१० वी 'क' - भाग ३

Submitted by किसन शिंदे on 27 July, 2014 - 06:48

१० वी 'क' - भाग १

१० वी 'क' - भाग २

शाळेत जावं की नाही या विचारात असतानाच आईसाहेबांनी फर्मावलं "सच्चू, आज शाळेत जायचंय रे. आज कंटाळा करशील तर संपूर्ण वर्षभर दांड्याच मारत राहशील." आता मातोश्रींचा हुकूम मोडणं तर शक्यच नव्हतं. पहिलाच दिवस असल्यामूळे वर्गशिक्षक नेमण्यात, मुला-मुलींची ओळख करून घेण्यात आणि सर्व विषयांचं दिवसाचं आणि आठवड्याभराचं वेळापत्रक ठरवण्यातच दिवस जायचा म्हणून मग मराठी, हिंदी या दोन पुस्तकांसोबत एक वही दप्तरात टाकली आणि पाल्याच्या घरी निघालो.

माझी शाळा मोतीलाल हरगोविंददास म्हणजेच मो.ह.विद्यालय! विंग्रजीत एम.एच.हायस्कूल.! या इंग्रजीतल्या एम्.एच मुळे बराच घोळ होतो, कारण न्यु इंग्लिशची पोरं आमच्या शाळेतल्या पोरांना एम्.एचची म्हणजेच मेंटल हॉस्पीटलची पोरं म्हणून चिडवतात. त्यावरून त्यांच्या आणि आमच्या शाळेतल्या पोरांमध्ये बर्याच वेळा मारामारीही झालेय. कधीकधी दादाही मला मेंटल हॉस्पीटलचा पोरगा म्हणून चिडवतो मग मी त्याच्या अंगावर धावून जातो.

इंग्रजीतल्या 'एल' अक्षरासारख्या दिसणार्या आमच्या शाळेला एकूण तीन मजले आहेत. प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर समोरच विद्येची देवता असलेल्या सरस्वतीची गोजिरी मुर्ती काचेच्या पेटीत ठेवलेली दिसते. परिक्षेच्या दिवसात आणि असंच मध्ये कधी कधी आम्ही त्या मुर्तीच्या पाया पडूनच पुढे वर्गात जातो. खाली तळघरात मोठ्ठं ग्रंथालय आहे. ग्रंथालय फक्त नावालाच असावं कारण त्यातली पुस्तकं एखाद्याला दिलेली मी तरी कधीच पाहिली नाहीत. पहिली ते सातवीचे सगळे वर्ग सकाळच्या शाळेत भरतात. आणि आठवी ते दहावीवाल्यांसाठी शाळा दुपारच्या वेळेत भरते. सकाळची शाळा १२ ला सुटल्यानंतर १२.३० वाजता आमच्या दुपारच्या शाळेचे टोल पडतात. बाहेरून, रस्त्यावरून पाहिल्यावर दिसत नाही पण आतल्या बाजूस खेळण्यासाठी एक बर्यापैकी मैदानही आहे. शाळेसमोरच प्रभात नावाचं मराठी चित्रपटांचं एक टॉकीज आहे. नावाला फक्त मराठी चित्रपटांचं असावं कारण तिथे मराठी सिनेमे लागलेले तर मी कधीच पाहिले नाहीत. तिथे नेहमी त्या पडेल मिथूनचे महापडेल सिनेमे लागलेले असतात. त्यांची नावंही एकदम भयानक 'आग ही आग', चंडाल, यमराज! कधी कधी मॉर्निंग शो ला 'तसले' सिनेमेही दाखवतात. आम्ही त्या पोस्टरकडे पाहून एकमेकांना डोळे मारत हसतो. उतावळा बापलेकर एकदा पाहून आला होता तो सकाळचा शो, मग नंतर दिवसभर त्यानं माझं नि पाल्याचं डोकं खराब केलं होतं.

प्रभातच्या पलिकडे फक्त मुलींसाठी असणारी कन्या शाळा आहे. आयला! हे लय भारीय. फक्त पोरींसाठी शाळा. एकपण पोरगा नाही. मुख्यध्यापकापासून ते शिपाईपर्यंत तिथे सगळ्या बायकाच असाव्यात कदाचित. आमच्या शाळेत ज्यु.कॉलेज पण आहे तिथल्या काही पोरांचे 'माल' कन्या शाळेत आहेत. सफेद शर्ट आणि काळी पॅंट अशा वेटरच्या वेशातले आमच्या ज्यु. कॉलेजचे मजनू आणि कन्या शाळेतल्या लैला हातात हात घालून रस्त्याने बर्याच वेळा एकत्र जाताना दिसतात. मला आणि पाल्याला ह्या असल्या गोष्टी खुप कमी माहित आहेत. मात्र बापलेकरला अशा बर्याच पोरांच्या भानगडी माहित आहेत ज्यामुळे आमचे 'सामान्य ज्ञान' खुप वाढलेय. कुठला मुलगा कोणत्या पोरीसोबत कुठे पिच्चर बघायला जाणारेय हे त्याला बरोब्बर माहित असतं.वासकाढ्या आहे एक नंबरचा. ते दादर का फादर काहितरी आहे खुप लांब. तिथूनही बरीचशी पोरं आमच्या शाळेत येतात.

