नारळाचं झाड जरासं नाठाळ असतं. ते सुरुवातीला अगदी हळूहळू वाढतं.. बहुतेकदा तर मालकाचा अगदी अंत पाहतं. वाटतं हे झाड काही उपयोगाचं नाही. पण मग, एकदा ही सुरुवातीची वर्षं सरली की फणा काढलेल्या नागासारखं डौलात उभं राहातं... उंचच उंच ! मग त्याच्या नाठाळपणाचा अनुभव हवेला येतो. कितीही जोरदार वारं वाहिलं तरी काहीही फरक पडत नाही. बरं कित्येक फूट वाढलं, तरी झाडाचा बहुतेक भाग खोडच! नारळ काढायचे म्हणजे झाडावर चढण्या-उतरण्याची कसरत!
असाच काहीसा नाठाळपणा माणसातही असतो. आयुष्याचे बारकावे उमगण्यात किती तरी वर्षं निघून जातात, पण जेव्हा ते उमगतात तेव्हा माणूस हाताला लागत नाही. तो नारळासारखा उंच होतो. वादळवार्यांना बधत नाही आणि त्याच्याकडून फायदा करून घेण्यासाठी जाम मेहनत करावी लागते !
काही माणसं तर इतकी नारळ बनतात की ती असतातही बाहेरून रुक्ष, कोरडी, कडक आणि आतून शीतल, निर्मळ..!!
असाच एक नारळ म्हणजे 'नारोबा'. कोकणातल्या कुठल्याश्या लहानग्या गावात राहणारा एक म्हातारा. ह्या नारबाची एक अत्यंत सुंदर वाडी असते, वडिलोपार्जित. ह्या बागेवर, इथल्या झाडांवर नारबा पोटच्या पोरांप्रमाणे माया करत असतो, त्यांची निगा राखत असतो. प्रामाणिक माया केली तर झाडंसुद्धा आपल्या रंध्रा-रंध्रांतून ममता पाझरतात. नारबाची वाडीसुद्धा अशीच झाडा-झाडातून ममता पाझरणारी शांत स्वर्गभूमी! नारबाची बायको, मुलं कुणीच नसतात. फक्त एक नातू असतो - पंढरी. छोट्या नातवासह सुखात नांदणार्या नारबाच्या ह्या सुंदर वाडीवर गावच्या खोताची - रंगराव खोताची - वक्रदृष्टी पडते आणि सुरू होते एक वेगळेच गंमतशीर नाट्य! ते काय, कसं हे कळण्यासाठी एकदा 'नारबाच्या वाडी'ला भेट देऊन यायलाच हवं !
दिलीप प्रभावळकरांचा 'नारोबा' निव्वळ भन्नाट झाला आहे. व्यक्तिरेखेच्या आवश्यकतेनुसार त्यांनी आपल्या अंगकाठीचा अप्रतिम वापर करून घेतला आहे. डोळे बारीक करून बोलण्याची लकब खूपच खास ! आणि कोकणी हेल काढून बोलणेही एकदम अस्सल झाले आहे. त्यांच्या चतुरस्र प्रतिभेचं दर्शन पहिल्यांदा झालेलं नाहीच, त्यामुळे खरं तर चित्रपट सुरु होण्याआधीच आपल्याला माहित असतं की ते आपली छाप सोडणारच आहेत.
मनोज जोशींनी रंगराव व त्याचा मुलगा मल्हारराव अशी दुहेरी भूमिका अफलातून साकारली आहे. लंपट बेवडा रंगराव आणि कंजूष धूर्त मल्हारराव फार सहज उतरले आहेत. काही दृष्यांत तर त्यांचा खलपुरुषसुद्धा काळजाला हात घालतो.
दिलीप प्रभावळकर आणि मनोज जोशी - ह्या 'कास्टिंग'मध्येच चित्रपट अर्धी बाजी जिंकतो, असं मला वाटतं. ह्या भूमिकांसाठी हे दोन नट इतके अचूक हेरले आहेत की ह्या भूमिका त्यांच्याचसाठी जन्माला आल्या असाव्यात.
निखिल रत्नपारखी, किशोरी शहाणे, विकास कदम, अतुल परचुरे आपापलं काम चोख करतात.
