कोकणकडा चढाई- सह्याद्रीने प्रसवलेलं रौद्रभीषण सौंदर्य
पच्छिम घाटाचा विस्तार महाराष्ट्राच्या उत्तरेपासून थेट केरळ पर्यंत पसरलेला. त्यात कर्नाटक आणि केरळ मधील भाग हिरवाईने नटलेला, याउलट महाराष्ट्रातला सह्याद्री मात्र खडकाळ रांगडेपणाच काळकभिन्न सौंदर्य मिरवतोय. आपल्या इतिहासाशी जवळीक साधणाऱ्या सह्यकड्याने हजारो वर्ष उन-पावसाच्या अभिषेकात कितीतरी प्रसव वेदना सहन करून अनघड सुळके आणि उंचच उंच कातळ भिंतींची रचना केली आहे.
सह्याद्रीतील अशाच डोंगररांगेपैकी एक माळशेज घाट परिसर आणि दुर्गवेड्यांचा सखा हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडावर सह्याद्रीचा मालक देवाधिदेव शंभूमहादेवाच दर्शन घेतल्यावर पाय आपोआप कोकणकड्याच्या दिशेने वळतात. कोकणकड्यावर लोटांगण घालून याची रौद्रता डोळ्यात साठवण्यासाठी तर झुंबड उडते. त्याची खोल भीषणता पाहून त्यातीलच काही जणांच्या मुठीची घट्ट पकड सोबतच्या संवंगड्यांच्या मनगटावर आवळली जाते. इथून दरी इतकी खोल आणि भयाण असूनही आपल्या डोळ्यात मात्र त्याच फक्त सौंदर्यच भरत. याची संपूर्ण छबी डोळ्यात साठवण्यासाठी माळशेज घाटाच्या पायथ्याखालील तळ कोकणातलं बेलपाडा गाव गाठायचं आणि रोहिदासच्या शिखरापासून ते नळीच्या वाटेपर्यंत दीड ते दोन किलोमीटरचा विस्तार असलेल्या संपूर्ण कोकणकड्याला आपल्या डोळ्यात साठवायचं.
प्रचि १
From Kokankada 2006
प्रस्तरारोहकांच्या कितीतरी पिढ्या याच्यावर चढाई करण्याच स्वप्न बाळगून असतात, पण यशस्वी झालेल्यांपेक्षा अयशस्वी मोहिमांचीच संख्या जास्त आहे. अयशस्वी झालात तरी हरकत नाही, कारण यावर चढाई करण्याचा प्रयत्नसुद्धा प्रशंसेस प्राप्त आहे. कोकणकड्यावर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला हवी कणखर सवंगड्यांची साथ आणि अनुभवी संघ.
महाराष्ट्रात १९८३ साली प्रथमच कृत्रिम चढाईच तंत्र (खिळे-बोल्ट) गिर्यारोहकांना अवगत झाल आणि ठाणे येथील चारूहास जोशी यांच्या गिरीविहार संस्थेने प्रथमच कृत्रिम चढाईच तंत्र वापरून जीवधनची वानरलिंगी सर केली. त्यानंतर असंख्य सुळक्यांच्या वाटा खुल्या होत गेल्या. पण कोकणकडा अजूनही आव्हानच ठरलेला. १९८५ मध्ये आयआयटी- मुंबईच्या गिर्यारोहकांनी वसंत लिमयेच्या नेतृत्वाखाली प्रथमच कोकणकडा सर केला. त्यांनी सुरुवात तर मध्यावरून केली होती पण पुढे डावीकडे सरकत ते मध्यावरून खूप दूरवरून कोकणकड्याच्या माथ्यावर पोहोचले. अद्यापही कोकणकड्याची मध्यवर्ती चढाई अभेद्यच होती. पण तत्कालीन मर्यादित उपलब्ध साहित्याच्या सहाय्याने यावर चढाई करण्याचा नुसता प्रयत्नसुद्धा कौतुकास पात्र आहे.
पण कोकणकड्यालासुद्धा पाझर फुटला आणि १९८७ मध्ये मिलिंद पाठक यांच्या नेतृत्वाखाली 'समिट हायकर्स' आणि 'पुणे व्हेंचर्स' या मुंबई पुण्याच्या दोन संस्थांनी मिळून याच्या मध्यावरून कोकणकड्यावर विजय मिळवला आणि खऱ्या अर्थाने कोकणकडा पादाक्रांत झाला. “किरण, तुमच्यासारखी क्लाईम्बिंग टीम नसल्याने कड्यावरचा २-२ रुफ (दगडी छत) असलेला भाग मला सोडून द्यावा लागला” अशी खंत मिलिंद पाठक यांनी किरण अडफडकरांकडे एका भेटी दरम्यान व्यक्त केली होती. यावरून कोकणकड्याची भव्यता आणि अवघडपणा लक्षात यावा.
मर्यादित साहित्य आणि प्रवासाची मर्यादित साधनं, यामुळे त्यांना जवळपास साडेतीन महिन्यांचा काळ लागला. यानंतर याच मार्गावरून उपलब्ध खिळ्यांच्या सहाय्याने कोकणकडा सर करण्यासाठी प्रस्तारारोह्कांची रीघ लागली. पण त्यात अयशस्वी प्रस्तारारोह्कांचीच संख्या जास्त होती. त्यानंतरही कोकणकड्यावर खूप दुर्दैवी घटना घडत होत्या. एका संस्थेने आयोजित केलेल्या कोकणकडा रॅपलिंग दरम्यान एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली होती. २००४ साली चढाईचा प्रयत्न करताना मार्गातील जुने व कमजोर झालेले खिळे तुटल्यामुळे कल्याणमधील एका संस्थेला दोर आणि मौल्यवान सामान कड्यावरच सोडून यशस्वी माघार घेण्यास भाग पडलं होत. एका वर्षी मोठा शिलाखंड कड्यापासून विलग होऊन खाली कोसळून मार्ग आणखी खडतर बनला होता.