शाळेच्या डाव्या बाजुला प्रचंड मोठ्ठा तलाव आणि मागच्या बाजूला एक मशीद आणि कब्रिस्तान आहे. मशिदीच्या बाजूला आईने मनाई केलीय त्यामुळे आम्ही सहसा तिकडे फिरकत नाही. घरातून शाळेकडे यायचा रस्ता तलावाच्या बाजूनेच येतो. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जायला आम्ही हटकून तलावाच्या बाजूचा रस्ता पकडतो. जाम मजा असते. तलावाच्या काठावर बरीचशी पोरं-पोरी प्रेमाचे चाळे करत बसलेली असतात. ह्याचा हात तिच्या गळ्यात आणि तिचे हात ह्याच्या कंबरेभोवती. दोघांच्या मधून मुंगीही जावू शकणार नाही इतके चिटकलेले.

दादूचंही कॉलेज दुपारचं असतं म्हणून मग बॅग गळ्यात अडकवत त्याने कॉलेजला जाण्यास सायकल बाहेर काढली.
"सच्चू, चल सोडतो तुला." निघता निघता मला म्हणाला. नको म्हटलं. जाता जाता मध्येच चिडवायला सुरूवात केली तर. शाळा साडेबाराची होती पण अर्धा तास लवकर जावं म्हणून साडेअकरालाच घरातून बाहेर पडलो. पाल्याच्या घरी पोहचलो तेव्हा तो ही सगळं आवरून शाळेतच निघाला होता. बापलेकरचा, साल्याचा अजूनही पत्ता नव्हता. कुठे तडमडला होता देव जाणे. घरापासून थोडं पुढे गेल्यानंतर एक बरंच मोठं आब्यांच झाड आहे. एकदम डेरेदार! ते ठिकाण म्हणजे आमची हक्काची थांबण्याची जागा. आमचा अड्डा.! झाडाखाली जावून थांबलो. शाळा भरायला तसा १०-१५ मिनिटांचा अवधी होता. मग निवांत बसलो. वर्गात कोणता बेंच पकडायचा ते कोणती पोरं-पोरी वर्गात असतील इथपासून ते वर्गशिक्षक म्हणून कोणी याव ते कोणते विषय कोणी शिकवावेत इथपर्यंत बर्याच प्रश्नांवर मी आणि पाल्याने चर्चा केली. वर्गशिक्षक म्हणून महाजन बाई किंवा दळवी बाई याव्यात यावर आमचं एकमत होतं. पण पुन्हा सुर्यवंशी सरच यावेत कि पाटील सर यावेत यावर मात्र आमच्यात मतभेद झाले. टोल पडण्याआधीच शाळेत पोहचलं पाहिजे या विचाराने ती चर्चा मग तिथेच थांबवून आम्ही पळत पळत बारा पंचवीसला शाळेत पोहचलो.

पहिलाच दिवस असल्याने बरीचशी पोरं शाळेत आली नव्हती. काही मोजकेच विद्यार्थी दिसत होते. वर्गातलं कोणी दिसतंय का, या आशेने आम्ही सगळीकडे नजर फिरवली. मग साळुंखे, केदारी, हरेकर, कदम हि सगळी मध्यम हुशार कॅटेगरीतली पोरं जिन्यात उभी दिसली. आमचा वर्ग दुसर्या मजल्यावर होता.

टण..टण्..टण्..टण्..टण..टण..

टोल पडल्यानंतर संथपणे चालत आम्ही आमच्या वर्गात जाऊन बसलो. आमच्या सोबत ९ वी 'क' मध्ये असणारे काही ओळखीचे चेहरे, ९ वी 'ब' आणि ९ वी 'ड' मधून आलेले काही अनोळखी चेहरे यांनी सगळा वर्ग भरून गेला. वर्गात प्रवेश करण्यासाठी डाव्या बाजुला एक दरवाजा आहे त्यासमोरच्या दोन ओळींमध्ये मुलींचे बेंच होते आणि त्यापलीकडच्या दोन ओळी मुलांच्या बेंचच्या होत्या. फळ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक बेंच होता. त्यातला मुलांच्या बाजुला ठेवलेला बेंच पटकवायचा हे मी आणि पाल्याने आधीच ठरवून टाकलं होतं. वर्गातली वर्षभर बसण्याची एखागी फिक्स जागा मिळवायची असेल तर पहिल्याच दिवशी शाळेत येण्याला पर्याय नसतो हे आम्हाला आधीच माहित होतं.

