चना मदरा

Submitted by चिनूक्स on 4 August, 2014 - 01:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१. भिजवलेले छोले - दोन कप
२. सुगंधी तांदूळ - सहा मोठे चमचे
३. फेटलेलं दही - एक कप
४. लवंगा - चार
५. मोठी वेलची - दोन
६. लहान वेलची - चार
७. दालचिनी - एक लहान तुकडा
८. काळी मिरी - पाव लहान चमचा
९. हिंग
१०. हळद - पाव चमचा
११. जिरं - अर्धा चमचा
१२. धणेपूड - एक लहान चमचा
१३. लाल तिखट - अर्धा चमचा
१४. तेल
१५. तूप - एक मोठा चमचा
१६. मीठ
१७. साखर - अर्धा चमचा
१८. पाणी

क्रमवार पाककृती: 

१. रात्रभर पाण्यात भिजवलेले छोले एक चमचा मिठासह प्रेशर कुकरात तीन-चार शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावेत.
२. तांदूळ आणि लहान वेलचीचे दाणे जेमतेम बुडतील एवढ्या पाण्यात तासभर भिजवून ठेवावेत. मग त्यांचं अगदी बारीक वाटण करावं.
३. लहान कढईत (तेल न घालता) एका मोठ्या वेलचीचे दाणे, एक अख्खी मोठी वेलची, काळी मिरी, दालचिनी, लवंगा भाजावेत आणि त्यांची बारीक पूड करावी.
४. एका कढईत तेल तापलं की त्यात हिंग घालावं. नंतर मसाल्याची पूड घालून चांगलं परतावं.
५. मसाल्याचा घमघमाट सुटला की त्यात जिरं घालावं.
६. जिरं तडतडलं की हळद आणि धणेपूड घालावेत.
७. नंतर या फोडणीत शिजवलेले छोले घालून पाच मिनिटं परतावं. नंतर तिखट घालावं.
८. मिश्रण एकजीव झालं की त्यात फेटलेलं दही घालावं, आणि मंद आचेवर दहा मिनिटं सतत ढवळत राहावं. दही फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.
९. गरज वाटल्यास थोडं पाणी घालावं.
१०.एक उकळी आली की त्यात तांदळाचं वाटण, मीठ आणि साखर हे जिन्नस घालावेत.
११. दहा-पंधरा मिनिटं कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.
१२. सरतेशेवटी चमचाभर तूप वरून घालावं.

चना मदरा तयार.

वाढणी/प्रमाण: 
चार माणसांसाठी
अधिक टिपा: 

हा पदार्थ भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खाता येतो.
तिखट, मसाले यांचं प्रमाण आवडीनुसार कमीजास्त करता येतं.
मीठ घालताना छोले शिजवतानाही मीठ घातलं आहे, हे लक्षात असू द्यावं.
दही आंबट नसल्यास साखर घातली नाही तरी चालेल.
लग्नात या पदार्थात काजू-किसमिसही घालतात.
या पदार्थाची चव सौम्य असते.
फारफार वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशातल्या चंब्याच्या खोर्‍यात भटकत असताना एका हिमाचली लग्नात उपस्थित राहण्याचा योग आला. आमच्या ड्रायव्हराच्या कुठल्याश्या दूरच्या नातलगाचं लग्न होतं, आणि मग त्याच्याबरोबर आम्हीही चंब्याजवळच्या त्या खेड्यात गेलो. लग्नातल्या किंवा सणासमारंभाच्या सामूहिक हिमाचली जेवणाला 'धाम' असं म्हणतात. चना मदरा, (चने का / आलू का / कद्दू का) खट्टा, मुंगौडी सब्जी, आलू पालडा, माल पुडा, मोटी सेवैयाँ, मीठे चावल, साबूत माह, दाल माहनी, राजमा, कढी असे अनेक पदार्थ या धामात असतात. तर, त्या लग्नातल्या स्वयंपाक्यानं दिलेली ही पाककृती.

माहितीचा स्रोत: 
हिमाचली लग्नातल्या स्वयंपाक्यानं दिलेली पाककृती.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

o wow!! mastay recipe
wil definitely taste during my visit to Dharamshala in Oct.

तसंच होणार आहे. कारण छोले शिजल्यावर, तांदूळ भिजत पडल्यावर मग मला दही घरात उपलब्धच नसल्याचा शोध लागलेला आहे Proud

अगोने टाकलेला फोटो एकदम भारी.
इंटरेस्टिंग रेसिपी रे चिन्मय. माझ्यासारखीलाही जमण्यासारखे वाटतेय.

अल्पना, तुझ्याकडून इतर रेसिपीजची वाट बघते.

रच्याकने आपल्याकडेही अनेक पातळभाज्यांमधे मिळून येण्यासाठी तांदळाची कणी वापरतात. अंबाडीच्या पालेभाजीत विशेषत:...

आमची जरा कथाच झाली.
छोले आयते शिजवलेले होते म्हणुन हे केले. कन्येने पहिला घास खाल्यावर जाहीर केले, आवडले नाही. म्हटले, का गं? तर म्हणे, शिर्‍यात घालतेस तो घटक यात घातलेला आहे आणि मला तो आवडत नाही. म्हणुन मी खाऊन पाहिले तर वेलचीचा स्वाद! आणि मीठ कमी. त्यामुळे तिचे म्हणणे तसे बरोबर होते. मग जरा मीठ घालुन पुन्हा नीट केले व दिले तर ती मदरा सोडुन दुसरे काहीच खाईना. पुन्हा दे पुन्हा दे सुरु केले. Happy .. मदरा जरा जास्तच झाला होते म्हणुन उरलेला चेचला व संध्याकाळी रवा व कोथिंबीर घालुन दोसे केले.
अशी ही कहाणी सुफल झाली.

तिथे चंबाला गेल्याशिवाय आता पानिपत होणार नाही .असेच न ढवळलेले पदार्थ हवेत .पंजाबीच्या नावाने कांद्याचे गरम मसाल्याचे फदफदे करतात .कोणतीही भाजी उसळ असो चव आणि वास/दर्प एकच भुसका कांद्याचा . मोदकात आणि पुरणपोळीत कांदा घातला नाही तरी खूप झाले .असो .प्रामाणिक आणि सोवळया चना मदराबद्दल धन्यवाद .अल्पना + .

सुनिधी. एकदमच रोमांचकरी वळण घेतले ... मदरा ते डोसा.
हा प्रवास मदराचा खूपच आवडला.
मायबोलीची कमाल!
जोक्स अपार्ट, नक्की डोसा कसा केला छोल्याचा?

छोटेछोटे प्रवास कधीक्धी रोमांचकारी असतात खरे.

मदर्‍यात तांदळाचे पीठ तर होतेच. त्यामुळे थोडासा जाडसर रस होता. मग छोले अजुन ठेचले, साधारण पाऊण कप रवा घातला. मीठ, धनेजीरे पावडर, तिखट, बारीक चिरलेली भरपुर कोथिंबीर घातली. मग कंटाळा आला म्हणुन अजुन जिन्नस घालायचे थांबवले Happy व नेहमीच्या दोशापेक्षा जरा जाडसर मिश्रण करुन किंचीत जाडसरच दोसे काढले, धीरड्यापेक्षा पातळ.
त्यानंतर त्याबरोबर खायला कोणती चटणी हा भलामोट्ठा प्रश्न उभा राहिला तेव्हा नेटवर कोबीच्या चटणीची एक चांगली पाककृती सापडली ती केली व शेवटी... अर्थाताच खाल्ले. Happy

Pages