निसर्गकन्या : लावणी

Submitted by अभय आर्वीकर on 22 July, 2014 - 12:43

निसर्गकन्या : लावणी

चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली

आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥

हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस

निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली .... ॥१॥

श्रावणाची सर, चाळविते उर, हवा खट्याळ पदराला नेते दूर
वाजले कंगण की कोकिळेची कुहु, पैंजणाच्या सवेला मैनेचा सूर
चिमणी-पाखरू, हरिण-कोकरू, फेर धरी भोवताली .... ॥२॥

आसक्त नजर तीक्ष्ण ती, ‘अभय’ बोलकी, अधर अनिवार
खुणवती पापणी प्रिया, पाश द्यावया, बाहु अलवार
शोधीत भिरभीर, बघुनी दूरवर, मनीच पुलकित झाली .... ॥३॥

                                                       - गंगाधर मुटे ‘अभय’
------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@rmd,

'अप्सरा आली' ही माझी अत्यंत आवडती लावणी आहे. गीत आणि संगीत या दोन्ही कसोट्यावर ही अत्यूच्य दर्जाची लावणी आहे.

पण या रचनेवर त्या लावणीचा प्रभाव नसेल, असे वाटत आहे.
या संबंधात वाचकच अधिक प्रभाव टाकू शकतील.

वाह, तुमच्यासोबत वाचकालाही तरून झाल्यासारखे वाटतेय ही लावणी वाचून..
(प्रोफेसरसाहेब नटरंग - २ बनवताहेत.. त्यांना दाखवायला विसरू नका) .