एव्हढ्या मोठ्या संख्येने मोहिमा अयशस्वी झाल्याने आम्हालाही याचे कुतूहल होतेच. २००६ साली गिरीविराजच्या मोहिमेच्या पूर्व तयारी दरम्यान जूनमध्ये याचा मागोवा घेण्याच काम आम्ही केल आणि एव्हढ्या मोठ्या संख्येने मोहिमा का अयशस्वी झाल्या त्याची कारण सुद्धा कळली.
कोकण कड्याच्या प्रत्यक्ष भिंतीची मध्यवर्ती उंची १८०० फुट आहे. सुरुवातीला ३०० फुटी मध्यम कातळ चढाई करावी लागते. त्यापुढे ५०० फुट तिरकस रेषेतील सोपी चढाई आणि त्यापुढे मात्र भयानक परिस्थिती आहे. कोकणकडा कशाशी खातात त्याची प्रचीती इथून यावयास लागते. ३५० फुटांची चढाई अवघड प्रकारातली. इथपर्यंत म्हणजे ११५० फुट उंचीवर पोहोचल्यावर डावीकडे सरकणारी आडव्या रेषेतली लांबलचक अर्धवर्तुळाकर परंतु अतिशय अरुंद लेज आहे, थोडस दुर्लक्षही जिवावर बेतेल. या लेजवरचा सुमारे ६५० फुट कडा हा या मार्गातला मुख्य अडसर. इथून मात्र याची भयानकता आणखी वाढते. तुमच्या शरीराचे हाल व्हायला इथूनच सुरुवात होते. त्यातही सुरूवातीच ३०० फुट अंतर पट्टीच्या प्रस्तरारोहकाला घाम फोडत. इथपर्यंत तो कसाबसा पोहोचेलही पण इथून वरची ३५० फुटी चढाई महाभयंकर. कारण इथून वरचा कडा ओव्हरहेंगच्या रूपाने सुमारे १४० ते १६० अंशाच्या कोनात असा काही बाहेर पडतो कि फक्त पाहतानाही भल्याभल्यांची तारांबळ उडावी. आजवरच्या बहुतेक मोहिमा इथूनच अयशस्वी झाल्या आहेत. या शेवटच्या टप्प्यातील मध्यभागात एकुलती एक ससाण्याची लेज आहे, पण इथेही स्वतःला दोर बांधून सर्व व्यवहार करावे लागतात. त्यामुळे इथे बेसकॅंप स्थापित करता येत नाही आणि सर्व व्यवहार माथ्यावरूनच नियंत्रित करावे लागतात. खाली पहाव तर आपण चढून आलेला रॉकपेंच दिसतच नाही आणि तिरकस ओव्हरहेंगमुळे वरचाही थांगपत्ता लागत नाही.
सुमारे १४-१५ वर्षे सर्व साहसी प्रस्तरारोहक याच मार्गाचा अवलंब करून कोकणकड्यावर झेंडा रोवत होते. आता अखंड कडाच कोसळून खाली पडल्यामुळे, मार्ग आणखी खडतर बनला होता, जवळ जवळ बंदच झाला होता. कोकणकडा परत गिर्यारोहकांची परीक्षा पाहत होता. एकतर जुन्या खिळ्यांच्या जागी नवीन खिळे ठोकणे अथवा नवीन मार्ग शोधणे असे दोनच पर्याय उपलब्ध होते. त्या दृष्टीने मुंबई पुण्याच्या विविध संस्थांनी प्रयत्नसुद्धा केले पण सारे विफल झाले.
नेमक्या अशाच वेळेस गिरीविराज हायकर्सचा (डोंबिवली) पुनर्जन्म झाला होता. किरण सोबतचे सुभाष पंडीयन, संजय लोकरे, सुनील लोकरे, नरेंद्र माळी आदी जुने साथीदार साथीदार निवृत्त झाल्याने जवळपास १० वर्षांचा काळ अज्ञातवासात गेला. २००२ साली संस्थेला परत उर्जितावस्था प्राप्त झाली. किरण अडफडकरांनी आशिष पालांडे, राहुल शिंदे, दिवाकर भाटवडेकर, प्रदीप म्हात्रे, योगेश सदरे आदीं तरुण मंडळींची सक्षम टीम बांधून वजीर, तावली, भैरवगड, बाण, नानाचा अंगठा आदींवर नवीनच मार्गाने चढाई करून भरपूर अनुभव नवीन टीमच्या पाठीशी गोळा केला आणि कोकणकड्याला हात घालण्याचा निर्णय घेण्यात आला, तोही कोणताही गाजावाजा न करता.
त्यासाठी दर शनिवार-रविवार तळोजा येथील पांडवकड्याला भेट देऊन १९८८ साली आम्हीच सर केलेल्या मार्गावर रुफ बोल्टिंग, लॅडर शिफ्टिंगचा कसून सराव करून घेतला. कारण कोकणकड्यावर चढाईसाठी आम्ही सर्वात अवघड मार्ग निवडला होता आणि दोन ठिकाणी १८० अंशाच्या कोनातील दोन दगडी छतांचा समावेश होता.
संस्थेची आर्थिक परिस्थिती तोळामासाच असल्याने सर्व प्रथम पैशांची जमवाजमव करावी लागणार होती. त्यावेळी ठाण्याचे चारुहास जोशी मदतीसाठी आले आणि त्यांच्या 'हिल्स अॅगण्ड ट्रेल्स' या कंपनीच्या वतीने छायाचित्रण आणि चलतचित्रणासाठी आर्थिक खर्चाचा काही भार उचलला. उर्वरित खर्चाची जबाबदारी संस्थेच्याच सभासदांनी विभागून घेतली.