कोकण, तिथे राहणारा एक बेरकी म्हातारा, त्याची नारळी-पोफळीची बाग ह्या सगळ्यावरून अपरिहार्यपणे पु.लं. चा अंतू बर्वा आठवतोच आणि मनातल्या मनात जराशी तुलनाही होते. मग वाटतं की, 'रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण होय रे झंप्या?' असं म्हणणार्या अंतूचा तिरकस, खडूसपणा नारोबात अगदी जसाच्या तसा नसता तरी थोडाफार गुंफता आला असता का ? असंही जाणवतं की बागेतलं एखादं झाड कसं इतर सगळ्या झाडांच्या वर डोकं काढून असतं, तसं गावातली इतर पिकली पानं हळूहळू गळत जात असल्याने नारबाचा एकटेपणा कसा वाढत चालला आहे, हे 'अंतू बर्व्या'च्या व्यथेप्रमाणेही दाखवता आलं असतं का? त्याऐवजी इतर काही दृष्यं गाळताही आली असती का ? पण अश्या जर-तरच्या समीकरणांना काही अंत नसतो. सर्वोत्कृष्टतासुद्धा अजून उत्कृष्ट करता येऊ शकते, कदाचित 'सर्वोत्कृष्ट' हे फक्त आभासी अस्तित्व असावं.
मनोज मित्रा ह्यांच्या बंगाली 'शाज्जानो बागान' ह्या नाटकावर आधारित हा चित्रपट मराठीत करताना ही कहाणी कोकणात घडवणं खूप परिणामकारक ठरलं आहे. नारबाच्या मुखी अधूनमधून येणारे 'नारो म्हणे' अभंग चित्रपटाला एक काव्यात्मक सौंदर्य व उंची देणार्या विविध सौंदर्यस्थानांत नक्कीच सगळ्यात महत्वाचे आहेत. गुरु ठाकूर ह्यांची पटकथा, संवाद एकदम 'फिट्ट' झाले आहेत !
दोनच गाणी आहेत आणि दोन्ही श्रवणीय आहेत. 'ही गजाल खरी काय?' तर बेफाट गाणं आहे..!!
वैचारिक उंची गाठण्यासाठी चित्रपट गंभीरच असायला हवा, असं नाही. हलका-फुलका चित्रपटही 'सेन्सिबल' असू शकतो. हे 'ना.वा.' दाखवून देतो. बासू चटर्जींची निर्मिती आहे, हे मला चित्रपट नामावली पाहताना कळलं आणि तिथेच चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या होत्या, ज्या माझ्या तरी पूर्ण झाल्या.
'पिच्चर फर्मास आसां', ही गजाल खरी काय?
'होय महाराजा !!'
रेटिंग - * * * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/09/narbachi-wadi-marathi-movie-revie...
मस्त, कालच पहायचा होता पण
मस्त, कालच पहायचा होता पण जमलं नाही, शनिवारी नक्की पाहणार.
बघायलाच हवा
बघायलाच हवा
पहिल्यांदा आपलं मत जुळल....
पहिल्यांदा आपलं मत जुळल.... खरच छान आहे ...
'होय महाराजा !!'
बघणारच
बघणारच
अरे वा! छान लिहिलंय परिक्षण.
अरे वा! छान लिहिलंय परिक्षण. बघायचं आहे मनात.
नक्की बघणार, छान आहे परिक्षण.
नक्की बघणार, छान आहे परिक्षण.
मस्तच. बघायला हवा.
मस्तच. बघायला हवा.
वेगळा विषय. नक्की बघणार.
वेगळा विषय. नक्की बघणार.
वा , नारळाच्या झाडाशी केलेली
वा , नारळाच्या झाडाशी केलेली तुलना आवड्लीच एकदम ....
अगदी लोभसवाणा आहे सिनेमा . नक्की बघावा सगळ्यांनी
मी पाहिला आज. ठीक वाटला.
मी पाहिला आज. ठीक वाटला. वेगळा काहीतरी म्हणून पाहाय्ला हरकत नाही.
प्रभावळ्कर सोडून कोणाची भाषा कोकणी वाटली नाही.
