची सुचना देऊन गेली. दरम्यान उत्तराखंड परिवहनची वॉल्वो बसही खाली येऊन उभी राहिली. काठगोदाम
पर्यंत वॉल्वो असते आणि तिथून पुढे धारचुलापर्यंत लहान बस असतात.
अखेर बरीच बोंबाबोंब झाल्यानंतर सगळं सामान वॉल्वो बसच्या पोटात गेलं आणि आम्ही बसमध्ये जागा पकडल्या. दरम्यान बरेच समितीवाले पुन्हा हार, टिळे, भेटवस्तू घेऊन आले होते. मग ओवाळणं, नमस्कार, चमत्कार झाल्यावर पार्वतेने आपली 'हर हर महावेव'वाली पाहिली आरोळी ठोकली आणि आमची बस काठगोदाम/अल्मोड्याकडे मार्गस्थ झाली.
क्रमशः
भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/50832
सुप्पर सुरवात आहे.
सुप्पर सुरवात आहे.
पराग, मस्त लिहिलं आहेस
पराग, मस्त लिहिलं आहेस
सहप्रवाश्यांचं वर्णन वाचण्यात रंगून जायला झालं. दिल्लीपासूनच पूजा आणि यात्रेचा माहौल म्हणजे आपल्यालाही नकळत अनिच्छेनेही त्याची लागण होत असेल. आत्ता कैलास मानसरोवर हा ट्रेक म्हणूनच माझ्या डोळ्यासमोर येतोय पण ती एक यात्रा आहे हे त्या माहौलमुळे लक्षात येत असेल आणि प्रत्यक्ष समोर कैलास दिसल्यावर काय वाटत असेल कुणास ठाऊक! हिमालयातल्या अनेक शिखरांपैकी विशिष्ठ आकार असलेलं एक शिखर? की साक्षात शिवशंभोंचं निवासस्थान? हिमालयातल्या कित्येक भागांना काहितरी आख्यायिका असल्यामुळे (गणेशाचे जन्मस्थान, पराशरांचा आश्रम, वसिष्ठांचा आश्रम, व्यास (बियास), स्वर्गारोहिणी, यमद्वार, केदार/बद्री इत्यादि अनेक) आणि निसर्गाची उधळण असल्यामुळे, म्हटलं तर अख्खा हिमालयच भगवंताच्या अस्तित्वाचा फील देतो आणि नकळत त्या आख्यायिकांच्या काळाशी आपण रिलेट करु लागतो.
अशा ऐतिहासिक वास्तू पाहून खूप काही वाटतं पण नक्की काय ते सांगता येत नाही. >>>> दोन वेगळ्या काळांना एकाच वेळी काही क्षण जगल्याचा आभास होतो.
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत....
अप्रतिम लिहीत आहेस रे.
अप्रतिम लिहीत आहेस रे.
पराग आधी यात्रा पूर्ण
पराग आधी यात्रा पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन!
मस्त लिहीलं आहेस अगदी सगळं समोर बसून सांगतो आहेस अशा भाषेत. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
केदार तुझाही भाग येउ देत लवकर.
खुप छान वाटलं वाचून.. पुढच्या
खुप छान वाटलं वाचून.. पुढच्या भागाची आणि फोटोंची वाट बघतोय.
खूप छान… अगदी सविस्तर लिहिलं
खूप छान… अगदी सविस्तर लिहिलं आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत
मस्त लिहीलयस पराग..पुढचा भाग
मस्त लिहीलयस पराग..पुढचा भाग लवकर येउदे.
मस्तच. आवडले.
मस्तच. आवडले.
सगळ्यांना प्रतिक्रियांकरता
सगळ्यांना प्रतिक्रियांकरता धन्यवाद.
खरतर खूप लांबण लावली पहिल्याच भागात पण लिहून झाल्यानंतर काय एडीट करावं ते कळेना, मग सगळं तसच ठेवलं.
तुझं बीपी आलं का मग नॉर्मलला? >>>> सायो, हो.. ते लिहायचच राहिलं. :| बिपी पुण्यापेक्षा कमी आलं पण माझं नेहमी जेव्हडं असतं त्याच्यापेक्षा किंचित जास्त होतं पण ते लिमिटमध्ये होतं.. डॉक्टर म्हणाले नॉर्मल आहे तेव्हडं असणं पण.