प्रार्थनेचे टोल पडले. 'या कुन्देन्दू तुषार हार धवला' सरस्वती स्तवन सुरू झालं आणि बेंचमध्येच आम्ही उठून उभं राहिलो. मग वंदे मातरम झालं. वर्गशिक्षक म्हणून अजूनही कोणी आलं नव्हतं त्यामुळे वर्गात नुसता गोधंळ सुरू होता. पाच-दहा मिनिटांनी इंगळे बाईंनी घाईघाईत वर्गात प्रवेश केला.

"गुड आफ्टनून मॅडम!" आफ्टरनून मधला 'र' मधल्या मध्ये खात सगळा वर्ग गडबडीत उठून उभा राहिला.

"अं...हं. बसा बसा."

"मी तुमची वर्गशिक्षिका म्हणून आलेय, तुम्हाला इतिहास शिकवणार." इंगळे बाईंनी असं म्हणतात वर्गातल्या

बर्‍याच जणांच्या कपाळावर एक सुक्ष्म आठी पडल्याचं मला दिसलं. त्याला कारणही तसंच होतं. हि इंगळी एक नंबरची मारकुटी बाई होती. हिच्या इंगळीचा ज्याला ज्याला डंख होई तो दुसर्‍या दिवशी हमखास गैरहजर राहत असे. ऐला!! गेलाबाजार ठोंबरे बाई किंवा जाधव बाईसुध्दा चालल्या असत्या. हि नसती ब्याद उगाच आमच्या वर्गाला आली. माझ्यासोबत वर्गातल्या प्रत्येकाच्या मनात हेच विचार आले असणार.

"चला. प्रत्येकाने आपापली नाव सांगा बर." इंगळी आल्या आल्याच सुरू झाली.

पहिली सुरूवात मुलींकडूनच झाली. सुरूवातीच्या आठ-नऊ मुलींनी नावं सांगितली असतील तोच मराठीचं पुस्तकं हातात घेतलेल्या ठोंबरे बाईंनी अचानक वर्गात अवतरल्या.

"अहो इंगळे मॅडम हा माझा वर्ग आहे, १० वी 'क'!"

"अहो पण हा १० वी 'ब' आहे ना?" इंगळी गोंधळली. १० वी ब मध्ये जायच्या एवजी इंगळे बाई चुकून आमच्या वर्गात आल्या होत्या. आता वर्गातल्याही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी आशेची पालवी फुटू लागली.

"नाही हो बाई. हा १० वी 'क' चा वर्ग आहे." सारा वर्ग एकसुरात ओरडला.

"ओह. सॉरी हं." ठोंबरे बाईंची माफी मागत इंगळे बाई निघून गेल्या.

वर्गातल्या तणावपुर्ण चेहर्‍यांची जागा आता खेळकर हसर्‍या चेहर्‍यांनी घेतली. इंगळे बाई गेल्याचा जवळ जवळ प्रत्येकालाच आनंद झाला होता. आता परत एकदा 'गुड आफ्टरनून मॅडम' झालं. ठोंबरे बाई पाच मिनिटं जरा निवांत बसल्या मग डोळा मिचकावत म्हणाल्या "वैतागला होतात ना, इंगळे बाईंना पाहून?"

सारा वर्ग हसला.

पुन्हा एकदा ओळख परेड सुरू झाली. प्रत्येक जण उठून आपलं नाव आणि आधीची तुकडी सांगू लागला.

"मे आय कम इन मॅडम?" दरवाज्यातून एक मुलगी अतिशय मधाळ आवाजात विचारत होती. माझं लक्ष मराठीच्या पुस्तकात गुंतलं होतं. इतका गोड आवाज कानावर पडल्यानंतर मी चमकून वर पाहिलं.

"मी आकांक्षा कुलकर्णी.! घरातून निघायला थोडा उशीर झाला." शाळेत यायला उशीर झाल्याने थोडसं ओशाळतच तिने आपली ओळख करून दिली.

पोटात गपकन खड्डा पडला तिला पाहिल्यानंतर. सर्वांगातून एक गोड कळ झिणझिण्या मारत मेंदूपर्यंत पोहचली. ह्रदयाचे ठोके एकदम जलद गतीने वाढू लागले होते. वर्गातल्या बाकीच्या मुलांचा एकदम विसर पडला.

ऐ काश के अब होश में हम आने ना पाऐ......

क्रमशः

(पूर्वप्रकाशित)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१

>>>पहिल्यापासुन वाचावी लागली, मस्त फ्लो आहे, कथा नक्की पुर्ण करा.

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

छान! लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. मी हि होतो मो. ह विद्यालय मध्ये आपल्या ग्रंथालय व प्रयोग शाळेचा उल्लेख नाही केलात. छान चालली आहे कथा keep it up, but fast.