आत्त्ताच बघितला .आणि घरी येउन
आत्त्ताच बघितला .आणि घरी येउन लगेच परीक्षण वाचल. रसप खूप सुंदर परीक्षण लिहिलंय खर तर "लंच बॉक्स " ला जाणार होते. अश्विनी मामीच परीक्षण वाचून. पण मैत्रिणीने आधीच बघितला होता आणि अजिबात बघू नकोस . खूप कंटाळा येतो. कधी सिनेमा संपतो अस होत . अस सांगितल्यामुळे. विचार बदलला आणि " नारबाची वाडी " बघितला. आणि आणि आणि सिनेमा प्रचंड आवडला. उत्कृष्ट . माझ्या जवळ दुसरे शब्दच नाहीत. खळखळून हसून आले. सगळ्याच दृष्टीने सिनेमा द बेस्ट. सगळ्यांनी बघायलाच पाहिजे असा
मस्तंय हा सिनेमा. शनिवारी
मस्तंय हा सिनेमा. शनिवारी पाहिला. संवाद एक नंबर आहेत!
दिलीप प्रभावळकर रॉक्स !!!
मध्यंतरापूर्वीचा सिनेमा जरा संथ आहे.
थोरला मनोज जोशी आवाजाच्या घेतलेल्या लकबीपायी जरा बोअर करणार असं वाटलं होतं मला, पण ती वेळ आली नाही.
पात्रांचा बोलण्याचा सूर शहरीच ठेवला होता, जे जरा खटकलं. अस्सल कोकणी बोली आणि सूर अजून जरा वापरले गेले असते तर अधिक मजा आली असती.
मस्त लिहिलं आहे! बघायचा आहे
मस्त लिहिलं आहे! बघायचा आहे हा सिनेमा
मस्त आहे सिनेमा. मजा आली.
मस्त आहे सिनेमा. मजा आली.
लले थोरल्या बद्दल अगदी १०० मोदक.
लली +१ खास करून दिलिप
लली +१
खास करून दिलिप प्रभावळकरांना जर अस्सल कोकणी संवाद दिले असते तर जास्ती बरं झालं असतं. भूमिका १००% वठली असती. खरंतर सिनेमात २ मनोज जोशी आणि एक दिलिप प्रभावळकर सोडल्यास इतर कोणतीही पात्रं नसती तरिही चाललं असतं... इतका या दोघांनी तो सिनेमा खाऊन टाकलाय. अॅक्चूली दिलिप प्रभावळकरांनीच जास्ती.
... आणि अतुल परचुरेला, माझ्या
... आणि अतुल परचुरेला, माझ्या मते, वाया घालवलंय. (हे मगाशी लिहायचं राहिलं.)
असुदे पण वाया आहे ते बरय.
असुदे पण वाया आहे ते बरय. उगाच घुसडल्यासारखे वाटले असते मग ते.
एकुणच मस्त आहे पण चित्रपट.
मस्त , नक्कीच बघायचा आहे
मस्त , नक्कीच बघायचा आहे
मस्तंय हा पिच्चर! मला स्वतः
मस्तंय हा पिच्चर!
मला स्वतः ला जसा आहे तसाच आवडला. अस्सल कोकणी संवाद असते तर म्या पामराला ते नसतेच कळाले...
चित्रपट कुणी मित्राने
चित्रपट कुणी मित्राने सांगितला म्हणून मुद्दाम पाहिला... अख्खा चित्रपट 'गणला' आहे.. दिग्दर्शक बहुतेक झोपला असावा, किंवा त्याला आदल्या रात्री जास्त झाली असावी.. (पु. ल.)
१. कथा बंगाली आहे ती तिकडून उपटुन कोकणात खुपसली आहे.
२. कोकणात सावकार व त्यानी ठेवलेले मल्ल हा प्रकार नाही.. शेतकरी मळक्या पंचेवाला तर सावकार (बामण) हा त्यापेक्षा जरा बर्या पंच्यातला. इथे मनोज जोशी कोकणच्या उन्हात शेरवानी श्टाईल कोट घालून हिंडताना दाखवलाय.
३. रामोशी/ दरवडेखोर कोकणात नाहीत (अजूनही ) आणि स्वातंत्र्यपूर्व काळात नव्हते.