जीएस.. एव्हडा मोठा भाग रोज एक ह्या स्पीडने लिहित बसलो तर मला परत रजा घ्यावी लागेल..
त्याच्या त्या रिंगटोन्स जबरी होत्या. >>>> हो अरे ! ते पण राहिलं लिहायचं. त्याच्या आईचा अडीच की साडेतीन वाजता फोन आला. हा उठत नाही बघून मीच कट करून टाकला तो. 'शिव शंकराय नमः.... शिव शंकराय नमः' असे काहितरी शब्द होते त्या रिंगटोनचे.. बादवे.. तुझे सगळे फोटो टाकून देऊ नकोस आधी. नाहितर माझे बघणारच नाही कोणी..
तू पण कन्या राशीचा? >>> ललिता, हो अगदी हाडाचा.. तू पण का??
अख्खा हिमालयच भगवंताच्या अस्तित्वाचा फील देतो >>> केश्विनी खरं आहे...
खूप छान वर्णन केलंय, लवकर
खूप छान वर्णन केलंय, लवकर पुढचा भाग येऊद्यात.
प्रसन्न व रंजक सुरुवात आहे.
प्रसन्न व रंजक सुरुवात आहे. छानच लिहिले आहेस. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.
वा! मस्त सुरूवात.. या
वा! मस्त सुरूवात..
या लेखमालिकेची मी वाट बघत होते.
त्या कूर्गच्या लेखाची पण लिंक दे ना..
मस्त लिहितो आहेस. लवकर पुढचा
मस्त लिहितो आहेस. लवकर पुढचा भाग लिही.
दोन दोन मायबोलीकर एकाच बॅचला म्हणजे खरंच मस्त योगायोग आहे.
केदारच्या लेखाच्या प्रतीक्षेत.
मस्त लिहीतो आहेस. वाचते
मस्त लिहीतो आहेस. वाचते आहे.
तुम्हा दोघांचे फार कौतुक (आणि हेवा) वाटले.
मस्त दमदार सुरुवात झाली
मस्त दमदार सुरुवात झाली आहे................
मस्त रे पराग.. माझ्याही टू डू
मस्त रे पराग.. माझ्याही टू डू लिस्टवर आहे (युरोपातले टू डू संपले की तिकडचे)
खुप सुन्दर लिहिलय!!! पुढच्या
खुप सुन्दर लिहिलय!!!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!
मस्त !
मस्त !
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
फार मस्त लिहीले आहे. पुढचा
फार मस्त लिहीले आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या
मस्त लिहिलय. पु. भा. प्र.
मस्त लिहिलय. पु. भा. प्र.
छानच. पराग मस्त लिहीलय.
छानच. पराग मस्त लिहीलय.
पराग, फारच मस्त लिहिलं आहेस.
पराग, फारच मस्त लिहिलं आहेस. तुझा लेख वाचून माझ्या तीन वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. गुजराथ समाज, ॐ नमः शिवाय म्हणणे, ती मेडिकलआधीची धाकधूक, बिदाई, निरनिराळे सहयात्री... सगळीच मजा आठवली. दरवर्षी जून महिना आला, की ते सगळं आठवतच म्हणा.
आता २०११ वाल्या आम्ही दोघी, २०१३ च्या पहिल्या बॅचची एक मैत्रीण आणि २०१४ चे तुम्ही दोघे, असं एक गटग करायला पाहिजे. बाय द वे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अर्ज सह्या करून देणे, हीसुद्धा एक प्रथाच आहे बरं का! आम्हीपण दिल्या होत्या. त्या एका डॉक्टर मॅडम घेतात ना?
पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत.
मस्त . पहिलाच फोटो जबदरस्त
मस्त . पहिलाच फोटो जबदरस्त आहे!