प्रची २
गिरीविराज हाईकर्सने निवडलेला चढाई मार्ग
From Kokankada 2006
२५ ऑक्टोबर, २००६ - हरिश्चंद्रगडाचा पायथा - खिरेश्वर
जवळपास वीस दिवसांचा शिधा, तंबू, स्वतः तयार केलेले २०० एक्स्पान्शन बोल्ट, दोर, इतर चढाई करण्यासाठीचे सामान घेऊन उत्साहाने भरलेली सगळी मंडळी सामानासोबत गडाच्या पायथ्याशी गोळा झाली. सामान खूपच असल्याने गावातील मंडळींकडे मदतीसाठी 'अर्थपूर्ण' विचारणा केली पण ते अवजड सामान पाहून त्यांनी काढता पाय घेतला. शेवटी आम्हीच सामान पाठीवरून वाहुन न्यायाचा निश्चय केला. तोलार खिंडीतून हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारण ४-५ तास लागतात, पण आम्हाला त्या दिवशी मात्र तब्बल ९ तास लागले, यावरून आमच्याकडे असलेल्या सामानाची प्रचीती आली असेल. गडावरील शंभू महादेवच दर्शन घेऊन थेट कोकणकड्याच्या धुंद वातावरणात प्रवेश केला. आता आमच मुख्यालय इथेच असणार होत, अर्थात कॅम्प नं.१. योग्य जागा पाहून साफसफाई करून तंबू ठोकून दिले.
प्रचि ३
From Kokankada 2006
प्रचि ४
From Kokankada 2006
२७ ऑक्टोबर, २००६ (पहिला दिवस):
सकाळी लवकर उठून किरण आणि मंडळी नळीच्या वाटेने कोकणकड्याच्या पायथ्याशी पोहोचले. आज त्यांना इथे कॅम्प नं. २ ची स्थापना करायची होती. कोकणकड्याच्या पायथ्याला जाणारा शॉर्टकट शोधण्याच्या नादात सुर्य कधी डोगरापल्याड गेला ते कळलंच नाही. रात्रीचे अंधारात धडपडण्यापेक्षा नळीच्या वाटेतच उघड्यावर मुक्काम करावा लागला.
२८ ऑक्टोबर, २००६ (दुसरा दिवस)
आज कसेही करून चढाईचा मुहूर्त साधायचा होता. रात्री उघड्यावरच झोपलेलो असल्याने लवकरच जाग आली. पहिल्याच दिवशी वेळापत्रक बिघडण्याची चिन्ह दिसत होती, त्यामुळे धावतपळत तडक कोकणकड्याचा पायथा गाठला. कॅंप नं. २ ची स्थापना करून चढाईसाठी सज्ज होण्यास तरीही दुपारचे बारा वाजलेच. शेवटी आज एवढ्या वर्षांपासून हृदयाशी जपून ठेवलेला क्षण प्रत्यक्षात साकार होणार होता. अपघातविरहीत यशासाठी सह्याद्रीचा धावा केला आणि सुरुवातीला चढाईचा मार्ग सोपा असल्याने नव-प्रशिक्षित मनीष पिंपळे आणि राहुल शिंदेने या महात्वाकांक्षी मोहिमेचा श्रीगणेशा केला. आज प्रत्यक्ष चढाईसाठी वेळ कमी मिळाला. तरीही मिळालेल्या वेळात या दोघांनी सुरुवातीची ३०० फुटी साधारण चढाई पूर्ण करून दोर तिथेच बांधला आणि पुन्हा पायथ्याला कॅंप नं.२ वर परत आले.
प्रचि ५
From Kokankada 2006
प्रचि ६
From Kokankada 2006
२९ ऑक्टोबर, २००६ (तिसरा दिवस)
तिसऱ्या दिवशी दिवाकर भाटवडेकर आणि प्रकाश म्हात्रे यांनी काल चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचून जवळपास ८५० फुट चढाई दिवसभरात केली. यातील सुरुवातीची ५०० फुट चढाई तिरकस रेषेत सोपी होती आणि त्याच्यावरील ३५० फुट चढाई थोडीशी अवघड स्वरूपातील होती. आता आम्ही ११५० फुटी रुंद लेजवर पोहोचलो होतो. खरतर आजच इथे कॅंप नं.३ ची स्थापना करायची होती पण संध्याकाळ झाल्याने परत ११५० फुट खाली पायथ्याला जाण्यास भाग पडले. चढाईचा पहिला टप्पा संपला होता पण कोकणकड्याची खरी लढाई यानंतरच सुरु होणार होती. आता पर्यंतच्या बहुतेक मोहिमा अयशस्वी का झाल्यात त्याची प्रचीती इथूनच येणार होती.
प्रचि ७
From Kokankada 2006
प्रचि ८
From Kokankada 2006
३० ऑक्टोबर, २००६ (चवथा दिवस):
या पुढच्या मोहिमेसाठी पायथ्याला असलेल्या कॅंप नं.२ ची आवश्यकता नसल्याने त्याचा गाशा गुंडाळून प्रकाश आणि मंगेश सदरे नळीच्या वाटेने कोकणकड्यावर परत कॅंप नं.१ वर निघून गेले. तर किरण, दिवाकर, मनीष आणि राहुल काल बांधून ठेवलेल्या दोराच्या साहाय्याने ११५० फुटी लेजवर पोहोचले. त्याच वेळेस पुढच्या मोहिमेची रूपरेषा ठरवण्यासाठी आशिष पालांडे आणि योगेश सदरे यांनी कोकणकड्याच्या माथ्यावरून रॅपलिंग करत ११५० फुटी लेजवर खाली असलेल्या टीमला येऊन सामील झाले. आता पुढच्या चढाईचे नियोजन याच ११५० फुटी लेज वरून होणार होते. तंबूसाठीची जागा हेरून पुन्हा सगळे जण आशिष आणि योगेशने माथ्यावरून आणलेल्या दोरावर झुमारिंग (सुमारे ६५० फुट) करत कोकण कड्याच्या माथ्यावर म्हणजेच कॅंप नं.१ वर आले.
प्रचि ९
From Kokankada 2006
प्रचि १०
From Kokankada 2006
प्रचि ११
From Kokankada 2006
३१ ऑक्टोबर, २००६ (पाचवा दिवस):
अर्धी लढाई जिंकलेली असल्यामुळे उत्साहाच्या भरात पाच जणांची टीम काल बांधून ठेवलेल्या दोराच्या साहाय्याने कोकणकड्याच्या माथ्यावरून रॅपलिंग करत ११५० फुटी लेजवर पोहोचली. या ऐसपैस लेजवर तंबू ठोकण्यासाठी आम्ही कालच जागा हेरून ठेवली होती, त्या जागेवर रात्रीच्या निवासाकरिता २ तंबू ठोकून कॅंप ३ ची स्थापना करण्यात आली. आता कृत्रिम चढाई (अर्थात खिळ्यांच्या मदतीने) सुरु होणार होती आणि आमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणार होती. दरम्यान जेवणखाण आणि सामान पुरवठ्यासाठी किरणने एक वेगळा नायलॉनचा दोर (६५० फुट) माथ्यापासून या ११५० फुटी लेजपर्यंत बांधून सप्लाई लाईन फॉर्म केली.
