मेढींतुन नाद किड्यांचा कानावर हलका येतो
दारावर वारा कातर का गीत उदासिन गातो
मातीत बुजवली स्वप्ने केलीत उशाशी गोळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा
गवताच्या पाचोळ्याचे हे छप्पर हसते आहे
पेटली कधीची नाही ती चूल धुमसते आहे
मी पेज पिठाची देते तू नको करु कंटाळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा
झोपडि ही माळावरची रात्रीत उगा थरथरते
तुटलेली जुनाट खिडकी लावली तरी करकरते
अंधार भयानक पडता टिटवीला सुचतो चाळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा
बरडावर असेल नक्की जित्राब कुणाचे मेले
चवताळून पिसाट कुत्रे परसातुन भुंकत गेले
घाबरु नको थोडाही तू झाक अता रे डोळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा
बावडी कोरडी झाली छातीतिल पाझर सुकला
पडतात भुकेची स्वप्ने बोचरा घसाही थकला
पाऊस बरसता यंदा शिकवीन तुला मी शाळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
जळजळीत वास्तव, चित्रदर्शी
जळजळीत वास्तव, चित्रदर्शी काव्य .... (रचना जमलीये अगदी पण सुंदर म्हणवत नाहीये ...)
जित्राब, बावडी वगैरे ग्रामीण शब्दांचा सुंदर वापर.
आह ! किती
आह ! किती हृदयस्पर्शी...
सुंदर म्हणवत नाहीये खरच.
धन्यवाद प्रिंसेस
धन्यवाद प्रिंसेस ....शशांकजी.....!!!