४. शेतकर्यापासून त्याच्याकडे जेवण करण्यासाठी असलेल्या बाई स्वातंत्र्यपूर्व काळात शुध्द मराठी बोलतात.
५. 'मालकानू' हा एक शब्द वापरला की मराठीचे 'मालवणी' झाले असे लेखक / दिग्दर्शक समजत असावेत. खरं तर तो शब्द सुध्दा चुकलेला आहे. ('धनियानू')
६. दशावतारी विनोद म्हणुन कोंबले असले तरी त्यांच्या पूर्ण चित्रपटाशी काहीही संबंध नाही. आणि तेही २ वाक्य मालवणी बोललेत त्यात व्याकरणाच्या चुका आहेत.
७. नातू बंगालात वाढला असावा इतका अ-कोकणी आहे. आणि त्याची बायको एकदम ब्राम्हणी.. स्वातंत्र्यपूर्व काळात असले चालत नसे..
एकंदरीत 'एक न-नाट्य' (पु. ल.) मधले ननू-ननी आठवले. आणि 'चिराबाजारात बर्फ पडला' आणि 'डुकराच्या मासाची भजी' हे पु. ल. का लिहून गेलेत याची पुन्हा जाणीव झाली. मला विचाराल तर 'पाच पैकी दिड मार्क' तेही दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय. मला का विचाराल म्हणा (पुन्हा पु. ल.)?
चित्रपट बघताना मलाही हेच
चित्रपट बघताना मलाही हेच वाटले. दि. प्र. चा टोन मालवणी आहे पण मला वाटते "खोत" हे रत्नागिरी साईडला असतात. तळकोकणात गावकर वगैरे आहेत.
गोगा, आता काही हा पिक्चर
"खोत" तळ कोकणातही आहेत.. पण
"खोत" तळ कोकणातही आहेत.. पण खोत मंडळी गावाचे पुढारीही काही गावात असावेत, असे 'सारे प्रवासी घडीचे (बेबलो खोत) ' वाचून वाटते.
कोकणी / मालवणी काहीतरी आहे म्हणुन बघायचा असेल तर नका बघू. बंगाली गोष्ट मराठीत सांगताहेत असं वाटत असेल तर बघून टाका .. हाकानाका
सिनेमा बरो आसा.. पन गो गा
सिनेमा बरो आसा.. पन गो गा च्या म्हनन्या प्रमाने बर्योच गोस्टी खटाकतत.. त्या पेक्षा आमच्या दशावतरातली चार पार्टी नेवुन काम करुक लावल्यानी असता तर बारच उडवुन दिल्यानी अस्तो...
हा चित्रपट आमीर खानच्या "इसी
हा चित्रपट आमीर खानच्या "इसी का नाम झिंदगी" की काय त्या सिनेमाची स्टोरी आहे का? ज्यात आमीरचा आजोबा प्राण आहे, आणि हिरोईनी म्हणून ती ओवर अॅक्टींग क्वीन फराह आहे..
मला ट्रेलर बघून तसे वाटले, तो जाम बोअर चित्रपट होता म्हणून मग हा बघणे झाले नाही.
पण याची माऊथ पब्लिसिटी बघून हा बघायच्या लिस्टमध्ये आहे, बघू कसे जमतेय.
बरोबर........... मी देखील याच
बरोबर........... मी देखील याच चित्रपटाचे नाव शोधत होतो.....
यात कादरखान आणि शक्तीकपुर असतात ..
कोकणी / मालवणी काहीतरी आहे
कोकणी / मालवणी काहीतरी आहे म्हणुन बघायचा असेल तर नका बघू. बंगाली गोष्ट मराठीत सांगताहेत असं वाटत असेल तर बघून टाका . >>>
हे बरोबर!
देसाईंनी दाखवलेल्या
देसाईंनी दाखवलेल्या तपशीलाच्या चुका , ते स्थानिक आणि ऑथेंटिक असल्याने बरोबर असतीलही पण त्यामुळे चित्रपटाच्या रसास्वादात अडथळो येत नाय. मला तर फारच आवडला बोवा. कदाचित तो माबुदोस असू शकेल.
विशेष्तः यातील सगळ्यांचा अभिनय एन्जॉय करणे ही फारच आनन्ददायक बाब आहे., विशेश्तः मनोज जोशी....