प्रचि १२
From Kokankada 2006
आज प्रदीप म्हात्रेने पायथ्यापासून १२०० फुट उंचीवर मुक्त चढाईचा सुंदर नमुना पेश करत जवळपास २०० फुटांची उंची गाठली. कॅंप ३ अर्थात ११५० फुटी लेजवरच मुक्काम असल्याने किरणने बांधलेल्या दोरावरूनच कॅंप १ वरून टीमसाठी जेवणपाणी पुरविण्यात आल.
प्रचि १३
From Kokankada 2006
प्रचि १४
From Kokankada 2006
०१ नोव्हेंबर, २००६ (सहावा दिवस)
आशिष आणि योगेशने, काल प्रदीपने चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून आरंभ केला. आता मात्र कोकणकडा आपले रंग दाखवायला लागला. दुर्दैवाने त्यांच्या मार्गात अत्यंत ठिसूळ खडक लागल्याने मारलेला खिळा (बोल्ट) केवळ हातानेच हलत होता. तरीही त्यांनी थोडा धोका पत्करून या हलणाऱ्या खिळ्यांच्या सहाय्याने चढाई चालू ठेवली पण अचानक आलेल्या संकटाने भांबावून चढाईचा वेग खूपच मंदावला.
प्रचि १५
From Kokankada 2006
०२ नोव्हेंबर, २००६ (सातवा दिवस):
आज प्रदीप आणि अविन्द्र म्हात्रे त्या ठिसूळ कड्याला भिडले पण त्यांचे सुद्धा ठिसूळ खडकामुळे कालच्यासारखेच हाल झाले. परिस्थिती खूपच कठीण होती. आता मात्र आमचीही इतर मोहिमांसारखीच गत होते कि काय याची शंका यायला लागली. नाईलाजाने प्रदीप आणि अविन्द्र ११५० फुटी लेजवर (कॅंप नं.३) परत आले. २ मौल्यवान दिवस वाया गेले होते, अगदीच आणिबाणीचा प्रसंग उभा ठाकला होता. वॉकीटोकीच्या साहाय्याने आलेल्या प्रसंगाची चर्चा करून किरणने कॅंप १ वरून खाली ११५० फुटी लेजवर (कॅंप ३) वर उतरण्याचा निर्णय घेतला.
प्रचि १६
From Kokankada 2006
०३ नोव्हेंबर, २००६ (आठवा दिवस):
आता अनुभवच कामी येणार होता आणि कॅम्पवर किरण एव्हढा प्रस्तरारोहणाचा अनुभव कोणाच्याच गाठीशी नव्हता. किरणने प्रदीपला सोबत घेतलं आणि त्या ठिसूळ कड्याला सामोरा गेला. प्रदीप साहस एकवटून अर्धवट मारलेल्या खिळ्यावर लटकून किरणला बिले देत होता. ठोकलेल्या खिळ्यावर भरोसा ठेवण्यासारखा नव्हताच, कुठल्याही क्षणी ते बाहेर येउन खाली पडण्याचीच भीती अधिक होती. ठोकलेला खिळा भसकन भिंतीच्या आत जात होता. शेवटी किरणने नवीनच युक्ती वापरली. भिंतीमध्ये छिंद्र करण्यासाठी जो पंच वापरतात, तो पंचच त्या ठिसूळ खडकात पूर्ण ठोकायचा आणि प्रदीपला सावध रहायला सांगून त्या हलत असलेल्या पंचच्या आधाराने वर सरकायचा. असे करत करत त्याने एव्हढ्या वर्षांच्या अनुभवातून कमवलेल्या शिदोरीवर दिवसभरात त्या ठिसूळ कड्यावर मात करत पालीची लेज गाठली (पालीच्या आकाराचा खडक). मग तिथेच दोर बांधून तो परत खाली ११५० फुटी लेज वर रात्रीच्या मुक्कामासाठी उतरला. ठिसूळ पॅचवर मात केल्यामुळे रात्री कॅम्पवर उत्साहाचे वातावरण होते. पण त्या उत्साहावर विरजण घालण्यासाठी परतीच्या पावसाने आपली हजेरी लावली. संपूर्ण कॅंप पाण्याने भिजून गेला, त्यामुळे रात्र लेजवर असलेल्या एका कपारीत काढावी लागली. पुढे आठवडभर वेळी अवेळी पाऊस हजेरी लावून आमच्या सहनशक्तीचा अंत पाहत होता, त्यातच पावसामुळे वरून घरंगळत खाली पडण्याऱ्या दगडांमुळे, अपघात टाळण्यासाठी सारखी कपारीकडे धाव घ्यावी लागत होती.
प्रचि १७
From Kokankada 2006
प्रचि १८
From Kokankada 2006
०४ नोव्हेंबर, २००६ (नववा दिवस):
४ दिवसांमध्ये ११५० फुटी लेजच्या वर खिळ्यांच्या साहाय्याने साधारण ३०० फुट चढाई केली होती. आता खरी परीक्षा सुरु होणार होती कारण १४०-१६० अंशाच्या कोनातला मुख्य ओव्हरहेंग सुरु होत होता ज्यात दोन रुफ (दगडी छत) चा समावेश होता. इथूनच खूप मोहिमा अयशस्वी होऊन माघारी गेल्या आहेत. आज योगेश आणि आशिषने १५ बोल्टच्या साहाय्याने ओव्हरहेंगपर्यंत मजल मारली.
