वालाचे बिरडे (सीकेपी पद्धत)

Submitted by अवल on 9 August, 2014 - 13:38
walache birade
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भिजवून मोड आलेले वाल सोलून एक वाटी

ओले खोबरे अर्धा वाटी

लसूण 7-8पाकळ्या

हिरवी मिरची एक

1कांदा बारीक चिरून

गूळ आवडीनुसार

2 अमसुलं

जिरेधणे पूड

हिंग, कढिपत्ता, हळद, तिखट, मीठ, तेल, मीठ, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

प्रथम ओलं खोबरं, मिरची, लसूण एकत्र वाटून घ्यावे.
पसरट भांडयात तेल तापवत ठेवावे, त्यात हिंग, कढिपत्ता टाकावा. लगेच चिरलेला कांदा टाकावा, लगेच वाल टाकावेत. त्यावर हळद, तिखट टाकून पाच सात मिनिटं सगळे परतावे. मग जिरेधणे पूड टाकून पुन्हा परतावे. आता त्यात वाल भिजतील इतके पाणी टाकून छान उकळू दयावे. आता आच बारीक करून झाकण ठेवावे. वाल शिजले की त्यात वाटण, अमसुलं, गुळ, मीठ, कोथिंबीर टाकावी. छान उकळी आली की झाकण ठेउन मंद आचेवर पाच मिनिटं ठेवावे. नंतर आच बंद करावी.

IMG_20140809_225518.jpg

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरावे
अधिक टिपा: 

रंगासाठी फोडणीत थोडे तिखट घालावे. गुळ घातल्यावर वाल थोडे आक्रसतात. तेव्हा वाल नीट शिजल्यानंतरच गूळ, मीठ घालावे.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा ! फोटो तोंपासू आहे .
वाल म्हणजे फेवरेट आहेत . आख्खी कढई संपवू शकेन . सोबत तांदूळाचि भाकरी !!!

अहाहा !

फर्मास पाककृती! शेवटचा फोटो तर क्लासच.

अवांतर - अलीकडेच पाहिलेला हा व्हिडिओ आठवला. 'विवा पश्चिमा'तल्या सीकेपी फेस्टिवलमध्ये चक्क मोहरी घालून केलेल्या वालाच्या बिरड्याचा किस्सा टिपिकल कणेकरी शैलीत Happy -

https://www.facebook.com/photo.php?v=292893360889429&set=vb.168057540039...

बिरडे = मोड आलेली / भिजवलेली धान्ये.
वालाच्या धान्यालाही बिरडं म्हणतात.

या धान्यांच्या उसळीलाच नंतर 'बिरडे' असं म्हटलं जाऊ लागलं.

सीकेपी लोकांच्यात धान्याच्या उसळीला उसळच म्हणतात. धान्य भिजवून, मोड आणून, त्याची सालं काढून, वाटण घालून केलेल्या रश्याला "बिरडं"म्हणतात. म्हणूनच नावात सीकेपी पद्धत असं मुद्दाहून लिहिलय.

आमच्याकडे डाळींब्या म्हणतात.

अवल माझी पद्धत पण थोडीफार अशीच आहे पण मी कांदा नाही घालत. जिरे-धने पुडऐवजी आमचा गोडा मसाला घालते. पण सी.के.पी पद्धती माहीत आहेत बर्‍याचशा कारण शेजारी दोन सी.के.पी रहायचे आणि माझ्या चुलतबहीणीचा नवरा पण सी.के.पी. आहे.

फोटो कातील, अशी उचलून खावीशी वाटते डाळींब्यांची उसळ (वालाचे बिरडं).

>>> प्रत्येक मूग सोललेलाच असला पाहिजे. बिरड्यात साल तरंगताना दिसले तर आमची सी. के. पी. जात बुडते
--- हा हा, अगदी अगदी! मूग गिळून बसण्याऐवजी 'सोल' सर्चिंग करणे कधीही श्रेयस्कर Wink

मुगाचं बिरडं शेजारच्या सबनीस काकु करायच्या पण मुग सोलणं डाळिंब्या सोलण्यापेक्षापण किचकट काम.

सी.के.पी. लोकांचे कानवले आणि निनावं पण फेमस आहे.

वा ! अगदी घरचं बिरडं दिसतंय वालाचं.

मी एकच गोष्ट वेगळी करते, आमसुलाऐवजी चिंचेचा कोळ किंवा सिझनमध्ये कैरी घलते.

- एक सी. के. पी.

Pages