मला बॉ या भागात फार जास्त इन्टरेस्ट वाटला -- ..... "दरम्यान केदारच्या कुठल्यातरी बोलण्याने टोपीवाल्याच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांची जरा बाचाबाची झाली. नंतर टोपीवाला पूर्ण प्रवासभर केदारवर आणि मी केदारचा मित्र म्हणून माझ्यावरही खार खाऊन होता! " ...... (अजून लिही यावर )
भारी लिहिलं आहेस पराग..
भारी लिहिलं आहेस पराग.. सहप्रवाश्यांची ओळख फारच छान करून दिलीस!
असेच मोठे मोठे लेख लिहित रहा.. वाचताना फार मजा येते आहे आणि पुढे काय काय झालं ह्याची उत्सुकता लागली आहे.
अरे सही सुरूवात झाली आहे
अरे सही सुरूवात झाली आहे मालिकेची. मजा येतेय वाचायला.
"दरम्यान केदारच्या कुठल्यातरी
"दरम्यान केदारच्या कुठल्यातरी बोलण्याने टोपीवाल्याच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांची जरा बाचाबाची झाली. नंतर टोपीवाला पूर्ण प्रवासभर केदारवर आणि मी केदारचा मित्र म्हणून माझ्यावरही खार खाऊन होता! " ...... (अजून लिही याव >>
मै,
फार काही नाही स्पष्टवक्तेपणा नडतो.
त्या SBI मध्ये ( जी ८ मजल्याची प्रचंड मोठी शाखा होती) हे सगळे यात्री लोकं घुसले. (टिपिकल इंडियन स्टाईल मध्ये - बस मधून तिकडेच पळत) आणि हम यात्री है, हम यात्री है, असे म्हणू लागले.
मग मी म्हणालो, हम यात्री है असे म्हणून त्यांना काय कळणार? त्याने होत नाही तर बँकेत फॉरेक्स कुठे आहे असा प्रश्न हवा. मी विचारतो तो प्रश्न. असे म्हणून विचारला आणि फोरेक्सचा पत्ता कळाला. ज्याला म्हणालो त्याला काही वाटले नाही पण हा बद्धकोष्ठी चिडला, आणि इंग्रजीतून म्हणाला, " you need not insult anybody, just because you want"
तर मी फ्लॅटच, ह्यात कुणाला कुठे इन्सल्ट दिसला ते तोच जाणे.
मी उगाच गडबड नको म्हणून सोडून दिले आणि ठिक आहे असे बोललो. शेवटी इथे कोणी भांडणे करायला येत नाही असा माझा समज होता.
खरी गडबड इथे नव्हती, तर ती काल झाली होती. ती काय?
तर मी फायनान्स कमिटीत हेड करणार होतो, माझ्याकडे पैसे जमा करायचे ठरले. तर ३००० रू प्रत्येकी द्पयायचे होते, तिथली गंमत मी पुढे लिहिन, पण काही लोकांना ( बद्धकोष्ठीच्या बहिणीच्या काही मैत्रीनींना ते पैसे ३००० न देता २००० च द्यायचे होते, आणि मी ३००० घेणार असल्यामुळे त्यांना असे वाटले की काही मेंबर त्यांच्यावर बळजबरी करत आहेत. इनफॅक्ट काही लोकं ५००० घ्या म्हणत असताना, मी ३००० च ठरवले होते. ते बहुदा त्याचा मनात असणार.
आणि नेमके परागही त्याला लागेल असे पुढे बोलला. त्यामुळे तो शत्रूपक्षातच गेला. त्याचा दुसराही एक किस्सा पुढे घडला, तो मी लिहिण. तेंव्हा मी चांगलाच फैलावर घेतला. (तो किस्सा पर्सनल नव्हता)
मस्त लिहीलयस
मस्त लिहीलयस
हम यात्री है, हम यात्री है,
हम यात्री है, हम यात्री है, असे म्हणू लागले. >> भारी प्रकार आहे !! नमुने एकेक !!
यात्री है, हम यात्री है,
यात्री है, हम यात्री है,
बरं, यात्री हैं तर त्याचं बँकवाल्यांनी काय करायचं? काय विचित्रपणा!
आता किस्से रसाळ होत चालले आहेत. ़ केदार, लवकर लिही लेख.
Pages