प्रचि १९
From Kokankada 2006
प्रचि २०
From Kokankada 2006
०५ नोव्हेंबर, २००६ (दहावा दिवस):
प्रदीप व दिवाकरने १६० अंशाच्या कोनात बाहेर पडलेल्या ओव्हरहेंगवर बोल्टिंगचा श्रीगणेशा केला. ओव्हरहेंगवर बोल्टिंग करणे सगळ्यात कठीण काम. ओव्हरहेंगवर बोल्टिंग करताना शरीर मागे फेकले जात असल्याने संपूर्ण शरीरावर अतिरिक्त भार पडतो आणि खिळा ठोकण्याचा वेगही मंदावतो.
प्रचि २१
From Kokankada 2006
०६ नोव्हेंबर, २००६ (अकरावा दिवस):
आशिषने एकट्यानेच ओव्हरहेंगवर दिवसभरात ११ बोल्ट ठोकले.
प्रचि २२
From Kokankada 2006
०७ नोव्हेंबर, २००६ (बारावा दिवस):
योगेशने एकट्यानेच ओव्हरहेंगवर दिवसभरात १० बोल्ट ठोकले.
०८ नोव्हेंबर, २००६ (तेरावा दिवस):
आता मार्गात पहिलं दगडी छत लागल. दगडी छत हा ओव्हरहेंगपेक्षाहि भयानक प्रकार. इथे डोक्यावर १८० अंशाच्या कोनात खिळा ठोकावा लागतो. वेदनेमुळे आपल्याला मान आहे हेच आपण विसरून जातो. जवळपास झोपूनच खिळे मारावे लागतात. पण वेदनेने शरीर गलितगात्र होऊन सुद्धा किरणने दिवसभरात छताला लटकून ९ बोल्टच्या सहाय्याने त्या ३५ फुट रुंदी असलेल्या छताचा फडशा पाडला.
प्रचि २३: किरण रूफवर (दगडी छत) हवेत अधांतरी झोपून बोल्टिंग करताना-
From Kokankada 2006
०९ नोव्हेंबर, २००६ (चौदावा दिवस):
प्रदीपने आज एकट्यानेच बोल्टिंग करत तब्बल १२ खिळे ठोकून तो सुद्धा शर्यतीत असल्याच दाखवून दिल.
प्रचि २४
From Kokankada 2006
प्रत्येक जण आता इतका तयार झाला होता कि रोज ११५० फुटी लेज वरून सुमारे ३००-४०० फुट झुमारिंग केल्यानंतर (तेही ओव्हरहेंगमुळे भिंतीपासून दीडेकशे फुट बाहेर हवेत लटकून) इच्छितस्थळी पोहोचल्यावर एकट्यानेच पंचिंग करून १०-१२ खिळे ठोकत होता. ते गरजेचही होत. तिथे वारंवार चढाईपटू बदलून वेळ वाया गेला असता. त्यात झुमारिंगला दीड दोन तास लागत होते. त्यामुळे एकट्यालाच संपूर्ण दिवस निभावून न्यावा लागत होता.
१० नोव्हेंबर, २००६ (पंधरावा दिवस):
आज किरणने चढाईला सुरुवात केली. त्याला मदतनीस म्हणून दिवाकर आणि त्याखाली दूरवर पालीच्या लेजवर प्रकाश होता. दरम्यान एक अजब प्रकार त्यांना अनुभवास आला. ओव्हरहेंगवर शेवटच्या टप्प्यात बोल्टिंग करताना अचानक प्रचंड गडगडाट होऊन धुरळ्याचे लोट जमा झाले. आसपासच काहीच दिसेनास झाल. या प्रकाराने किरण आणि दिवाकर गांगरूनच गेले. धुरळा विरताच, प्रकाश ज्या लेजवर होता त्या ठीकाणी थोड खाली एक मोठा खडक निखळून पडल्याच लक्षात आल. सुदैवाने प्रकाश सहीसलामत होता पण या पडझडीत एक भलामोठा धोंडा नेमका आमच्या अतिरीक्त दोरावर पडला आणि त्याचे दोन तुकडे झाले. झाल्याप्रकारातून सावरत एकंदर नऊ खिळे आणि एक पाचर यांच्या मदतीने किरणने दिवसभरात चढाईचा अर्धा टप्पा म्हणजेच ससाण्याची लेज गाठली. जेमतेम दीड-दोन फुट रुंद असलेल्या लेजवर असंख्य दगड तुटून पडले होते. दगड इकडे तिकडे हलवून किरण आणि दिवाकरने दोन माणसांना झोपता येईल इतकी जागा तयार करून तिथे एक खिळा ठोकून त्याला दोर बांधला आणि परत खाली ११५० फुटी लेजवर परतले. दुसऱ्या दिवसापासून ११५० फुटी लेजला राम राम करायचा होता. खरतर आजच हि लेज सोडणार होतो पण वाइंड अप अर्थात आवराआवर करण्यात वेळ गेला आणि अंधार पडल्याने सगळी काम दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आली.
प्रचि २५
From Kokankada 2006
११ नोव्हेंबर, २००६ (सोळावा दिवस):
आज कॅंप ३ चा अर्थात ११५० फुटी लेजवरचा गाशा गुंडाळून आम्ही माथ्यावर असलेल्या कॅंप १ वर दाखल झालो. तसेच ससाण्याच्या लेजवर असलेल्या दोराचे एक टोक माथ्यावर नेऊन तिथे असलेल्या कारवीच्या झुडुपात ते टोक बांधल. यानंतरची मोहीमेच नियोजन माथ्यावरूनच करणार होतो. दुपारी योगेश आणि आशिष टायरोलीन (व्हॅली क्रॉसिंग) पद्धतीने कारवीत बांधलेल्या दोराच्या साहाय्याने ससाण्याच्या लेजवरील कॅंप ४ वर उतरले. आज वेळ खूपच कमी मिळाल्याने फक्त २० फुट चढाई होऊ शकली. आज त्यांचा मुक्काम या दीड फुट रुंद लेजवरच असल्याने संध्याकाळी दोराच्या साहाय्याने त्यांना जेवण व पाणी पुरवण्यात आले.
प्रचि २६
From Kokankada 2006
प्रचि २७
From Kokankada 2006
१२ नोव्हेंबर, २००६ (सतरावा दिवस):
फक्त दीड फुट रुंद लेजवर अंग अवघडून संपूर्ण रात्र काढावी लागल्याने झोप आलीच नाही. योगेशने सकाळीच चढाईला सुरुवात केली आणि दिवसभरात अथक परिश्रमाने तब्बल १८ खिळे ठोकून नवीन विक्रम केला.
दुसऱ्या दिवशी किरण, दिवाकर आणि प्रदीप कॅंप ४ (ससाण्याची लेज) वर जाणार होते, त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी संध्याकाळी प्रथम आशिषला दोराच्या सहाय्याने वरून बिले देऊन माथ्यावर खेचून घेतलं. पण या सर्व उपद्द्व्यापात रात्रीचे ८ वाजले. त्यामुळे नाईलाजाने योगेशला सलग दुसरा दिवस एकट्यालाच ससाण्याच्या लेजवर मुक्काम करावा लागणार होता. मानसिकता, सुरक्षितता, संपर्क अशा सर्वच दृष्टीने ते चुकीच होत पण नाईलाज होता. मनावर धोंडा ठेऊन ती रात्र आम्ही सर्वांनी अक्षरशः चिंतेत काढली. उजाडताच वॉकीटोकीवरून योगेशशी संपर्क करून तो सुरक्षित असल्याच कळल्यावर जीव भांड्यात पडला.
प्रचि २८
From Kokankada 2006
प्रचि २८
From Kokankada 2006
१३ नोव्हेंबर, २००६ (अठरावा दिवस):
सकाळी योगेश परत माथ्यावरच्या कॅंप १ वर येताच, प्रदीप, दिवाकर आणि किरण ससाण्याच्या लेज वर (कॅंप ४) पोहोचले. प्रदीपने चढाई सुरु केली, किरण सेकंड मेन आणि दिवाकर लेजवर. दुपारी दोनच्या सुमारास योगेशचा संदेश मिळाला 'आग्यामाशांच भलमोठ मोहोळ खालच्या (दरीच्या) बाजूला गेल आहे, तुम्हाला दिसलं का?' त्यांना काहीच कल्पना नव्हती. साडेतीनच्या सुमारास किरण दिवाकरशी बोलत असताना खाली दरीत काळ्याकभिन्न आग्यामाशांच भलमोठ मोहोळ त्यांच्याच दिशेने येत होत. किरणने, दिवाकर आणि प्रदीपला लागलीच सावध केल आणि कोणतीही हालचाल न करण्याची सूचना केली. माशा डसल्या तर त्यांच्या बचावासाठी कोणतच साधन नव्हत. डोळे मिटून, शिडीवर लटकत त्याची प्रतीक्षा करत असतानाच ते भलमोठ मोहोळ चक्क त्यांच्या शरीरावरून जाताना जाणवत होत. त्या माशांचे स्पर्श शहारून टाकणारे होते. क्षणार्धात ते मोहोळ, काळे काळे ठिपके वर वर जात नाहीसे झाले. त्यांची जवळपास बंद पडलेली हृदय परत धडधडायला लागली. एव्हढा बाका प्रसंग घडून सुद्धा प्रदीपने जबरदस्तपणे १६ खिळे ठोकलेच.
परत संध्याकाळी वर येताना एक अपघात होता होता वाचला. नेहमीप्रमाणे प्रदीपने संध्याकाळी चढाई थांबवली आणि माथ्यावर कॅंप नं. १ वर जाण्यास तयार झाला. माथ्यावरून जो दोर खाली सोडण्यात आला होता तो चढाईच्या रेषेत नव्हता. त्याचा मध्य चढाईपटूच्या डाव्या हाताला १०० फुट दूरवर होता. त्यामुळे चढाईपटूला त्या दोराच्या रेषेत येण्यासाठी एकतर स्विंग घ्यावा लागला असता, अथवा कोणीतरी त्याचा स्विंग नियंत्रीत करण जरुरी होत. सेकंड मेंन नियंत्रकाच काम करायचा. पण दुर्दैवाने किरणच्या हातून त्या दोराचे नियंत्रण सुटल्यामुळे प्रदीपला १०० फुटांचा जोरदार स्विंग आला आणि प्रदीप हवेत हेलखावे खाऊ लागला. त्या दोरावर परत नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात किरणचा हातसुद्धा चांगलाच भाजून निघाला. सुदैवाने कोणताही अपघात न होता प्रदीप सुखरूपपणे कॅंपवर पोहोचला.
१४ नोव्हेंबर, २००६ (एकोणिसावा दिवस):
चढाई पूर्णपणे आटोक्यात आली होती. आता शेवटच एक दगडी छत उरल होत. प्रस्तरारोहणातील सर्वात कठीण प्रकार. योगेश आणि आशिषने कामगिरी फत्ते करण्याचा विडा उचलला. ईथेच गिरीविराज हायकर्सच्या नावाची एक स्मरणिका ठोकण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत योगेशने १५ खिळे ठोकून त्या छताचा निकाल लावला. त्याला आता माथा एकदम आवाक्यात आला होता. आता आणखी थोडासा जोर लावून योगेश माथ्यावर पोहोचू शकत होता. जीवनात एकदाच मिळणारी संधी. कोकणकड्यावर पाय ठेवून इतिहासात आपलं नाव अजरामर करू शकत होता.
प्रचि २९ : रूफवर (दगडी छत) हवेत अधांतरी बोल्टिंग करताना योगेश -
From Kokankada 2006
प्रचि ३०
From Kokankada 2006
पण गिरीविराजच्या सर्व तरुण मंडळीने हा मान सह्याद्रीचा शिलेदार किरण अडफडकरांना द्यायचा हे आधीच निश्चित केले होते. म्हणून योगेशने चढाई थांबवून पुढची सूत्रे किरणच्या हाती दिली. किरणने सलग चार खिळे ठोकून शेवटची शिडी सोडली, ३५ फुटांची मुक्त चढाई करत मातीची ढेकळ आणि गवत यातून सावधपणे हालचाली करत संध्याकाळी सव्वा सहा वाजता कोकणकड्याच्या माथ्यावर पाऊल ठेवलं. आयुष्यभराच स्वप्न साकार झाल होत. कोकणकड्याच्या सर्वात अवघड आणि अभेद्य मार्गावर १७० expansion bolt च्या सहाय्याने गिरीविराज हायकर्सच नाव कोरल गेल होत.
प्रचि ३१
From Kokankada 2006
अवांतर:
एव्हढी मोठी मोहीम यशस्वी करण्यासाठी तेव्हढीच मजबूत बेसकॅंप टीम हवी. संस्थेचे संस्थापक सदस्य सुभाष पांडीयन, कै. संजय रेडकर आणि संदीप रहाटवळ यांनी इतरांच्या मदतीने ते आव्हान लीलया पार केले. अथक शारीरिक त्रासामुळे मोहीम अर्धवट राहण्याचीच चिन्हे दिसत होती, अशा वेळेस संजय नेहमीच धाऊन आला आणि चढाईपटूना मानसिक बळ देण्याच काम सुद्धा समर्थपणे पेललं. प्रवीण घुडे, अमृता राजे, योगेश आंब्रे, जेम्स, राजेश, हर्षद यांचेही बहुमोलाचे सहकार्य लाभले.
दुखः एकाच गोष्टीच आहे कि प्रायोजक मिळून सुद्धा या मोहिमेचे योग्य प्रकारे चलतचित्रण करू शकलो नाही. तत्कालीन उपलब्ध व्हिडीओ कॅमेऱ्याने (कॅसेटवाला) याचे चलतचित्रण केले आहे, पण दुर्दैव असे कि ज्याला हे काम सोपवले होते त्याने पहिल्या दिवशी हजेरी लावल्यानंतर तो जो घरी गेला तो थेट मोहिमेच्या शेवटच्या दिवशी परत हजर झाला त्यामुळे चलतचित्रणाची जबाबदारी सर्व नवशिक्यानीच पार पाडली.
या मोहिमेचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे खूपस साहित्य स्वतःच तयार करण्यात आले होते, अगदी बोल्ट आणि कॅराबिनर्ससुद्धा.
From Kokankada 2006
आपला नम्र
गिरीविराज हायकर्स - डोंबिवली
अफाट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अफाट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
आणि अचाट !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
फोटो पाहूनच छाती दडपली!
फोटो पाहूनच छाती दडपली! निवांत वाचते सविस्तर आता.
फारच
फारच अफाट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!१
एक्दम सह्ही!!!!!!!!!!!!१
अफलातुन आणि प्रेरक सुद्धा
अफलातुन आणि प्रेरक सुद्धा
खूपच छान आणि चित्त थरारक …
खूपच छान आणि चित्त थरारक …
जबरदस्त , तुमच्याकडे चिपकली
जबरदस्त , तुमच्याकडे चिपकली चे पाय वगैरे आहेत कि काय ? काय भन्नाट वेड आहे हे, अभिनंदन
तुम्हा सर्वांना शिरसाष्टांग
तुम्हा सर्वांना शिरसाष्टांग दंडवत ........
शब्द नाहीयेत माझ्याकडे तुमचं कौतुक करायला ....
_____________/\______________
_____________/\__________________
वाचून आणि प्रचि पाहुनच धडकी भरली.
शब्द नाहीयेत माझ्याकडे तुमचं कौतुक करायला .... >>> +१११११११११११११११११
थरारक!
थरारक!
अरे बापरे ........अचाट आणि
अरे बापरे ........अचाट आणि अफाट धैर्यशक्ती.
सह्याद्री सुध्दा तुमच्या या वेडेपणावर फिदा झाली असेल.
मस्तच..!
जबरदस्त... भाऊ आणि वहिनी
जबरदस्त... भाऊ आणि वहिनी अनेकवेळा जाऊन आले आहेत.. मला मात्र अजूनही संधी मिळालेली नाही. असे फोटो बघून जावेसे मात्र वाटत राहते.
फोटो पाहूनच धडकी भरली. तुम्हा
फोटो पाहूनच धडकी भरली. तुम्हा सर्वांना _____________/\__________________
अशक्य तुफान भार्री आहे हे!
अशक्य तुफान भार्री आहे हे!
अनेकानेक धन्यवाद इथे टाकल्या बद्दल
बापरे!!! काही काही फोटो बघूनच
बापरे!!! काही काही फोटो बघूनच चक्कर येत आहे....
गिरीविराज हायकर्स , तुम्हा
गिरीविराज हायकर्स , तुम्हा सर्वांनाच माझा मानाचा मुजरा.............
बापरे!!! काही काही फोटो बघूनच
बापरे!!! काही काही फोटो बघूनच चक्कर येत आहे...>>++११
दंडवत ....--------------------^--------------------------
जबरदस्त प्रकार आहे.
जबरदस्त प्रकार आहे.
फोटो बघून सुद्धा काळजाचा ठोका
फोटो बघून सुद्धा काळजाचा ठोका चुकला. पण आवडलं. ग्रेट आहात.
जिगरबाज!!! आशिष आणि मी एकत्र
जिगरबाज!!!
आशिष आणि मी एकत्र ट्रेकिंगला सुरुवात केली. भेटच पाहिल्या ट्रेकमध्ये झाली आणि मग अनेकवर्ष एकत्र भटकंती केली. आशिषसोबत मी देखील गिरीभ्रमंतीच्या सोबतीने गिर्यारोहणात हात घातला पण नंतर मात्र त्यात काही फार केले नाही.
शेवटच्या फोटोत डाव्याबाजूने दुसरा राजेश म्हाडदळकर आहे का?
सूनटून्या, कोक म्हणजे भयंकर
सूनटून्या,
कोक म्हणजे भयंकर प्रकार आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी एका संस्थेने आयोजित केलेल्या शिबिरात कोकवरून उतरलो (टायरोलीन(?) + रॅपलिंग + रॅपलिंग) होतो. पहिल्या टप्प्यात उतरत असतांना मोठ्ठ्या विहिरीत उतरतोय असं वाटंत होतं. जसजसा खाली जात होतो तसतसा विहिरीचा घेर वाढतच होता. म्हणजे भरपूर उपरांग (ओव्हरहँग) दिसत होतं. या मार्गाने कुणी चढाई करू शकेल असं आजिबात वाटलं नाही. हे दुस्तर कार्य आहे.
किरण यांचा हात भाजला हे वाचून नवल वाटलं. हातमोजे बहुधा घातले नसावेत. किंवा काही कारणाने काढले असावेत. हात दोरावर घासून भाजणं काय असतं ते उपरिनिर्दिष्ट शिबिरात अनुभवलं आहे. एक जण रॅपलिंग करतांना अनियंत्रितपणे झरकन खाली आला. मी बिलेवाला होतो. त्याला सावरतांना माझा हातही छानपैकी भाजला. शिवाय तो जमिनीवर आदळू नये म्हणून त्याच्या खाली चक्क झोपलो. त्या गडबडीत तळव्यावर मोठी खोक पडली. आजही खूण दिसते. बेसावध राहिल्याची शिक्षाच मिळाली जणू! साध्या शिबिरात एव्हढी काळजी घ्यावी लागते, तर तुमच्यासारख्या मोहिमांत किती दक्ष राहावं लागत असेल याची कल्पनाही करता येत नाही!
लेखाबद्दल धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.
अप्रतिम !!!! कोकणकडा हे
अप्रतिम !!!!
कोकणकडा हे सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान आणि ते यशस्वीपणे पेलणं हे भल्याभल्यांना शक्यं झालेलं नाही. गिरीविराजच्या टीमचे मनःपूर्वक आभार.
वर गामा पैलवाननी म्हटल्याप्रमाणे कोकणकडा रॅपलिंग हाच मुळात एक अफाट अनुभव असतो. चढाई तर निव्वळ खतरनाक !!
बाऽऽऽपरे!!! हे लोक शूर आहेत
बाऽऽऽपरे!!!
हे लोक शूर आहेत आणि वेडे आहेत म्हणूनच असं काही अचाट करु शकतात.
हे लोक गेले अनेक जन्म घोरपड असणार आणि खूप प्रॅक्टिस केली असणार
_/\_
सतिश, अत्यंत सुंदर लेख.
सतिश, अत्यंत सुंदर लेख. कोकणकडा म्हणजे वेड आहे वेड! नुसता बघितला तरी आठवडाभर स्वप्नात येत रहातो. तुम्हांला आयुष्यभर पुरेल.. !
इथे शेअर केल्याबद्दल तुझे आभार!
साष्टांग दंडवत.... बाकी काही
साष्टांग दंडवत....
बाकी काही शब्दच नाहीत
ज ब रा !!!! साष्टांग दंडवत
ज ब रा !!!! साष्टांग दंडवत !!! इच्छाशक्तीला प्रणाम !! इतक्या कष्टाळू पण अप्रतिम चढाईचे वर्णन सुंदररित्या शब्दांकीत केल्याबद्दल खूप आभार्स !!! एकेक फोटो थेट काळजात घुसलाय !!! तुमच्या टिमवर्क चे कितीही कौतुक केले तरी कमीच..
ज ह ब ह रा!!! निव्वळ म्हणजे
ज ह ब ह रा!!!
निव्वळ म्हणजे निव्वळ थरारक आहे सगळे फोटो आणि वर्णनही. तुम्हाला साष्टांग दंडवत भौ.
स्पीचलेस.. बोलतीबंद!!!
स्पीचलेस.. बोलतीबंद!!!
डोंबिवलीच्या तरूणांनी
डोंबिवलीच्या तरूणांनी कोकणकड्यास अभिनव मार्गाने गवसणी घातल्याची सुरस कहाणी वाचून अभिमानाने माथा उन्नत झाला. ह्याकरता सर्व सहभागी व्यक्ती आणि गिरिविराज हायकर्स ह्या संस्थेचे हार्दिक अभिनंदन तसेच त्यांना त्यांच्या सर्व भावी उपक्रमांकरता हार्दिक शुभेच्छा!
ही कहाणी केवळ देदिप्यमान, चित्तथरारक आणि संस्मरणीयच नाही तर गिर्यारोहण कौशल्याचा आणि संघशक्ती नियोजनाचा अपूर्व अध्याय लिहिणारी कथा आहे. जागतिक गिर्यारोहण विषयक साहित्यात ही मानाचे स्थान मिळवू शकेल. ह्या कहाणीची गाथा तंत्रशुद्ध, शास्त्रीय पद्धतीने प्रकाशचित्ररूप पुराव्यांची सज्जड जोड देऊन लिहीली असता, अनमोल पुस्तकात रूपांतरित होऊ शकेल. हे पुस्तक इंग्रजी भाषेतही लिहीले जावे. म्हणजे ते जागतिक गिर्यारोहण साहित्यातील मेरुमणी बनून राहील.
अशी परिस्थिती असतांना २००६ ते २०१४ एवढा दीर्घ काळ ही गोष्ट प्रायः अप्रकाशित कशी राहिली ह्याचे आश्चर्यच वाटते.
असो. ही चढाई, तिची कहाणी आणि तिच्यातील अपूर्व साहस, संघटन आणि कौशल्य; हे सर्वच आवडले. धन्य तो कोकणकडा! धन्य त्यावर छताच्या तळातून शिखरावर चढाई करणारी गिर्यारोहक चमू!! आणि धन्य त्या माहितीस प्रकाश देणारी आपली मायबोली!!!
ह्या कहाणीची गाथा तंत्रशुद्ध,
ह्या कहाणीची गाथा तंत्रशुद्ध, शास्त्रीय पद्धतीने प्रकाशचित्ररूप पुराव्यांची सज्जड जोड देऊन लिहीली असता, अनमोल पुस्तकात रूपांतरित होऊ शकेल. हे पुस्तक इंग्रजी भाषेतही लिहीले जावे. म्हणजे ते जागतिक गिर्यारोहण साहित्यातील मेरुमणी बनून राहील.
>>> अत्यंत महत्वाचा मुद्दा. हे खरतर खूप महत्वाचे आहे. आपल्याकडे साहित्यात ह्या आणि अश्या प्रकारच्या लेखन प्रकाराकडे पुर्णपणे दुर्लक्ष्य झालेले आहे.
शब्दच नाहीत ....
शब्दच नाहीत .... ______/\______
Pages